छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वधर्माच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र येऊन धर्मकार्याबरोबर राष्ट्रकार्य करावे, एकजुटीने शत्रूचा पराभव करीत स्वराज्य निर्माण करावे, स्वधर्म-स्वदेश-स्वभाषा यांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध व्हावे यासाठी आग्रही होते.
तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून हिंदुस्थानावर एकामागोमाग अनेक इस्लामी आक्रमक आले. काही लुटालूट करून परत गेले, तर काही इथेच स्थिरावले. पुढील तीन शतकांत भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांत अनेक इस्लामी सत्ता निर्माण झाल्या. त्यांच्या धर्मांधतेमुळे अनेक मंदिरे फुटली, धर्मस्थाने नष्ट झाली, कित्येकांना बाटवले गेले, गुलाम म्हणून विकले गेले. हिंदूंचे दैनंदिन धर्माचरणही कठीण कर्म होऊन बसले. विविध प्रकारे इथल्या हिंदूंनी त्याचा विरोधही केला, परंतु असंतोषाचे सारे बंड या सत्तांनी मोडीत काढले. शिवरायांचा उदय अशा भीषण परिस्थितीत झाला होता. रयतेला सुखी करावे, अन्याय-अत्याचारापासून तिचे रक्षण करावे हा शिवाजी महाराजांचा स्वराज्यसंस्थापनेचा मूळ हेतू होता, तरी स्वधर्मरक्षण हेही त्यामागील मुख्य प्रयोजन होतेच. इस्लामी सत्ताधीशांच्या काळात हिंदू धर्मीयांची जी वाताहत झाली, त्याचे शिवरायांनी पुनर्वसन केले. शिवरायांची स्वधर्मावर - म्हणजे हिंदू धर्मावर निष्ठा होती. शहाजीराजे आणि जिजाऊसाहेबांनी धर्मग्रंथांच्या वाचनासह अनेक देवधर्मकार्यांचे संस्कार केले. देवधर्म, साधुसंत यांविषयी श्रद्धा आणि भक्ती त्यांच्या हदयात होती. ते धार्मिक सश्रद्ध होते, पण धर्मांध वा अंधश्रद्ध मुळीच नव्हते. शिवरायांच्या पत्रांतून त्यांच्या देव-धर्मकार्याची अनेक उदाहरणे सापडतात.
बेचिराख झालेल्या पुण्याला जिजाऊसाहेब आणि शिवरायांनी दादोजी कोंडदेवांच्या साथीने पुन्हा वसवले. कसब्यातील भग्न गणेशमंदिराचा जीर्णोद्धार करून आपल्या स्वराज्यकार्याचा श्रीगणेशा केला. दि. 19 मार्च 1647च्या पत्रात शिवराय लिहितात, ‘कसबे पुणे येथील श्री मोरयाच्या देवस्थानाला दिव्याकरिता दररोज अर्धा शेर तेल दरवर्षी देत जाणे. खुर्दखत वेदमूर्ती विनायकभट ठकार यांना परत देणे.’ मंदिराची पूजाअर्चा व दैनंदिन देखभाल त्यांनी ठकार घराण्याकडे सोपवली. कसब्याच्या गणेश मंदिराच्या पुनर्निर्माणाने स्वराज्याची धर्मवाट निश्चित केली आणि लोकांचा विश्वास संपादन केला.
