राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, तसेच समविचारी संघटनांना प्रतिगामी, उजव्या किंवा परंपरावादी अशी विशेषणे बहाल करण्याचा विचारवंतांमध्ये (म्हणजे लेखन-वाचनावर एकाधिकार केलेल्या मंडळींमध्ये) प्रघात आहे. याच्या उलट डावी विचारसरणी म्हणजे प्रगतिशील मंडळी असेही समीकरण सरधोपटपणे मांडले जाते. या कल्पनांना छेद देणारा असा सप्टेंबरचा दुसरा आठवडा ठरला. निमित्त होते पुण्यात झालेल्या रा.स्व. संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीचे, तसेच त्याला लागून झालेल्या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन झालेल्या ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे.
संघाच्या प्रेरणेने सुरू झालेल्या विविध संघटनांची समन्वय बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते. या समन्वय बैठकीमध्ये सहभागी संस्था त्यांच्या कामाची आणि अनुभवांची, तसेच आगामी कार्यक्रमांच्या माहितीची देवाणघेवाण करतात. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पुण्यात 14, 15 व 16 सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीत तीन दिवस 36 संघटनांच्या 246 प्रतिनिधींनी भाग घेतला. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या भाषणाने या बैठकीचा समारोप झाला. आपापल्या संघटनेची सद्य:स्थिती, आगामी योजना आणि कार्यविस्तार यावर त्यांनी साधकबाधक विचार केला. मात्र बैठकीचे खरे फलित म्हणजे महिलांना अधिकाधिक वाव देण्याबाबत झालेली चर्चा. संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी या बैठकीच्या शेवटच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
“समाजपरिवर्तनामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी संघप्रेरित संस्था काम करणार आहेत. संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली” असे त्यांनी सांगितले. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर हेही या वेळी उपस्थित होते.
डॉ. वैद्य म्हणाले, “भारतीय जीवनदृष्टीमध्ये कुटुंब हे सर्वात लहान एकक आहे. कुटुंबात स्त्रियांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे राहण्याची भूमिका बजावली पाहिजे. समाजात महिलांची सक्रियता वाढत असून हे निश्चितच प्रशंसनीय आहे. या संदर्भात संघाच्या शताब्दी योजनेअंतर्गत विविध क्षेत्रांत सक्रिय असलेल्या महिलांचा सहभाग वाढवण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. अशा महिलांमधील परस्पर संपर्क वाढवण्यासाठी देशभरात विभाग स्तरावर 411 महिला संमेलने आयोजित केली जाणार आहेत. आतापर्यंत 12 प्रांतांत अशा 73 संमेलनांचे आयोजन करण्यात आले. त्याला 1 लाख 23 हजारांहून अधिक महिलांच्या सहभागाद्वारे चांगला प्रतिसाद मिळाला.”
संघ महिलांकडे दुय्यम दृष्टीने पाहतो, महिलांना संघात काहीही स्थान नाही असे म्हणणार्यांना ही एक मोठीच चपराक होती. बदलत्या काळानुसार संघ महिलांना अधिकाधिक महत्त्व देण्याच्या प्रयत्नात आहे, हेही त्यातून अधोरेखित झाले. त्यातून एक प्रकारे संघाचे प्राकृतिक वर्तनच समोर आले.
ते म्हणाले की, “संघाचे कार्य सुरू होऊन 97 वर्षे झाली आहेत. या प्रवासाचे चार टप्पे आहेत. संघटना, विस्तार आणि संपर्क-क्रियाकलाप हे तीन टप्पे होते. सन 2006मध्ये पू. गोळवलकर गुरुजींच्या जन्मशताब्दीनंतर चौथा टप्पा सुरू झाला, ज्यामध्ये प्रत्येक स्वयंसेवकाने राष्ट्राच्या प्रगतीसाठी अधिक सक्रिय होणे अपेक्षित आहे.”
बैठकीतील विषयांची माहिती देताना ते म्हणाले की, “समाजातील सज्जनशक्तीला संघटित करून सामाजिक कार्यात सक्रिय करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा करण्यात आली.”
हे झाले संघाच्या बाबतीत. याच्या नेमके उलट डावी विचारसरणी ही कशी मानवताविरोधी आहे आणि जगभरात तिने किती उच्छाद मांडला, याचे दर्शन झाले ते सरसंघचालकांच्या हस्ते झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात. डाव्या मंडळींची वैचारिक बदमाशी आणि इतिहास लेखनातील विकृती यांचा पर्दाफाश करणारे ‘असत्यमेव जयते’ या पुस्तकाचे लेखक अभिजित जोग यांचे नवे पुस्तक नुकतेच आले आहे. ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ हे त्या पुस्तकाचे नाव. नावावरूनच स्पष्ट होते की पुस्तकात काय आहे. “ईर्षा, द्वेष व अराजक हाच डाव्यांच्या विचारांचा गाभा आहे. त्यातून जगभर ते कसा विध्वंस करत आहेत, याचे चित्रण आपण या पुस्तकातून केले आहे,“ असे जोग यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सांगितले. दिलीपराज प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सिम्बायोसिस विश्वभवन सभागृहात झालेल्या या समारंभाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित याही उपस्थित होत्या. “डाव्यांनी आपला विचार पुढे रेटण्यासाठी, तसेच तो प्रस्थापित करण्यासाठी भक्कम इकोसिस्टिम उभी केली आहे. डाव्यांना चोख वैचारिक उत्तर देण्यासाठी आपणही अशीच भक्कम इकोसिस्टिम उभी केली पाहिजे. आपले विचार, आपली मूल्ये जगापुढे मांडताना आपण घाबरू नये” असे डॉ. पंडित यांनी सांगितले.
“सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जगभर विध्वंस सुरू केला असून, डाव्यांच्या या संकटापासून जगाला मुक्त करण्याचे दायित्व भारतावरच आहे” असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले, “जगभरच्या सर्व मंगलाविरोधातच डावे आहेत. त्यामुळे सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली जगभर व विशेषत: पाशात्त्य देशांत डाव्यांनी या मांगल्याच्या विरोधात भूमिका घेत विध्वंस सुरू केला आहे. विमर्शाच्या नावाखाली चुकीचे विचार समाजात रुजवण्याचे प्रयत्न डाव्यांनी सुरू केले आहेत. त्यातून समाजाचे नुकसानच होत असून, मानवी वर्तन पशुत्वाकडे झुकते आहे. डाव्यांचे हे संकट आता भारतावरही येते आहे. आपल्या समाजातच नव्हे, तर घराघरांपर्यंत ते पोहोचते आहे.” त्यामुळेच भारतीय समाजाने अधिक सजग राहणे आवश्यक असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले.
आज आपल्याला दिसतो हा संघर्ष नवा नाही. देव आणि असुर यांच्यामधील संघर्षाचेच हे आधुनिक रूप आहे. डाव्यांच्या या संकटातून वाचवण्याचे सामर्थ्य भारतीय संस्कृती मध्ये आणि सनातन मूल्यांत आहे. डाव्यांचा विमर्श खोडून काढण्यासाठी समाजाने सत्य, करुणा, शुचिता आणि तेजस या चतु:सूत्रीचा अंगीकार केला पाहिजे. आपली सनातन मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजेत. भारताने इतिहासकाळापासून अशी संकटे पचवली असून, हे संकट पचवण्याचीही भारतीय समाजात ताकद आहे. सनातन मूल्यांची कास धरून सर्व समाज हे काम करू शकतो. त्यासाठी अशी अनेक पुस्तके सर्व भाषांमधून प्रकाशित झाली पाहिजेत. अन्य मार्गांनीही आपली मूल्ये, आपला विचार घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे. हे कोणा एका संघटनेचे काम नसून सर्व समाजाचे हे दायित्व आहे. त्यातून आपण फक्त आपल्या देशालाच नव्हे, तर जगालाही या संकटापासून मुक्त करू शकतो.
संघकार्याचा विस्तार
रा.स्व. संघाच्या कार्यविस्ताराची माहिती देताना डॉ. वैद्य म्हणाले की, “संघाच्या कार्याला देशभरातून मिळणारा प्रतिसाद वाढता आहे. संघाच्या शाखांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि आज ती संख्या कोरोनापूर्वी होती त्यापेक्षा अधिक आहे. 2020मध्ये देशात 38 हजार 913 स्थानी शाखा होत्या. 2023मध्ये ही संख्या 42 हजार 613 झाली आहे, म्हणजेच 9.5 टक्के वाढ झाली आहे. संघाच्या दैनंदिन शाखांची संख्या 62 हजार 491वरून 68 हजार 651 झाली आहे. देशात संघाच्या एकूण 68 हजार 651 दैनंदिन शाखा असून त्यापैकी विद्यार्थी शाखांचे प्रमाण 60 टक्के आहे. चाळीस वर्षांपर्यंतचे तरुण येणार्या शाखांचे प्रमाण 30 टक्के आहे, तर चाळीस वर्षांवरील स्वयंसेवक येणार्या शाखांचे प्रमाण 10 टक्के आहे. संघाच्या अधिकृत संकेतस्थळावर दर वर्षी एक ते सव्वा लाख जण संघात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यापैकी बहुतांश 20 ते 35 वयोगटातील आहेत.”
सनातन आणि भारत
सनातन संस्कृतीबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, “सनातन’ आणि ‘रिलिजन’ या अर्थी वापरला जाणारा ‘धर्म’ या दोन शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. सनातन संस्कृती ही आध्यात्मिक लोकशाही आहे. सनातनबद्दल विधाने करणार्यांनी आधी या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा.” ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या नावांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “देशाचे नाव ‘भारत’ आहे आणि ते ‘भारत’च राहिले पाहिजे. खरे तर, हे प्राचीन काळापासूनचे प्रचलित नाव आहे आणि त्या नावाला सांस्कृतिक मूल्य आहे.”