पर्यावरणाचे रक्षण हे प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. आजवर स्वतःच्या भौतिक प्रगतीसाठी स्वार्थी मानवजातीने पर्यावरणाची अपरिमित हानी केली आहे. त्यामुळेे आपले वर्तमान आणि भविष्यही धोक्यात आले आहे, हे लक्षात घेऊन चूक सुधारण्याची हीच योग्य वेळ आहे. ती सुधारली, तरच तरणोपाय आहे. त्यासाठी पर्यावरण रक्षणाचा विचार, हा आपल्या नित्य चिंतनाचा विचार व्हायला हवा आणि त्यानुसार वर्तनात बदलही व्हायला हवेत. पर्यावरणाचे रक्षण ही सवय म्हणून रुजली तरच या दिशेने पहिले पाऊल पडेल. ही सवय म्हणून व्यक्तीत आणि समूहात कशी रुजेल याचे विविध मार्ग सुचवणारा हा परिसंवाद. त्यातून विवेकी वाचकांच्या विचारांना चालना मिळेल, अशी आशा आहे.
वेद, उपनिषद, इतिहास, पुराण, सणवार, लोककथा, लोकदेवता आदींमधून निसर्गावर प्रेम करायला शिकवले गेले. कोणाही प्राणिमात्राचे अहित करू नये हे शिकवले; पण हे करताना कोणत्याही गोष्टीवर पूर्ण बंदी न आणता त्यावर बंधने आणली. ऋषी-मुनींनी केलेले पर्यावरणाचे चिंतन यज्ञ, मंत्र अथवा कथेच्या रूपाने आबालवृद्धांपर्यंत पोहोचवले गेले. त्या चिंतनाचे पर्यवसान झाले मनामनांत निसर्गाविषयी पूज्यभाव रोवण्यात. पंचमहाभूतांविषयीदेखील कृतज्ञता शिकवली. आपल्या भारतीय पर्यावरण चिंतनात सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शिकवण निश्चित मिळते.
वैदिक काळात ‘पर्यावरण’ हा शब्द नव्हता. ’एर्पींळीेपाशपीं’ ह्या नवीन शब्दासाठी तयार केलेला हा प्रतिशब्द आहे. सर्व बाजूंनी जे आच्छादते त्याला शर्पींळीेपाशपीं म्हटले आहे. त्यामध्ये सजीव- निर्जीव, हवा-पाणी, ऊन-पाऊस, दगड-माती इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश होतो. त्याला अनुसरून पर्यावरण (परि + आवरण, सर्व बाजूंनी ज्याचे आवरण आहे असे ते) हा शब्द तयार झाला. हा शब्द नवीन असला तरी प्राचीन काळापासून भारतीयांनी आपल्या भोवतालाचा आत्मीयतेने विचार केला. त्यातील सर्व घटकांचे परस्पर अवलंबित्व जाणून त्यांचे रक्षण आणि संगोपन होईल असे नेम घालून दिले. हे नेम विविध प्रकारांनी व्यक्त झाले - कधी सृष्टीतील शक्तींवर, प्राण्यांवर, झाडांवर देवत्व बहाल करून त्यांच्या पूजेचे नेम घातले. त्यांच्याविषयी कधी कथांमधून, कधी मंत्रांमधून, तर कधी परंपरांमधून प्रेम, आदर आणि कृतज्ञता शिकवली.
चार-पाच वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे. आमच्या सदनिकेच्या समोरील गुलमोहर आडवातिडवा वाढला होता. त्याच्या काही फांद्या तोडायला शेजारच्या काकांनी एका कामगाराला बोलावले. त्याने काकांनी सांगितलेल्या सगळ्या फांद्या तोडल्या. मग आमच्या उच्चशिक्षित काकांनी त्याला समोरच्या औदुंबराच्याही काही फांद्या तोडायला सांगितल्या. त्या वेळी तो गरीब, अशिक्षित कामगार नकार देत म्हणाला, “आम्ही औदुंबर तोडत नाही! देवाचे झाड असते ते!” उच्चशिक्षणाने काकांना झाडांची माहिती दिली होती; पण झाडाविषयी कृतज्ञता, आपलेपणा नाही देऊ शकले. परंपरेने मात्र कामगाराला ह्या अनमोल गोष्टी शिकवल्या होत्या.
