मराठी भाषेला अनेकविध बहुमान मिळतील. त्यासाठी आपल्या भाषेचा अभिमान बाळगून आपल्याला सतत सतर्क राहून भाषेचा उपयोग करावा लागणार आहे. ही सगळी प्रक्रिया दीर्घकालीन तरी अतिशय संथपणे चालणारी आहे. भाषेचं हे संथ तरी प्रवाही असणं, हेच खरं तिचं सौंदर्य आहे आणि तिचं हे प्रवाहीपण वाढवायची जबाबदारी आपली आहे. त्या जबाबदारीकडे सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे. त्यासाठीचे काही प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर, काही प्रयत्न सामाजिक पातळीवर, काही प्रयत्न शासकीय पातळीवर केले, तर ‘अभिजाततेच्या वलयामागची जबाबदारी’ ही रुक्ष न वाटता तो ‘जनांचा प्रवाहो होईल’ आणि आपल्याला भाषिकदृष्ट्या अधिक समृद्ध होता येईल...
घटस्थापनेच्या दिवशी आणि दिवाळीच्या अगदी तोंडावर आपली मातृभाषा, आपली मराठी भाषा ‘अभिजात’ झाली आणि आपण सगळे आनंदी झालो. खरं तर दसरा-दिवाळीच झाली आपल्या ‘अस्मितेची’.
आपल्याला मराठी भाषा आपली ‘मातृभाषा’ म्हणून खूप खूप अभिमानाची वाटते आणि हा अभिमान आपण मिरवतही असतो. त्या आपल्या भाषेला ‘अभिजाततेचं’ एक वलयही आता लाभलेलं आहे. या वलयाची एक नवी अस्मिता आपल्या मनात उभी राहणार आणि एक नवाच जोश आपल्यात संचारणार. म्हणजे आपण काय करणार? तर आपण 3 ऑक्टोबर हा ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार आणि आपल्या एका उपक्रमात, एका फेसबुक पोस्टमध्ये, व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये वाढ होणार... आणि आपण कृतकृत्य होणार... आणि एक दिवस आपला अभिमान मिरवणार; पण त्यापुढे काय? असा प्रश्न सध्या जोरात आहे. तो जोरात असण्यामागे आपल्याला काय करता येईल, या विचाराचा असलेला अभाव असं कारण असण्याची दाट शक्यता आहे.
आपल्याला जिवंत, खळाळत्या, प्रवाही आणि परिवर्तनशील भाषेला ‘अभिजाततेचा दर्जा मिळणं’ फारच सुखद आहे. आपण अनेकदा, विविध प्रसंगांच्या निमित्ताने जेव्हा आपल्या या जिवंत भाषेला अनेकदा ती ‘मृत’ होणार अशी शापवाणी देत असतो, त्या शापवाणीमागे भाषेसंदर्भातली आपली उदासीनता दडलेली असते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. एकीकडे आपण ‘मराठी’ ही ज्ञानभाषा झाली पाहिजे, असा धोशा लावला आहे आणि दुसरीकडे ती मृत कशी होईल यासाठी हेतुपुरस्सर तसं वर्तनही करतो आहोत. आपला भाषेसंदर्भातला हा विरोधाभास लक्षात घेतला की, मुकुंदराज, ज्ञानेश्वरादी संतांनी त्या काळात भाषासंघर्ष ऐरणीवर का आणला याचा प्रत्यय येतो. तो भाषासंघर्ष त्यांनी फक्त ऐरणीवर आणला नाही, तर भाषा ज्ञानभाषा होण्यासाठीचा लढाही दिला. तो लढा देताना मुकुंदराज ‘विवेकसिंधू’ या आपल्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथात म्हणतात,
‘जया नाही शास्त्रप्रतीती
जे नेणती कर्ममुद्रेची स्थिती
तयालागि मर्हाटीया युक्ती
केली ग्रंथरचना’
या ग्रंथरचनेतून त्यांची भाषेबद्दलची आत्मीयता आपल्या प्रत्ययाला येतेच.
ही प्रतीती सामान्यजनांना येत असतानाच ज्ञानेश्वरांनी ‘माझा मराठाचि बोल कवतिके...’ म्हणत ‘अमृतातेही पैजा जिंकण्याची’ दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून ‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ असा आशावाद निर्माण करण्यात आणि मराठीला ज्ञानभाषा करण्यात मोठाच हातभार लावला, तर ‘संस्कृत भाषा देवे केली, तर प्राकृत काय चोरापासुनि आली’ असा खडा सवाल संत एकनाथांनी विचारून भाषेसाठी संघर्षाची एक नवी परंपरा उभी केली. प्रश्न विचारण्याची धडाडी, भाषेबद्दलची आत्मीयता, सामान्यांच्या भाषेला लोकमान्यता मिळवून देण्याची धडपड आणि त्यातून अनेक शतके भाषेची चाललेली ही चळवळ आजही चालू आहे, हे जिवंत मराठी समाजमनाचं आणि भाषेप्रतिच्या प्रेमाचं एक विलक्षण सुंदर असं उदाहरण आहे.
