॥युगन युगन हम योगी॥

विवेक मराठी    01-Nov-2023   
Total Views |
 
 
vivek
कबीराने वाट दाखवली मुक्तीची, मौनाची. काहीच नसण्यात सारं काही असण्याची. देवासला गेल्यावर स्वरदेहात एक मोठ्ठी पोकळी निर्माण झालेली. एक संपूर्ण रिक्तता. स्वत:च्या कंठातून स्वरमूर्त निर्माण करून त्या रिक्त गाभार्‍यात तिची प्रतिष्ठापना करावी, हे संभव नव्हतं. मग ती भरली गेली निर्गुणाच्या चिंतनाने. हळूहळू निर्वाणाच्या चिंतनाने आतला कोलाहल शांत होत गेला. दृष्टी स्वच्छ झाली आणि मग आपली वाट स्पष्टपणे दिसू लागली.
कुमार गेले, तेव्हा रामूभैया दाते म्हणाले होते, “लोक मृत्यूनंतर स्वर्गात जातात. पण कुमार तर स्वर्गातून आला होता! तो कुठे जाईल? तो तर युगानुयुगांचा स्वरप्रवासी. त्याला कसलं येणं-जाणं? ब्रह्मांडाचा नाद ऐकत त्या विस्तीर्ण पोकळीत गात गात तो गानयोगी अखंड फिरतोच आहे. आपल्याकरता मध्येच पृथ्वीवर येऊन गेला, इतकंच.”
 
 
खरंच, कुठल्या अनाहताच्या प्रदेशातून आला होता तो, कोण जाणे! पण ‘हम परदेसी पंछी बाबा, अणी देसरा नाही’ म्हणतच तो आला. कंठात दैवी सूर भरून आणि गंधर्वाच्या गायकीचे पंख लेवून वयाच्या पाचव्या वर्षापासून स्वरप्रदेशात निर्भय संचार करू लागला. आतूनच असलेली स्वरांची उमज आणि स्वतंत्र प्रज्ञा यामुळे संगीताची मन:पूत लूट करत तो निघाला होता. राग-ताल याची काहीही समज, कुठलंही लौकिक शिक्षण नसताना बालवयात घेतलेली झेप पाहून भले भले चकित होत होते.
 
‘मुख बिन गाना,
 
पग बिन चलना,
 
बिना पंख उड जाई।
 
बिना मोह की सूरत हमारी अनहद में रम जाई।’
 
असाच तो होता. ‘आम्ही परमात्म्याच्या प्रदेशातून आलेले पक्षी. या जगातले नव्हेच. आम्ही मुख नसताना गातो, पाय नसताना चालतो आणि पंख नसताना उडून जातो. आम्हाला कशाचीच गरज नाही, न कशाचा मोह. हे आमचं निर्मोही रूप सदैव अनाहत नाद ऐकण्यात रमून गेलेलं असतं, सदैव ब्रह्मानंदात लीन. या जगात राहणार्‍या लोकांना मात्र ‘स्व’चं जराही भान नाही आणि त्यामुळे ते अज्ञानी लोक सदा पश्चात्ताप करत असतात.. ‘अणी देसरा लोग अचेता पलपल पर पछताई।’
 
दहाव्या वर्षी ‘कुमार गंधर्व’ पदवी पदरात पडली. पण संगीताच्या बाजारात त्याला उभा न करता अकराव्या वर्षी वडिलांनी त्याला बी.आर. देवधरांच्या ओटीत घातला. गुरूच्या छत्रछायेत गंधर्व गायकी बहरली. बालवयात अंगावर चढलेलं प्रसिद्धीचं खोगीर देवधरांनी उतरवलं आणि मुक्त संचार करणार्‍या वारूला गाण्याच्या शिस्तीत बांधलं. कुमारांच्या स्वभावातली बंडखोरी, उत्स्फूर्तता, सर्जकता सार्‍याला गुरुस्पर्शाने योग्य वाट मिळाली.
 
‘गुरुजीने दियो अमर नाम..
 
गुरु तो सरिखा कोई नाही रे..
 
अलख भरया है भंडार, कमी जा मे नाही है।’
 
- ‘अनादि-अनंत अशा परम ईश्वराचं अमृतनाम मला माझ्या गुरूने दिलं. गुरूंसारखा त्राता नाहीच! हे निर्गुणाचं भांडार गुरूंनी खुलं केलं, ज्याच्यात कधी घट होत नाही!’
 
या अवलियाच्या अंत:करणातल्या तानपुर्‍याच्या अनुनादाने देवधर स्कूलमधल्या भानुमती नावाच्या सुरेख आणि सुरेल तानपुर्‍याच्या ताराही झंकारू लागल्या. भानुमती आणि कुमार विवाहबद्ध झाले. लोकप्रियतेचं शिखर गाठलेलं आणि सोबतीला सुयोग्य सहचरी. अशा रंगत चाललेल्या मैफिलीत ऐन मोक्याच्या क्षणी एक तार तटकन तुटली. कलकत्ता कॉन्फरन्समध्ये गाऊन आले आणि येताना सर्दी-खोकला घेऊन आले. उतार पडेना, म्हणून तपासण्या झाल्या, तर तपासणीत क्षय निघाला.
 
vivek 
 
कबीराच्या रोकड्या शब्दांची भेट नंतर झाली असेल, पण प्रत्यय मात्र आला असणार 47 सालीच.
 
