स्वामी विवेकानंदांनी केलेली विधाने आणि त्यावेळेची परिस्थिती काय होती, याची आपल्याला सर्व माहिती नाही. म्हणून त्यांचे साहित्य वाचताना आपण या सर्व गोष्टींचा विचार करून मगच ते समजून घ्यावेत. अकारण त्यांच्याविषयी गैरसमज करून घेऊ नयेत. या लेखात स्वामीजी बुद्ध आणि बौद्ध पंथ, येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती पंथ, या बाबतीत वेळोवेळी काय बोलले आणि लिहिले आहे, याची चर्चा करणार आहोत.
स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्मपरिषदेनंतर अमेरिकेत (28 जुलै 1893 ते 17 ऑगस्ट 1895) आणि इंग्लंडमध्ये (सप्टेंबर 1895 ते डिसेंबर 1895) असे वास्तव्य केले आणि 15 जानेवारी 1896ला ते कोलंबोला उतरले. या वास्तव्यादरम्यान त्यांनी अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये विविध विषयांवर (वेदान्त तत्त्वज्ञान, आध्यात्मिक जीवन, राजयोग, ख्रिस्ती मिशनर्यांचे भारतातील अत्याचार, भारतीय स्त्रिया, बौद्ध धर्म, धर्म इ.) भरपूर व्याख्याने दिली. भारतात परत आल्यावरही कोलंबोपासून अल्मोरा येथे जाईपर्यंत ते ठिकठिकाणी विविध विषयांवर व्याख्याने देत होते. यातून त्या त्या विषयांवरील त्यांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचले. याचबरोबर त्यांनी काही तत्कालीन वर्तमानपत्रे आणि मासिके यांना मुलाखती दिलेल्या होत्या आणि वेळोवेळी त्यांनी आपल्या गुरुबंधूंना, तसेच शिष्यांना जी पत्रे लिहिली, त्यातूनही विविध विषयांवर असलेले त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतात. पण यामध्ये बर्याच ठिकाणी विरोधाभासी मजकूरही दिसतो. यावर स्पष्टीकरण असे देता येईल की स्वामी विवेकानंद हे महापुरुष असले, तरी ते एक माणूस होते हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे ते अमेरिकेत त्या काळात ज्या भौगोलिक परिस्थितीत आणि अतिशीत हवामानात राहिले, त्यांच्याकडे पैसे नसायचे, अनेक वेळा त्यांची खाण्याची आबाळ होत असे, अमेरिकेत अनेक मिशनरी लोकांनी, तसेच रमाबाई सर्कलच्या, लेक्चर-ब्यूरोच्या, थिऑसॉफिस्ट सोसायटीच्या लोकांनी त्यांना भयंकर मानसिक त्रास दिला. त्यांच्याविरुद्ध अपप्रचार केला. या सगळ्याला त्यांनी एकट्याने परदेशात राहून तोंड दिले आणि आपले कामही पुढे नेले. त्यामुळे काही वेळा त्यांची तब्येत बरी नसणार, काही वेळा त्यांना परिस्थितीमुळे फ्रस्ट्रेशन येऊन त्या भरातही काही लिहिलेले असू शकते, काही वेळा ते कुणावर रागावलेही असतील. यातील तपशील आपल्याला समजत नाहीत, कारण त्या त्या वेळची परिस्थिती काय होती, याची सर्व माहिती आपल्याला उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे त्यांचे साहित्य वाचताना आपण या सर्व गोष्टींचा विचार करून मगच ते समजून घ्यावेत. अकारण त्यांच्याविषयी गैरसमज करून घेऊ नयेत. या लेखात स्वामीजी बुद्ध आणि बौद्ध पंथ, येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती पंथ, तसेच महमंद आणि इस्लाम धर्म या बाबतीत वेळोवेळी काय बोलले आणि लिहिले आहे, याची चर्चा करणार आहे.