आणखी एकदा, भिंतीत एक पिंपळाचे रोप उगवले होते. चांगले फुटभर वाढल्यावर, ते तोडायला एकाला बोलावले होते. त्याने हळदीकुंकू मागून घेऊन त्या रोपाची पूजा केली. त्याला दुधसाखरेचा नैवेद्य दाखवला. मग रोपाची क्षमा मागून ते उपटून काढले.
सामान्यातल्या सामान्य मनुष्यावर विविध सणांद्वारे, लोककथांद्वारे हे प्रेमाचे संस्कार केले गेले आहेत. कित्येक झाडांच्या पूजेसाठी विविध सण योजले आहेत. जसे- वैशाख पौर्णिमेला पिंपळाची, ज्येष्ठ पौर्णिमेला वडाची, श्रावण पौर्णिमेला नारळाची, कार्तिक महिन्यात तुळशीची, त्यानंतर आवळ्याची पूजा केली जाते. त्या पूजेने काय फळ मिळते याच्या कथा सांगून वृक्षांची पूजा करण्यास प्रोत्साहन दिले आहे. पौराणिक साहित्यात वृक्षाचे पूजन कसे करावे हे सांगताना अग्निपुराण म्हणते-
वृक्षपूजनाने या लोकात सुख आणि परलोकात मोक्ष प्राप्त होतो. म्हणून, वृक्षांवर जलाभिषेक करा! सर्व प्रकारच्या औषधींचा त्यांच्यावर वर्षाव करा. वृक्षांना हार घालून सजवा. त्यांना औषधी लेप लावा. त्यांच्या बुंध्याभोवती वस्त्र बांधा. एकूण झाडाचा भोवताल स्वच्छ ठेवा, झाडाला जपा, सजवा, त्याचे कोडकौतुक करा, लाड करा! अग्निपुराण 70.1
अक्षय्य तृतीया हा परंपरेने चालत आलेला वृक्षारोपणाचा मुहूर्त आहे. कोणती झाडे लावावीत, किती लावावीत, ह्याबद्दल भविष्यपुराण सांगते -
अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दश चिञ्चिणीकान् ।
कपित्थबिल्वामलकीत्रयं च पञ्चाम्रवापी नरकं न पश्येत्॥
4.128.11 ॥
जो मनुष्य एक पिंपळ, एक कडुनिंब, एक वडाचे झाड लावेल; तसेच दहा चिंचेची, तीन बेलाची, तीन आवळ्याची आणि पाच आंब्याची झाडे लावेल तो मनुष्य मृत्यूपश्चात स्वर्गात जाईल.
रोप लावल्यावर त्यांची देखभाल कशी करावी ह्याचीदेखील कथा पुराणात आली आहे. एकदा ब्रह्मदेवाने पाहिले की, पार्वतीदेवी एका लहान रोपट्याला खत घालत आहे, पाणी घालत आहे, ते रोप प्रेमाने वाढवत आहे. ब्रह्माने अचंबित होऊन विचारले, “हे देवी! ह्या रोपाची तू मुलाप्रमाणे काळजी का घेत आहेस?” तेव्हा पार्वतीदेवी म्हणाली, “अहो देवा! तुम्हाला माहीत नाही का? एक वृक्ष दहा पुत्रांच्या समान आहे! दशपुत्रसमो द्रुमः मग आपण मुलांची जितकी काळजी घेतो त्याच्या दहापट रोपाची काळजी घेतली पाहिजे, नाही का?”
असा जिव्हाळा प्राण्यांविषयीदेखील शिकवला आहे. ‘गीते’मध्ये भगवान आपल्या प्रिय भक्ताची लक्षणे सांगताना बाराव्या अध्यायात म्हणतात -
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च।
जो मनुष्य कोणाही प्राणिमात्राशी वैर धरत नाही, कोणाही प्राण्याचा द्वेष करत नाही, जो सर्व जीवांचा मित्र असतो तो मला अतिशय आवडतो.
