विवेक जाणिजे तैसा..

विवेक मराठी    25-Sep-2023   
Total Views |
2024 नोव्हेंबरमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका असणार आहेत. ही निवडणूक प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असते. आतापर्यंतच्या अमेरिकेच्या इतिहासात ख्रिस्ती धर्मीय सोडल्यास इतर धर्मीय राष्ट्राध्यक्ष होऊ शकलेला नाही. अशा या सर्वात प्रमुख निवडणुकीसाठी भारतीय वंशाचा, जन्माने आणि आचरणाने हिंदू असलेला विवेक रामस्वामी याने राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा केली.

Vivek Ramaswamy
 
2024च्या सुरुवातीस भारतातील लोकसभा निवडणुका असणार आहेत, तशाच त्याच वर्षाच्या शेवटी 2024 नोव्हेंबरमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका असणार आहेत. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडण्याची पद्धत लोकशाहीस धरून असली, तरी क्लिष्ट आहे.
 
 
दर चार वर्षांनी नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी निवडणुका होतात. पण त्याची सुरुवात साधारण दीड वर्ष आधी होते. द्विपक्षीय राज्यव्यवस्थेत ज्या पक्षाच्या राष्ट्राध्यक्षाची पहिली चार वर्षांची मुदत झालेली असते, तो राष्ट्राध्यक्ष परत एकदा निवडणूक लढवू शकतो. परिणामी या वेळेस डेमोक्रॅटिक पक्षाकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन हे परत एकदा पक्षांतर्गत बिनविरोध राहून निवडणूक लढवतील.
 
रिपब्लिकन पक्षाला त्यांचा राष्ट्राध्यक्षपदासाठीचा उमेदवार ठरवायचा आहे. त्यासाठी 2024च्या जानेवारी-फेब्रुवारीपासून प्रत्येक राज्यात पक्षांतर्गत निवडणुका होतील. त्यामध्ये पक्षाचे त्या त्या राज्यातील प्राथमिक सदस्य त्यांच्या पसंतीच्या उमेदवारास मते देऊन निवडून आणायचा प्रयत्न करतील. सद्य:स्थितीत राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळावी, म्हणून साधारण 12 उमेदवार उभे आहेत.
 


Vivek Ramaswamy 
 
रिपब्लिकन पक्षांतर्गत जनसर्वेक्षणानुसार डोनाल्ड ट्रंप हे उमेदवारीच्या शर्यतीत 50% अधिक टक्क्यांनी लोकप्रिय आहेत. सध्या ट्रंप यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे अनेक खटले चालू आहेत. त्यामुळे जर का हे मैदान ट्रंप सोडून इतरांना मोकळे झाले, तर त्यात सद्य:स्थितीत ट्रंप राष्ट्राध्यक्ष असतानाचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस, फ्लोरिडाचे गव्हर्नर रोन डीसंटिस, भारतीय वंशाच्या, जन्माने शीख पण नंतर ख्रिस्ती धर्मांतर केलेल्या निक्की हिली असे त्यांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे जनतेस माहीत असलेले काही उमेदवार आहेत.
 
 
वरील सर्व मान्यवरांमध्ये अचानक एक उमेदवार आला आहे, ज्याने एक ट्रंप सोडल्यास इतर सर्व उमेदवारांची झोप उडवून लावली आहे - तो आहे 38 वर्षांचा, राजकारणात कधीच सहभागी न झालेला, इतकेच काय, प्रमुख निवडणुकांमध्ये केवळ दोनदाच मतदानाचा हक्क बजावलेला, भारतीय वंशाचा, जन्माने आणि आचरणाने हिंदू असलेला विवेक रामस्वामी. फेब्रुवारी 2023च्या सुमारास जेव्हा विवेकने राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा केली, तेव्हा फॉक्स आणि तत्सम काही रिपब्लिकन माध्यमे सोडल्यास कोणी विवेकला गांभीर्याने घेतले नव्हते.
 
