शंभर वर्षांच्या वाटचालीत समाजातल्या बहुतेक स्तरांमध्ये संघकार्य पोहोचले आणि त्यातून संघाविषयीची स्वीकारार्हता वाढली. आजवर विविध आयामांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामाच्या पाच मुख्य दिशा निश्चित केल्या आहेत. सामाजिक समरसता, कुटुंबप्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आणि नागरी कर्तव्य हे ते पाच विषय... पाच मुख्य दिशा... कार्याची पंचसूत्री. या पंचसूत्रीचा बारकाईने विचार केला तर बहुदिशांनी विकसित झालेले संघकार्य या पंचसूत्रींच्या माध्यमातून अधिक सखोल होईल, सर्वव्यापी होईल. ही पंचसूत्री म्हणजे केवळ कार्याची दिशा नाही, तर संघविचारांचे प्रतिबिंब त्यात पडलेले दिसते. या दिशेने मार्गक्रमण करणे हे समाजाच्या अंतिम हिताचे, पर्यायाने देशाच्या हिताचे आहे; पण या मार्गाचे अनुसरण जागतिक स्तरावर झाले तर ते जगाच्या हिताचेही आहे हे लक्षात येते.
या पंचसूत्रीच्या संदर्भात रा. स्व. संघाचे सरकार्यवाह माननीय दत्तात्रेयजी होसबाळे यांच्याशी ‘विवेक’च्या संपादक कविता (अश्विनी) मयेकर यांनी संवाद साधला. त्यातून, एकेक दिशा किती विचारपूर्वक निवडली आहे ते लक्षात आले. सर्वसामान्य स्वयंसेवकाने आणि एकंदर सर्वच भारतीय व्यक्तींनी या पंचसूत्रीचा अवलंब आपल्या दैनंदिन जीवनात केला तर त्यातून जगण्याची गुणवत्ता सुधारेल आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष देशाचे व जगाचेही भले होईल.
या संवादाचे हे साररूप विवेकी वाचकांसाठी...
हाती घेतलेले काम अधिकाधिक व्यापक, सर्वस्पर्शी करत पुढे चाललेल्या समाजव्यापी संघटनेने एका शतकाचा उंबरठा ओलांडणे ही अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे. नव्या शतकात पदार्पण करताना समाजपरिवर्तनासाठी पंचसूत्रीच्या रूपात कामाच्या ज्या पाच दिशा निश्चित केल्या आहेत, त्या निवडल्या कशा? त्याला अंतिम स्वरूप देताना काय विचार झाला?
समाजपरिवर्तनाची कामे तर शेकडोंच्या संख्येत देशभर चालू आहेत. ती सगळी काही संघाची नाहीत. समाजाप्रति संवेदनशील असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, त्याच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर समाजात अमुक एक प्रकारचा बदल झाला पाहिजे असे वाटू शकते. जसे एखाद्या व्यक्तीला वाटू शकते तसे सामाजिक संस्था-संघटनेलाही वाटू शकते. त्यातून नेमके कोणते काम हाती घ्यायचे हे ठरवले जाते. असे होण्यात गैर काही नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. या वर्षासाठी म्हणून खास समारंभाची वा देशभर उत्सव साजरा करण्याची कोणतीही योजना संघाने केलेली नाही. याआधीही असे कधी केले नव्हते. म्हणजे, आपण संघाचा सुवर्ण महोत्सव वा अमृत महोत्सवही साजरा केलेला नाही. त्यामुळे शताब्दी वर्षाचा म्हणून संघाचा खास कार्यक्रम नसणे, ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे.
आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार तर संघ अगदी पहिल्या दिवसापासूनच करतो आहे. व्यक्तिनिर्माण हे संघाचे स्थापनेपासूनचे उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार कामही. प्रामाणिक, परिश्रमाचे मोल जाणणारा, चारित्र्यसंपन्न, समाजाप्रति संवेदनशील असलेला नागरिक घडवणे हे समाजाला सुदृढ करण्याचेच काम आहे. समाजाच्या विभिन्न क्षेत्रांत काम करण्यासाठी सक्षम व्यक्ती तयार करणे हेदेखील सामाजिक परिवर्तनासाठी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान आहे. संघात येणारी एक व्यक्ती जरी अशी घडली तर तिचा प्रभाव घरातील अन्य सदस्यांवरही पडतो. त्यातून सहजपणे कुटुंबातही परिवर्तन घडते. याची अनेक उदाहरणे संघ स्वयंसेवकांशी होत असलेल्या चर्चांमधून समोर येतात.
सांगायचे तात्पर्य हे की, समाजपरिवर्तन हे संघाचे शताब्दी वर्षात ठरवलेले उद्दिष्ट नाही, तर ते स्थापनेपासूनचे आहे. विविध प्रकारची समाजोपयोगी कामे करणे, सेवाकार्यांच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणणे हे निरंतर चालू आहे.
परमपूजनीय डॉक्टरांच्या जन्मशताब्दी वर्षात, 1989 साली संघाचा सेवा विभाग चालू झाला, तर पूजनीय गुरुजींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत संघाने सामाजिक सद्भावाचे काम हाती घेतले. समाजात विविध प्रकारचे सामाजिक सद्भावाचे काम चालू आहे. हिंदू समाज हा अनेकविध जाती, पंथ, संप्रदाय यांनी बनलेला आहे. प्रत्येक जातीचे संमेलन होते. त्यांचे त्यांचे प्रमुख नेते असतात. या प्रमुखांनी समाजाविषयीचा योग्य दृष्टिकोन आपल्या जातिबांधवांसमोर ठेवला, तर अशी संमेलने समाजपरिवर्तनाचा एक विधायक मार्ग बनतील. यावर सारासार विचार करून, आणि समाजहितासाठी व्यापक समन्वयाचे असलेले महत्त्व लक्षात घेत संघाने श्रीगुरुजी जन्मशताब्दीचे औचित्य साधून सामाजिक सद्भाव उपक्रम हाती घेतला. तात्पर्य हे की, प्रत्येक सामाजिक घटनेत स्वयंसेवकाला काम करण्याची एक संधी असते; समाजात सुप्त स्वरूपात असलेल्या शक्तीचे जागरण करण्याची संधी. ती संधी साधणे हे संघाचे उद्दिष्ट आहे.
