समलैंगिकता ही कायम विकृतीच असते असं नाही. ती एक पूर्णत: नैसर्गिक आणि जन्मजात असलेली प्रवृत्ती असू शकते. परंतु या सर्वांना काहीतरी कायदेशीर संरक्षण नको का? शिवाय या गोष्टींचा गैरफायदा घेणार्या संस्थांविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे. आपली कुटुंबव्यवस्था अधिक मजबूत केली पाहिजे. या विषयावर देशहिताच्या दृष्टीने विचारमंथन चालू करू शकतो, यासाठी हा लेखनप्रपंच.
भारतात G20 अध्यक्षतेखाली चालू असलेल्या C20 आयामात विवेकानंद केंद्रातर्फे डायव्हर्सिटी इन्क्लुजन म्युच्युअल रिस्पेक्ट या कार्यगटात LGBTQIAF+ या विषयासंदर्भातील काम मी पाहते आहे. याविषयी मला जानेवारी 2023आधी फारशी माहिती नव्हती, म्हणून खास C20साठी LGBTQIAF+ या विषयात काम करणार्या संस्था, त्या समाजातील प्रत्यक्ष व्यक्ती, अशा व्यक्तींचे पालक, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती अशांशी बोलून, त्याचप्रमाणे परदेशात या विषयात काय चालू आहे याची इंटरनेटच्या माध्यमातून, ट्विटर, यूट्यूब इ.च्या माध्यमातून माहिती घेण्यास सुरुवात केली. मला जी काही थोडीफार माहिती मिळालेली आहे, (ती परिपूर्ण आहे असा माझा दावा कुठेही नाही, पण) त्याआधारे आपण या विषयावर देशहिताच्या दृष्टीने विचारमंथन चालू करू शकतो, असं मला वाटतं म्हणून हा लेखनप्रपंच.
समलिंगी कोण? ही व्याख्या आता सगळ्यांना माहीत आहेच, त्यामुळे त्यात जास्त न जाता समलैंगिकतेची कारणं याविषयी अधिक ऊहापोह व्हावा असं मला वाटतं, म्हणजे मग समलैंगिक विवाहांना मान्यता द्यावी की न द्यावी की त्याबाबत काही वेगळा अॅप्रोच घ्यावा, या दिशेने चर्चेस न्याय मिळेल. याबाबत या सगळ्यांशी माझ्या ज्या काही चर्चा झाल्या, त्यावर आधारित माहिती आणि माझं त्यावरील मंथन लिहिते आहे.
काही गोष्टी मला येथे नमूद कराव्याशा वाटतात. C20च्या नागपूरच्या सेमिनारमध्ये किंवा इतर ठिकाणी चर्चा करतानादेखील पाहिलं की लोक या विषयाला हात लावायला धजावत नाहीत. या विषयाची माहिती घेण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क साधला असता फार कमी लोकांनी याबाबत माझ्याशी बोलण्यास उत्साह दाखवला. असंही लक्षात आलं की त्यातील अनेकांनी याकडे दुर्लक्षही केलेलं आहे. पण आपण डोळेझाक केल्याने प्रश्न संपत नसून तो वाढत जातो आणि आपल्याला वाटतं की प्रश्नच नाहीये. मी आशावादी आहे की मला या विषयावरील वैद्यकीय बाजू समजून घेण्यास जास्तीत जास्त वैद्यकीय व्यावसायिक मदत करतील. त्याचबरोबर मी उजव्या विचारसरणीच्या संघटनेची असल्याने या क्षेत्रात काम करणार्या काही संघटनांनी, व्यक्तींनी मला भेटण्यास सरळ न-कार दिला. तरीही अतिशय मोकळ्या मनाने काही जणांनी मला वेळ देऊन माझ्याशी या विषयाबाबत बोलले, यासाठी मी त्या सगळ्यांचीच ऋणी आहे. काही ठिकाणी मी ऑथेंटिसिटीसाठी व्यक्तींची नावं टाकलेली आहेत, त्यात त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास व्हावा असा उद्देश नाही. काही संस्थांची नावं त्यांचे बुरखे फाडण्यासाठी आणि इतरांना सावध करण्यासाठी लिहिणं क्रमप्राप्त आहे. हे सगळं देशहितासाठी जेन्युइनली बाहेर यावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि त्यासाठी माझ्या मनाने मला कौल दिला, म्हणून हे लिहिण्याचं धाडस. खरं तर याविषयी माझ्याकडे बरीच इतरही माहिती आहे, पण जागेअभावी आणि विषयाचा फोकस वेगळा असल्याने ती इथे देत नाहीये, इतकंच. पण देशहितासाठी आपली जागरूकता वाढवणं, अभ्यास वाढवणं महत्त्वाचं आहे.
