मेरी आवाज सुनो - मदन मोहन आणि मोहम्मद रफी यांचा सांगीतिक प्रवास

विवेक मराठी    19-Oct-2024   
Total Views |
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाला आपल्या संगीतरचनेने झळाळी देणारे आणि आपल्या सुरेल गायकीने मंत्रमुग्ध करणारे प्रतिभावान कलाकार म्हणजे ज्येष्ठ संगीतकार मदनमोहन आणि ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी. या द्वयींचे हे जन्मशताब्दी वर्ष. 1950 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आँखे’ या सिनेमात मदन मोहन आणि रफीजींनी पहिल्यांदा एकत्र काम केले. हा सांगीतिक सिलसिला पुढे अनेक वर्षे चालला. या पंचवीस वर्षांत, मदन मोहन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली रफीजींनी 168 गाणी गायली. यातली जवळजवळ सर्वच गाणी अजूनही लोकप्रिय आहेत. त्यातील काही लोकप्रिय गीतांचा हा आढावा.

madan mohan and rafi
 
साल 1937. स्थळ - लाहोर.
 
प्रसिद्ध कलाकार के. एल. सैगल एका कार्यक्रमात गाणार होते. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होती. अचानक वीज गेली.
 
मायक्रोफोनशिवाय गाण्यास सैगल यांनी नकार दिला. कार्यक्रम सुरू होण्यास विलंब झाल्याने प्रेक्षक अस्वस्थ झाले. प्रेक्षकांत एक तेरा वर्षांचा मुलगा होता. त्याला गाण्याची आवड होती. थोडेबहुत गाण्याचे शिक्षणही झाले होते.
 
प्रेक्षकांना शांत करण्यासाठी, अवघ्या तेरा वर्षांच्या मोहम्मद रफी या मुलाला गाण्याची संधी मिळाली.
 
माइक नसतानाही, आपल्या खणखणीत आवाजात तो मुलगा गाऊन गेला. केवळ प्रेक्षकांनाच नाही तर दर्दी रसिकांनासुद्धा या आवाजाने मंत्रमुग्ध केले.
 
सैगलजींचा आशीर्वाद तर मिळालाच; पण प्रसिद्ध संगीतकार शाम सुंदर यांनाही या मुलाचा आवाज आवडला आणि पार्श्वगायनाचे दरवाजे मोहम्मद रफी यांच्यासाठी उघडे झाले.
 
साल 1941 मध्ये रफीजींचे पहिले गीत रेकॉर्ड झाले. मोठ्या कष्टाने वडिलांची परवानगी मिळवून रफीजींनी लाहोरवरून मुंबईकडे प्रयाण केले.
 
सुरुवातीचा काळ जरी संघर्षाचा असला तरी काहीच वर्षांत, त्यांनी नौशादजींच्या दिग्दर्शनाखाली ‘पहले आप’ या चित्रपटासाठी गीत गायले.
 
हिंदी चित्रपटाच्या इतिहासात एका सुरेल तार्‍याचा उदय झाला.
 
24 डिसेंबर 1923 रोजी रफीजींचा जन्म झाला. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.
 
अनंत काळाच्या या सांगीतिक प्रवासात, 1923/24 ह्या वर्षाला गंधर्व लोकांचा आशीर्वाद असावा. याच काळात केवळ सहा महिन्यांच्या अंतराने, हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाला आपल्या संगीतरचनेने झळाळी देणारा एक प्रतिभावान संगीतकार जन्माला आला.
 
 
पंजाबी असलेल्या मदन मोहन कोहली यांचा जन्म इराकमध्ये, 25 जून 1924 ला झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड असणार्‍या मदन मोहन यांचे शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण काही फार झाले नाही; मात्र नसानसांत गाणे मुरल्याने, एक चांगला गायक म्हणून त्यांच्या नातलगांत आणि मित्रगणांत ते प्रसिद्ध होते.
 
 
madan mohan and rafi
 
सीनिअर केम्ब्रिजची परीक्षा झाल्यावर, वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी मिलिटरी शाळेत प्रवेश घेतला आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर लेफ्टनंट म्हणून ते फौजेत भर्ती झाले. त्यांचे मन इथे रमले नाही. वडिलांच्या इच्छेविरुद्ध, आर्मी सोडून, रेडिओ लखनौमध्ये त्यांनी नोकरी धरली. इथे त्यांची अनेक संगीतकारांशी, वादकांशी आणि गायकांशी ओळख झाली.
 
संगीतकार म्हणून त्यांच्या कारकीर्दीचा पाया इथेच रचला गेला.
 
मुंबईच्या बॉम्बे टॉकीजमध्ये त्यांचे वडील जरी भागीदार असले तरी मदन मोहन यांचा प्रवास काही सोपा नव्हता. वडिलांचा प्रखर विरोध असल्याने जवळ पैसे नव्हते. कामाच्या शोधात करावी लागणारी वणवण, काम मिळाले तरी मोबदला न मिळणे, अपमान होणे हे सर्व अनुभव त्यांच्याही वाट्याला आले.
 