‘रंक निवाज करे वो राजा, भूपति करे भिकारी।
 
अवधूता, कुदरत की गत न्यारी!’
 
- ‘नियतीचा खेळ और असतो. ती क्षणात एखाद्या गरिबाला राजा बनवते, तर सम्राटाला भिकारी!’
 
स्वरसम्राट म्हणून डौलात चाललेली यात्रा अचानक थांबली. क्षयासारख्या दुर्धर आजारामुळे ‘सा’ लावणंदेखील मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. डॉक्टरांनी गाण्यावर संपूर्ण बंदी घातली. विवाहाच्या पहिल्या वर्षातच सुखाला ग्रहण लागलं. काय मन:स्थिती झाली असेल?
 
कुमार म्हणतात, “देवासची हवा फुप्फुसाला मानवणारी, म्हणून भानूचा हात धरून देवासला आलो. तिच्या शिक्षिकेच्या नोकरीमुळे ठरावीक मिळकतीची निश्चिंती झाली.”
 
देवासमधला परीक्षेचा काळ. स्ट्रेप्टोमायसीन उपलब्ध होऊन वाढीव आयुष्याचं दान मिळायला पाच वर्षं लागली. पण गाणं हेच जगणं असलेल्या कलावंतासाठी शरीर जिवंत राहण्यापेक्षा अधिक मोलाचं होतं आतलं गाणं जिवंत राहणं. देवासची कोरडी हवा आणि भानुताईंची निरलस सेवा यामुळे शरीर जगत होतं. पण कुमारांच्या आतल्या संगीताला जगवलं ते देवासमधल्या लोकसंगीताने. इथेच घराबाहेरून जाणारे साधू, संन्यासी, टांगेवाले, वाटसरू, भिकारी यांच्या तोंडून बाहेर पडणार्‍या निर्गुणी भजनांनी त्यांना एक नवं विश्व सापडलं. देवासमध्ये असताना दररोज सकाळी कुमार आणि भानुमती फिरायला जात. त्या फेरीत ऐकू येणारं निर्गुण संगीत ते टिपून घेत, सोबत घेऊन येत.
 
 
‘मै जागू म्हारा सदगुरू जागे, आलम सारी सोवे’ म्हणत जगाला जागं करणारा कुणी भेटत असेल, कुणी ‘गुरा तो जिने ग्यान की जडिया दई, सतगुरु जिने ग्यान की जडिया दई’ म्हणत आपल्याला मिळालेली अद्भुत जडीबुटी दाखवत सुटला असेल! ‘मन बावरा भयो मोरा रे स्वामी’ म्हणत एकतारी घेऊन मुक्तकंठाने गात आपल्याच नादात निघालेला कुणी भिकारी, ‘चार जने मिल खाट उठाइन, चहू दिसी धूँ धूँ उठल हो। कहे कबीरा सुनो भाई साधो, जगसे नाता छूटन हो। कौन ठगवा नगरिया लूटन हो।’ असं मृत्यूच्या महोत्सवाचं गीत बेहोष होऊन गात असलेला कुणी फकीर.. यांच्याकडे त्यांना कबीर भेटला आणि मग त्याच्यासोबत गोरखनाथ, देवनाथ, शिवगुरू हे निर्गुणाचे वाटाडे भेटीला आले.
 
 
कुमार सांगत, “निर्गुणाचं सौंदर्य मला जाणवलं ते माळव्यामध्ये. देवासमध्ये एक शीलनाथ महाराज होते, त्यांच्या मठात सकाळ-संध्याकाळ गाणं चालत असे. निर्गुणी भजनं गाणार्‍यांचा तो अड्डाच होता! मी माळव्यात या निर्गुणी भजनांचा सुस्वाद चाखला. माळव्यातले भिकारीसुद्धा निर्गुणी भजनं सुरेख गात. एखादी ओळ, एखादा चरण घेऊन घोळवत, आळवत, गात फिरायचे. कुठल्यातरी अंधार्‍या कोपर्‍यात बसून निर्गुणी गात असायचे. एखादा मुखडा, एक तुटकी एकतारी, इतक्यावर आयुष्य जायचं त्यांचं. वाटलं की कितीतरी सांगता येईल या भजनांमधून, आपण सांगायला हवं. मग शोधू गेलो, तर समुद्रच सापडला. निर्गुणात काहीच नाही. मूर्ती नाही, वर्णन नाही, आहे फक्त तत्त्व. अवस्था. स्थिती. मग हे गाण्यातून कसं दाखवता येईल, याचा विचार सुरू झाला.”
 
देवासमधल्या नवीन घरातील एकांतात मौनातलं संगीत शोधण्याचा प्रयास सुरू झाला.
 
‘वा घर सबसे न्यारा, सखिया.. जहां पुरण पुरुष हमारा।’
 
कबीर सांगत होता - ‘त्या पूर्ण पुरुषाचं घर अद्भुत आहे. तिथे सुख-दु:ख, सत्य-असत्य, दिन-रात, पाप-पुण्य काही नाही. चंद्रसूर्याविनाच तिथे दिव्य प्रकाश असतो. तिथे पिंड-ब्रह्मांड, अहं-सोहम नाही, त्रिगुण-पंचमहाभूतं काहीच नाही!’
कबीर म्हणतात की
 
‘जहां पुरुष तहवा कछु नाही, कहे कबीर हम जाना।
 
हमारी सैन लखे जो कोई, पावै पद निरवाना।’
 