सर्वप्रथम मी पुण्यातील मानसोपचारतज्ज्ञ (सायकिअॅट्रिस्ट) डॉ. सुचित्रा अग्रवाल यांच्याशी बोलून याची वैद्यकीय बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सांगण्यानुसार जेव्हा स्त्री गरोदर राहते, तेव्हा X आणि XY यांच्यामार्फत गर्भाचं लिंग ठरतं. पण पुढील नऊ महिन्यात दर तीन महिन्यांनी एकदा असं तीन वेळा हार्मोनल सिक्रीशन होऊन त्याप्रमाणे बदल होत असतात. आता या हार्मोनल सिक्रीशनमध्ये गडबड झाली, तरी पुढे काही काही वेगळं घडू शकतं. यात गर्भारशी स्त्री काय खाते-पिते, तणावाखाली असते का? काय पाहते? काही औषधे घेतली असतील.. इ.चाही हार्मोनल सिक्रीशनवर परिणाम होऊ शकतो. याचबरोबर काही वेळा जेनेटिकलीदेखील काही बदल होतात. आता या संदर्भात खूप संशोधन उपलब्ध नाही. त्यामुळे अशी LGBIA मुलं नक्की कशामुळे जन्माला येतात, याची वैद्यकीय ठोस कारणं सांगता येत नाहीत. असं संशोधन थोडं जिकिरीचं आणि किचकटही असतं. पण या संदर्भात संशोधन करून रिपोर्ट्स उपलब्ध करून दिले, तर ज्यांची मुलं अशी आहेत अशा पालकांना आनंदच होईल आणि पुढे जन्माला येणार्या मुलांसाठी काय काळजी घ्यावी हेदेखील समजेल. त्यामुळे समलैंगिकता ही कायम विकृतीच असते असं नाही. ती एक पूर्णत: नैसर्गिक आणि जन्मजात असलेली प्रवृत्ती (एखादी व्यक्ती डावखुरी असणं जितकं नैसर्गिक असतं, तितकी) असू शकते. पण असंही 100% नसतं.. ते कसं, हे पुढे स्पष्ट होईलच.
मूल जन्माला आल्यानंतरही थोड्या हार्मोनल गडबडीस पूरक असं सामाजिक वातावरण, घटना यांना जर त्याला सामोरं जावं लागलं, तर मूल समलैंगिकतेकडे झुकण्यावर त्याचाही परिणाम होत असतो. उदा., उडान ट्रस्टच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितलं की लहान मुलांना जास्त कुरवाळल्याने किंवा घरातील अथवा बाहेरील कुणा मोठ्या परिचित व्यक्तीकडून लहानपणी अत्याचार झाल्याने/होत असल्यानेदेखील काही मुलं समलैंगिकतेकडे नकळत वळतात. समजा, जन्मत:च मुलगा असलेल्या एखाद्या व्यक्तीची चाल, हातवारे, हावभाव मुलीसारखे असले आणि त्याला घरात, बाहेर, शाळेत किंवा मित्रांमध्ये त्यावरून बोल लावले गेले, तरी त्या मुलाच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हेच मुलीच्या बाबतीतही घडू शकतं. मुलींबाबत लहानपणापासून त्यांच्यावर एक मुलगी म्हणून अन्याय होत असेल, बोल लावले जात असतील तर तिच्या मनात मुलं किंवा पुरुष यांच्याविषयी आढी बसून ती मुलगी समलैंगिकतेकडे वळू शकते किंवा कुणावर मोठ्या व्यक्तीकडून अत्याचार झाले असतील, पुरुषी बांधा, हातवारे यावरून चिडवलं जात असेल, तरीही अशा मुलींचा कल समलैंगिकतेकडे जाऊ शकतो. दिल्लीतील Inclusion at Connecting Dreams Foundationच्या डायरेक्टर सिमी मिश्रा यांच्याशी बोलताना या सगळ्याला पुष्टी झाली. ही संस्था LGBTQIAF+ या कम्युनिटीतील व्यक्तींसाठी त्यांच्यात उद्योजकता वाढीसाठी काम करते. यामुळे मला असं वाटतं की जन्माला आलेल्या मुलांना पालकांनी एक सुरक्षित कौटुंबिक वातावरण देऊन त्यांच्यावर अन्याय होऊ न देणं, त्यांच्यावर अत्याचार होणार नाहीत याची काळजी घेणं, त्यांना बॉडी शेमिंगला, उपहासाला सामोरं न जावं लागणं या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे.