अखेर 1950 साली, स्वतंत्ररीत्या संगीतकार म्हणून त्यांना पहिला चित्रपट मिळाला ’आँखे’.
 
चित्रपटाचे संगीत गाजले. वडिलांनी आपला विरोध मागे घेतला. यानंतरच्या काळात आलेल्या ‘मदहोश’, ‘आशियाना’, ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’, ‘भाई-भाई’ या चित्रपटाने उत्कृष्ट संगीतकार म्हणून त्यांचे स्थान पक्के केले.
 
 
मोहम्मद रफी आणि मदन मोहन यांच्या सांगीतिक कारकीर्दीवर लिहिताना एक लेख काय, एक पुस्तकसुद्धा अपुरे पडेल याची जाणीव आहे. असंख्य गीतांतून गाण्यांची निवड करतानाच श्रोत्यांचा कस लागेल याचीही खात्री आहे.
 
ही निवड करणे सोपे जावे म्हणून मदन मोहन यांनी मोहम्मद रफी यांच्यासाठी संगीतबद्ध केलेली गीते हा विषय लेखासाठी निवडला आहे.
 
 
1950 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आँखे’ या सिनेमात मदन मोहन आणि रफीजींनी पहिल्यांदा एकत्र काम केले. हा सांगीतिक सिलसिला पुढे अनेक वर्षे चालला.
 
या पंचवीस वर्षांत, मदन मोहन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली रफीजींनी 168 गाणी गायली. यातली जवळजवळ सर्वच गाणी अजूनही लोकप्रिय आहेत. त्यातील काही लोकप्रिय गीतांचा हा आढावा.
 
 
बस्ती बस्ती परबत परबत गाता जाये बंजारा
 
- रेल्वे प्लॅटफॉर्म -1956 (गीतकार- साहिर लुधियानवी)
 

madan mohan and rafi  
 
‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या सिनेमाची सुरुवात या गीताने होते. सिनेमाच्या नामावलीच्या पार्श्वभूमीवर हे गीत पडद्यावर चित्रित झाले आहे. पडद्यावर एका याचकाने किंवा भिक्षुकाने (मनमोहन कृष्ण)गायलेले हे गीत काहीसे उपदेशप्रद आणि थोडेसे उपहासात्मक आहे. आयुष्याची अनिश्चितता हे मानवी जीवनाचे अंतिम सत्य आहे. ज्या घटना घडणार आहेत त्या घडून जाणार आहेत. आपल्या हातात आहे, जो पथ आपण निवडला आहे त्यावर अथक चालणे.
 
धन-दौलत के पीछे क्यों है ये दुनिया दीवानी
यहाँ की दौलत यहाँ रहेगी, साथ नहीं ये जानी
 
आपल्या आयुष्यात माणूस सर्व गोष्टींच्या, मग ते पैसे असो वा प्रेम, मागे लागतो. या सर्व गोष्टी क्षणभंगुर असतात, हे मात्र त्याला उमजत नाही. जेव्हा आयुष्याचा प्रवास संपतो तेव्हा कुणीही साथ देत नाही. महत्त्वाचे आहे ते वर्तमानात जगून हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करणे आणि आयुष्याचा आनंद घेणे. हे गीत जीवनाचे रूपक आहे.
 
 
मदन मोहन यांनी गीताला चाल देताना, त्यातील भावनांच्या गहिरेपणाचा विचार करून आपल्या सुरावटी बांधल्या. शब्दांचे सामर्थ्य ते जाणून होते. यामुळे त्या हृदयस्पर्शी झाल्या. मींड, हरकती, मुरक्या यांचा उपयोग केल्याने त्यांच्या चाली क्लिष्ट आहेत, असे म्हटले जाते; पण इथे मात्र एक सामान्य, भटकी व्यक्ती जसे गीत गाईल तितकीच सरळ चाल बांधली आहे.
 
 
सिनेमासाठी जेव्हा गाणी रचली जातात, तेव्हा कथा पुढे सरकवणे हे एक उद्दिष्ट असते. सिनेमातील गाणी, ही निर्मात्याला पैसे देणारी खाण असल्याने लोकांच्या अभिरुचीचासुद्धा विचार केला जातो. सुरांशी इमान राखून बनवलेल्या गाण्यांचे प्रमाण अतिशय कमी असते. ‘हकीकत’ या सिनेमात मात्र या तिन्ही अंगांचा विचार करून गाणी बनलेली आहेत.
 
1962 मधील भारत-चीन युद्धावर आधारित असलेल्या या चित्रपटात गाण्याचे ते काय महत्त्व असणार, अशा मताला मदन मोहन यांच्या संगीताने मात दिली. यातले ‘कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियों’ हे तर राष्ट्रगीताच्या जवळ जाणारे गीत आहे आणि अत्यंत लोकप्रिय आहे.
 
