22 तारखेचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा तर काय वर्णावा? सर्व संतांची मांदियाळी त्या समयी अयोध्येत अवतरली होती. प्रत्यक्ष मंदिराचे पहिले दर्शन जेव्हा घडले, तेव्हा माझ्यासकट सर्वांचेच डोळे भरून आले. फोटोत दिसते त्यापेक्षा मंदिर कितीतरी भव्य आहे आणि रामरायाची मूर्ती काय वर्णावी? राखाडी काळ्या पाषाणात आपला संपूर्ण जीव ओतून मूर्तिकार अरुण योगिराज याने बनवलेली ही मूर्ती म्हणजे दगडात साकार झालेले साक्षात सुंदर, सावळे रूप मनोहर! त्याचे क्षणभर झालेले दर्शनदेखील आयुष्यभराची ऊर्जा देऊन जाणारे!
पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत 2080, अर्थात सोमवार 22 जानेवारी 2024 हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, कारण ह्या दिवशी स्वतंत्र भारताने मानसिक गुलामगिरीचे जोखड आपल्या मनावरून खर्या अर्थाने झुगारून दिले.
अयोध्येमध्ये श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन भव्य मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा आणि तीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली. अनेक पिढ्यांच्या त्यागानंतर प्रभू राम खर्या अर्थाने अयोध्येत आपल्या जन्मस्थळी परत विराजमान झाले. निमंत्रित म्हणून हा ऐतिहासिक सोहळा मला याची देही, याची डोळा पाहण्याचे भाग्य मिळाले. हा सुवर्णयोग माझ्या भाळी लिहिला गेल्याबद्दल मी फार कृतज्ञ आहे.
20 तारखेला सकाळी मी इस्रायलच्या अभ्यासदौर्यावरून परत आले आणि त्याच दुपारी मुंबईहून अयोध्येचे विमान पकडले. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे देशभर ज्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या लहरी पसरलेल्या होत्या, त्यांची अनुभूती अगदी मुंबई विमानतळापासूनच येत होती. विमानात बसलेले सगळेच श्रीरामासाठी चाललेले होते. सगळेच काही निमंत्रित नव्हते. काही लोक फक्त 22 तारखेला आम्हाला अयोध्येत राहायचेय ह्या तीव्र इच्छेने चालले होते. माझ्या शेजारी पंचविशीचे दोन तरुण बसले होते. ते म्हणाले की ज्या दिवशी मुंबई-अयोध्या अशी थेट विमानसेवा सुरू झाली, त्याच दिवशी त्यांनी तिकिटे काढून ठेवली होती. मी विचारले, ‘’तुमचे राहायचे वगैरे बुकिंग झालेय का?” तर ते म्हणाले की त्यांनी प्रयत्न केला, पण काही मिळाले नाही, तेव्हा कुठेतरी दुकानाच्या ओवरीवर किंवा शरयूच्या घाटावर झोपायच्या तयारीनेच ते निघाले होते, स्लीपिंग बॅग वगैरे घेऊन!
पुढे अयोध्येत मला असे असंख्य लोक भेटले, जे निमंत्रित नव्हते, पण मिळेल त्या वाहनांनी, मिळेल तसा प्रवास करून ते अयोध्येत दाखल झाले होते, त्यांच्या श्रीरामासाठी. कुठून कुठून आले होते लोक - आसाम, नेपाळ, बिहार, कर्नाटक, पंजाब, जम्मू, तामिळनाडू, केरळ.. वेगवेगळ्या क्षेत्रांतले, वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे हे लोक होते. त्यामध्ये छत्तीसगडच्या जगदलपूरहून आलेल्या, संपूर्ण अयोध्येत अनवाणी फिरणार्या जनजाती स्त्रिया जशा होत्या, तसेच बेंगळुरूमध्ये आयटी क्षेत्रात उच्च पदावर काम करणारे तरुणही होते. बिहारमधल्या मधुबनी जिल्ह्यातले ’आम्ही सीतेच्या माहेराहून आलोय’ असे अभिमानाने सांगणारे आजोबा होते आणि आपल्या चिमुकल्याला धोतर नेसवून त्याच्या हाती चिमुकला धनुष्य-बाण देऊन त्याचा हात धरून त्याला चालवणारी दिल्लीतली वकील आईही होती.
