संशोधनमहर्षी - डॉ. म. रा. जोशी

विवेक मराठी    19-Oct-2024   
Total Views |

vivek
‘संशोधनमहर्षी’ पुरस्काराने विभूषित आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘संत ज्ञानेश्वर-तुकाराम’ या सर्वोच्च सन्मानासह अनेक संशोधन पुरस्कारांनी गौरवान्वित ज्येष्ठ संशोधक डॉ. म.रा. जोशी यांनी नुकतेच 93व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेली 60 वर्षे प्राचीन धर्मसंप्रदाय व साहित्य क्षेत्रात त्यांनी केलेले व्रतस्थ संशोधनकार्य अपूर्व आहे. नुकताच त्यांनी ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (ICHR) या विख्यात संस्थेसाठी ‘शोध पांडुरंग विठ्ठलाचा’ हा शोध प्रकल्प पूर्ण केला आहे. या वयातही त्यांचे शोधकार्य सुरू आहे. वैदर्भीय संशोधकांच्या ललामभूत परंपरेतील या ज्ञानवंताच्या शोधसाधनेला व अक्षरकार्याला आमचे विनम्र प्रणाम व अभीष्टचिंतन! जीवेत् शरदः शतम् ।
‘माझा मराठाचि बोलु कौतुके।

परि अमृतातेहि पैजा जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥’
 
 
संत ज्ञानदेवांच्या ओवीतील मराठी मातृभाषेविषयीचा स्वाभिमान, मनीमानसी बाळगून मराठी प्राचीन संतसाहित्याच्या क्षेत्रात गेली 60 वर्षे व्रतस्थपणे संशोधन करणारे, नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख प्रा. डॉ. मधुकर रामदास जोशी यांनी दि. 19 जून रोजी 93व्या वर्षात पदार्पण केले आहे. मराठी साहित्यामध्ये मध्ययुगीन धर्मसंप्रदायी संतसाहित्याचे योगदान अपूर्व आहे. त्या काळातील विविध संप्रदायांतील महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय यांच्या भक्ती साहित्याचे साक्षेपी संशोधक म्हणून डॉ. म.रा. जोशी यांनी केलेले संशोधनकार्य मौलिक स्वरूपाचे अक्षरकार्य आहे. या कार्याची दखल घेऊन नागपूरच्या विदर्भ संशोधन मंडळाने त्यांना ‘संशोधनमहर्षी’ सन्मानाने भूषित केले तसेच महाराष्ट्र शासनाने ‘संत ज्ञानेश्वर-तुकाराम’ या सर्वोच्च पुरस्काराने त्यांच्या संशोधनकार्याचा व साहित्यसेवेचा उचित गौरव केला आहे. त्यांच्या साक्षेपी संशोधन-संपादनातून सिद्ध झालेले ‘समग्र तुकाराम’, ‘समग्र समर्थ साहित्य’, ‘ज्ञानेश्वर चरित्र’, ‘मराठी संशोधनशास्त्र’ आदी ग्रंथसंपदा त्यांच्या विद्याव्यासंगाचे दर्शन आहेत. त्यांनी देशभर भ्रमंती करून जमा केलेल्या ‘ज्ञानेश्वरी’च्या 400 पेक्षा अधिक हस्तलिखिते पोथ्या आणि चक्रधरस्वामींच्या ‘लीळाचरित्रा’ची 250 पेक्षा अधिक हस्तलिखिते त्यांच्या ध्यासाच्या साक्षी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर 35 पेक्षा अधिक विद्यार्थी संशोधकांनी ‘पीएच.डी’ पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांनी जमा केलेल्या हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह, त्यासाठी केलेली भ्रमंती, त्यांचा अभ्यास, त्यांच्या निरीक्षणाचा आवाका, त्यांच्या चिंतनाची झेप आणि त्यांची साक्षेपी विश्लेषणाची अनाग्रही शैली-पद्धत सारेच थक्क करणारे आहे. डॉ. वि.वा. मिराशी, डॉ. श्री.ना. बनहट्टी यांच्या मुशीत घडलेल्या डॉ. म.रा. जोशी यांनी वैदर्भीय संशोधन परंपरेला आपल्या कार्याने व योगदानाने अधिक उज्ज्वल केले आहे. त्यांच्या संशोधनाने संतसाहित्यातील अज्ञात, अल्पज्ञात साधनांचा धांडोळा घेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील अनेक गोष्टींवर नवा प्रकाश टाकला आहे. अशा या ज्ञानसाधक संशोधकाच्या व्यक्तित्वाची व संशोधन कर्तृत्वाची लोकविलक्षण कहाणी नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.
 
