ज्ञानसाधनेतून राष्ट्रसाधना

विवेक मराठी    25-Nov-2023   
Total Views |
rss
दि. 29 ऑक्टोबरला रंगा हरीजींच्या मृत्यूची बातमी समजली आणि मन सहा वर्षे मागे गेले. हरीजींचे अद्भुत जीवन समजून घेण्यासाठी मी 21, 22 एप्रिल 2017ला दोन दिवस कोचीला गेलो होतो. त्या दोन दिवसांत सुमारे बारा तास ते बोलत होते आणि मी लिहीत होतो. त्या संभाषणाच्या आधारे हा लेख लिहीत आहे.
ऋषीचे कूळ शोधू नये असे म्हणतात. पण हरीजींसारख्या ऋषितुल्य ज्ञानसाधकाची प्रेरणा शोधण्यासाठी या गोष्टीचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. पोर्तुगीजांचे गोव्यावरील आक्रमण 1510 साली सुरू झाले. त्यांनी लवकरच साष्टी, बारदेश आणि तिसवाडी भागांवर जम बसविला. हरीजींचे घराणे भारद्वाज गोत्राचे गौड सारस्वत शेणॉय! मडगावपासून चार-पाच कि.मी. दूर असलेले कालवे हे या घराण्याचे मूळ गाव. पोर्तुगीजांनी 1540च्या सुमारास गोव्यात आपले अत्याचार सुरू केले. परिणामी हे सर्व गाव ख्रिस्ती झाले. पोर्तुगीजांच्या जाचाला कंटाळून मडगाव आणि साष्टी भागांतील हिंदूंनी 1540-1550 या दशकात केरळला पहिले स्थलांतर केले. हरीजींचे पूर्वजही याच काळात कोची बंदरात आले आणि तेथून एर्नाकुलमजवळील चेरानेल्लूर भागात स्थायिक झाले. हरीजींना गोव्यातील हिंदूंच्या विस्थापनाचे आणि धर्मांतराचे कधी विस्मरण झाले नाही. त्यांचे ‘गोवाईले मतम् मातम्’ हे गोव्यातील हिंदूंच्या धर्मांतरावरील मल्याळम पुस्तक 2011 साली आणि ‘विस्थापनाची कथा’ हे कोकणी खंडकाव्य 2014 साली प्रसिद्ध झाले.
 
हरीजींचे वडील तेरुविपरंबिल जनार्दन रंगा शेणॉय हे मॅट्रिक असून टाटा ऑइल मिल्स कं.लि. (टॉमको) येथे साहाय्यक लेखापाल होते. आपल्या नोकरीच्या 44 वर्षांच्या काळात ते घरून कामाच्या ठिकाणी आणि परत असे दिवसातून चार वेळा दररोज एकूण 14 कि.मी. चालले. त्यामुळे असेल, पण ते वयाच्या नव्वदीपर्यंत जगले (आई पद्मावती वयाच्या ऐंशी वर्षांपर्यंत जगल्या). “दीर्घ ज्ञानसाधनेला दीर्घायुरारोग्य लागते. ही पैतृक संपत्ती मला मिळाली” असे हरीजी म्हणायचे. शालेय वयापासून हुशार विद्यार्थी म्हणून हरीजी प्रसिद्ध होते. चौथीच्या वर्गात शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यांचे पुढील तीन वर्षांचे शिक्षण नि:शुल्क झाले.
 