आपल्या या संतांची भाषा चळवळ आज आपल्या काळात ‘अभिजात’ झाली, याचा आनंद मराठी मनाला खचितच मोठा असणारा आहे. आपल्याकडे भाषेच्या अनुषंगाने उभी राहिलेली ती नुसती भाषा चळवळ नाही, तर वैचारिक भाषा चळवळ आहे. ज्ञानेश्वरादी संतांनी उभी केलेली ही चळवळ कालखंडाच्या प्रत्येक टप्प्यात अधिकाधिक जोमाने पुढे पुढे जात राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला एक आखीव रूप दिलं. त्यासाठी अनेकानेक गोष्टी जाणीवपूर्वक प्रत्यक्षात आणल्या. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘निबंधमाले’तून भाषेच्या संदर्भातला एक लढा अधिक तीव्र केला. त्यानंतरही ही चळवळ अधिक सशक्त झाली. गेली 40 वर्षे मराठी भाषा अभिजात भाषा आहे, हे सिद्ध करण्याच्या लढ्याने जोर पकडला आणि आपल्या जिवंत भाषेवर 3 ऑक्टोबर 2024 रोजी ‘अभिजात’तेचा शिक्का उमटला आणि एक ऐतिहासिक क्षण घडला.
अभिजातता म्हणजे काय? तो दर्जा कसा मिळतो वगैरे अनेक गोष्टींची माहिती विविध माध्यमांतून आपण वाचलीच आहे. त्यावर उलटसुलट चर्चाही झाल्या आहेत. त्यातून काही सकारात्मक, तर काही नकारात्मक सूरही आपल्या कानावर पडले.
‘भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमके काय बदल होणार आहेत?’, ‘आमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे?’, ‘आम्हाला याचा उपयोग काय?’ असे एक ना अनेक प्रश्न समोर आले; त्यातून ‘भाषेच्या क्षेत्रात काम करणार्या लोकांना फार तर उपयोग होईल’ असा एक आवाज मोठा होत गेला; पण हा आवाजमोठा करताना आपण भाषेच्या माध्यमातूनच ‘संवाद’ साधत असतो, म्हणजेच सोप्या शब्दांत आपण भाषेच्या माध्यमातून एकमेकांशी बोलत असतो, गप्पा मारत असतो, स्वतःला अभिव्यक्त करत असतो, भावनांचे प्रगटीकरण करत असतो आणि दिवसभरातला आपला सगळाच वेळ आपण भाषेच्या जिवावर उड्या मारत असतो, म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाइलइतकीच ‘भाषा’ ही आपली मूलभूत गरज आहे, हे आपण विसरतो आणि भाषेला गृहीत धरून तिचा रोजच्या रोज खून पाडतो. आता तर आपण आपल्या ‘अभिजात भाषेचा खून रोज पाडणार आहोत’, असं चित्र आजूबाजूला पाहायला मिळत आहे.
खरं तर दीर्घकाळ भाषा जिवंत राहते, याचा अर्थ ती भाषा प्रवाही, परिवर्तनशील आणि भाषिक देवाणघेवाणीतून समृद्ध झालेली असते, असं मानायला हवं आणि ते मानून आपण अधिक योग्य दृष्टीने भाषेचा विचार करून पुढे जायला हवं.
या क्षणाला ‘अभिजातते’चा सरकारी शिक्का तर मिळाला. वरवरचा विरोध, वरवरचा आनंद तर आता दाखवून झालेला आहे, मग आता आपण काय केलं पाहिजे? असा एक प्रश्न आपल्या समोेर आहेच. आपण भाषेच्या संदर्भात अनेक गोष्टी करू शकतो. त्या व्यक्तिगत पातळीवर काय आणि कशा करू शकतो, याचा विचार प्राधान्याने आणि आपलेपणाने केला पाहिजे.
* सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या अभिजाततेचा स्वीकार केला पाहिजे. तो केला की, पुढचे अनेक मार्ग सुकर होतात. आपल्या नवीन शैक्षणिक धोरणाने मातृभाषेत शिक्षणाचा आग्रह धरला आहे, ही त्यातली एक महत्त्वाची बाब येथे मुद्दाम अधोरेखित करावीशी वाटते आहे. त्यातून मुलांची मराठी भाषेशी तोडली जाणारी नाळ, पुन्हा एकदा सांधली जाण्याची शक्यता मोठी होताना दिसते आहे. आपण या गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्याची गरज समजून घेतली पाहिजे.
* मराठी अभिजात झाली हो... आता पुढे काय? असा प्रश्न आहेच. शासकीय पातळीवर मिळत जाणारी अनुदाने हा एका विशिष्ट गटापुरता मर्यादित राहणारा विषय असला तरी प्रत्येक व्यक्तीने या अभिजाततेत जबाबदारीने भर घातली पाहिजे. ती भर घालताना काही गोष्टी आपल्याला व्यक्तिगत पातळीवर करता येतील.