कशासाठी आले होते हे लोक अयोध्येत? कुणी त्यांना बोलावले होते? त्यांना बोलावले होते त्यांच्या श्रीरामावरच्या श्रद्धेने. हा जो विशाल जनसमुदाय अयोध्येत जमला होता, त्यांना गुंफणारा एकच धागा होता - त्यांचे हिंदू असणे आणि त्यांची रामावरची दृढ श्रद्धा! त्यांची जात, त्यांची भाषा, त्यांची वेशभूषा, ते कुणाला मत देतात ह्या कशाकशाला अयोध्येत महत्त्व नव्हते. महत्त्व होते ते फक्त त्यांच्या हिंदू असण्याला!
विमान अयोध्येत उतरले, तेव्हा सर्व प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे ’जय श्रीराम’चा गजर केला. अयोध्येत भर दुपार असूनही चांगलीच थंडी आणि धुके होते. संपूर्ण विमानतळ राममय होता. गुलाबी दगडात बांधलेल्या विमानतळाला रामायणावर आधारित चित्रांनी सजवले होते, बिहारमधली मधुबनी चित्रे, ओडिशामधली पारंपरिक चित्रकला, तामिळनाडूमधली तंजोर चित्रकला, कर्नाटकमधले लाकडी कोरीवकाम अशा अनेक पारंपरिक चित्र आणि हस्तकला शैलींचा वापर करून विमानतळ सजवला गेला होता. विमानात बर्याच वेगवेगळ्या पंथांचे साधू-संत आणि अनुयायी होते. महाराष्ट्रातून काही बौद्ध भिक्खूही आवर्जून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आले होते, जैन परिव्राजक होते, निहंग सरदार होते, मराठी कीर्तनकार होते. इस्कॉनचे एक मोठे गुरू राधानाथ स्वामीही होते. त्यांना मी आवर्जून भेटले. अत्यंत मृदुभाषी असलेल्या स्वामीजींनी सांगितले की “सनातन धर्माबद्दल आस्था असलेल्या प्रत्येकासाठी हा अत्यंत आनंदाचा आणि कृतार्थतेचा क्षण आहे!”
विमानतळावरून बाहेर पडलो आणि संघ’व्यवस्थेशी’ पहिला परिचय झाला. बाहेर अनेक स्वयंसेवक उभे होते, प्रत्येक निमंत्रिताची आस्थेने चौकशी करून त्यांना स्वागत कक्षात नेत होते. तिथे फुलांचा हार आणि कुंकुमतिलक लावून प्रत्येकाचे स्वागत केले जात होते. राहायची व्यवस्था कुठे आहे ह्याची पडताळणी करून बस आणि कार्सद्वारे सर्वांना शहरात नेले होते. माझी व्यवस्था मणिरामदास छावणीतल्या टेंट सिटीत होती. एकाला लागून एक अशा पत्र्याच्या खोल्या होत्या. प्रत्येक खोलीत स्वच्छतागृहाची आणि स्नानगृहाची व्यवस्था केलेली होती, जेवणासाठीचा मोठा टेंट सर्वात शेवटी होता. प्रत्येक खोलीत तीन खाटा. खोली साधी असली, तरी स्वच्छ होती आणि मुख्य म्हणजे व्यवस्था पाहणार्या सर्व स्वयंसेवकांचे अगत्य वाखाणण्याजोगे होते. अतिशय मनापासून आणि नम्रतेने सर्व जण सेवा देत होते, अगदी घरचे कार्य असल्यासारखे सर्व वावरत होते.