पूजनीय गुरुजींनी आपल्या कार्यकाळात हिंदू समाजात जातीआधारित तसेच जन्मआधारित असे कोणत्याही प्रकारचे भेदभाव असू नयेत यासाठी अथक प्रयत्न केले. अशा भेदभावांना शास्त्राधार नाही हेही सतत सांगितले. आपण सारे एकच आहोत, ही समरसतेची दृष्टी संघशाखा, संघकार्यात सातत्याने प्रतिबिंबित होते, ती समाजातही अनुभवास यावी यासाठी श्रीगुरुजी सातत्याने प्रयत्नशील होते. त्यासाठी भारतभरातल्या संतमहंतांशी, मठाधीशांशी त्यांचा सतत संवाद चालू असे.
समाजात समरसतेचा भाव असणे ही समाजाचे संघटन होण्यासाठीची पूर्वअट आहे. समाज समरस नसेल तर तो संघटित होऊ शकत नाही. म्हणूनच गेली काही वर्षे पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आग्रहाने प्रत्येक गावात एक देवालय, एक पाणवठा, एक स्मशान अशी मांडणी करीत आहेत.
म्हणजेच पंचसूत्रीतले हे पहिले सूत्र जर आपण दैनंदिन जीवनात आचरणात आणले तर अन्य चार सूत्रे आचरणात आणणे शक्य आहे, असा तुमच्या बोलण्याचा मथितार्थ. सामाजिक समरसता हा दैनंदिन जगण्यातला अग्रक्रम असायला हवा.
तशी तर पाचही सूत्रे रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत, त्यात कमीजास्त महत्त्वाचे असे कोणतेच नाही. तरीही समरसता अग्रक्रमाने येण्याचे कारण, याच्याशी संबंधित समस्येचा आपण शेकडो वर्षे सामना करत आहोत. त्या पार्श्वभूमीवर, सामाजिक समरसतेला अग्रक्रम दिला आहे. समाजात समरसता आली की अन्य विषयांसाठीही दरवाजे उघडतात.
अगदी स्वातंत्र्यासाठी आंदोलने चालू असतानाही अनेक विभूतींनी सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न केले. त्यात स्वामी विवेकानंद होते, महात्मा गांधी होते, बाबासाहेब आंबेडकर होते, स्वातंत्र्यवीर सावरकरही होते. त्यामुळेच पंचसूत्रीत सामाजिक समरसता हा विषय पहिला येणे स्वाभाविक आहे.
जेव्हा समाजात सौहार्द असेल, समरसता असेल, तेव्हा एखादी व्यक्ती दुसर्याविषयी संवेदनशील असेल, एकत्र काम करण्यासाठी उत्सुक असेल. समरसता, कुटुंबप्रबोधन, पर्यावरण हे असे विषय आहेत, की ज्यात कुठल्याही वयाच्या व्यक्तीला करता येईल असे खूप काम आहे.
सामाजिक परिवर्तन हा विषय समाजातील काही प्रमुख व्यक्तींनी हाती घेण्याचा विषय आहे; असा सर्वसाधारणपणे समज असतो. मात्र वस्तुस्थिती अशी नाही. या विषयात समाजातली प्रत्येक व्यक्ती योगदान देऊ शकते. कोविडच्या काळात आम्ही हा विषय आग्रहपूर्वक सर्वांसमोर ठेवला. त्या वेळी संघशाखा मैदानात लागत नव्हत्या. घरात बसून स्वयंसेवक एकमेकांशी चर्चा करत, विचारांचे आदानप्रदान करत.
हे पाचही विषय परस्परांशी जोडलेले आहेत. त्यातही कुटुंबाचे प्रबोधन झाले की समरसता, स्वदेशी, पर्यावरण हे सगळे विषय त्यामागून येतील.
आपण पंचसूत्रीत जेव्हा कुटुंबप्रबोधन हा विषय घेतो तेव्हा या संदर्भात प्रबोधनाची कोणती दिशा आपल्यासमोर आहे?
एकत्र कुटुंब पद्धती ही आदर्श कुटुंब पद्धती आहे. अशा कुटुंबात मुलांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संस्कार होतात. कोणा एका व्यक्तीची ती जबाबदारी असत नाही, तर घरातील सर्व ज्येष्ठ-जाणती मंडळी मुलांना वाढविण्यात सहभागी होतात. अशा घरांत मुलांमध्ये होणारी मूल्यांची रुजवण त्यांना एक चांगली व्यक्ती बनवते. घरातल्या वातावरणामुळे समाजऋण फेडणे हे कर्तव्य असल्याची जाणीव त्यांच्यात रुजते. जन्माला आलेल्या प्रत्येकाला देवऋण, मातृपितृऋण, ऋषीऋण और समाजऋण फेडावे लागते अशी आपली परंपरा मानते. ‘धन्यो गृहस्थाश्रम‘ असे आपण म्हणतो, कारण गृहस्थाश्रमाच्या आधारेच अन्य आश्रमांचे काम चालते. म्हणूनच कुटुंब हा आपल्या सामाजिक रचनेचा मूलभूत घटक आहे. समाजाची ती मजबूत आधारशिला आहे. त्याचे मोल आपण लक्षात घेतले पाहिजे.
आपल्या देशावर आतापर्यंत अनेक आक्रमणे झाली. त्यांनी इथल्या राज्यव्यवस्थेला, समाजव्यवस्थेला हादरे दिले. राज्ये लयाला गेली. गुलामीचे जिणे नशिबी आले. आक्रमकांनी देशातली संपत्ती लुटली. इतके सारे होऊनही आपले राष्ट्र तगले, तरले ते कशामुळे? त्याला कारण आपली कुटुंबव्यवस्था. जोवर आपल्या कुटुंबव्यवस्थेवर थेट आक्रमण झाले नाही तोवर आपला देश वाचला, वाचू शकला, कारण याच कुटुंबांमधून समाजासाठी काम करायला माणसे पुढे आली.