एका समुपदेशक मैत्रिणीशी (ईशा ढमढेरेशी) बोलताना तिने समुपदेशन करत असलेल्या एका केसविषयी सांगितलं. एक मुलगा थोडा उफाड्या छातीचा असल्याने त्याच्या शाळेतील वर्गातील मुलंच त्याला त्रास देत होती. हे त्रास देणं इतकं टोकाचं झालं की त्या मुलांनी घरी बोलावून त्याच्यावर अत्याचार केला. हा मुलगा एकदम गप्प गप्प आणि कायम आईच्या मागे लपायचा. कुणाशीही बोलायला घाबरत असे. घराबाहेर पडण्यास घाबरत असे. अतिशय डिप्रेशनमध्ये राहत असे. समुपदेशन करताना ईशाताईंना या सर्व गोष्टी समजल्या. सतत समुपदेशनाने त्यांनी त्याचा आत्मविश्वास बराच परत आणण्यास मदत केली. आता तो मुलगा संगणकशास्त्राच्या दुसर्या वर्षात शिकतोय, पण तरीही अजूनही तो फारसं कुणाशी बोलायला जात नाही. आता जर या मुलाचं समुपदेशन झालं नसतं, तर हा मुलगा समलैंगिकतेकडे नक्कीच वळला असता. म्हणजे समलैंगिकतेकडे कल हा तात्कालिकदेखील असू शकतो. ज्या वेळी अशा प्रकारचा त्रास देणं जास्त होतं आणि त्यात हार्मोन्समधील बदलही तीव्र असतील, तर मग अशा मुलांचा कल केवळ समलैंगिकतेकडे न राहता त्यांना आपण लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया करावी असंही वाटण्यात होतो. यातूनच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांसारख्या ट्रान्स वूमन तयार होतात. अशोक रावकवी या स्वत: गे असलेल्या व्यक्तीशी बोलताना लक्षात आलं की त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांना याची जाणीव होण्यास सुरुवात झाली. त्यांचे वडील ओपन माइंडेड असल्याने त्यांनी त्यांना या बाबतीत वाचण्यास पुस्तकं दिली आणि त्यांना पाठिंबा दिला. अशोक रावकवी ही स्वत: शिकलेली आणि यूएनमध्ये गे लोकांचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहे. पण सगळेच त्यांच्यासारखे नशीबवान नसतात. अनेक पालकांना आपलं मूल समलिंगी आहे हे पचवणं खूप अवघड जातं. मुंबईतील स्वीकार संस्थेच्या अरुणा देशमुख यांनी आपल्या गे मुलाचा स्वीकार अतिशय सहजपणे केला आणि समाजातील इतर पालकांनाही त्या याबाबत मदत करतात.
