गरिबांची भाकर म्हणून ओळखली जाणारी नाचणी हे शेतकर्यांना श्रीमंती मिळवून देणारे पीक आहे. नाचणी हे कोकणातील पारंपरिक पीक आहे. त्यामुळे पितांबरीच्या तळवडे विभागाच्या राजापूर ठिकाणी मागील चार वर्षांपासून प्रायोगिक तत्त्वावरनाचणीचे उत्पादन घेतले जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात नाचणीची पाच एकरांवर लागवड होणार असून एकरी 35 क्विंटल उत्पादन काढण्याचे उद्दिष्ट आहे.
गेल्या दोन-तीन दशकांपासून नगदी पिकांकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे पौष्टिक श्रीधान्यांची लागवड कमी झाली आहे. श्रीधान्यांबाबत जनजागृतीसाठी भारताच्या संकल्पनेनुसार संयुक्त राष्ट्र संंघातर्फे 2023 हे ’आंतरराष्ट्रीय श्रीधान्य वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना श्रीधान्यांचे महत्त्व समजत आहे. असे असले, तरी श्रीधान्यांच्या लागवडीसंदर्भात शेतकर्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे.
माझ्या लहानपणापासून मी नाचणीची शेती पाहत आलोय. नागलीची भाकरी आणि आंबिलची चव आजही माझ्या ओठांवर आहे. मधुमेहींसाठी नाचणी ही वरदानच. अनेक वर्षांपासून आमच्या घराच्या शेतात खरीपात भाताची व नाचणीची लागवड केली जाते. नाचणी हे एक वैशिष्ट्यपूर्ण पीक आहे. नाचणीला ’नागली’ असेही म्हटले जाते. कोकणात ’हळव्या’, ’पितरपटा’, ’निमगरवी’ अशा नाचणीच्या स्थानिक जाती आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानेही स्थानिक वाणांतून ’दापोली-1’, ’दापोली-2, ’कोकण सफेद’ या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.
गेल्या चार वर्षांपासून आम्ही पितांबरीच्या तळवडे विभागाच्या राजापूर ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर नाचणीचे उत्पादन घेत आहोत. पहिल्या वर्षी पाच गुंठ्यांत लागवड केली. त्यानंतर लागवड क्षेत्र वाढविण्यात आले. पहिल्या वर्षी ’हळव्या’ या स्थानिक जातीची निवड केली. लागवडीसाठी ठोंबा पद्धत (रोप उताराच्या आडव्या दिशेने ठोंबा पद्धतीने ओळीत उथळ आणि उभी लावणे) अंगीकारली. हळव्या जातीची रोपे 21 दिवसांची झाल्यानंतर 22.5 से.मी. ु 10 से.मी. अंतरावर पुनर्लागवड केली. लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया केली. त्यासाठी प्रतिकिलो तीन ग्रॅम थायरम, 25 ग्रॅम अॅझोस्पिरिलम ब्रासीलेन्स आणि 25 ग्रॅम अॅस्परजिलस ओवोमोरी जीवाणू संवर्धकांची प्रक्रिया केली.
बियाणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीतील ’दापोली 1’ या सुधारित जातीचे 100 ते 110 कमी कालावधीत परिपक्व होणारे (दिवस) तसेच 15 ते 20 (क्विंटल) धान्य उत्पादन क्षमता आणि विशेष गुणधर्म मध्यम खोल जमिनीस योग्य व उत्पादनक्षम जात, रासायनिक खतास व व्यवस्थापनास प्रतिसाद देणारी जात निवडली होती.
पिकाची लागवड करण्यापूर्वी पहिल्या पावसानंतर हलक्या लोखंडी नांगराने शेताची आडवी नांगरणी केली. नंतर धस्कटे वेचून जमीन स्वच्छ केली. पुनर्लागवडीपूर्वी प्रतिहेक्टरी पाच टन गोमय शेणखत जमिनीत मिसळले. हेक्टरी 25 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 25 किलो पालाश अशा अन्नद्रव्यांची मात्रा दिली. साधारणपणे दोन वेळा खुरपणी केली. शिवाय 20 ते 25 दिवसांपर्यंत विरळणी करून एका जागी एकच जोमदार रोप ठेवली.
करपा, काणी, पानावरील ठिपके व केवडा हे रोग नाचणीवर पडतात. यापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही रोगविरहित बियाणे पेरणीकरिता वापरल्याने रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला. तुरळक प्रमाणात रोग आढळून आले होते. व्यवस्थापनामध्ये रोगट रोपे उपटून नष्ट केली. तसेच कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रतिकिलो बियाणास प्रक्रिया केली.
नाचणी पीक तयार झाल्यावर कणसे विळ्याने कापून उन्हात वाळवून नंतर काठीने मळणी केली. नंतर वरावणी करून चांगले दाणे वेगळे करून हेच पुढील हंगामात बियाणे म्हणून वापरले. पहिल्या वर्षी पाच गुंठे क्षेत्रातून समाधानकारक उत्पन्न मिळाले नाही. गतवर्षी एक एकरामध्ये 6.8 क्विंटल नाचणीचे उत्पादन घेतले.
नाचणी हे अत्यंत औषधी गुणधर्म असलेले पीक आहे. त्यामुळे नाचणीला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामात 5 एकरांवर नाचणीची लागवड करण्याचा निर्धार केला आहे. त्यामधून 35 क्विंटल नाचणीचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. मुख्य म्हणजे नाचणी हा उत्तम पौष्टिक आहार आहे. या आहाराबाबत नागरिकांमध्ये सजगता वाढली आहे. त्यामुळे नाचणी ग्लोबल झाली आहे. त्यामुळे नाचणी हे गरीब शेतकर्यांना श्रीमंती मिळवून देणारे पीक ठरणार आहे. ही संधी ओळखून आम्ही येत्या काळात नाचणी प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहोत.