दहशतवाद्यांसाठी सुरक्षित देश म्हणून आज कॅनडाची ओळख निर्माण होत आहे. त्यातच सध्याचे ट्रुडो यांचे अल्पमतातले सरकार तरले आहे तेच मुळी खलिस्तानचे उघड समर्थन करणार्या जगमितसिंग धलिवाल यांच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीच्या आधाराने. आपली मतपेढी बळकट करण्याच्या उद्देशाने ट्रुडो यांनी हरदीप निज्जरच्या खुनाचा विषय उचलून धरला. या सार्याचे भान भारतीय नेतृत्वाला आहे आणि योग्य वेळी योग्य पावले भारत सरकार नक्की उचलेल ही खात्री आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे इतके महामूर्ख आणि आपमतलबी असतील असे कुणाला वाटले नसेल, पण ते तसेच आहेत. त्यांनी स्वत:च हे सिद्ध केले आहे. याच वर्षी 18 जूनला ब्रिटिश कोलंबियाच्या सरेमध्ये एका गुरुद्वाराबाहेर झालेल्या खलिस्तान टायगर फोर्सच्या हरदीपसिंग निज्जर याच्या खुनाची जबाबदारी ट्रुडो यांनी कॅनडाच्या पार्लमेंटमध्ये भारतावर टाकली. निज्जर हा केवळ दहशतवादी नाही, तो भारताला हवा असलेला आणि ज्याच्यासाठी भारताने दहा लाख रुपयांचे बक्षीस लावलेले आहे असा दहशतवादी आहे. भारतात किमान दहा खून करून तो कॅनडामध्ये गेला होता. त्याच्या नावाने इंटरपोलची रेड कॉर्नर नोटिसही निघालेली होती. कॅनडा हा इंटरपोलचा सदस्य आहे आणि अनेक वेळा मागणी करूनही कॅनडाने त्याला भारताच्या हवाली करण्यास नकार दिला होता. जस्टिन ट्रुडो यांच्या मतदारसंघात शिखांचे प्रमाण जास्त आहे, पण त्यांचे अज्ञान एवढे की प्रत्येक शीख हा खलिस्तानवादी आहे असे गृहीत धरून ते चालत असतात. ट्रुडो यांच्या मते हरदीपसिंग निज्जरचा खून भारतीय गुप्तचर खात्याच्या सूचनेवरून केला गेला. सर्वसाधारण शिष्टाचार असे सांगतो की, अशा गोष्टीबाबत खातरजमा केल्याशिवाय त्याची वाच्यता केली जात नाही. त्यांनी ते नुसतो जाहीर केले असे नाही, तर त्याबाबत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि ब्रिटन यांच्यासह कॅनडाचा पाच देशांचा जो ‘फाइव्ह आइज’ गट आहे, त्याकडे भारताला चौकशीत सहकार्य करण्याबाबतचा दबाव आणण्याचा आग्रह धरला. हा सगळा श्वोतवर्णी गट कोणत्याही अर्थाने भारताला तसे सांगू शकत नाही. अमेरिकेने काहीसा चावटपणा करून भारताला सल्ला देऊ केला, पण तो भारतीय परराष्ट्र खात्याने तातडीने फेटाळून लावला. ट्रुडो यांच्या या कृतीने खलिस्तानवाद्यांना बळ मिळेल, इतकेच नाही, तर जगभरातले खलिस्तानवादी कॅनडाला ‘आपला देश’ मानून त्याचा ‘सिरिया’ करतील. त्यांनी हेही लक्षात घेतले नाही, की काही दिवसांपूर्वी कॅनडामध्ये तिथल्या दहशतवाद्यांनी एक मिरवणूक काढली होती, तीत त्यांनी इंदिरा गांधी यांच्या खुन्यांची चित्रे मोठ्या ‘गौरवा’ने मिरवली होती. ते इंदिरा गांधींच्या हत्येचा ‘गौरवदिन’ साजरा करत होते. त्याबाबत खुद्द नरेंद्र मोदींनी ट्रुडो यांना समज दिली होती. अशा तर्हेचे कोणतेही उदात्तीकरण भारत सहन करणार नाही, हे त्यांना साफ शब्दात सांगितले होते. भारतीय वकिलातीसमोर जमा होऊन तिरंग्यावर गोळ्या झाडण्याचा प्रकारही या खलिस्तानवाद्यांनी केला होता. भारतीय अधिकार्यांशी हुज्जत घातली होती आणि हे प्रकरण मारहाणीपर्यंत गेले होते. कॅनडाचे पोलीस तेव्हा काय करत होते? असा प्रश्नही मोदींनी त्यांना विचारला. ट्रुडोंनी केलेल्या या आरोपानंतर पाकिस्तानसारख्या आपल्या शेजारी राष्ट्रानेही ‘तरीच आम्ही म्हणत होतो की, भारत हे एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी राष्ट्र आहे’ यासारखे फूत्कार टाकले. डॉन आणि अन्य वृत्तपत्रांनी कुलभूषण जाधव यांना पकडून पाकिस्तानने कसा पुरावा आधीच पुढे आणला होता, ते सांगायला सुरुवात केली.
