रामायणाचे मोठे गारुड भारतीय जनमानसावर आहेच, त्यातही पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा भव्य मंदिरात होत असल्याने हा क्षण मोहरून टाकणारा होता. तो रोमांचक क्षण चिरंतन करण्यासाठी सर्वच भारतीयांनी तो हर्षाने साजरा केला - मग ते वास्तव्याला भारतात असोत किंवा परदेशात!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येतील रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचे थाटामाटात लोकार्पण झाले. त्या निमित्ताने केवळ अयोध्येतच नव्हे, तर देशभर चैतन्याचे वातावरण पसरलेले होते. पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर हे भव्य मंदिर उभे राहत असल्याने त्या क्षणाचे स्वागत करण्यासाठी देशभर उपक्रमांची आणि कार्यक्रमांची रेलचेल होती आणि मुख्य म्हणजे त्यातील सामान्यांचा सहभाग हा उत्स्फूर्त होता. अयोध्येत झालेल्या कार्यक्रमाने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे तर फेडलेच, तसेच देशभरातदेखील रामभक्तांनी त्या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करण्यात कोणतीही कसर बाकी सोडली नव्हती. भारतातील अयोध्येच्या पवित्र भूमीवर साकारण्यात आलेल्या भव्य मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याचा हर्ष केवळ भारतापुरता मर्यादित होता असे नाही. जगभर अनेक देशांत भारतीय समुदाय पसरलेला आहे आणि त्यांना प्रत्यक्ष भारतात येऊन सोहळ्यात सामील होणे शक्य नसले, तरी आपापल्या ठिकाणी हा क्षण त्यांनी उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे साजरा केला. त्यातून त्यांना झालेला उल्हास प्रत्ययास आला. अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत अनेक देशांत या निमित्ताने अनेक उपक्रम योजण्यात आले होते, कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. अशा उप्रक्रमांत सहभागी झालेल्यांनी किंवा त्यांचे साक्षीदार असलेल्यांनी आपापले अनुभव कथन केले आहेत. ते चक्षुर्वैसत्यम अनुभव अयोध्येतील ’जय श्रीराम’चा ध्वनी जगभर पोहोचल्याची प्रचिती देणारे आहेत, यात शंका नाही.
अमेरिकेत जल्लोश
अमेरिका आणि ब्रिटन या दोन देशांत भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणावर असल्याने याच दोन देशांत सर्वाधिक कार्यक्रम झाले हे जरी खरे असले, तरी जगभरातील अन्य देशांतदेखील या सोहळ्याविषयी असणारा उत्साह कमी नव्हता. अमेरिकेत ‘विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिका’ आणि ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ या संघटनांनी यासाठी विशेष पुढाकार घेतलेला होता. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना भाविकांना त्याचे थेट प्रक्षेपण पाहता यावे, म्हणून अमेरिकेत सुमारे तीनशे ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. अमेरिकेबरोबरच ब्रिटन (25), ऑस्ट्रेलिया (30), कॅनडा (30), मॉरिशस (100) अशा ठिकाणी प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्यावरूनच या कार्यक्रमाविषयी असणार्या उत्सुकतेची कल्पना येऊ शकेल.
न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर या प्रसिद्ध चौकात दिव्यांची भव्य आरास करण्यात आली होती आणि भजन, गाणी, नृत्य यातून रामभक्त आपला आनंद साजरा करीत होते. भाविकांना प्रभू रामचंद्रांच्या भव्य चित्राचे दर्शन घडत होते. अमेरिकेत दहा ते बारा शहरांत रॅली काढण्यात आल्या होत्या. त्यात भारतीय समुदायाचे नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यातील उल्लेखनीय रॅली कॅलिफोर्निया भागातील. ढोल-नगारे यांच्यासह हा परिसर दुमदुमून गेला होता आणि रॅलीत अडीचशे वाहने सामील झाली होती. हजारेक जणांनी रॅलीत भाग घेतला. बिग बे भागात झालेल्या रॅलीने सुमारे दीडशे किलोमीटरचे अंतर पार केले. ‘हिंदूज ऑफ ग्रेटर ह्युस्टन’ या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्या ज्या देशात प्रभू रामचंद्र हे संस्कृतीचा भाग आहेत, त्या देशांतील अमेरिकास्थित नागरिकांना निमंत्रित करण्यात आले होते. ‘वर्ल्ड हिंदू काउन्सिल ऑफ इंडिया’ या संघटनेने रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने रामयात्रेचे आयोजन केले आहे. ही अभिनव यात्रा 25 मार्चपासून सुरू होईल आणि पुढील दीड महिन्यांत कॅनडातील आणि अमेरिकेतील हजार मंदिरांना भेटी देईल. अयोध्येत झालेल्या सोहळ्याला अमेरिकेतून जे भारतीय उपस्थित होते, त्यांनी आणलेल्या अक्षतांचे वाटप या वेळी करण्यात येईल. एका वाहनावर प्रभू रामचंद्रांसह लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती असतील आणि अशी ही यात्रा अमेरिकेतील रामभक्तांना एका अर्थाने रामाचा प्रसाद देईल.