समाजात जेव्हा एखादे अपरिहार्य परिवर्तन होते तेव्हा ते कुटुंब म्हणून समजून घेऊन त्यानुसार काही बदल केले पाहिजेत, ते स्वीकारले पाहिजेत.
चार बंधू गावातल्या घरात आपापल्या कुटुंबासह एकत्र राहतील हे आज व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. जग बदलले आहे. मुळात आज एका घरात चार सख्खी भावंडे असणे हेच दुर्मीळ आहे.
मात्र जितकी भावंडे असतील त्यांनी परस्परांशी नियमित संपर्क, संवाद ठेवायला हवा. महिन्यातून किमान एकदा एकमेकांशी बोलायला हवे. आज त्यासाठी कॉन्फरन्स कॉल, व्हिडीओ कॉलसारखे पर्यायही उपलब्ध आहेत. अगदी ठरवून वर्षातून एकदा तरी सर्वांनी सहकुटुंब भेटायला हवे. आपापसात सुखदु:खाच्या चार गोष्टी व्हायला हव्यात. यातून परस्परांविषयी असलेला जिव्हाळा टिकतो, वाढतो, तो अधिक मजबूत होतो. कुटुंबे छोटी असोत वा मोठी... अशा अनौपचारिक भेटींमधून आपण सगळे एकाच कुटुंबाचा भाग आहोत, ही भावना खोलवर रुजते.
आमच्या लहानपणी, रात्रीच्या जेवणासाठी घरातले सर्व जण जोवर हजर होत नाहीत तोवर आमची आई जेवायला वाढत नसे. दिवसभरातले एक जेवण तरी एकत्र असावे, हा तिचा आग्रह असे. आता काय होते? रात्रीच्या जेवणासाठी अनेक घरांमध्ये सगळे एकत्र आले तरी ते एकत्र असतातच असे नाही. प्रत्येकाच्या हातात स्वत:चा मोबाइल असतो, तर काही जण समोर टीव्ही चालू करून त्यावरचे कार्यक्रम पाहत जेवतात. त्यात परस्परांशी संवाद किती होतो? दिवसभरातल्या घडामोडी एकमेकांना सांगण्याची ती एक संधी असते. ती आपण गमावतो.
या गोष्टी दिसायला खूप छोट्या, कदाचित क्षुल्लक वाटू शकतात; पण कुटुंबातील सदस्यांना परस्परांशी जोडून ठेवण्याच्या कामी खूप उपयोगाला येतात.
आपली जगण्याची मूल्ये काय आहेत हे घरातल्या वडीलधार्यांच्या जगण्यातून लहानांपर्यंत पोहोचत असतेच. त्याचबरोबर ते जाणीवपूर्वक संवाद साधूनही पोहोचवणे गरजेचे असते. घरातल्यांचे परस्परांशी नाते कसे असावे, त्यातला संवाद प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व घडवणारा असावा, ही शिकवण बोलण्यापेक्षा वडीलधार्यांच्या वागण्यातून घरातल्या लहानांपर्यंत पोहोचते आणि झिरपतेही. त्याचबरोबर घरातली वडीलधारी मंडळी शेजारधर्म कसा निभावतात हेही मुले पाहत असतात. त्यात बदलत्या काळानुसार काही बदल झाले असतील. आता मोठमोठ्या शहरांमध्ये अनेक जण अपार्टमेंटमध्ये राहतात. कामाच्या वेळा बदलल्यामुळे अनेकांना आपल्या शेजारी कोण राहते हेही माहिती नसते. तसे होणे समाजस्वास्थ्यासाठी योग्य नाही. आपल्या अपार्टमेंटमध्ये सर्वांनी एकत्र येण्याचे ठरावीक दिवस असायला हवेत. अनौपचारिक संवाद आणि स्नेह रुजायला हवा. घराबाहेरचे बृहद कुटुंब असे त्याचे स्वरूप असायला हवे. असे करणे म्हणजे कुटुंबव्यवस्थेला कालसुसंगत रूप देणे आहे.
कुटुंबाच्या संदर्भात भाषा-भूषा-भजन-भोजन-भ्रमण-भवन या सहा विषयांना धरून काम करण्याची गरज आहे. नीट विचार केला तर प्रत्येक कुटुंबाला या सहा गोष्टींचे पालन करता येऊ शकते. प्रत्येक कुटुंबातला संवाद हा मातृभाषेत होण्यावर कटाक्ष असायला हवा. घरातल्या सदस्यांना अन्य कितीही भाषा येत असल्या तरी घरातला संवाद मातृभाषेत झाला तर त्या भाषेविषयीही आपुलकी वाटते. त्याचबरोबर तो आत्मीय, प्रेमाचा असायला हवा. मुलांच्या फक्त अभ्यासाची वा शैक्षणिक प्रगतीची नित्य चौकशी म्हणजे मुलांशी संवाद, अशी काही जणांची समजूत असते. त्या चौकशीपलीकडे अवांतर विषयांवर गप्पा होणे, एकमेकांची मते समजून घेणे हे व्हायला हवे. केवळ मातृभाषेत बोलणेच नाही, तर आपल्या मातृभाषेतील प्रकाशित साहित्यही घरी असायला हवे. त्याच्या वाचनाची सवय असायला हवी, त्यावर चर्चा व्हायला हवी. मातृभाषा टिकावी असे नुसते वाटणे पुरेसे नसते. त्यासाठी कुटुंब स्तरावर जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.
जी गोष्ट भाषेची तीच वेशभूषेची. गरज आणि आवड म्हणून आपल्या पोशाखात बदल झाला आहे. त्याला कोणी हरकत घेण्याचे कारण नाही; पण आपल्या सण-समारंभाच्या दिवशी ठरवून पारंपरिक पोशाख करणे हे जमू शकते. आपल्या वेशभूषेतून आपल्या संस्कृतीची अभिव्यक्ती होत असते. आपल्याला तिचा विसर पडता कामा नये.