 
वडनेर-गंगई (अकोला)च्या जोशी घराण्यात जन्म
 
ऋषी ‘अगस्त्य’ आणि ब्रह्मवादिनी ‘लोपामुदा’च्या वास्तव्याने पावन अशा वैदर्भीय भूमीतील, मोर्णा नदीकाठच्या अकोला जिल्ह्यातील ‘वडनेर-गंगई’ गावी धर्मपरायण विठ्ठलोपासक जोशी घराण्यात डॉ. म.रा. जोशी यांचा दि. 19 जून 1932 रोजी जन्म झाला. त्यांचे वडील रामदास महादेव जोशी हे कोर्टात ट्रेझरी ऑफिसर होते. त्यांच्या मातोश्री मथुराबाई या विदर्भातील तेल्हाराच्या होत्या. ‘वडनेर गंगई’ येथे जोशी घराण्याचे स्वतःचे विठ्ठल मंदिर असून अनेक पोथ्यांचा मोठा संग्रह आहे. अशा भक्ती-ज्ञानाच्या परिसरात जोशी सरांचे बालपण भावभक्तीच्या संस्कारांनी संपन्न झाले.
 

vivek 
 
डॉ. म. रा. जोशी सरांचे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन असे सारे शिक्षण अकोला शहरात झाले. विदर्भातील तिसर्‍या क्रमांकाचे शहर, कापसाचा बालेकिल्ला असलेल्या अकोल्यातील सीताबाई आर्ट्स महाविद्यालयातून ते पदवीधर झाले. तेथेच त्यांनी एम.ए. केले. डॉ. म.रा. जोशींचे भाग्य म्हणजे त्याच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व संस्थाचालकांनी त्यांना ‘प्राध्यापक’ म्हणून अध्यापन करण्यासाठी विचारणा केली आणि ज्या महाविद्यालयामध्ये ते शिकले तेथेच ते प्राध्यापक झाले. म.रा. जोशी, ‘जोशी सर’ झाले. विषयावरील प्रभुत्व, अध्यापननिष्ठा आणि सौजन्यशील लाघवी स्वभाव या गुणसमुच्चयामुळे अल्पावधीतच जोशी सर विद्यार्थिप्रिय अध्यापक म्हणून प्रसिद्ध झाले.
 
 
जोशी सरांच्या अध्यापनाचा सुगंध अकोल्याच्या सीमा पार करून थेट नागपूर विद्यापीठापर्यंत दरवळला. तेव्हा थोर संशोधक आणि महानुभाव साहित्याचे व्यासंगी डॉ. वि.भि. कोलते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. गुणी माणूसच गुणी माणसाला जाणतो. कुलगुरू कोलते थेट अकोल्याला गेले आणि त्यांनी म.रा. जोशी सरांची भेट घेऊन ‘आपण नागपूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून यावे’ असा प्रस्ताव दिला आणि आग्रह करून नागपूरला घेऊन गेले. जोशी सरांचा नामवंत अशा नागपूर विद्यापीठातील अध्यापनकार्याचा श्रीगणेशा झाला. विद्यापीठाचे कुलगुरू घरी येऊन विद्यापीठात येण्याचा आग्रह करतात, हाच म.रा. जोशींचा मोठेपणा, गुणवत्ता होय!
 
 
नवनाथ संप्रदाय व तत्त्वज्ञानावर पीएच.डी.
 