हे इथपर्यंतच मर्यादित नाहीये. यात अनेक गैरप्रकारही चालू आहेत. अमेरिका-कॅनडातील काही राज्यांतील शाळांत तर केजीमधील मुलांना “तू कोण आहेस असं तुला वाटतंय?” असा प्रश्न विचारून त्यांचं स्वत:चं जेंडर सिलेक्ट करण्यास सांगतात. मग त्याप्रमाणे त्यांच्यासाठी सर्वनामाचा वापर चालू करतात. यामुळे स्मार्टफोन्स, व्हिडिओ गेम्स, सोशल मीडिया यामुळे आधीच भांबावलेली आणि भावना चाळवलेली मुलं पुरती गोंधळून जातात. मग 11-12 वर्षांची होईपर्यंत लिंगपरिवर्तनाच्या अपरिवर्तनीय शस्त्रक्रिया करून घेतात. काही प्युबर्टी ब्लॉकर्स घेतात. पालकांना या सगळ्याची कल्पना नसते, किंबहुना पालकांना यात काहीही करताच येत नाही, कारण तो त्यांच्या मुलाचा-मुलीचा पूर्णपणे व्यक्तिगत मामला होतो. परदेशात अशा प्रकारच्या लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर्सना पूर्णपणे मुभा दिलेली असते. कॅनडातील सेलिब्रेटी समुपदेशक जॉर्डन पीटरसन यांनी Chloe Cole (क्लोई कोल) या कॅलिफोर्नियातील 18 वर्षीय डीट्रान्झीशनमध्ये असलेल्या मुलीची घेतलेली मुलाखत पाहा -
https://www.youtube.com/watch?v=6O3MzPeomqs. तिची मुलाखत पाहिल्यावर हे लक्षात येतं की तिचे खांदे मुलासारखे रुंद होते आणि मुली तिला सुरुवातीपासून चिडवत असत, म्हणून ती शाळेत मुलांबरोबरच असे. स्मार्टफोन, सोशल मीडिया (विशेषत: इन्स्टाग्राम) याचा परिणाम असा झाला की तिथे जेंडर डिस्फोरिया किंवा लिंग परिवर्तनासंदर्भात ज्या गोष्टी दिसत असत, ती वाचत असे. त्यातून तिला वयाच्या 12व्या वर्षी आपणही लिंगपरिवर्तन करून घ्यावं असं वाटू लागलं. तिने त्याप्रमाणे डॉक्टरकडे जाऊन हार्मोन्स घेतली, स्वत:वर दोन शस्त्रक्रिया करून घेतल्या. हे सगळं करून आपण चुकलो आहोत, अशी तिला वयाच्या 16व्या वर्षी जाणीव झाली. पण परतीचे दोर नव्हतेच आणि आयुष्याचं जे काही नुकसान व्हायचं ते झालेलं होतं. तिचा अनुभव सांगताना तिला रडायला येत होतं. ती म्हणते, “शस्त्रक्रियांच्या परिणामांबद्धल मला डॉक्टर्सनीही फारसं काही सांगितलं नाही आणि मी तोपर्यंत कधी कुणाबरोबर समागम केलेलादेखील नव्हता. त्यामुळे हे सगळं काय चालू आहे, मी स्वत:च्या शरीराचं काय नुकसान करून घेतेय याची मला स्वत:लाच काहीही कल्पना नव्हती. 16व्या वर्षी डिप्रेशन जाणवायला लागल्यावर मी मानसोपचारतज्ज्ञांकडे गेले, तर त्यांनी मला फारसं गांभीर्याने न घेता अँटीडिप्रेसंट्स देण्यास सुरुवात केली. या सगळ्यामुळे माझा त्रास आणखीनच वाढलाय. वयाच्या 18व्या वर्षी मी स्वत:ला 50-55 वर्षाची असल्यासारखं फील करतेय.” समलैंगिकता नैसर्गिक असते याचे टोकाचे निष्कर्ष काढून जेव्हा हे सगळं अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळलं जातं, तेव्हा क्लोई कोलसारख्या केसेस तयार होतात. सध्या कॅलिफोर्नियात, कॅनडात अशांची लाट आलेली आहे.