rss
 
ज्ञानसाधनेचे पहिले संस्कार हरीजींना घरीच मिळाले. “तुला शब्दकोश वाचता आला पाहिजे, मी तुला दररोज कामावरून आल्यावर शब्दकोश कसा वाचावा हे शिकवेन” असे हरीजींच्या वडिलांनी त्यांना एके दिवशी सांगितले. हरीजींसाठी त्यांनी ऑक्स्फर्डचा मोठा इंग्लिश शब्दकोश विकत आणला. मूळ धातू किंवा शब्द कोणता, त्यातून शब्दांची व्युत्पत्ती कशी होते हे हरीजी शिकले - उदा., पॅथी (भाव, अनुभूती) हा मूळ शब्द आहे, त्यातून सिमपॅथी (सहानुभूती), एपॅथी (भावाचा अभाव) अँटीपॅथी (विरोधी भाव) हे शब्द निर्माण झाले. त्या काळात संघाचे सरकार्यवाह असलेल्या एकनाथजी रानडे यांच्याशी हरीजींचा पुढे संपर्क आला. ‘कडक स्वभावाचे’ एकनाथजीदेखील शब्दकोश बाळगत. “मी शब्दकोश वाचतो आणि जाणतो” असे हरीजींनी त्यांना सांगताच “तुम्हाला काय म्हणावयाचे आहे?” असे एकनाथजींनी विचारले. जवळ असलेल्या शब्दकोशाकडे निर्देश करत एकनाथजींनी विचारले, “याला काय म्हणतात?” “डिक्शनरी” असे हरीजींनी उत्तर देताच मग मूळ शब्द ‘डिक्टम’ असून त्यातून ‘डिक्शन’ (शब्दांची निवड), ‘डिक्शनरी (निवडलेल्या शब्दांचा संग्रह), प्रेडिक्शन, कॉन्ट्राडिक्शन, बेनेडिक्शन, ज्युरिसडिक्शन हे शब्द कसे आले, ही चर्चा रंगली. व्युत्पत्तिशास्त्र हा हरीजींचा आवडीचा विषय! म्हणूनच त्यांनी 2006 साली 3830 शब्दांचा ‘भगवद्गीता निघंटु’ हा मल्याळम ग्रंथ लिहिला. ‘विष्णुसहस्रनाम व्याख्यानम’ (2004) हे त्यांचे मल्याळम पुस्तक विष्णुनामांची व्युत्पत्ती आणि अर्थ सांगते. संस्कृत, हिंदी, मराठी, कोकणी, तामिळ, बंगाली, असमिया, नेपाळीसह हरीजींना बारा भाषा अवगत होत्या, पैकी दहा भाषांमध्ये ते अस्खलित बोलू शकत. या सर्व भाषांचे शब्दकोश त्यांच्याकडे होते.
 

rss 
 
सन 1939मध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी एर्नाकुलमवर जपानी बॉम्बहल्ला होणार अशी भीती होती. त्यामुळे हरीजी आणि त्यांची आजी, वडील आणि मोठा भाऊ तेवढे घरात राहिले. हरीजींच्या उरलेल्या दोन भावांना आणि चार बहिणींना घेऊन हरीजींच्या आई सुरक्षित ठिकाणी गेल्या. हरीजींच्या आजी अशिक्षित असल्या, तरी वृत्तीने धार्मिक होत्या. त्यांच्यासाठी हरीजींच्या वडिलांनी महिपतीकृत ‘श्री भक्तविजय’ ग्रंथाचा मल्याळम अनुवाद विकत आणला. या ग्रंथाचा काही भाग हरीने आपल्याला दररोज वाचून दाखवावा असा आजीचा आग्रह असे. त्यामुळे इयत्ता चौथीत असतानाच हरीजींनी हा ग्रंथ वाचून काढला होता. वारकरी संप्रदायाशी बालपणी आलेला हा संपर्क पुढे दृढ होत गेला. ‘थॉट्स ऑन ज्ञानेश्वरी’ हा हरीजींचा छोटेखानी इंग्लिश ग्रंथ 2023 साली प्रसिद्ध झाला. ‘आजीने मला वाचनाची संथा दिली’ असे हरीजी सांगत.
भास्करराव कळंबी, रंगा हरीजी आणि पं. नारायणन
rss 
 
