जेएनयूत पद्मश्री रमेश पतंगे यांच्या ‘द आरएसएस, मनू अँड आय’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अभाविपचा वैचारिक मंच वाल्मिकी स्टडी सर्कलतर्फे पार पडला. हा कार्यक्रम होऊ न देण्यासाठी डाव्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. परंतु त्यात त्यांना काही यश आले नाही. कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे डाव्यांना वाटत असलेली संघाची भीती आणि कमी होत चाललेले त्यांचे जेएनयूतील वर्चस्व याचा प्रत्यय आला.
जेएनयूत पद्मश्री रमेश पतंगे यांच्या ‘द आरएसएस, मनू अँड आय’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अभाविपचा वैचारिक मंच वाल्मिकी स्टडी सर्कलतर्फे करण्याचे महिन्याभरापूर्वी ठरवण्यात आले आणि कार्यकर्त्यांमध्ये हुरूप निर्माण झाला. पुस्तक प्रकाशनाची तारीख ठरली आणि युनिव्हर्सिटीतील डाव्या वर्गाला त्याची कुणकुण लागली. अर्जुन आनंद, चिराग धनकर यासारख्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारली. ह्या सगळ्या कार्यक्रमाची मांडणी कशी असावी, कोणत्या वक्त्यांना बोलवावे याविषयी चर्चा सुरू झाल्या. ऑप इंडिया या न्यूज पोर्टलच्या संपादिका आणि राष्ट्रीयत्वाचा विषय सतत मांडणार्या नूपुर शर्मा आणि तुलनात्मक राजकारणाचे अभ्यासक आणि जेएनयूतील वरिष्ठ प्राध्यापक रवी शुक्ल यांना बोलावण्याचे ठरले.
कार्यक्रमातील वैचारिक मांडणीची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पेलली. कार्यक्रमाची दिशा कशी असावी ह्यासाठी विवेकतर्फे अरविंद सिंह यांनी जेएनयूतील वाल्मिकी मंडळाच्या सदस्यांशी समन्वय साधला. 15 दिवस आधीपासून कार्यक्रमाचे पोस्टर्स आणि माहिती यावर काम सुरू झाले आणि आठवड्याभरात संपूर्ण कॅम्पसमध्ये कार्यक्रमाची पोस्टर्स झळकली. पोस्टर्समुळे कॅम्पसमध्ये चर्चेला सुरुवात झाली, संघ म्हणजे काय? संघाची कार्यपद्धती, त्यामुळे देशात निर्माण झालेले एकसंधतेचे वातावरण, देशभक्तीच्या अभिव्यक्तीसाठी मिळालेला वाव याबाबत विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल जागृत झाले. यामुळेच कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीपासून डाव्यांनी पोस्टर्स फाडण्याच्या मोहिमेला सुरवात केली. अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या पोस्टर्सवर डाव्यांनी त्यांची पोस्टर्स लावली. जेएनयूतील हॉस्टेल्समध्ये वाल्मिकी सर्कलकडून वाटलेली कार्यक्रमाची हँडबिल्स फाडण्यात आली. एरव्ही खुली चर्चा आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या खोट्या बाता करणार्या डाव्यांकडून हे वागणे अगदीच अपेक्षित होते. जेएनयूत अभाविपमध्ये काम करणार्या सगळ्याच मुलांना ह्याची सवय असल्याने त्यांनी निडरपणे आवाज उठवायला सुरुवात केली. डाव्यांच्या या कृतीला कृतीनेच उत्तर द्यावे, म्हणून कार्यक्रमाच्या एक दिवस आधी साबरमती ढाब्याजवळ ‘द आरएसएस, मनू अँड आय’ या पुस्तकाचा स्टॉल लावण्यात आला. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून कार्यक्रमात संस्थात्मक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. वाल्मिकी मंडळातर्फे आठवडाभर आधीच कमिटी रूमच्या बुकिंगसाठी अर्ज केला होता, परंतु वैचारिक भेदांमुळे अगदी आदल्या दिवशीपर्यंत त्या अर्जावर सही झाली नव्हती. कार्यक्रम रद्द होईल की काय अशी भीती सगळ्यांना वाटू लागली.
