बदलापूरचे ‘जांभूळ आख्यान’

विवेक मराठी    17-Jun-2023   
Total Views |
@विकास पांढरे। 9970452767
 
बदलापूरच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या जांभळांची चर्चा सर्वदूर आहे. यंदाच्या हंगामात दिल्लीकरांनी बदलापूर जांभळांची चव चाखली. या जांभळांचे संवर्धन होण्यासाठी वन विभागामार्फत 10 हेक्टर क्षेत्रावर ‘जांभूळ वन’ विकसित करण्यात येणार आहे. यासाठी ‘जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्ट’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. या फळपिकाशी या भागातील शेतकरी व आदिवासी बांधव अधिकाधिक जोडण्यास मोठी मदत होणार आहे.
 
badalapur
 
फळांचा राजा जसा आंबा, तसा झाडांचा राजा म्हणजे जांभूळ. अशा या वैशिष्ट्यपूर्ण जांभूळ वृक्षाचे शास्त्रीय नाव आहे ‘सायझिजियम क्युमिनी’. जंगलात मिळणारे वनउपज हे आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असते. त्यामुळे जांभूळ हा आदिवासींचा कल्पवृक्ष समजला जातो. जांभूळ हा बहुगुणी वृक्ष आहे. महाराष्ट्रात गडचिरोली, चंद्रपूर, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, कोकण किनारपट्टी, सातारा, कोल्हापूर या भागात जाभळांची पारंपरिक झाडे पाहायला मिळतात. प्रदेशानुसार जांभळाची विविधता आढळते. विदर्भात व पश्चिम महाराष्ट्रात ‘राई जांभूळ’, तर मराठवाड्यात ‘लेंढी जांभूळ’ अधिक लोकप्रिय असले, तरी कोकणातील जांभळाला मात्र वेगळीच चव आहे. कोकणात ‘कुंदे’, ‘सावंतवाडी’, ‘कोलगाव’, ‘आंब्रड’, ‘निरुखे’ अशा काही जांभळाच्या स्थानिक जाती आहेत. पालघर जिल्ह्यातील बहाडोली भागात जांभळाचे मोठे क्षेत्र पाहायला मिळते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 2004 साली ‘कोकण बहाडोली’ नावाची अधिक उत्पन्न व मोठी फळे देणारी जांभळाची जात विकसित केली आहे. त्यामुळे या प्रजातीचे क्षेत्र वाढले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आकेरी हे गाव आता जांभळाची मुख्य बाजारपेठ म्हणून नावारूपाला येत आहे. बदलापूरचे जांभूळ आता ‘बदलापूर जांभूळ’ असे भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यामुळे अधिक लोकप्रिय होत आहे. याचे मुख्य कारण आहे या जांभळाचा असलेला मोठा आकार, उत्तम चव, रंग आणि औषधी गुणधर्म. या गुणवैशिष्ट्यांमुळे बदलापूर जांभळाचा गोडवा सर्वदूर पोहोचला आहे. बदलापूर जांभळाचा हंगाम साधारणत: मार्च ते जून या महिन्यात असतो. या काळात मुंबई व उपनगरात या जांभळांना मोठी मागणी असते. या वर्षीच्या जांभूळ हंगामात बदलापूर जांभळाची चव दिल्लीकरांनी अनुभवली.
 
 
बदलापूर जांभळाचे 1300 वृक्ष
 
मुंबईजवळ हाकेच्या अंतरावर वसलेले बदलापूर हे एकेकाळी निसर्गसौंदयाने नटलेले शहर म्हणून ओळखले जाते. या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील जांभूळ बाजारपेठ. बदलापूर आणि आसपासच्या कुळगाव, शिरगाव, मुळगाव, एरंजाड, बोराडपाडा, बारवी धरण, बेंडशीळ, दहिवली, भोज, वालिवली यासह आदिवासी पाड्यांमध्ये अवीट गोडी, सुमधुर चव, आकाराने लंबगोल अशा बदलापूर-हळवा व गरवा जातीच्या जांभळाचे हजारो वृक्ष होते. काळाच्या ओघात आणि शहरीकरणाच्या रेट्यात बदलापूरच्या जांभूळ वृक्षांची संख्या झपाट्याने घटत चालली आहे.
 

