@पूनम पवार
पाच राज्यांच्या निवडणूक निकाल हा भारतीय राष्ट्रवादाचा विजय आहे. मोदींच्या भाषेत सांगायचे तर हा विजय आत्मनिर्भर भारताचा आहे, हा विजय ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या भावनेचा विजय आहे, हा विजय विकसित भारताचा आहे, हा विजय राष्ट्रभाव जागृतीचा विजय आहे.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपा आणि विरोधात असलेला काँग्रेस पक्ष यांच्यात थेट लढत झाली. खरंतर या निवडणूकीत काँग्रेससह सर्वच भाजपा विरोधकांनी इंडिया आघाडी म्हणून भाजपाला आव्हान देणे गरजेचे होते. तसे या निवडणूकीत झाले नाही. पण काँग्रेसचा हा दारुण पराभव झाला तो... निवडणूकांपूर्वी केलेल्या इंडिया आघाडीतील नेत्यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळेच...
वर जो इंडिया आघाडीचा उल्लेख झाला, याआधीही अशी कडबोळी आघाडी यूपीए या नावाने काढली होती. त्यानंतर या कडबोळीचा कसा चिवडा झाला, हे जनतेने पाहिले आहे. पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर समजले की, पुन्हा एकदा आपल्याला खिचडी पकवावी लागेल. Indian National Developmental Inclusive Alliance - (INDIA) या अद्याक्षराने ही इंडिया आघाडी एकूण 28 पक्षांनी एकत्र येऊन उघडली. काही महिन्यांतच या आघाडीत किती बिघाडी आहे, हे हळुहळू दिसू लागले. यातील Inclusive Alliance याचा अर्थ सर्वसमावेशक भागीदारी. याचा त्यांच्या सोयीने अर्थ म्हणजे ही भागीदारी, भ्रष्टाचाराची, तुष्टीकरणवादाची, घराणेशाहीची, एखाद्याच समाजगटाचे लांगूलचालन करण्याची. त्यापुढील शब्द आहे National Developmental म्हणजे राष्ट्रीय विकास. यातील राष्ट्रीय शब्द पुढे आहे, हे विसरून त्यांनी ‘विकास’ या शब्दावर लक्ष केंद्रित केले आणि विकास केवळ स्वत:पुरता सीमित ठेवला.
या इंडिया आघाडीचे महानाट्य कसे रंगत आहे, कोण कोणाला विंगेत पाठवीत आहे, कोण कोणाच्या संवादावर आपली पाठ थोपटून घेत आहे, हे नाट्यरंजन, रंजन नसून धूळफेक आहे, एवढी शहाणी जनता नक्कीच झाली आहे. या इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी सनातन धर्मावर अनेक वेळा बेताल बडबड केली आहे. तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मामध्ये समानता नसल्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन होणे गरजेचे आहे, तसेच सनातन धर्माची तुलना डेंग्यू व मलेरियाशी केली, तर द्रमुक नेते ए. राजा यांनी सनातन धर्माची तुलना एड्सशी केली, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, सनातन हा धर्म नाही तर हिंदू धर्मातील कट्टरतावादी लोकांचा गट आहे. या बेताल बडबडीचा पाढा वाचू तेवढा कमी आहे. या इंडिया आघाडीची मदार ज्याच्या हाती आहे असे भासवणारा अखिल भारतीय पक्ष म्हणजे काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी. असे हे राजपुत्र व काँग्रेसवासी चालू असलेल्या बेताल बडबडीवर चकार शब्दही काढीत नाही किंवा साधा निषेधही नोंदवत नाहीत. कॉँग्रेसच्या अशा वर्तणुकीचा अर्थ असा झाला की, आघाडीत चाललेल्या वायफळ वटवटीला ते सहमत आहेत. हे सर्व पाहता इंडिया आघाडीचा अर्थ होतो, हिंदुविरोध-सनातन विरोध होय. इंडिया आघाडीतील सहभागी हिंदू द्वेषी आहेत, हे ते स्वत:च सिद्ध करतात.