- ‘मला एक कळलंय की जिथे त्याचं वास्तव्य आहे, तिथे अन्य काहीच नाही. हे माझं सांगणं ज्याला कळेल, त्याला निर्वाणपदाची प्राप्ती होईल.’
 
 
vivek 
 
कबीराने वाट दाखवली मुक्तीची, मौनाची. काहीच नसण्यात सारं काही असण्याची. देवासला गेल्यावर स्वरदेहात एक मोठ्ठी पोकळी निर्माण झालेली. एक संपूर्ण रिक्तता. स्वत:च्या कंठातून स्वरमूर्त निर्माण करून त्या रिक्त गाभार्‍यात तिची प्रतिष्ठापना करावी, हे संभव नव्हतं. मग ती भरली गेली निर्गुणाच्या चिंतनाने. हळूहळू निर्वाणाच्या चिंतनाने आतला कोलाहल शांत होत गेला. दृष्टी स्वच्छ झाली आणि मग आपली वाट स्पष्टपणे दिसू लागली.
 
देवासमधलं घर कुमारांच्या सांगीतिक पुनर्जन्माचं ठिकाण ठरलं. या घरातल्या साधनेतच त्यांना संगीताचं मर्म गवसलं. बाहेर निर्गुणी भजनांचे झरे वाहत आणि बागेत पक्ष्यांची गाणी! कुमार मौन राहून हे सारे ध्वनी टिपत होते. बागेत टेपरेकॉर्डर लावून पक्ष्यांचे आवाज टेप करत होते. माळव्याच्या भूमीत सार्‍याच जाणिवा समृद्ध झाल्या, संवेदना तीव्र झाल्या. देवासमधल्या मेंढकी रोडवर बेडकांची खर्जातली संगीतसाधना सुरू असे. तीही त्यांनी कानात साठवली. संगीत असं चहूबाजूंनी वेढून घेत राहिलं. हळूहळू संगीत, लोकजीवन, निसर्ग, प्राणिजीवन, परंपरा, संस्कृती, मानवी स्वभाव सार्‍यांचं नातं उलगडत गेलं. परमेश्वर काय, आनंद काय किंवा संगीत काय.. आत शोधायला हवं, हे उमगलं.
 
सुरुवातीच्या काळात कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही कुमारांच्या मनात एक अस्वस्थता होती. अपूर्णतेची एक जाणीव. ती रुखरुख नंतरच्या चिंतनकाळात फळली, फुलली. जणू वेदनेचा वेद झाला. आतल्या संगीताला बहिर्मुख होण्याला असलेली बंदी ही इष्टापत्ती ठरली आणि संगीत अंतर्मुखी बनलं. कबीरांच्या आणि अन्य संतांच्या निर्गुणी रचना यांच्या विचारांची चौकट त्या चिंतनाला लाभली आणि जीवनविषयक मूलभूत सत्यं कुमारांना गवसली. कबीराच्या रचनेतल्या सिंहशावकासारखी.
‘केहर सुत ले आयो गडरिया।
 
पाल पोस उन कीन्ह सयाना।
 
करत कलोल राहत अजयन संग।
 
आपण मर्म उनहू नाही जाना।’
 
- ‘रानात भटकणार्‍या सिंहाच्या छाव्याला एक मेंढपाळ आपल्या घरी घेऊन आला. त्याला नीट सांभाळला. मोठा होऊन तो सिंह मेंढरांसारखाच ओरडू लागला. आपण कोण आहोत ते त्याला उमगलंच नव्हतं. एकदा एक सिंह फिरत फिरत त्या ठिकाणी आला आणि त्या छाव्याची अवस्था पाहून त्याला आपल्यासोबत जंगलात घेऊन गेला आणि त्याला त्याच्या स्वरूपाची ओळख करून दिली. सदगुरू हेच करतात.’
 
‘बिन सदगुरू नर रहत भुलाना।
 
खोजत फिरत राह नाही जाना।
 
अर्ध उर्ध बिच लगन लागी है।
 
छक्यो रूप नाही जात बखाना।
 
कहत कबीर सुनो भाई साधो।
 
उलटी आप मी आप समाना।’
 
- कबीर सांगतात, ‘जरा उलटे फिरून पाहा.. बाहेर शोधायच्याऐवजी आत शोध, मग उर्ध्व, अधर सर्व दिशांना तोच आहे, तो तुझ्यातच सामावलेला आहे हे तुला कळेल.’
 
अशी अंतर्मुख होण्याची संधी मिळाली, तरीही त्याचं सोनं करण्यासाठी मुळात कलावंताचा पिंड तसा असावा लागतो. कुमारांच्या निर्मळ आणि निर्भय मनात अनुभवाच्या मुळाशी जाऊन सत्य शोधण्याची क्षमता होती. त्यांची स्वरसाधना निर्गुण साधनेच्या मर्मापर्यंत त्यांना घेऊन गेली.
 
निर्गुणी रचना ऐकताना आपणही कुमारांच्या स्वरांचं बोट धरून तिथे पोहोचतो आणि मग तिथल्या अलौकिक शांततेचा, शून्यतेचा प्रत्यय आपल्याला येतो. निर्गुणी भजनं म्हणजे शून्यातून निघणारे आणि अवकाशाला व्यापून टाकणारे सूर. पण अवकाश समजायलासुद्धा त्याला काहीतरी बाह्याकार, सीमा आखाव्या लागतात. नुसता असीम-निराकार-अथांग अवकाश समजत नाही, झेपत नाही. कबीरांनी आणि कुमारांनी तो अवकाश रेखून दाखवला. ‘शून्य’च्या केवळ उच्चारणातून कुमार अवकाशाचा प्रत्यय कसा देतात, ते श्रवणीय आहे.
 
