निःसंकोच स्वयंसेवक - देवेंद्र फडणवीस

विवेक मराठी    05-Dec-2024   
Total Views |
 
devendra fadnavis
 
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा निवड झाल्यामुळे एका सच्च्या आणि निःसंकोच स्वयंसेवकाचा सन्मान झाला आहे. देशाच्या मूळ आत्म्याशी निष्ठा बाळगणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकारणात ’गावकुसाबाहेर’ ठेवण्याचा एक काळ होता. तिथपासून ते संपूर्ण राजकीय विचारविश्वाच्या केंद्रस्थानी संघाला आणण्याचे काम स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेक नेते व कार्यकर्त्यांनी केले. त्याच कार्याचा वारसा चालविणारा नेता पुन्हा ’परत आलाय’.
 
आपले वडील स्वर्गीय गंगाधरपंत यांच्यापासूनच देवेंद्र फडणवीस यांना संघाचा वारसा मिळालेला. राजकारणात आल्यानंतर फडणवीस यांनी हा वारसा पुढे तर चालवलाच; पण राजकीय किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही त्याचा गाजावाजा केला नाही किंवा तो नाकारलाही नाही. पंतप्रधान मोदी यांचा उदय झाल्यापासून डोक्यावर काळी टोपी घालून आपण संघ स्वयंसेवक असल्याचे भासविणार्‍यांची एक फळी उदयाला आली आहे. फडणवीस त्यापासून शेकडो कोस दूर आहेत. एकीकडे जातीमुळे आलेली मर्यादा, तर दुसरीकडे संघ स्वयंसेवक म्हणून रोखल्या जाणार्‍या नजरा यांचा सामना करतानाही फडणवीस यांनी आपल्या ’गणवेशा’शी प्रतारणा केली नाही. आपण संघाचे स्वयंसेवक आहोत, हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले; पण कधी मिरविले नाही.
 
पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर संघाच्या अनेक कार्यक्रमांना फडणवीस उपस्थिती लावू लागले. विजयादशमी उत्सवात नागपूरला संपूर्ण गणवेशात फडणवीस आणि नितीन गडकरी यांची छायाचित्रे प्रसिद्ध होऊ लागली. पारंपरिक आणि नव्या माध्यमांना ती चर्चेला चघळण्यासाठी कायम कामाला आली. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या वर्षातच गोवंश हत्याबंदी कायदा करून आपली वैचारिक मुळे कुठे आहेत, हे फडणवीस यांनी दाखवून दिले.
 
पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल? त्याची संकल्पना काय? अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा? 

https://www.vivekprakashan.in/books/akhand-bharat/

 
 
या निर्णयावरून राजदीप सरदेसाई यांनी जेव्हा आचरट टीका केली, तेव्हा स्वतंत्र लेख लिहून त्याचा तितकाच समर्थ समाचार घेणारे फडणवीसच होते. सरदेसाई यांनी खुले पत्र लिहून राज्य सरकारच्या गोवंश हत्याबंदी कायद्याची खिल्ली उडवली होती. त्याला उत्तर देताना, मि. सरदेसाई, तुमच्या पत्रातील मजकूर हा तुमच्या व्यवसायाचा भाग असेल; परंतु माझ्या उत्तरातील संकल्प हे माझे ध्येय आहे आणि मी ते पूर्ण करेन, हे फडणवीस यांचे वाक्य गाजले होते.
 
असाच खोडसाळपणा एबीपी माझा वाहिनीच्या राजीव खांडेकर आणि प्रसन्न जोशी यांनी केला होता. ’सावरकर नायक की खलनायक’ या नावाचा कार्यक्रम या मंडळींनी प्रसारित केला होता. काही दिवसांनी त्याच वाहिनीच्या जाहीर कार्यक्रमात स्वत: खांडेकर व्यासपीठावर उपस्थित असताना फडणवीसांनी त्या कार्यक्रमावर जाहीर टीका केली. दोन्ही संपादकांना शालजोडीतले हाणले आणि वरून पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ‘नायक की महानायक’ असा कार्यक्रम करा. मीदेखील त्या कार्यक्रमात सावरकर महानायकच कसे होते हे सांगण्यासाठी हजर राहीन, असे सरळ सरळ जाहीर आव्हानच दिले.
 

devendra fadnavis 
 
राजकारणात जातीपातीच्या पलीकडे आणि विचारसरणीच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा नेता, अशी फडणवीस यांनी ओळख तयार केली. सामाजिक अभिसरणाचे एक पाऊल म्हणून छत्रपती संभाजी यांना राज्यसभेवर निवडून देण्याची त्यांनी भूमिका घेतली. त्या वेळी पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे, आता पेशवे छत्रपतींना खासदारकी देतात, अशी खवचट व जहरी टीका शरद पवार यांनी केली होती. मात्र त्याला शब्दांनी उत्तर न देता फडणवीस यांनी काम चालू ठेवले.
 
 
देशातील संविधानाचे राज्य आणि लोकशाही कायम ठेवण्यासाठी संघाने दिलेल्या योगदानाची बूज स्वयंसेवकच राखू शकतो. म्हणूनच आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी सरकारच्या अत्याचारांच्या विरोधात लढा देऊन तुरुंगवास भोगलेल्या अनेक कार्यकर्त्यांना मदत म्हणून मानधन देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला होता. या कार्यकर्त्यांमध्ये बहुसंख्य संघ स्वयंसेवक होते, तसेच काही समाजवादी व कम्युनिस्ट कार्यकर्तेही होते; परंतु नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नतद्रष्ट महाविकास आघाडीचे सरकार आले. दोन्ही काँग्रेसच्या दडपणाखाली ठाकरेंनी कोरोनाचे निमित्त करून हे मानधन बंद केले. अडीच वर्षांनी पुन्हा सत्तापरिवर्तन झाले. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार आले. त्या सरकारच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी उद्धव सरकारचा निर्णय बदलून मानधन पुन्हा देण्याचा निर्णय जाहीर केला.
 
कौटुंबिक संस्कार, शाखेतील संस्कार आणि संघाचा विचार यांची चुणूक देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार दाखवून दिली आहे. शिंदे सरकार स्थापन होत असताना झालेला घोळ हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण. मुख्यमंत्री म्हणून अवचित आलेली संधी जशी त्यांनी स्वीकारली, तशीच उपमुख्यमंत्री म्हणून झालेली पदावनतीही शिरोधार्य मानली. ’पाच वर्षे एकहाती कारभार केलाय, गोवा आणि बिहारमध्ये पक्षाच्या मोठ्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलीय, राष्ट्रीय पातळीची क्षमता असताना उपमुख्यमंत्री म्हणून मी काम कसा करणार,’ अशी कुठलीही खळखळ त्यांनी केली नाही. तुम्ही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षे काम केले. आताचे सरकार आणण्यासाठीदेखील तुम्ही अपार कष्ट उपसलेत. इतके असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षापेक्षा मोठा आहे, हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिले. पक्षाशी बांधिलकी म्हणजे काय असते त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांतील आणि संघटनेतील पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांच्या सारख्या परपक्षातील नेत्याने त्यावेळी फडणवीसांचं कौतुक केलं होतं. यातच सर्व काही आलं.
 
पडेल ते काम करण्याचा संघाचा संस्कार यापेक्षा वेगळा काय असतो?
 
अशा या निस्सीम आणि निःसंकोच स्वयंसेवकाला पुढील कार्यकाळासाठी मनापासून शुभेच्छा.

देविदास देशपांडे

पत्रकार आणि राजकीय विश्लेषक