 
अमेरिकन लेखक नॉर्मन व्हिन्सेट पील यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे - डहेेीं ऋेी ढहश चेेप. र्एींशप खष र्धेी चळीी, र्धेी’श्रश्र ङरपव ओपस ींहश डींरीी. थोडक्यात, मोठी महत्त्वाकांक्षा ठेवली, तर अगदी ती पूर्ण झाली नाही, तरी आता जिथे उभे आहात त्यापेक्षा अधिक उंची नक्की गाठाल, असा याचा अर्थ आहे. बर्‍याचदा राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे असलेले उमेदवार हे ते पद मिळवण्याऐवजी त्या निमित्ताने इतर कुठले पद मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकांना विवेकचे असे उभे राहणे म्हणजे कदाचित तो ज्या राज्यातून येत आहे, त्या ओहायो राज्याचा गव्हर्नर व्हायचे असावे, असे सुरुवातीस वाटत असे. मात्र गेल्या सहा-सात महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अजून दिल्ली खूप दूरची असली, तरी विवेकची लोकप्रियता वाढू लागली आहे.
 
 
 
कोण आहे हा विवेक रामस्वामी?
 
विवेक हा व्ही. गणपती रामस्वामी आणि गीता रामस्वामी या केरळमधून आलेल्या तामिळ दांपत्याचा मुलगा आहे. 1985मध्ये सिनसिनाटी, ओहायोमध्ये त्याचा जन्म झाला. सेंट झेव्हियर्स नावाच्या कॅथलिक शाळेत विवेकचे उच्च माध्यमिक शिक्षण झाले. पुढे त्याने 2007मध्ये हार्वर्डमधून बॅचलर ऑफ आर्ट्स केले, तर नंतर 2012-13च्या सुमारास येल विद्यापीठातून लॉमध्ये उच्च शिक्षण घेतले. येलमध्येच भेटलेल्या डॉक्टर अपूर्वा तिवारीशी त्याने लग्न केले आणि त्याला दोन लहान मुले आहेत.
 

Vivek Ramaswamy 
 या पुस्तकामुळे विवेक रामस्वामीची ओळख निर्माण झाली
 
 
सुरुवातीपासूनच धडपड्या आणि उद्यमशील असलेल्या विवेकने हार्वर्डमध्ये असल्यापासून आणि नंतर येलमधले शिक्षण पूर्ण झाल्यावर फायनान्समध्ये, फार्मसीमध्ये काम केले. त्यातून मिळालेल्या तांत्रिक आणि आर्थिक यशातून विवेक अब्जाधीश झाला.
विवेकला राजकारणाची सुप्त आवड कदाचित लहानपणापासूनच असावी. हार्वर्डला असतानादेखील तो राजकीय पद्धतीच्या विद्यार्थी कार्यक्रमांमध्ये सक्रिय असायचा.
 
 
वोक विरोधक
 
अमेरिकेत आणि पर्यायाने जगभर गेल्या काही वर्षांमध्ये अतिरेकी नवउदारमतवाद अथवा वोकिझम जागृत झाला आहे. वास्तविक हा नवउदारमतवाद म्हणजे जुना मार्क्सवाद आणि समाजवाद यांचे एक विचित्र मिश्रण आहे. वंशवादाच्या विरोधात नववंशवाद निर्माण करणे, स्त्री-पुरुषाहून अधिक प्रकारची लिंगभिन्नता समाजमनात शाळेतल्या मुलांपासून बिंबवणे, अतिरेकी पर्यावरणवाद आदी अनेक गोष्टींवर या वोक लोकांच्या चळवळीचा भर असतो. त्यापुढे जाऊन आमच्या विरोधात असाल, तर आम्ही आवाजी करून तुमचे अस्तित्व रद्दबातल अर्थात कॅन्सल करू. हे कॅन्सल कल्चर अमेरिकेत खूप वाढीस लागल्याने त्याला राजकारणी, विद्वान, उद्योजक, आदी सर्वच भीतीपोटी सावधपणे जवळ ठेवू लागले. परिणामी या वोक कल्चरचे बळ आणखीनच वृद्धिंगत होऊ लागले. अशा काळात विवेकने Summary of Woke, Inc.: Inside Corporate America's Social Justice Scam हे पुस्तक लिहिले आणि वोक विरोधक म्हणून न घाबरता पुढे आला. तिथे जे लोक या वोक कल्चरला घाबरून राहिले होते, त्यांना त्याची मते भावली आणि कदाचित पहिल्यांदा जनतेचा लहानसा असेल, पण एक हिस्सा विवेकला ओळखू लागला.
 