‘शून्य गढ शहर, शहर धर बस्ती।
 
कौन सूता कौन जागे है। लाल हमारे हम लालन के।
 
तन सूता ब्रह्म जागे है।’
 
एकदा एका सिद्धयोगी पुरुषाला एका पाश्चात्त्य चिकित्सकाने प्रश्न विचारला, “तुमच्या शरीरात आत्मा आहे, यावर तुमचा विश्वास आहे काय?” ते उत्तरले, “नाही.” बाकीचे चकित होऊन पाहू लागले. ते शांतपणे पुढे म्हणाले, “मुळात मी आत्माच आहे. हे माझं आत्ताचं शरीर आहे.” गोरखनाथांनी किती सुंदर पद्धतीने हे सत्य सांगितलं - ‘शून्य गढ म्हणजे शून्याचा किल्ला. निर्गुण-निराकाराचं स्थान. इथे शहर म्हणजे शरीर. शरीर त्याला धरून बसलं आहे. पण या सत्याविषयी कोण जागरूक आहे? गोरखनाथ म्हणतात, ‘मी त्याचा-तो माझा’ हे सत्य मला इतकं चांगलं ठाऊक आहे की माझं शरीर जरी झोपलं असलं, तरी आतलं ब्राह्म सदैव जागृत आहे.’
 
निर्गुणी भजनं हा केवळ भजनांचा एक प्रकार नाही. निर्गुणाचा साक्षात्कार घडवण्याचं ते एक माध्यम आहे. कुमार म्हणत, “निर्गुणी भजन ऐकताना भान हरपलं पाहिजे. तो परिणाम नाही निर्माण करता आला, तर ते निर्गुणी भजन नाही. निर्गुण ही अवस्था आहे, स्थिती आहे, अनुभव आहे, वस्तू नाही. निर्गुण गाताना स्वरात एक फक्कड मस्ती हवी. ते कानाला छान छान, गोड गोड वाटण्याकरता नाहीच.” त्यामुळे कुमारांच्या भजनात त्याला उठाव येण्याकरता लग्गी वगैरे लावत नाहीत. निर्गुण गाताना रचनेचं माधुर्य, सौंदर्य, वाद्यमेळ, अनावश्यक आलापी, काहीच लागत नाही. तिथे एकांत आहे. नि:शब्दता. शून्यता.
 
 
नाना वस्त्रालंकार घातलेली, तुळशीमाळांनी दाटलेली गुलाल -बुक्क्याने माखलेली श्रीविठ्ठलाची मूर्त किती देखणी दिसते! नजर हटत नाही त्यावरून. पण पहाटे ते सारं उतरवतात, आतली निखळ मूर्ती उभी असते आणि मग धुपाच्या रेषांतून, पंचामृताचे ओघळ वाहत असताना अस्पष्ट धूसर अशी जी श्रीमूर्त दिसते, ती पाहताना आपण त्या निर्गुण-निराकाराचा अनुभव घेत आहोत असं वाटतं. कुमारांच्या गाण्यातले सारे अलंकार, चमत्कृती, बुद्धिगम्य आनंद सारं ते उतरवत निर्गुण गाताना. निखळ सत्याचं दर्शन घडवत.
 
 
केवळ एकतारी, नाहीतर तानपुरा यांच्या सोबतीने चालणारं हे मातीतलं संगीत. त्याला आपल्यासमोर ठेवताना ती माती पुसून, स्वच्छ करून, नागरी बैठकीतल्या संगीताचा सिल्कचा झब्बा घालून त्यांनी आणलं नाही! त्यांची भजनं फकीराच्या वापरून मऊसूत झालेल्या साध्या कफनीतच मंचावर आली.
 
आपला देह हे परमात्म्याने विणलेलं सुंदर तलम वस्त्र आहे, हे सांगताना कुमारांचा स्वरही तसाच तलम होऊन जातो एकदम रेशमाच्या रेघांसारखा.
 
‘झीनी झीनी झीनी, बीनी चदरिया’ - बाबा रे, ही देहाची चादर उधार मिळालीय हे ध्यानात आहे नं तुझ्या? नऊ महिने नऊ दिवस खपून ही विणताना गंगा-यमुनेसारख्या इडा-पिंगला यांचे ताणेबाणे वापरले आणि सरस्वतीरूपी सुषुम्नेच्या तारेने त्यांना घट्ट बांधून टाकलं. चक्रांच्या रूपाने शरीरात आठ ठिकाणी हे चरखे कमळासारखे डोलत आहेत. पाच महाभूतं, तीन गुण यांनी ही चादर सजली. सुर-असुर, नर-साधू सर्वांना मिळताना सारखीच चादर मिळाली. बहुतेक लोक ती बेपर्वाईने वापरून जीर्ण करून परत देतात, पण कबीरासारखी जपून वापरली तर ती ‘ज्यों की त्यों’ परत करता येते.
 