भारतातीलच परंतु वेगळी चूल मांडलेल्या इंडिया आघाडीचे हे विकृत रुप पाहिले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक भाषणांतून-वक्तव्यांतून एक गोष्ट अभिव्यक्त होते, ती म्हणजे ‘भारताला अन्य काही करण्याची गरज नाही, तर भारताने भारतच राहिले पाहिजे.’ या पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल पाहिले, तर मतदारांनी ‘भारत हा भारत’ आहे यावर शिक्कामोर्तब केले आहे. निवडणूक निकालानंतर आभार व्यक्त करतानाही मोदींनी “हा विजय 140 कोटी भारतीय जनतेचा विजय आहे” असेच सांगितले. देशवासीयांमध्ये भारतीयत्वाची जाणीवजागृती झाल्यामुळेच ‘राष्ट्र प्रथम’ मानणार्या पक्षाला जनतेने कौल दिल्याचे गौरद्गारही त्यांनी काढले. तसेच राष्ट्रहिताशी कटिबद्ध राहून भारताला सर्वोच्च पदी नेण्याचे ध्येय हे सर्व भारतीयांनी पाहिलेले स्वप्न, संकल्प घेऊन सत्यात उतरविण्याची ग्वाही या वेळी त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विजयाचे श्रेय कायमच भारतीयांना देत असले, तरी भारताची ओळख असलेल्या सुप्त रुजवातीला जागृतभावाच्या तेजाने तेवत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण योगदानाचे श्रेय मोदींनाच द्यावे लागेल. मोदींच्या राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय व्यवहारात राष्ट्रभाव नेहमीच अभिव्यक्त होताना दिसतो. श्रीरामजन्मभूमी शिलापूजन - अयोध्येत येऊ घातलेल्या श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठा, गंगाआरती, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, परदेशातील आपला वारसा असलेल्या वस्तू व देवतांच्या मूर्ती पुन्हा भारतात आणणे, परदेशातील राष्ट्रप्रमुखांना भेटी म्हणून भारतीय परंपरेचा वारसा असलेल्या वस्तू देणे, तसेच चंद्रयान 2-3 वैज्ञानिकांना व क्रिकेट विश्वचषक 2023 खेळांडूना कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती म्हणून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणे, योगदिनाला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त करून देणे, जी 20सारख्या आंतरराष्ट्रीय एकत्रीकरणात वसुधैव कुटुंबकम या भारतीय मूल्याला विशेषत्वाने स्थान, राष्ट्रभाव विकसित करण्याचे असे कितीतरी विषय पंतप्रधान मोदींनी आपल्या व्यवहारातून प्रकट केले आहेत. यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची कधीही तडजोड केली नाही.
मोदींनी एक विषय प्रारंभापासून मांडलेला आहे, तो म्हणजे कायदा-सुव्यवस्था राखणे, लोकांच्या गरजा पूर्ण करणे, समाजातील सर्वात दुर्बळ घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे, नारीशक्तीचा सन्मान करणे हे सरकारचे मुख्य काम आहे. हे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक उपक्रमांची जंत्री राबविली. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा या दृष्टीने ठोस पावले उचलली. सर्व भारतीयांना या कृतिरूप आराखड्याचे दर्शन झाले आणि म्हणूनच इंडिया आघाडीने रचलेल्या सापळ्यात जनता अडकली नाही. त्याचाच परिणाम राजस्थान, छत्तीसगड, आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत विकासाचे कमळ मोठ्या प्रमाणात फुलले.
भारत हा जातींत विभागलेला देश आहे. प्रत्येक जातीला स्वत:च्या जातीविषयी अभिमान आहे. हाच घटक लक्षात घेऊन इंडिया आघाडीतील म्होरक्याचे काम पाहणारे नितीश कुमार यांनी जातिनिहाय जणगणनेचे अस्त्र बाहेर काढले. याआधारे प्रत्येक वंचित जातीचा विकास व्हावा, हा उद्देश दर्शविण्यात आला; मात्र जातीजातीत कलह निर्माण करणे, जातिद्वेष वृद्धिंगत करणे हा छुपा अजेंडा त्यामागे होता. या कारणाने जातीजातीत विभागलेल्या जनतेत ईर्ष्या, अंहकार, द्वेष निर्माण करून समाजमन कलुषित करणे आणि अराजक पसरविणे एवढाच त्यांचा हेतू होता. आम्हीच तुमचे कैवारी आहोत हा भ्रमाचा भोपळा एवढा मोठा करायचा की त्यापलीकडचे काही दिसूच द्यायचे नाही. मात्र ते हे विसरले की, माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग आणून हिंदू समाजाला शतखंडित करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या व्ही.पी. सिंग यांनी हा विकृत प्रयत्न केला, ते आज राजकीय इतिहासाच्या खिजगणतीतही नाहीत. कधीकधी सोयीने मात्र पुरोगामी पंडितांना त्यांचे स्मरण होते, हेही नव्हे थोडके.
अशा लोकांनी हे लक्षात ठेवावे की, आपली जातिव्यवस्था ही कौशल्य विभाजनावर उभी आहे. प्रत्येक जातीला आपल्या कौशल्याधारित व्यवसायाचा अभिमान आहे. त्यामध्ये कुठेही तुच्छतेची भावना चाटणालाही नव्हती. पूर्वीची बारा बलुतेदारांची जीवनशैली हे याचेच उदाहरण म्हणता येईल. नंतरच्या काळात उच्च-नीचतेच्या भावना प्रबळ करुन समाज कलुषित करण्याचा प्रयत्न झाला आणि मग जातीची उतरंड, अस्पृश्यता इत्यादी विषय निर्माण झाले. या सर्व विषयांना आपल्या संविधानाने मूठमाती दिली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आपले संविधान जातीनिरपेक्ष आहे म्हणून जातिनिहाय जणगणनेचे नाट्य आता चालणार नाही. जातिनिहाय जणगणना केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी ढोंगी राजकारण्यांनी काढलेली एक क्लृप्ती आहे. जनता आता पुरती शहाणी झाल्याने या ढोंगीपणाला आता ती बळी पडत नाही.
हे महानाट्य पाहता पाच राज्यांच्या निवडणूक निकाल हा भारतीय राष्ट्रवादाचा विजय आहे. मोदींच्या भाषेत सांगायचे तर हा विजय आत्मनिर्भर भारताचा आहे, हा विजय ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या भावनेचा विजय आहे, हा विजय विकसित भारताचा आहे, हा विजय राष्ट्रभाव जागृतीचा विजय आहे.