बुद्ध आणि बौद्ध पंथ
गौतम बुद्धांविषयी त्यांना अपार आदर होता. स्वामीजींच्या म्हणण्यानुसार गौतम बुद्धांनी जरी हिंदू धर्मातील जातिभेद आणि कर्मकांडे याला विरोध करून सगळ्यांना सामावून घेणारा पंथ सांगितला, तरी ते एक निस्सीम वेदान्ती होते. ते सामान्य जनतेच्या भाषेत बोलून त्यांना मार्गदर्शन करत असत. यामुळेच त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वांचा सर्वदूर वेगाने प्रसार झाला. यात संस्कृतीचा प्रसार होणे गरजेचे होते, पण फक्त ज्ञानाचाच प्रसार झाला. संस्कृतीमध्ये आक्रमणांशी टक्कर घेण्याचे सामर्थ्य असते, निव्वळ ज्ञानात ते नसते (हिंदू तेजा जाग रे, 74). प्रबुद्ध भारतच्या डिसेंबर 1898च्या अंकात भारतीय स्त्रियांची स्थिती यावरील मुलाखतीतील प्रश्नोत्तरांत ‘बौद्ध संप्रदायाचा स्त्रियांवर विपरीत परिणाम झाला आहे’ या विधानाचे स्पष्टीकरण देताना स्वामीजी म्हणतात, ‘एखाद्या संप्रदायाचा उत्कर्ष काही विशिष्ट कारणाने होतो आणि त्यातच त्याच्या विनाशाची बीजेही सुप्त रूपाने असतात. त्या संप्रदायाचे सामर्थ्यस्थान हीच त्याची दुर्बलता ठरते. बौद्ध मठांमध्ये प्रमुख बौद्ध भिक्षुणींनाही प्रमुख भिक्षूंची आज्ञा प्रमाण मानावी लागत असे आणि त्यांना स्वतंत्र निर्णय घेता येत नसत. याचेच दूरगामी परिणाम होऊन स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान प्राप्त झाले. त्यामुळे त्या काळातील स्त्रियांच्या समाजातील दुय्यम स्थानाला बौद्ध धर्माचा प्रसार अवलंबून आहे. त्याचबरोबर अतिरेकी अहिंसेच्या अवलंबाने नालंदा, तक्षशीला यांसारखी विद्यापीठे मुसलमान आक्रमणांदरम्यान तेथील बौद्ध भिक्षूंनी प्रतिकार न केल्यामुळे नष्ट केली गेली.’ मद्रास येथे दिलेल्या ‘भारतातील महापुरुष’ या व्याख्यानात स्वामीजी म्हणतात, ‘बौद्ध पंथाच्या प्रसाराआधी घरोघरी यज्ञ आणि उपासना होत असत. पण बुद्धांच्या शिकवणीने यज्ञ लोप पावले आणि त्याजागी बाहेर भव्य मंदिरे उभी राहिली, अवडंबरपूर्ण विधी-अनुष्ठानांची सुरुवात होऊन अवडंबरप्रिय पुरोहितवर्ग तयार झाला.’ यात तथ्य असावे असे वाटते, कारण मोठमोठे बौद्ध विहार आणि मोठमोठ्या बुद्धमूर्ती आपल्याला बौद्ध पंथीयांच्या प्रभावाखाली बनलेल्या आढळतात. बुद्धांनी मूर्तिपूजेचा नाश केला नसून त्यांनीच ब्राह्मण आणि मोठमोठ्या मूर्ती यांची निर्मिती केली. कलिंग प्रदेशाच्या (आत्ताचा ओडिशा) राजा अशोकाने बौद्ध पंथ स्वीकारल्यानंतर तेथील प्रजेमध्येही बौद्ध पंथाचे अनुसरण चालू झाले. एका रशियन लेखकाने एक पुस्तकात ‘येशू ख्रिस्त हे जगन्नाथाच्या मंदिरात आले होते, पण ब्राह्मणांच्या संकुचितपणाला आणि मूर्तिपूजेला कंटाळून ते तिबेटमध्ये लामांकडे गेले आणि तेथे ज्ञान प्राप्त करुन घेतले’ असे लिहिले आहे. स्वामीजींनी त्याचा खरपूस समाचारही घेत ही माहिती खोटी असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी जगन्नाथाचे मंदिर हा प्राचीन बौद्धविहार होता असे सांगितले आणि तिथे ब्राह्मण नव्हते, असेही सांगितले. स्वामीजींच्या या विधानावरुन दत्तप्रसाद