आपले कर्तव्य चोखपणे बजावणारा देशाचा बहादूर सैनिक, सीमेवर थंडी, ऊन, वारा, पाऊस या कशाचीही पर्वा न करता कार्यरत असतो म्हणून आपण शांतपणे आपले आयुष्य जगू शकतो. ह्या सैनिकांच्या गणवेशाच्या आत मात्र आपल्यासारखाच हाडामांसाचा माणूस असतो. त्याचा कौटुंबिक चेहरा दाखवणारे एक सुरेल गीत या चित्रपटात आहेत. येणारा दिवस काय घेऊन उगवणार आहे याची कल्पना नाही आणि मृत्यू तर डोळ्यासमोर उभा आहे. अशा वेळी आपल्या प्रियजनाची आठवण अस्वस्थ करते. क्षणभर का होईना, मन कचरते.
 
‘होके मजबूर मुझे, तुमने बुलाया होगा’
 
- हकीकत - 1964 (गीतकार- कैफी आझमी)
 
ह्या गीतात त्यांच्याबरोबर, तलत महमूद, मन्ना डे आणि भूपिंदर सिंग यांचाही आवाज त्यांच्या रेंजचा विचार करून वापरला आहे. यातील दुसर्‍या कडव्यासाठी रफीजींनी आवाज दिला आहे.
 
‘उसने घबराके नज़र लाख बचाई होगी
 
दिल की लुटती हुई दुनिया नज़र आई होगी
 
मेज़ से जब मेरी तस्वीर हटाई होगी
 
हर तरफ़ मुझको तड़पता हुआ पाया होगा...’
 
1962 मध्ये चीनने केलेला हल्ला अतिशय अनपेक्षित होता. भारताची ना मानसिक तयारी होती ना लष्करी ताकद. अप्रशिक्षित, अपुरी साधने असलेल्या सैनिकांसाठी हा मृत्यूचा सापळा होता.
 
 
आपण आपल्या प्रेमाच्या लोकांना परत पाहू शकणार नाही याची जाणीव आणि त्यांच्या घरच्या लोकांची झालेली अवस्था कैफी आझमी यांनी शब्दांत गुंफली आहे.
 
 
मनाची उद्विग्न अवस्था, जगण्याची संपलेली आशा, जिच्याबरोबर आयुष्य घालवायची स्वप्ने पाहिली ती संपल्याचा एहसास, त्यातही तिच्या मनाचा विचार, प्रेम, वेदना, विरह ह्या सर्वांचा संगम असलेले हे गीत आहे. यात क्लॅरिनेट या बासुरीसदृश वाद्याचा फार सुंदर उपयोग केला आहे.
 
 
1964 साल तर मदन मोहन याच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. या काळात प्रदर्शित झालेल्या, ‘जहाँ आरा’, ‘हकीकत’, ‘सुहागन’, ‘आप की परछाईयाँ’, ‘गज़ल’, ‘वो कौन थी’ या सर्वच सिनेमांचे संगीत आजही लोकप्रिय आहे.
 
 
लखनौ येथील रेडिओ केंद्रात काम केल्यामुळे बेगम अख्तर, तलत महमूद या गज़ल गायकांशी त्यांची ओळख झाली होती. त्यांच्या सांगीतिक रचनांवर याचा बराच प्रभाव पडला. गज़लसम्राट म्हणून नावाजलेल्या मदन मोहन यांना याच नावाच्या चित्रपटात संधी मिळावी हा गज़लनेच दिलेला आशीर्वाद असावा.
 
 
गज़ल म्हणजे दैनंदिन आयुष्यातील छोट्यामोठ्या अनुभूतींवर केले जाणारे तंत्रशुद्ध काव्य. पराकोटीची तीव्रता असणारे प्रेमकाव्य हीसुद्धा गज़लची ओळख आहे. मानसिक वेदना हा गज़लचा पाया आहे. शब्दांचे महत्त्व जाणून, त्यातील भाव जागे करणारी सरगम बांधणे ही मदन मोहन यांच्या संगीताची खासियत होती, तर शब्दांमागील भाव जाणून, त्यांना आपल्या स्वरांनी उठाव देणे यावर रफीजींची हुकमत होती.
 
रंग नूर और की बारात
- गज़ल -1964 (गीतकार- साहिर लुधियानवी)
 
मीनाकुमारी आणि सुनील दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सामाजिक चित्रपट मुस्लीम कुटुंबाच्या परंपरांवर आधारित होता. नायिका ही गज़लकार, त्यामुळे साहिर लुधियानवी यांच्या अप्रतिम गज़ल यात घेतल्या आहेत.
 
नायक-नायिकेचे प्रेम असूनही, काही गैरसमजांमधून नायिकेचे लग्न दुसर्‍याशी ठरवले जाते. तिच्या लग्न समारंभात नायक हे गीत गातो.
 