मोरगावचा श्रीमयुरेश्वर म्हणजे मोरेश्वर क्षेत्रासंबंधित शिवरायांची अनेक पत्रे उपलब्ध आहेत. 1647-48चे एक पत्र पाहा, ‘मोरेश्वर गोसावी, क्षेत्र मोरेश्वर, हुजूर येऊन मालूम केले की .... गाई दहावीस आहेत. तेणेकरून ब्राह्मण अतीत अभ्यागतास पावते. गाईस चारावयास रान नाही. गुरांची निगा होत नाही. महाराज गोब्राह्मणांचे प्रतिपालक आहेती. गाईचा प्रतिपाल केलिया बहुत पुण्य आहे. आपला इनाम मौजे मजकुरी आहे. त्यास शेजारी नाकीर्दी जमीन आहे. ती इनाम दिल्यास गाईचा प्रतिपाल करून कल्याण चिंतू. तरी ती जमीन यास इनाम दिली आहे.’ पडिक जमिनींवरचे रान गाईंना चरावयास देण्याची देवस्थानाच्या ब्राह्मणांची मागणी मंजूर करून महाराजांनी जमीन इनाम दिली, इतकेच नाही, तर इ.स. 1648-49मध्ये तिथल्या देशमुख कारकुनांना महाराज आदेश देतात, ‘मोरेश्वर गोसावी, क्षेत्र मोरेश्वर, यांनी गाई चारण्याकरिता इस्ताव्याने घेतलेल्या पड जमिनीवर इस्तावा माफ केला आहे. त्यांच्या नावे धर्मादाय म्हणून लिहावा. ब्राह्मणांकडून गुरांची पाल घेऊ नका. माफ केली आहे.’ याउपर देवस्थानाच्या पूजाअर्चांसाठी ज्या रिकाम्या जमिनीवर लोकांनी पिढ्यांपिढ्या फूलझाडे लावली, त्या केलेल्या प्रयत्नाचा विचार करून 12 जुलै 1649च्या पत्रानुसार त्या जमिनीही इनाम दिल्या. शिवरायांपूर्वी जी इनामे मोरेश्वर देवस्थानाला होती, ती भोगवटा तुटल्यानंतरही महाराजांनी पुन्हा चालू केली .
मुस्लीम अमदानीत कशाबशा तग धरलेल्या तीर्थक्षेत्रांतील पूजाअर्चा, यज्ञ-अनुष्ठाने इ. धर्मकार्ये वाढीस लागावी, म्हणून शिवरायांनी विशेष प्रयत्न केले. श्रीक्षेत्र महाबळेश्वर इथल्या गोपाळभट बिन श्रीधरभट ह्यांना दिलेले 18 फेब्रुवारी 1653चे पत्र पाहा, ‘आपण व मातोश्री जिजाबाई आऊसाहेब, वेदमूर्ती प्रभाकर भट उपाध्ये यांच्या विद्यमाने पासून मंत्र उपदेश संपादिला. स्वामी आपले गुरू. स्वामीस आपण आपले अभ्योदयार्थ सूर्यप्रीत्यर्थं अनुष्ठान सांगितले. प्रतिवर्षी वर्षासन द्यावयाची मोईन केली. येणेप्रमाणे वर्षासन व पूजासामुग्री मोईन करून दिल्ही असे. स्वामीनी आमचे अभ्योदयार्थ सूर्यप्रीत्यर्थ प्रतिवर्षी अनुष्ठान करावे आणि मंत्रोपदेशही स्वामींचे वंशपरंपरेने आमचे वंशपरंपरेस करावा.’ सूर्यमंत्रोपदेश प्राप्त झाल्यावर दर वर्षी महाबळेश्वरी सूर्योपासनेचे अनुष्ठान करावे म्हणून वर्षासन लावून दिलेच, तसेच आपल्या वंशात हे धर्मकार्य होत राहावे, असा संकल्पही शिवराय करतात.