भ्रमणाच्या संदर्भातही असे विचारपूर्वक काही करता येईल. वर्षातून एकदा कुटुंबाने एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्यावी. अशा सहलींमध्ये शक्यतो कुटुंबातले सर्व सदस्य सहभागी होतील असा प्रयत्न असावा. केवळ पुण्यप्राप्तीसाठी या यात्रा नसतात. त्यातून नकळत होणारे शिक्षण महत्त्वाचे असते. त्या त्या भागातले लोकजीवन कळते. तिथली संस्कृती लक्षात येते. देशभर असलेला संस्कृतीचा समान धागा अनुभवता येतो. आपल्या वैभवशाली इतिहासाची महती सांगणार्या ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला हवी. थोडक्यात, हे केवळ आरामासाठी, मनोरंजनासाठी केलेले पर्यटन नसावे, तर आपला देश समजून घेण्यासाठी केलेले डोळस देशाटन असावे.
आपल्या घराची रचनाही विचारपूर्वक केलेली हवी. सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज आणि सजवलेले घर जरूर असावे. त्या घरात आपल्या देवासाठीचे देवघरही मनःपूर्वक तयार केलेले असावे. काही जण ही बाब फार महत्त्वाची मानत नाहीत; पण देवघराने घराला घरपण यायला मदत होते. मराठीत एक प्रसिद्ध कविता आहे,
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती
याचा अनुभव आलेल्या पाहुण्याला यायला हवा. ते हॉटेल वाटता कामा नये. आपल्या दिवंगत पूर्वजांना घरातल्या भिंतींवर यथोचित स्थान द्यायला हवे आणि त्यांची माहिती आपल्या मुलाबाळांना असायला हवी
घराबाहेर हॉटेलमध्ये अनेक प्रांतांमधले, देशोदेशीचे पदार्थ मिळतात. त्यांचा आस्वाद जरूर घ्यावा. घरीही करावेत; पण आपल्या प्रांताचे वैशिष्ट्य असणारे पदार्थही घरी व्हायला हवेत. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित शिवराम कारंथजी एकदा धारवाडच्या महाराष्ट्र सदनात आले होते. संध्याकाळी त्यांचा जाहीर कार्यक्रम होता. सकाळी त्यांच्या भोजनाची व्यवस्था एका मराठी कुटुंबात करण्यात आली होती. संध्याकाळी महाराष्ट्र सदनात त्यांचे स्वागत करताना, ‘मराठी संस्कृती, मराठी भाषेचे जतन करण्यासाठी आम्ही हे सदन बनवले,’ असे तेथील कार्यकर्त्याने सांगितले. तो धागा पकडून शिवराम कारंथजी आपल्या भाषणात म्हणाले, ‘मराठी संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी हे सदन तयार केले हे चांगलेच; पण आज दुपारी ज्या मराठी कुटुंबात माझ्या भोजनाची व्यवस्था होती तिथे आमटी नव्हती की पोळी नव्हती.. सगळे पंजाबी पदार्थ केले होते.’
‘आपली जी विशेषता आहे त्यानुसार पाहुण्यांसाठी स्वयंपाक हवा’ हा त्यांच्या सांगण्याचा मथितार्थ होता. भारतात प्रांतानुसार पदार्थ बदलतात. आपला आहार फक्त चवीचा विचार करून नाही तर स्वास्थ्याचा विचार करून तयार होत असतो. त्या प्रांतातल्या ऋतूचा विचार करून आणि शरीराला काय चालेल याचा विचार करून पाककृती असतात. केरळमधील आहारात चिंचेचा वापर जास्त असतो, कारण ती तिथली आवश्यकता आहे.
असे वरकरणी छोटे दिसणारे अनेक विषय कुटुंबप्रबोधनाच्या कक्षेत येतात. घरातील सर्व वयोगटांसाठी एक तरी विषय कुटुंबप्रबोधनाशी जोडलेला आहे. आणखी एक, शेजारधर्म तर निभावायचा आहेच; पण त्याचबरोबर एका कुटुंबाने अन्य पाच कुटुंबांच्या संपर्कात राहायचे आहे. अशी कुटुंबे ज्यांच्याशी कोणतेही नाते नसेल, जी आपल्या जातीबाहेरच्या वर्तुळातली असतील, संवाद हवा आणि प्रत्यक्ष संपर्कही हवा. कारणपरत्वे एकमेकांकडे येणे-जाणे हवे, सुखदु:खात साथ हवी आणि त्यांचे रीतिरिवाज, संस्कृती समजून घेण्याची उत्सुकताही हवी. असे संपर्कजाळे तयार झाले तर त्यातून समाजस्वास्थ्य सुधारायला मदत होईल.
आता आपण जे जाणीवपूर्वक करायला सांगत आहोत तसे वातावरण पूर्वी समाजात होतेच. एक सख्यभाव समाजात असे. तो नाहीसा कसा झाला? त्यामागची कारणे काय असावीत?
समाजात असे सौहार्द आपसूक टिकत नाही. ही व्यवस्था कायमस्वरूपी टिकण्यासाठी रचना असावी लागते. त्याकडे आपण दुर्लक्ष केले, हे एक प्रमुख कारण. दुसरे असे की, रोजीरोटी कमाविण्यासाठी लोकांनी गावांकडून शहरात स्थलांतर केले खरे; पण ते त्या शहरी वातावरणात मनापासून रमले नाहीत. इथे फक्त पैसे कमवायला आलो आहोत, अशी त्यांची समजूत होती. बाकी त्या शहराशी, तिथल्या घडामोडींशी आपला काही संबंध नाही असे वाटणारे खूप आहेत. त्यातून आपण राहतो त्या गावाविषयी आत्मीयता कमी झाली, असे एक निरीक्षण आहे.
आधुनिकतेचा पुरस्कार करणे यात वावगे काही नाही; पण तसे करताना आपण जुन्या आणि चांगल्या जीवनमूल्यांशी घेतलेली फारकत योग्य नव्हती. सहसंवेदना समाजात सौहार्द टिकण्यासाठी आवश्यक असते. ती हळूहळू कमी होऊ लागली आहे. भौतिक समृद्धीच्या मागे पळताना याचा विसर पडला. चांगला बँक बॅलन्स हवा, मुले चांगली शिकावीत, मनोरंजनाचे अनेक पर्याय हवेत, एवढ्याच आकांक्षा आहेत. हे चुकीचे नाही; पण अपुरे आहे. आपण टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनसमोर बसून क्रिकेटचा आनंद घेतो; पण आपल्या घरातली मुले मैदानात खेळाचा आनंद घेत आहेत हे दृश्य आता अगदी अभावानेच दिसते. हे गंभीर आहे. याचा विचार व्हायला हवा आणि सुधारण्यासाठी सामायिक कृतीही. तीच या आयामाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे.
