जागृत हिंदू शक्तीचा अनुभव

विवेक मराठी    22-Apr-2023   
Total Views |

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दीकडे वाटचाल करीत आहे. संघ आपली शताब्दी कशी साजरी करणार, याची समाजाला उत्सुकता आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील बांधवांपर्यंत पोहोचून समर्थ, सक्षम, संघटित हिंदू समाज निर्माण करण्यासाठी काम करणार्‍या संघाच्या विरोधात राजकीय कारवाया सुरू आहेत. तामिळनाडूमधील संघसंचलनावर घालण्यात आलेली बंदी हे त्याचे एक उदाहरण आहे. संघाने या बंदीविरुद्ध न्यायालयीन लढाई लढली आणि संघाविरुद्ध पवित्रा घेणार्‍या तामिळनाडू सरकारला नामुश्कीला सामोरे जावे लागले.

vivek

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शताब्दीकडे वाटचाल करीत आहे. या प्रवासात संघाला अनेक अग्निदिव्यांतून पार पडावे लागले आहे. गांधीहत्येचे कारण पुढे करून पहिल्यांदा संघावर बंदी घातली गेली. त्यानंतर आणीबाणी पर्वात संघावर बंदी घालण्यात आली व संघस्वयंसेवकांना मिसाबंदी म्हणून तुरुंगात डांबण्यात आले. 1992 साली बाबरी ढांचा पाडल्यानंतर संघावर बंदी घालण्यात आली. अशा प्रकारे संघावर बंदी घालून संघाची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचप्रमाणे संघस्वयंसेवकांच्या हत्या करण्यात आल्या. केरळ व पश्चिम बंगाल राज्यातील राजकीय पक्षांनी स्थानिक संघस्वयंसेवकांची हत्याकांडे केली. ईशान्य भारतात संघप्रचारकांचे अपहरण करण्यात आले. अशा अनेक संकटांचा सामना करत संघ आजवर वाटचाल करीत आला आहे. संघाला विरोध का? या प्रश्नाचे उत्तर राजकीय आणि वैचारिक पातळीवर शोधायला हवे. संघ राष्ट्रीय विचारांचा प्रसार करतो, आग्रह धरतो. संघ सांस्कृतिक वारसा जपतो, नव्या परिप्रेक्ष्यात त्यांची मांडणी करतो. आणि या गोष्टीचा ज्यांना तिटकारा आहे, ते संघाच्या विरोधात उभे राहतात. यांचे अलीकडचे उदाहरण म्हणजे तामिळनाडू सरकारने संघाच्या संचलनावर घातलेली बंदी होती.
 
 
 
संघाचे पथसंचलन संघव्यवहारातील महत्त्वाचा भाग आहे. हिंदू समाजात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि स्वयंशिस्तीची व स्वयंशक्तीची परीक्षा घेण्यासाठी संघ पथसंचलन करत असतो. तामिळनाडूमध्ये 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी पन्नास ठिकाणी पंथसंचलन करण्याचे नियोजन स्थानिक संघस्वयंसेवकांनी केले होते. मात्र तामिळनाडूमधील विद्यमान द्रमुक सरकारने या पथसंचलनावर बंदी आणत परवानगी नाकारली होती. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. द्रमुकचा आजवरचा इतिहास हा सांस्कृतिक राष्ट्रवादाला विरोध करण्याचा आहे. एकाधिकारशाही आणि लांगूलचालन यांच्या आधाराने वाटचाल करणार्‍या द्रमुक पक्षाने संघाला विरोध का केला असावा? असा प्रश्न उपस्थित होतो. याचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे संघाचा वाढता प्रभाव. संघ राष्ट्रीय विचारांचा प्रसार करतो आणि त्याआधारे समाजाचे संघटन करतो. शतकाकडे वाटचाल करणारा संघ आजवर अभेद्य राहिला, तो याच कारणामुळे. संघाचा वाढता प्रभाव, वाढता जनाधार ही गोष्ट द्रमुक पक्षाला भीतिदायक वाटली नसेल तर नवलच. संघ वाढतो म्हणजे भविष्यात आपल्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होणारच. याच भीतीपोटी तामिळनाडू सरकारने संघाच्या कार्यक्रमावर बंदी घातली. पथसंचलन करण्यास परवानगी नाकारली.
 
