मणिपूर येथील हिंसाचाराला अनेक घटक कारणीभूत असले, तरी मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भात नामताने कॅनडातील गुरुद्वारात भाषण दिल्याचे समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. या हिंसाचारात खलिस्तांनींच्या सहभागामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि शांततापूर्ण तोडगा काढणे कठीण होऊ शकते. अशी भीती आता निर्माण झाली आहे.
मागील 4 महिन्यांपासून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांसमोर दोन प्रमुख आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यातील पहिली समस्या म्हणजे मणिपूरमधील हिंसा आणि दुसरी समस्या म्हणजे पुन्हा एकदा जोर धरत असलेला खलिस्तानचा प्रश्न. वरवर ह्या दोन्ही घटना वेगवेगळ्या वाटत असल्या तरीही त्यामागील भारतविरोधी शक्ती एकवटत असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. दोन आठवड्यांपूर्वी सोशल मीडियावर एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली आणि मणिपूर हिंसेचे खलिस्तान कनेक्शन जगासमोर आले. हे सगळे प्रकरण जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला हरदीप सिंग निज्जर आणि नॉर्थ अमेरिकन मणिपूर ट्रायबल असोसिएशन त्याचबरोबर त्यांचा नेता लिएन गंगते यांची ओळख होणे गरजेचे आहे.
खलिस्तान टायगर फोर्स
खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) या दहशतवादी संघटनेची स्थापना 1995 मध्ये जगतार सिंग तारा याने केली. 1995 मध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्येप्रकरणी जगतार सिंग सध्या भारतात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या संघटनेला पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचा मोठा पाठिंबा आहे. 2022 मध्ये आयएसआय समर्थित कॅनडात बसून भारतात दहशतवादी कारवाया करत असलेल्या खलिस्तान टायगर फोर्सचा पंजाब पोलिसांनी पर्दाफाश केला होता. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी एक टिफिन बॉम्ब, तीन हातबॉम्ब आणि दोन एके-56 असॉल्ट रायफलसह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता. पहिल्या छाप्यात, अमृतसर ग्रामीण पोलिसांनी तरनतारन जिल्ह्यातील राजोके गावातील रहिवासी योगराज सिंग उर्फ योग याला अटक केली, जो कॅनडास्थित लखबीर सिंग, पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग रिंडा आणि इटलीतील हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी संघेरा या अमली पदार्थांची तस्करी करणार्या टोळीचा भारतातील मुख्य सूत्रधार होता. दुसर्या एका छाप्यात, पंजाब राज्य पोलिसांनी हरप्रीत सिंग उर्फ हिरा याला अटक केली होती, जो या खलिस्तानी टायगर फोर्सचा भारतातील प्रमुख कार्यकर्ता होता. त्याच्या गाडीमधून तीन हँडग्रेनेड, दोन पिस्तुल आणि 60 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. पंजाबमधील हे दहशतवादी आऊटफिट कॅनडास्थित गँगस्टर अर्शदीप सिंग उर्फ अर्श डाला चालवत होता, जो खलिस्तान टायगर फोर्सचा कॅनडास्थित प्रमुख हरदीप सिंग निज्जरचा जवळचा सहकारी होता. मागच्या चार महिन्यात वर उल्लेख केलेल्या कॅनडास्थित लखबीर सिग, पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग रिंडा आणि इटलीतील हरप्रीत सिंग या खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित असलेल्या या तीन प्रमुखांची ते राहत असलेल्या देशांमध्ये अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे.
कॅनडाच्या पंतप्रधानांच्या संसदेतील भाषणामुळे हरदीप सिंग निज्जर आणि खलिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेविषयी भारतात चर्चांंना सुरुवात झाली. निज्जर हा कॅनडाचा नागरिक होता. 18 जून 2023 रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथील सरे येथील गुरुद्वाराबाहेर अज्ञातांकडून त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. निज्जरचा जन्म 1978 मध्ये भारतात झाला. तो 1990 च्या सुरुवातीला शीख फुटीरतावादी चळवळीत सहभागी झाला आणि 1995 मध्ये खलिस्तान टायगर फोर्सला जाऊन मिळाला. जगतार सिंग याच्यासोबत 1995 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्येसह भारतातील अनेक दहशतवादी कारवायांसाठी निज्जर जबाबदार होता. पुढे 1997 मध्ये निज्जर भारतातून कॅनडाला पळून गेला, तिथे त्याने आश्रय घेतला आणि कॅनडाचे नागरिकत्व मिळवले. तो खलिस्तानी टास्क फोर्ससाठी निधी उभारणे, भारतविरोधी कारवायांसाठी आपल्या अनुयायांना प्रोत्साहन देणे, कॅनडास्थित भारतीय नागरिकांविषयी हिंसा भडकावणारे लेख लिहिणे आणि प्रक्षोभक भाषणे करणे या कारवायांमुळे 2020 मध्ये भारत सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केले होते. म्हणूनच 2023मध्ये कॅनडात झालेली निज्जर आणि त्यासोबतच इटली आणि पाकिस्तानस्थित केटीएफ प्रमुखांच्या हत्या हा खलिस्तान फुटीरतावादी चळवळीसाठी मोठा धक्का होता.