आताही अमेरिकेतील बोस्टन, शिकागो इत्यादी शहरांत अशा रॅली निघाल्या आणि किमान तापमान शून्याखाली असूनही त्याची पर्वा न करता भाविक श्रद्धेने त्यात सहभागी झाले. बोस्टननजीकच्या वूस्टर या शहराचे महापौर जोसेफ पेटी यांनी एक परिपत्रक काढून हिंदूंना राम मंदिर लोकार्पणाच्या विशेष शुभेच्छा दिल्या. सॅन फ्रान्सिस्को येथेदेखील रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मॅसॅच्युसेट्समध्ये राधाकृष्ण मंदिरात भाविकांनी आरती केली, तर न्यू जर्सी येथील मंदिरांत भाविकांचा असाच उत्साह होता. मॉनरो येथील मंदिरात या निमित्ताने एकाच पाषाणातून कोरलेल्या हनुमानाच्या पंचवीस फूट उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, हे विशेष. व्हर्जिनिया येथील देवळात अडीच हजार भाविकांनी एकत्र येऊन पूजा-प्रार्थना केली. अमेरिकेतील दहा प्रांतांत सुमारे चाळीस होर्डिंग (बिलबोर्ड) लावून त्यातून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा आणि मंदिर लोकार्पणाचा संदेश देण्यात आला होता. टेक्सास, वॉशिंग्टन, ओहायो, मिशिगन येथेदेखील चैतन्यपूर्ण वातावरणात समारंभ साजरे झाले. या सगळ्यात आढळलेले वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ भारतातून अमेरिकेत गेलेल्या पिढीचेच नागरिक सहभागी झाले होते असे नाही, तर ज्यांचा जन्म अमेरिकेतच झाला अशा भारतीय वंशाचे तरुणदेखील सहभागी झाले होते. उल्लेखनीय म्हणजे नॅसडॅकच्या (अमेरिकेचा शेअर बाजार) स्क्रीनवरदेखील प्रभू रामचंद्रांचे चित्र झळकत होते.
ब्रिटनमध्ये भक्तिपूर्ण वातावरण
ब्रिटनमध्येही असाच उत्साह होता. डब्लिनमार्गे सुधीर बर्वे यांनी तर श्रीमती रितू परिहार यांनी त्यांना विश्व हिंदू परिषदेच्या राजस्थान शाखेतून प्राप्त झालेले असे अक्षता कलश भाविकांसाठी दर्शनाला ठेवल्याने भारतात येऊ न शकलेल्या शेकडो जणांना त्याचे दर्शन घेता आले. हे कलश अक्षरश: डोक्यावर घेत, नाचत आणि वाजतगाजत त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. लंडनच नव्हे, तर वॉटफर्ड, लिस्टर, केम्ब्रिज, साउथहॉल इत्यादी ठिकाणी हजारो भाविकांनी कलशाचे दर्शन घेतले. एवढेच नाही, तर त्या अक्षता ब्रिटनमधील हिंदूंच्या घरातील देव्हार्यापर्यंत पोहोचल्या. ‘इन्साइट यूके’ या ब्रिटनमध्ये हिंदूंसाठी कार्यरत असणार्या संस्थेने रामरक्षा पठण, राम मंदिर लढ्याची माहिती समाजमाध्यमांवरून नेटाने दिली. लंडन महाराष्ट्र मंडळात अयोध्येतील राम
मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
वास्तविक ब्रिटन आणि भारतीय प्रमाण वेळ यात काही तासांचे अंतर आहे. भारतात ज्या वेळी रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार होती, त्या वेळी ब्रिटनमध्ये सकाळचे आठ-साडेआठ वाजले होते. त्याअगोदरपासूनच तेथील हिंदू दूरचित्रवाणीच्या पडद्यासमोर बसले होते आणि त्या ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा करीत होते. ब्रिटनमध्ये शेकडो मंदिरांत भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते, एवढेच नव्हे, तर लंडनमध्ये डिजिटल बॅनर्सच्या माध्यमातून या प्रसंगाची माहिती देण्यात येत होती. ‘हिंदू सोसायटी’ या ऑक्स्फर्ड विद्यापीठाशी संलग्न संस्थेने आणि ‘सेंटर फॉर हिंदू स्टडीज’ या विभागाने विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते. रामसंकीर्तन, हनुमान चालिसा यांचे पठण तेथे करण्यात आले.