कॅनडा हा देश पाकिस्तानच्या खालोखाल दहशतवाद्यांना आश्रय देणारा मोठा देश आहे. कॅनडामध्ये गेल्या शतकापासून शीख मंडळी मोठ्या प्रमाणात स्थायिक होत असतात. त्यांच्या तिथल्या वास्तव्याला भारताचा आक्षेप असायचे कारण नाही. जोपर्यंत ते तिथे शांततेने नांदत आहेत, तोपर्यंत त्यांच्या बाबतीत कॅनडानेही कधी तक्रार केलेली नाही. अशा पद्धतीने वाढता वाढता वाढे त्यांचे प्रमाण सात लाख सत्तर हजार एवढे वाढले. त्यांच्यापैकी काही कुटुंबे गर्भश्रीमंत बनली आणि हजारो एकर शेतजमिनी त्यांच्या मालकीच्या झाल्या. ते सगळे यांत्रिक शेतीतून प्रचंड पैसे कमावतात. त्यांच्यापैकी काही जण एवढे श्रीमंत आहेत की, ते त्यांच्याजवळची जादाची रक्कम खलिस्तानवाद्यांमागे उभी करू लागले. निज्जर या दहशतवाद्याच्या खुनाशी भारताचा काहीही संबंध असल्याचे त्यांचे म्हणणे भारतीय परराष्ट्र खात्याने तातडीने फेटाळून लावले. निज्जर हा माफिया होता आणि तो नकली पासपोर्टच्या आधारे कॅनडामध्ये गेला. कॅनडामध्ये जे खलिस्तानवादी आश्रयासाठी गेले, ते एकतर मादक पदार्थांच्या व्यवसायात होते किंवा त्यांनी येथे अनेक खून पचवून परागंदा होण्याचे पत्करले. आपल्याला तिथे आश्रय मिळावा आणि नागरिकत्व मिळावे म्हणून निज्जरने अनेकवार प्रयत्न केले, पण ते त्यास जमले नाही, म्हटल्यावर त्याने एका कॅनेडियन महिलेशी विवाह केला आणि त्याआधारे नागरिकत्व मिळवले. तो तिथेही स्वस्थ बसला नव्हता. शीख समुदायाची मने भडकवण्याचे त्याचे उद्योग सुरूच राहिले. अर्थात त्याचा खून भारताने केला असे मानणे म्हणजे दोन माफिया टोळ्यांच्या युद्धात भारताने उडी घेतली असे म्हणण्यासारखे आहे. ट्रुडो यांच्या आरोपामुळे कॅनडामध्ये असणार्या भारतीय दूतावासांच्या संरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे, तर ‘सिख फॉर जस्टिस’सारख्या संघटनेचा पदाधिकारी म्हणवणार्या गुरुपतवंतसिंग पन्नून याने कॅनडात राहणार्या तमाम हिंदूंना ‘भारतात परत जा, नाहीतर तुमचे काही खरे नाही’ अशी धमकी दिली आहे. हे सर्व ट्रुडो यांच्यासारख्यांच्या पाठबळावर चालू राहणार आहे.