सामान ठेवून चहा-बिहा घेऊन मी लगेचच अयोध्या पाहण्यासाठी बाहेर पडले. थंडीचा कडाका प्रचंड होता, तरी लोकांचा उत्साह अमाप होता. संपूर्ण अयोध्या जणू काही पुन्हा एकदा दिवाळी साजरी करत असल्यासारखी सजली होती. मी एक इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन जमेल तितके शहर बघून घेतले. संपूर्ण रामायण संगमरवरात कोरलेले वाल्मिकी भवन, सीता वाटिका, बद्रीनाथ, रामेश्वरम, पुरी आणि द्वारका ह्या भारताच्या चार दिशांच्या चार धामांची प्रतिकृती असलेले चार धाम मंदिर, देशाच्या अनेक भागांतून आलेल्या शिळा ठेवलेले शाळीग्रामनगर आणि रामजन्मभूमी न्यासाचे कार्यालय हे सर्व पाहून घेतले. सगळीकडे उत्साह, आनंद नुसता ओसंडून वाहत होता. चार दिवस मी अयोध्येत होते, पण दुर्मुखलेला, करवादलेला एकही चेहरा मी पाहिला नाही.
सगळीकडे संगीताचे स्वर ऐकू येत होते, अनेक ठिकाणी प्रवचने, रामलीला सुरू होत्या. अगदी समर्थांचे शब्द आठवले मला -
अनेक वाजती वाद्ये, ध्वनिकल्लोळ उठिला,
छबीने डोलती धाला, आनंदवनभुवनीं!
बुडाले सर्वही पापी, हिंदुस्थान बळावले,
अभक्तांचा क्षयो जाला, आनंदवनभुवनीं!
येथून वाढीला धर्मु, रमाधर्म समागमे,
संतोष मांडला मोठा, आनंदवनभुवनीं!
खरोखरी अयोध्येतले वातावरण ‘संतोष मांडला मोठा’ असेच होते. खूप भटकून मी उशिरा खोलीत परत आले. नुकतीच इस्रायलमध्ये युद्धभूमीवरचा संघर्ष बघून, तिथल्या दहशतवादाने पोळलेल्या लोकांशी बोलून काहीशा विषण्ण मनाने मायदेशी परत आले होते तीच अयोध्येला, अतिशय उत्सवी, आनंदी वातावरणात. नाना पालकरांच्या शब्दात सांगायचे, तर ‘छळाकडून बळाकडे’!
21 जानेवारीचा दिवस उजाडला. सर्व आन्हिके आणि न्याहारी उरकून मी परत बाहेर पडले. आज मला पेजावर मध्व मठाच्या श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजींचे दर्शन घ्यायचे होते. त्यांचे गुरू आधीचे पेजावर श्री विश्वेश तीर्थ स्वामींचे रामजन्मभूमीच्या लढ्यात खूप मोठे योगदान होते. पडलेल्या ढांच्याच्या ठिकाणी त्यांनीच स्वहस्ते रामलल्लाच्या छोट्या मूर्तीची स्थापना केली होती. इतकी वर्षे छोट्या कापडी टेंटमध्ये राहिलेली तीच मूर्ती आता भव्य अशा मंदिरात उत्सवमूर्ती म्हणून विराजमान होणार होती, आणि ती मूर्ती मिरवत मंदिरात नेण्याचा अधिकार निर्विवादपणे विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजींचा होता.
कुठल्याही आलिशान हॉटेलमध्ये किंवा सरकारी गेस्ट हाउसमध्ये न राहता स्वामीजींनी आपल्या मध्वाश्रमाच्या साध्या वास्तूत राहणेच पसंत केले होते. माझ्याशी बोलताना स्वामीजींनी स्पष्टपणे सांगितले की “मंदिर बनले ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, पण आता हे मंदिर ’आचंद्रार्क’ टिकवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा ह्या देशात हिंदू बहुसंख्य असतील, एकसंघ असतील आणि प्रबळ असतील.” माझ्या ‘नो बिंदी नो बिझनेस’ चळवळीचे स्वामीजींनी कौतुक केले, तेव्हा मला खरोखरच भरून आले.
उरलेला दिवस मी अयोध्येत नुसती भटकत होते, लोकांशी बोलत होते. उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षा व्यवस्था उत्तम राखली होती. स्वच्छतेसाठी जागोजागी सुलभ शौचालय संकुले उभारली होती, स्त्रियांसाठी पोर्टेबल टॉयलेट्स उभे केले होते. ठिकठिकाणी पोलीस उभे होते, जे अत्यंत नम्रतेने आणि सौजन्याने लोकांशी वागत होते. अयोध्येत गर्दी नुसती ओसंडून वाहत होती, पण एकूण वातावरण निर्मळ होते. आवाज होता, गोंधळ होता, गोंगाट होता, गर्दी होती; पण मुजोरी नव्हती, वखवख नव्हती, लाचारी नव्हती.