हळूहळू हा ट्रेंड जगभर दिसतो आहे. इंटरनेट आणि असंख्य वाहिन्यांच्या जंजाळात जगभरातली माणसे अडकली आहेत. त्यामुळे सगळीकडे एकसमान स्थिती दिसू लागली आहे. पूर्वी असे नव्हते. प्रत्येक गावाची स्वत:ची म्हणून काही विशेषता होती. हे चूक की बरोबर असा कोणताही शिक्का मारायचा नाही; पण त्याचा परिणाम सरधोपटपणा येण्यात झाला आहे. सर्वांमध्ये मन:पूर्वक मिसळतानाही आपले म्हणून वैशिष्ट्य, वेगळेपण राखले जायला हवे.
कुटुंबातली तरुण पिढी घरापासून केवळ शरीरानेच दूर नाही, तर मनानेही दूर होते आहे, हे घरातल्या ज्येष्ठांच्या लक्षात आले नाही का? त्यांनी हे रोखण्यासाठी प्रयत्न केले का?
लक्षात आले असेल; पण हतबल असतील. आपण हे सुधारू शकू, असा भरवसा उरला नसेल. काही लोकांनी ते रोखण्यासाठी प्रयत्नही केले असतील. काहींनी त्यांच्यावरच संकुचित असा शिक्का मारत कुचेष्टा केली. या सगळ्याचे अनेक विपरीत सामाजिक परिणाम झाले. आपण ते पाहतो आहोत, अनुभवतोही आहोत. या सगळ्याची पाळेमुळे विस्कळीत झालेल्या कुटुंबव्यवस्थेत आहेत. आत्मविश्वासाची कमतरता असलेली मुले आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात किंवा अंमली पदार्थांच्या सेवनात आयुष्य बरबाद करतात. जगभरात जिकडे बहुतांश लोकांचा कल होता त्या दिशेने सगळे चालू लागले, प्रवाहपतित झाले. कुटुंबाचे म्हणावे तसे संरक्षण कवच राहिले नाही. मुले घरापासून दूर राहायला गेली आणि त्यांचा संवादही कमी होत गेला.
आपल्या संस्कृतीविषयीची अनभिज्ञता आणि परंपरांविषयी अनास्था असल्याने सश्रद्ध असणे आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाणे यातला फरक ओळखण्यातही लोकांची गल्लत होऊ लागली. याचेही कारण पुन्हा परिवाराची विसविशीत झालेली बांधणी यातच आहे. उद्याचा जबाबदार नागरिक आजच्या घराघरांत तयार होतो आहे. म्हणूनच आपल्या मुलांना योग्य तर्हेने वाढवणे हे जन्मदाते म्हणून तर कर्तव्य आहेच; पण देशाप्रतिही कर्तव्य आहे.
कुटुंब प्रबोधन या विषयाचा इतका सखोल आणि व्यापक विचार झाला आहे.
अनेक हादरे बसत असलेली कुटुंबव्यवस्था सामाजिक जीवनावरही विपरीत परिणाम करते आहे आणि त्याच वेळी, आधुनिकता आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचीही अपरिमित हानी होत आहे. हे जग मानवजातीसाठी अनुकूल राहायला हवे असेल तर पर्यावरणाची काळजीही घ्यायला हवी. ते आपले कर्तव्य आहे. संघाचा पर्यावरणाच्या संदर्भात दृष्टिकोन कसा आहे?
पर्यावरण हा तर आपल्या देशापुरता नाही, तर जगभराचा चिंतेचा विषय आहे. ही चिंता अधोरेखित करणारी संमेलने जागतिक पातळीवर होत आहेत. हवामानविषयक परिषदा भरवल्या जात आहेत. या विषयासंदर्भात सार्वजनिक धोरणे आखली जात आहेत, ठराव केले जात आहेत. हे सगळेही आवश्यक आहेच; पण पुरेसे नाही. त्याच्याबरोबरच दैनंदिन जीवनशैलीसंदर्भातही व्यापक प्रमाणात जनजागृती व्हायला हवी. सामाजिक कार्यकर्त्याचे हे काम आहे; पण मग सामान्य माणसाला या चळवळीशी कसे जोडायचे? हा विषय काही फक्त धोरणकर्त्यांच्या अभ्यासाचा वा विद्यापीठीय वादविवादाचा नाही. तेही समांतर चालू राहायला हवेच; पण आचरणाच्या पातळीवर बदल झाले तर या सगळ्याचा फायदा आहे. तेव्हा सर्वसामान्यांचे आचरण कसे बदलायला हवे यावर संघ विचार करतो आहे.
पाणी वाचवणे हे आजच्या आणि पुढच्या पिढ्यांसाठी गरजेचे आहे, असे आपण म्हणतो; पण ते व्हावे कसे? तर, आपल्या घरातील नळांमधून पाण्याचा एक थेंबही अकारण वाया जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. त्यासाठी घरातले नळ सुस्थितीत ठेवणे हे प्रत्येकाने करायला हवे. ते होते का, हा प्रश्न आहे.
‘बूँद बूँद से बनता है सागर...’ या काही फक्त काव्यपंक्ती नाहीत, त्याचा गर्भितार्थ लक्षात घेऊन ते आचरणात आणायला हवे. दैनंदिन कामासाठी उपयोगात येणारी ऊर्जा, मग ती कोणत्याही स्वरूपातली का असेना, तिची बचत, सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. भौतिक समृद्धीच्या अवास्तव मोहापायी जंगलांची भरमसाट कत्तल होते आहे. त्याविरोधात फक्त आवाज उठवणे वा फक्त आंदोलने करणे यातून काय साध्य होईल? आपण आपल्या स्तरावर काय करू शकतो याचा विचार करून त्यानुसार कृती करायला हवी.
