सोनेरी घोडदौड - आशियाई क्रीडा स्पर्धा 2022(23)

विवेक मराठी    27-Sep-2023   
Total Views |
@अनुजा  देवस्थळीआशियाई क्रीडा स्पर्धा ही आशियातील खेळाडू आणि क्रीडारसिक दोघांसाठी एक पर्वणीच असते. अश्वारोहण (Equestrian Dressage) खेळातील सांघिक सुवर्णपदक ही ह्या वर्षीची आत्तापर्यंतची सर्वात उल्लेखनीय कामगिरी आहे. हे यश भविष्यातल्या अनेक सकारात्मक बदलांची नांदी ठरेल.
 
Equestrian Dressage
 
चीनमधील हांगचाऊ ह्या ठिकाणी आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. 2022मध्ये नियोजित असलेली स्पर्धा कोविड प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडली होती. परिस्थिती सुरळीत झाल्यावर अखेर ह्या वर्षी स्पर्धा सुरू झाली. दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी ही स्पर्धा आशियातील खेळाडू आणि क्रीडारसिक दोघांसाठी एक पर्वणीच असते. 1951मध्ये पहिल्यांदा भारतातील दिल्ली शहरात आशियाई खेळ आयोजित केले गेले होते. 1951 ते 1978 ह्या काळात जपानने आणि त्यानंतर 2018पर्यंत चीनने स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. ह्या वर्षीही पहिल्या क्रमांकावर चीन असेल, हे स्पर्धेच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरही खात्रीपूर्वक सांगता येईल.
 
 
आपल्या देशाचा विचार केला, तर गेल्या दोन स्पर्धांमध्ये भारत आठव्या स्थानी होता. ह्या वर्षीचा अंतिम निकाल काही दिवसांत समोर येईलच, पण स्पर्धा अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी (26 सप्टेंबर) मिळालेलं अश्वारोहण (Equestrian Dressage) खेळातील सांघिक सुवर्णपदक ही ह्या वर्षीची आत्तापर्यंतची सर्वात उल्लेखनीय कामगिरी आहे.
 
 
ह्या खेळात घोडा घोडेस्वाराच्या आज्ञा किती प्रमाणात पाळतो, हालचालींमध्ये किती सहजता आणि लवचीकता आहे, तसंच घोडा आणि खेळाडूचं एकमेकांशी असलेलं नातं पाहायला मिळतं. सांघिक खेळ म्हणजेच सहभागी 3 किंवा 4 खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी आणि त्यांनी मिळवलेले गुण एकत्रित केले जातात आणि सर्वाधिक गुण मिळवणारा संघ विजयी ठरतो.
 
Equestrian Dressage 
 
 
अश्वारोहण आणि एशियाड
 
1982मध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई खेळांमध्ये पहिल्यांदाच अश्वारोहण हा खेळ समाविष्ट करण्यात आला होता. त्या वर्षी स्पर्धेचं यजमानपद भूषवणार्‍या भारताने 3 सुवर्णपदकं मिळवत स्पर्धेवर वर्चस्व गाजवण्यात यश मिळवलं. वैयक्तिक इव्हेंटिंग, सांघिक इव्हेंटिंग आणि वैयक्तिक टेंट पेगिंग ह्या प्रकारांत ही तीन पदकं मिळाली होती. वैयक्तिक इव्हेंटिंगमध्ये त्या वर्षी रौप्य आणि कांस्यपदकदेखील भारतीय खेळाडूंनीच मिळवली होती. 1986मध्ये ड्रेसाज प्रकारात भारताने कांस्यपदक मिळवलं होतं. 2018मध्ये भारताला इक्वेस्ट्रिअन जंपिंगमध्ये वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात 2 रौप्यपदकं मिळाली होती. सुवर्णपदकाची पाटी मात्र 41 वर्षं कोरीच राहिली होती. ह्या वर्षी ही प्रतीक्षा संपली.
 
 
सुवर्णविजेते अश्वारोहक
 
हा खेळ अत्यंत खर्चीक आहे आणि त्यामुळेच आपल्या देशात तो फारसा लोकप्रिय नाही. सुवर्ण विजेत्या संघातील खेळाडू 21-25 वयोगटातील आहेत आणि आज सर्वांची नावं हॅशटॅगसह ट्रेंडिंग आहेत. ट्विटर अणि अन्य समाजमाध्यमांमधून अभिनंदनाचे संदेश पाठवणार्‍यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर अनेक मंत्री, सचिन तेंडुलकरसारखे खेळातले दिग्गज असे अनेक लोक आहेत.
 