 
‘कौन कहता है के चाहत पे सभी का हक़ है
 
तू जिसे चाहे, तेरा प्यार उसी का हक़ है’
 
जेव्हा, एखाद्या व्यक्तीवर जीव तोडून प्रेम केलं जाते, तेव्हा ती व्यक्ती तुमचे आयुष्य व्यापते. जेव्हा अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जाते, तेव्हा हे सर्व खोटे होते या जाणिवेने माणूस खचतो. फसवणुकीचा राग आणि प्रेम गमावल्याचे दुःख माणसाला नैराश्येच्या दारात नेते. रफीजींचा आवाज या वेदनेच्या खोलीचा आणि हतबलतेचा प्रत्यय देतो.
 
 
‘मुझसे कह दे, मैं तेरा हाथ किसे पेश करूँ’ हे शब्द म्हणजे प्रेयसीचा घेतलेला निरोप आहे. अशीच एक नितांतसुंदर गज़ल ‘आप की परछाईयाँ’ या सिनेमात आहे.
 

madan mohan and rafi  
 
मैं निगाहें तेरे चेहरे से हटाऊँ कैसे
आप की परछाईयाँ-1964 (गीतकार-राजा मेहदी अली खान)
 
असे म्हणतात, जे मनात असते तेच डोळे पाहतात.
 
नायकाच्या मनात तिने केव्हाच जागा केली आहे. तिचा चेहरा पाहिल्यानंतर त्याच्यासाठी काळसुद्धा थांबला आहे.
‘मैं निगाहें तेरे चेहरे से हटाऊँ कैसे
लुट गए होश तो फिर होश में आऊँ कैसे?’
 
हा प्रश्नसुद्धा निरर्थक. बेहोशीमधून बाहेर पडायची इच्छा तरी कुठे उरली आहे?
 
गाण्यात प्रेम आहे, आकर्षण आहे, ओढ आहे. रोमान्सच्या सर्व छटा रफीजींनी आपल्या आवाजातून दाखवल्या आहेत. यातली ‘तौबा तौबा तौबा तौबा तौबा तौबा,
 
वो नशा है कि बताऊँ कैसे’ ही ओळ ऐका. हा एकच शब्द त्यांनी वेगवेगळ्या सुरावटीत गायला आहे आणि प्रत्येक वेळेला तो तेवढाच नशिला गायला आहे.
 
 
1964 मधील ‘वो कौन थी’ या रहस्यमय चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जे यश मिळवले त्यात त्याच्या संगीताचाही मोठा वाटा होता. या सिनेमाच्या यशाने प्रेरित होऊन निर्माता राज खोसला याने ‘मेरा साया’ या चित्रपटाची निर्मिती केली.
 
लता मंगेशकर यांनी गायलेले टायटल गीत ‘तू जहाँ जहाँ चलेगा’, ‘नैनो में बदरा छाये’, आशा भोसले यांनी गायलेले ‘झुमका गिरा रे’ ही गाणी अतिशय प्रसिद्ध झाली. सिनेमा स्त्रीप्रधान होता आणि कथेच्या अनुषंगाने नायकाला गाण्याची संधी नव्हती. तरीही एक अप्रतिम विरहगीत रफीजींच्या वाट्याला आले.
 
‘आपके पहलू में आकर रो दिये’
 
- मेरा साया - 1966 (गीतकार- राजा मेहदी अली खान)
 
नायकाच्या पत्नीचा अकस्मात मृत्यू झाला आहे. या धक्क्यातून तो अजून सावरला नाही तोच त्याच्या पत्नीसारखी दिसणारी एक अनोळखी मुलगी, या साधर्म्याचा फायदा घेऊन, त्याच्या पत्नीची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे. उद्ध्वस्त मनाचे प्रतिबिंब या गीतात आहे.
 
 
‘शाम जब आँसू बहाती आ गयी
 
हर तरफ ग़म की उदासी छा गयी
 
दीप यादों के जला कर रो दिए’
 
शाम या शब्दावर घेतलेली छोटीशी हरकत हा खास रफीस्पर्शच. मदन मोहन यांनी त्यांच्या संगीतरचनेत सतार आणि व्हायोलिनचा वापर सातत्याने केला. यात बासरीची कमाल आहे. राजा मेहदी अली खान यांचे शब्द, मदन मोहन यांचे सूर आणि रफीजींचा आवाज फक्त गाणे निर्माण करत नाहीत, ते विरहाच्या चिरंतन वेदनेला जन्म देतात. नायकाच्या दुःखाला वाचा फोडणारे हे सूर ऐकले की, प्लेबॅक संगीत म्हणजे काय ह्याचा अंदाज येतो.
 
 
मदन मोहन यांनी शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेतले नाही. असे असूनही रफीजींनी गायलेली, ‘मैं निगाहें तेरे चेहरे से हटाऊँ कैसे’, ‘बस्ती बस्ती परबत परबत’ (दरबारी कानडा), ‘रंग और नूर की बारात’ (शिवरंजनी), ‘आपके पहलू में आकर रो दिये’ (पिलू), ‘कैसे कटेगी जिंदगी तेरे बगैर’ (झिंझोटी), ‘बरबाद मोहब्बत की दुआ साथ लिये जा’ (मिश्र झिंझोटी खमाज), ‘मै ये सोचकर उसके दर पे उठा था’ (पिलू) ही सर्व गाणी रागदारीवर आधारित आहेत.
 