इयत्ता पाचवीत असताना शाळेत दुसरी भाषा म्हणून संस्कृत की मल्याळम (इंग्लिश ही पहिली भाषा होती) अशी निवड करण्याची वेळ आली, तेव्हा “संस्कृत ही आपली भाषा आहे, तिची निवड कर” असे आजीने सांगितले. शाळेत हरीजी नेहमी संस्कृत पठणाच्या स्पर्धांत भाग घ्यावयाचे आणि पारितोषिक पटकवायचे. पुढे बीएलादेखील हरीजींना संस्कृत हा विषय होता. थोडक्यात, इयत्ता पाचवी ते बीए या सर्व काळात हरीजी संस्कृत शिकले. पुढे दि. 3 मे 1951 या दिवशी हरीजी प्रचारक म्हणून बाहेर पडले आणि त्यांनी परूर नगरात कामाला सुरुवात केली. गांधीहत्येनंतरच्या त्या प्रतिकूल वातावरणात हरीजींनी त्या गावातील इंग्लिशचे प्रा. पिशारोडी यांच्याशी मैत्री केली. त्यांनी वर्षभर हरीजींना पारंपरिक पद्धतीने संस्कृत शिकविले. संस्कृतवर प्रभुत्व असल्यामुळे हरीजी मुळातून धर्मग्रंथ अभ्यासू शकले. त्यांनी 1996 साली ‘शंकराचार्य प्रश्नोत्तरी’ या मूळ संस्कृत ग्रंथाचा मल्याळम अनुवाद केला. संस्कृत नीतिवचनांचा ‘लौकिक न्यायांजली’ नावाचा सुमारे 300 पृष्ठाचा संग्रह कर्नल जी.ए. जेकब यांनी 1900 साली प्रसिद्ध केला होता. त्याचे मल्याळम भाषांतर हरीजींनी 2014 साली पूर्ण केले.
 
 
शालेय वयातच विविध ज्ञानशाखांशी हरीजींचा परिचय झाला. इयत्ता आठवी-नववीत असताना अँटनी नावाच्या त्यांच्या गणिताच्या शिक्षकाने त्यांना ‘कटपयादी’ पद्धतीची ओळख करून दिली. एखाद्या अंकाला अक्षराने दाखविणार्‍या या सूत्रांचा खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, संगीत इ.मध्ये उपयोग केला जातो. पुढे 1953 साली त्रिशूर येथे प्रचारक असताना हरीजी खगोलशास्त्र शिकले. ‘ज्योतिष बाल बोधिनी’ हे मल्याळममधील प्रायमर त्यांनी याच काळात वाचले. त्यांना 27 नक्षत्रे ओळखता येत असत. नक्षत्रांची पदे, चरण आणि गणितीय माहिती त्यांना अवगत होती. पुढे 2013 साली दादरच्या ‘पितृछाया’ कार्यालयात बसून 83 वर्षांच्या हरीजींनी पुष्कर भटनागरलिखित रामायणाच्या कालनिश्चितीवरील पुस्तकाच्या एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे प्रदीर्घ नोट्स काढल्या.
 
दीर्घोद्योग म्हणतात तो याला!
संघातील पहिली दोन दशके
 
इयत्ता आठवीत असताना 1944 साली हरीजींचा रा.स्व.संघाशी संपर्क आला. पुरुषोत्तम गोविंद चिंचोळकर हे संघाचे प्रचारक 1943मध्ये कोचीला आले. (पुढे पोटाच्या विकारामुळे त्यांना सहा महिन्यांतच परत जावे लागले.) त्या वेळी डॉ. बळवंत गंगाधर गुंडे कोचीचे संघचालक होते. डॉ. गुंडे 1936 साली बनारस हिंदू विद्यापीठाच्या संघशाखेचे संघचालक राहिले होते आणि तेथे असलेल्या प्रा. माधवराव गोळवलकर गुरुजींचे घनिष्ठ स्नेही होते. लिव्हरपूलहून रसायनशास्त्रात पीएच.डी. मिळवून ते 1941 साली हरीजींचे वडील नोकरीला होते त्या टॉमकोमध्ये मॅनेजर म्हणून लागले. एकदा श्रीगुरुजींचे पत्र घेऊन चिंचोळकर डॉ. गुंडे यांच्याकडे आले आणि तेथून ते दोघे हरीजींच्या वडिलांना भेटावयास आले. पुढे श्रीगुरुजींसह काम करणार्‍या आणि त्यांची सर्व कागदपत्रे पालथी घालणार्‍या त्या शाळकरी मुलाने श्रीगुरुजींचे पत्र पाहिले असेलही!
 
