बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे दुर्लक्षिलेले हत्याकांड

विवेक मराठी    04-Dec-2024   
Total Views | 69
 Bangladesh
गेल्या काही महिन्यांत बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार व हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक हिंदू मंदिरांवर हल्ले केले जात आहे. जाळपोळ केली जात आहे. याविरोधात आवाज उठवणार्‍यांना देशद्रोही म्हणून तुरुंगात टाकले जात आहे. बांगलादेशातील हिंदू बांधवांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे अशी मागणी करत भारतातील हिंदू समाज एकवटला आहे. बांगलादेशातील घटनांचा निषेध केला जात आहे.
 
‘सा. विवेक’च्या संकेतस्थळावर अक्षय जोग लिखित ‘बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे दुर्लक्षिलेले हत्याकांड’ ही बांगलादेश संदर्भात माहिती देणारी लेख मालिका ई-विवेकवर सुरू करत आहोत त्याचाच हा पहिला भाग...
 
2012 ला डॉ. रिचर्ड बेंकीन त्यांच्या 'Quiet Case of Ethnic Cleansing: The Murder of Bangladesh's Hindus by Dr. Richard L. Benkin, Akshaya Publication, ह्या त्यांच्या ग्रंथ-सहलीसाठी (Book tour) आलेले असताना त्यांच्याशी झालेल्या संवादातून माझे बांगलादेशातील हिंदूंच्या हत्याकांडाकडे सर्वप्रथम लक्ष वेधले गेले. नंतर काही वर्षांनी 2015 मध्ये बांगलादेशात धार्मिक मूलतत्त्ववादाच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे आठ महिन्यांत चार सेक्युलर ब्लॉगर्सच्या हत्येची तसेच तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातील (आताचा बांगलादेश) चित्तगावमधील धार्मिक छळामुळे 1964 पासून भारतात निर्वासित म्हणून राहणार्‍या चकमा बौद्ध व हाजोंग हिंदूंना मागील वर्षी सप्टेंबरमध्ये भारत सरकारने भारतीय नागरिकत्व देण्याची बातमी वाचनात आली. त्यानंतर मी बांगलादेशातील अल्पसंख्याक ह्या विषयावार गांभीर्याने अभ्यास करण्यासाठी ग्रंथ, अहवाल व संदर्भ गोळा करायला लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आले की, बांगलादेशातील अल्पसंख्याकांची स्थिती सर्व जगाने दुर्लक्षिलेली आहे.
 
बांगलादेश व म्यानमार हे दोन्ही देश वेगळे असले तरी दोन्हीकडील अल्पसंख्याकांकडे पाहण्याचे जगाचे दृष्टिकोन मला भिन्न व बहुतांशी भेदभाव करणारे वाटले. बांगलादेशातील हिंदू-बौद्धांच्या वंशविच्छेदाकडे दुर्लक्ष व म्यानमारमधील रोहिंग्यांसाठी मानवतेचा पाझर अशी भेदभाव करणारी निवडक मानवता पाहावयास मिळते म्हणून मी ह्या विषयावर लिहिण्याचे ठरवले.
 
 
बांगलादेश - प्राथमिक माहिती
 
बांगलादेशाची स्थापना
 
सन 1971ला भारत-पाकिस्तान युद्धात भारताचा विजय झाला व पाकिस्तानची फाळणी होऊन ’बांगलादेश’ची निर्मिती झाली. सन 1971च्या आधी बांगलादेश ’पूर्व पाकिस्तान’ म्हणून ओळखला जात होता. आजच्या भारतातील पश्चिम बंगाल व बांगलादेश हा संपूर्ण भूभाग सन 1947च्या आधी ब्रिटिशकालीन भारतात ’बंगाल प्रांत’ म्हणून ओळखला जात होता. 1947 ला भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी बंगाल प्रांताची पश्चिम बंगाल व पूर्व पाकिस्तान अशी फ़ाळणी झाली होती.
 
