प्रिगोझिनच्या या उठावामुळे एक महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे व्लादिमीर पुतीन यांची सत्ता अभेद्य आणि अनिर्बंध नाही. त्यालाही आव्हान दिले जाऊ शकते आणि तशा प्रकारचे घटक अस्तित्वात आहेत. त्यामुळे भविष्यात पुतीन यांच्या सत्तेला ग्रहण लागू शकते. थोडक्यात, अमेरिका आणि नाटो या बाह्य घटकांपासूनच पुतीन यांना धोका आहे असे नाही, तर अंतर्गत घटकही त्यांची खुर्ची डळमळीत करू शकतात.
संपूर्ण जग गेल्या दीड वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम भोगत आहे. फेब्रुवारी 2022मध्ये सुरू झालेले हे युद्ध काही आठवडे चालेल अशी अपेक्षा होती; परंतु दीड वर्ष उलटूनही या युद्धाला पूर्णविराम मिळालेला नाही. संपूर्ण जग या युद्धबंदीकडे डोळे लावून बसलेले आहे. त्यासाठी विविध स्तरांवर मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, हे युद्ध आपल्याला जिंकता येणार नाही याची व्लादिमीर पुतीन आणि झेलेन्स्की या दोघांनाही कल्पना आहे. असे असूनही दोन्हीही नेते हार पत्करायला किंवा माघार घ्यायला तयार नाहीत. युक्रेन युद्धाचा हा तिढा कायम असतानाच रशियामध्ये काही दिवसांपूर्वी एक महत्त्वपूर्ण किंवा अनपेक्षित अशी घडामोड घडली. या घटनेमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ही घटना म्हणजे रशियामध्ये वॅगनर नावाच्या एका खासगी लष्करी गटाने (पॅरामिलिटरी फोर्सने) एकाएकी उठाव केला आणि रशियाची राजधानी मॉस्कोच्या रस्त्यावर सुमारे 50 हजार सैन्य उतरलेले दिसले. युक्रेनमधून प्रवेश करत वॅगनर गटाचे सैन्य आणि रशियन लष्कर यांच्यात मॉस्कोच्या रस्त्यावर एक प्रकारचा संघर्ष निर्माण झाला. या संघर्षामध्ये रशियाची दोन हेलिकॉप्टर्स क्षतिग्रस्त झाल्याचे आणि चार सैनिक मृत्युमुखी पडल्याचे वृत्तही समोर आले. यातून व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध रशियामध्ये मोठा उठाव झाला असून रशियात सत्तांतर होणार अशा अटकळी जगभरातून व्यक्त केल्या जाऊ लागल्या. या पार्श्वभूमीवर रशियामध्ये घडलेल्या या घटनेच्या मुळाशी जाऊन विचार करणे औचित्याचे ठरेल.
वॅगनर हा रशियाने मोठा केलेला एक खासगी लष्करी गट आहे. साधारणत: 2014-15मध्ये हा गट अस्तित्वात आला. त्या वेळी अनेक देशांमध्ये रशियाच्या समर्थनावरची सरकारे होती. त्या सरकारांच्या विरोधामध्ये काही बंड-उठाव सुरू होते. अशा वेळी याच वॅगनर गटाने रशियाच्या वतीने तेथील स्थानिक सरकारांना मदत करण्यात मोलाची भूमिका बजावली. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, सिरियामध्ये बशर यांच्या सत्तेला समर्थन देण्यासाठी याच वॅगनर गटाने पुढाकार घेतला होता. सुदान आणि मालीमध्येही हा गट लढला होता. लिबियामध्येही या गटाने पुढाकार घेतला होता. थोडक्यात, रशियाचे हितसंबंध असणार्या क्षेत्रांमध्ये या गटाचे अस्तित्व होते आणि रशियाचे हितसंबंध वाढवण्यासाठी हा गट प्रयत्नशील होता. या गटाचा प्रमुख असणारा येवेगनी प्रिगोझिन हा अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असणारा आहे. त्याने 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही भोगली आहे. तो पूर्वी हॉटेल व्यावसायिक होता. सेंट पीटर्सबर्गमध्ये त्याने रेस्टॉरंट्सची एक साखळी उघडली. त्या वेळी व्लादिमीर पुतीन उपमहापौर होते. हॉटेलिंगच्या व्यवसायात असतानाच पुतीन यांच्याशी त्याची मैत्री झाली. ही मैत्री कालौघात इतकी घट्ट होत गेली की या गटाला मोठमोठी लष्करे कंत्राटे दिली जाऊ लागली. या गटाला शस्त्रास्त्रांचा, साधनसामग्रीचा पुरवठादेखील रशियाकडूनच केला जात होता. परिणामी, व्लादिमीर पुतीन यांचे खासगी लष्कर अशाच प्रकारची वॅगनरची रचना आणि कार्यपद्धती होती.