rss
 
 
सन 1948मध्ये बीएस्सी (रसायनशास्त्र)ला हरीजींनी प्रवेश घेतला. पण गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली. कोची-त्रावणकोर हे संस्थान असल्यामुळे तेथे तांत्रिकदृष्ट्या संघावर बंदी नव्हती, म्हणून 12-13 स्वयंसेवकांच्या सत्याग्रही पथकात सहभागी होऊन हरीजींनी कोळिकोल (कालिकत)ला सत्याग्रह केला. (केरळमधून 256 संघस्वयंसेवकांना सत्याग्रहात अटक झाली.) डिसेंबर 1948 ते एप्रिल 1949 या काळात ते कन्नूरच्या कारागृहात होते. या पाच महिन्यांत पांडुरंग किणी (मंगळूर) आणि हरीजी यांनी 150पेक्षा अधिक संघगीते लिहून काढली. अगदी शेवटपर्यंत हरीजींना 250पेक्षा अधिक संघगीते पाठ होती. सत्याग्रहामुळे बीएस्सी अभ्यासक्रम अर्धवट सोडून द्यावा लागला. कारागृहात असताना हरीजींना ‘आर्ट्स’च्या विषयांत रुची वाटू लागली.
 
 
संघकार्याच्या दृष्टीनेसुद्धा ‘सायन्स’पेक्षा ‘आर्ट्स’ उपयुक्त होईल असा विचार करून आपण बीएला प्रवेश घेत आहोत, असे हरीजींनी वडिलांना कळविले. “हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट निर्णय” असे हरीजी सांगत. बीएला अर्थशास्त्र हा त्यांचा मुख्य विषय असून राजकारणशास्त्र, भारतीय इतिहास आणि संस्कृत हे दुय्यम विषय होते.
 
 
बालपणापासूनच हरीजींना लेखनाची आवड होती. इंटरला असतानाच त्यांनी मे 1948मध्ये ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकात ‘विजय’ या टोपणनावाखाली ‘पॉलिसी अँड पर्सन’ या शीर्षकाचा पहिला लेख लिहिला. बीएच्या वर्गात असताना नेहरू-लियाकत करारावर त्यांचा ‘पॉलिसी, प्लेजेस अँड पॅक्ट्स’ हा लेख ‘विजय’ या टोपणनावाखाली ‘ऑर्गनायझर’मध्ये प्रसिद्ध झाला. प्रचारक झाल्यावर 1958 साली श्रीगुरुजींच्या केरळ दौर्‍यावर ‘गुरुजी इन केरला’ हा त्यांचा लेख ‘ऑर्गनायझर’मध्ये‘ ‘एम. हरी’ अशा चुकीच्या नावाने प्रसिद्ध झाला. सन 1951मध्ये ‘केसरी’ हे मल्याळम साप्ताहिक सुरू झाले. आता हरीजी मल्याळममध्ये लेख लिहू लागले. प्रचारक असल्यामुळे स्वत:च्या नावाने त्यांनी लेखन केले नाही. संघाचे अधिकारी काय म्हणतील हा विचारही मनात होता. सन 1953-54 या काळात त्यांनी अनेक लेख लिहिले. एर्नाकुलमचे तत्कालीन प्रचारक भास्करराव कळंबी यांना ते हे सर्व लेख आधी दाखवायचे. पुढे ‘मल्याळराज्य’, ‘ग्रंथलोक’, ‘मातृभूमी’, ‘मल्याळ मनोरमा’, ‘जन्मभूमी’ अशा विविध मल्याळम वृत्तपत्रांत हरीजींनी लेखन केले.
 