युरोप-जपानमध्ये चैतन्य
विश्व हिंदू परिषद आणि अयोध्या राम मंदिर व्यवस्था समितीतर्फे युरोपमधील विविध देशांमध्ये अक्षता पाठविण्यात आल्या होत्या. जर्मनीमध्ये बर्लिन येथे सर्वप्रथम अक्षता आल्या. बर्लिन शाखेने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जर्मनीमधील सर्व शाखांमध्ये अक्षता टपालाने पाठविल्या. जर्मनीमध्ये हिंदू स्वयंसेवक संघाच्या एकूण 18 शाखा आहेत. या अक्षतांचे वाटप करण्यासाठी ‘घर घर राम’ ही मोहीम राबविण्यात आली होती. त्यासाठी ड्रेस्डेन शाखेतील कार्यकर्त्यांनी अभिनव योजना केली. श्रीरामांचे चित्र इंटरनेटवरून डाउनलोड केले, त्याच्या सुमारे दोनशे प्रती काढल्या. अक्षतांसाठी जाळीच्या पिशव्या खरेदी केल्या. अक्षता वितरणासाठी याद्या करून स्वयंसेवकांना त्या देण्यात आल्या. आपापले रोजचे काम संपल्यावर अगदी रात्री उशिरादेखील हे स्वयंसेवक हे ‘राम आमंत्रण’ देण्यासाठी जात असत. तेथेही तापमान शून्याखाली असूनही, बर्फ पडत असूनही त्याला न जुमानता रामभक्तांनी हे कार्य पूर्ण केले. प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला - 21 जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी जेथे मंदिर नव्हते, तेथे एखाद्या सभागृहात जरी कार्यक्रम घ्यावा लागला, तरी त्यातील उत्साहात कमी नव्हती. भजन संध्या, प्रभू रामचंद्रांच्या आणि मंदिराच्या अनुषंगाने ऐतहासिक-पौराणिक माहिती देणारी भाषणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बर्लिन येथे मंदिरात 1008 राम ज्योतींचे प्रज्वलन आणि रामधून अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युरोपात अन्यत्रही या सोहळ्याचा उत्साह होता. जर्मनीतील प्रमुख शहरांत ढोल-नगारे यांचे वादन करीत, भगवे ध्वज फडकावत भाविकांनी वातावरण भारून टाकले. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या दिवशी ‘रामरथयात्रा’ काढण्यात आली होती आणि सुमारे तीन तास ती चालली होती.