 
तसेच एका गीतात, प्रत्येक कडव्यासाठी वेगळी चाल बांधणे, हीसुद्धा त्यांची खासियत होती. ‘एक हसीन शाम को’, ‘तुम जो मिल गये हो’, ‘तुमसे कहू एक बात’, ‘बरबाद-ए-मोहब्बत की दुआ साथ लिए जा’, ‘ये दुनिया ये मैफिल’ आणि अनेक गीते, ज्यात एकाच गीतात अनेक मेलडी गुंफलेल्या आढळतील.
 
 
मदन मोहन यांची उत्कृष्ट गाणी निवडण्याचा प्रयास करण्यापेक्षा त्यांचे उत्कृष्ट संगीत असलेले चित्रपट शोधणे सोयीचे ठरते.
‘गजल’, ‘जहाँआरा’, ‘वो कौन थी’, ‘अदालत’, ‘हीर रांझा’, कोणताही सिनेमा घ्या, यातली सर्व गाणी उत्कृष्ट आहेत. प्रत्येक गीत, दुसर्‍या गीतापासून वेगळे आहे.
 
 
असाच एक सिनेमा ‘दस्तक’; ज्याच्या संगीतासाठी मदन मोहन यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवले गेले.
‘तुमसे कहूँ इक बात परों सी हल्की-हल्की’
 
- दस्तक-1970 (मजरुह सुलतानपुरी)
 
हिंदी सिनेमातील रोमान्सची व्याख्या शारीरिक आहे आणि म्हणूनच सेन्सॉरच्या कात्रीत न येणारे उत्तेजक गीत लिहिणे, त्याला संगीत देणे आणि ते चित्रित करणे ह्या गोष्टी अत्यंत अवघड आहेत.
 
 
‘तुमसे कहूँ इक बात’ ह्या गीताचे शब्द उत्तेजक आहेत. त्यातला आशयसुद्धा स्पष्ट आहे. शयनगृहात याचे झालेले चित्रीकरणसुद्धा शब्दांना धरून आहे.
 
 
‘है भीगा सा जिस्म तुम्हारा इन हाथों में
 
 
बाहर नींद भरा पंछी भीगी शाखों में
 
और बरखा की बूंद बदन से ढलकी-ढलकी
 
तुमसे कहूँ इक बात’
 
हा 1970 चा काळ. सेन्सॉरच्या कात्रीत न सापडेल असे गाणे निर्माण करणे तेव्हा सोपे नव्हते; पण रफीजींच्या आवाजाने हे शक्य झाले. गाण्याची लय संथ आहे. कमीत कमी वाद्ये आणि हळुवार साद घालणारा मादक आवाज.
 
 
एखाद्या प्रिय व्यक्तीशी कुजबुज करावी असे गीत आहे आणि त्यात गाण्याची लय सांभाळणे विलक्षण कठीण आहे. ह्यात सुरुवातीला व्हायब्राफोनचा उपयोग केला आहे. साथीला काँगो आणि तार शहनाई, तर शेवटी जलतरंगचा वापर केला आहे.
वाहत येणारा रफीचा स्वर, त्यात ओढ आहे, आतुरता आहे आणि देण्याघेण्यातले समर्पणसुद्धा.
 
 
‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये लिहिले गेले होते, गायनात मी तुझ्यावर प्रेम करतो हे सांगण्याचे 101 मार्ग असतील तर रफीजींच्या सुरांना ते सर्व माहिती आहेत.
 
 
‘तुम जो मिल गए हो, तो ये लगता है कि जहां मिल गया’
 
 
- हसते जख्म- 1963 (गीतकार- कैफी आझमी)
 
 
श्रीमंत घरातील नायक, पण आयुष्याला दिशा नाही. एक भरकटलेले जीवन आणि भरलेल्या जगात जाणवणारे एकटेपण. कुठे तरी स्थिरावे असा किनारा नाही आणि ती येते.
 
 
त्याला जाणवते की, आपला शोध संपला आहे त्यातून आलेला तो समाधानाचा हुंकार ‘मिल गया’ ह्या शब्दांवर रफीजींनी दिलेला हलकासा जोर ऐका.
 
 
‘अजनबी ज़माना, अपना कोई न था
 
दिल को जो मिल गया है तेरा सहारा
 
इक नई ज़िंदगी का निशां मिल गया’
 
 
आयुष्याच्या चक्रव्यूहात फसलेले दोन अनोळखी जीव, अपघाताने एकत्र येतात आणि आयुष्य उजळून निघते.
 
मदन मोहनच्या संगीतात हे झपाटलेपण आहे. ज्ञान वर्मा आणि केसरी लॉर्ड यांनी या गीताचे संयोजन केले. यातली सिम्फनी आणि वाद्यांचा मेळसुद्धा अभ्यास करण्यासारखा आहे. सुरुवात पियानोने होते. नंतर गिटार, बास, ड्रम आणि मग रोलिंग ड्रम या क्रमाने गीत पुढे सरकते. ढगांचा गडगडाट होण्याच्या आधी बासरीचा उपयोग केला आहे.
 