दक्षिण भारतात संघाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या दादाराव परमार्थ यांच्या आवाहनानुसार 1950च्या सुमारास हरीजी संघाचे विस्तारक म्हणून महाविद्यालयीन सुट्टीत कालडी येथे गेले. तसेही ते दर शनिवार-रविवारी कालडीच्या रामकृष्ण आश्रमात जात. “मी संघात आलो नसतो, तर बहुधा रामकृष्ण आश्रमात गेलो असतो” असे पुढे हरीजी सांगत. हरीजींचे हे ‘लक्षण’ बघून की काय, एके दिवशी भास्करराव कळंबी अचानक कालडीला आले आणि त्यांनी त्रिपुनीतुरा या कोचीपासून आठ कि.मी. दूर असलेल्या गावी हरीजींची रवानगी केली.
 
 
सन 1955ला केरळच्या संघकामात ‘जिल्हा व्यवस्था’ सुरू झाली आणि हरीजी त्रिशूरचे जिल्हा प्रचारक झाले. कोलकात्याला प्रचारक असलेले केशवराव दीक्षित यांचे वडील दत्तात्रय चंद्रशेखर दीक्षित हे त्या काळात त्रिशूरला होते. त्यांच्या घरी हरीजींचे येणेजाणे असे. केशवरावांच्या भगिनी सुनीती हरीजींना मराठी शिकवत, तर हरीजी त्यांना संस्कृत शिकवत असत. अशा प्रकारे हरीजींनी मराठी शिकून घेतली. पुढे जून 1962मध्ये केरळच्या संघकामात ‘विभाग योजना’ झाली. हरीजी दक्षिण केरळ विभागाचे विभाग प्रचारक झाले. पुढील वर्षी - म्हणजे स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी वर्षात एकनाथजी रानडे यांनी स्वामीजींच्या भाषणांच्या आणि लेखांच्या आधारावर ‘राऊझिंग कॉल टू हिंदू नेशन’ हे संकलन सिद्ध केले होते. ते मल्याळममध्ये भाषांतर करण्याची जबाबदारी भास्कररावांनी हरीजींवर सोपविली. ग्रंथ लिहिण्याचा किंवा अनुवाद करण्याचा हा हरीजींसाठी नवीन अनुभव होता. त्या पहिल्या अनुवादामध्ये कुठेकुठे दुरुस्त्या दर्शविणार्‍या पी. परमेश्वरन यांच्या लाल रेघांच्या आणि कोपर्‍यातील शेर्‍यांच्या आठवणी हरीजी पुढे सांगत असत. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचे किस्से सांगणारे ‘स्मरणांजली’ हे हरीजींचे मल्याळम पुस्तक 1966 साली प्रसिद्ध झाले. त्यानंतर 1978नंतरच त्यांची पुढची पुस्तके आली.
 
आणीबाणीविषयीचे लेखन
 
सन 1957 ते 1959 या काळात ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये पहिली कम्युनिस्ट राजवट होती. सन 1967मध्ये पुन: कम्युनिस्ट राजवट आली. संघस्वयंसेवकांना खोटी पोलीस प्रकरणे, हल्ले आणि हत्या अशा दमनचक्राला सामोरे जावे लागले. दि. 28 एप्रिल 1969ला पहिली हत्या झाली, तेव्हा हरीजी विभाग प्रचारक होते. ‘हृदय पिळवटून टाकणारा आणि मेंदूला झिणझिण्या आणणारा’ असे त्या कालखंडाचे हरीजी वर्णन करत. जिवाला स्वस्थता नसल्यामुळे हरीजींनी ग्रंथलेखन केले नाही. तरीही 1970-71 या काळात त्यांनी मूळ संस्कृत वाल्मिकी रामायण विकत आणले. दररोज किमान 100 श्लोक वाचण्याचा त्यांनी नेम केला. हे वाचन करत असताना ते हिरव्या शाईने कोपर्‍यात आपले शेरे नोंदवून ठेवायचे. सन 1991-2005 या काळात अ.भा. बौद्धिक प्रमुख हे दायित्व पार पाडल्यानंतरच त्यांना रामायण पुन: वाचण्याची सवड मिळाली. त्यांनी एकूण 3-4 वेळा रामायण वाचून काढले. महाभारताच्या वाचनाला अधिक वेळ लागला. ते सर्वप्रथम त्यांनी ऐंशीच्या दशकात वाचले. महाभारताचे बारीक वाचन तीनदा आणि त्यातील काही भाग चार वेळा वाचून काढला. वाल्मिकी रामायणाचे आणि व्यासकृत महाभारताचे साक्षेपी वाचन करून त्यांनी या महाग्रंथांवर अनुक्रमे दोन आणि आठ ग्रंथ लिहिले.
 