नागपूर विद्यापीठात 1965 साली प्राध्यापक म्हणून मिळालेल्या संधीने जोशी सरांच्या व्यासंगी, जिज्ञासू संशोधकाला नवे क्षितिज लाभले. प्राचीन धर्मसंप्रदायांचे ‘भक्ती वाङ्मय’ हा त्यांचा आवडता विषय होता. याच विषयावर आपण पीएच.डी. करायची, अशी मनाशी खूणगाठ बांधून त्यांनी अल्पावधीत पीएच.डी.ची उपाधी मिळवली. प्राचीन धर्मप्रधान काळामध्ये महाराष्ट्रात अनेक पंथ-संप्रदाय उदयास आले, वर्धिष्णू होत विस्तारले. त्यामध्ये ‘नाथ संप्रदाय’ हा एक प्रमुख आदि संप्रदाय होता. जोशी सरांनी ‘नवनाथ संप्रदाय, तत्त्वज्ञान आणि समकालीन विचारधारा’ असा विषय घेऊन आपला अभ्यापूर्ण प्रबंध लिहिला. या प्रबंधाची विद्वान संशोधक प्राध्यापकांनी खूप प्रशंसा केली. या प्रबंधावर आधारित ‘नाथ संप्रदाय’ म्हणून त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची सत्त्वधारा म्हणून ज्या वारकरी भक्ती संप्रदायाचा गौरव केला जातो, त्याचे प्रवर्तक संत निवृत्तीनाथ-ज्ञानदेव हे मूळचे नाथपंथीय अनुग्रही आहेत. नाथपंथीय श्रीगुरू गहिनीनाथ यांनी संत निवृत्तीनाथांना दीक्षा दिली असून ‘ज्ञानदेवे रचिला पाया।’ असे ज्या ज्ञानदेवांचे वर्णन केले जाते ते श्रीगुरू निवृत्तीनाथांचे बंधू आहेत, त्याचबरोबर शिष्यही आहेत.
 
थोर ज्ञानोपासकांच्या स्नेहसहवासाचे भाग्य
 
जोशी सरांचे भाग्य म्हणजे त्यांना एकापेक्षा एक थोर संशोधक व व्यासंगी ज्ञानोपासकांचा सहवास लाभला, त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी लाभली. या सर्वच मान्यवर थोर संशोधकांमध्ये तरुण युवा संशोधक म्हणून डॉ. म.रा. जोशींबद्दल एक प्रकारचा आश्वासक विश्वास व आदर होता. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू, महानुभाव साहित्याचे संशोधक डॉ. वि.भि. कोलते, प्राच्यपंडित डॉ. वि.वा. मिराशी, महानुभाव साहित्याचे थोर अभ्यासक वा.ना. देशपांडे, ज्ञानेश्वरीचे चिकित्सक संशोधक बनहट्टी, ब.श्री. पंडित, डॉ. सुरेश डोळके, डॉ. य.खु. देशपांडे या संशोधकांच्या मांदियाळीचे प्रेम, जिव्हाळा आणि मार्गदर्शन-सहवास डॉ. म.रा. जोशी यांना लाभले. तसेच विद्येचे माहेर असलेल्या पुण्यातील थोर संशोधक श्री. ग.ह. खरे, महामहोपाध्याय द.वा. पोतदार, मुंबई महानगरीतील थोर व्यासंगी विद्वान संशोधक श्री. ज. वा. देशपांडे यांचीही डॉ. म. रा. जोशी सरांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मर्जी प्राप्त केलेली होती. या ऋषीतुल्य ज्ञानोपासकांच्या सहवासात जोशी सरांमधील संशोधक घडला, वाढला, परिपक्व झाला. विशेषतः डॉ. वि.वि. मिराशींच्या सात वर्षांच्या गुरुतुल्य सहवासात ‘संशोधन पद्धती’, ‘संशोधन शास्त्र’ यांचे विशेष ज्ञान व दृष्टी जोशी सरांना लाभली. डॉ. मिराशींनी जोशी सरांना खूप काही शिकवले. संशोधनाचा निष्कर्ष काय? यापेक्षा संशोधन पद्धतीला महत्त्व असते, असे डॉ. म.रा. जोशींचे मत आहे.
 
 
भारतीय संशोधक ज्ञानवंताप्रमाणेच जोशी सरांवर विदेशातील संशोधन क्षेत्रातील दोन दिग्गजांचा विशेष प्रभाव आहे. त्या दोन विद्वान संशोधकांना ते गुरुस्थानीच मानतात. त्या दोन थोर संशोधकांपैकी एक आहेत प्राच्य महर्षी डॉ. यान होन्डा (Jan Gonda) आणि दुसरे डॉ. हंस बेकर (Hans Baker). “विविध देशांतील सांस्कृतिक अभ्यासात-संशोधनात ‘सीटी स्टडी’ महानगर अभ्यासाला जे महत्त्व आहे तसेच भारताच्या बाबतीत सीटी (शहरे) ऐवजी विविध ‘तीर्थक्षेत्रं व तेथील स्थळपुराणाचे’ महत्त्व अनन्यसाधारण आहेत,” असे प्राच्यमहर्षी डॉ. यान होन्डांचे मत जोशी सर बर्‍याच वेळा उद्धृत करतात आणि जोशी सरांच्या संशोधनात ‘पंढरपूर माहात्म्य’ आदी विविध स्थळमाहात्म्यांच्या अभ्यासावर भर आपणास दिसतो. तो डॉ. होन्डा-बेकर यांचा प्रभाव आहे असे वाटते.
 