आपले स्वराज्य हे ईश्वराच्या इच्छेनुसार निर्माण झाले आहे, ही शिवाजी महाराजांची धारणा होती. आपल्या सवंगड्यांच्या मनातही त्यांनी ही भावना यशस्वीरित्या रुजवून त्यांच्यात विश्वास निर्माण केला. शिवरायांच्या ह्या धारणेचा प्रत्यय जुन्नर प्रांतातील कारकुनांना लिहिलेल्या 17 जुलै 1653च्या पत्रातून येतो. ‘वेदमूर्ती सिधेश्वरभट बिन मेगनाभट ब्राह्मण उपाध्ये हे ब्राह्मण, पूर्वाचार आपले आश्रित यांच्या अनुष्ठान बळे आपण राज्यास अधिकारी जालो व सकळ मनोरथ चिंतिले पावलो. पैसा अनुभव आला म्हणऊन व संकटकाळी साहायकारी जाणवून पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने यांसी वर्षासन होन पा 100 केले असेत. ते प्रांत मजकुरच्या पोतापैकी आधी प्रविष्ट करून पावल्याचे उत्तर घेत जाणे. यासी पुढे आपल्या वंशपरंपरेचे जे होतील त्यांनी वेदमूर्तीच्या वंशपरंपरेचा प्रतिवर्षी परामर्ष करून वर्षासन चालवावे. जो लिहिल्याप्रमाणे न चालवील त्यास श्री भवानीशंकराची व कुलस्वामीची व आपल्या पूर्वजांची व गोब्राह्मणाची शफत असे. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे.’ अनेकांच्या प्रार्थनांचे, अनुष्ठानाचे बळ आपल्या स्वराज्यकार्याला आहे म्हणून ते यशस्वी होते, ह्याची शिवरायांना जाणीव होती आणि त्यांनी अशी कार्ये निरंतर चालू राहावीत ह्याची तजवीज करून ठेवली. अशा वर्षासनांना दर वर्षी नूतनीकरणाचा आग्रह करू नका, असे आपल्या अधिकार्यांना ते आवर्जून सांगत.
पैठण म्हणजे महाराष्ट्राचे तत्कालीन धर्मपीठ. तेथे आपल्या वंशजांची धर्मकार्ये परंपरेने चालवण्याची सनदच त्यांनी तेथील पुरोहित गोविंदभट कावळे यांना दिली (इ.स. 1667-68). ‘स्वस्ति श्रीमंत वेदमूर्ती गोविंदभट कावळे यांस लेहून दिधले प्रस्तिस्ठाणचे तीर्थपुरोहितपण माहाराजे सिवाजीराजे भोसले हर जो कोन्ही आपले वंसिचा जो येईल त्यासी मान्य.’
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील पूजाअर्चेसाठी शिवरायांनी दिलेली वर्षासने पाहा - ‘प्रति - वेदमूर्ती अपदेभट ढेर्गे, वास्तव्य त्र्यंबकेश्वर, 18 जून 1670, श्री त्र्यंबकेश्वराचे तीर्थ उपाध्येपण तुम्हास पूर्वीपासून दिले आहे. श्री त्र्यंबकेश्वराची पूजा नैवेद्य व ब्राह्मण भोजन, दक्षिणा याकरिता पुढीलप्रमाणे मोईन केली आहे : पूजा, नैवेद्य व नित्यदक्षिणा याकरिता 60 होन आणि ब्राह्मण दक्षिणा, अभिषेक याकरिता 40 होन, एकूण होन 100.’ इतकेच नाही, तर स्वारीप्रसंगी, मोहिमांवर जाता-येता आपल्या सैन्याकडून देवस्थानांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी ते सदैव जागरूक असत. इ.स. 1670-71मध्ये त्र्यंबकेश्वराच्या भटभिक्षुकांना या बाबतीत आश्वस्त करणारा कौलनामा महाराजांनी दिला आहे, ‘...मालुमात केली की साहेबांचे लोक येताजाता आपणास तसवीस देतात. तरी कौल मरहमत केलिया आसीरवाद देऊन सुखे राहो. तरी तुम्ही सुखे राहणे. साहेबांचे लोक येथे आले तरी भिक्षुक ब्राह्मणास आजार देणार नाही. कौल असे.’