* मुलांपासून सुरुवात केली तर, आजकाल मुलं इतर भाषा शिकतात, त्यातल्या गोष्टी, कविता वाचतात, त्या वाचलेल्या गोष्टी, कवितांचा अनुवाद/भाषांतर त्यांनी केलं तर भाषेचे अभ्यासक तयार होतील. महाविद्यालयीन पातळीवरही यासाठी वेगवेगळे प्रकल्प मुलांना देता येतील. आपल्या भाषेतलं साहित्य दुसर्या भाषेतही मुलांना अनुवादित करण्यासाठी प्रोत्साहन देता येईल. यामुळे आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द, नवीन संकल्पना येतील. आपल्याकडचे शब्द, संकल्पना दुसर्या भाषेत जातील आणि भाषा एक पाऊल अधिक पुढे जाईल. यातून मुलांना अनुवादाचं तंत्र आणि भाषेला समृद्धतेचा मंत्र मिळेल.
* आपण रोजच मराठीतून बोलत असतो; पण ते अधिक सजगपणे बोललो तर त्याचा अधिक फायदा होईल, म्हणजे उदा. बघा. “माझी मुलगी आज ‘स्कूल’ला गेली नाही.” असं बोलण्याऐवजी “माझी मुलगी आज ‘शाळे’त गेली नाही.” असं बोललं तर? तर ते अधिक योग्य असेल ना? ज्या शब्दांना आपल्याकडे प्रतिशब्द प्रचलित आहेत, त्या शब्दांचा वापर आपण जाणीवपूर्वक आणि सजगतेने केला पाहिजे. जे शब्द, ज्या संकल्पना आपण परकीय भाषेतून घेतलेल्या आहेत, त्या तशाच वापराव्यात, त्यातून भाषा समृद्ध होईल, याकडे लक्ष द्यावे.
* साध्या-सोप्या शुद्धलेखनाच्या नियमांकडे लक्ष द्यावे. त्यातून आपल्याला लेखनातील अचूकता कशी साधता येईल हेही पाहावे.
* निवेदन, सूत्रसंचालनाच्या स्पर्धाही घेता येतील, त्यातून भाषेकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल.
* विविध कार्यक्रमांच्या संहिता लेखनासाठी उपयुक्त ठरतील अशा कार्यशाळा घेता येतील.
* मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला आणि वर्षानुवर्षे सुरू असलेला बोली विरुद्ध प्रमाणभाषेचा वाद पुन्हा उफाळून वर आला. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, बोलीभाषेत असलेल्या वैविध्यामुळेदेखील आपल्या भाषेला हा दर्जा मिळालेला आहे. आता बोलीभाषांचं संवर्धन करण्यासाठी आपण व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करतो का? याचा विचारही झाला पाहिजे. खरं तर प्रत्येक कुटुंबाला कोणत्या तरी एका बोलीभाषेची पार्श्वभूमी असते. या कुटुंबातल्या शब्दांच्या अर्थासकट नोंदी करणे आणि त्या सोशल मीडियावर देणे. आपल्या बोलीभाषेत लेखन करणे, त्याची पुस्तके प्रकाशित करणे वगैरे गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक करायला लागणार आहे, कारण आपल्या भाषेतलं साहित्य आता इतर भाषांमध्ये अनुवादित होणार आहे.
अशा काही गोष्टी आपण जाणीवपूर्वक केल्या, तर आपल्याला काही भाषेच्या मृतावस्थेवर बोलण्याची गरज उरेल असं वाटत नाही.
खरं तर यापुढच्या काळात मराठी भाषेला असे अनेकविध बहुमान मिळतील. त्यासाठी आपल्या भाषेचा अभिमान बाळगून आपल्याला सतत सतर्क राहून भाषेचा उपयोग करावा लागणार आहे. ही सगळी प्रक्रिया दीर्घकालीन तरी अतिशय संथपणे चालणारी आहे. त्यात ‘पी हळद आणि हो गोरी’ असा उतावळेपणा करून चालणार नाही. भाषेचं हे संथ तरी प्रवाही असणं, हेच खरं तिचं सौंदर्य आहे आणि तिचं हे प्रवाहीपण वाढवायची जबाबदारी आपली आहे. त्या जबाबदारीकडे सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे. त्यासाठीचे काही प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर, काही प्रयत्न सामाजिक पातळीवर, काही प्रयत्न शासकीय पातळीवर केले, तर ‘अभिजाततेच्या वलयामागची जबाबदारी’ ही रुक्ष न वाटता तो ‘जनांचा प्रवाहो होईल’ आणि आपल्याला भाषिकदृष्ट्या अधिक समृद्ध होता येईल; पण या सगळ्यासाठी आपल्याला गरज आहे ती संयमाची आणि सकारात्मक प्रयत्नांची.