अहिल्याबाईंचा ‘अर्थ’विचार

विवेक मराठी    22-Oct-2024   
Total Views |
 

vivek
अहिल्याबाईंची धर्मपरायणता, त्यांनी केलेले देवळांचे जीर्णोद्धार, बांधलेले घाट याची थोडी तरी दखल इतिहासाने घेतली; पण त्यांचे प्रशासनिक कौशल्य, न्यायप्रियता, सक्षम राजकीय नेतृत्व, आर्थिक विचार आणि आजच्या भारतीय तरुणींसाठी ‘रोल मॉडेल’ ठरावे असे तडफदार व्यक्तिमत्त्व, सजग व लढाऊ स्त्री नेतृत्व असे पैलू अभ्यासण्याजोगे आहेत. अहिल्याबाई होळकरांच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष साजरे होताना त्यांचा दुर्लक्षित राहिलेला ‘अर्थ विचार’ हा पैलू जाणून घेऊयात.
आधुनिक भारताच्या इतिहासातले एक सोनेरी पान असलेल्या, स्वत:च्या आयुष्यातच आख्यायिका बनून राहिलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष आपण साजरे करतो आहोत. त्यानिमित्ताने अहिल्याबाईंच्या जीवनाचा, कारकीर्दीचा अभ्यास करताना त्यांनी दाखवलेले विविधांगी कर्तृत्व स्तिमित करणारे आहे. तेज, तप आणि त्याग या गुणत्रयीने परिपूर्ण असे त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे मूर्तिमंत भारतीय स्त्रीत्वाचे प्रतीक! करारी, पण मर्यादशील, प्रशासक म्हणून कठोर, पण जनतेच्या लोकमाता, न्यायप्रिय तरीही माणुसकी हा मुख्य धर्म मानणार्‍या, वृत्ती धार्मिक; पण कर्मकांडांचे अवडंबर नाही, आध्यात्मिक तरीही आधुनिक, तार्किक... असे वरवर परस्परविरोधी वाटणारे अनेक गुणविशेष त्यांच्या ठायी पुरेपूर भरलेले होते.
 
 
त्यांच्या हयातीतच रयतेकडून त्यांना देवी, लोकमाता, कर्मयोगिनी अशा अनेक उपाधी मिळाल्या होत्या. याचे सारे श्रेय त्यांच्या व्यक्तिमत्त्वातली आध्यात्मिकता, मराठी मुलखाचा नेकीचा वारसा, त्यांच्या पूर्वसूरी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रभाव, समकालीन पेशवेशाहीचे शासनव्यवस्थेचे मापदंड यांना द्यावे लागेल. पेशवे ज्या मराठेशाहीचे वारसदार, त्याच्या अध्वर्यू राजांच्या-शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचे प्रतिबिंब अहिल्याबाईंच्या प्रशासन पद्धतीत पाहायला मिळते. महाराज श्रीमंत योगी होते, तर अहिल्याबाई या योगिनी होत्या. ‘उपभोगशून्य राज्ञी’ असे त्यांचे वर्णन करावे असे त्यांचे वर्तन होते.
 
 
मौखिक शिक्षणाची परंपराच जेव्हा ‘लौकिक’ शिक्षणाची होती त्या काळात अहिल्याबाई जन्मल्या. त्या परंपरेत त्यांनी जिजाऊ व छ. शिवाजीच्या गोष्टी, रामदास व तुकारामांचा तत्त्वबोध, रामायण- महाभारताच्या युद्धकथा, राम व कृष्णाची चरित्रे, सीता व द्रौपदीचा कणखर बाणेदारपणा, वेदकाळातल्या गार्गी-मैत्रेयीने केलेले देदीप्यमान वादसंवाद, मुक्ताबाई-जनाबाईने परमेश्वराला केलेले रोकडे सवाल, नागनिकेपासून राणी दुर्गावतीपर्यंतच्या राण्यांनी केलेल्या राज्यकारभाराच्या रम्य कथा ऐकल्याच असणार! त्या केवळ ऐकल्या नाहीत तर त्यांचा जिवंत मूल्यवारसा, धार्मिकता, सात्त्विकता, आध्यात्मिकता, समर्पण, सेवा व वैराग्यभाव हा आपल्यात मुरवला होता, असे म्हणावे लागते. संस्कृतमध्ये ‘अहल्या’ म्हणजे न नांगरलेली जमीन! या अहिल्येच्या व्यक्तिमत्त्वाची अनाघ्रात सुपीक जमीन कसदार होती. तिच्या व्यक्तिमत्त्वात किती किती सनातन गोष्टींचे बीज पडले, फळले, फुलले त्याला तोड नाही; पण ही विश्वनायिका तिच्या कर्तृत्वाच्या मानाने आजपर्यंत अप्रकाशित राहिली, दुर्लक्षित राहिली, असे खेदाने म्हणावे लागते. त्यांच्या जन्मजयंतीच्या तीनशेव्या वर्षात हा कलंक पुसून टाकला पाहिजे.
 