 
सन 1975-1977 या काळात देशात आणीबाणी होती. या काळात हरीजी भूमिगत होते. ज्येष्ठ संघकार्यकर्ते मोरोपंत पिंगळे यांच्या योजनेनुसार हरीजींना मुंबई, बेंगळुरू अशा ठिकाणी जाऊन तेथील केरळच्या स्वयंसेवकांशी संपर्क ठेवण्याचे काम देण्यात आले. हरीजींना अनेक भाषा अवगत असल्यामुळे त्यांना हे काम देण्यात आले. भूमिगत असताना त्यांनी वि.स. खांडेकर लिखित ‘ययाती’ ही कादंबरी विकत आणून वाचून काढली. आणीबाणीचा कालखंड केवळ संघस्वयंसेवकांचीच परीक्षा पाहणारा नव्हे, तर एकूण देशातील लोकशाही रक्षणाच्या दृष्टीने निर्णायक होता. अशा महत्त्वाच्या घटनांचे प्रलेखन करण्याचे काम जिकिरीचे असले, तरी भावी पिढ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. हरीजींनी 1978 साली आणीबाणी-विरोधी प्रलेखांचे 300 पानांचे मल्याळम संकलन सिद्ध केले. शिवाय त्याच वर्षी त्यांनी ‘ज्यांनी मृत्यूला आव्हान दिले’ या अर्थाचे शीर्षक असलेले, आणीबाणीत बळी पडलेल्यांच्या व्यक्तिगत अनुभवांचे मल्याळम पुस्तक सिद्ध केले.
 
 
संघसाहित्याचे सर्जन
 
सन 1979मध्ये केरळमधील स्वयंसेवकांचे ‘प्रांत प्रमुख’ म्हणून संघ शिक्षा वर्गाच्या तृतीय वर्षाला हरीजी नागपूरला गेले. त्या 30 दिवसांत आपण ‘केशव : संघनिर्माता’ या चं.प. भिशीकर लिखित डॉ. हेडगेवार चरित्राच्या 26 प्रकरणांचा मल्याळममध्ये अनुवाद करू, अशी महत्त्वाकांक्षी कल्पना त्यांनी उराशी बाळगली होती. पहिल्या दिवशी ते केवळ डॉक्टरांच्या पुतळ्यासमोर बसले. संघ शिक्षा वर्गाच्या काळात त्यांनी चौदा प्रकरणांचा अनुवाद केला. वर्ग संपल्यानंतर अनुवाद पूर्ण केला. अनुवादित ग्रंथाला मूळ ग्रंथाचे मुखपृष्ठ पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुस्तकाच्या 2000 प्रतींच्या पहिल्या आवृत्तीचे मुद्रण पुण्यात करवून घेतले. सरसंघचालक बाळासाहेब देवरसांच्या हस्ते त्याचे प्रकाशन पार पडले.
 