जस्टिन ट्रुडो हे काही दिवसांपूर्वीच भारतात जी-20 देशांच्या परिषदेसाठी येऊन गेले. नवी दिल्लीत आल्यानंतर त्यांचे वागणे अतिशय विक्षिप्त होते. मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आलेल्या सर्व परदेशी पाहुण्यांसाठी रात्रीचे भोजन ठेवले होते, पण त्याला ट्रुडोंनी फाटा दिला. सर्वसाधारणपणे आलेला कोणताही महनीय पाहुणा तोंडदेखलेपणासाठी का होईना, पाहुणचार करणार्या देशाच्या पंतप्रधानांचा, अध्यक्ष वा राष्ट्रपती यांचा मान राखण्यासाठी त्या सोहळ्यात सहभागी होतो. पण ते तिकडे फिरकले नाहीत. ते आले तेही त्यांच्या मुक्कामाच्या ललित महाल या हॉटेलात, जो सन्माननीय व्यक्तींसाठी राखून ठेवलेल्या अशा मोठ्या ‘प्रेसिडेन्शियल सूट’मध्ये न उतरता त्याच हॉटेलातल्या अन्य खोल्यांमध्ये राहणे त्यांनी पसंत केले. भारतीय गुप्तचर खात्याची स्वाभाविकच पळापळ झाली. कारण त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न होता. ट्रुडो बहुधा त्यांच्या ‘सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस’च्या सल्ल्याने वागले असावेत, अशी शक्यता आहे. ट्रुडो हे भारतातूनच काही राष्ट्रप्रमुखांना हाताशी धरून भारताच्या निषेधाचे पत्रक काढू इच्छित होते, पण त्यांना अन्य देशांनी फटकारले. ट्रुडोंच्या अशा या आचरटपणाला थारा मिळाला नाही, हा भाग निराळा; पण त्यांनी ‘क्वाड’सारख्या (ज्यात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया यांच्यासह न्यूझिलंड, व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया हे सहसदस्य आहेत) संघटनेत फूट पाडायचा प्रयत्नही केला. पाकिस्तानने त्यासाठी बरेच प्रयत्न करून पाहिले होते. त्यांचे हे प्रयत्न चीनच्या वतीने होते, हे सांगायची आवश्यकता नाही. हा संपूर्ण गट चीनपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने निर्माण झाला आहे, ज्याचा भारत हा एक प्रमुख सदस्य आहे.
आपली मतपेढी बळकट करण्याच्या उद्देशाने ट्रुडो यांनी निज्जरच्या खुनाचा विषय उचलून धरला. ट्रुडो हे लिबरल पक्षाचे सदस्य असून त्यांच्या अल्पमतातल्या सरकारला न्यू डेमोकॅ्रटिक पार्टीच्या जगमीतसिंग याचा पाठिंबा आहे. त्याच्या पक्षाच्या 25 सदस्यांच्या पाठबळावर ट्रुडोंचे सरकार टिकून आहे. त्यांचे इंग्लिश तर इतके भारी असेल असे वाटले नव्हते. त्यांनी भारतावर आरोप करताना ‘क्रेडिबल अॅलिगेशन (विश्वासार्ह आरोप, मुळात जो बिनबुडाचा असतो तो) असा शब्द वापरला. त्यांनी ‘क्रेडिबल एव्हिडन्स’ (विश्वासार्ह पुरावा) असा शब्दप्रयोग वापरला नाही. एका दहशतवाद्यासाठी त्यांचे प्राण एवढे तळमळत होते, पण त्याही पलीकडे त्यांना पाश्चिमात्यांबरोबर - विशेषत: अमेरिकेबरोबर भारताच्या गेल्या काही वर्षांत झालेल्या जवळिकीलाही सुरुंग लावायची इच्छा होती. त्यात त्यांना तेवढे यश आले नाही, पण त्यांनी इतरांच्या मनात हेतुत: संशयाचे वातावरण निर्माण केले. त्यांनी केलेल्या आरोपात काडीमात्र तथ्य नाही; परंतु समजा, त्यात तथ्यांश आहे असे मानले, तर भारत किती बलशाली झाला आहे हेही सार्या जगाला कळून येईल. पाकिस्तानसारख्या देशात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करणारा भारत कॅनडासारख्या दूरच्या देशातही मूळच्या भारतीय दहशतवाद्याला गोळ्या घालून मारू शकत असेल, तर त्यात गैर काय आहे? असे जर उद्या कोणी मानले तर त्यात चुकीचे काही नाही. ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात अबोटाबादमध्ये जाऊन ठार करणार्या अमेरिकेला कॅनडाने बोल लावले होते का?