 
दिव्यकृती सिंग, हृदय छेडा, अनुष अगरवाला आणि सुदीप्ती हजेला हे ते चार खेळाडू आहेत. ह्या सुवर्णपदकानंतर खेळाडूंच्या भावना जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एरवी भारतात ज्याची फार कुणी दखलही घेत नाही असा हा खेळ. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे असलेल्या अश्वारोहण अकादमीचा अपवाद वगळता फारशा सोयीसुविधा नसलेल्या आपल्या देशातले हे तरुण खेळाडू जिंकण्याच्या जिद्दीने देशात आणि काही काळ परदेशात जाऊन अविरत परिश्रम करत होते, पण आपल्याला ह्याची जराही कल्पना नव्हती. इतर खेळांमध्ये साहित्य महागडं असेलही, पण ह्या खेळात तुम्हाला तुमच्याबरोबर एका सजीव प्राण्याचीदेखील काळजी घ्यायची असते. पदक तुमच्या गळ्यात येत असलं, तरी तुमचा घोडा हा तुमचा खरा साथीदार असतो आणि त्याच्याशिवाय जिंकता येत नसतं. असा हा महागडा खेळ अपुर्‍या पाठबळासह खेळत राहणं आणि आशियाई खेळांमध्ये जपान, चीन, कोरिया अशा मातबर देशांना मागे टाकून विजेतेपद मिळवणं ह्या कामगिरीसाठी खेळाडूंचं कौतुक करावं तितकं कमीच होईल. ह्या पदकानंतर आता कदाचित ह्या खेळाकडे बघण्याचा भारतीय लोकांचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल आणि अधिकाधिक मुले घोडेस्वारीकडे आकर्षित होतील. हा खेळ ऑलिम्पिकमध्येही खेळला जातो, शिवाय इतरही अनेक स्पर्धा आयोजित होत असतात. आपण प्रत्यक्षपणे कदाचित मदत करू शकणार नसू, पण शक्य त्या प्रकारे प्रोत्साहन नक्कीच देऊ शकतो. खेळाडूंची दखल घेतली जाते, ही भावनाही त्यांना काही वेळा खूप प्रोत्साहन देऊन जाते. ह्या पदकानंतर खेळाडूंना अशाच काहीशा भावना व्यक्त केल्या होत्या. हे पदक फक्त आमचं नाही, तर भारताचं आहे. राष्ट्रगीताची धून ऐकत आणि तिरंग्याकडे पाहत, गळ्यात पदक मिरवत पोडियमवर उभं राहण्याचा आनंद खेळाडूंकडे पाहूनही समजू शकतो.
 
 
विजेत्यांबद्दल थोडक्यात
 
 
सुदीप्ती हजेला - 21 वर्षीय सुदीप्ती फ्रान्समध्ये फ्रेंच प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. लहानपणी एका उन्हाळी शिबिरात तिची ह्या खेळाशी ओळख झाली आणि आज तोच खेळ तिचा ध्यास झाला आहे.
 
 
दिव्यकृती सिंग - दिव्यकृती राजस्थानची आहे. 23 वर्षांची ही मुलगी जर्मनीत सराव करते. शाळा, महाविद्यालय स्तरावरही प्रशिक्षणासाठी ती अनेक युरोपीय देशांमध्ये जाऊन आली आहे. 2020पासून आशियाई खेळांच्या तयारीसाठी ती युरोपात होती. ह्यासाठी तिच्या वडिलांनी त्यांचं जयपूरमधील घर विकून पैसे जमा केले होते.
 
 
हृदय छेडा - मुंबईत जन्मलेला हा खेळाडू अगदी लहानपणीच ह्या खेळाकडे आकर्षित झाला होता. गेल्या 10 वर्षांत सरावासाठी अनेक युरोपीय देशांमध्ये तो गेला आहे. भारतात ह्या खेळाचा प्रसार करण्यासाठी गेली अनेक वर्षं हृदय प्रयत्नशील आहे. लंडन विद्यापीठातून त्याने पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. तो 25 वर्षांचा आहे.
 
 
अनुष अगरवाला - वय 23. अनुष जर्मनीत प्रशिक्षण घेत आहे. वयाच्या 8व्या वर्षापासून त्याच्या अश्वारोहण प्रशिक्षणाला सुरुवात झाली. जर्मनीत जाण्याआधी तो दिल्लीत सराव करत होता. ह्या स्पर्धेत सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा अनुषचाच होता.
 
 
ह्या चारही खेळाडूंबद्दल वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे यश मिळवणं किती अवघड होतं. ह्या सगळ्याच मुलांच्या पालकांनी अक्षरश: कोट्यवधी रुपये खर्च करून मुलांची स्वप्नं जिवंत ठेवली आहेत. भारतात राहून सराव करण्यात अनेक अडचणी आणि मर्यादा आहेत, त्यामुळे ह्या खेळाडूंना भारताबाहेर जावं लागलं. परदेशात स्वत:च्या खर्चाबरोबरच एक-दोन घोडे पाळण्याचा खर्चही त्यांना स्वत:लाच करावा लागत होता.
 
 
इतकं सगळं केल्यावरही शेवटच्या क्षणापर्यंत आपण ह्या स्पर्धेत खेळू की नाही ह्याबद्दल शंका होती. इक्वेस्ट्रिअन फेडरेशन ऑफ इंडियाच्या गोंधळामुळे दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत जायची वेळ खेळाडूंवर आली होती. मात्र खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीवर ह्या सगळ्याचा परिणाम होऊ दिला नाही, हे विशेष.
 
 
भविष्यात ही सगळी परिस्थिती बदलावी आणि हे सुवर्णपदक भविष्यातल्या अनेक सकारात्मक बदलांची नांदी ठरावं, ह्याच सदिच्छा! तूर्तास ह्या चारही खेळाडूंचं मनापासून अभिनंदन, आणि भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.
 
जय हिंद!