 
डॉ. जोशींची ग्रंथसंपदा ः व्यासंगाची अक्षरलेणी
 
कोणत्याही लेखकाचे-संशोधकाचे मोठेपण त्यांच्या नावावर किती पुस्तके, ग्रंथ आहेत या संख्येवर अवलंबून नसते. लेखकाच्या ग्रंथाचे अक्षरमूल्य काय? आशय काय? तो महत्त्वाचा का असतो? या निकषावर डॉ. म.रा. जोशी यांचे सारे ग्रंथ ज्ञानाचा ठेवा, संदर्भमूल्याची शाश्वत अक्षरसंपदा आहे. मराठी शारदेच्या दरबारातील अक्षरलेणीच आहेत. ‘श्रीदत्त गुरूंचे दोन अवतार’, ‘ज्ञानेश्वर चरित्र’, ‘ज्ञानेश्वर कन्या व मराठी साहित्य’, ‘ज्ञानेश्वरी (पाटंगण परंपरा)’, ‘मनोहर अंबाझरी व मुकुंदराज’, ‘दासबोध (संपादन)’, ‘समर्थ रामदास व समर्थ संप्रदाय’, ‘नाथ संप्रदाय’, ‘समग्र समर्थ साहित्य’, ‘समग्र तुकाराम’, ‘मराठी संशोधनशास्त्र’ आणि ‘प्राचीन मराठी वाङ्मय इतिहास, पुरवणी (1 ते 7 खंड)’ ही ग्रंथसंपदा डॉ. म.रा. जोशींच्या बहुमुखी व्यासंग आणि संशोधनाची मूर्त अक्षररूपे आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासावर, नवी साधने व नव्या आधाराद्वारे डॉ. जोशी यांनी या ग्रंथातून नवा प्रकाश टाकलेला आहे. अल्पज्ञात व अज्ञात अशा साधनांच्या शोधार्थ, प्राप्तीसाठी त्यांनी केलेली भ्रमंती थक्क करणारी आहे. प्राप्त झालेल्या अलक्षित साधनांच्या आधारे त्यांनी अनेक विषयांचा मोठ्या साक्षेपाने घेतलेला धांडोळा आणि अनाग्रही निष्कर्ष प्रतिपादन याचा वस्तुपाठ म्हणजे डॉ. जोशी सरांचे ग्रंथलेखन होय.
 
 
या ग्रंथामधील ‘मनोहर अंबाझरी व मुकुंदराज’ हा शोधग्रंथ विद्वानांमध्ये व नवसंशोधकांमध्ये बहुचर्चित झाला. ‘विवेकसिंधू’कार मुकुंदराज हे आद्य मराठी कवी समजले जात होते. पुढे नवी साधने-पुरावे उजेडात आले व ते आद्य कवी नाहीत हे सर्वमान्य झाले; पण मुळात मुकुंदराज हे अंबेजोगाई मराठवाड्याचे की विदर्भातील अंबाझरीचे? हा प्रश्न विवाद्य झाला. ‘विवेकसिंधू’तील ‘मनोहर अंबा नगरी’ म्हणजे अंबेजोगाई की विदर्भातील ‘आंभोरा’ यावर वाद सुरू झाला. या वादग्रस्त विषयावर संशोधन करून डॉ. म.रा. जोशी यांनी मुकुंदराजांची साधार स्थलनिश्चिती केली. मुकुंदराजांच्या ग्रंथात ‘वैनगंगेच्या तिरी मनोरम अंबा नगरी।’ असा स्थळाचा निर्देश आहे. अंबेजोगाईला वैनगंगा नदी नाही. ती विदर्भात आहे. संशोधनात भौगोलिक पाठाला अनन्य महत्त्व असते. वैनगंगा नदी विदर्भात आहे आणि अंबा नगरी हे ‘आंभोरा’ या नदीतीरी वसलेल्या स्थानाचे नाव आहे. तेथे मुकुंदराजच्या गुरू व परात्पर गुरू, रामचंद्र व हरिनाथ यांच्या समाध्या आहेत. खेडला येथे सापडलेला राजा जैत्रपाल, नृसिंह यांचा शिलालेख हा सर्वात मोठा पुरावा आहे. डॉ. म.रा. जोशी सरांचा या विषयावरील संशोधनग्रंथ ‘डी.लिट’साठीही सादर करण्यात आला होता. समितीने त्या ग्रंथास ‘पीएच.डी.’ देऊ केली; पण जोशी सरांनी ‘मी मुळात पीएच.डी. आहेच, मला दुसरी पीएच.डी. नको’ म्हणत समितीला नकार दिला. थोडक्यात डॉ. म.रा. जोशींचे शोधग्रंथ किती उच्च दर्जाचे आहेत हे यावरून लक्षात येते.
 