केवळ मैत्री आणि करुणा नाही, तर त्यापलीकडे जाऊन जो मनुष्य सदैव सर्व भूतांच्या हिताच्या गोष्टी करण्यात रत असतो, सर्व प्राणिमात्रांचे कल्याण करण्यात रमलेला असतो, तो मला फार फार आवडतो. सर्वभूतहितेरता: 5.25
कित्येक प्राणी विविध देवतांचे वाहन असल्याने त्यांना आपोआप देवत्व मिळाले. जसे शंकराचा वृषभ, इंद्राचा हत्ती, देवीचा सिंह, सरस्वतीचा हंस, विष्णूचा गरुड, रामाचे वानर, दत्ताबरोबर असलेले कुत्रे... अशाने अनेक प्राणी सुरक्षित राहिले आहेत. निदान त्यांचा मानवाकडून र्हास झाला नाही. कृष्णाबरोबर असलेल्या गाईला तर देवासमान मानले गेले. देवत्व बहाल केल्याने प्राण्यांचे पालन, पोषण आणि संरक्षण ओघानेच आले.
झाडे, वेली, पशुपक्षी ह्यांच्यावर देवत्व बहाल करणे खुळचटपणाचे लक्षण आहे, असे अनेक बुद्धिजीवींना वाटू शकते, वाटते; पण ज्या पाश्चात्त्य संस्कृतींनी प्राण्यांवर देवत्व बहाल केले नाही, त्या संस्कृतींनी उभे केलेल्या मांसाच्या कारखान्याचे क्रौर्य आपण पाहू शकतो. तेथील एक पर्यावरणाचे अभ्यासक डग्लस हुमस म्हणतात-
It also became apparent to me that while knowledge about the environment is important, without compassion and a sense of mystery and wonder, there can be little hope for solving the incredible environmental problems we as a species have created. - Douglas Forell Hulmes
अभ्यासांती मला हे स्पष्ट झाले की, पर्यावरणाविषयीचे ज्ञान महत्त्वाचे असले तरी, निसर्गातील घटकांविषयी करुणा आणि निसर्गाचे अवलोकन करताना मनात उमटणारे आश्चर्य आणि गूढत्व ह्या भावना असल्याशिवाय आपण निर्माण केलेल्या पर्यावरणाची समस्या सोडवता येणार नाही.
वेद-पुराणे केवळ भूतांविषयी आपलेपणा सांगून थांबत नाहीत. ते पंचमहाभूतांविषयीदेखील कृतज्ञता शिकवतात. जल देणार्या नद्यांना वेदांनी माता आणि देवी म्हणून गौरवले. ऋग्वेदात सरस्वती नदीला - ‘अम्बितमे नन्दितमे देवितमे‘ म्हटले. तिला सर्वोत्तम आई, सर्वोत्तम नदी आणि सर्वोत्तम देवी म्हटले. अर्थात इतरही नद्या आई आणि देवी होत्या; पण त्यामध्ये ही सर्वोत्तम होती.
पर्वतांना फुटणार्या पाझराला, अर्थात नद्यांना, पृथ्वीमातेचा पान्हा म्हटले आहे. त्या शुद्ध जलरूपी दुधावर पृथ्वीमाता सर्व सजीवांचे पालनपोषण करते. सकाळी उठताच म्हणायचा हा श्लोक पृथ्वीला वंदन करताना म्हणतो-
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥
हे विष्णुपत्नी पृथ्वी! पर्वतरूपी स्तन असलेली तू समुद्राचे वस्त्र परिधान करतेस. हे महान देवी, मी तुला पाय लावतो यासाठी मला क्षमा कर!
अथर्ववेदातील पृथ्वीसूक्तामध्येसुद्धा अशीच भावना दिसते, ‘माता भूमि: पुत्रो अहं पृथिव्या‘ - हे पृथ्वी, तू माझी माता आहेस, मी तुझा पुत्र आहे! आम्ही तुला खणून कंदमुळे उपटून काढतो, अनेक खनिजे खोदून काढतो... ते करीत असता तुला त्रास न होवो! तुझ्यामधून काढून घेतलेल्या गोष्टी पुन्हा लवकर भरून येवोत!