नॉर्थ अमेरिकन मणिपूर ट्रायबल असोसिएशन
नॉर्थ अमेरिकन मणिपूर ट्रायबल असोसिएशन (नामता) ही अमेरिकेतील एक एनजीओ संस्था आहे, जी अमेरिका आणि कॅनडा येथील मणिपूर आदिवासी समुदायाकडून चालवण्यात येते. नामताची स्थापना 1990 मध्ये झाली होती. या संस्थेचे नेतृत्व मणिपुरी वंशाच्या, पुडाईतांच्या प्रभावशाली ख्रिश्चन कुटुंबाकडून करण्यात येते. इव्हॅन्जेलिकल फ्री चर्च ऑफ इंडिया (एऋउख) अंतर्गत ईशान्य भारतातील अनेक चर्चवर ह्या कुटुंबाचे वर्चस्व आहे. हा संबंध म्हणजे निव्वळ योगायोग नव्हे. उत्तर अमेरिकेतील मणिपूर आदिवासी समुदायाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक हक्कांचे समर्थन करणे हे संस्थेचे ध्येय आहे. ही संस्था स्वतःला संपूर्ण मणिपुरी वनवासी समाजाची पालक म्हणवत असली तरीही, मैतेई समाजाविरुद्ध त्यांच्या मनात मोठा राग असल्याचे आढळते. सांगायचे तात्पर्य असे की, ही संस्था मणिपुरी वनवासी समाजाचे नाव घेऊन फक्त ख्रिस्तीबहुल असलेल्या वांशिक गटांसाठी कार्यरत आहे. मे 2023 मध्ये मणिपूर येथे वांशिक संघर्ष सुरू झाल्यापासून ही संस्था अमेरिकेत आणि जगभरात भारतविरोधी आणि हिंदुविरोधी नरेटिव्ह तयार करत आहे. नामता भारत सरकार आणि देशातील हिंदू समुदायाविरुद्ध हिंसाचार पसरवण्यासाठी खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांशी हातमिळवणी करत असल्याचा आरोप केला जात आहे. मणिपूर राज्याच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकन सरकारकडे लॉबिंग करणे आणि मणिपूरमधील अतिरेकी गटांसाठी निधी उभारणे यासारख्या भारतविरोधी कारवायांमध्ये नामताशी जवळीक असणारे काही लोक गुंतल्याचा आरोप अमेरिकेतील भारतीय समुदायाकडून केला जात आहे.
मागील काही दिवसांपूर्वी याच नामताच्या कॅनडा भागाचा अध्यक्ष लिएन गंगते याचे, कॅनडातील निज्जरचा प्रमुख वास असलेला सरे येथील गुरुद्वारात मणिपूरच्या हिंसाचाराविषयी भाषण देतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. भारतात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत त्यामुळे कॅनडा सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी गंगते याने केली. याशिवाय गंगते याने भारत सरकारविरोधी मोर्चा काढण्यासाठी खलिस्तानी गटांचे समर्थन मागितले. हा व्हिडिओे 7 ऑगस्ट 2023 रोजी, नामताच्या फेसबुक आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट वरून शेअर करण्यात आला होता. परंतु भारत आणि कॅनडा मधील संबंध बिघडण्यास सुरूवात झाल्यावर नामताकडून डिलिट करण्यात आला. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दावा केला आहे की गंगते याच्या भाषणानंतर निज्जर याच्या समर्थकांनी नामताच्या सदस्यांसोबत बैठक घेतली.
मणिपूर आणि पंजाब या दोन्ही राज्यांना भारतविरोधी चळवळींचे चटके बसत आहेत. वरचेवर जरी ह्या गोष्टी साध्या वाटत असल्या तरीही, हा सगळा भारतविरोधी षडयंत्राचा भाग असल्याचे नाकारता येणे शक्य नाही. मणिपूरमधील हिंसाचार हा दीर्घ इतिहासाचा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. वांशिक शत्रुत्व, आर्थिक असमानता आणि राजकीय अस्थिरता यासह अनेक घटक या हिंसाचाराला कारणीभूत आहेत. कुकी-झोमी आणि मैतेई हे दोन्ही वांशिक गट या हिंसाचाराला बळी पडले आहेत. त्यात आता मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भात नामताने कॅनडातील गुरुद्वारात भाषण दिल्याचे समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. खलिस्तानी फुटीरतावादी गट त्यांच्या हिंसक डावपेचांसाठी ओळखले जातात. मणिपूरमधील हिंसाचारात त्यांच्या सहभागामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि शांततापूर्ण तोडगा काढणे कठीण होऊ शकते. मणिपूर प्रकरणात खलिस्तानी गटांच्या दखल देण्याने ईशान्य भारतातील हिंदूंविरुद्ध सांप्रदायिक हिंसाचारात देखील वाढ होण्याची भीती आहे. म्हणूनच या संदर्भात भारत सरकारला वाटत असलेली काळजी स्वाभाविक आहे.
(लेखिका सध्या जेएनयूमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधात पीएचडी करत आहेत.)