देशाच्या सीमेचं अहोरात्र रक्षण करणार्या आपल्या सैनिक बांधवांसाठी महिलांनी केलेलं सामूहिक गीतापठण. तेही एखाददुसरं नाही, तर सहा महिन्यांच्या कालावधीत 75 मंदिरांमध्ये करण्यात आलेली 75 गीतापठणं. निमित्त.. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं. समाजाची आत्मकेंद्रित वृत्ती वाढते आहे, अशी धारणा पक्की होत असताना जेव्हा असा अनोखा सामूहिक संकल्प सफल झाल्याची बातमी कानावर येते, तेव्हा होणारा आनंद हा शब्दांपलीकडचा असतो. सामूहिक प्रार्थनेत अमाप बळ असतं. गीतापठण करून जेव्हा सैनिकांच्या योगक्षेमासाठी परमेश्वराला प्रार्थना केली जाते, तेव्हा त्या प्रार्थनेचं सामर्थ्य शतगुणित होतं. कसा सुचला हा संकल्प? आणि तो सिद्धीस कसा गेला, त्याची ही गोष्ट...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी, देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलताना, “हे भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे, या वर्षात आपण देशासाठी काय विशेष करू शकतो?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नाने एका व्यक्तीच्या - नागपूरच्या विशाखा पाठक यांच्या मनात विचारचक्र सुरू झालं. या अमृतमहोत्सवी वर्षात अशी कोणती गोष्ट आपण देशासाठी करू शकतो, जी आपल्याला जबाबदार भारतीय नागरिक असल्याचं समाधान देईल, यावर त्या विचार करू लागल्या.
विशाखाताई त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात अभाविपच्या कार्यकर्त्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेतून अधिकारिपदावरून निवृत्त झाल्यावर गीतापठण आणि पौरोहित्य प्रशिक्षणादी कामात त्या व्यग्र झाल्या. तरुण वयात विकसित झालेली कार्यकर्ता वृत्ती आणि चळवळीचे खोलवर झालेले संस्कार स्वस्थ बसू देत नाहीत, हेच खरं! आता सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या विशाखाताईंना सुचलेला हा अनोखा संकल्प त्याचंच प्रतीक.
ब्रि. कुलकर्णी यांनी आयोजित केलेले
गीता पठण
पंतप्रधानांच्या भाषणापासून त्यांच्या मनात सुरू असलेला विचार थांबला तो वर्धा येथील गोपाळकृष्ण मंदिरात झालेल्या गीतापठणाच्या वेळी. ‘प्राणाची बाजी लावून देशासाठी अहोरात्र कार्यरत असणार्या सैनिकांसाठी आपण गीतापठण केलं, तर? केवळ सैनिकांच्याच नाही, तर या देशासाठी निरलसपणे काम करणार्या, आयुष्य वेचणार्या व्यक्तींच्या पाठीशी भगवंताने उभं राहावं, त्यांच्यावर कृपाशीर्वादरूपी छत्र कायम धरावं, अशी प्रार्थना या माध्यमातून करायची.’ मनातले विचार विशाखाताईंनी सोबत असलेल्या मैत्रिणींसमोर ठेवले. सर्वांनीच अतिशय उत्स्फूर्तपणे कल्पना उचलून धरली. देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभरात 75 मंदिरांमध्ये गीतापठणाचे 75 कार्यक्रम करायचं ठरलं. मात्र एक वर्षासाठी केलेला हा संकल्प पूर्ण झाला अवघ्या सहा महिन्यांत! आणि त्यात सहभागी झाल्या होत्या 50 ते 55 जणी. हा संकल्प केवळ अनोखाच नाही, तर सामूहिक सद्भावनेचं प्रतीक आहे.
75 मंदिरांत 75 वेळा सामूहिक गीतापठण करायचं, तेही बाकी सर्व व्याप सांभाळून आणि ठरवलेल्या मुदतीत. हा संकल्प परीक्षा बघणारा. पण विशाखाताईंना असं वाटलं नाही. संकल्प करताना नाही आणि नंतरही नाही. त्या म्हणाल्या, “आपल्या सैनिकांसाठी-देशासाठी आपण हे सहज करू अशीच भावना मनात होती. संघटनेने केलेली घडण कधी पुसली जात नाही. ती वेगवेगळ्या माध्यमांतून व्यक्त होत राहते. माझ्या मनातला संकल्प वर्ध्याच्या वझुरकरांच्या गोपाळकृष्णाच्या मंदिरात 25 जणींसमोर मांडला, तेव्हा त्या सर्व जणींनी त्याला एकमुखाने पाठिंबा दिला. हा पाठिंबा कृतिशील होता. संकल्पपूर्तीच्या मागे त्या सगळ्यांचं मोठं पाठबळ होतं, म्हणूनच माझा संकल्प आमचा संकल्प झाला. बरोबर असणार्यांची संख्या लवकरच 50वर गेली आणि ती कुरुक्षेत्रावर झालेल्या शेवटच्या गीतापठणापर्यंत कायम होती.”