डॉ. हेडगेवारांच्या निवडक पत्रांचा आणि संक्षिप्त जीवनपटाचा मल्याळम अनुवादही हरीजींनी केला, शिवाय डॉक्टरांच्या निवडक विचारांचा परामर्श घेणारे पुस्तकही लिहिले. संघाच्या कार्यपद्धतीचा विकास, संघ प्रार्थना, समर्पण, संघ आणि हिंदुत्वजागृती, राष्ट्र आणि संस्कृती असे अनेक विषय हरीजींनी हाताळले. दादरच्या शिवाजी उद्यान शाखेचे भास्करराव कळंबी 1946मध्ये संघकामासाठी केरळला गेले आणि के. भास्कर राव म्हणून केरळचे पहिले प्रांत प्रचारक झाले. सन 1983 ते 1994 या काळात केरळ प्रांत प्रचारक राहिलेल्या हरीजींनी त्यांचे चरित्र लिहिले, तेव्हा हरीजींचे वय 88 वर्षांचे होते. पण त्यांनी आपल्या अद्भुत स्मरणशक्तीच्या साहाय्याने त्याचे बारीकसारीक तपशील लिहिले.
 
 
तथापि, श्री गोळवलकर गुरुजींविषयी हरीजींनी केलेले लेखन आणि संपादन कार्य हा त्यांच्या एकूण ज्ञानसाधनेचा कळस म्हणावा लागेल. श्रीगुरुजींच्या समग्र साहित्याच्या संकलनाचे आणि संपादनाचे शिवधनुष्य रामभाऊ बोंडाळे, श्रीकृष्ण बवेजा, श्रीधर पराडकर या तीन प्रचारकांच्या आणि डॉ. कृष्ण माधव उपाख्य भैय्यासाहेब घटाटे, डॉ. श्रीकांत त्रिंबक उपाख्य राजाभाऊ शिलेदार, डॉ. लक्ष्मण शंकर जोशी अशा एकूण 30 कार्यकर्त्यांच्या साहाय्याने हरीजींनी उचलले. त्यासाठी संघकार्यालयात या कामासाठी कार्यालय सुरू करण्यात आले. सकाळी 9.30 ते सायं. 6 अशा कार्यालयीन वेळात दररोज काम चाले. मग श्रीगुरुजींना पाहिलेल्या 20-25 ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबर दररोज दोन-तीन तासांची बैठक होत असे. श्रीगुरुजींच्या इंग्लिश, मराठी आणि 10-12 संस्कृत पत्रांचा हिंदीमध्ये अनुवाद करण्याचे काम हरीजींनी केले. ‘श्रीगुरुजी समग्र’चे बारा खंड 2005 साली प्रकाशित झाले. त्याचे सार एकाच पुस्तकात काढण्याचे कामही हरीजींनी ‘दृष्टी और दर्शन’ (हिंदी) आणि ‘श्री गोळवलकर : हिज व्हिजन अँड मिशन’ (इंग्लिश) या ग्रंथांद्वारा केले. श्रीगुरुजी हा हरीजींसाठी श्रद्धेचा आणि चिंतनाचा विषय होता. श्रीगुरुजी जन्मशताब्दी वर्षात त्यांनी अमेरिकेतील विविध राज्यांत जाऊन श्रीगुरुजींच्या अज्ञात पैलूंवर 28 दिवसांत 22 भाषणे दिली. सन 2010मध्ये त्यांनी ‘श्रीगुरुजी जीवन चरित्र’ लिहिले.
 
 
मृत्यू हीच विश्रांती
 
हरीजींचा लेखनप्रवास जो 1948 साली सुरू झाला, तो अक्षरश: त्यांच्या मृत्यूपर्यंत अखंड चालू होता. या 75 वर्षांच्या काळात त्यांनी सहा भाषांत 65 पुस्तके लिहिली. या सगळ्या ग्रंथांची हस्तलिखिते त्यांच्या टाचणांसकट त्यांनी व्यवस्थित जपून ठेवली होती. हरीजींनी असंख्य भाषणे दिली, त्यांतील किती भाषणांच्या पुस्तिका झाल्या याची गणती नाही. अनेक ग्रंथांना त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या. आपण ‘अ.भा. प्रस्तावना प्रमुख’ असल्याचे ते गंमतीने म्हणायचे. प्रगाढ ज्ञान आणि कमालीची ऋजुता यांचा अनोखा संगम त्यांच्या ठायी होता. अहंकार, दुराग्रह, एकलकोंडेपणा हे अनेकदा विद्वत्तेसोबत येणारे विकार हरीजींच्या जवळपासही फिरकू शकले नाहीत. ते आजन्म विद्यार्थीच राहिले.
 