कार्यक्रमाच्या तासभर आधी कमिटी रूममधील माइक नीट चालत नाहीत म्हटल्यावर कार्यक्रमासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन माइक आणि स्पीकरची सोय केली. रमेशजी पतंगे आधीच जेएनयूत पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांना हुरूप आला होता. सरांनीसुद्धा त्यांच्या स्वभावाप्रमाणे आम्हाला साहाय्य केले. या सगळ्या गडबडीमुळे कार्यक्रम सुरू व्हायला वीस मिनिटे उशीर झाला, परंतु वाल्मिकी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शांततेने ह्या सगळ्या अडचणींवर मात करून ठरलेला कार्यक्रम तडीस नेला. डाव्यांना वाटत असलेली संघाची भीती आणि कमी होत चाललेले त्यांचे जेएनयूतील वर्चस्व याचा प्रत्यय या निमित्ताने आला.
भारतभूमी ही राष्ट्रीय भावनेची जन्मभूमी आहे. संपूर्ण इतिहासात, या प्रदेशात सहअस्तित्व असलेले विविध गट नेहमीच एकमेकांच्या श्रद्धा, विधी आणि अस्तित्व मान्य करून एकत्र नांदले आहेत. जागतिक प्रतिमानाप्रमाणेच व्यवहार सुलभ करण्यासाठी आणि कामांचे वाटप करण्यासाठी एक सामाजिक व्यवस्था स्थापित केली गेली होती. दुर्दैवाने पुढे चुकीच्या धारणांमुळे श्रेणीबद्ध भेदभाव झाला, परिणामी व्यक्तींचे व्यवसायाऐवजी जन्मसिद्ध अधिकारावर आधारित अवमूल्यन होऊ लागले. त्याचे पर्यवसान जातिव्यवस्थेच्या बळकटीकरणात झाले आणि जाती-आधारित भेदभाव वाढला. परंतु अशा विखंडित समाजात विघटनाचे बीज पेरले गेले होते का? हे विचारात घेण्यासारखे आहे. राष्ट्राच्या संकटांची मुळे हिंदू समाजाच्या विखुरलेपणाच्या वैशिष्ट्यात सापडतात, ही जाणीव डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना झाली होती आणि त्यातूनच ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची’ स्थापना झाली. संघाने विसंवादाच्या पलीकडे जाऊन हिंदू समाजाला बळकट करण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि करतो आहे. पद्मश्री रमेश पतंगे यांचा स्मृतिग्रंथ ‘द आरएसएस, मनू अँड आय’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होणार्या कार्यकर्त्याच्या प्रवासाचे आणि संघातील सामाजिक समरसतेच्या प्रवासाचे वर्णन करणारे पुस्तक आहे.