वेदातील देवता ह्या निसर्गातील शक्ती असल्याचे दिसते - पृथ्वी, आकाश, सूर्य, चंद्र, रुद्र, इंद्र (पावसाची देवता); अग्नी, मरुत्त (मोसमी पावसाचे वारे), अरण्यानी (अरण्याची देवता), उषा (पहाट), रात्री, नद्या, ब्रह्मा, विष्णू, रुद्र, सरस्वती (नदी), लक्ष्मी (समुद्राची कन्या), पार्वती (पर्वताची कन्या)... अशा प्रकारे निसर्गाला विविध रूपांत पूजले. जेव्हा पावसाचा देव म्हणून इंद्राला नमन केले आहे त्यामागे- पावसाचे विज्ञान, पाऊस मोजायचे शास्त्र, पावसाचे अनुमान वर्तवण्याचे शास्त्र, पाऊस पडावा म्हणून करायचे यज्ञ ( possibly a technique of cloud seeding), पावसाच्या देवाविषयी कृतज्ञता या सर्वांचा समावेश होतो. ऋषी-मुनींनी केलेले पर्यावरणाचे चिंतन यज्ञ, मंत्र अथवा कथेच्या रूपाने आबालवृद्धांपर्यंत पोहोचवले गेले.
त्या चिंतनाचे पर्यवसान झाले मनामनांत निसर्गाविषयी पूज्यभाव रोवण्यात. त्याबरोबरच कुठेही घाण करू नये, स्वच्छता राखावी ह्याकरिता नियमदेखील केले. जसा हा ‘मनुस्मृती’मधील नियम सांगतो-
न ससत्त्वेषु गर्तेषु न गच्छन्नपि न स्थितः ।
न नदीतीरमासाद्य न च पर्वतमस्तके ॥ 4.47 ॥
कोणीही नदीत, नदीतीरावर अथवा पर्वतांवर मलमूत्रविसर्जन करू नये. असे करणार्यास दंड आहे.
पंचमहाभूतांच्या बाबतीत जसे दंड होते तसे झाडे तोडणार्यांना आणि प्राण्यांना इजा करणार्यांनाही होते. ‘अर्थशास्त्रा’ने हत्ती मारल्यास मृत्युदंड सांगितला. गोहत्या तर निषिद्ध होती. अगदी मांजर जरी चुकून हातून मेली तरी त्यासाठी प्रायश्चित्त सांगितले होते.
हे नियम जसे नागरिकांसाठी होते, तसेच राजाची पर्यावरणाविषयीची कर्तव्ये ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘अर्थशास्त्र’ आदी ग्रंथांतून आली आहेत. राजाने प्राण्यांची, वृक्षांची काळजी घेणे अपेक्षित आहे. भरतभेटप्रसंगी राम भरताला विचारतो- “बंधो! तू नगराची, नागरिकांची, नगरातील प्राण्यांची, चौका-चौकांतून लावलेल्या वृक्षांची, नगरातील उपवनांची, आजूबाजूच्या वनांची आणि तिथे राहणार्या वनवासींची काळजी घेत आहेस ना?”
राजा मनु सांगतो- “जो मनुष्याला अथवा प्राण्याला इजा पोहोचवेल, त्याला त्या प्रमाणात राजाने शिक्षा करावी.”
