जिद्द, निष्ठा आणि प्रबळ इच्छाशक्ती ही ध्येयप्राप्तीची त्रिसूत्री आहे, हा वस्तुपाठ प्रत्यक्षात अमलात आणणारे सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार महादेव शंकर गोपाळे. सामान्य कुटुंबातील जन्म, बेताची आर्थिक परिस्थिती, अल्प शिक्षण, पण कलेची आवड आणि त्यासाठी केलेली साधना या सर्वांमुळेच ते यशाचे शिखर गाठू शकले. त्यांच्या कलाप्रवासाचा घेतलेला आढावा.
भीमाशंकरच्या पायथ्याशी वसलेल्या राजगुरूनगर तालुक्यातील कळमोडी गावातील सरस्वती विद्यालयात एका मुलाभोवती शाळकरी मुलांचा घोळका जमला होता. हा घोळका जमला होता प्रयोगशाळेच्या वहीत चित्र काढून घेण्यासाठी. त्या मुलालाही चित्र काढून देण्यात वेगळाच आनंद मिळत असे. हाच मुलगा त्याच्या 45 वर्षांच्या कलासाधनेने नावारूपाला आला. तो मुलगा म्हणजे सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार महादेव शंकर गोपाळे. कागदावर अक्षर गिरविण्याच्या वयात महादेवाला आवड निर्माण झाली ती मंत्रमुग्ध करणार्या चित्रकलेची. त्याची मातीशी असलेली घट्ट नाळ कलाकृती घडवत गेली. लहान वयातच कुठलेही प्रशिक्षण न घेता नागपंचमीच्या पूजनासाठी नाग आणि काही गणपती बनविले. मुसळधार पावसामुळे गावातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आणि महादेवने तयार केलेले गणपती गावकर्यांनी आनंदाने घेतले. एक गणपती शिल्लक राहिला आणि त्याच गणपतीपासून त्यांच्या घरी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आपल्याच निर्मितीला जेव्हा दैवत्व प्राप्त होते, तो आनंद काही औरच असतो, हे सांगताना महादेव गोपाळे आनंदाने भारावून गेले होते.
सहा मैल दूर असणार्या वाडा गावी त्यांचे आठवी-नववीचे शिक्षण झाले. आर्थिक परिस्थिती इतकी बेताची होती की, अनवाणी पायांनी हा सहा मैलांचा प्रवास करावा लागे. सूर्य तापलेला असताना तळव्यांची लाहीलाही होई. अशा वेळी आधार असे तो, तळव्यांना बांधलेल्या झाडांच्या पानांचा. या वर्णनाने डोळ्याच्या कडा ओलावतात. अशी परिस्थिती असूनही समाजकार्य करण्यास महादेव कधी मागे हटत नसत.
गरिबीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी दहावीच्या शिक्षणासाठी महादेव यांनी मुंबई गाठली. आर्थिक अडचण असली, तरी ती सोडविण्यासाठी महादेव कष्टाची पराकाष्ठा करायला तयार होते. सकाळी दूध केंद्रावर काम आणि रात्रशाळेत शिक्षण अशी तारेवरची कसरत चालू होती. मात्र कलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. दूध केंद्राच्या बाजूलाच असलेल्या चित्रशाळेकडे त्यांचे पाय वळले. कलेचा दर्दी असणार्या एका स्नेहीजनाने बाळकृष्ण आर्टमध्ये एका सहकार्याची गरज आहे असे सांगितले. तिथे चित्रपटाचे पोस्टर बनविणे इ. काम चाले. “चार वर्षांच्या अनुभवानंतर माझे गुरू प्रसिद्ध चित्रकार श्रीकांत धोंगडे यांच्याकडे काही वर्षे कला विकसित करण्याचे भाग्य लाभले आणि माझ्या कलेला बहर येऊ लागला” असे महादेव यांनी सांगितले.
कालचक्राबरोबर प्रगतीचे वारेही वाहू लागले. डिजिटल युग अवतरले आणि हाताने तयार होणारी चित्रपट पोस्टर्स कालबाह्य झाली. अल्प शिक्षण-कुटुंबाची जबाबदारी-वाढती महागाई याने त्रस्त महादेव यांना आशेचा किरण दाखविला खोत या सद्गृहस्थांनी. त्यांनी रेल्वे भरतीची माहिती दिली आणि सर्व प्रकारचे सहकार्य केले आणि आर्थिक प्रश्न सुटला.