बांगलादेश - भौगोलिक स्थान
 
भारताची सर्वाधिक सीमारेषा बांगलादेशाच्या लगत आहे. भारत-बांगलादेश सीमारेषा 4096 किमी लांबीची आहे. बांगलादेशाच्या पश्चिमेला बिहार व प. बंगाल (2216.7 किमी), उत्तरेला मेघालय (443 किमी), ईशान्येला आसाम (263 किमी), पूर्वेला त्रिपुरा (856 किमी) व मिझोराम (318 किमी) ही भारताची राज्ये आहेत; तर आग्नेयला म्यानमार व दक्षिणेला बंगालचा उपसागर आहे. फ़ाळणीच्या वेळी अखंड बंगालचा 66% भूभाग पूर्व पाकिस्तानला व 34% भूभाग भारताला मिळाला.
 
1) लोकसंख्या : बांगलादेशची एकूण लोकसंख्या 15 कोटी 61 लक्ष 86 सहस्र 882 (2016 पर्यंतच्या अनुमानानुसार) आहे. त्यांपैकी मुस्लीम 89.1% (मुस्लिमांमध्ये सुन्नी बहुसंख्य आहेत, अंदाजे 90%), हिंदू 10% (पण वर्तमान अनुमानानुसार 8%), तर बौद्ध व ख्रिश्चनांसह 0.9%. (2013 पर्यंतच्या अनुमानानुसार). काही छोट्या द्वीपांचा व शहर राज्यांचा अपवाद वगळता बांगलादेश हा जगातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला देश आहे. चिमुकल्या बांगलादेशची लोकसंख्या महाकाय रशियाच्या लोकसंख्येएवढी आहे.
 
 
2) राज्यघटनेतील बदल : 1971ला बांगलादेशच्या नवनिर्मित राज्यघटनेत ’समाजवाद व संप्रदाय निरपेक्षता’ हे शब्द होते; पण शेख मुजीब उर्-रहमान यांच्या हत्येनंतर सत्तास्थानी आलेल्या जन. झिया उर्-रहमान यांनी त्याऐवजी ’सामाजिक न्याय’ व ’सर्वशक्तिमान अल्लाहवर निरपवाद श्रद्धा’ हे शब्द टाकले. ’बिस्मिल्ला इर्रहमान ईरहीम’ (दयाळू अल्लाहच्या नावाने) हा कुराणातील शब्दसमुच्चयही घटनेच्या प्रारंभी घालण्यात आला. 1982ला लोकशाही शासनाला उलथवून सत्तेवर आलेल्या जन. हुसेन मुहम्मद इर्शाद यांनी 8वी घटनादुरुस्ती करून सन 1988ला इस्लामला राजधर्माचा दर्जा दिला.
 
 
4) विद्यमान पंतप्रधान शेख हसिना यांना सन 2011ला ही 8वी घटनादुरुस्ती रद्द करायची सुवर्णसंधी आली होती; पण त्यांनी ते टाळले. इस्लामचा राजधर्माचा दर्जा काढून टाका, असा 28 वर्षांपूर्वीचा अर्ज मार्च 2016ला न्यायालयापुढे आला व दोन मिनिटांत न्यायालयाने तो फेटाळून लावला.
 
 पूर्वप्रसिद्धी : दै. मुंबई तरूण भारत
 
संदर्भ
 
1. गोडबोले, डॉ. श्रीरंग. बौद्ध-मुस्लीम संबंध- आजच्या संदर्भात, तक्षशिला प्रबोधिनी प्रकाशन, 2009, पृष्ठ 62

2. Hindus in South Asia The Diaspora - A Survey of Human Rights, 2017 by Hindu American Foundation
3. गोडबोले, पृष्ठ 62
 
4. उपरोक्त, पृष्ठ 64
 
5.Sattar, Maher Barry, Ellen. In Two Minutes, Bangladesh Rejects 28-Yr-Old Challenge to Islam's Role, 28 March 2016, New York Times
 

अक्षय जोग

सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद, भारतीय स्वातंत्र्यलढा व क्रांतिकारक ह्या विषयाचे अभ्यासक. www.savarkar.org संकेतस्थळाच्या कार्यात सहभाग. विश्व संवाद केंद्र, पुणे कार्यकारिणी सदस्य.
राजकारण
लेख
संपादकीय