मॅचोमॅनचे मृगजळ

विषवृक्षाची बीजे या लेखमालेचा चौथा भाग.

विवेक मराठी    21-Aug-2023   
Total Views |
मॅचो ही पोर्तुगीज, स्पॅनिश संकल्पना पुरुषपणाशी जोडलेली आहे. युरोपीय व अमेरिकी युद्ध, शौर्याच्या व विजयाच्या कल्पनांनी त्या प्रतिमेत रंग भरले आहेत. जी आजची मर्दानगीची, पुरुषपणाची जागतिक व्याख्या बनली आहे. हे एक मृगजळ आहे. हे टाळायचे तर आपल्या धर्म-संस्कृतीचे प्रगाढ ज्ञान, तिच्यावर विश्वास, आदळणारे आघात रोखण्याची शक्ती व ठामपणा हवा. भारतीय समाजात स्त्रीप्रती सन्मान, स्त्रीदाक्षिण्य, आदर अशा भावनांना महत्त्व आहे, याचे संस्कार देण्याची गरज आहे.

vivek
 
मागच्या भागात आपण मुलीला घडवताना, मुलीकडे पाहायच्या समाजाच्या दृष्टीकोनाबद्दल आणि नव्या परिस्थितीत तिच्यावर करायच्या संस्काराबद्दल चर्चा केली. पालक आपल्या मुलांवर सुसंस्कार करण्याचा प्रयत्न करतातच. मुलगा, मुलगी दोघांनाही आदर, जबाबदारीपूर्ण वर्तणूक, कौटुंबिक जबाबदार्‍या, स्वावलंबन, परस्परांप्रती सन्मान, एकमेकांचे स्वातंत्र्य जपणे, सामाजिक मर्यादांचे व संकेताचे पालन, मूल्यांची जपणूक, व्यसनांपासून दूर राहणे असे समान संस्कार दोघांवर हवेतच. आजच्या चॅलेंजिंग दिवसात, घरापेक्षा जास्त बाहेर राहण्याच्या काळात, कुटुंबाबाहेरच्या विचारांचे आक्रमण व्हायच्या काळात आपण विशेष दक्ष राहायला हवे. मुली, महिला व मुले यांच्या सामाजिक सुरक्षेबाबत आपल्या मुलग्याला योग्य माहिती, संस्कार व योग्य-अयोग्य याचा विवेक देण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.
 
 
 
स्त्री व पुरुष निसर्गाने बनत असले, तरी बायकी व पुरुषी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व, स्वभाववैशिष्ट्ये व गट हे संस्कृतीने घडवले जातात. मागच्या पिढीचे अनुकरण, पारंपरिकता, सत्ता संबंध, चित्रपट असे घटक त्यावर प्रभाव टाकत असतात.
 
 
लहानपणापासूनच मुलीच्या वागण्याबाबत बंधने व मुलाला सूट असे दुहेरी निकष नसावेत. जसे आपल्या मुलीच्या सुरक्षेबद्दल अपघात होऊ नये यासाठी दक्ष असतो, तसे आपला मुलगाही कोण्या मुलीच्या असुरक्षिततेचे कारण ठरणार नाही ही जबाबदारी आपलीच नव्हे का? लडके तो लडके है असे वाटणे, मानणे ही अक्षम्य चूक आहे. मागच्या एका लेखात आपण कॉपीकॅट क्राइमचा विचार केला होता. घटना, चित्रपट, साहित्य, वार्तांकन यांच्या अनुकरणातून होणारे फक्त गुन्हे नाही, तर त्यांच्या वैचारिक आक्रमणातून, अनुकरणातून तयार होणार्‍या भावना, सवयी, मते, धारणा मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर कसा परिणाम करत आहेत, यांचा विचार करणेही अत्यावश्यक. असुरक्षितता फक्त शारीरिक नाही, तर भावनिकही असते. दर वेळी ती गुन्ह्याचे रूप घेईल असेही नाही. मुलांची व पुरुषांची मुली-बायकांबद्दलची मते कशी तयार होतात, स्वत:बद्दलची कल्पना, मते, अपेक्षा कशा तयार होतात यावर पालकांचे सजग लक्ष हवे.
 

vivek 
 
मर्दानगीची कल्पना - लहानपणापासून मुलग्याला आपण असे ऐकवतो - अंधारात जायला, झुरळ-पालीला घाबरतोस काय, रडतोस काय? तसे घाबरणार्‍या मुलाला भित्री भागुबाई, किंवा न घाबरणार्‍या मुलाला शूरवीर म्हणतो. त्याला बंदूक, पिस्तूल अशी खेळणी देतो. शौर्य, पराक्रम, यांच्या गोष्टी सांगतो. मुलीला असे निर्भय करणारे प्रशिक्षण देत नाही. तिला नम्रतेचे, अवलंबून राहणारे संस्कार देतो. ती अंधाराला, पालीला वा झुरळाला घाबरली तर आपल्याला चालते.
 
