@रवींद्र प्रभुदेसाई
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, तिच्या रक्षण व संवर्धनाकरिता ‘पितांबरी’तर्फे विविध उपक्रम सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आनगाव येथे या दिशेने जाणारा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी गोशाळा, गोमय सेंद्रिय खतनिर्मिती ते भाजीपाला, फळबाग लागवड असे बहुविध शेतीचे अनोखे मॉडेल पाहायला मिळते.
पितांबरी हे नाव गेल्या 33 वर्षांपासून ग्राहकांना सुपरिचित आहे. सध्या होमकेअर, हेल्थकेअर, फूडकेअर, अगरबत्ती अशा विभागांमधील 82 अभिनव उत्पादनांची निर्मिती करण्यात आली आहे. जगभरातील 26हून अधिक देशांतील ग्राहकांच्या पसंतीस ही सर्व उत्पादने पात्र ठरली आहेत. या उत्पादनांच्या निर्मिती व विक्रीबरोबरच पितांबरीच्या अॅग्रिकेअर विभागाच्या वतीने शेतीविषयक विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आनगाव (ता. भिवंडी) येथे पितांबरी उद्योग समूहाची साडेसहा एकर जमीन आहे. यामध्ये खाद्यतेल निर्मिती कारखाना, गोशाळा, बेकरी उत्पादने, गोमय सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प, फळबाग व भाजीपाला लागवडीचे विविध प्रयोग सुरू आहेत.
देशी गायीचे महत्त्व लक्षात घेऊन 2003 साली आनगाव येथील शेतात गोशाळेची स्थापना करण्यात आली. या गोशाळेत गीर, सहिवाल, कांकरेज जातीच्या 36 देशी गायी आणि बारा म्हशी आहेत. रासायनिक खतांचे वाढते दुष्परिणाम लक्षात घेऊन 2014 साली पितांबरीने देशी गीर गायीच्या शेणापासून व गोमूत्रापासून सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला. प्रारंभी या ठिकाणी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली होती. कालांतराने त्यात विविध प्रकारच्या सुधारणा करत गोमय सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प उदयास आला.
या खतांच्या उत्पादनानंतर प्रयोगशाळेत तपासणी करून 1 किलो, 5 किलो व 40 किलो अशा विविध प्रकारच्या पॅकिंगमध्ये खत उपलब्ध करून देण्यात येते. गोमय खताला महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून सेंद्रिय प्रमाणपत्र मिळाले आहे.
खतनिर्मितीकरिता लागणारे शेण आनगाव येथील पितांबरी गोशाळेतून व आसपासच्या गोशाळांमधून मिळते. सध्या दरमहा 100 टनपर्यंत गोमय खताची विक्री होत आहे. गायीच्या मलमूत्रापासून जीवामृत, बीजामृत तयार केले जाते. या खताच्या वापरामुळे शेतातील उत्पादकता वाढण्यास खूप मदत झाली आहे. शिवाय जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढली आहे.
गोमय खताचा वापर करून 20 गुंठे जमिनीवर पूर्णपणे पारंपरिक, सेंद्रिय आणि विषमुक्त भाजीपाला लागवडीचा प्रयोग सुरू केला. यात सध्या भेंडी, मिरची, काकडी, वांगी, मुळा, चवळी, लाल माठ अशा भाज्यांचा समावेश आहे. भाजीपाल्यांना गोमय खताबरोबर नीम ऑइल, नीम पेंड, जीवामृत, बीजामृत यांची आवश्यक मात्रा दिली जाते. सध्या परिसरातील ग्राहकांना सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध झाला आहे. भाज्यांना ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तिन्ही हंगामांत सेंद्रिय भाजीपाला लागवड करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.
याशिवाय आनगाव प्रकल्पात केशर आणि रत्ना हापूस आंब्याची झाडे, आवळा लावण्यात आलेली आहेत. त्याशिवाय विविध दर्जेदार आणि जातिवंत मातृवृक्षापासून तयार केलेली फूलझाडे, फळझाडे, जंगली झाडे, मसाला रोपे आणि शोभिवंत झाडे यांची नर्सरी सुरू केली आहे. त्याबरोबरच शेतीसाठी आवश्यक सर्व प्रकारच्या अवजारांची विक्री करण्यात येणार आहे.
आपल्याकडे हरित क्रांतीनंतरच्या काळात रासायनिक खतांचा बेसुमार वापर करण्यात आला. त्यामुळे जमिनींची उत्पादनक्षमता काही काळासाठी वाढली. परंतु एकात्मिक पीकपद्धतीचा वापर न झाल्याने कित्येक जमिनी क्षारपड आणि मृत बनू लागल्या. याचा गांभीर्याने विचार करून पितांबरीने सेंद्रिय खते, जीवामृत, बीजामृत इत्यादींचा वापर वाढवून एकात्मिक पीकपद्धती अवलंबण्याचा पर्याय निवडला आहे. रासायनिक खतांचा वापर हळूहळू कमी करून सेंद्रिय खतांचे, जीवामृताचे, बीजामृताचे प्रमाण वाढवत नेणे हा यामागील मुख्य हेतू आहे.
गोमय खतनिर्मिती, भाजीपाला लागवडीद्वारे त्याच्या उपयोजनाचे प्रात्यक्षिक उभारणे, रोपवाटिका तयार करणे, सेंद्रिय शेतीसाठीचे विविध प्रयोग हाती घेणे - उदा. एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, तसेच कृषिपूरक साहित्याची विक्री करणे अशा विविध उपक्रमांतून बहुविध शेतीचे एक अनोखे मॉडेल आनगाव येथे येत्या काळात उभे करण्याचा पितांबरीचा मानस आहे.
या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी व अधिक माहितीसाठी । 9867112714 या क्रमांकांवर संपर्क साधावा.