 
 
या पार्श्वभूमीवर संघाचे स्वयंसेवक न्यायालयात गेले. आधी मद्रास उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली व शेवटी सर्वोच्च न्यायालयाने संघाच्या पथसंचलनास परवानगी दिली. या निकालानंतर तामिळनाडूमध्ये 16 एप्रिल रोजी 45 ठिकाणी संघाचे पथसंचलन झाले व त्याला अमाप प्रतिसाद मिळाला. संघाच्या दक्षिण तामिळनाडू प्रांतात 12306 तर उत्तर तामिळनाडू प्रांतात 8223 स्वयंसेवक गणवेशात सहभागी झाले; तर हे पथसंचलन पाहण्यासाठी सुमारे 33 हजार नागरिक उपस्थित होते. तामिळनाडूमधील संघस्वयंसेवक न्यायालयीन लढाई लढले आणि जिंकले. या लढाईने द्रमुक सरकारला धडा मिळाला आहे. मात्र संघ कुणाला धडा शिकवण्यासाठी काम करत नाही, तसा कोणताही अन्याय सहन करत नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.
 
 
 
तामिळनाडू सरकारने दंड घेऊन पथसंचलन करण्यास परवानगी नाकारली होती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही दंड घेऊन पथसंचलन करण्यास परवानगी दिली नाही, असे सरकारचे म्हणणे होते. पण न्यायालयाने दंड हा संघ गणवेशाचा भाग असल्याचे मान्य केले आहे आणि त्यानुसार सदंड पथसंचलन पार पडले आहे. तामिळनाडू सरकारने संघाच्या पथसंचलनास परवानगी नाकारली, त्यानंतर सुरू झालेल्या न्यायालयीन लढाईवर अनेक संस्था संघटना लक्ष ठेवून होत्या. स्वाभाविकपणे संघाला विरोध करणार्‍याची संख्या त्यामध्ये अधिक होती. पथसंचलनाच्या निमित्ताने जी लढाई लढली गेली, ती अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली आहे. ते अर्थही समजून घेतले पाहिजेत. संघ न्यायालयात जिंकला आणि पथसंचलन निर्विघ्नपणे पार पडले, एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित राहत नाही, तर संघ ज्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आग्रह धरतो आणि आसेतुहिमाचल भारतमातेच्या परमवैभवाचे स्वप्न पाहतो, ते प्रत्यक्षात येण्यास पूरक वातावरण या निकालामुळे निर्माण झाले आहे.
 
 
दक्षिण भारतातील तामिळनाडू या राज्याचा राजकीय इतिहास हा एकाधिकारशाहीने बरबटलेला आणि भारतीय संस्कृती-संस्कार नाकारणारा आहे. द्रविड चळवळीच्या माध्यमातून वेगळेपणा जपला गेला. इथल्या परंपरा नाकारल्या गेल्या. राम, कृष्ण या राष्ट्रीय दैवतांची अवहेलना केली गेली. या सार्‍या घटना एकसंघ राष्ट्रापुढे आव्हान होत्या. राजकीय दहशत आणि कर्मठ विचार यांच्या आधाराने तामिळनाडूमध्ये सर्वसामान्य हिंदू माणसाला दाबून टाकले आहे आणि दुसर्‍या बाजूला मुस्लीम, ख्रिश्चन समाजांचे लांगूलचालन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या पथसंचलनास तामिळनाडूमधील 33 हजारपेक्षा जास्त हिंदू बांधवांची उपस्थिती असते, हा एक शुभसंकेत मानायला हरकत नाही. तामिळनाडू राज्याची संघदृष्ट्या दोन प्रांतात विभागणी झाली आहे आणि दोन्ही प्रांतांत संघाचे काम खूप वर्षांपासून सुरू आहे. हिंदू संघटन करत असताना या निमित्ताने तामिळनाडूमधील सर्वच हिंदूंना आणि राजकीय संघटनांना संघटित शक्तीचा परिचय झाला आहे. तामिळनाडूमधील सुप्त हिंदू शक्ती जागृत होत असल्याचे चित्र या निमित्ताने समोर आले आहे. या जागृत हिंदू शक्तीचा परिणाम भविष्यात अनेक प्रकारच्या बदलातून आपणास दिसून येणार आहे. या जागृत हिंदू समाजाला राष्ट्रीय भूमिका घेताना आणि सर्वस्तरीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुढाकार घेताना आपण पाहणार आहोत.
 
 

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001