 
अहिल्याबाईंची धर्मपरायणता, त्यांनी केलेले देवळांचेजीर्णोद्धार, बांधलेले घाट याची थोडी तरी दखल इतिहासाने घेतली; पण त्यांचे प्रशासनिक कौशल्य, न्यायप्रियता, सक्षम राजकीय नेतृत्व, आर्थिक विचार आणि आजच्या भारतीय तरुणींसाठी ‘रोल मॉडेल’ ठरावे असे तडफदार व्यक्तिमत्त्व, सजग व लढाऊ स्त्री नेतृत्व असे पैलू दुर्लक्षित राहिले.
 
 
‘वित्ता’ची अर्थसत्ता आणि त्यांचा ‘अर्थ’विचार
 
कोणत्याही शासनव्यवस्थेत दोन महत्त्वपूर्ण घटक असतात ते म्हणजे ‘अर्थ किंवा वित्त’ आणि ‘लोक म्हणजे जनता’! जनतेच्या ज्या मूळ प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा, त्या पूर्ण करण्याचे माध्यम म्हणजे पैसा, वित्त किंवा अर्थ. अर्थशास्त्राच्या भारतीय अवधारणेत अर्थ म्हणजे केवळ संपत्ती नव्हे. वस्तूंचे उत्पादन आणि उपभोग नव्हे, तर व्यापाराच्या, सुबत्तेच्या नैतिक मापदंड व जीवनमूल्यांच्या आधाराने व्यक्ती व समाजाचे निर्माण! आदर्श राज्याच्या परिकल्पनेत जनतेच्या सुख, शांती व सदाचाराचे समीकरण म्हणजे समृद्धी, म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्ती. या दोन्ही महत्त्वाच्या घटकांना सकारात्मक दिशा देण्याचे काम सक्षम नेतृत्व करते. असे नेतृत्व हे उत्तरदायित्व निभावणारे असेल तर त्या नेतृत्वाच्याच आधारावर शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि समाजरचना तयार होते. या कसोटीवर अहिल्याबाईंचा कार्यकाळ हे इतिहासातले सोनेरी पान आहे.
 