शोधयात्रांची भ्रमंती ः हस्तलिखितांचा संग्रह
 
डॉ. म.रा. जोशी हे विद्यापीठ परिसरातील कक्षात बसून सवडीने संशोधन करणारे प्राध्यापक नाहीत, ते प्रत्यक्ष स्थळाला भेटी देऊन तेथील जुन्या पोथ्या, हस्तलिखिते पाहून लोकांशी भेटी-संवाद करून, स्थानिक अभ्यासकांना भेटून शोधसाधनांचे संकलन व अवलोकन करणारे संशोधक आहेत. विविध ठिकाणी भ्रमंती करून जोशी सरांनी ‘ज्ञानेश्वरीची 450 हस्तलिखिते’ मिळवली. त्यांची सुंदर सूची पुस्तकरूपाने नुकतीच आळंदीच्या संत ज्ञानेश्वर संस्थानने प्रकाशित केलेली आहे. महानुभावांच्या मुख्य ‘लीळाचरित्रा’च्या तब्बल 324 पोथ्या मिळवून त्याचे सूक्ष्म अध्ययन-संशोधन जोशी सरांनी केलेले आहे. विशेष कौतुकास्पद गोष्ट म्हणजे महानुभाव पंथाच्या 27 गुप्त लिप्यांपैकी 22 लिप्यांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे त्यांना कोणतीही लिपी दुर्बोध वाटत नाही. डॉ. म.रा. जोशी यांचा ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखितांचा जेवढा व्यासंग, अभ्यास आहे तेवढाच महानुभाव पंथाच्या लीळाचरित्रांचा आहे. एवढेच नव्हे, तर दत्त संप्रदाय आणि समर्थ संप्रदायाच्या वाङ्मयाचे सरांचा विद्याव्यासंग-संशोधन दांडगे आहे. मुंबईच्या ‘कालनिर्णय’कार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या सुमंगल प्रकाशनाद्वारे प्रकाशित केलेले ‘समग्र समर्थ साहित्य’, ‘समग्र तुकाराम’ हे ग्रंथराज जिज्ञासूंनी आवर्जून पाहावेत. समर्थ साहित्याचे थोर उपासक-अभ्यासक धुळ्याचे शंकर श्रीकृष्ण देव यांना ज्या समर्थमठांना भेटी देणे शक्य झाले नव्हते व जे हस्तलिखित साहित्य पाहता आले नव्हते, त्या सर्व मठांना भेटी देऊन, तेथे वास्तव्य करून, मठाधिपतीच्या मर्जीनुसार-अटीनुसार सर्व हस्तलिखितांचा जोशी सरांनी धांडोळा घेतला. ठिकठिकाणच्या समर्थ मठांना भेटी देण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक शोधयात्रा, त्यांच्या ध्यासाच्या द्योतक आहेत. त्या शोधयात्रांचा तपशील त्यांच्या ‘समग्र समर्थ साहित्य’ ग्रंथाच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत आपण पाहू शकतो. त्या शोधयात्रांचे वर्णन वाचून आपण स्तिमित होऊन त्यांच्या ज्ञाननिष्ठेपुढे- चिकाटी व परिश्रमापुढे नतमस्तक होतो.
 