दाभोळकरांसारखे लेखक अत्यंत चुकीचा निष्कर्ष काढतात की सगळी हिंदू मंदिरे ही तेथील बौद्धविहार पाडून बांधलेली आहेत. वास्तविक पाहता त्याच व्याख्यानात पुढे स्वामीजी म्हणतात की ‘बुद्धांच्या शिकवणीत जी चूक होती, त्याचा परिणाम पुढे आदिशंकराचार्यांनी पुन्हा वेदान्त तत्त्वज्ञानाची प्रतिष्ठापना केली. या बदलात तेथील लोक पुन्हा बौद्ध पंथ सोडून वैदिक धर्म पाळू लागले. जगन्नाथाचे मंदिर त्या जागी होते, याचा उल्लेख भागवत पुराणात (1.3.24) आढळतो. त्यामुळे बौद्ध काळात त्या मंदिराचा बौद्धविहार झालेला असणार आणि वैदिक कालखंडाच्या पुनरागमनानंतर त्याचेच पुन्हा जगन्नाथाच्या मंदिरात रूपांतर झालेले असणार. जगन्नाथाच्या मंदिर परिसरातील एका मंदिरात बुद्धाच्या मूर्तीत जगन्नाथाची मूर्ती असलेली आपल्याला अजूनही पाहावयास मिळते. म्हणजे कुठेही कोणत्याही बौद्धविहाराची मोडतोड फोड झालेली नाही, हे त्रिवार सत्य आहे.
येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती पंथ
येशू ख्रिस्ताबद्धलही स्वामी विवेकानंदांना खूप आदर होता. पण त्याच्या अनुयायांनीच त्याच्या शिकवणीचा केलेला विपर्यास वेळोवेळी सांगून त्यांनी ख्रिस्ती मिशनरी लोकांवर ताशेरे ओढले. त्यामुळेच अमेरिका, इंग्लंडमध्ये ख्रिस्ती मिशनरी लोकांनी त्यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध वर्तमानपत्रांतून लेखन करून अपप्रचार केला. खोट्या कहाण्या पेरून आणि कुभांडे रचून या मिशनरी लोकांनी त्यांच्या चरित्र्यावरही शिंतोडे उडविले. पण स्वामीजींनी न घाबरता या सगळ्याला व्यवस्थित तोंड दिले. प्रबुद्ध भारत या नियतकालिकास 1899मध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांना धर्मांतराच्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यास उत्तर देताना स्वामीजी म्हणाले की ‘हिंदू धर्मातून बाहेर गेलेल्यांना तर पुनश्च हिंदू धर्मात घेतलेच पाहिजे, कारण एक हिंदू धर्मांतरित झाला तर केवळ एक हिंदू कमी होत नसून आपला एक शत्रू वाढतो. ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मांतरे ही बहुतांशी तलवारीच्या जोरावर केलेली असल्याने आजचे धर्मांतरित हे त्यांचेच वंशज आहेत. कोणत्याही हिंदू बांधवाने ख्रिस्ती/इस्लाम पंथ स्वीकारला, तर प्रत्येक हिंदूला अतीव दु:ख व्हायला हवे. प्रतिदिनी ख्रिश्चन पादरी तुमच्या धर्माविषयी वेडेवाकडे बोलून त्याची निंदा करतात, पण तुमचे रक्त उसळून येत नाही. डेट्रॉइट येथील व्याख्यानात त्यांनी भारतात सर्वप्रथम आलेल्या स्पॅनिश मिशनर्यांनी बौद्धविहार आणि मंदिरे उद्ध्वस्त करून हजारो लोकांच्या कत्तली केल्या, त्यामुळे 90% हिंदूंनी जीव वाचविण्यासाठी ख्रिस्ती पंथ स्वीकारला, असे सांगितले. त्याच व्याख्यानात त्यांनी एका बिशपला त्याच्या खोडसाळ निवेदनास प्रत्युत्तर देताना सांगितले की ख्रिस्ती मिशनर्यांनी भारतात येऊन तिथले पवित्र जल प्राशन करावे आणि अनेक ऋषिमुनींनी तेथील जनमानसावर आपला ठसा कसा उमटवला आहे, हे अनुभवावे. या उत्तराने एखाद्या बाँबस्फोटाचेच काम