इस 78मध्ये, शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला. त्या विजयाचा उत्सव म्हणून त्याच्या प्रजेने गुढ्या उभारल्या होत्या. गुढीपाडवा हा विजयोत्सव आहे. परकीय शकांचे राज्य उलथवून आपल्याला पारतंत्र्यातून मुक्ती मिळाली, म्हणून हा सण. गुढीपाडवा हा आपला प्राचीन स्वातंत्र्य दिवस आहे, जो आपण घराघरातून ध्वज उभा करून साजरा करतो.
सतत फिरणारे, अनादी अनंत असे कालचक्र. दिवसामागून दिवस पळतात, महिन्यांमागून महिने जातात, वर्षामागून वर्षे जातात, संवत्सरे उलटतात, युगे लोटतात, महायुगे संपतात, मन्वंतरं पूर्ण होतात, कल्पान्त होतो... पण काळाचा ओघ मात्र चालूच राहतो. चक्रच आहे नं ते! जणू काही एकात एक बसवलेले अनेक गियर. दिवस-रात्रीच्या चक्राचे 30 फेरे झाले की महिन्याच्या चक्राचा एक फेरा होतो. महिन्याच्या चक्राचे 12 फेरे झाले की वर्षाच्या चक्राचा एक फेरा होतो. वर्षाच्या चक्राचे 60 फेरे झाले की संवत्सराचा एक, वर्षांचे 43,20,000 फेरे झाले की एक महायुग, महायुगांचे 71 फेरे झाले की एक मन्वंतर, मन्वंतरांचे 14 फेरे झाले की एक कल्प, कल्पाचे दोन फेरे झाले की ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण झाला म्हणायचे. मग त्याचा दुसरा दिवस सुरू होणार.. अशी ब्रह्माची शंभर वर्षे पूर्ण झाली की विष्णूचा एक निमिष होणार, असे करत विष्णूची शंभर वर्षे झाली की महेशाचा एक निमिष.. अखंड, अव्याहतपणे हे कालचक्र असेच चालू राहणार.
हे चक्र असल्याने, त्याचा सुरुवातीचा बिंदू कोणता धरायचा? हा प्रश्न येतोच.. म्हणजे सूर्य डोक्यावर आला की काही जणांचा दिवस सुरू होतो. काही जणांचा दिवस सूर्यास्ताला सुरू होतो, आणि काही जण तर चक्क मध्यरात्रीला दिवस सुरू झाला म्हणतात. एखाद्या कार्यालयाची वेळ सकाळी 9:00ची असेल, तर ते म्हणतात आमचा दिवस नऊला सुरू होतो. आपल्या भारतीय पद्धतीत मात्र सूर्योदयाला दिवस सुरू होतो.
महिन्याच्या चक्राचेही असेच. कुठून सुरू करायचा महिना? काहींचा महिना 1 तारखेला सुरू होतो. काहींचा पहिल्या सोमवारी. काहींचा महिना सूर्याच्या संक्रमणाने सुरू होतो. कुणाचा अमावास्येनंतर, तर कुणाचा पौर्णिमेनंतर. आपण मराठी लोक, अमावास्येनंतरच्या प्रतिपदेला महिना सुरू करतो.
वर्षाच्या चक्राची तर आणखीनच मजा! 365 दिवस आहेत! कुठून सुरू करता सांगा वर्ष? ग्रेगोरियन कॅलेंडरचे वर्ष 1 जानेवारीला, आर्थिक वर्ष 1 एप्रिलला, शैक्षणिक वर्ष 1 जूनला.. प्रत्येकाचे आपले आपले एक एक वेगळेच! काही युरोपीय कॅलेंडर आपले वर्ष 21 मार्चला सुरू करत असत. तिथे 21 मार्च 1190नंतरचा दिवस असे - 22 मार्च 1191! काही वर्ष उत्तरायणाला सुरू होतात, काही दक्षिणायनाला, कुठले वसंत संपातला, तर कुठले वर्ष शरद संपातला! विक्रम संवतचे वर्ष दिवाळीच्या पाडव्याला सुरू होते, तर शालिवाहन व युगाब्दचे वर्ष चैत्र पाडव्याला सुरू होते.
आता वर्ष मोजायची कशी आणि कुठपासून? अमुक घटनेपासून अमुक इतकी वर्षे झाली आहेत अशी मोजायची पद्धत आहे. मग काही जण गॉडने जग निर्माण केले तिथून वर्ष मोजतात (इसपूर्व 3761, Anno Mundi), काही जण येशूच्या जन्मापासून वर्ष मोजतात (इस 1, Anno Mundi), काही जण प्रेषित मोहमदच्या मदिना प्रयाणापासून वर्षमोजणी करतात (इस 622, हिजरी), काही जण विक्रमादित्याने शकांचा पराभव केला तिथून मोजतात (इसपूर्व 57, विक्रम संवत), काही जण शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला तिथून मोजतात (इस 78, शालिवाहन शक), काही जण छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकापासून मोजतात (इस 1674 शिवराज्याभिषेक शक) इत्यादी.