वारकरी संप्रदायाबाबतही शिवरायांना विशेष आदर होता.देहूत तुकारामबाबांच्या कीर्तनांना ते गेल्याचे उल्लेख सापडतात. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माउलीच्या समाधी मंदिराच्या देखभालीसाठी त्यांनी तजवीज केली. 25 ऑक्टोबर 1671 रोजी चाकण प्रांतदेशमुखांना लिहिलेल्या पत्रात महाराज आदेश देतात की, ‘श्री ज्ञानदेव यांचे इनाम मौजे आळंदी, परगणे मजकूर, येथे देवाचे देवास दिधले असे. दुमाला करणे. साल दर साल चालवीत जाणे. तालीक घेऊन असल फिराऊन रामानंद गोसावी यापासी देणे.’ सासवडच्या सोपानदेव समाधी मंदिराबाबतीतही त्यांचे आदेश सापडतात - ‘प्रति कारकून, देशमुख, देशपांडे, मोकदम व रयान, कसबे सासवड, कर्यात मजकूर, श्री सोपानदेव यांची समाधी कसबे मजकुरी आहे. तिला इनाम जमीन रोजिना मोईन, नैवेद्याकारणे ज्वारी व दिवाबत्तीस तेल सालाबाद आहे. ते चालवणे. असल पत्र गोसावी रामानंद याजपाशी देणे.’
संतसज्जनांबद्दल शिवरायांना विशेष आदर होता. साधुसंतांचे कार्य समाजामध्ये नीतिमत्ता, सदाचार, भक्ती आणि स्वधर्माप्रती निष्ठा वाढीस लावते, म्हणून शिवरायांनी संतसज्जनांचे रक्षण केले. त्यांच्या कार्यांना प्रोत्साहन दिले. जे ब्राह्मण पुरोहित आपली सेवा देत धर्मकार्ये करीत, त्यांचेही आपण रक्षण केले पाहिजे ही त्यांची भूमिका होती. 8 सप्टेंबर 1671 रोजी तुकोराम नावाच्या प्रभावलीच्या सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात शिवरायांच्या ह्या भूमिकेची प्रचिती येते. ‘सबनीस सुबे मजकूर यावरी +++ तगारा नाईकवाडी निसबत बापूजी नलावडे याणे कल्हावती करून तरवारेचा हात टाकला आणि अखेर आपलेच पोटात मुरी मारून घेऊन जीव दिल्हा. तुम्ही काही हुजूर लिहिले नाही. मराठा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली याचा नतीजा तोच पावला. ऐसे बेकैद लोकांस होऊन देणे.’
ब्राह्मणांवर तलवार चालवू नये ह्याचा अर्थ धर्मकार्य चालवणार्या ब्राह्मणांचे रक्षण करावे असा होता. ज्या ब्राह्मणांनी स्वराज्यकार्यात चुका केल्या किंवा आड आले, त्यांच्या बाबतीत केवळ ब्राह्मण म्हणून शिवरायांनी हयगय केली नाही. असा उच्चनीचतेचा जातिभेद त्यांना मान्यच नव्हता. पद्मदुर्ग वसवताना वेळेत सामान न पोहोचल्यामुळे जो आरमाराचा खोळंबा झाला, त्याबाबत प्रभावलीच्या जिवाजी विनायक ह्या ब्राह्मण सुभेदाराला लिहिलेल्या 19 जानेवारी 1675च्या पत्रात ते म्हणतात, ‘दौलतखान व दर्यासारंग यासी ऐवज व गला राजश्री मोरोपंत पेशवे याणी वराता सुबे मजकुरावरी दिधल्या. त्यास तुम्ही काही पावले नाही. त्यावरून अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील. पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी, सामान पावावे, ते नाही. पद्मदुर्ग हबशी फौजा जेर करीत असतील आणि तुम्ही ऐवज न पाववून आरमार खोळंबून पाडाला ऐशा चाकरास टीकेठीक केले पाहिजेत. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो? याउपरी बोभाट आलिया तुमचा मुलाहिजा करणार नाही.’ एका बाजूस राज्याभिषेकसमयी गागाभट्टांसारख्या धर्मपंडितांचा आदर आणि दुसर्या बाजूस कृष्णाजी भास्करासारख्या अफझलखानाच्या ब्राह्मण वकिलांनी केलेल्या हल्ल्याचे प्रत्युतर शिवरायांनी प्रतिवाराने दिले, या दोहोत त्यांची नीरक्षीरविवेकबुद्धीच दिसते.
समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे समकालीन संत. रामदासस्वामींचे समाजप्रबोधनाचे कार्य एकीकडे सुरू होते, तर दुसरीकडे शिवरायांची स्वराज्यनिर्मितीची घोडदौड सुरू होती. शिवरायांनी समर्थांना दिलेली चाफळची सनद सुप्रसिद्ध आहे. समर्थांच्या कार्याबाबत शिवरायांना किती आदर होता व त्यांनी चालवलेले समाजकार्य अबाधित राहावे, याचा बोध शिवरायांच्या पुढील पत्रातून होतो. 22 जुलै 1672ला दत्ताजीपंत वाकेनिवीसांना लिहिलेल्या पत्रात शिवराय लिहितात की ’चाफळच्या रघुनाथाच्या देवालयाचा जो उत्सव भरतो त्यात सैन्याकडून चोर चोरट्यांकडून तुर्कांकडून कोणताही उपद्रव होणार नाही याची खबरदारी घ्यावी. गोसावी ब्राह्मण त्या स्थळी घरे बांधतात त्यांचेही रक्षण करावे.’
31 मार्च 1676ला जावळीचे देशाधिकारी आबाजी मोरदेव यांना लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, ‘श्री रघुनाथ देवस्थान, कसबे चाफल, कर्यात नानेघोल, प्रांत कर्हाड यास नित्यपूजा व सेवक लोकांस वतने याची मोईन व श्री रामदासस्वामी गोसावी यांचे संनिध शिष्यसमुदाय व अतीत अभ्यागत यांनिमित्त पेशजी सुभे मजकुरास सनद सादर केली आहे. श्री रामदासस्वामी गोसावी शिवथरी असता सनदेप्रमाणे पावत होते. त्याउपरी सांगोन पाठविले की, जे रघुनाथकारणे दिल्हे ते सर्व पावले, याउपरी आपणास काही न पाहिजे. पूर्वी श्रीरामदासस्वामींची व आमची भेटी चाफळी जाहली ते समई आम्ही विनंती केली होती की श्रीचे पूजेस जे देणे कोणा स्वाधीन करावे. ते समई श्री रामदासस्वामींची आज्ञा की जे देणे ते दिवाकर गोसावी याचे स्वाधीन करीत जाणे. म्हणून राजश्री दताजीपंत यास पत्र पाठवून पनालियास बोलाऊन आणिलेव विचारले. त्यांनी सांगितले की पूर्वीपासून श्रीरामदासस्वामींच्या पूर्वील आज्ञेवरून दिवाकर गोसावी यांच्या स्वाधीन करणे. श्रीच्या कार्यभागास हरकरा व राजपूत पाहिजेत ते प्रयोजनानुसार येकदोनी सुभे मजकूरचे देत जाणे. वेदमूर्ती दिवाकर गोसावी यासी घोडी बैसावयास दिली तिचा दाणा रोज पाईलीप्रमाणे देत जाणे. श्रीकडील मोईन पावल्याचे जाब वेदमूर्ती दिवाकर गोसावीचे घेत जाणे.’ ह्या पत्रात शिवराय समर्थांच्या चाफळ येथील भेटीचा उल्लेख सापडतोच, तसेच समर्थांच्या सेवेसाठी शिवरायांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या, याचाही उलगडा होतो. रामदास स्वामींचे वास्तव्य आधी शिवथरच्या गुहेमध्ये होते. परळीचा किल्ला अर्थात सज्जनगड शिवरायांनी समर्थांच्या वास्तव्यासाठी उपलब्ध करून दिला आणि तिथे त्यांच्या सर्व शिष्यांची राहण्याची सोय करून दिली. तिथे येणार्या भक्तांना मज्जाव करू नये व रामदास संप्रदायाचे रक्षण करावे, या अर्थाची शिवरायांची पत्रे सापडतात.