Ahilyabai Holkar 
 
मध्य भारतातल्या संपन्न अशा माळवा प्रांताचे नेतृत्व कसे होते? त्या काळात बहुतेक संस्थानिक व सरदार धन कमावण्यासाठी युद्ध करत होते व कमावलेले धन पुढच्या मोहिमांसाठी खर्च करत होते. ते कधी युद्ध जिंकायचे, तर कधी हरतही होते. लुटून आणलेल्या धनातून अय्याशी करत होते. इतिहास व मध्ययुगीन काळात जनतेवर मनमानी कर लावत होते आणि जबरदस्तीने करांची वसुली करत होते. याचे उदाहरण म्हणजे जिझिया कर. मुगल बादशहा व सरदारांचा इतिहास म्हणजे बळजबरी, विलासी जीवनशैली, चैन व उपभोग यांचे उदाहरण होते. या पार्श्वभूमीवर अहिल्याबाईंचा दृष्टिकोण ‘वैशिष्ट्यपूर्ण’, जीवनशैली ‘आदर्श’ आणि व्यवहार ‘धर्माधिष्ठित’ होता. त्यांचे चरित्र म्हणजे भारतीय जीवनमूल्यांचे एकमेवाद्वितीय उदाहरण म्हटले पाहिजे. अहिल्याबाईंच्या ठायी शुचिता आणि पावित्र्य पुरेपूर भरलेले होते. तत्कालीन प्रथेनुसार पतिनिधनानंतर सती न जाता, सहगमन न करताही, सतीत्वाचे व्रत त्यांनी उर्वरित जीवनभर पाळले. त्यांचे व्यक्तिमत्त्व कर्मठ व जीवन धार्मिक होते. लोकप्रशासन, निर्माणकार्य, कूटनीती, अन्य राज्यांशी संबंध, वैचारिक स्पष्टता, दूरदर्शिता, आत्मविश्वास, रणनीती, तार्किक विचार आणि या सर्वांना असलेले धर्माचे सुवर्ण अधिष्ठान हा एक दुर्मीळ असा अलौकिक योग होता. या दुर्लभ गुणसमुच्चयाच्या आधारावर त्यांनी 30 वर्षे आदर्श राज्य प्रशासन चालवले, प्रजाहिताला अत्युच्च प्राधान्य देऊन रयतेला सदैव सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणून जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा केवळ महाराणी वा चांगली शासक अशी नव्हती, तर ‘लोकमाता’ अशी होती.
 
 
18व्या शतकात माळवा प्रांतातले होळकर सरकार हे एक वैशिष्ट्यपूर्ण शासन होते, ज्याचे संस्थापक होते मल्हारराव होळकर आणि त्यांची सून अहिल्यादेवी होळकर. अहिल्याबाई प्रशासनिक कौशल्य व कारभाराची पद्धत जरूर त्यांचे गुरू आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्याकडून शिकल्या; परंतु स्वत:चा आंतरिक विवेक - सूझबूझ, कर्तव्याप्रति कठोरता, न्यायप्रियता, अनुशासनप्रियता, प्रतिभा आणि तेज यामुळे त्यांनी होळकर राज्याला एका उंचीवर नेऊन ठेवले. त्या आणि त्यांचे प्रशासन केवळ भारतासाठी नाही तर जगासाठी आदर्श प्रशासनाचा एक उत्तुंग मापदंड ठरला. त्यांचे समकालीन नाना फडणवीस आणि नबाबानेही त्यांची स्तुती केली होती.
 
 
त्यांच्या तीस वर्षांच्या शासनकाळात अहिल्याबाईंनी सतत आर्थिक कार्य व राज्याच्या, जनतेच्या आर्थिक उन्नतीचे सतत प्रयास केले. त्यात सातत्य राहील याचा व वहनीयतेचा (sustainability) विचारही केला. हे प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सर्वसमावेशी (inclusive) आणि सर्वधर्मसमभावाचा विचार करणारे होते हे अजून एक वैशिष्ट्य. त्यांनी अमलात आणलेला ‘अर्थविचार’ त्यांच्या आदर्श व प्रजाहितैषी दृष्टिकोनाचा द्योतक आहे, म्हणून महत्त्वपूर्ण आहे व वैशिष्ट्यपूर्णही आहे.
 
या ‘अर्थ’विचाराचे तीन पैलू आहेत-
 
1. अर्थाचे निर्माण 2. अर्थाचे व्यवस्थापन 3. अर्थाचा विनियोग
 
1. अर्थनिर्माण
 
राज्याची अर्थस्थिती चांगली नसेल, तर ते राज्य नेहमी दुर्बळ, परजीवी, दुसर्‍यांच्या साहाय्यावर अवलंबून राहणारे राज्य होते. आर्थिक स्वयंपूर्णता हा राज्य, समाज व व्यक्तिजीवनाचा महत्त्वपूर्ण निकष आहे. त्या काळात उद्योग, शेती, व्यापार व उत्पादन हे धन कमावण्याचे मार्ग होते; पण अहिल्याबाईंनी धन कमावण्याचे, धन मिळवण्याचे नवे मार्ग शोधले होते. त्यांचा उपयोग केला होता.
 