मग तुम्ही म्हणाल, याचा भारताशी काय संबंध? आहे, याचा भारताशीदेखील संबंध आहेच. कारण जे तिथे चालू होतं, ते भारतात येण्यास वेळ लागत नाही. आपल्याकडेही जेंडर सेन्सिटायझेशन, जेंडर स्टिरिओटाइप्सना विरोध, मस्क्युलॅनिटीला विरोध या नावाखाली MAVA (Men Against Violence and Abuse) (
http://www.mavaindia.org/) सारख्या संस्था, ज्यांचे संस्थापक हरिष सदानीसारखे टीआयएसएसमधील शिकलेल्या व्यक्ती असतात, ते गैरवापर करून घेतात. मावा आसाममधील 8वी ते 12वी या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यासाठी, तसंच तरुण पुरुषांसाठी ‘प्रोजेक्ट मानुष’ नावाखाली स्त्रियांवरील अत्याचाराला विरोध, जेंडर सेन्सिटायझेशन, जेंडर स्टिरिओटाइप्सना विरोध, मस्क्युलॅनिटीला विरोध या संदर्भात तीन वर्षांचं ओरिएंटेशन करून यांचं पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करतात. अशी मुलं स्वत:ला आपण चुकीच्या शरीरात आहोत असं समजू लागतात आणि स्वत:ची लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया करून घेतात. अशा परिवर्तन केलेल्या मुलांना, तरुणांना हे लोक ‘मेन विथ सबस्टन्स’ असं नाव देतात. तरुण मुलांना आणि पौंगंडावस्थेतील मुलांना लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार करून नक्की कोणतं विमेन एम्पॉवरमेंट साधलं जाणार आहे? याची कल्पना नाही; पण हे मात्रं नक्की की अशा लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रिया करून घेणार्या पुरुषांची संख्या वाढली की आगामी 10-20 वर्षांतील जनगणनेतील संख्येवर त्याचा नक्की परिणाम दिसेल. हे फक्त आसाम, मेघालय, मिझोराम, नागालँडमध्ये चालू नसून अगदी दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू यांसारख्या शहरांतही चालू आहे. “अशा गोष्टींची तुम्हाला माहिती आहे का?” असं मी अशोक रावकवी यांना विचारलं, तर ते म्हणाले, “अनफॉर्च्युनेटली हे सर्व चालू आहे. हरिष सदानीसारखे अनेक आहेत, जे अशा संस्था चालवत आहेत. या संस्थांकडून लहान मुलांना ड्रग्जही पुरवले जातात.” या सगळ्या गैरप्रकारांमुळेच त्यांनी या लोकांबरोबर काम करणं सोडून दिलं. भारतातील काही - उदा., रोहिणी निलकेणी फिलॅन्थ्रॉपीज, तर सर्वाधिक अमेरिकेतील फोर्ड फाउंडेशन, DAWN (Direct Action for Women Now) Worldwide, Jackson Katz, USA, Dr. Caroline Heldman, The Representation Project, USA यांसारख्या संस्थांमार्फत या सगळ्यांना पैसा येतो आहे.
बरं, मग याचा समलैंगिक विवाहाच्या मान्यतेशी काय संबंध? सांगते. एकूणच वरील सर्व व्यवस्थित वाचल्यावर एक गोष्ट लक्षात येईल की समलैंगिकता ही नैसर्गिक असली, तरी त्याचा गैरपद्धतीने वापर करून घेणारेच जास्त वाढलेले आहेत आणि समाजाचं थेट नुकसान करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आहे. यातील जेन्युइन लोकांना याचा फटका बसतो आहे. अमेरिका-कॅनडात याबाबत विरोध चालू झालेला असला, तरी आपल्याकडील या क्षेत्रात काम करणार्यांनाही हा प्रकार फारसा माहीत नाही. हे सगळं नक्की काय आहे याविषयी आपल्याकडे सामान्य लोकांना मुळात जागृती नसल्याने जे खरंच नैसर्गिकरित्या याचे शिकार आहेत, त्यांना समाजात याविषयी असलेल्या अज्ञानामुळे त्रास होतो. दुसर्या बाजूने मावासारख्या