इस्रायलच्या राजधानीतून - तेल अवीव्हहून पॅरिसला निघालेल्या एअर फ्रान्सच्या एअरबसचे अपहरण करण्यात येऊन ते विमान युगांडात 4 जुलै 1976 रोजी उतरवण्यात आले होते. हे विमान आधी अथेन्सकडे वळवले गेले, तिथून ते बेंगाझीला गेले, तिथून ते युगांडात एन्टेबी विमानतळावर उतरले. चाळीस पॅलेस्टिनियन दहशतवादी कैद्यांना इस्रायलच्या तुरुंगांमधून सोडण्यात यावे, अशी विमानातील दहशतवाद्यांची मागणी होती. त्याखेरीज अन्य देशांमध्ये अटकेत असणारे 13 अन्य दहशतवादी सोडवावेत, असेही त्यांनी म्हटले होते. वादी हद्दाद या ‘पॅलेस्टाइन एक्स्टर्नल ऑपरेशन्स’ संघटनेच्या प्रमुखाच्या ‘आदेशा’नुसार ही हवाई चाचेगिरी करण्यात आली होती. विमानात 248 प्रवासी होते. लेफ्टनंट योनातन नेतान्याहू (पुढे इस्रायलचे पंतप्रधान बनलेले बेंजामिन नेतान्याहू यांचे थोरले बंधू) यांच्या नेतृत्वाखाली तेल अवीव्हहून चार हजार किलोमीटरवर असलेल्या युगांडातील एन्टेबी विमानतळावर खास इस्रायली विमान पोहोचले आणि त्यांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यात योनातन हे मृत्युमुखी पडले. त्या वेळी युगांडाच्या अध्यक्षपदी हुकूमशहा इदी अमीन होता. तेव्हा युगांडाच्या स्वायत्ततेचा भंग म्हणून कोणी त्या कारवाईचा निषेध केला होता का? अमीन यांनी तेव्हा युगांडामध्ये राहणार्या केनियन नागरिकांचे हत्याकांड आरंभले. त्या वेळी सारे जग अमीनच्या निषेधात होते. हे अशासाठी सांगितले की, कोणत्याही अध्यक्षाने दहशतवादाचा पुरस्कार केला, तर तोही दहशतवादीच ठरत असतो हे लक्षात यावे, म्हणून.
कॅनडा हे दहशतवाद्यांचे नंदनवन बनते आहे आणि त्यावर आताच उपाय योजले नाहीत, तर ते कॅनडालाच धोकादायक स्थितीत नेऊन ठेवतील, यात शंका नाही. 23 जून 1985 रोजी एअर इंडियाच्या विमानात बाँबस्फोट घडवण्यात आला होता. हे विमान एआय-182 कनिष्क माँट्रियलहून लंडनमार्गे भारतात येण्यासाठी निघाले असता वाटेत त्यात स्फोट होऊन सर्वच्या सर्व 329 प्रवासी मारले गेले. त्यात 268 कॅनेडियन होते, 27 ब्रिटिश होते आणि 24 भारतीय होते. जे कॅनेडियन मारले गेले, त्यांच्यासाठी ट्रुडो यांचा जीव कधीच तळमळताना दिसला नाही. विमानात बाँब ठेवणार्या तलविंदरसिंग परमार या दहशतवाद्याची मागणी भारताने 1982मध्येच केली होती, पण तेव्हा पंतप्रधानपदी असणारे पिएर ट्रुडो यांनी तेव्हाच्या इंदिरा गांधी सरकारची ही मागणी फेटाळली होती. पिएर हे कोण ते सांगायची आवश्यकता नाही. ते जस्टिन ट्रुडो यांचे वडील आहेत म्हटल्यावर अधिक भंपक कोण तेवढेच ठरवणे आपल्या हाती आहे. त्या वेळी त्यांनी ती मागणी मान्य केली असती, तर कॅनडाच्या 268 नागरिकांचे जीव तरी नक्कीच वाचले असते. न्यू डेमोकॅ्रटिक पार्टीच्या जगमीतसिंगने जस्टिन ट्रुडो भारताकडे प्रयाण करण्यापूर्वी त्यांचे कान भरले असले पाहिजेत, अशीही शंका घेतली जात आहे. जर त्याने आपल्या पक्षाचा पाठिंबा काढून घेतला, तर ट्रुडो यांचे सरकार कोसळू शकते. जगमीतसिंग हा खलिस्तानची उघड मागणी करणार्यांपैकी एक.