 
1964 साली डॉ. म. रा. जोशींनी पहिली शोधयात्रा केली ती धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिराची. 1968 मध्ये राजवाडे संशोधन मंदिरास भेट देऊन तेथील हस्तलिखितांचे अध्ययन केले. मुंबईचे मराठी संशोधन मंदिर (दादर), बडोद्याचा सयाजी विद्यापीठ हस्तलिखित संग्रह, हैदराबादचा उस्मानिया विद्यापीठ हस्तलिखित संग्रह, जाहिराबाद-एक्केहाळी? आत्माराम स्वामी मठातील हस्तलिखिते, पुण्याचे भारत इतिहास संशोधन मंदिर-भांडारकर प्राच्य संशोधन मंदिर, तंजावर (तमिळनाडू) मधील सरस्वती महल संग्रह आणि समर्थांचे चार मठ, अशा ज्ञानकेंद्रांना त्यांनी केवळ भेटीच दिल्या नाहीत, तर अध्ययनासाठी काही काळ तेथेच मिळेल त्या सोईनुसार मुक्काम ठोकला होता. ही त्यांच्या शोधयात्रांच्या प्रमुख यात्रांची नोंद आहे. त्याशिवाय पंढरपूर, आळंदी, सज्जनगड अशा त्यांनी अनेक संशोधन वार्‍या केलेल्या आहेत.
 
 
पंढरपूरच्या शोधयात्रेवर ते 1985-86 साली आले होेते. तेव्हा श्रीमंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाड्यातील, संत प्रल्हाद महाराज बडवेंच्या संग्रहातील हस्तलिखिते पाहण्यास त्यांचा अनेक दिवस मुक्काम होता. त्या वेळी वासकर फडाचे प्रमुख विवेकानंद वासकर महाराज व अनिलराव बडवे यांच्यासमवेत माझा डॉ. म.रा.जोशी यांच्याशी प्रथम परिचय झाला. तेव्हा मी पुण्याच्या दैनिक ‘तरुण भारत’चा मुख्य उपसंपादक होतो व वारी-वारकरी संतसाहित्याचा अभ्यास करीत होतो. पंढरपूरच्या भक्तिपीठात जोशी सरांशी जुळलेले स्नेहबंध पुढे वृद्धिंगत होत गेले व आजही तो स्नेह कायम आहे. नुकत्याच झालेल्या भेटीत त्यांच्या ‘शोध पांडुरंग-विठ्ठलाचा’ या नव्या शोधप्रकल्पाबद्दल आमचा प्रदीर्घ तीन-चार तास संवाद झाला होता. 92व्या वर्षातील त्यांचा उत्साह, कामाचा उरक आणि स्मरणशक्ती सारेच विलक्षण आहे. या नव्या शोधप्रकल्पाबद्दल त्यांचे पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंदिराच्या राजवाडे सभागृहात दीड तासाचे व्याख्यानही झाले होेते. त्यास संशोधन क्षेत्रातील जिज्ञासू तरुण-तरुणींची प्रचंड उपस्थिती होती.
 
ICHRचा नवा प्रकल्प ः शोध पांडुरंग-विठ्ठलाचा
 
ICHR ‘इंडियन कौन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च’ अर्थात भारतीय इतिहास संशोधन परिषद, नवी दिल्ली या विख्यात संस्थेने डॉ. म.रा. जोशी यांना ‘शोध पांडुरंग-विठ्ठलाचा’ हा नवा प्रकल्प संशोधनास दिला. मध्यंतरी कोविडच्या भीषण विचित्र रोगाच्या संकटकाळात दोन-अडीच वर्षे सर्वांनाच घरात बसावे लागले होते, तेव्हा हे कामही ठप्प होते. पुढे 2021 मध्ये जोशी सरांनी संशोधनकार्य हाती घेऊन नुकतेच 2024 च्या मेमध्ये पूर्ण केले आहे. त्यासाठी जोशी सरांचा अनेक महिने पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतच मुक्काम होता.
 