अ) उद्योग
 
 
महेश्वर आजसुद्धा हातमाग व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे, ज्याची सुरुवात अहिल्याबाईंनी 300 वर्षांपूर्वी केली होती. तेव्हा इंदौर हेसुद्धा छोटेसे गाव होते, जे होळकरांनी विकसित केले होते. अहिल्याबाईंनी आपली राजधानी 1767 मध्ये महेश्वरला हलवली आणि तीही अल्पावधीतच विकसित केली. तिथे त्यांनी विणकर म्हणजे मारू समाजाला आणून महेश्वरमध्ये वसवले. अहिल्याबाईंनी युद्ध किंवा लढाईचे समर्थन केले नाही; परंतु युद्धमोहिमा होतातच. युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या पत्नी व परिवारांच्या चरितार्थासाठी त्यांना विणकरीचे प्रशिक्षण दिले. त्यासाठी बनारसी विणकरांना बोलावले आणि महेश्वरला वस्त्र उत्पादन सुरू केले, त्यातून ‘माहेश्वरी’ हा ब्रँड बनला.
 

Ahilyabai Holkar 
 
आज स्व-सहायता समूह, विणकरांच्या, कारागिरांच्या किंवा महिलांच्या सहकारी संस्था केल्या जातात. ही प्रागतिक कल्पना अहिल्याबाईंनी महेश्वरमध्ये 18व्या शतकात यशस्वीपणे अमलात आणली होती. आज अमलात असलेल्या अनेक अभिनव कल्पनांच्या जनक अहिल्याबाई होत्या.
 
ब) व्यवसायाचे आधारस्तंभ
 
कोणत्याही व्यवसायाचे चार आधारस्तंभ असतात. 1. कौशल्य- Skill and Labour, 2. भांडवल- Capital, 3. जमीन- land, 4. कच्चा माल-Raw material. महेश्वरला राजधानी वसवताना त्यांनी याचा विचार केला होता असे जाणवते. राज्याकडची अतिरिक्त जमीन व्यापार्‍यांना उपलब्ध करून दिली गेली. नव्या वस्त्या वसवल्या गेल्या. त्यांना कौशल्ये शिकवली गेली. कच्चा माल उपलब्ध करून दिला गेला. व्यापारी, व्यावसायिक लोकांना स्वत:च्या खासगी कोषातून अल्प व्याज दर आकारून कर्जे दिली गेली. याचा परिणाम असा झाला की, त्यांचा निजी कोष वाढला, त्याबरोबरच व्यापारवृद्धीही झाली. अशा पद्धतीने राज्यात त्यांनी व्यापार व उत्पादन त्यांनी वाढवले.
 
क) शेती
 
भारतात आर्थिक व्यवस्था नेहमी शेतीप्रधान राहिलेली आहे. शेती हाच समाजाच्या चरितार्थाचे साधन व संस्कृतीचा आधारस्तंभसुद्धा आहे. आजच्या काळात आधुनिक कृषी कायद्यांच्या अंतर्गत शेतमाल कुठेही विकायला परवानगी मिळावी, अशी मागणी केली जाते. ती सुविधा अहिल्याबाईंनी 18 व्या शतकात लोकांना दिली होती. त्यांच्या काळात शेती लाभदायक होण्याचे एक महत्त्वाचे कारण होते त्यांचे पाणी व्यवस्थापन. खासगी उपयोगासाठी प्रदूषणमुक्त पाण्याचे स्रोत, वेगळे प्रवाह आणि शेतीच्या उपयोगासाठी वेगळे स्रोत हे नियोजन लाभदायक ठरले. त्यांनी पशुपक्ष्यांसाठी राखीव शेत ठेवण्याची अभिनव कल्पना राबवली, त्यामुळे उभ्या शेतात पाखरांनी धाड घालून शेत फस्त करण्याच्या घटना टळल्या. त्याचा शेतकर्‍यांना फायदा झाला, शेतीची लाभप्रदता वाढली.
 