पहिल्या कडव्यानंतर वाद्यांच्या मेळाची गती वाढत जाते. कॉर्ड्स बदलतात.
 
मदन मोहन यांच्या संगीतात अशी सिम्फनी पहिल्यांदाच आली असावी.
 
 
सुरुवातीला लांब बसलेले नायक-नायिका एकत्र येतात, भेद सरतो, मनाची खूण पटते आणि गाण्याचा हळुवारपणा जाऊन गीत जल्लोषाकडे सरकते. या गीतात लता मंगेशकर फक्त शेवटी येते.
 
 
‘तुम जो मिल गये हो’ तिच्या आवाजातील ही ओळ म्हणजे त्याच्या प्रेमाला दिलेला प्रतिसाद.
 
 
सुरुवातीला हे गीत रसिकांच्या पसंतीला उतरले नव्हते. एक तर याची चाल अत्यंत गुंतागुंतीची आहे. गाण्यातला मूड जसा बदलत जातो, तसा वाद्यांचा मेळ, त्यांची गती आणि अंतर्‍याची चालही बदलते. मदन मोहनच्या नेहमीच्या शैलीपासूनही हे गीत वेगळे आहे, आधुनिक आहे, जॅझच्या अंगाने जाणारे आहे.
 
 
नंतरच्या काळात हे गीत लोकप्रिय झाले. काळाच्या पुढची संगीतरचना म्हणून गौरवले गेले. कोकाकोलानेही आपल्या जाहिरातीत हे गीत वापरले.
 
 
वरील गीतांत काही तत्त्वज्ञान सांगणारी गीते आहेत, काही देशप्रेम जागवणारी, काही प्रेमगीते, काही विरहाची वेदना जागवणारी. या सर्वांतून लक्षात येतो तो रफीजींचा शायराना अंदाज. वाद्यांची साथ नसलेल्या गीतांत तर हे प्रकर्षाने जाणवते.
 
 
इथे सूर महत्त्वाचे असतात आणि शब्दांच्या उच्चारांना, शब्दांच्या फेकेला महत्त्व असते. गीतातून तुम्हाला भावना व्यक्त करायच्या असतात. रफीजींच्या दैवी आवाजात हे गुण होते म्हणून अगदी दगडी चेहर्‍याच्या अभिनेत्यांनासुद्धा त्यांच्या आवाजाने तारले.
 
सत्तरच्या दशकात सिनेमाचे तंत्र बदलले, प्रेक्षकांची आवड आणि समज बदलली तसे संगीतसुद्धा बदलले, स्पर्धा वाढली. आपल्या शैलीशी इमान राखून मदन मोहन यांनी नव्या काळाला सुसंगत असे संगीत दिले. 1975 मध्ये गुलज़ारजींच्या ‘मौसम’ या सिनेमाचे संगीत लोकप्रिय झाले. यानंतर 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लैला मजनू’ या सिनेमाने सुवर्ण जयंती साजरी केली.
त्यात मदन मोहन यांच्या संगीताचा मोठा वाटा होता.
 
 
या काळात किशोर कुमार यांची चलती होती. त्या वेळचे मान्यवर संगीतकार आर.डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी यांनी किशोरच्या आवाजाला प्राधान्य दिले होते. अशा परिस्थितीतसुद्धा मदन मोहन यांनी ‘लैला मजनू’ या सिनेमासाठी रफीजींच्या आवाजाचा आग्रह धरला आणि ‘लैला मजनू’च्या गीतांनी इतिहास घडवला.
 
‘बरबाद-ए-मोहब्बत की दुआ साथ लिए जा’
 
- लैला मजनू 1976 (गीतकार- साहिर लुधियानवी)
 
लैला मजनू, ही वाळवंटात फुललेली कहाणी.
 
त्या वेळच्या गाजलेल्या प्रेमकथांप्रमाणे हिचाही अंत दुर्दैवी आहे.
 
लैलाचे लग्न दुसर्‍या व्यक्तीशी होते. तिची वरात जात असताना मजनू ही गज़ल गातो. रफीजी, साहिर लुधियानवी आणि मदन मोहन यांचे हे शेवटचे गीत.
 
‘इक दिल था, जो पहले ही तुझे सौंप दिया था
 
ये जान भी ऐ जान-ए-अदा साथ लिए जा
 
बरबाद-ए-मुहब्बत की दुआ साथ लिए जा’
 
हृदय तर कधीच तुला देऊन बसलो आहे मी, आता प्राणसुद्धा तू घेऊन जा.
 
सर्वनाश झालेल्या माझ्या प्रेमाचा तू निरोप घेऊन जा.
 
मोहब्बत हा शब्द गाताना मींडचा किती सुंदर उपयोग रफीजींनी केला आहे.
 