कुमार कबीर भजनं गाऊ लागले, तेव्हा ‘एक स्वरगंधर्व भिकार्‍यांची गाणी गात आहे’ अशी टीकाही झाली. पण ते गात राहिले. कबीर त्यांनी नुसता वाचला ऐकला नाही, पचवला होता. ते लोकांना सांगत राहिले, “ऐका, कबीर काय सांगतोय..”
‘अवधूता ऽऽऽऽ गगन घटा गहारानी रे।’
 
- ‘ऊठ, जागा हो. तुझं शेत नांगरायची वेळ आलीय. सगळे योग जुळून आलेत. पश्चिमेकडून वारे वाहत आहेत, मेघ हलके हलके बरसत आहेत. आता ही जलवर्षा वापरून आपलं शेत भिजवून घे, नाहीतर ही अमृतवर्षा वाया जाईल.’
‘पश्चिम दिशासे उलटी बादल, रुमझुम बरसे मेहा..
 
उठो ग्यानी खेत सम्हालो बिगै निसरेगा पानी।’
 
- ग्यानी, अवधूत म्हणजे योगी. ज्ञानी पुरुष. त्यांच्याकरता कबीर म्हणतात की ‘साधनेचे ढग गडगडू लागले आहेत. मूलाधारापासून उलट प्रवास करत येणारी ऊर्जा सहस्रार चक्रापर्यंत पोहोचून अमृताची वर्षा करायला सिद्ध आहे. आता ही संधी दवडू नको.’
‘निरत सुरत के बैल बनाओ, बीजा बोवो निज धानी।
 
दुबध्या दूब जमन नहिं पावे, बोवो नामकी धानी।’
 
- निरत म्हणजे संसारात रमलेलं चित्त काढून घेणं आणि सुरत म्हणजे स्मृती. ईश्वराची आठवण. संसारातून विरक्ती आणि ईश्वराचं स्मरण याचे बैल बनवून आपल्या चित्ताची भुई नांगरून टाक आणि त्यामध्ये बीज पेरून घे. दुबध्या म्हणजे दुविधा. दूब हे धूप या अर्थी येतं. संशय, शंका याचं ऊन पडलं तर जमिनीत केलेली नांगरट वाया जाईल, म्हणून त्या उन्हाचा जम बसू देऊ नको आणि पटकन बी पेरून टाक. कसलं? नामाचं. बोवो नामकी बानी!’
 
सगळे संत पुन्हा पुन्हा हा साधा सरळ मार्ग सांगतात. पण आपण काही बधत नाही. तरीही ते सावध करतच राहतात आपल्याला. जगाचं हिरवंगार कोवळं लुसलुशीत गवताचं कुरण आणि त्यात खालमानेने चरत सुटलेले आपण.. आपल्या कानात येऊन कुमार सांगतात, ‘जरा सावध.. जपून राहा.’
 
‘हिरना, समझ बूझ बन चरना।’
 
- ‘तुला चरतच राहायचं असेल तर खुशाल चर, पण ज्ञानाच्या कुरणात चर. योगाच्या प्रदेशात चर.’
 
‘एक बन चरना, दूजे बन चरना।
 
 
तीजे बन पग नाही धरना।’
 
- ‘तिसरं वन मात्र मायेचं आहे, तिथे पाऊलही टाकू नकोस.’
 
‘तीजे बनमे पांच पारधी। उनके नजर नाही पडना।’
 
- ‘त्या मायेच्या किंवा देहाच्या वनात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे मोहात पडणारे पाच शिकारी टपून बसलेले आहेत. तू जसा मायेच्या वनात फिरतो आहेस, तसंच तुझ्या शरीरात पाच महाभूतांची हरणं चरत आहेत. त्यांच्यापासून तयार होणार्‍या पंचवीस तत्त्वांच्या हरिणीही फिरत आहेत. पण त्यांच्यापैकी कुणीही शहाणं नाही की जे तुला यापासून लांब ठेवेल.’
 
‘पांच हिरना, पचीस हिरनी, उनमे एक चतुर ना।’
 
- आणि ही केवळ चतुर नाहीत असं नव्हे, तर क्रूर आहेत. त्यांना तुझ्या कल्याणाशी काही देणंघेणं नाही. तुला या कुरणातच अखेरपर्यंत गुंतवून ठेवणं हेच त्याचं काम. ते तुझी पुरती वाट लावतील. कळवळून सांगतात ते..
 
‘तोय मार तेरो मांस बिकावे।
 
तेरे खाल का करेंगे बिछौना।’
 
- तुला विकून खातील! म्हणून सांगतो, ‘हिरना, समझ बूझ बन चरना।’
 
तरीही नाही समजलं? या हरणासारख्या सुंदर शरीराचा किती अभिमान धरशील? ऐका.. गोरखनाथही तेच सांगत आहेत.
 
‘धन रे जोबन सपनेसी माया।
 
बादल की सी छाया।
 
भोला मन जाने अमर मेरी काया।’
 
- ‘तुझ्या भाबड्या मनाला वाटतं आहे की हे शरीर तुला कायमसाठी मिळालं आहे. जणू काही अमर आहे. पण हे यौवन, हे धन सारं स्वप्नासारखं फसवं आहे. ढगाची सावली असावी तितकं क्षणिक. वाळूच्या भिंती आणि वार्‍याचे खांब यावर तुझ्या देहाचं हे देऊळ उभं आहे. त्याचा तुला इतका भरवसा आहे हे पाहून मी थक्क झालो!’
 
‘बालू की भीत, पवन का खंबा। देवल देख भया है अचंबा!’
 
तरीही नाहीच उजाडत. मग कुमार आणखी एक युक्ती करतात. भवनदीच्या तिरावर आपल्याला घेऊन जातात. त्यात एक नाव शांतपणे निघालीय लाटांवर डुलत डुलत. त्यात कोण आहे? कबीर! कुमारांचं बोट धरून आपण त्या नावेत पाय ठेवू. कुमार गात आहेत की कबीर ते कळत नाही, पण आपण त्या नावेसारखे डोलू लागतो. नदीच्या पाण्यासारखा अगदी सौम्यशीतल पण पोटातून ऊबदार लागतो कुमारांचा स्वर. अगदी निश्चिंत, निर्भय असा. कुमारांच्या निरंतर चाललेल्या आनंदयात्रेचा अनुभव आहे हे पद!
‘नैया मोरी निके निके चालन लागी।
 
आंधी मेघा कछु ना व्यापे, चढे संत बडभागी।’
 
- ‘माझी साधनेची नाव आता छान मार्गाला लागली आहे. या नावेत बसायला मिळणारे संत मोठे भाग्यवान. कारण या नावेत एकदा चढलं की कसलंच भय नाही. संसारातलं घनघोर वादळ असो किंवा संकटांचे काळेकुट्ट ढग असोत, कशाचाच आता त्रास होत नाही.’
 
‘उथले रहतो डर कछु नाही।
नाही गहरे को संसा।
उलट जाये तो बाल न बांका
वाह जब रे तमासा।’
- ‘पाणी अगदी उथळ असलं, तरी रुतून बसण्याचं भय या नावेला नाही आणि फार खोल पाणी असेल तर हिचं काय होईल अशी शंकाही घेण्याचं कारण नाही. कारण ही नाव अशी अद्भुत आहे की ही उलटी झाली, तरी प्रवाशाच्या केसालाही धक्का लागत नाही!’
 
माझ्या सद्गुरूंवर मी जीव ओवाळून टाकतो, कारण त्यांनीच मला ही वाट दाखवली. गुरूंना अज्ञाताच्या सार्‍या वाटा दिसतात, सारे अज्ञाताचे ध्वनीही ऐकू येतात.
 
‘सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी।
 
गगन में आवाज हो रही झीनी झीनी।
 
पहिले आये नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी।
 
सब घट पूरण पूर रह्या है अलख पुरुष निरबानी।’
 
- ‘प्रथम काहीही नव्हतं. तिथे सोहम नाद प्रथम निर्माण झाला आणि मागून सगळं विश्व निर्माण झालं आणि मग तो अलख पुरुष म्हणजे अदृश्य परमात्मा कसा सार्‍याला व्यापून राहिला, ते निरबानी म्हणजे अवर्णनीय आहे!’
 
कबीरांच्या अनेक रचना योगमार्गाचा प्रवास, चक्रांची जागृती, कुंडलिनी जागृती यावर आधारित आहेत. हे सारं ज्ञान आपल्याला देणार्‍या गुरूविषयी कृतज्ञता आहे. गुरूविषयी बोलताना कबीरांचाच काय, गोरखनाथांचाही ऊर अगदी भरून येतो. कुमारही अगदी खुल्या, उंच स्वरात जणू गुरूंना आश्वासन देतात की ‘मी तुम्ही दाखवलेल्या मार्गावरूनच जाईन. दुसर्‍या कोणत्याही मोहाला बळी पडणार नाही, याची खात्री बाळगा.’
 
‘गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊँ जी।
 
दूजे के सांग ना जाउँ जी।
 
दुख ना जानू जी, दरद ना जानू जी।
 
मैं ना कोई बैद बुलाऊ जी।
 
सदगुरू बैद मिली अविनाशी
 
वाको ही नाडी बताऊँ जी।
 
पत्ती न तोडू जी, पत्थर न पूजूँ जी।
 
ना कोई देवल जाऊँ जी
 
बन बन की मैं लकडी न तोडू
 
ना कोई झाड सताऊँ जी!
 
काहे गोरख जी सुनो हो मछिंदर।
 
मैं ज्योत में ज्योत मिलाऊँ जी।
 
सतगुरु के मैं शरण गये से
 
आवागमन मिटाऊँ जी।’
 
- ‘हे सद्गुरू, मी आता तुमच्याशी एकरूप झालो आहे, तुम्हाला शरण आल्यामुळे आता मला जन्म-मरणाच्या येरझार्‍या घालायचं कारण उरलं नाही.’
 
कबीर म्हणाला तसं परमेश्वराचं घर हे आपलं खरं कायमचं घर. तिकडे एकदा गेलं की परत येणं नाही. मला माझ्या घरी जायची ओढ लागलीय.
 
‘साई की नगरी परम अती सुंदर।
 
 
जहां कोई जाय न आवै। नैहरवा हमको न भाये!’
 
- ‘पण मला आता इथे करमत नाही, हा माझा संदेश तरी मी तिकडे कसा पाठवू, ते मला कळत नाही. ही माझी व्यथा त्याला कोण सांगेल?’
 
‘केही बिधी ससुरे जाऊँ मोरी सजनी।
 
बिरहा जोर जरावै, विषैरस नाच नचावै।’
 
- ‘माझ्या घरी जाण्याचा कोणताच मार्ग मला सापडत नाही आहे. एकीकडे हा विरह मला सहन होत नाहीये आणि दुसरीकडे हे विषयभोग मला त्यांच्या तालावर नाचवत आहेत.’
 