वर्धा येथील गोपाळकृष्ण मंदिरात संकल्पाचा शुभारंभ
17 सप्टेंबर 2022ला सुरू झालेल्या या संकल्पाची पूर्ती फेब्रुवारी 2023मध्ये मथुरा-वृंदावन-कुरुक्षेत्र येथील गीतापठणाने झाली आणि अलीकडेच मा. प्रमिलताई मेढे यांच्या उपस्थितीत नागपूर इथे त्याचा सांगता समारंभ झाला. (अहिल्या मंदिरातही गीता पठण झाले होते.) या सांगता समारंभात संपूर्ण गीतेचा स्वाहाकार झाला. संकल्पपूर्तीसाठी ज्या ज्या व्यक्तींचं आणि संस्थांचं सहकार्य लाभलं, त्यांच्याविषयी जाहीर कृतज्ञता व्यक्त करणं हा हेतूही या समारंभामागे होता.
संकल्पात सहभागी होऊ इच्छिणार्या सर्व जणींसाठी एक नियमावली होती. विशाखाताई म्हणाल्या, “अगदी सुरुवातीलाच सांगितलं होतं की, हे पठण आपण आपल्या देशासाठी, सैनिक बांधवांसाठी स्वेच्छेने करणार आहोत. तेव्हा प्रत्येकीने स्वखर्चाने सगळ्या मंदिरात यायचं आहे. आपण दोन तास मंदिरातील लाइट, पंखे, माईक वापरणार आहोत. मंदिर व्यवस्थापनावर कोणत्याही खर्चाचा भार पडणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. म्हणूनच गीतापठणानंतर समोर येणार्या आरतीच्या ताटात आपल्यापैकी प्रत्येकीने किमान 5 रुपये आणि जास्तीत जास्त 20 रुपये ठेवायचे. या नियमांची आठवण परत कोणालाही करून द्यावी लागली नाही. आम्हा 50 जणींपैकी बहुतेक जणी साठीच्या वरच्या होत्या आणि माधुरी जोशी ही 81 वर्षांची ज्येष्ठ मैत्रीण 74 ठिकाणी गीतापठणात सहभागी झाली. दर महिन्याला किमान 12 ते 13 पठणं होत होती. या सगळ्या ठिकाणी होणार्या पठणासाठी समन्वयाचं काम माझी मैत्रीण रंजना भांडारकर हिने केलं. या यशस्वी संकल्पपूर्तीत तिचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर आपल्या नेहमीच्या जबाबदार्या सांभाळून, वेळेचं अचूक व्यवस्थापन करत सर्व जणींनी वेळ काढला, हेही विशेष!
या 75 मंदिरांपैकी जवळजवळ 70-71 मंदिरं नागपूर शहरातली होती. काही मंदिरं विशेष आठवणीत राहण्याजोगी. विशाखाताई म्हणाल्या,“नागपुराच्या महाल भागात दक्षिणामूर्ती मंदिर हे महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास यांच्या कुटुंबीयांचं खाजगी मंदिर आहे. प्रकांड बुद्धिमत्ता आणि त्याला असलेलं स्वदेशभक्तीचं तेजस्वी कोंदण असं बाळशास्त्रींचं वर्णन करता येईल. सव्वाशे वर्षांपूर्वी या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी काशीहून दशग्रंथी ब्राह्मण आले होते. त्यांनी इथे अतिरुद्र करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. बाळशास्त्री हरदास आणि त्यांच्या मोठ्या बंधूंनी त्या काळात 3 लाख रुपये जमा करून क्रांतिकारकांच्या चळवळीला दिले. भगतसिंग-राजगुरू-सुखदेव या त्रयीपैकी राजगुरूंना अज्ञातवासात असताना 24 दिवस या घराने आश्रय दिला. ब्रिटिशांना याची कुणकुण लागल्यावर त्यांनी मंदिराची झडती घेतली, तेव्हा घरातल्या ज्येष्ठ स्त्रियांनी दांडीवरचा मुकटा राजगुरूंना नेसवून, त्यांच्या हाती फुंकणी देऊन चुलीपाशी चूल फुंकायला बसवलं. त्यामुळे झडती होऊनही राजगुरू ब्रिटिशांच्या हाती लागू शकले नाहीत.
या मंदिरात लोकमान्य टिळक, गजानन महाराज, सावरकर येऊन गेले आहेत. दक्षिणामूर्तीची मूर्ती बघितल्यावर सावरकरांना काव्यही स्फुरलं होतं. लोकमान्य टिळक या मंदिरात आले त्या वेळी त्यांच्या भाषणावर ब्रिटिशांनी बंदी घातली होती. बाळशास्त्री हरदास किर्तनाला उभे होते. त्यांनी आपल्या डोक्यावरची पगडी काढून टिळकांना घातली. हातातले टाळ त्यांच्या हाती दिले. म्हणाले, “भाषणांना बंदी आहे. कीर्तनाला नाही. तेव्हा राष्ट्रभक्तिपर कीर्तन होऊन जाऊ द्या!” आणि तिथे टिळकांचं कीर्तन झालं. यंदाचं वर्ष या मंदिराचं शतकोत्तर रौप्यमहात्सवी वर्ष असल्याने, त्यानिमित्त योजलेल्या महोत्सवाची सुरुवात आमच्या गीतापठणाने झाली, हा आमचा गौरव आहे.”
