रविवारी मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. यामध्ये फारसे काही नवीन्य नसल्याने मीडियानेसुद्धा त्याचा जास्त गाजावाजा केला नाही. पण यातील लक्षवेधी ठरणारी घोषणा झाली, ती म्हणजे काँग्रेस आता पालिका निवडणुका महाविकास आघाडीतच काँग्रेस लढविणार... भाई जगताप अध्यक्ष झाल्यापासून आजवर पालिका निवडणूका स्वबळाचा लढण्याचा नारा देणार्या भाईंची वज्रमूठ एवढी का सैल झाली? याचीच चर्चा आता रंगू लागली आहे...
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा होत आहेत. त्यातील एक सभा रविवारी महाराष्ट्र दिनी मुंबईतील बीकेसीच्या मैदानात झाली. आजवर झालेल्या वज्रमूठ सभांमधील ही सर्वात मोठी सभा म्हणता येईल. मुंबई हा उद्धव सेनेचा बालेकिल्ला, त्यामुळे गर्दी जमवण्याचे मोठे आव्हान उबाठा सेनेपुढे होते. उबाठा सेनेने अगदी योग्यरित्या यशस्वीपणे ते आव्हान पार पाडले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यासाठी सेनेने अगदी शाखास्तरावर बैठका घेऊन नियोजन केले होते. त्यामुळे गर्दी जमवण्यात सेनेची झाकली मूठ सव्वा लाखाची होती. या अगोदर झालेल्या वज्रमूठ सभा आणि ही सभा यात नवीन असे काहीच दिसत नव्हते. अगोदरच्या सभेतील भाषणे, तेच आरोप, तीच थोडीफार बदल केलेली सर्व पक्षांतील नेत्यांची भाषणाची स्क्रिप्ट होती. उद्धव ठाकरेंनी तर खेड, जळगाव, नागपूरच्याच भाषणांची तीच स्क्रिप्ट पुन्हा वाचली. मिंधे, गद्दार, खोके, ओके हे त्यांचे ठरलेले भाषण करून सभेत रंग भरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यामध्ये नवीन असे काहीच नव्हते, होती ती फक्त जागा... यामध्ये एक भाषण लक्षवेधी, तसेच दखल घेण्याजोगे झाले ते म्हणजे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगतापांचे! एरवी भाषण असो वा टीव्हीवरील चर्चा, भाई नेहमीच गोल गोल बोलणारे, विषयपासून भरकटणारे असेच असते. पण वज्रमूठ भरसभेत भाई अगदी मेणाहून मऊ होऊन त्यांनी भर सभेत सांगितले की, काँग्रेस एक पाऊल मागे जाईल, पण भाजपाच्या पराभवासाठी आम्ही युती करणार आहोत. या त्यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ माजली आहे. भाई जगताप यांना जेव्हा मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे दिली, तेव्हापासून ते शिवसेनेला अंगावर घेत आहेत. महाविकास आघाडी असूनही मुंबईत कार्यकर्त्यांच्या मनातील भावनांना ते स्थान देत होते. कारणही तसेच होते. सामान्य कार्यकर्ते असताना जगताप हे शिवसेनेशी दोन हात करीत मोठे झालेले नेते आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेशी लढताना पाहिलेले आहे. हा लढा संघर्षाचाही होता आणि कार्यकर्त्यांच्या जिद्दीचाही होता. कारण मुंबईत आक्रमक शिवसैनिकांपुढे तग धरून राहणे हे मोठ्या धैर्याचे काम होते. पण त्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि पक्षाला बळ दिले. अगदी 2014पर्यंत काँग्रेसचे 80पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येत होते. काँग्रेसचे पाच खासदार, 20पेक्षा जास्त आमदार मुंबईतून निवडून जायचे. मोठे संघटन, कार्यकर्त्यांची फळी होती. पण 2014नंतर काँग्रेसची अवस्था एवढी बिकट झाली असली, तरीही काँग्रेसचे अस्तित्व नाही असे म्हणता येणार नाही.
काँग्रेसला वाढवण्याचे काम भाई जगताप अगदी व्यवस्थित करीत होत. पण कालचे त्यांचे वक्तव्य कार्यकर्त्यांना नक्कीच धक्का देणारे आहे. अगदी डिसेंबर महिन्यात मुंबई काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या 138व्या स्थापनादिनानिमित्ताने मेळावा आयोजित केला होता. त्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकर्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला होता. पण पाच महिन्यांत शिवसेना आणि काँग्रेसची जवळीक अधिकच वाढत गेली आहे. अगदी राहुल गांधींच्या भारत जोडोमध्ये आदित्य ठाकरे समील होणे, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला येणे, अगदी काही दिवसांतच राहुल गांधीसुद्धा मातोश्रीला भेट देणार असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचे भाजपाला आव्हान देण्यासाठी मुंबईत युतीचा सूर आळवला आहे, असे दिसते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसची संदिग्ध भूमिका आहे. त्यामुळे शिवसेनेशी जवळीक करणे काँग्रेसला अधिक जवळचे वाटू लागले आहे. त्यामुळे भाजपाविरोधात मोट बांधताना उबाठाचा उपयोग होईल, असे समीकरण आहे. त्यामुळेच मुंबई पालिकेसाठी शिवसेनेसोबत जाण्याची घोषणा केली आहे. मात्र यामुळे शिल्लक राहिलेल्या काँग्रेसचेही अस्तित्व शून्य होण्याची शक्यता नाकराता येत नाही. कारण काँग्रेसचे आजच्या घडीला संपूर्ण 227 वॉर्डांमध्ये काँग्रेसचे नेटवर्क आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी आहे, त्याचबरोबर काँग्रेसला मतदान करणारा एक मतदार मुंबईत आहे. त्यामुळेच 2017च्या पालिका निवडणुकीत केंद्रीय नेतृत्वाने लक्ष न देऊनसुद्धा काँग्रेसचे 25 नगरसेवक निवडून आले, मतदानाची टक्केवारीसुद्धा चांगली होती. अशा स्थितीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढले तर मुंबईत काँग्रेसच्या पदरात किती जागा मिळतील? योग्य तो न्याय न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या नाराजीला व बंडखोरीला तोंड द्यावे लागेल... याची कल्पना भाईंना नसेल असे नाही. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून पालिकेची निवडणूक लढविणार याची भाईंनी किती आनंदाने घोषणा केली, हे येणार्या काळात पाहणे औसुक्याचे ठरेल.