पर्यावरण रक्षणासाठीचा एक उपाय म्हणजे वृक्ष लागवड, झाडे लावणे. प्रत्येक घराची, गल्ली-मोहल्ल्याची, संस्थांची ती जबाबदारी आहे. दर वर्षी झाडे लावून त्यांचे जतन, संवर्धन करायला हवे.
जेव्हा इस्रायल देश स्वतंत्र झाला तेव्हा तो सगळा वाळवंटी भाग होता. देशाच्या सरकारने प्रत्येक मुलाला दर वर्षी एक झाड लावायला आणि त्याची जपणूक करायला प्रेरित केले. या जनजागरणाचा परिणाम काही वर्षांनी ठळक स्वरूपात दिसू लागला. इस्रायलची भूमी हिरवीगार झाली. असे विषय जेव्हा समाजाचे होतात तेव्हा त्यातून होणारे परिवर्तन आमूलाग्र आणि कायमस्वरूपी असते.
‘झाडे लावा, पाणी वाचवा आणि पॉलिथीनचा वापर टाळा’ या नुसत्या घोषणा नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीची जोड त्याला अपेक्षित आहे. पर्यावरणाविषयी बोलताना संघाने प्रामुख्याने झाडे, पाणी आणि पॉलिथीन या तिघांवर भर दिला आहे.
पॉलिथीनचा वापर बंद करण्याचे आवाहन केले असले तरी सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी अपेक्षित नाही. ती व्यवहार्यही ठरणार नाही. तुम्ही गावात राहात असाल वा शहरात, प्रत्येक घर हे हरितघर असायला हवे. अशा हरितघरातल्या झाडांसाठी घरातील कचर्यापासून तयार झालेल्या खताचा वापर करावा. घराला लागून गच्ची असेल तर छोटा बगिचाही करता येईल. पक्ष्यांसाठी निवारा तयार करता येईल, त्यांना पाणी ठेवता येईल. आपण निसर्गातले एक आहोत, एकमेव नाही, याचीही जाणीव अशा उपक्रमांमधून वाढीस लागेल. हरितघरासाठी संघाने काही निकष ठरवले आहेत.
झाडे लावा, ऊर्जा वाचवा, वीज वाचवा, पाणी वाचवा यावर भर दिला आहे. पर्यावरणाच्या संरक्षणात प्रत्येक घराची भूमिका महत्त्वाची आहे म्हणून सर्वांनी गांभीर्याने यासाठी प्रयत्न करायला हवेत. जसे हरितघर असू शकते तसे हरित विद्यालयही असू शकते आणि हरित कार्यालयेही.
या पंचसूत्रीत पहिला आयाम सामाजिक समरसता असा असला तरी या सर्व आयामांचे केंद्र कुटुंब आहे. ज्या घरात सामाजिक समरसतेचा संस्कार होईल, जिथे पर्यावरण हा आस्थेचा विषय असेल अशा घरांमधली मुले आपोआप तो दृष्टिकोन अंगी बाणवतील.
पंचसूत्रीतला एक आयाम स्व-जागरण असा आहे, त्यामागे काय विचार आहे?
आपल्या देशाची-भारताची एक अस्मिता आहे, ओळख आहे. अशी प्रत्येक देशाची स्वत:ची अशी एक ओळख असते, अस्मिता असते. प्रत्येक देशाचा ‘स्व’ असतो. जपानचा आहे, इंग्लंडचा आहे तसा भारताचाही आहे आणि तो ओळखू येतो. प्रत्येक राष्ट्राने आपल्या ’स्व’च्या आधारे जगाला योगदान दिले पाहिजे.
आपल्या पूर्वजांनी, ऋषिमुनींनी इथली समाजव्यवस्था विकसित केली. एक उदाहरण द्यायचे तर.. .आपण ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव’ म्हणतो आणि तसे आचरणही करतो. हा भारताचा म्हणजे आपला ’स्व’ आहे. आपला हा दृष्टिकोन आहे. प्रत्येक प्राणिमात्रात ईश्वराचा अंश असतो, ही आपली धारणा आहे, तोही आपला ’स्व’ आहे.
दुसरी गोष्ट अशी की, प्रत्येकाच्या आयुष्याची सार्थकता एका विशिष्ट गोष्टीशी निगडित असते. प्रत्येकाच्या म्हणजे... वस्तू असेल किंवा माणसे. आपल्या आयुष्याची सार्थकता कशात आहे हे ओळखून ते प्रयत्नपूर्वक मिळवायला हवे. असे करणे म्हणजेच मोक्ष. तोच त्या व्यक्तीच्या विकासाचा मार्ग असतो. हा विचार हा आपला ’स्व’ आहे. त्याच दृष्टिकोनातून आपण निसर्गाकडे पाहतो, कुटुंबव्यवस्थेकडे पाहतो. आपल्या शास्त्र, संगीत, कलांचा विकासही या आधारे झाला आहे. आपली संस्कृती ही आपल्या ‘स्व’ची अभिव्यक्ती आहे. ती आपली जीवनसंस्कृती आहे. तीच आपली जगात ओळख आहे. संघाचे एक ज्येष्ठ स्वयंसेवक आणि त्यांच्या पत्नी पेरू देशात गेले होते. पत्नीने साडी परिधान केली होती आणि कपाळावर कुंकू होते. ते समुद्रकिनारी फिरत असताना अचानक एक विदेशी महिला जवळ आली आणि ‘इंडि..इंडि’ असे म्हणू लागली. म्हणजेच भाषा येत नसतानाही त्या महिलेने पेहरावावरून देश ओळखला. असा आपला ‘स्व’ प्रकट होत असतो. हे त्याचे अगदी एक छोटे उदाहरण. आधुनिकतेचा पुरस्कार करताना सर्वच जुन्या गोष्टी त्यागण्याची गरज नसते. काळाच्या कसोटीवर त्या पारखून, त्यातले सत्त्व बरोबर न्यायचे असते.
ही ‘स्व’ची ओळख केवळ पुस्तकातून, संग्रहालयातूनच राहिली आणि आपल्या दैनंदिन जीवनातून हद्दपार झाली तर त्याला फारसा अर्थ राहत नाही.
म्हणूनच आपला ’स्व’ जगण्यात प्रतिबिंबित व्हायला हवा.
आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होणे हे देशाच्या ’स्व’चे दुसरे रूप आहे. देश भौतिकदृष्ट्या समृद्ध हवा. आर्थिक समृद्धता हवीच. देशासाठी, देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी हे गरजेचे आहे. देशातला प्रत्येक नागरिक खाऊनपिऊन सुखी असेल तरच मनुष्यधर्माचे आचरण नीटपणे करू शकतो. आर्थिक समृद्धीकडे पाठ फिरवायला आपल्या परंपरेने कधी शिकवले नाही. अर्थ हा चार पुरुषार्थांपैकी एक आहे, इतके त्याचे महत्त्व आहे. ‘धर्मस्य मूलं अर्थम्...’ हे चाणक्यांनी ओळखले होते. आर्थिक संपन्नता इतकी महत्त्वाची आहे.
हजारो वर्षांच्या संघर्षात आणि त्यानंतर इंग्रजांच्या गुलामीत खितपत असताना आपला देश लुटला गेल्याने आर्थिक विपन्नता आली. ही विपन्नता दूर करायला हवी. हे केवळ सरकारी अर्थसंकल्पातून, सरकारने आर्थिक नियोजन करून होणार नाही. आपण सगळे मिळून देशाला अर्थसमृद्ध करू शकतो, हा भाव समाजात निर्माण व्हायला हवा. हे भावजागरण आपल्याला करायचे आहे. त्यासाठी परिश्रमाला पर्याय नाही हे समाजमनावर बिंबवायला हवे. समाजाच्या विविध स्तरांतील अंगभूत कौशल्याचा विकास करावा लागेल. तशा योजना तयार कराव्या लागतील. ज्याप्रमाणे समाज समरस व्हावा, हे आग्रहाने मांडायचे आहे त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या देश सबल व्हावा, हा आग्रहही करावा लागेल. केवळ मूल्य म्हणून आपण याचा विचार करत नाही, तर समाजाच्या रक्षणासाठीही आर्थिक सबलता आवश्यक आहे. आपल्याकडे समाजाला देण्यासाठी कमवायचे, असे म्हटले जाते, ठसवले जाते. शंभर हातांनी कमवा आणि हजार हातांनी वितरित करा, याचाही तोच अर्थ. ‘स्वदेशी जीवनशैली’ या संकल्पनेत आर्थिक संपन्नता या मुद्द्याचा अंतर्भाव आहे. म्हणूनच आपल्याला देशी व्यवसायांना - मग ते ग्रामीण उद्योग असतील वा कुटिरोद्योग वा खादी... त्याला सर्वांनी उत्तेजन दिले पाहिजे, सक्रिय पाठिंबा दिला पाहिजे. या उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे, त्याचे विपणनही (मार्केटिंग) प्रभावी पद्धतीने केले पाहिजे.
...चीन करू शकतो, जपानला हे जमू शकते, कोरिया त्याच मार्गावरून आर्थिक प्रगती साधतो, तर मग भारत का नाही करू शकत? असे घडले नाही तर काय होईल? आपली बाजारपेठ अन्य देशांसाठी खुली असेल. चीनमध्ये तयार होणारी गणेशमूर्ती बाजारात आली आहे. याचा अर्थ आणि त्याचे गंभीर परिणाम आपण लक्षात घ्यायला हवेत.
आपल्याकडे साडी आणि धोतरासारखे वस्त्र विणण्याचे प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी आपण ती कामे मिलच्या हातात दिली. वस्त्रे तुलनेने स्वस्त झाली तरी गावागावांतून अनेक बेरोजगार झाले. या मोठमोठ्या कापड गिरण्या हळूहळू विदेशी कंपन्यांच्या हाती गेल्या, जाताहेत.
थोडक्यात काय, तर इंग्रज गेले आणि विदेशी कंपन्या आल्या. त्यांनी इथला पैसा बाहेर नेला. याने देश आर्थिक समृद्धीच्या वाटेवर कसा जाणार? तेव्हा स्वदेशी संकल्पनेत आर्थिक दृष्टीने स्वदेशी, आर्थिक संपन्नता, आर्थिक सबलता, उत्पादनांचे विकेंद्रीकरण हे सर्व गृहीत धरले आहे.
अशा सगळ्या घटकांनी मिळून ‘स्व’ तयार होतो.
नागरी कर्तव्य हा पंचसूत्रीतला एक महत्त्वाचा आयाम आहे आणि तो कुटुंबप्रबोधनाशी जोडलेला आहे. त्याविषयी...
जेव्हा व्यक्ती कुटुंबात वावरत असते तेव्हा ती कुटुंबाचा सदस्य असते. मात्र जेव्हा ती घराचा उंबरठा ओलांडून समाजात येते तेव्हा ती भारतीय नागरिक असते. तेव्हा कुटुंबाच्या बाहेर भारतीय नागरिक म्हणून तिची काही कर्तव्ये असतात. आपल्या संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत. ते अतिशय मौलिक अधिकार आहेत. या मूलभूत अधिकारांबरोबरच संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्येही सांगितली आहेत. अधिकारांविषयी तर आपण हिरिरीने, उच्च स्वरात बोलत असतो, मात्र कर्तव्यांबाबत इतके सजग असतो का?
आपल्या राष्ट्रीय श्रद्धा आहेत... राष्ट्रगीत आहे, राष्ट्रगान आहे, आपला ध्वज आहे.
या सर्वांप्रति आपल्या मनात सन्मानाची, आदराची भावना असली पाहिजे आणि त्यानुसार आचरणही असायला हवे. भारताच्या वैभवशाली परंपरेचे, संपत्तीचे रक्षण करणे हे सरकारइतकेच नागरिकांचेही कर्तव्य आहे. जेव्हा आपण पर्यटनासाठी जातो तेव्हा आपले वागणे जबाबदार नागरिकाचे असले पाहिजे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण हे आपले नागरी कर्तव्य आहे. एखाद्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आंदोलन करणे हा सांविधानिक अधिकार आहे; पण असे आंदोलन करताना तोडफोड करणे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे, रेल्वेरुळात ठाण मांडून बसून जनजीवन विस्कळीत करणे हे कशासाठी? असा काही अधिकार घटनेने आपल्याला दिलेला नाही.