विशाखा पाठक - 9881236512
या पठणापैकी एक पठण सैन्यदलातल्या सैनिक/अधिकार्यांसमोर करण्याचा योग आला. नागपूरकर असलेल्या ब्रिगेडियर कुलकर्णी यांना आमच्या संकल्पाविषयी समजलं, तेव्हा त्यांनी त्यांच्या समर्थ मंदिरात गीता पठणासाठी आमंत्रण दिलं. ‘भारतीय सैनिकांच्या रक्षणार्थ संपूर्ण गीतापठण’ असा बॅनरही लावला होता. योगायोगाने तो स्थलसेना दिवसही होता. त्या दिवशी पठणाला जवळजवळ दीडशे लोक उपस्थित होते. ब्रिगेडियर कुलकर्णी यांच्या रेजिमेंटमधल्या सैनिकांना गीतापठण लाइव्ह दाखवण्यात आलं.” याविषयी सांगताना विशाखाताई म्हणाल्या, “या पठणामुळे आमच्या संकल्पाला एक वेगळी झळाळी मिळाली. ऐकणार्यांपैकी अनेकांना गीता माहीत नसल्याने प्रत्येक अध्यायानंतर थोडंफार विवेचन करत त्या दिवशी गीतापठण झालं. गीतापठण चालू करण्यापूर्वी लष्करी पलटणी परस्पर अभिवादन करताना ज्या घोषणा देतात, त्या सर्व घोषणा देऊन आम्ही गीतापठणाला प्रारंभ केला. पलटणीतील सैनिकांनी त्याला आपापल्या ठिकाणाहून मनापासून प्रतिसाद दिला. शेवटी या अभिवादनाबद्दल आणि पठणाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यावर आम्ही सांगितलं, “आम्ही फक्त गीतापठण केलं. तुम्ही गीतेतला विचार प्रत्यक्ष जगता. ‘वासांसी जीर्णानी’ हे तुम्ही जगून दाखवता. म्हणूनच तुमच्यासमोर गीता म्हणताना आमचा उत्साह द्विगुणित झाला होता.”
मथुरा-वृंदावन-कुरुक्षेत्रावर पठण करून या संकल्पाची सांगता व्हावी, असं मनात होतं. पण त्या ठिकाणी कोणाशी ओळख नसल्याने मनातले मांडे मनातच राहतात की काय, असं विशाखाताईंना वाटत होतं. मात्र एखादं काम सद्भावनेने आणि निरपेक्ष वृत्तीने केलं की परमेश्वर पाठीशी असतो, याचा त्यांनी अनुभव घेतला. त्यांच्या शाळेतल्या मित्राच्या माध्यमातून तिथवर विनासायास पोहोचता आलं आणि भगवंताच्या पवित्र भूमीत या यज्ञाची सांगता झाली.
वृंदावनात बाँकेबिहारीच्या देवळात गीतापठण करणंं शक्य नव्हतं, म्हणून तिथल्या इस्कॉन मंदिरात पठण केलं. मथुरेत कडेकोट बंदोबस्त असल्याने प्रत्यक्ष जन्मस्थळी पठण करणं शक्य नव्हतं. तेव्हा व्यवस्थापनाने मंदिर परिसरातच पठणासाठी दुसरी जागा उपलब्ध करून दिली. 81 वर्षांच्या सदस्या वगळता बाकी सगळ्या जणी पठणासाठी झाडांना बांधलेल्या पारावर बसल्या आणि अगदी पूर्ण जोशात गीतापठण झालं.
सगळ्यात शेवटचं पठण झालं ते कुरुक्षेत्रावर.. जिथे भगवंतांनी गीता सांगितली, ते ठिकाण. तिथे मंदिराऐवजी लाइट अँड साउंडसाठी असलेल्या ऑडिटोरियममध्ये पायर्यांवर बसून गीतापठण केलं. जिथे भगवंतांनी गीता सांगितली, त्या जागी फक्त महिला सामूहिक गीता पठण करताहेत, हे तिथल्या लोकांसाठी अप्रूपाचं दृश्य होतं. “आमच्यासाठी तर हा आयुष्यातला एक अतिशय विलक्षण योग होता. संकल्पाची यशस्वी पूर्तता एका अदृश्य शक्तीने माझ्याकडून करवून घेतली होती.”
समाजहित डोळ्यासमोर ठेवून केलेल्या संकल्पामागचा हेतू निरपेक्ष असला आणि त्यासाठीचे प्रयत्न प्रामाणिक असले की त्याच्या पूर्तीसाठी दशदिशांतून मदतीचे हात कसे पुढे येतात, त्याचं हे उदाहरण.. अनोखं आणि अनुकरणीयही!