 
पुढे जाऊन या मर्दानगीच्या कल्पनेत जेव्हा पितृसत्तात्मकतेचा (Patriarchyचा) भाव व लिंगवादी (Sexist) भेदभावात्मक विचार घुसतो, तेव्हा ती विखारी (Toxic) बनून जाते. मुलींप्रती, महिलांप्रती अपमान, दुय्यमता दर्शवणारी वागणूक आढळायला लागते. पितृसत्तात्मक व लिंगवादी वर्तन व भावना यांमध्ये काय काय येते? बायकांना मुलींना दुर्बळ मानणे, त्यांना सतत संरक्षण पुरवणे, कमावत्या किंवा पोशिंद्या पुरुषाने न कमावणार्‍या स्त्रीचा, पत्नीचा अपमान करणे, बायकांच्या नावावर पैसे न ठेवणे, गुंतवणूक न करणे, टोचून बोलणे, शेलकी विशेषणे लावणे, बायका करीत असलेली कामे न करणे, दुय्यम मानणे, घरातल्या जबाबदारी व कामांमध्ये वाटा न उचलणे, आई-बहिणीवरून शिव्या देणे, अपशब्द वापरणे, पुरुष श्रेष्ठ, उच्च दर्जाचे, त्याला जास्त कळते, बायकांची अक्कल बेताची, बायकांचा द्वेष, त्यांना शारीरिक बळाचा वापर करून ताब्यात ठेवणे, मारहाण, अपमान, छळ, हिंसाचार, शारीरिक बळजबरी, सहज वाटेल असे स्पर्श, कटाक्ष, नजर याने स्त्रीला अस्वस्थ, असुरक्षित वाटेल असे वागणे, चोरून तिची छायाचित्रे घेणे, स्वत:ची असभ्य छायाचित्रे, कंटेंट पाठवणे, द्य्वर्थी बोलणे.. किती यादी करावी? दुराग्रह, दुराभिमान, अहंगंड ही विषारी मर्दानगीची लक्षणे आहेत.
 
 
आजच्या मुलींशी कसे वागावे?
 
आजची मुलगी, स्त्री आकांक्षांचे पंख लावून मुक्त विहार करू इच्छिते. शिक्षण, अर्थार्जन, कायद्यांचे संरक्षण, सामाजिक, राजकीय संधी, विकसित झालेली स्त्रीपुरुष समानतेची पातळी, आत्मविश्वास, अधिकारांची जाणीव व ते प्राप्त करण्यासाठी संघर्ष करायची तयारी, कुटुंबाचा व समाजाचा पाठिंबा अशा अनेक घटकांमुळे आज तिचे पारडे जड आहे. स्त्री-पुरुष नात्यात समतोल आणायचा, तर मुलांचे पारडे स्त्रीप्रति सन्मान, सहकार्य व संवेदना यांनी भरून जायला हवे.
 
 
आत्मविश्वास असलेल्या, मोकळेपणे वागणार्‍या मुलीशी वागताना, ती उथळ आहे, उपलब्ध आहे, स्वैर आहे असे निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. ते नेहमी खरे असेलच असे नाही. आजच्या मुली, स्त्रिया मोकळ्या, स्वतंत्र वागत आहेत म्हणजे त्या उपलब्ध आहेत या मुला-पुरुषांच्या गैरसमजाबद्दल चर्चा व्हायला हवी.
 
 
मुलगा आणि मुलगी यांचे व्यक्तिमत्त्व भिन्न असते, हे समजून घेतले पाहिजे. दोघांची शरीरे वेगळी, हार्मोन्सचे स्राव वेगळे, तशी विचारपद्धती, भावनाप्रधानता, सुखाच्या - अगदी शरीरसुखाच्या कल्पना, अपेक्षा, प्रतिसाद, प्रतिक्रिया, काही प्रमाणात कौशल्ये व वैशिष्ट्ये वेगळी असतात. ‘मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हीनस’ असे म्हटले जाते, ते याचमुळे. हा शारीरिक किंवा मनोकायिक फरक समजून घेणे गरजेचे.
 