ख) पर्यावरण
 
सार्वजनिक वनीकरण, वृक्षारोपण आणि संरक्षित वनांची त्यांनी परिकल्पना लढवली. त्याचा परिणाम व्यामिश्र म्हणजे एकाच वेळी पर्यावरणावर आर्थिक, सामाजिक व प्राकृतिक असा झाला. भूमिहीन शेतकर्‍यांना त्यांनी कसायला जमीन दिली. त्यांना वड, पिंपळ, आंबा, औदुंबर, कवठ अशा भूमिगत जलाचा स्तर वाढवणार्‍या झाडांची लागवड करायला सांगितली आणि ‘नौ ग्यारह कानून’ लावला. लावलेल्या 20 झाडांपैकी नऊ झाडांचे उत्पन्न शेतकर्‍याने स्वत:कडे ठेवायचे व 11 झाडांचे उत्पन्न सरकारकडे जमा करायचे. यातून सरकारचे उत्पन्न वाढत होते. जनतेचे हितही साधले जात होते. आज ज्याला Public Private Participation (PPP)  म्हटले जाते त्या ‘प्रशासन व व्यक्ती सहकार्य’ कल्पनेचा पाया अहिल्याबाईंनी रचला होता, हे आपण सार्थ अभिमानाने म्हणू शकतो.
 
 
ग) व्यापार
 
सुराज्य आणि व्यापार यांचा घनिष्ठ संबंध आहे. माळवा प्रांत भारताचे मध्यवर्ती स्थान आहे. त्या भौगोलिक स्थानाचा फायदा त्यांना मिळाला आणि त्यांनी तो करून घेतला. त्या काळात होळकर राज्याला जकात किंवा Road Tax मधून चांगले उत्पन्न येत होते. अहिल्याबाईंच्या दूरदर्शीपणाला व न्यायप्रवणतेला त्याचे मोठे श्रेय जाते. त्यांच्या एकीकृत प्रयत्नांमुळे त्या काळात होळकर राज्याचे उत्पन्न 75 लाखांवरून वाढून एक कोटी पाच लाख झाल्याची नोंद कागदपत्रात सापडते.
 
 
नवाचार
 
जनतेच्या आर्थिक संपन्नतेसाठी अनेक नवे प्रयोग, नव्या कल्पना अहिल्याबाईंनी अमलात आणल्या. आज ज्यांना नवाचार म्हणजेच   Innovationम्हटले जाते, त्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. त्यापैकी एक सामूहिक व्यवसाय करण्याची कल्पना आणि त्यांची सहकारी संस्था उभी करण्याची कल्पना.
 
 
अन्य देशीय/विदेशी गुंतवणूक - FDI - आजच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या समीकरणात विदेशी गुंतवणुकीला महत्त्वपूर्ण स्थान आहे. विदेशी गुंतवणूकदाराला आकर्षित करायचे तर शांतता, सामाजिक सलोखा, व्यापारस्नेही वातावरण, पोषक कर धोरण आणि योग्य वायुमंडल असे अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यकाळात या मु्द्द्यांकडे लक्ष दिले. सावकार या रचनेचा उपयोग त्यासाठी करून घेतला होता. व्यापारस्नेही वातावरण असल्यामुळे माळवा प्रांत व्यापार्‍यांना प्रिय होता. रस्ते, विहिरी, धर्मशाळा अशा सोयीसुविधा (Infrastructure services) त्यांनी निर्माण केल्या. या कामांना केवळ ‘धार्मिक कामे’ या गटात आपल्याला टाकता येणार नाही. तसे करणे हे त्यांच्या दूरदर्शितेचा संकोच केल्यासारखे होईल. केवळ माळवा प्रांतात नव्हे, तर उत्तर - दक्षिण - पूर्व - पश्चिम दिशांना त्यांनी या सुविधा निर्माण केल्या. त्यातून भारत धार्मिकदृष्ट्या जोडला गेलाच; पण महत्त्वाचे म्हणजे आर्थिकदृष्ट्या, पर्यटनदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या जोडला गेला. दळणवळण सुलभ नसलेल्या त्या काळात त्यांनी काशी ते कलकत्ता हा सुमारे 700 कि.मी. लांबीचा रस्ता बांधण्याचे कार्य केले.
 