2014मध्ये व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर कारवाई करत क्रिमिया या भागावर कब्जा मिळवला, त्या वेळी या संघर्षामध्ये याच वॅगनर गटाने सक्रिय सहभाग आणि पुढाकार घेतला होता. किंबहुना, 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर जे आक्रमण केले, ती लष्करी कारवाई यशस्वी होण्याची जबाबदारीही वॅगनर गटाने पार पाडली. वॅगनर गटाचे मुख्यालय रशिया-युक्रेन यांच्या मधल्या भागात आहे. पूर्व युक्रेन आणि रशियाच्या पश्चिमेकडील भागातील डोनबास्क आणि लुहान्समध्ये हे मुख्यालय आहे. काही महिन्यांपूर्वी रशियाला वॅगनर गटाच्या सहकार्यामुळेच या दोन प्रांतांवर कब्जा मिळवण्यात यश आले आणि तिथे रशियाचे वर्चस्व प्रस्थापित करता आले. प्रिगोझिनच्या सैन्याने युक्रेनविरुद्धच्या युद्धाव्यतिरिक्त अनेक युद्धे लढवली आहेत. ज्या ज्या ठिकाणी रशियन लोक आहेत, त्या त्या ठिकाणी या गटाचे प्राबल्य आहे. विशेष म्हणजे वॅगनर गटाने रशियन जनतेची मने बर्यापैकी जिंकली आहेत. वॅगनर गटामधील सैनिकांमध्ये रशियन लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकार्यांचे-सैनिकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे वॅगनर गटाविषयी समाजमनात एक आदर दिसून येतो. युक्रेनविरुद्धचे युद्ध दीड वर्ष सुरू ठेवण्यामध्ये वॅगनर गटाचा मोठा वाटा आहे. या युद्धाची जबाबदारी घेतल्यानंतर वॅगनर गटाकडूनच स्थानिक गुप्तवार्ता संकलन करून त्याचे अहवाल रशियन लष्कराला आणि पुतीन यांना दिले जात होते.
साहजिकच, व्लादिमीर पुतीन यांच्याशी एकनिष्ठ असणार्या आणि रशियाच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी-संवर्धनासाठी प्रभावी भूमिका बजावणार्या या वॅगनर गटाला एकाएकी का उठाव करावा लागला? असा प्रश्न उपस्थित होतो. हा उठाव नसून न्यायासाठी काढलेला मोर्चा होता, असे भलेही आता प्रिगोझिनकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तो लष्करी उठावच होता. त्यामुळेच पुतीन यांनी “वॅगनर गटाने आपल्या पाठीत खंजीर खुपसला” अशा प्रकारची टिप्पणी करत त्यांना देशद्रोही म्हटले होते. या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हा स्टेट आणि नॉन स्टेट यांच्यातील संघर्ष आहे. राज्य विरुद्ध राज्यके. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राज्यकांचे म्हणजेच नॉन स्टेट अॅक्टर्सचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. राज्यकांमध्ये वॅगनरसारख्या खासगी लष्करी संघटना, दहशतवादी संघटना, बहुराष्ट्रीय कंपन्या, ट्रेड ब्लॉक्स यांचा समावेश होतो. या प्रकारच्या राज्यकांनी राज्यांची भूमिका कमी करण्याचे काम केले आहे. आजवर राज्य हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मुख्य घटक होता. एका राष्ट्राशी दुसर्या राष्ट्राशी असणारे संबंध अशा स्वरूपाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास केला जात असे. कारण राज्य हा केंद्रीभूत घटक होता आणि त्या आधारावर परराष्ट्रसंंबंध ठरवले जात असत. पण गेल्या काही वर्षांत राज्यकांची ताकद इतकी वाढली की तो राज्यांपेक्षाही प्रभावी घटक बनला. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, अल् कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेवर आक्रमण केले. अनेक दहशतवादी संघटनांचे नेटवर्क अनेक देशांमध्ये पसरलेले आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची उलाढाल पाहिल्यास छोट्या छोट्या देशांच्या बजेटपेक्षाही मोठी आहे. त्यामुळे या राज्यकांकडून दबावाच्या भूमिका घेतल्या जात आहेत.