मनुष्याणां पशूनां च दुःखाय प्रहृते सति ।
यथा यथा महद् दुःखं दण्डं कुर्यात् तथा तथा ॥8.286॥
कौटिल्य ‘अर्थशास्त्रा’त सांगतो- राजाने अशी अरण्ये निर्माण करावीत, जिथे सर्व प्राण्यांना मोकळेपणाने प्रवेश असेल. 2.2.4 प्राणी संरक्षण खात्याच्या मंत्र्याने - मृग, गवे, पक्षी, मत्स्य आदींना संरक्षण दिले पाहिजे. 2.26.1 गावात कोणीही प्राण्यांना इजा पोहोचवत नाही हे पाहणे गावाच्या सरपंचाचे कर्तव्य आहे. गुरांना चरण्यासाठी राने मोकळी सोडवीत. (आता गायरान नसल्याने गाई, हत्तीसुद्धा उकिरड्यावर चरताना दिसतात.) जर प्राणी ते रान सोडून दुसरीकडे चरू लागले तर त्यांना केवळ चाबकाचा उपयोग करून तेथून हाकलून द्यावे. प्राण्यांना इजा पोहोचवू नये. कोणीही प्राण्यांशी क्रूरपणाने वागू नये. 3.10.30-34
हे सगळे कशासाठी करायचे? पर्यावरणाची देखभाल का करायची? ‘दुर्गा सप्तशती’ सांगते-
यावद्भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननम् ।
तावत्तिष्ठति मेदिन्यां संततिः पुत्रपौत्रिकी ॥ 54 ॥
जोपर्यंत ह्या पृथ्वीवर पर्वत, वने आणि वृक्ष आहेत तोपर्यंतच मानव आणि त्याच्या वंशजांचे अस्तित्व राहील. पर्वत फोडले, वृक्ष तोडले आणि वने नष्ट केली, तर मानवजात फार काळ टिकणार नाही.
अशा प्रकारे- वेद, उपनिषद, इतिहास, पुराण, सणवार, लोककथा, लोकदेवता आदींमधून निसर्गावर प्रेम करायला शिकवले गेले. कोणाही प्राणिमात्राचे अहित करू नये हे शिकवले; पण हे करताना कोणत्याही गोष्टीवर पूर्ण बंदी न आणता त्यावर बंधने आणली. जसे- शिकार निषिद्ध नाही सांगितली; पण शिकारीला नियम लावले. जसे- गर्भार मादीला मारायचे नाही, विणीच्या हंगामात शिकार करायची नाही इत्यादी. तसेच मांसाहाराचे. मांसाहार बंद केला नाही; पण त्याभोवती नियम घातले. जसे- मंगळवारी, शुक्रवारी, एकादशीला, चतुर्थीला, पौर्णिमेला, प्रतिपदेला मांसाहार वर्ज्य. चातुर्मासात मांसाहार बंद इत्यादी. निसर्गाचा उपभोग घ्या, आनंद घ्या; पण ते मर्यादेत असावे, आपल्या कृतीने सृष्टीचा समतोल न बिघडवता.
आज पाश्चिमात्य देशांतून environmental sciences हा शब्द आलाय आणि आता आपणदेखील त्यांच्या पद्धतीने त्याचा अभ्यास करत आहोत; परंतु पाश्चात्त्य संस्कृतीसाठी environment हा विषय नवीन आहे. ख्रिश्चन धर्माला अनुसरून त्यांनी सृष्टीला मानवकेंद्रित मानले.God ने पृथ्वी-सूर्य-चंद्र-पशू-पक्षी वगैरे तयार केल्यावर स्वत:सारखा दिसणारा पुरुष तयार केला आणि नंतर त्याच्या बरगडीपासून स्त्री निर्माण केली. मग त्याने पुरुषाला सांगितले की, तू आता समुद्रातील प्राण्यांवर, आकाशात उडणार्या पक्ष्यांवर आणि भूमीवर चालणार्या प्राण्यांवर राज्य कर! ह्या विचारधारेला अनुसरून मध्ययुगात The Great Chain Of Being ची कल्पना मांडली गेली. ह्यानुसार सर्वात वरती God असून, त्याच्या खालील पातळीवर पुरुष आहे. पुरुषाच्या खालच्या स्तरावर स्त्री, त्याखाली लहान मुले, त्याखाली गुलाम, त्याखाली इतर प्राणी, त्याखाली किडे, कृमी, झाडे आणि सगळ्यात खाली निर्जीव दगड-गोटे-खनिजे असलेली पृथ्वी. ह्या साखळीत, जो वर आहे त्याचा खालच्यांवर अधिकार होता. साहजिकच स्त्रिया, गुलाम, पशू-पक्षी ह्यांची मालकी पुरुषाकडे होती. या दृष्टिकोनामुळे पर्यावरणीय प्रश्न कसे निर्माण झाले हे लिन् व्हाईट ह्यांनी 1966 मध्ये The Historical Roots of Our Ecological Crisis या व्याख्यानात मांडले.