‘बिन सतगुरु आपनो नाही कोई
 
जो यह राह बतावै।
 
कहत कबीरा सुनो भाई साधो
 
सुपनेमे प्रीतम आवै
 
तपन यह जिया की बुझावै।’
 
 
- या तळमळीवर काहीच का उपाय नाही? तर कबीर म्हणतात, “आहे. एक सद्गुरूच या भेटीचा मार्ग आपल्याला सांगू शकतात. त्यांच्याइतकं आपलं दु:ख कुणी समजून घेऊ शकत नाही. आपलं खरं हित कशात आहे ते त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे ते आपल्याला या सार्‍यातून सुटकेचा आणि आपल्या प्रिय ठिकाणी जाण्याचा मार्ग दाखवतात. त्या मार्गावर चालू लागलो, तर तिथे पोहोचण्याआधी तो स्वप्नात आपल्याला दर्शन देतो आणि आपल्या हृदयीची तळमळ थोडी शांत करतो. त्याच्या दर्शनाने तात्पुरती का होईना, ती आग जरा शांत होते, विझते.’
 
आपल्या गुरूबद्दल नितांत आदर आणि कृतज्ञता कुमारांनी वेळोवेळी अगदी मनापासून व्यक्त केली. पण विशिष्ट घराणं, गुरुपरंपरा याचा अभिनिवेश किंवा मर्यादा त्यांनी कधीच बाळगली नाही. ‘गुरु की करणी गुरु जायेगा। चेले की करणी चेला’ हे जाणून आपली स्वतंत्र वाट रेखली, अगदी निर्भयपणे.
 
 
‘निर्भय निर्गुण गुणी रे गाऊँगा’ म्हणत त्यांना गवसलेलं सत्य ते मांडत राहिले.
 
‘शून्य शिखर पर अनहद बाजे जी।
 
राग छत्तीस सुनाऊँगा।
 
कहत कबीर सुनो भाई साधो
 
जीत निशान घुराऊँगा।’
 
 
- शब्दांचा आणि सुरांचा आधार घेऊन निर्गुणाच्या वाटा तुडवल्या आणि त्या अज्ञाताच्या प्रदेशातले सारे संज्ञाप्रवाह आपल्या मनात प्रवाहित केले. शून्यतेच्या शिखरापर्यंत पोहोचून आपलं विजय निशाण तिथे रोवलं, तिथला अनाहत नाद ऐकला आणि तो अलौकिक आनंद आपल्या ओटीत आणून घातला.
 
 
आपल्याला आभाळासारखं सत्य गवसतं, असीम आनंदाचा अनुभव येतो, तेव्हा तो आनंद वाटून द्यावा असं वाटू लागतं. पाच वर्षांनंतर डॉक्टरांकडून अर्धा तास गायची परवानगी मिळवून आलेले कुमार ‘मारुजी भूलो न म्हाणे’ म्हणत परत गाऊ लागले. नवा राग दाखवला- ‘सोहनी भटियार’. मग पोतडी खुलत गेली. पाच वर्षांत जे स्थित्यंतर झालं होतं, ते ऐकून संगीत रसिकांनी त्या पर्वाचे आभारच मानले असतील. सक्तीच्या विश्रांतीला त्यांनी चिंतनपर्वात, साधनापर्वात बदललं. साधना करणारे ऋषी द्रष्टे होते, तसे कुमार द्रष्टे होते. त्यांना चिजा, चाली ‘दिसल्या’ आहेत. एकेक निखळ सूर त्यांनी ‘पाहिला’ आहे. ‘मला जे दिसतं ते मी तुम्हाला दाखवतो. प्रत्येक रागाचं एक व्यक्तित्व आहे. स्वर लावताना त्याच्याकडून आपल्याला काय सांगून घ्यायचं आहे ते आपल्याला माहीत हवं’ असं ते सांगत.
 
 
त्यांना स्वत:ला काय सांगायचं आहे हे नीटच उमगलं होतं. तानपुर्‍यांचा कॅनव्हास वापरून रागाचं पोर्ट्रेट करावं, तशी रागाची, भावाची सुस्पष्ट आकृती ते उभी करत. पंचेंद्रियांना अनुभूती येईल असे क्षण त्यांनी निर्माण केलेत. सार्‍या कलांना शेवटी संगीत व्हायचं असतं, असं म्हणतात. शब्द, सूर, रंग, भाव, इतकंच काय, मातीचा वास, वृक्षाची छाया, प्राण्यांचे आकांत, पक्ष्यांची गाणी, पावसाचा ओलावा, उन्हाचा चटका, सारे प्रहर आणि त्यांचे विभ्रम, सार्‍या संवेदनांनाही स्वरदेह प्राप्त करून घ्यायची उत्कट इच्छा असणार. कुमारांच्या कंठातून या सार्‍यांना स्वरेल पुनर्जन्म मिळाले.
 
 
लोकसंगीताचा हिरवा वास आणि नैसर्गिक विविधता असलेला अत्यंत प्राकृतिक, सच्चा स्वर. शरीराच्या मर्यादेमुळे आकाराला, लांबीला लहान, पण विलक्षण ताकदवान ताना. माळावर भणाणणार्‍या वार्‍यासारखा गरजणारा आवाज, कधी फुंकर घालावी इतका हळुवार होई आणि त्यांना दिसलेलं सत्य दर्शवताना स्वर उंच आकाशात झेप घेत.. गरुडासारखे जोमदार आणि हंसासारखे डौलदार!
 
 
शेवटी जाणारच असतो हंस उडून. गेला.. कुठून आला होता, माहीत नाही. कुठे गेला, तेही नाही.
 