कोकणातील पाटगावचे मौनीबाबा आणि केळशीचे याकूतबाबा अशा साधू-फकिरांच्या स्थानांनाही वर्षासने दिल्याची शिवरायांची पत्रे सापडतात. स्वराज्यातील ज्या मशिदींना-दर्ग्यांना मुस्लीम सत्तेच्या काळात इनामे होती, ती बर्याच ठिकाणी चालू ठेवल्याचीही शिवरायांची काही पत्रे आहेत. उदाहरणार्थ, ’(25 ऑक्टोबर 1646) मौजे काटी पा मा येथील मशिदीच्या खिदमतीबद्दल काजी सैद यास 1 चावर जमीन व रोज पावशेर तेल इनाम आहे. ते दुमाले करणे.’ ’(इ.स. 1653-54) काजी हाफिज यास इंदापूर कसब्यातील मशिदीच्या सेवेकरिता तीन चावर जमीन इनाम आहे. गतवर्षीपर्यंत चालले असेल त्याप्रमाणे चालवणे.’ ‘20 नोव्हेंबर 1653 - काजी अबन बिन काजी हाफिज वास कसबे बालेवाडे येथील मशिदीचे खिजमतीकरिता 1 चावर जमीन व रोज पावशेर तेल इनाम आहे. तरी पूर्वी चालले असेल तसे चालवावे.’ परंतु शिवरायांनी कोणत्याही मशिदीला वा दर्ग्याला स्वत:होऊन नवीन इनाम वा वर्षासन लावून दिल्याचे एकही उदाहरण नाही. उलट इंदापूर मशिदीच्या काझीच्या पत्रात ’शिवरायांच्या काळांत आमचे इनाम चालले नाही’ हा उल्लेख सापडतो.
हिंदू धर्माची पारंपरिक सहिष्णुता महाराजांकडे होतीच, म्हणून त्यांनी सर्व धर्मीयांना सन्मानाने वागवले. मात्र स्वधर्माआड आलेल्या सर्व विघ्नांना संपवून हिंदू धर्मीयांच्या छळाला पायबंदच घातला नाही, तर त्याच्या पुन:प्रतिष्ठापनेसाठी असंख्य कार्ये केली.
श्रीतुळजाभवानीचा उपमर्द करणार्या अफझलखानाला ज्या प्रतापगडच्या पायथ्याशी फाडला, त्याच प्रतापगडावर जगदंबेचे सुंदर मंदिर बांधले. 14 जून 1679ला प्रतापगडच्या मंबाजी नाईक ह्याला लिहिलेल्या पत्रात महाराज कळवतात, ’श्री पासी प्रत्यही अन्नछत्र चालविले आहे. एकूण आमान्ये (शिधा) दहा देविली आहेत. मंबाजी नाईक 5. विश्वनाथभट 4 आणि पुराणिक याला 1. मंबाजी नाईक व विश्वनाथभट आणि ब्राह्मण वगैरे जाती येतील त्यास भोजन घालीत जावे. पुराणिकाचे आमान्य त्यास द्यावे.’
महाराजांनी केवळ मंदिरे स्थापली, भग्न मंदिरांचा जीर्णोद्धार केला असे नाही, तर तेथील पूजाअर्चा, तजविजा, व्यवस्था लावल्या. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे चालवली. दानधर्म केला. धर्माच्या ऐक्यासाठी जातीपातीतले तंटे सोडवले. बाटलेल्यांना पुन्हा हिंदू करून घेतले. स्वधर्माच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र येऊन धर्मकार्याबरोबर राष्ट्रकार्य करावे, एकजुटीने शत्रूचा पराभव करीत स्वराज्य निर्माण करावे, स्वधर्म-स्वदेश-स्वभाषा यांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध व्हावे हाच शिवरायांचा आग्रह होता आणि त्यासाठी त्यांनी आपल्या सार्या क्षमता पणाला लावल्या. ‘महाराष्ट्रधर्म’ वाढवला. म्हणूनच शिवरायांच्या धर्मसंरक्षणाची थोरवी गाताना रामदासस्वामी म्हणतात - ‘या भूमंडळाचे ठायी। धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्रधर्म राहिला काही। तुम्हाकारणें॥’