‘समन्वय’चा समरसता प्रयोग

विवेक मराठी    21-Dec-2023   
Total Views |
नुकताच भरोच शहरातील हिंदू समाज विवाह संस्कार सोहळा झाला. केवळ विवाहसोहळा न करता त्या निमित्ताने सर्व हिंदू समाज एकत्रित करण्यासाठी या सोहळ्यात विविध उपक्रम करण्यात आले. सामाजिक समरसता हा विषय या उपक्रमाचा आत्मा होता. या सोहळ्याचा वृत्तान्त सा. विवेकाच्या वाचकांसाठी.
gujrat
 
एखाद्या संकल्पनेचा किती वेगवेगळ्या प्रकारे विचार केला जाऊ शकतो आणि केवळ विचार करून न थांबता त्याला प्रत्यक्ष रूप दिले जाते, याचा अनुभव नुकताच भरोच (गुजरात) येथील समन्वय चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन घेता आला. समन्वय चॅरिटेबल ट्रस्ट ही भरोच शहरात सामाजिक कार्य करणारी महत्त्वाची संस्था आहे. स्वामी मुक्तानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची वाटचाल सुरू आहे. मागील काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात या संस्थेचे कार्य सुरू असून ‘मातृस्वरूप हिंदू समाज’ हा संस्थेच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. हिंदुहिताचे काम करणार्‍या या संस्थेचे ट्रस्टी म्हणून गिरीशभाई शुक्ला, दीपिका शाह, नीरवभाई पटेल, गणेशभाई कायस्थ इत्यादी मान्यवर काम करत आहेत. स्वत: स्वामी मुक्तानंद महाराज या ट्रस्टी मंडळींच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात, त्याचप्रमाणे सामाजिक समरसता हा विषयही आग्रहाने करत असतात. पाच-सहा महिन्यांपूर्वी स्वामी मुक्तानंद महाराज यांनी भरोच शहरातील गोगाराव महाराजांच्या छोट्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. भरोच शहरातील विविध समाजगटांतील बांधवांच्या सहकार्यातून, वाल्मिकी समाजाचे आराध्य दैवत असणार्‍या गोगाराव महाराजांच्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास राम मंदिर न्यासाचे कामेश्वर चौपाल उपस्थित होते. स्वामी मुक्तानंद महाराजांच्या प्रयत्नांमुळे गोगाराव महाराज मंदिर केवळ वाल्मिकी समाजाचे न राहता संपूर्ण हिंदू समाजाचे झाले. आज हिंदू समाजातील सर्व बंधुभगिनी श्रद्धापूर्वक या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. या मंदिराच्या उभारणीत समन्वय चॅरिटेबल ट्रस्टचाही सहभाग होता.
तर असा हा समन्वय चॅरिटेबल ट्रस्ट मागील काही वर्षांपासून हिंदू समाज विवाह संस्कार सोहळा आयोजित करत असतो. या वर्षी 15 डिसेंबर रोजी हा विवाह संस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास या वर्षी आणखी एक नवा आयाम जोडला गेला. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या काळात रामचरितमानस कथा आयोजित करण्यात आली होती. पू. सकरूदास महाराज यांनी रामचरितमानस कथा सांगितली. केवळ रामचरितमानस कथा आयोजित करणे हा समन्वय चॅरिटेबल ट्रस्टचा उद्देश नव्हता, तर संपूर्ण हिंदू समाजाचे प्रतिबंध या सोहळ्यात दिसावे, असा आग्रह होता, म्हणून सात दिवस सात समाजगटांतील यजमान निश्चित केले गेले. यामध्ये धनजीभाई परमार (बुनकर समाज), बलदेवभाई आहिर (आहिर समाज), जिग्नेशभाई मिस्त्री (खरवा समाज), परेशभाई लाड (प्रजापती समाज), चिरागभाई सोलंकी (वाल्मिकी समाज), जतिनभाई शाह (वणिक समाज), जनकसिंह दायमा (राजपूत समाज) इत्यादी मान्यवरांचा समावेश होता. प्रजापती समाज, वाणंद समाज, ब्रह्म समाज, सिंधी समाज, वसावा समाज, जादव समाज, पटेल समाज, कायस्थ समाज इत्यादी समाजगटांकडे कथावाचनानंतरच्या महाप्रसादाची जबाबदारी दिली होती.
 