 
प्राचीन शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्या, स्थलपुराणे, क्षेत्रमाहात्म्ये, लोकश्रुती, लोकपरंपरा-श्रद्धा या मूळ साधनांचा डॉ.जोशी सरांनी चिकित्सक धांडोळा घेतला आणि 425 पानांचा शोधप्रकल्प लिहून दिल्लीच्या संस्थेस सुपूर्द केला आहे. लवकरच हा शोधप्रबंध इंग्रजी आणि मराठीमध्ये प्रकाशित होणार आहे. बर्‍याच वेळा संशोधकास साधनाद्वारे सप्रमाण हाती आलेले सत्य सांगताना, अनेकांच्या पारंपरिक श्रद्धा-विश्वास व हितसंबंधांना धक्का लागण्याचा वाईटपणा स्वीकारावा लागतो, कारण संशोधकाची निष्ठा ही, संत तुकाराम म्हणतात तशी ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही।’ अशी असते. डॉ. जोशींनी आपल्या नव्या संशोधनाद्वारे, पांडुरंग-विठ्ठलाबाबत आजवर विविध संशोधकांनी केलेले दावे-निष्कर्ष चुकीचे असल्याचे प्रतिपादन केले आहे. डॉ. भांडारकर, राजवाडे, डॉ. तुळपुळे, डॉ. शोभना रानडे, डॉ. सोन्थायमर, डॉ.डलरी, डॉ. ढेरे आदींच्या विठ्ठलविषयक संशोधनातील अनेक गोष्टी नव्या साधनाच्या, नव्या पुराव्याच्या आधारे कशा चुकीच्या ठरतात, हे डॉ. जोशींनी सप्रमाण सिद्ध केले आहे. अर्थात प्रत्येक संशोधकाचे मत हे त्याला प्राप्त-उपलब्ध आधार-साधनावर असते. नवनवी साधने उजेडामध्ये येताच-उपलब्ध होताच, जुने दावे-निष्कर्ष हे आपोआपच अर्थहीन ठरतात. त्यामुळे कोणताही खरा संशोधक अनाग्रही असतो, नव्या शोधनिष्कर्षाबद्दल स्वागतशीलच असतो.
डॉ. म.रा. जोशी यांनी नव्या शोधप्रकल्पाद्वारे पांडुरंग-विठ्ठलबाबत व्यक्त केलेल्या निष्कर्षांचा मला समजलेला थोडक्यात गोषवारा असा-
* पंढरपूर हे प्राचीन शैवस्थान होते व मूळ स्थानाचे पुढे वैष्णवीकरण झाले, हे डॉ. भांडारकर-डॉ. शोभना रानडे यांचे मत नव्या उपलब्ध पुराव्याने खोटे ठरते. पंढरपूर हे प्राचीन काळापासून वैष्णवस्थान म्हणूनच प्रसिद्ध होते.
 
* गोरक्षक गोपालकांच्या स्मृतिस्तंभाचे उन्नयन होत होत त्यांचे विठ्ठल देवताच्या रूपात विकसन झाले. वीरगळचा उन्नयन होऊन विठ्ठल झाला, हे डॉ. तुळपुळे आदी प्रभृतींचे मत सबळ पुराव्याअभावी खोटे ठरते. महानुभाव लीळाचरित्रातील ज्या ‘विठ्ठलवीरूकथन लीळे’च्या आधारे हा दावा केला गेला, ती लीळाच खोटी-प्रक्षिप्त ठरून नव्या लीळाचरित्रातून काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे वीरगळचे विठ्ठलरूप उन्नयन झाले नसून विठ्ठल हा प्रारंभापासून विष्णूचा अवतार म्हणून प्रसिद्ध होता. हे इसवी सन 7व्या-8व्या शतकातील ताम्रपत्रे व रामनुजाचार्य-विष्णुवर्धन यांच्या ज्ञानेश्वरपूर्व काळातील नव्या पुराव्यावरून सिद्ध होते. विष्णुवर्धनाचा काळ शके 988 ते 1064 आहे. त्याने पंढरपुरातील विठ्ठल मंदिर बांधले असे सप्रमाण असून विठ्ठल मंदिर 1064 पूर्वीचे होते. मग त्याचे 12व्या-13व्या शतकात मूळ शैवस्थानाचे वैष्णवीकरण झाले हे मत विसंगत ठरते.
 