पण वर्षगणनेबद्दल आर्यभट म्हणतो, ‘काळ काही लौकिक नाही, अलौकिक आहे. म्हणून वर्षाची गणना आकाशातील ग्रह-तार्यांनुसार केली पाहिजे.’ त्या पद्धतीने भारतीय वर्ष मोजायचे, तर युगांच्या आधाराने मोजायला हवे.
संदर्भ -
कालगणना - मोहन आपटे
भारतीय युग-कालगणनेत एक गंमत आहे. त्यामध्ये ऋण संख्यांची वर्ष नाहीत. कलियुगाच्या आधीच्या घटना नोंदवताना त्रेता युगात अमुक झाले, द्वापारात तमुक झाले, सत्य युगात असे झाले किंवा मागच्या मन्वंतरात काय झाले? अशा नोंदी येतात. प्रत्येक काळाला त्याचे स्वत:चे नाव आहे.
इतर कालगणनेत - उदा., ग्रेगोरियनमध्ये 2000 वर्षांच्या पूर्वीचे वर्ष सांगायला इसवीसनपूर्व म्हणावे लागते. म्हणजे त्या काळाचे नाव, येशूच्या जन्माच्या आधीचे त्रेपन्नावे वर्ष वगैरे नाव नंतर दिले जाते.
आता ह्या चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या सूर्योदयाला नवीन वर्ष सुरू होते. हे वर्ष आहे - ब्रह्माच्या 51व्या वर्षाच्या, पहिल्या महिन्याच्या, पहिल्या दिवसाच्या, पहिल्या कल्पाच्या, 7व्या मन्वंतराच्या, 28व्या महायुगाच्या, कलीयुगाचे 5125वे वर्ष. ह्या वर्षाचे नाव आहे -
शोभन संवत्सर.
थोडक्यात, त्या दिवशीचा दिनांक आहे - चैत्र शुक्ल 1, युगाब्द 5125.
वर्षगणना
कोणत्याही संस्कृतीमध्ये वर्ष मोजायचे साधन आहे - सूर्य, चंद्र आणि नक्षत्रे.
सौर वर्ष - पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी म्हणजे एक सौर वर्ष. हा कालावधी आहे 365 दिवस आणि वरती पाव दिवस. सौर वर्ष आणि ऋतुचक्र हातात हात घालून चालतात. ठरलेल्या दिवसाला ठरावीक ऋतू सुरू होतो. पण एक समस्या अशी की प्रत्येक दिवशी सूर्य सारखाच दिसतो. दिवसादिवसात काही फरक नाही.
चांद्र वर्ष - 12 पौर्णिमांच्या 12 महिन्यांचे एक चांद्र वर्ष होते. चांद्र वर्षाचा कालावधी आहे साधारण 355 दिवसांचा. चांद्र कॅलेंडरचा फायदा असा की चंद्राची कोर पाहून तिथी सांगू शकतो. पौर्णिमेचा चंद्र ज्या नक्षत्रात उगवतो, त्याप्रमाणे महिनाही सांगता येतो. पण हे कॅलेंडर ऋतूंशी निगडित नाही.
आता सूर्याचा हात धरावा की चंद्राचा? जगभरातील संस्कृतींनी काय केले ते पाहू.
चांद्र कालगणना
इस्लामचे हिजरी हे पूर्णपणे चांद्र कॅलेंडर आहे. यामध्ये 29/30 दिवसांच्या 12 महिन्यांचे 355 दिवसांचे एक वर्ष होते. दर वर्षी सौर कॅलेंडरमध्ये आणि हिजरीमध्ये 11-12 दिवसांचा फरक पडतो. चांद्र कॅलेंडरचा ऋतूंशी काही संबंध नसल्याने कोणताही सण कोणत्याही ऋतूमध्ये येतो.
हिजरी कॅलेंडरचा पहिला महिना मोहर्रम. इसवीसन 680मध्ये, मोहर्रमच्या पहिल्या दहा दिवसांत इस्लामच्या दोन पंथांमध्ये घनघोर युद्ध झाले. या युद्धात प्रेषित मोहम्मदचे नातू मारले गेले. त्या प्रसंगाची आठवण म्हणून शिया पंथाचे मुस्लीम महिनाभर दुखवटा मानून शोक व्यक्त करून नवीन वर्ष सुरू करतात.
सौर कालगणना
अनेक संस्कृतींनी केवळ सूर्याच्या स्थितीवरून वर्षाची गणना केली - उदा., इजिप्त, बॅबिलॉन, माया, पारसी, रोमन आणि नंतर युरोपनेसुद्धा.
इजिप्तच्या वर्षामध्ये 30 दिवसांचे 12 महिने अधिक सूर्याच्या वाढदिवसाचे 5 दिवस असे 365 दिवस होते. पारसी कॅलेंडरमध्ये 30 दिवसांचे 11 महिने, 35 दिवसांचा 12वा महिना आणि दर 120 वर्षांनी 1 अधिक महिना घेतला जात असे. बॅबिलॉनमध्ये 30 दिवसांचे 12 महिने आणि दर 6 वर्षांनी एक अधिक मास घेत. ह्या कालगणनेत दिवसाची सुरुवात सूर्योदयाला असल्याने, नवीन वर्षाचे स्वागत सकाळी होत असे.
रोममधील कॅलेंडर मात्र फार गुंतागुंतीचे होते. इसपूर्व 7व्या शतकापासून ते इसवीसनाच्या 16व्या शतकापर्यंत - दोन हजारहून अधिक वर्षे त्यांना कॅलेंडरमध्ये दुरुस्त्या करत राहायला लागले. सुरुवातीच्या कॅलेंडरमध्ये 10 महिन्यांचे 304 दिवस आणि थंडीतले 61 निनावी दिवस असे 365 दिवसांचे वर्ष होते. पुढे सुधारणा करून जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन नवीन महिने घातले. त्यानंतर जुलियस सीझरने सुधारणा करून 365 दिवसांचे वर्ष आणि दर चार वर्षांनी एक अधिक दिवसाचा समावेश केला. 16व्या शतकात पोप ग्रेगोरीने या कॅलेंडरमध्ये आणखी एक सुधारणा करून दर 400 वर्षांमधली तीन लीप इयर्स कमी केली. ग्रेगोरियन कालगणनेत दिवसाची सुरुवात मध्यरात्री असल्याने, नवीन वर्षाचे स्वागत मध्यरात्री केले जाते.
चांद्र-सौर कालगणना
कैक जुन्या संस्कृतींमध्ये चंद्र आणि सूर्य असा दोन्हींचा मेळ घालून वर्षगणना केली जात असे. चिनी, ग्रीक, ज्यू आणि भारतीय कालगणना अशा पद्धतीची आहे. 12 चांद्र महिने आणि ठरावीक कालावधीने अधिक महिना घालून दोन्हीची सांगड घातली जात असे.
ह्यापैकी ज्यू दिवसाची सुरुवात सूर्यास्ताला होत असल्यामुळे नवीन वर्षाची प्रार्थना, क्षमायाचना आणि उपास सूर्यास्ताला सुरू होतात.
भारतातील प्रत्येक गोष्टीत दिसते तशी कॅलेंडर्समध्येसुद्धा खूप विविधता आहे. काही कॅलेंडर सौर आणि बरीचशी कॅलेंडर चांद्र - सौर (Luni Solar) आहेत. काहींमध्ये महिना पौर्णिमेला संपतो, तर काहींमध्ये महिना अमावस्येला संपतो. काही वर्ष चैत्रात, काही वैशाखात, काही आषाढ महिन्यात तर काही कार्तिक महिन्यात सुरू होतात. अधिक मासाप्रमाणेच क्षय मासदेखील असतो.
भारतीय नववर्ष
भारतीय दिवस सूर्योदयाला सुरू होत असल्याने नवीन वर्षाची सुरुवात सूर्योदयाला होते. सकाळी लवकर उठून, घराला तोरण लावून, दारात रांगोळी काढून नववर्षाचे स्वागत केले जाते. उंच काठीला उत्तम रेशमी वस्त्र बांधून, पानाफुलांची माळ आणि कलश लावलेली गुढी उभी केली जाते. गुढी म्हणजे एक प्रकारे ध्वज आहे. गुढीला ब्रह्मध्वज किंवा इंद्रध्वज असेही म्हणतात. ध्वजाप्रमाणे ती सकाळी उभी करायची आणि सूर्यास्ताला उतरवायची.
गुढीच्या अनेक कथा आहेत. एका कथेनुसार ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला विश्वाची निर्मिती केली. तो निर्मितीचा दिवस ब्रह्मध्वज उभारून साजरा करायचा. नवनिर्मितीचा सोहळाच जणू!
आणखी एक कथा येते विमानातून विहार करणार्या उपरीचर राजाची. ही कथा महाभारतात आली आहे. फार पूर्वी उपरीचर नावाचा एक राजा होता. इंद्राने त्याला एक ध्वज दिला होता. दर वर्षारंभाला उपरीचर राजा त्या ध्वजाची पूजा करत असे. राज्यात पाऊस पडू दे, धान्य पिकू दे, शत्रूंपासून राज्याचे संरक्षण होऊ दे अशी तो प्रार्थना करत असे. त्याच्या राज्यत वेळेवर पाऊस पडत असे, धान्य पिकत असे वगैरे पाहून इतर राजेसुद्धा इंद्रध्वज उभा करून त्याची पूजा करू लागले. तेव्हापासून, इंद्रध्वज उभा करून पूजा करायची रीत चालू आहे.
त्यानंतरच्या काळात, इस 78मध्ये, शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला. त्या विजयाचा उत्सव म्हणून त्याच्या प्रजेने गुढ्या उभारल्या होत्या. गुढीपाडवा हा विजयोत्सव आहे. परकीय शकांचे राज्य उलथवून आपल्याला पारतंत्र्यातून मुक्ती मिळाली, म्हणून हा सण. गुढीपाडवा हा आपला प्राचीन स्वातंत्र्य दिवस आहे, जो आपण घराघरातून ध्वज उभा करून साजरा करतो.