 
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा विचार
 
आजसुद्धा महिलांना त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्य, कुटुंबाच्या उत्पन्नावर अधिकार, वाटा यासाठी झगडावे लागते. त्यांच्या आर्थिक निर्णयातला सहभाग, पैसे कुठे खर्च करायचे, कुठे गुंतवायचे, या निर्णयाच्या अधिकारांबद्दल आपण बोलतो. विधवा महिलांची स्थिती अजूनच गंभीर! तत्कालीन सामाजिक प्रथेनुसार अपत्यहीन विधवेची संपत्ती सरकारजमा होत असे. त्यांनी विधवा स्त्रियांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार व पारिवारिक संपत्तीचा आपल्या इच्छेनुसार उपयोग करण्याचा अधिकार दिला. न्यायोचित बुद्धी, आत्मविश्वास, योग्य-अयोग्य यांचा पाचपोच आणि धाडस या गुणांच्या संयोगातूनच हे घडू शकले. म्हणून अहिल्याबाई म्हणजे आजच्या काळातल्या मुली-स्त्रियांसाठी एक अनुकरणीय ‘रोल मॉडेल’ ठरतात. स्त्रीची आर्थिक स्वयंपूर्णता हे मूलगामी तत्त्व त्यांनी सहज स्वीकारलेले होते, त्याची कसून अंमलबजावणी करण्याचे असामान्य धैर्यही त्यांनी दाखवले होते.
2. अर्थ व्यवस्थापन
 
अहिल्याबाई होळकरांच्या कार्यकाळात त्यांनी न्याय्य व उचित कर लावले होते. वसुलीची व्यवस्था चोख होती; पण देश-काल-परिस्थितीनुसार त्यात सवलत देणे हा त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा दाखलाच होय. इतिहास व मध्ययुगीन काळ पाहिला तर मनमानी कर लावले जात होते व वसुली व्यवस्था ही दमनकारी होती. अहिल्याबाई होळकरांनी अनावश्यक कर रद्द ठरवले. पीक किती आले त्या आधारावर कर लावत असत. दुष्काळ पडला असेल तर करमाफी दिली जात असे. आजारपण, लग्नकार्य, युद्ध अशा अन्य अडचणींच्या काळात सुलभ हप्त्यांमध्ये कर भरण्याची सवलतही दिली जात असे. अहिल्यादेवींनी आर्थिक शिस्तीचा वस्तुपाठ घालून दिला. त्याच वेळी समाजहित व व्यक्तीची प्रापंचिक व प्रासंगिक स्थिती पाहून निर्णय करण्याची लवचीकता त्यांच्याकडे होती. भिल्ल समाज वाटमारीसाठी प्रसिद्ध होता, त्यांचे प्रबोधन करून, लूटमारीपासून समाजाचे रक्षण करून त्यांनाच करवसुलीचे काम दिले. भिल्लांना आत्मसन्मान मिळवून दिला, त्यांच्या क्षमता उपयोगात आणल्या. त्यांचे शासन न्यायप्रवणता, प्रशासनिक कंट्रोल व कर-कायद्यांचे प्रभावी कार्यान्वयन यांचे म्हणजेच गुड गव्हर्नसचे अद्वितीय उदाहरण आहे.
 
 
अहिल्याबाई आर्थिक नियोजन व हिशोब यात पक्क्या होत्या. रागाच्या भरात दरबारात हिशोबाच्या वह्या फेकून दौलतीचा अपमान करणार्‍या पतीकडून दंड वसूल करणार्‍या त्या आदर्श प्रशासिका होत्या. त्यांचे अनुशासन, निष्पक्ष भूमिका व नियमांची कठोर अंमलबजावणी प्रशंसनीय होती. त्यांचे स्वत:चे खर्च, अगदी खाण्यापिण्याचा खर्चही व दानधर्मही वैयक्तिक कोशातून होत असे, सरकारी कोशातून नाही.

नयना सहस्रबुध्दे

स्त्रीविषयक लेखनासाठी प्रसिध्द असणाऱ्या नयना सहस्रबुध्दे या भारतीय स्त्री शक्ती या संघटनेच्या संस्थापक सदस्य आहेत. भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणूनही त्या कार्यरत होत्या. नयना सहस्रबुध्दे या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदावर कार्यरत होत्या. सध्या महिला बँकेत डेप्युटेशनवर रुजू झाल्या आहेत. साप्ताहिक विवेकमध्ये स्त्रीभान या सदरातून त्या स्त्रीविषयक लेखन करत आहेत.