badalapur 
 
याविषयी माहिती देताना अदित्य गोळे म्हणाले, “बदलापूर हे जांभळाच्या बाजारासाठी पूर्वापार प्रसिद्ध आहे. नागरीकरणाच्या रेट्यामुळे बदलापूरच्या ’गरवा’ व ’हळवा’ जातींच्या जांभूळ उत्पादनात 50 ते 60 टक्के घट झाली आहे. नामशेष होत असलेल्या बदलापूरच्या जांभळाला नवसंजीवनी देण्यासाठी आम्ही जानेवारी 2022 साली ’बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्ट’ची स्थापना केली. संस्था स्थापन केल्यानंतर वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून काम केले. प्रथमत: दुर्मीळ जांभूळ वृक्षांचा व जांभूळ उत्पादक शेतकर्‍यांचा शोध घेतला. बदलापूर जांभूळ प्रजातीच्या झाडांची संख्या मोजताना किमान चाळीस वर्षे किंवा त्यापेक्षा जुन्या वृक्षांची गणना केली. या निकषात आम्हाला बदलापूर जांभळाची 1300 झाडे सापडली. महेश सरोशे, मोहन जोशी-इनामदार, विलास देशमुख, संजय चौधरी यांच्याकडे 40 ते 50 वर्षांपूर्वीची जांभळांची झाडे पहायला मिळाली. या झाडाची तोड होऊ नये, यासाठी जनजागृती केली. नुकताच बदलापूर परिसरातील शेतकर्‍यांसाठी कृषी मेळावा आयोजित करून जनजागृती केली. प्रत्येक शेतकर्‍याने जांभळाची किमान पाच झाडे लावावीत, असे आवाहन केले.”
 
 
“10 हेक्टर क्षेत्रावर बदलापूर जांभूळ वन विकसित होणार”- आदित्य गोळे

“बदलापूर व परिसरात उपलब्ध असलेली पडीक जमीन, बदलापूर जांभूळ फळपिकास अनुकल असलेल्या हवामानाचा विचार करून आम्ही जांभळाचे क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न करीत होतो. त्यासाठी कृषी विभाग, वन विभाग यांच्याशी व इतर संस्थांशी संपर्कात होतो. वन विभागाने याविषयी अनुकूलता दर्शवत चामटोली या गावात 10 हेक्टर क्षेत्रावर बदलापूर जांभूळ वन विकसित करणार आहे. या क्षेत्रावर जांभळाची दर्जेदार रोपे कशी उपलब्ध होतील, यासाठी आम्ही वन विभागाला सहकार्य करणार आहोत. या चळवळीत स्थानिक शेतकरी, मजूर, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था कशा जोडल्या जातील यासाठी प्रयत्नशील आहोत”

- मुख्य विश्वस्त, जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्ट, बदलापूर

संपर्क - 9096442984

  
बदलापूर जांभळाला भौगोलिक मानांकन
 
 
बदलापूरच्या जांभळाला ‘जिऑग्राफिकल इंडिकेशन’ (जीआय) अर्थात भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्यामुळे या जांभळाचे भविष्य बदलण्याची शक्यता आहे.
 
 
याबाबत सांगताना अदित्य गोळे म्हणाले, “बदलापूर जांभळाला भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी आम्ही जेव्हा प्रयत्न करू लागलो, तेव्हा लक्षात आले की या क्षेत्रात खूप व्यापक काम करण्याची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी कृषी विद्यापीठालाही बदलापूर जांभळाविषयी निश्चित माहिती नव्हती. त्यानंतर व्यापक कार्य हाती घेऊन प्रा. गणेश हिंगमिरे यांच्या माध्यमातून बदलापूर जांभळाला ’जी.आय.’ मानांकन मिळवून दिले. या भौगोलिक मानांकनामुळे बदलापूर व परिसरातील शेतकरी, आदिवासी, कातकरी समाजबांधवांनी जांभळाचे अधिकृत उत्पादक म्हणून नोंदणी केली, तर किंवा भौगोलिक चिन्हांकनासह जांभळाची विक्री केली, तर वाजवी दरात मालाची विक्री करता येईल. या गोष्टींमुळे स्थानिक जांभूळ उत्पादकांचा अर्थार्जनाचा मार्ग सुकर होण्यास मदत होणार आहे.
 