 
हरीजींच्या ग्रंथलेखनाची सुरुवात स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथाने झाली. त्यांचा शेवटचा ग्रंथ योगायोगाने ‘श्रीरामकृष्ण कथामृत’वर आधारलेला असून तो त्यांनी 26 जून 2023 रोजी लिहून पूर्ण केला. हा आपला अखेरचा ग्रंथ असल्याचे त्यांनी नमूद केले होते. तो ग्रंथ अद्याप प्रकाशित व्हायचा आहे. युधिष्ठिर, ज्ञानेश्वरी, पृथ्वीसूक्त आणि श्रीरामकृष्ण कथामृत या त्यांच्या अखेरच्या ग्रंथांवर काम करताना ते स्थितप्रज्ञाप्रमाणे कर्करोगाला सामोरे गेले. तीन वेळा अतिदक्षता विभागात राहावे लागले. मृत्यूच्या तीन दिवस अगोदर त्यांनी नव्याने परिचय झालेल्या डाव्या विचारांच्या डॉक्टरला आपले काही ग्रंथ भेट म्हणून दिले होते.
 
हरीजींची आयुष्यभर जोपासलेली ज्ञानसाधना सहेतुक होती. त्यांच्या राष्ट्रसाधनेचाच तो एक भाग होता. वज्रास्त्र तयार करण्यासाठी आपल्या अस्थी अर्पण करणार्‍या दधिची ऋषींच्या आणि शरपंजरी असताना उपदेश करणार्‍या भीष्माचार्यांच्या कथा आपण वाचल्या आहेत. मृत्यूला धीरोदात्तपणे सामोरे जात असताना केवळ देव, देश आणि धर्म यांचाच विचार करणार्‍या आणि त्यांवर लेखन करणार्‍या हरीजींचे कूळ काही वेगळे नाही. ते शरीररूपाने आपल्यात नसले, तरी विचाररूपाने आणि ग्रंथरूपाने सदैव आपल्यात आहेत.

डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले

शिक्षण व व्यवसाय

एमबीबीएस व एमडी (मेडिसिन) - सेठ जीएस मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालय मुंबई; डीएनबी (एण्डोक्रायनॉलॉजी) - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली; पुणे-स्थित मधुमेह व ग्रंथीविकार तज्ज्ञ

 

लेखन: मराठी पुस्तके

'मधुमेह' (सहलेखन), 'अहिंदू लोकसंख्येचा विस्फोट', 'इस्लामचे अंतरंग', ‘बौद्ध-मुस्लिम संबंध: आजच्या संदर्भात', 'मार्सेलीसचा पराक्रम: सावरकरांची शौर्यगाथा', ‘मागोवा खिलाफत चळवळीचा’

 

लेखन: हिंदी पुस्तके

‘शुद्धि आंदोलन का संक्षिप्त इतिहास: सन ७१२ से १९४७ तक’, ‘ईसाइयत: सिद्धान्त एवं स्वरूप’

 

लेखन: इंग्रजी पुस्तके

‘Full Life with Diabetes' (co-author), Savarkar’s leap at Marseilles: A Heroic Saga, ‘Krantiveer Babarao Savarkar’ (online), ‘Khilafat Movement in India (1919-1924)’

 

ग्रंथ संपादन

'हिंदू संघटक स्वा. सावरकर', 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार','द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस'

 

ग्रंथ अनुवाद

'जिहाद: निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धांत' (सह-अनुवादक, मूळ इंग्रजीतून मराठीत), ‘Love jihad’ (मूळ मराठीतून इंग्रजीत)   

 

संकेतस्थळ निर्मिती सहभाग
www.savarkar.org , www.golwalkarguruji.org    

मधुमेह व हॉर्मोनविकार या विषयांसंबंधी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये शोधनिबंध; सामाजिक विषयांवर स्फुट व स्तंभलेखन