 
vivek
 
राजकीय मते
 
विवेक हार्वर्डला असताना डेमोक्रॅटिक पक्षाकडे झुकलेला होता. पण नंतर जसजशी त्याने अमेरिकेत होत असलेली सामाजिक दुफळी पाहिली, त्यानंतर तो रिपब्लिकन पक्षाकडे झुकला. तरीदेखील एका मुलाखतीत त्याने स्पष्टपणे म्हटले होते, “मी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून नाही, तर देशाचा अध्यक्ष म्हणून काम करणार आहे.” आजतागायत विवेकचे बोलणे त्याच्या या विचारांना साजेसे कायम राहिले आहे.
 
 
विवेक हा आत्ताच्या घडीस नक्कीच टोकाचा भांडवलवादी वाटतो. उदाहरणार्थ, त्याला टॅक्सेस कमी करायचे आहेत. त्याला विकासाची कामे न अडखळता व्हायला हवीत, म्हणून पर्यावरणवाद्याच्या विरोधात अमेरिकेतील पोलीस स्टेशन्स, एफबीआय आदी बंद करावीत अथवा कमी करावीत, असे विवेक सातत्याने बोलत असतो.
 
हिंदू धर्मीय
 
अमेरिका हा प्रामुख्याने ख्रिस्ती धर्मीयांचा देश आहे. आजपर्यंत इथे कोणी इतर धर्मीय राष्ट्राध्यक्ष होऊ शकलेला नाही. इतकेच काय, ख्रिश्चन धर्मीयांमध्येही अनेक प्रकार आहेत, त्यातले बहुतांशी प्रोटेस्टंटच राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. जॉन केनेडी हे पहिले रोमन कॅथलिक ख्रिश्चन राष्ट्राध्यक्ष होते, तर दुसरे जो बायडेन आहेत. क्लिटंन यांच्या कारकिर्दीनंतर त्यांच्या काळातले उपाध्यक्ष गोर जेव्हा डेमोक्रॅटिक पार्टीकडून उभे होते, तेव्हा त्यांच्याबरोबर जोसेफ (जो) लिबरमन हे ज्यू उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उभे होते. तेव्हा लिबरमन यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस या जरी आईकडून भारतीय वंशाच्या हिंदू असल्या, तरी त्या ख्रिश्चन आहेत. लिबरमनना विचारले गेले, तसे प्रश्न त्यांना निवडणुकीच्या काळात विचारले गेले नव्हते.
 
विवेक मूर्तिपूजक तर आहेच, त्याव्यतिरिक्त तो पूर्णपणे शाकाहारी आहे. त्याला प्रत्यक्षात त्याच्या धर्मावरून अनेकदा प्रश्न विचारले गेले आहेत. त्यांना उत्तर देताना विवेकने कायम इतर सर्वच धर्मांचा मान ठेवला. त्याचबरोबर स्वत: हिंदू आहोत हे कुठेही लाज वाटत सांगितले नाही की लपवले नाही. हिंदू धर्म हा ‘अनेकी सदा एक देवासी पाहे..’ हे आचरणात आणणार्‍यांचा आहे, असा त्याच्या उत्स्फूर्त उत्तराचा एका वाक्यात गोषवारा आहे.
 
 
विवेक यशस्वी होऊ शकेल का?
 
 
विवेकचे कुठले न कुठले तरी विचार कुठल्याही पक्षीय व्यक्तीस आत्यंतिक टोकाचे वाटू शकतील असे आहेत. सगळे विचार हे जसेच्या तसे कुणाला पटू शकणार नाहीत, तरीदेखील त्याचे स्पष्ट बोलणे लोकांना नक्की आवडत आहे. तो इतर कुठल्याही उमेदवारापेक्षा स्पष्ट बोलू शकतो, कारण तो प्रामुख्याने स्वत:च्या पैशावर निवडणूक लढवत आहे. कुठलाही उद्योग, राजकीय मतांच्या संघटना आदींच्या आर्थिक पाठबळावर नाही. परिणामी त्याच्या बोलण्यात तडजोड नसते. ही त्याची शक्ती आहे, पण तीच राजकीय आखाड्यातील मर्यादाही ठरू शकेल.
 