 
भाभा अणुशक्ती संशोधन संस्थेच्या अहवालानुसार बदलापूर जांभळात ’अ‍ॅथोसायनीन’ आणि ’अ‍ॅटी-ऑक्सिडंट’ गुणधर्म आढळून आले आहेत. त्यामुळे हे जांभूळ गुणवत्तापूर्ण मानले जात आहे. जांभूळ हा मधुमेहावर रामबाण उपाय समजला जातो. मात्र जांभूळ लागवडीतून शाश्वत शेती विकासाच्या संधी आहेत, हे बहुतांश शेतकर्‍यांना माहीत नाही. त्यासाठी शेतकर्‍यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी कृषी विभागाने व्यापक कार्य हाती घेतले पाहिजे.”
 

badalapur 
 
असे होतेय जतन व संवर्धन
 
 
बदलापूर जांभळाचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने आशिष गोळे, अरविंद गोळे, धनंजय गोळे, विलास देशमुख व इतर लोक पुढे सरसावले आहेत. आशिष गोळे हे निसर्गप्रेमी असून त्यांनी आपल्या खाजगी जागेत जांभळ्याची सात झाडे लावली आहेत. अरविंद गोळे हे गेल्या दोन दशकांपासून बदलापूर जांभळाची खरेदी करून नातेवाइकांना भेट म्हणून देतात, तर धनंजय गोळे जांभूळ बियाणे संकलनात अग्रेसर आहेत. यंदाच्या हंगामासाठी त्यांनी जांभळाची 1 हजार रोपे तयार केली आहेत.
 
 
विलास देशमुख हे स्वत: शेतकरी असून त्यांच्याकडे बदलापूर जांभळाची 25 झाडे आहेत. विलास देशमुख सांगतात, “कारकगाव येथे माझी साठ एकर शेती आहे. आंबा, चिकू या फळपिकांसह 50 वर्षांपूर्वीची बदलापूर जांभळाची 25 झाडे आहेत. यंदा उशिरा फुलोरा आला. त्यानंतर वादळी पाऊस आला. जांभळाचे उत्पादन घटले. त्यात जांभळाच्या फांद्या लवचीक असतात, तुटण्याची भीती असते. त्यात मजुरांची संख्या घटली आहे. उंच झाडावर चढून कोणी जांभळे काढत नाही. यंदा जेमतेम 15 ते 20 हजाराचा नफा निघू शकला.”
 
 
जांभळाला ‘मधुबना’ची जोड
 
 
जांभळाचा मध आणि मेण हे औषधी असतात. बदलापूरच्या जांंभळाचे मूल्यवर्धन व्हावे, यासाठी एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळ बदलापूर परिसरात मधुबन प्रकल्प विकसित करणार आहे. या संदर्भात महामंडळाच्या अधिकार्‍यांनी बदलापूर परिसराला नुकतीच भेट दिली आहे.
 
 
महामंडळाकडून स्थानिक शेतकरी, आदिवासी बांधवांना त्यांच्या शेतात मधुमक्षिका पालन करता यावे यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींना मधमाश्यांच्या पेट्या दिल्या जाणार आहेत. त्यातून तयार होणारा मध आणि मेण महामंडळ हमीभावाने खरेदी करणार आहे, अशी आदित्य गोळे यांनी माहिती दिली.
 
 
आदिवासींचा कल्पवृक्ष असलेल्या जांभळाच्या फळापासून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तत्पूर्वी बदलापूर जांभूळ दुर्मीळ होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून व कृषी विद्यापीठांकडून जांभूळ उत्पादकांना संरक्षण देण्याची गरज आहे.
 
 

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.