जपानमध्ये भारतीय दूतावासाने प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली होती. भारताचे जपानमधील राजदूत सिबी जॉर्ज यांच्यासह अनेक भारतीय नागरिक त्यास उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी भारतीय दूतावासात कर्नाटक मंडळाच्या मुलांनी रामायणाचे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण केले. बांदो शहर, इबाराकी येथील भाविकांनी भव्य रॅली काढली. अचानक आलेल्या पावसातदेखील अनेक वाहनांनी त्यात उत्साहाने सहभाग घेतला होता. सोदो शहर, इबाराकी येथीस राम मंदिरात भाविकांनी पूजा, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते. फुनाबोरी शहर, तोक्यो येथील इस्कॉन मंदिरातदेखील सोहळ्याचे आयोजन केले गेले होते. ‘हिंदू स्वयंसेवक संघा’च्या स्वयंसेवकांनी रामराया अयोध्येत येण्याचा क्षण विविध शाखांमध्ये धूमधडाक्यात साजरा केला. श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन, रामरक्षा, विष्णुसहस्रनामस्तोत्र आदी स्तोत्रांचे पठण व उत्साही बालांनी म्हटलेली भजने, आयोध्येवरून आलेल्या अक्षतांचे वाटप, विविध भजनांचे गायन यामुळे वातावरण मंगलमय झाले होते. कावासाकी येथे रामभक्तांनी एकत्र येऊन श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून भजनांचे गायन केले. योकोहामा मंडळानेही अशाच प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केले आणि उपस्थितांनी जल्लोशात गायन, वादन करत रामरायाचे स्वागत केले आणि अक्षतांचे वाटप केले.
कार्यक्रमांची रेलचेल
याखेरीज अन्य अनेक देशांत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम-उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मॉरिशस सरकारने शासकीय कर्मचार्यांपैकी जे हिंदू असतील, त्यांना 22 जानेवारी रोजी दोन तासांची विशेष सुटी जाहीर केली होती. त्या देशाचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी प्रभू रामचंद्रांचे अयोध्येत होणारे आगमन साजरे करू असा संदेश जारी केला होता. फिजीमध्ये 18 ते 22 जानेवारी या कालावधीत रामलल्ला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियात सिडनी येथे वाहनांची रॅली काढण्यात आली होती आणि शेकडो रामभक्त त्यात सामील झाले होते. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड येथील ईडन पार्क येथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती आणि तेथील भारतीयांनी तेथे मोठी गर्दी केली होती.
त्रिनिदाद-टोबॅगो येथे तर भारतीय वंशाच्या नागरिकांचे प्रमाण लोकसंख्येच्या सुमारे चाळीस टक्के आहे, तेव्हा तेथे या सोहळ्याचे विशेष आकर्षण होते, यात नवल नाही. हजारो भाविकांनी तेथे एकत्र येत भजने म्हटली, गाणी म्हटली. मेक्सिकोसारख्या देशाचा आवर्जून उल्लेख करावयास हवा. याचे कारण तेथील क्वेरेटारो शहरात या निमित्ताने राम मंदिर स्थापन करण्यात आले.
त्यासाठीच्या मूर्ती भारतातून पाठविण्यात आल्या होत्या. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की संपूर्ण मेक्सिकोमधील हे पहिलेच राम मंदिर होय. कॅनडात तीन महापालिकांनी 22 जानेवारी हा ’अयोध्या दिन’ अधिकृतपणे जाहीर केला होता आणि त्यामुळे तेथे भारतीयांमध्ये असणारा उत्साह अवर्णनीय होता. श्रीलंकेत विशेषत: जाफना भागात जेथे हिंदूंचे प्राबल्य आहे, तेथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांची सफाई, पूजा-अर्चा यांनी वातावरण राममय होऊन गेले. नेपाळ तर सीता मातेचे माहेर. जानकी मंदिरात फुलांची आकर्षक आरास, रस्त्यांवर सुशोभीकरण यांनी सारा परिसर फुलून गेलाच, तसेच वातावरणदेखील मंगलमय झाले. जनकपूर येथे सव्वा लाख मातीच्या दिव्यांचे प्रज्वलन करण्यात आले होते. भारताच्या सीमेनजीकच्या आठेक जिल्ह्यांत अतिशय भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून उपक्रम राबविण्यात आले.
रामायणाचे मोठे गारुड भारतीय जनमानसावर आहेच, त्यातही पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा भव्य मंदिरात होत असल्याने हा क्षण मोहरून टाकणारा होता. तो रोमांचक क्षण चिरंतन करण्यासाठी सर्वच भारतीयांनी तो हर्षाने साजरा केला - मग ते वास्तव्याला भारतात असोत किंवा परदेशात!
(विकास देशपांडे, अमेरिका; राहुल करूरकर, इंग्लंड; सारंग देशमुख, जपान; मानसी शेंडे, जर्मनी यांनी दिलेल्या आणि अन्य माध्यमांतून संकलित माहितीच्या आधारे.)