 
‘टूटा हुआ इक़रार-ए-वफ़ा साथ लिए जा’ या ओळीत रफीजींच्या आवाजाची रेंज काय होती त्याचाही प्रत्यय येतो. केरवा तालातील हे गीत राग झिंझोटी आणि खमाजवर आधारित आहे. कथा घडते ती मध्यपूर्वेच्या वाळवंटात, त्यामुळे तिथल्या सुरावटीचा उपयोग मेलडी बांधताना केला आहे.
 
 
संगीतकार नौशाद यांचे उद्गार आहेत, मदन मोहनला लतासाठी बनवले होते का लताला मदन मोहनसाठी, हे ठरवणे कठीण आहे. मदन मोहन यांनी लता मंगेशकर यांच्यासाठी बनवलेली गाणी अत्यंत सुरेल आणि लोकप्रिय आहेत. त्यामुळे कदाचित इतर गायकांबरोबर त्यांनी दिलेल्या गीतांकडे थोडेसे दुर्लक्ष होत असेलही; पण रफीजींसाठी बनवलेल्या गाण्याचा दर्जासुद्धा फार वरचा आहे.
 
 
‘हकीकत’ या सिनेमातले ‘मैं ये सोचकर उसके दर से उठा था’ हे गीत ऐका.
 
 
सुरुवातीपासून, शेवटपर्यंत एक उदास सूर गाण्याच्या पार्श्वभूमीवर सतत जाणवत राहतो. त्यांचा नेहमीचा आक्रोश नाही यात तर हतबलतेतून आलेले मूक रुदन आहे.
 
 
हे सुरांतून दाखवणे अत्यंत अवघड आहे.
 
 
‘किसी की याद में दुनिया को है भुलाये हुए, बात मुद्दत के ये घडी आयी’ (जहाँ आरा), ‘तुझे क्या सुनाऊँ मैं दिलरुबा’ (आखरी दाव), ‘शम्मा में ताक़त कहाँ जो एक परवाने में है’ (नया कानून), ‘इक हसीन शाम को दिल मेरा खो गया’ (दुल्हन एक रात की), ‘तुम मेरे सामने है’ (सुहागन), ‘तुम्हारे जुल्फ के साये में शाम’ (नैनिहाल). खरंच, अप्रतिम गजल आणि प्रेमगीते, मदन मोहन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली रफीजींनी गायली आहेत.
 
 
प्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्र म्हणाले होते, मदन मोहन यांनी फक्त सुंदर गजल बनवल्या असे नाही, त्यांनी ज्या काही संगीतरचना केल्या त्या सर्व अत्युत्तम होत्या. कोणत्या गीतासाठी, कोणते वाद्य वापरावे याबाबत त्यांना जे ज्ञान होते, ते कदाचित त्या वेळच्या कोणत्याही संगीतकाराहून सरस होते.
 
 
त्यांची आणखी एक खासियत म्हणजे, गायकाच्या आवाजाचा पोत जाणून त्यांनी संगीतरचना केल्या म्हणून त्या त्या गायकांच्या आवाजात रसिकांना भावल्या.
 
 
रफीजींनी गायलेली अनेक द्वंद्वगीते, केवळ लता मंगेशकरच नाही तर इतर गायिकांबरोबर गायलेली द्वंद्वगीतेसुद्धा अत्यंत लोकप्रिय आहेत.
 
 
काही गाणी बघा.
 
‘दो घडी हो जो पास आ बैठे’, ‘तेरी आँखों के सिवा दुनिया में’, ‘ये हवा ये मस्ताना मौसम’ (सहगायिका- लता मंगेशकर), ‘ज़मीं से हमें आसमाँ पर/बिठा के गिरा तो ना दोगे’, ‘तेरे पास आके मेरा वक़्त गुजर जाता’, ‘हम बुलाते ही रहे’ (सहगायिका- आशा भोसले), ‘मुझे ये फुल ना दे तुझे दिलबरी की कसम’, ‘बाद मुद्दत के यह घड़ी आयी’ (सहगायिका- सुमन कल्याणपूर), ‘गाओ रे, गाओ रे, गाओ रे खुशियोंका तराना झुमके आयी’(सहगायिका- गीता दत्त) आणि अनेक.
 
 
या काळात, काही वर्षे रफीजी आणि लता मंगेशकर यांनी काही वादातून एकमेकांबरोबर गाणे थांबवले होते. या वादाचा फायदा इतर गायिकांना झाला आणि फार दर्जेदार गाणी त्यांच्या वाट्याला आली, ज्यांचे त्यांनी सोने केले.
 
 
हिंदी सिनेमाचे यश अनेक वेळा संगीतावर अवलंबून असते. सर्वसामान्य लोकांच्या ओठावर जी गाणी सहज येतात, ती गाणी समाजाच्या सर्व स्तरांत लोकप्रिय होतात आणि सिनेमा तिकिटबारीवर यशस्वी होतो. त्यासाठी अनेक वेळा तडजोडसुद्धा करावी लागते. आपल्या कलेशी तडजोड करणे मदन मोहन यांना जमले नाही. प्रेम, विरह, वेदना आणि आठवणींच्या जगात नेणारी त्यांची गाणी पहिल्यांदा मनात रुजायची आणि मग हृदयात विराजमान व्हायची. त्यामुळे असेल, ती अजरामर झाली.
 