gujrat 
रामचरितमानस कथा आयोजित करताना समरसता भाव जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. समरसता हा विषय आता सर्व पातळ्यांवर स्वीकारार्ह झाला असल्याची प्रचिती या निमित्ताने आली. रामचरितमानस कथा वाचनाबरोबरच समरसता विषयाचे विविध पैलू उलगडून दाखवणारी व्याख्याने या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये रा.स्व. संघ गुजरात प्रांत मा. संघचालक डॉ. भरतभाई पटेल, सामाजिक समरसता गतिविधी गुजरात प्रांत संयोजक डॉ. हेमांगभाई पुरोहित, प.पू. दंडी स्वामी श्री जितेंद्रानंद सरस्वतीजी, अखिल भारतीय संत समिती राष्ट्रीय महासचिव यशवंतभाई चौधरी, पश्चिम क्षेत्र सहकार्यवाह डॉ. कमलेशभाई उपाध्याय, विवेकानंद केंद्र अहमदाबाद डॉ. मधुकर पाडवी, बिरसा मुंडा विश्वविद्यालय (राजपिपला), हिंदुस्थान प्रकाशन संस्था अध्यक्ष रमेशजी पतंगे (मुंबई) इत्यादी मान्यवरांनी आपले विचार मांडले. आध्यात्मिक आणि सामाजिक आशय विषयाची घुसळण या निमित्ताने झाली. रामकथेच्या सोहळ्यास गुजरात राज्यातील विविध संत, संप्रदायांचे मान्यवर उपस्थित होते.
14 डिसेंबर रोजी रामकथेची सांगता झाली आणि दुसर्‍या दिवशी भरोच शहरातील परेड मैदानावर हिंदू समाज विवाह संस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. एकूण 23 वधुवरांचा विवाह संस्कार या ठिकाणी झाला, पैकी 18 विवाह आंतरजातीय विवाह होते. या विवाह संस्कार सोहळ्यानिमित्त एक ‘ज्ञाती सद्भाव सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेस रमेश पतंगे व गुरुप्रसाद पासवान यांनी मार्गदर्शन केले. विविध समाजगटांतील वधुवरांचे पालक, नातेवाईक यांनी या सद्भाव सभेत सहभागी होऊन विशाल हिंदू समाजाचे दर्शन घडवले. हिंदू विवाह संस्कार सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे नववधूचे पाद्यपूजन. या सोहळ्यातही भरोच शहरातील प्रमुख व्यक्ती, समाज नेते, कार्यकर्ते सहभागी झाले. आपण कोणत्या मुलीचे पाद्यपूजन करणार आहोत? ती कोण आहे? असे कोणतेही प्रश्न त्या मान्यवरांना पडले नाहीत. ती नववधू आहे, लक्ष्मीस्वरूप आहे एवढी एकच गोष्ट त्या मान्यवरांना माहीत होती. एकूण हृदयस्पर्शी अशा या सोहळ्यात जे जे सहभागी झाले, ते स्वत:ला धन्य मानत होते. पूर्वसुकृताचे फळ प्राप्त झाले असेच त्यांच्या चेहर्‍यावर भाव होते.
 
समरसता हा विषय केवळ भाषणाचा नसून कृतीचा आहे, आपल्या हिंदू समाजाच्या मनातील असहकाराच्या गाठी फोडणारा आहे, तसाच जे स्वत:ला उपेक्षित वंचित समजतात, त्यांना आत्मविश्वास देणारा आहे याचे प्रात्यक्षिक भरोच येथील समन्वय चॅरिटेबल ट्रस्टने करून दाखवले आहे. या यशस्वी प्रयोगाचे अनुकरण अन्य ठिकाणी होणे आवश्यक आहे.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001