कॅनडात सध्या कोणते शीख दहशतवादी आहेत आणि त्यांच्या संघटना कोणत्या आहेत, हेही पाहण्यासारखे आहे. 1) अर्शदीपसिंग (खलिस्तान टायगर फोर्स, सरे, कॅनडा), 2) सतिंदरजितसिंग ब्रार (किंवा गोल्डी ब्रार), 3) स्नोवर धिल्लन, (ओटावा), 4) रमणजितसिंग (रमण जज्ज), 5) गुरजितसिंग चीमा (खलिस्तान लिबरेशन फ्रंट) 6) गुरजिंदरसिंग पन्नू (सरे), 7) गुरप्रीतसिंग (खलिस्तान लिबरेशन फोर्स), 8) तेहलसिंग (टोरोंटो), 9) मल्कितसिंग फौजी (सरे), 10) मोनिंदरसिंग बिजाल (खलिस्तान टायगर फोर्स, सरे), 11) मानवीरसिंग दुहरा (ब्रिटिश कोलंबिया), 12) परवरसिंग दुलाई (सरे), 13) भगतसिंग ब्रार (टोरोंटो), 14) सतिंदरपालसिंग (व्हँकूव्हर), 15) सलिंदरसिंग विर्क (ब्रॅम्टन), 16) मानवीरसिंग (टोरोंटो), 17) लखबीरसिंग लांडा (कॅनडा), 18) सुखदुलसिंग (कॅनडा), 19) हरप्रीतसिंग (ब्रॅम्प्टन), 20) संदीपसिंग (ब्रिटिश कोलंबिया), 21) मनदीपसिंग धालिवाल (सरे).
जी-20 शिखर परिषदेच्या समारोपापूर्वी दुसर्या दिवशी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्ली येथे राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीपुढे प्रत्येक पाहुण्याचे स्वागत केले. त्यात ट्रुडो होतेच. त्यांच्याशी मोदींनी हस्तांदोलन केले. आलेल्या प्रत्येक पाहुण्याने मोदींबरोबर हस्तांदोलनात काही वेळ घालवल्यावर त्यांच्याशी बातचित करून मग पुढे प्रत्यक्ष राजघाटाच्या दिशेने पावले टाकली. ट्रुडो हे एकमेव असे निघाले की त्यांनी मोदींबरोबरचा हात झटकून टाकला आणि ते काही सेकंद थांबून राजघाटाच्या दिशेने पावले टाकीत गेले. याचा अर्थ एकच निघतो की त्यांच्या डोक्यात तेव्हापासूनच हे विष घोळत असावे. त्यानंतर कॅनडाकडे परत जाण्यासाठी निघायच्या वेळेस त्यांच्या विमानात नेमका बिघाड झाला. हे विमान बिघडल्याचे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी असणारे खास विमान त्यांना उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. त्यांनी त्यासही नकार दिला. कॅनडातून त्यांना नेण्यासाठी विमान येईपर्यंत ते 48 तास दिल्लीतच थांबले. या 48 तासांत ते कोणाकोणाला भेटले, याचा तपास भारतीय गुप्तचरांनी केला पाहिजे. माझी खात्री आहे की, त्यांनी या काळात दिल्लीत काही खलिस्तानवाद्यांशी खलबतेही केली असण्याची शक्यता आहे. कॅनडा हे आपले शत्रुराष्ट्र कधीही नव्हते, पण त्यांनी हे शत्रुत्व ओढवून घेतले आहे. पाकिस्तानी पंतप्रधान वा अध्यक्ष भारतात येतात, तेव्हा ते काश्मिरी अतिरेक्यांच्या म्होरक्यांशी नेहमीच बोलतात आणि त्यांच्या डावपेचांना खतपाणी घालतात, हा आपला अनुभव आहे. कॅनडाचे पंतप्रधानही तसेच वागले असतील अशी शक्यता आहे. कॅनडाने पवनकुमार राय या आपल्या अधिकार्याची हकालपट्टी केली आणि आपण त्यांच्या ऑलिव्हिए सिल्व्हेस्टर यांची हकालपट्टी केली. हे असेच काही दिवस चालू राहणार, याची खात्री बाळगा. ज्यांची मुलेबाळे कॅनडात नोकरीसाठी वा शिक्षणासाठी तिथे आहेत, त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, त्यांना सुरक्षा पुरवणे त्या सरकारचे काम आहे. त्यात जर हयगय झाली, तर भारत सरकार पुढील उपाययोजनेसाठी सक्षम आहे.