केले. अनेक वेळा त्यांनी ख्रिस्ती धर्मावर थेट टीका न करता कोपरखळ्या मारलेल्या दिसतात. यामुळे तेथील जनता त्यांच्याकडे आकर्षित होत होती. याचा परिपाक म्हणून त्यांच्यावर कॉफीतून विषप्रयोग करण्यापर्यंत ख्रिस्ती मिशनर्यांची मजल गेली होती. परमेश्वरकृपेनेच स्वामीजी यातून वाचले. याच ख्रिस्ती मिशनर्यांनी भारतात स्वामीजींबद्धल अपप्रचार केलेला होता की हिंदूंसाठी जे अभक्ष आहे, तेदेखील (म्हणजेच गायीचे मांस) स्वामीजी पाश्चात्त्य देशांत खातात. ते इंग्लंडला जायच्या प्रवासात असतानाच पॅरिसला अलासिंगा पेरुमलच्या आलेल्या पत्रात जेव्हा त्याने याविषयी सांगितले आणि सत्य काय असे विचारले, तेव्हा स्वामीजी इतके चिडले होते आणि रागाच्या भरात त्यांनी ताबडतोब अलासिंगाला उत्तर लिहिले - हो, ते सगळे खातात. हे रागाने दिलेले उत्तर म्हणजेच त्यांची कबुली आहे असा निष्कर्ष काढणे वेडेपणा आहे, असे एस.एन. धर यांनी स्वामी विवेकानंद समग्र चरित्राच्या द्वितीय खंडात दिलेले आहे.
पुढच्या लेखात आपण मुहंमद आणि इस्लाम पंथाविषयीचे स्वामीजींचे विचार आणि हिंदू धर्माविषयीचे विचार याची चर्चा करू.
(लेखिका विवेकानंद साहित्याच्या अभ्यासक, विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्या आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य आहेत.)
पी.एचडी - एज्युकेशन टेक्नॉलॉजी (ट्रीपल आय टी बंगलोर), एम. फिल. (केम्ब्रिज विद्यापीठ, इंग्लंड); एम. एस्सी - गणित (पुणे विद्यापीठ), बीएड; स्वतःची एज्युकेशन टेक्नॉलॉजीची कंन्सलटन्सी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य; एनसीईआरटीच्या अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक निर्मिती कमिटीच्या गणित विषयाच्या सदस्य (member of NSTC CAG mathematics); जी 20 सी 20 आंंतर्गत Diversity Inclusion Mutual Respect आणि वसुधैवकुटुंबकम या दोन कार्यगटांत काम; उच्च शिक्षणासाठी देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्त्यांचे संपादन; पोस्टडॉक्टोरेे संशोधनासाठी इस्त्रााली गव्हर्नमेंटच्या फेलोशिपवर वर्षभर इस्रायल मध्ये वास्तव्य; दोन वर्षे विवेकानंद केंद्राचे सेवाव्रती शिक्षिका म्हणून नॉर्थ ईस्टमधील अरूणाचल प्रदेश व आसाममधील शाळांमधे काम; ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे येथे चार वर्षे गणिताचे अध्यापन; विवेकानंद केंद्र पुणे येथे सह-सचिव म्हणून जबाबदारी त्याआंतर्गत युथ कॅम्प्स, व्याख्यानमाला यांचे आयोजनात सहभाग, स्वामी विवेकानंदांचे विचार आणि कार्य यांवर विविध ठिकाणी व्याख्याने देणे, कार्यशाळा घेणे; महाविद्यालयीन जीवनात संघाच्या कौशिक आश्रम या कार्यालयाच्या माध्यमातून बालसंस्कार वर्ग घेणे, त्यातूनच पर्वती दर्शन परिसरात वस्तीतील मुला-मुलींसाठी एक अभ्यासिका चालू केली होती. एज्युकेेन टेक्नॉलॉजी, स्वामी विवेकानंद, इस्त्रायल, एल जी बी टी क्यू सारखे विविध सामाजिक तसेच राजकीय विषयांवर साप्ताहिक विवेक, मासिके, दिवाळी अंक, समाजमाध्यमे यांत अभ्यासपूर्ण लेखन.