पाश्चात्त्यांचा पृथ्वीकडे पाहायचा दृष्टिकोन वेगळा आहे- मनुष्याचे पृथ्वीवरील वास्तव्य थोड्याच काळासाठी असून मृत्यूनंतर हेवन (heaven) हे त्याचे शाश्वत, सुंदर ठिकाण असेल. त्यामुळे पृथ्वीची काळजी घ्यायला हवी, ती जपायला हवी, असे सांगणारे धार्मिक ग्रंथ, कथा इथे नाहीत. खाली असलेल्या पहिल्या चित्रातून पाश्चात्त्य दृष्टिकोन दिसतो, तर दुसर्या चित्रातून ‘ईशावास्यमिदं सर्वं‘ सांगणारे हिंदू तत्त्वज्ञान (सर्वांमध्ये ईश्वर आहे, जसे नदी-डोंगर-पक्षी आहेत तसेच आपणसुद्धा ह्या सृष्टीचा भाग आहोत)- वेदांनी सृष्टीमधील शक्तींचा देव म्हणून गौरव केला आणि पुढे जात जात वेदान्ताने संपूर्ण विश्व हे एकच एक ब्रह्म आहे, हा विचार दिला. मी आणि सृष्टी, जीव आणि शिव, आत्मा आणि परमात्मा, ब्रह्म आणि माया हे वेगळे नाहीत, एकच आहेत, असा विचार अद्वैत मताने मांडला. अलीकडेच गस् स्पेथ ह्या पर्यावरण शास्त्रज्ञाने म्हणले आहे -
I used to think that top environmental problems were biodiversity loss, ecosystem collapse and climate change. I thought that thirty years of good science could address these problems. I was wrong. The top environmental problems are selfishness, greed and apathy, and to deal with these we need a cultural and spiritual transformation. And we scientists don't know how to do that.
जैवविविधता नष्ट होणे, परिसंस्था नष्ट होणे आणि हवामानातील बदल या प्रमुख पर्यावरणीय समस्या आहेत असे मला वाटायचे. मला वाटत असे की, तीस वर्षांचे विज्ञान या समस्या सोडवू शकेल; पण ते चूक होते. सर्वोच्च पर्यावरणीय समस्या म्हणजे स्वार्थ, लोभ आणि परंपरांच्या बाबतीत असलेली उदासीनता आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाची गरज आहे आणि ते कसे करायचे हे आम्ही शास्त्रज्ञ जाणत नाही.
त्यासाठी लागणारी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शिकवण भारतीय पर्यावरण चिंतनात निश्चित मिळते. भारतीय मनाचा पर्यावरणाच्या बाबतील दृष्टिकोन ‘महा-उपनिषदा’च्या ह्या श्लोकातून प्रकट होतो -
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥
कोत्या मनाचे लोक ह्या जगाला आपले आणि परके अशा गटात विभागतात. साहजिकच ते केवळ आपल्यांच्या हिताचा विचार करतात. मग ते आपले म्हणजे कुणासाठी? पुढच्या सात पिढ्या असतील अथवा कुणासाठी विशिष्ट पंथाचे लोक असतील. मोठ्या मनाचे लोक मात्र ह्या संपूर्ण पृथ्वीला आपले मानतात. पृथ्वीवरील सर्व जीवांना एका मोठ्या कुटुंबाचे सदस्य मानतात. सहजच त्यांच्या वागण्यात सर्वांच्या हिताचा विचार असतो.
असे विशाल हृदयी लोक निर्माण करण्याची क्षमता भारतीय पर्यावरण विचारात असल्याने त्याचा सर्वत्र प्रचार झाला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानपरंपरेचा समावेश केला गेला आहे. त्याद्वारे पर्यावरण क्षेत्रात भारतीय विचार आणि परंपरांचा समावेश केला गेला पाहिजे.