गृहस्थाश्रमाच्या कर्तव्याबरोबरच कलासाधनेची साथ त्यांनी कधी सोडली नाही. उपजत असलेली आवड कौशल्यप्राप्तीचा वेध घेत होती. तो काळ मुंबईतील अनेक शहरांत रंगावली प्रदर्शन भरण्याचा. घाटकोपरमधील भाजी गल्लीत दर वर्षी प्रवीण वैद्य हे रांगोळी प्रदर्शन भरवीत असत. त्याने महादेव इतके प्रभावित झाले की, घरी रांगोळी चित्रांचा सराव करू लागले. रेखाटलेल्या रांगोळी चित्रांचे नमुने त्यांनी परिचितांमार्फत वैद्य यांना दाखविले. त्यांनीही मोठ्या मनाने महादेव यांच्या रांगोळी चित्रांची प्रशंसा केली आणि त्यांना प्रदर्शनामध्ये संधी दिली.
या संधीचे सोने करत महादेव यांनी आपल्या आयुष्यात यशाचे रंग भरले. रांगोळीचा सराव आणि गुरुस्थानी असलेल्या वैद्य यांचे मार्गदर्शन घेऊन स्वत:ची अशी वेगळी शैली महादेव यांनी निर्माण केली. महाराष्ट्रभर रांगोळी प्रदर्शनात सहभाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली. रांगोळीतून साकारणारे पोर्ट्रेट इतके हुबेहुब वाटे की ती व्यक्तीच आपल्यासमोर प्रत्यक्ष आहे इतके सजीव. गोपाळे हे रांगोळी चित्रात अक्षरश: जीव ओततात, याबद्दल त्यांची रांगोळी चित्रे पाहणार्या कुणाचेही दुमत होऊ शकत नाही. पोर्ट्रेट ही त्यांची खासियत असली, तरी त्यांच्या सामाजिक जाणिवा इतक्या प्रगल्भ आहेत की, त्या त्यांच्या रांगोळी चित्रांतूनही उमटतात. कला हे माध्यम समाजप्रबोधनासाठी प्रभावी ठरू शकते, म्हणून गोपाळे यांनी पोर्ट्रेटबरोबरच समाजदर्शन व सामाजिक संदेश देणार्या रांगोळ्या रेखाटल्या. हुंडाबंदी, दारूबंदी, गुटखाबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, बालमजुरी, 26/11 दहशतवादी हल्ला, एस.टी. डेपो, रेल्वे स्थानक यांची, तसेच अनेक सामाजिक, राजकीय व कलाक्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची रांगोळी चित्रे त्यांनी रेखाटली. यात विशेष म्हणजे, रांगोळी चित्र रेखाटताना त्या व्यक्तीची उपस्थिती.
प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास होत असतो, तसतसे त्या कलाविष्काराच्या पद्धती बदलत जातात, तसे रांगोळीमध्ये होते का? या प्रश्नावर गोपाळे म्हणाले की, “80-90च्या काळात रांगोळी रेखाटण्याकरता एखाद्या चित्राचा शोध घेण्यातच आमचा बराच वेळ खर्ची होत असे. पण आता गूगलच्या साथीने कोणतेही चित्र जादूच्या दिव्यातून चुटकीसरशी समोर येते.” काळाबरोबर बदलणे हा आपल्या जीवनाचा स्थायिभाव असला पाहिजे, असे मत गोपाळे यांनी व्यक्त केले.
कुठलीही कला ही साधना म्हणूनच करावी, तरच ती साध्य होते, अशाच आशयाचा एक प्रसंग गोपाळे सांगतात, “देहूला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील येणार होत्या आणि मला रांगोळी काढण्यास पाचारण केले होते. रांगोळी पूर्णत्वास येते, तोच वादळ-वारा-पाऊस सुरू झाला. काढलेली रांगोळी विस्कटली, पण निर्धार पक्का होता, जिद्द होती, त्यामुळे पुन्हा ती रांगोळी पूर्ण केली. असे या प्रवासात अनेक प्रसंग आले. पण कधीही खचलो नाही, स्वत:वर पूर्ण विश्वास आणि कलेप्रप्ती निष्ठा ध्येयप्राप्तीच्या दिशा सुनिश्चित करते.”
रांगोळी चित्रकार की चित्रकार या दोघांपैकी कोणास प्राधान्य देता, यावर गोपाळे उद्गारले, “खरे तर या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या व्यक्तीला चित्र काढता येते, तो रांगोळी काढू शकतो. माझ्या आयुष्यात दोघांचे मूल्य समान आहे. एवढे मात्र मी मान्य करतो की, रांगोळी चित्रकार म्हणून मला ओळख मिळाली. गावी भूक लागली असता एकदा एका हॉटेलमध्ये पैशाअभावी आम्ही मिसळ खाल्ली म्हणून आम्हाला पकडले आणि मारले. त्याच हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर माझ्या रांगोळीचे भव्य प्रदर्शन भरविले गेले व त्याच हॉटेल मालकाच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. असाच एक प्रसंग मुंबईतील भटवाडीतील चाळीतला. त्या काळी घरी टीव्ही नव्हता, म्हणून एका घराच्या खिडकीवर लोंबकळत टीव्ही पाहण्याचा प्रयत्न करीत होतो. हळूच तो घरमालक आला आणि माझ्या कानशिलात जोराची थप्पड मारली. याचे शल्य नाही, कारण परिस्थिती होती, तिचा स्वीकार होता. शब्द नाहीत, पण माझ्या रांगोळी चित्रकलेमुळे त्याच सह्याद्री वाहिनीवर माझी मुलाखत प्रसिद्ध झाली आणि कानशिलात वाजविणार्या त्याच घरमालकाने माझे कौतुक केले. हा माझा सत्कार आणि कौतुक झाले ते केवळ माझ्या रांगोळी कलेमुळे. त्यामुळे आयुष्यभर कलेचा पाईक राहण्याची माझी इच्छा आहे.”