तेव्हा संविधानात दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचे नागरिकांना स्मरण करून देणे, तसे वागायला उद्युक्त करणे यासाठी पंचसूत्रीत या आयामाचा अंतर्भाव आहे.
आपण समाजात राहतो, वावरतो... त्यासाठी समाजाचे म्हणून काही नियम असतात, वागावे कसे, या संदर्भात लक्ष्मणरेषा असतात.
बसमधून वा कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना आपल्या सहप्रवाशांशी... त्यात वृद्धही आले आणि महिलाही, यांच्याशी वर्तन कसे आहे, संवादाची भाषा कशी आहे, याचा विचार मनात जागृत असणे हे भारतीय नागरिकाचे कर्तव्य असते. समाजात वावरताना नियमांचे पालन करणे, शिस्त आणि संयम पाळणे हे प्रत्येक भारतीयाकडून अपेक्षित आहे.
दुसरे म्हणजे सामाजिक संपत्तीचे संरक्षण ही आपल्यातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. कमीत कमी प्रदूषण करणारी वाहने वापरणे, वाहने चालवताना कमीत कमी ध्वनी प्रदूषण करणे याचे भान बाळगायला हवे. प्रदूषणासंदर्भात सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन व्हायला हवे.
शहरातल्या बगिच्यांच्या स्वच्छतेचे, देखभालीचे काम कोणावर तरी सोपवलेले असते. त्याचप्रमाणे या बगिच्याचा लाभ घेणार्या प्रत्येकाने तिथे कचरा होणार नाही, बागेतली सर्व उपकरणे नीटपणे हाताळली जातील याबाबत दक्ष असावे.
पूर्वीच्या काळी भारतात जे परदेशी पर्यटक आले त्यांनी आपल्या प्रवासवर्णनांमधून तत्कालीन भारताची खूप प्रशंसा केली होती. प्राचीन काळी भारतातील नागरी प्रशासन आदर्श होते. याचे ठोस पुरावे हडप्पा-मोहेंजोदरो इथे सापडले आहेत. मधल्या संघर्षमय कालखंडात विद्रोहाची भाषा बोलली जाऊ लागली. त्यांनी व्यवस्थेविरुद्धच बंड पुकारले होते. त्याला इंग्रजांनी केलेल्या अनन्वित अत्याचारांचा संदर्भ होता. त्यातूनच बंडाचा, असहकाराचा जन्म झाला.
पण आता तशी स्थिती नाही ना? आता आपले राज्य आहे. तेव्हा विद्रोहाचा वापर करून कामे करण्याची मानसिकता असता कामा नये. त्याऐवजी लोकशाहीने बहाल केलेल्या नागरी अधिकारांचा वापर करून दाद मागितली पाहिजे आणि त्याच वेळी या सरकारविषयी, इथल्या व्यवस्थेविषयी आणि समाजाप्रति आपली जी कर्तव्ये आहेत तीही पार पाडायला हवीत.
स्वस्थ समाजाचे निर्माण हे नागरी कर्तव्य आहे. त्यासाठी सभ्य आणि सुसंस्कृत समाजाची उभारणी हीदेखील नागरिकांनीच कर्तव्यबुद्धीने करायला हवी.
आपल्या या पंचसूत्रीतला प्रत्येक आयाम दुसर्याशी जोडलेला आहे. हे सगळे विचार म्हणून उत्तम आहेत, आदर्श आहेत; पण हे प्रत्यक्षात आणण्यासाठी उपक्रम जोडावे लागतील, योजना कराव्या लागतील... त्यासंबंधी काय विचार केला आहे?
संघाच्या शाखा हे त्याचे एक माध्यम असेल. तसेच परिवारातील अन्य संस्था-संघटनासुद्धा आपापल्या स्तरावर या दिशेने काम करतील.
पर्यावरण रक्षणासाठी सीड बॉल्स तयार करणे, वृक्षारोपण-जतन-संवर्धन यातून जनजागरण होईल. असे छोटेमोठे असंख्य उपक्रम ठिकठिकाणी करता येतील.
समरसतेचे उद्दिष्ट समोर ठेवून मंदिर-जलसाठे-स्मशानभूमी- केंद्री उपक्रम असतील.
अयोध्येचे राम मंदिर, काशी विश्वनाथ, दादरचे सिद्धिविनायक मंदिर इथे सर्वांना मुक्त प्रवेश आहे. तिथे कोणी तुमच्या जातीची चौकशी करत नाही. असे जर आहे तर आपापल्या गावातून जातिआधारित मंदिरप्रवेश का? याबाबत जनजागृती करून समाजमन बदलावे लागेल.
आपल्या देशात आजही अनेक संत-महंत-गुरू हे समाजातील एखाद्या वर्गाशी जोडलेले असतात. काही जाती-पंथ-संप्रदायाचे प्रमुख असतात... अपेक्षित सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी, समरसता रुजवण्यासाठी त्यांची मदत घेतली जाईल. त्यांना हा विचार समजला, पटला, तर तो समाजात रुजवायला मदत होईल.
समाजाची विचारशक्ती जागृत झाली तर, दृष्टीत आणि आचरणात बदल झाला तर, अशी आणखी दहा सकारात्मक कामे आपोआप सुचतील.
अशा प्रकारे शांतपणे तरीही व्यापक रूपात सामाजिक परिवर्तन घडणे शक्य आहे. हे पुढच्या वर्षभरातच घडेल, अशी अपेक्षा नाही. मात्र आगामी दशकात आपण भारताला एका स्वस्थ, सुसंस्कृत समाजाच्या रूपात उभे करू शकू. सर्व दृष्टीने देशाला शक्तिशाली करू. हे पाचही विषय जितके वैयक्तिक आहेत तितकेच वैश्विकही आहेत, हे यांचे वैशिष्ट्य.
https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.