 
* काही संशोधकांनी विठ्ठलाचे मूळ, आदिरूप भटक्या विमुक्त धनगर-मेंढपाळ अशा समाजाच्या दैवतांमध्ये शोधले. भटक्या मेंढपाळ-धनगराच्या देवाची कीर्ती सर्वत्र झाली तेव्हा वैदिकांनी त्याची लोकप्रियता पाहून त्याचे वैदिकीकरण-वैष्णवीकरण करणार्‍या पुराणकथा रचल्या, असे मत दुर्गा भागवत, डॉ. दलरी, डॉ. ढेरे, सोन्थायमर आदींनी मांडले होते; पण ठोस पुरावे नसल्याने ते सिद्ध होत नाही. उलट विठ्ठल हा विष्णूचा अवतार म्हणून 7व्या- 8व्या शतकापासूनच पूजला, भजला जात होता. यास नव्या पुराव्याने बळकटी लाभते आहे.
 
 
थोडक्यात, पंढरपूर व विठ्ठल यांचे ना वैष्णवीकरण करण्यात आले, ना त्याचे वीरगळापासून उन्नयन झाले. रामानुजाचार्य-विष्णुवर्धन यांच्या काळापासूनच विठ्ठल विष्णूचा अवतार म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, आंंध्र, ओरिसा, तमिळनाडू या भागांत प्रसिद्ध होता. विठ्ठल देवतेवरून व्यक्तिनाम झालेली अनेक व्यक्तिनामे ताम्रपटातून सापडली आहेत. हे ताम्रपट ओरिसामध्ये मिळालेले असून इंपिग्राफिका-इंडिका व्हा. 23, 26 आणि 96 मध्ये ते सर्वांना पाहण्यास उपलब्ध आहेत.
 
समारोप
डॉ. म.रा. जोशींच्या नव्या शोधाचा ग्रंथ प्रकाशित होईल तेव्हा याविषयी उलटसुलट अधिक चर्चा, विचारमंथन होईलच; पण इ.स. 1981 साली प्रकाशित ‘महाराष्ट्राची सत्त्वधारा’ (डॉ.ढेरे अभिनंदन ग्रंथ) या ग्रंथास थोर विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विवेचक प्रस्तावना आहे. त्यात तर्कतीर्थ म्हणतात- “एखादा ‘भडखंबा’ किंवा ‘वीरगळ’ वा प्राथमिक गोपसंस्कृती शाश्वत विश्वधर्म होण्याच्या योग्यतेच्या धर्माची, सत्त्वधारा प्रसवू शकत नसते. इतिहासाच्या कार्यकारणभावात असा पुरावा निःसत्त्व निरर्थक ठरतो... विठ्ठलभक्तीच्या सत्त्वधारेचा उगम, परमार्थाचा आणि विश्वधर्माचा गाभा असलेली पुंडलिकाची कथा आहे.” हे मत जोशी सरांच्या संशोधनास बळकटी देणारे आहे.
 
साहित्य संशोधनाला आपले जीवन समर्पित केलेल्या जोशी सरांना ‘छत्रपती पुरस्कार’, ‘प्रा. अ.का. प्रियोळकर पुरस्कार’, ‘डॉ. मु.श्री. कानडे पुरस्कार’ असे मानाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. संशोधक म्हणून आज वयाच्या 92 व्या वर्षातही ते नव्या उत्साहाने, नव्या ध्यासाने नवे शोधप्रकल्प हाती घेत आहेत. त्यांचे हे कार्य महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला संपन्न करणारे आहे. ‘कालनिर्णय’कार ज्योतिर्भास्कर कै. जयंतराव साळगावकरांनी डॉ. म.रा. जोशींबद्दल ‘समग्र समर्थ साहित्य’ ग्रंथाच्या प्रारंभी लिहिलेल्या भावपूर्ण ओळींनी या लेखाचा समारोप उचित ठरेल असे मला वाटते. कै. साळगावकर म्हणतात - “संतांचे वाङ्मय अधिकाधिक परिपूर्ण स्वरूपात प्रकाशात यावे या तळमळीने, ध्यासाने, अत्यंत परिश्रमाने हे संकलन व संशोधन कार्य तडीस नेले त्याबद्दल मी डॉ. म.रा. जोशींचा ऋणी आहेच; पण महाराष्ट्रानेही त्यांचे हे उपकार जाणून घेतले पाहिजेत.”
 
संशोधनमहर्षी डॉ. म.रा. जोशी यांच्या 93व्या वर्षातील पदार्पणास आणि शताब्दीच्या वाटचालीस सानंद शुभेच्छा! जीवेत् शरदः शतम्!
 
लेखक हे मूळचे पंढरपूरचे असून ‘एकता’ मासिकाचे माजी संपादक आहेत.

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.