 
मॅचोमॅन किंवा अल्फा मॅन
 
 
जागतिक बाजारव्यवस्था, चित्रपट-मनोरंजन व फॅशन उद्योग, इंटरनेटचे जग मुलांच्या मनात नव्या संकल्पना, जीवनाचे नवे मार्ग रुजवते आहे आणि आधीच असलेले पुरुषी-बायकी विभाजन अधिक दृढ करते आहे. ती बार्बी असो वा मॅचोमॅन! ही जाहिरात तुम्ही पाहिली असेल. प्राण्यांच्या संदर्भात वापरलेल्या dominance hierarchy - peking orders या संकल्पना पुरुषांमध्ये प्रस्थापित केल्या जात आहेत. मॅचो ही पोर्तुगीज, स्पॅनिश संकल्पना पुरुषपणाशी जोडलेली आहे. युरोपीय व अमेरिकी युद्ध, शौर्याच्या व विजयाच्या कल्पनांनी त्या प्रतिमेत रंग भरले ते शौर्य, साहस, नेतृत्व, हुशारी अशा गुणांचे, जी आजची मर्दानगीची, पुरुषपणाची जागतिक व्याख्या बनली आहे. काही पुरुषांना, मुलांना त्याचे ओझेही होते. मग boys are boysसारखी गृहीतके जन्माला येतात. या अमेरिकी वा युरोपीय संकल्पना तिथल्या धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरणात जन्म पावलेल्या. जगभरच्या संस्कृतीवर, रितींवर, कल्पनांवर त्याचे कलम करणे योग्य नसले, तरी आजच्या प्रसारमाध्यमांमुळे त्यांची घाऊक निर्यात होते आहे. अल्फा मेन क्रमांक एकावर, बीटा किंवा डेल्टा व अशा दुय्यम, तिय्यम ते नगण्य स्थानावर पुरुषांना नेऊन ठेवते. वर्चस्वाची उतरंड फक्त प्राण्यांमधले नर किंवा पुरुष यांच्यापुरती मर्यादित राहत नाही. ती काही पुरुषांना व स्त्रियांना उतरंडीच्या खालच्या पायर्‍यांवर ढकलते. मुलग्याच्या व्यवहारात मुलीबद्दल मालकी हक्काची भावना, पझेसिव्हनेस, एकतर्फी प्रेम, हिंसा, बलात्कार, हत्या अशा वर्तनात या भावना दिसून येतात. अल्फा मेन किंवा बीटा मेनसारख्या संकल्पना मुलग्याची, पुरुषांची प्रवृत्ती manly म्हणजे पौरुषयुक्त, आक्रमक, यशस्वी अशा तर्‍हेची होईल याची काळजी घेतात. असेच पुरुष बायकांना आवडतात अशीही आवई उठवली जाते.
 
 
हे टाळायचे, तर आपल्या धर्म-संस्कृतीचे प्रगाढ ज्ञान, तिच्यावर विश्वास, आदळणारे आघात रोखण्याची शक्ती व ठामपणा हवा. भारतीय समाजात स्त्रीप्रती सन्मान, स्त्रीदाक्षिण्य, आदर अशा भावनांना महत्त्व आहे. लैंगिकता, कामुकता, शारीरिक दृष्टीकोन वाढीला लागलेला असताना स्त्री-पुरुष नाते फक्त शारीर पातळीवर नाही, नसते, नसावे याचे संस्कार देण्याची गरज आहे. सिक्सपॅक शरीर कमावताना ते स्त्रीसन्मान, समानता, स्वातंत्र्य, संवेदना, सहकार्य व समन्याय या सहा गुणांनी युक्त होणे हे स्वस्थ कुटुंब व समाज यासाठी आवश्यक आहे.
 
 
कोणत्याही लैंगिक संबंधांत मुलग्यांची जबाबदारीही महत्त्वाची आहे. ती एक मानसिक, शारीरिक प्रक्रिया आहे. दोन्ही व्यक्ती भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या समतल पातळीवर असणे हे महत्त्वाचे. त्याच्या परिणामांसाठी दोघेही जबाबदार असतात हे ठसवले पाहिजे. शिकलेल्या मुलींशी, अपारंपरिक पुरुषी मनोवृत्ती सोडून समानतेच्या न्यायाने कसे वागायचे, याचे भान द्यायला हवे, तेही फक्त आई, बहीण, शिक्षिका किंवा नातेवाईक स्त्रीबद्दल नाही. अपरिचित, शेजारी, कार्यालयातल्या स्त्रीबद्दलही तशीच सन्मानाची, आदराची भावना व भाषा असायला हवी.
 
 
मुलग्याच्याही वर्तनावर, मित्रसंगतीवर, त्याच्या सवयींवर, तो पाहत असलेल्या चित्रपटांवर, मालिकांवर नजर असणे, त्याच्याशी चर्चा करणे, संवाद साधणे हे महत्त्वाचे अस्त्र आहे. स्वातंत्र्य किती व कुठले द्यायचे, बंधने कोणती व केव्हा घालायची, याचे भान ठेवून पालकत्वाच्या बदललेल्या आयामांना समजून घेणे हे आजचे पालकत्व आहे. तुमच्या आई-वडिलांनी केलेले तुमचे संगोपन आणि नवी आव्हाने यात फरक आहे.
परूरपरी63ऽसारळश्र.लेा

नयना सहस्रबुध्दे

स्त्रीविषयक लेखनासाठी प्रसिध्द असणाऱ्या नयना सहस्रबुध्दे या भारतीय स्त्री शक्ती या संघटनेच्या संस्थापक सदस्य आहेत. भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणूनही त्या कार्यरत होत्या. नयना सहस्रबुध्दे या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदावर कार्यरत होत्या. सध्या महिला बँकेत डेप्युटेशनवर रुजू झाल्या आहेत. साप्ताहिक विवेकमध्ये स्त्रीभान या सदरातून त्या स्त्रीविषयक लेखन करत आहेत.