आवड असेल तर सवड मिळतेच, हे गोपाळे यांच्या बाबतीत तंतोतंत खरे आहे. नोकरी, प्रपंच करीत असताना रांगोळी व चित्र ही वेळखाऊ कला त्यांनी जिवापाड जपली. त्यासाठी गोपाळे पहाटे लवकर उठून, वेळेचा अपव्यय न करता, साधनेला समर्पित आयुष्य जगले. आईवडिलांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ते कधी घराबाहेर पडले नाहीत. “माझ्या कलेला कायमच त्यांचे प्रोत्साहन मिळाले. कलासाधना स्वच्छंदी तेव्हाच होते, जेव्हा आपण मुक्तहस्ताने तिची उधळण करतो. माझ्या कलेत संपूर्ण जीव ओतता आला तो केवळ माझी सहचारिणी मंगल हिच्यामुळेच. मी केवळ नाममात्र आहे, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तिने स्वखुशीने स्वीकारली, म्हणूनच माझी कला अधिकाधिक बहरत गेली. माझ्या मते पत्नीची साथ नसेल तर संसाराची एक रेघदेखील आपण ओढू शकत नाही. मी तर कलाकार, अशा किती रेघा ओढताना माझा दोर भक्कमपणे सांभाळणारी मंगल सोबती मिळाली, ही माझ्या पूर्वजन्माची पुण्याई असावी.” त्यांनी आजपर्यंत तीन हजारांच्या वर रांगोळी चित्रे रेखाटली आहेत. परदेशातही त्यांनी आपल्या कलेची झलक दाखविली आहे. यानिमित्त त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. घाटकोपर भूषण पुरस्कार, अक्षर गौरव राज्यस्तरीय पुरस्कार, राजा रविवर्मा चित्रकार पुरस्कार, मुंबई कलागौरव पुरस्कार, कलादर्पण, तसेच 2021 साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये इव्हेंटच्या माध्यमातून सहभाग.. पुरस्कारांचे स्वतंत्र दालन उभे राहील एवढे पुरस्कार आहेत. शिवाय एका हिंदी पुस्तकातही त्यांच्या कलाप्रवासाचे स्वतंत्र प्रकरण वाचायला मिळते.
महादेव गोपाळे मध्य रेल्वेच्या तांत्रिक विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर येणारे एकाकीपण, नैराश्य त्यांच्या गावीही नाही. गोपाळे हे 24ु7 व्यग्र असतात. त्यांनी त्यांच्या कलासाधनेसाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे, हे त्यांच्या सुखी जीवनाचे गमक आहे. रांगोळी साकारताना चिंतेचा, नैराश्याचा, तणावाचा, वृद्धत्वाशी निगडित समस्यांचा नाश होतो. मन:शांती व मन:स्वास्थ लाभते. त्यामुळे प्रत्येक सेवानिवृत्त व्यक्तीला गोपाळेे यांचे एकच सांगणे आहे की, आपल्या आवडीनुसार एखादी कला वा छंद जोपासा आणि आपले आयुष्य आनंदी करा. रांगोळी हे क्षणिक चित्र असले, तरी पुन्हा साकारली जाणारी रांगोळी अशाश्वत जगाचे भान करून देणारी आणि नव्याने प्रस्थापित होणार्या जीवनानुभूतीची आशा देणारी आहे. आईविषयीचा कृतज्ञभाव म्हणून महादेव गोपाळे यांनी त्यांच्या आईच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पुण्यात कलाप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये कलेने कलेचा सन्मान करण्याचा त्यांचा निर्भेळ हेतू आहे. या कलाप्रदर्शनात अनेक मान्यवर, कलाप्रेमी आणि मोठ्या संख्येने कलाकार सहभागी होणार आहेत. महादेव गोपाळे यांचा हा कलाप्रवास अविरत चालत राहो आणि त्यातून त्यांना आणि कलारसिकांना अधिकाधिक आनंद मिळत राहो, या शुभेच्छा!