संध्याकाळी मला सीएनएन न्यूज 18वर एका शोसाठी जायचे होते, म्हणून साडी नेसून राम की पैडीवर निघाले होते. मुख्य रस्त्यावरून वाहनांची वाहतूक बंद केली होती, म्हणून गल्लीतून पायी पायी निघाले होते. साडी आणि शाल सावरत चालायला जरा वेळ लागत होता. इतक्यात एक इलेक्ट्रिक रिक्षा आपणहोऊनच थांबली. आत प्रवासी होते, तरी रिक्षावाल्याने विचारले, ’‘कहाँ जाना है?” मी राम की पैडी सांगितल्यावर म्हणाला, “बसा, मी सोडतो.” जास्त दूर नव्हते घाट, दीड किलोमीटर असेल अंतर. पोहोचल्यावर मी पैसे देऊ केले, तर रिक्षावाला म्हणाला, “इतने का क्या पैसा लेना, आप भी तो राम जी के लिये आयी हैं।” हे प्रेम, ही आस्था, हा स्नेहभाव मला अयोध्येत ठायी ठायी आढळला, मग तो दुसर्यांदा एकाच स्टॉलवर चहा प्यायला गेल्यावर माझी आवड लक्षात ठेवून कमी साखर आणि खूप आले घातलेला चहा न सांगता आठवणीने बनवणारा चहावाला असो किंवा पहिल्या दिवशी हनुमान गढीमध्ये गर्दीमुळे न शिरता आल्यामुळे हिरमुसला झालेला माझा चेहरा पाहून, “दीदी, आपको दर्शन तो नहीं करा सकता, पर प्रसाद तो खिला ही सकता हूँ” म्हणणारा डोग्रा रेजिमेंटचा सैनिक असो.. हिंदू समाजाच्या अगत्याचे, आतिथ्यशीलतेचे, श्रद्धेचे दर्शन मला अयोध्येत पदोपदी घडले.
22 तारखेचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा तर काय वर्णावा? सर्व संतांची मांदियाळी त्या समयी अयोध्येत अवतरली होती. प्रत्यक्ष मंदिराचे पहिले दर्शन जेव्हा घडले, तेव्हा माझ्यासकट सर्वांचेच डोळे भरून आले. फोटोत दिसते त्यापेक्षा मंदिर कितीतरी भव्य आहे आणि रामरायाची मूर्ती काय वर्णावी? राखाडी काळ्या पाषाणात आपला संपूर्ण जीव ओतून मूर्तिकार अरुण योगिराज याने बनवलेली ही मूर्ती म्हणजे दगडात साकार झालेले साक्षात सुंदर, सावळे रूप मनोहर! त्याचे क्षणभर झालेले दर्शनदेखील आयुष्यभराची ऊर्जा देऊन जाणारे!
प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वांनीच प्रत्यक्ष पाहिला, त्यामुळे त्याचे वर्णन करत बसत नाही; पण त्या निमित्ताने अयोध्येत लोटलेला जनांचा प्रवाहो, पंतप्रधानांच्या शब्दांनी, त्यांच्या अस्तित्वाने भारलेले वातावरण, त्या निमित्ताने घराघरावर अभिमानाने फडकणारा भगवा झेंडा, घरोघरी लावलेले दिवे आणि ह्या मंगल प्रसंगी जागृत झालेला हिंदुत्वाचा हुंकार हे सर्व प्रत्यक्ष अनुभवता आले, हे क्षण जगता आले हे माझे परमभाग्य! अयोध्येत जे जे पाहिले, अनुभवले, जगले ते शब्दात उतरवणे खरेच कठीण. पण आयुष्यात एखादा क्षण असा येतो, जेव्हा वाटते की हा जन्म सार्थक झाला. नियतीने माझ्या तळहातावर ठेवलेला असाच हा सुवर्णक्षण! ह्या आठवणींची शिदोरी एखाद्या दीपस्तंभासारखी मला आयुष्यभर सन्मार्ग दाखवेल, ह्याची मला पूर्ण खात्री आहे!