रशियाचा विचार करता व्लादिमीर पुतीन हे एकाधिकारशाहीवादी राजकारणी आहेत. असे असताना ते प्रिगोझिनसारखे दुसरे नेतृत्व कसे सहन करू शकतात? असा प्रश्न उपस्थित होत होता. विशेषत: जसजसे युक्रेन युद्ध लांबत चालले होते, तसतसे वॅगनर गटाचे महत्त्व वाढत चालले होते. त्यातून या गटाच्या मागण्या वाढत चालल्या होत्या. पुतीन यांना ही बाब खटकणारी होती. त्यामुळे पुतीन यांनी जाणीवपूर्वक या गटाचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले. यासाठी वॅगनर गटाला देण्यात येणारी कंत्राटे बंद करण्यात आली. त्यांना साधनसामग्रीचा पुरवठा करणे बंद केले. त्यामुळे आपले अस्तित्व दाखवण्यासाठी आणि महत्त्व ठसवण्यासाठी प्रिगोझिनने उठावाचे पाऊल उचलले. दोन मित्रांमधील संघर्ष म्हणून या घडामोडीकडे पाहिले गेले.
विशेष बाब म्हणजे, हा उठाव झाल्यानंतर दुसर्याच दिवशी बेलारूस या रशियाच्या शेजारी देशाने केलेल्या मध्यस्थीनंतर प्रिगोझिनने माघार घेतल्याचे वृत्त आले आणि हा उठाव-बंड शांत झाल्याचे सांगितले गेले. पण यामुळे प्रश्न संपलेले नाहीत. किंबहुना, बेलारूससारख्या देशाने यामध्ये मध्यस्थी का केली? हा कळीचा प्रश्न आहे. याचा दुसरा अर्थ वॅगनर गटाची पाळेमुळे खोल रुजलेली आहेत. केवळ वरवरचा संघर्ष असे याचे स्वरूप नाहीये. तसेच वॅगनरनी माघार घेतली असली, तरी हा उठाव करूनही त्यांचे रशियातील अस्तित्व कायम आहे. त्यामुळे आज ना उद्या हा उठाव पुन्हा होऊ शकतो. याचे कारण सीआयए ही अमेरिकेची गुप्तचर संघटना आणि ब्रिटनच्या एम 16 या गुप्तचर संघटनेने मिळून वॅगनरला चिथावणी दिली का, याचीही चर्चा सुरू असून ती अनाठायी म्हणता येत नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडलेली असून ती यथावकाश समोर येतीलच. पण या उठावामुळे एक महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे व्लादिमीर पुतीन यांची सत्ता अभेद्य आणि अनिर्बंध नाही. त्यालाही आव्हान दिले जाऊ शकते आणि तशा प्रकारचे घटक अस्तित्वात आहेत. त्यामुळे भविष्यात पुतीन यांच्या सत्तेला ग्रहण लागू शकते. थोडक्यात, अमेरिका आणि नाटो या बाह्य घटकांपासूनच पुतीन यांना धोका आहे असे नाही, तर अंतर्गत घटकही त्यांची खुर्ची डळमळीत करू शकतात. रशियात अंतर्गत असंतोष मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे आणि तो ज्वालामुखीसारखा कधीही फुटू शकतो, अशी अमेरिकादी राष्ट्रांकडून केली जाणारी मांडणी खोटी नाही, हे या उठावाने सिद्ध केले आहे.
लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.