संस्था याचा गैरवापर करून घेत आहेत आणि त्याचीही जागृती जनतेमध्ये नाही. आज वयाची 30 वर्षं पार केलेल्या कोणत्याही मुलाला-मुलीला समलैंगिकता, LGBTQIAF हे सर्व माहीत असतं, कारण त्यांच्या अभ्यासक्रमांतच या गोष्टी आहेत. पण त्यांच्या पालकांनाच याबाबत फारशी माहिती नसते. तरुणांनी या सगळ्याचा मानसिकदृष्ट्या स्वीकार केलेला आहे. सरकारनेही समलैंगिकता बेकायदेशीर नाही असं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपही आपल्याकडे बेकायदेशीर नाही. त्यामुळे ज्यांचा मुळात समलैंगिकतेला एक विकृती म्हणून विरोध आहे, त्यांनी आणि इतरांनी समलैंगिक विवाहांना किंवा समलैंगिकतेला विरोध केला तरी जे तसे आहेत ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागणार.. एकत्र राहणार. ज्यांनी याचा स्वीकार केलेला आहे, ते यांना स्वीकारणार आहेत. म्हणजे तुमच्या विरोधाने हे बंद होणार नाहीये. पण परिणामी तुमच्या कुटुंबातच संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते. तुमची मुलंच तुमच्या विरोधात पवित्रा घेऊ शकतात. म्हणून विकृतीला स्वीकृती द्यायची का? तर तेही नाही. मग काय करायचं?
मुळात या बाबतीत आपलं मन, डोळे, कान उघडे ठेवून समाजात वावरायचं. याबाबत जागरूकता योग्य मार्गाने करून घ्यायची, पसरवायची. त्यासाठी आपणच काही पुढाकार घेतला, तर मावासारख्या राष्ट्रद्रोही आणि समाजद्रोही संघटनांना विकृत स्वरूपात हे पसरवण्यासाठी संधी मिळणार नाही. त्याचं प्रमाण कमी होईल. एकदा स्वीकार केला की या लोकांच्या जेन्युइन अडचणी लक्षात येऊ लागतील. एक माणूस म्हणून या सगळ्याचा अगदी तटस्थपणे विचार करावा. प्रत्येक माणसाला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, मायेची पाखर, दुसर्या माणसाची साथ याची गरज असते.. मग ते स्ट्रेट असू देत की समलैंगिक. मग अशांना एकत्र राहायचं असेल, तर त्यांना काहीतरी कायदेशीर संरक्षण नको का? त्यांच्या मुलांचं (अशी जोडपी सामान्यत: मुलं दत्तक घेतात) कायदेशीर हक्क अबाधित असायला हवेत की नकोत? अशा मुलांचा संपत्तीतील हक्कदेखील त्यांना नीट मिळायला हवा. काही वेळा केवळ संपत्तीस वारस कोणी नाही म्हणून दबावाखाली अशा लोकांचं भिन्नलिंगी व्यक्तीशी लग्न लावून दिलं जातं. मग ती व्यक्ती आणि ज्या दुसर्या व्यक्तीशी लग्न झालं आहे अशी व्यक्तीदेखील सुखाने राहू शकत नाहीत. बघा, या सगळ्याचा शांतपणे आणि सर्व बाजूंनी विचार करा. मला तरी असं वाटतं की समलैंगिक जोडप्यांच्या एकत्र राहण्याला ‘अदर लीगल मॅरेज अॅक्ट’ असा विचारपूर्वक तयार करून एक कायदेशीर सुरक्षा मिळवून दिली पाहिजे. आपण जेन्युइन लोकांना विरोध करण्यात आपली ऊर्जा खर्च करण्याऐवजी, या गोष्टींचा गैरफायदा घेणार्या संस्थांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना विरोध केला पाहिजे. आपली कुटुंबव्यवस्था अधिक मजबूत केली पाहिजे. आपल्या कुटुंबात मुलांना सुरक्षित आणि चांगलं मायेचं वातावरण मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्यातील काही शारीरिक गुणधर्मांवर उपहासाने ताशेरे न ओढता त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. यातून व्यक्ती, समष्टी, सृष्टी ते परमेष्टी अशा शाश्वत विकासास हातभार लावण्याचं काम आपण करायचं आहे.