 
गाणी रागदारीवर आधारित असल्याने काहीशी क्लिष्ट होती. अगदी उडत्या चालीची गाणीसुद्धा सहज गुणगुणता येत नाहीत. गाण्याचे शब्द, अर्थ याबाबतसुद्धा ते आग्रही होते. त्यांचे गाणे दर्दी लोकांसाठी आहे असा समज झाला, जो काही अंशी खरा होता. ही त्यांची, त्यांनी स्वतःला लावून घेतलेली मर्यादा होती. यामुळे त्यांचे कमी सिनेमा यशस्वी झाले.
 
 
सिनेजगतात यश, पैसे आणि लोकप्रिय पारितोषिकांवर मोजले जाते. फिल्म फेअरसारख्या पारितोषिकाने त्यांना हुलकावणी दिली. संवेदशील मन ह्या गोष्टी सहन करू शकत नाही. अत्यंत गुणी असूनही या बाबतीत अन्याय झाल्याने, भ्रमनिरास होऊन ते नैराश्येच्या चक्रात अडकले आणि फक्त 51 व्या वर्षी, 14 जुलै 1975 ला या गुणी संगीतकाराचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर आलेला ‘लैला मजनू’ आणि ‘मौसम’ तुफान चालले; पण ते यश पाहायला मदन मोहन राहिले नाहीत. नियतीनेसुद्धा त्यांच्याबरोबर आशा-निराशेचा खेळ खेळला, असे म्हणावे लागेल.
 
 
मदन मोहन यांच्यानंतर पाचच वर्षांनी, रफीसाहेबांनी या दुनियेचा निरोप घेतला. चार दशकांची गाजलेली सांगीतिक कारकीर्द, 31 जुलै 1980 रोजी जेव्हा अचानक थांबली तेव्हा कधीही न थांबणारे मुंबई शहरसुद्धा थांबले.
 
शहराच्या कानाकोपर्‍यातून लोकांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली.
 
आपल्या लाडक्या गायकाच्या शेवटच्या दर्शनासाठी जनसागर उफाळला होता. तुफान पाऊस असूनही लोकांचा लोंढा थांबत नव्हता.
 
 
मदन मोहन यांचेच शब्द आहेत. गीतरचनेसाठी एकच गोष्ट फार महत्त्वाची आहे.
 
 
थोड्या काळातच ते रसिकांना आवडले पाहिजे आणि अनंत काळापर्यंत ते लोकांच्या मनात राहिले पाहिजे.
 
रफीजी-मदन मोहन यांची गीते ह्या व्याख्येला न्याय देतात.
 
 
ह्या लेखासाठी गीते निवडताना, कोणते निवडायचे, हा प्रश्न नव्हताच; पण जी गीते अत्यंत मधुर आहेत आणि काळालासुद्धा पुरून उरणार आहेत, त्या गीतांतले कोणते वगळायचे, हा प्रश्न त्रास देणारा होता. त्यानिमित्ताने मात्र गाण्यांची जी सुरेल उजळणी झाली ती बरेच काही सांगून गेली.
 
 
1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नौनिहाल’ या चित्रपटातील गीत, ‘मेरी आवाज सुनो’ मदन मोहन आणि रफीजी यांच्यासाठी उचित श्रद्धांजली आहे. हे गीत आहे आशेचे, प्रेमाचे आणि एकतेचे.
 
 
कलाकाराला आपल्या मृत्यूचे भय नसते, कारण तो जाणून असतो की, त्याच्या कलाकृती त्याला रसिकांच्या मनात जिवंत ठेवणार आहेत. कैफी आजमी यांचे हे गीत मृत्यू पावलेल्या कलाकाराचे मनोगत सांगते.
 
 
कलाकार सांगतो, माझ्या मृत्यूचा शोक करू नका. माझ्या सुरांना, शब्दांना ऐका. ते तुम्हाला शांततेचा आणि प्रेमाचा रस्ता दाखवतील.
 
 
‘क्यों सँवारी है ये चन्दन की चिता मेरे लिये
 
मैं कोई जिस्म नहीं हूँ के जलाओगे मुझे
 
राख के साथ बिखर जाऊंगा मैं दुनिया में
 
तुम जहाँ खाओगे ठोकर वहीं पाओगे मुझे
 
हर कदम पर है नए मोड़ का आग़ाज़ सुनो
 
मेरी आवाज सुनो’

प्रिया प्रभुदेसाई

प्रिया  प्रभुदेसाई

अर्थशास्त्रात पदवीत्तर शिक्षण.... सा. विवेक आणि दिव्य मराठीत दोन वर्षे चित्रपट विषयक सदर. दिवाळी अंक, मासिके यात चित्रपटाविषयक लेखन. सेन्सॉर बोर्डवर ज्युरी म्हणून चार वर्षांसाठी निवड.