 
तरीदेखील विवेकच्या अगदी आत्तापर्यंतच्या नुसत्या लोकप्रियतेचा विचार केला, तरी त्याच्यामुळे अमेरिका आणि अमेरिकेतील भारतीय, त्यातही हिंदू भारतीय हे सर्वच जण अप्रत्यक्ष लाभार्थी ठरले आहेत.
 
 
आज अमेरिकन जनता - अगदी त्याच्या विरोधातील उदारमतवादी माध्यमेही विवेकला गांभीर्याने घेत आहेत आणि कोणीही त्याच्या वंशावरून अथवा धर्मावरून किमान वरकरणी तरी कमी लेखत नाही आहे. अमेरिकेचे वांशिक अथवा धार्मिक चश्मा बाजूस ठेवून विवेकसारख्या उमेदवाराकडे बघणे हे नक्कीच स्पृहणीय आहे.
 
 
विवेककडे असे सगळे नकळत भारतीय म्हणून बघत असतात. आज माहिती तंत्रज्ञानातील गूगल, मायक्रोसॉफ्टपासून अनेक उद्योगांचे प्रमुख, अनेक विचारवंत प्राध्यापक, बायडेन सरकारमध्ये सर्जन जनरल असलेला विवेक मूर्ती, पत्रकार इथपासून ते वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बंगा असे अनेक भारतीय आहेत. इथपासून ते विविध क्षेत्रांतील दृश्य यशामुळे कुठेतरी या देशाच्या लोकसंख्येच्या 1 टक्का असलेल्या हिंदू-भारतीय समाजाबद्दल आणि या समाजाने या देशात केलेल्या विविध प्रकारच्या योगदानामुळे एक खात्री झालेली असते की भारतीय/हिंदू माणूस (अपवाद वगळता) कधीही राष्ट्रविरोधी वागणार नाही आणि देशाचा विविध अर्थाने विकास होण्यासाठी कायम हातभारच लावेल.
 
 
असे अनेकदा होऊ शकते की केवळ एक टक्काच लोकसंख्येमुळे अनेकदा भारतीय हिंदूंची पुढची पिढी बर्‍याचदा बिचकलेली असते. विशेषकरून राजकारणात नकळत कमी आत्मविश्वास असू शकतो. म्हणूनच बॉबी जिंदाल, निक्की हिली आदींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. आज विवेकने तसे केलेले नाही. तो हिंदूच राहिला. त्याच्या ह्या एका निर्णयामुळे त्याने पुढील सर्व अमेरिकन हिंदू पिढ्यांवर उपकार केलेले आहेत. योग्य लायकी तयार केली तर बाकी काबीज करण्यासाठी परधर्माच्या कुबड्या घेण्याची गरज लागत नाही, हा पायंडा पाडला. म्हणूनच वाटते की विवेक आजही यशस्वी झाला आहे.
 
 
1893 साली अमेरिकेत येऊन स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्मासाठी येणार्‍या भविष्यासाठी वाट करून दिली. आज 130 वर्षांनी स्वामी नसलेल्या आणि राजकारणी म्हणून जे काही गुणदोष असतील, ते घेऊन पुढे जात असलेल्या विवेकने अमेरिकेतील हिंदू धर्मीयांसाठी तेच केले आहे आणि तसेच अमेरिकन जनतेला ही एक व्यापक दृष्टीकोन दिला आहे. समर्थ रामदासांच्या शब्दात बोलायचे झाले तर,
 
वन्ही तो चेतवावा रे। चेतविताचि चेततो।
 
विवेक जाणिजे तैसा। वाढविताच वाढतो।
 
ही उक्ती अमेरिकेत वास्तवात येताना दिसत आहे.