 
‘जैसे पात गिरे तरुवरके
 
मिलना बहुत दुहेला।
 
ना जानू किधर गिरेगा
 
लग्या पवन का रेला।
 
जब होवे उमर पूरी
 
जब छूटेगा हुकुम हुजुरी।
 
यम के दूत बडे मजबूत
 
यम से पडा झमेला।
 
उड जायेगा हंस अकेला।’
 
- झाडावरचं पान एकदा गळून पडलं की पुन्हा जोडता नाही येत. एकेक क्षण गळून पडत राहतो. आयुष्य असंच गळून पडतं कधीतरी, कुठेतरी. हा गंधर्व बेळगावात जन्मला, मुंबईत घडला आणि मायेच्या एका फटक्यासरशी देवासला येऊन पडला. पण कबीराच्या मातीत असा रुजला की पाच वर्षांच्या दीर्घ शिशिरात निष्पर्ण झालेला त्याचा स्वरदेह आत्मप्रत्ययाच्या जाणिवेने मोहरून गेला. जगाला वाटलं, तो थांबला होता आणि मग परत आला. पण त्याला आतून हे पक्कं कळलं होतं की ही यात्रा अविरत सुरू आहे.. कधी भानू सोबत असेल, कधी वसुंधरा.. कधी मीच मला सोबत करत असेन.
 
‘अवधूता, युगन युगन हम योगी।
 
आवे न जाये मिटै न कबहुं
 
सबह अनाहत भोगी।’
 
- मला न कुठे जाणं, ना येणं. सतत अहं ब्रह्मास्मि या नादात रमलेला मी.
 
‘हम ही सिद्ध, समाधि हम ही
 
हम मौनी हम बोले।’
 
- मीच साधना, मीच समाधी. मीच मौन आणि मीच शब्द.
 
‘रूप सरूप अरूप दिखा के।
 
हम ही में हम तो खेले।’
 
- मीच सगुण, मीच निर्गुण आणि मीच आत्मरूप. अशी माझीच माझ्याशी क्रीडा. आता मनात काही वासना उरली नाही, न काही इच्छा. आता आपल्या विश्वात, स्वानंदात रमायचं, आत्मरूपाशी खेळायचं. या खेळात मी आहेही आणि नाहीही.
 
 
‘कहे कबीरा जो, सुनो भाई साधो।
 
नाहीं न कोई इच्छा।
 
 
अपनी मढी में, आप में डोलू, खेलू सहज स्वइच्छा।’
 
स्वइच्छेने तो इथे काही काळ खेळला आणि आता खेळ आवरून तो निघाला होता..
 
 
देवासच्या भूमीवर कुमार पंचत्वात विलीन होत होते.. संधिप्रकाशाच्या सोन्याला गहिवर फुटला होता. त्या दिवशीची ती संध्याकाळ तिथे असलेले कुणी विसरू शकणार नाहीत. कुमार अंतिम यात्रेला निघाले होते आणि माळव्याचं संगीत त्यांना अखेरची सोबत करत होतं. त्यांनी गाऊन अमर केलेलं, कदाचित सर्व निर्गुणी भजनांत सर्वात हृदयस्पर्शी असलेलं ‘नैहरवा’ तिथले स्थानिक गोसावी गात होते.. नैहरवा भजन वाटत नाही. विराणी वाटते. परमेश्वराला प्रियतमाच्या रूपात पाहून त्याच्या विरहाने तळमळणार्‍या विरहिणीचं हे पद. त्यामुळेच बहुधा कुमारांच्या सर्व भजनांत सर्वात हळुवार, सर्वात आर्त असं हे भजन आहे. एक पारलौकिक असं वातावरण तिथे निर्माण झालं होतं. जणू कबीर कुमारांना न्यायला आला होता. निर्गुणाची वाट साद घालत होती. जोगी रमता भला.. एका जागी थांबून कसं चालेल? त्याच आर्त स्वरांची सोबत घेऊन तो युगायुगांचा गानयोगी पुढे निघाला. त्याला सुंदराची ओढ लागली होती..
 

विनीता शैलेंद्र तेलंग

विनीता शैलेंद्र तेलंग (D.pharm.Post Dip.in Ayu.Pharm.)

 पुनर्वसु आयुर्वेदीय औषधी निर्माण या नावाने स्वतःचा आयुर्वेदिक औषध निर्मितीचा 1995 पासून व्यवसाय .सुमारे शंभर उत्पादने . बेळंकी व हरीपूर येथे चालणाऱ्या कामातून स्थानिक महिलांना रोजगार .

१९८८ ते ९० अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे औरंगाबाद येथे पूर्ण वेळ काम .

 भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्य. या संस्थेतर्फे तीन अनाथाश्रम, एक अल्पमुदत निवासस्थान, कुटुंब सल्ला केंद्रे इ .उपक्रम चालतात .नुकत्याच सुरु केलेल्या नर्सिंग विभागाची संपूर्ण जबाबदारी . अनेक अन्य सामाजिक कामात सक्रिय.

त्याचबरोबर अनेक संगीत व नुत्यविषयक कार्यक्रमांचे निवेदन व सूत्रसंचालन. काव्य लेखन, विविध अंक संपादन याबरोबर ग्राहक हित, सा.विजयंत, सा. विवेक, विश्वपंढरी, प्रसाद ,छात्रप्रबोधन या अंकात नैमित्तिक लेखन. अनेक स्मरणिकांचे संपादन,  रा.स्व.संघाची पश्चिम महाराष्ट्र महिला समन्वय समिती सदस्य .