मानवी स्वभाव हा धार्मिक जीवनाकडे वळणारा आहे. आदिम अंत:प्रेरणा ओलांडून, मानवतेने हे सामूहिक अस्तित्व एका संरचित समाजात विकसित केले. ही सामाजिक रचना मानवाच्या अंतर्भूत बौद्धिक आणि संज्ञानात्मक क्षमतांद्वारे तयार केली गेली. युगानुयुगे आणि वैविध्यपूर्ण भौगोलिक भागांत सामाजिक संस्कार आणि परंपरा सर्व मानवी समूहांमध्ये अंतर्भूत झाल्या. परिणामी, एकेकाळची सर्वसमावेशक सामाजिक व्यवस्था अधिक कठोर प्रणालीमध्ये रूपांतरित झाली. या चौकटीने अधूनमधून धार्मिक किंवा सांप्रदायिक सिद्धान्ताचे आवरण धारण केले. विषम मानवी गटांमधील कठीण होत गेलेला परस्परसंवाद आणि परिस्थितीनुसार त्यांच्या संबंधित गटाचे नियम इतरांवर लादण्याची आतुरता यामुळे स्थानिक अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी विविध गटांकडून सामूहिक प्रयत्न सुरू होतात. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीची ओळख, त्याची उत्पत्ती याच्या शोधाचा प्रवास सुरू होतो. परंतु आपले मूळ अस्तित्व एका प्रदेशाच्या अविभाज्य गटाशी जोडले गेले आहे, याची जाणीव झाल्यावर राष्ट्रीयत्वाच्या भावनेची सुरुवात होते. ‘द आरएसएस, मनू अँड आय’ या पुस्तकात रमेश पतंगे यांनी स्वयंसेवक ते विचारवंत या प्रवासाची मांडणी केली आहे. मुंबईतील झोपडीपासून सुरू झालेला प्रवास पद्मश्रीपर्यंत येऊन कसा पोहोचला, आर्थिक प्रतिकूलता आणि मर्यादित शैक्षणिक संधींचा सामना करत असताना संघशाखेकडून त्यांना मिळालेला पाठिंबा आणि खेळ, कविता आणि शिबिरे यांसारख्या उपक्रमांचा त्यांच्या जडणघडणीवर झालेला परिणाम या पुस्तकात मांडला आहे.
आणीबाणीच्या काळात पतंगे यांना तुरुंगवास भोगावा लागला, ज्यामुळे त्यांना त्यांच्या बौद्धिक वाढीसाठी खाद्य मिळाले. अनेक विषयांवर विस्तृत वाचन, ज्येष्ठ स्वयंसेवकांशी संवाद साधून, त्यांचा दृष्टीकोन विस्तारला. धनंजय कीर यांच्या पुस्तकांतून त्यांना वैचारिक खाद्य मिळाले. धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राने त्यांना अपरिचित असलेल्या जगाची माहिती दिली. समाजातील प्रचलित जातीय अडथळ्याची वाढलेली जाणीव ही एक व्यक्ती आणि कार्यकर्ता म्हणून पतंगे यांच्यासाठी एक निर्णायक क्षण म्हणून उदयास आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वसमावेशक असल्याने, जात हा प्रवेशाचा निकष नसतो. विशिष्ट समुदायांशी हेतुपुरस्सर जोडण्यासाठी पद्धतशीर दृष्टीकोन नसल्यामुळे, संघाने उपेक्षित समुदायांशी संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सामूहिक चिंतन सुरू केले. या समुदायांशी सहयोग वाढवणे आणि या समुदायांच्या सामाजिक समस्या दूर करणे हा या प्रयत्नांचा उद्देश होता. विशेष म्हणजे सुखदेव नवले आणि दामुअण्णा दाते यांसारख्या समविचारी कार्यकर्त्यांसह पतंगे यांनी या प्रयत्नात पुढाकार घेतला, परिणामी ’समरसता मंच’ची स्थापना झाली. समरसता मंचाच्या माध्यमातून नंतर परिश्रमपूर्वक प्रयत्न केले गेले, ज्यामध्ये समानतेच्या घटनात्मक तरतुदी असूनही, खर्या अर्थाने सामंजस्य साधण्यासाठी समाजात समरसतेची भावना जोपासणे या विश्वासाने प्रेरित झालेले कार्यकर्ते जोडले गेले. ‘द आरएसएस, मनू अँड आय’ हे पुस्तक सर्वसमावेशकतेसाठीच्याक आणि सुसंवादासाठीच्या संघाने केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. त्याचबरोबर संघावर सतत होणार्या ब्राह्मणवादाच्या आरोपांचा एक महत्त्वपूर्ण प्रतिवाद करते आणि हिंदू समाजातील एकता आणि सामाजिक समरसता जोपासण्यासाठी संघामार्फत कार्यकर्त्यांच्या समर्पणाचा प्रवास अधोरेखित करते.
लेखिका जेएनयू दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय संबंधांवर पीएच.डी. करत आहेत.