ज्या पंतप्रधानांच्या हातात ‘कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस’ आहे, त्यांना आपले खाते कोणकोणत्या उद्योेगांत गुंतलेले आहे हे कळत नसेल, तर त्यांना काय म्हणावे? आयएसआयला ट्रुडोंच्या गुप्तचरांनी वापरून घेतले की कॅनडाच्या गुप्तचरांना आयएसआयने वापरून घेतले आणि आपल्या मादक पदार्थांच्या व्यापारातला एक काटा काढला, हेही पाहावे लागेल. एकमेकांवर मात करण्याच्या ईर्षेने दोघांनीही एकमेकांना खड्ड्यात घातले आहे.
शीर्षक खळबळजनक वाटले, तरी परिस्थितीशी सुसंगत वाटेल असा ‘विश्वासार्ह पुरावा’ (आरोप नव्हे) पुढे आला आहे. कॅनडामध्ये हरदीपसिंग निज्जरच्या खुनामागे पाकिस्तानची ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ ही गुप्तचर संघटना आहे. निज्जर एकाच वेळी ‘आयएसआय’शी संबंध ठेवत होता आणि दुसरीकडे ‘आयएसआय’च्या विरोधातल्या गुप्तचरांशी साटेलोटे करत होता, ही माहिती ‘आयएसआय’ला होती आणि त्या संघटनेच्या कॅनडातल्या हस्तकांना निज्जरला संपवायचे होतेच. त्याने काय साधणार होते? तर भारतावर आरोप केला जाऊन कॅनडा आणि भारत यांचे संबंध ताणले जाणार होते आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक आमसभेच्या काळातच भारताकडे संशयाने पाहिले जाणार होते. हरदीपसिंग निज्जर हा मादक पदार्थांच्या व्यवहारात होता. त्यात त्याने बराच पैसा कमावला होता. तो इतरांच्या डोळ्यांवर आलेला होता. त्याचे या व्यवसायातले प्रतिस्पर्धी राहत राव आणि तारिक कियानी (या नावाचे अनेक जण पाकिस्तानात, अमेरिकेत आणि कॅनडामध्ये आहेत) यांची त्याच्याशी या व्यवहाराबद्दल जबरदस्त खुन्नस होती. निज्जरने 18 जून रोजी कॅनडामध्ये ब्रिटिश कोलंबियात सरेला त्याचा खून होण्यापूर्वी आठच दिवस कॅनडातल्या गुप्तचरांशी संपर्क साधला होता आणि त्याने आपल्याला संरक्षण देण्यात यावे, अशी त्यांच्याकडे मागणी केली होती. या गुप्तचरांनी त्याला ‘काही काळजी करू नकोस, तुझ्यावर आमचे सतत लक्ष राहील’ असे आश्वासनही दिले होते. विशेष म्हणजे निज्जर ज्या भागात राहत होता, त्याच भागात आयएसआयचे अनेक हस्तक राहतात, हेही त्याने त्या गुप्तचरांना सांगितले होते. याचा अर्थ उघड आहे की, त्याने आपले बोट आयएसआयच्या दिशेने तेव्हाच दाखवले होते. जेव्हा आयएसआयने त्याला ठार करायचा बेत रचला, तेव्हा त्यांनी राहत राव आणि तारिक कियानी यांच्याशी संपर्क साधला असावा. ज्याला त्यांना ठार करायचे आहे, त्याचा मागोवा काढण्यास संबंधित खुन्यांना सोपे जावे यासाठी त्यांना कॅनडाच्या गुप्तचरांनीच त्याचे सर्व पत्ते आणि तो जिथे जात असेल त्या त्या सर्व ठिकाणांचे पत्ते पुरवले होते. कॅनडाचे गुप्तचर खाते निज्जरच्या मागावर कायमच होते, असा याचा अर्थ होतो. म्हणजेच कॅनडाच्या गुप्तचरांना त्याच्या हालचालींची माहिती होती. असे असता त्यांना निज्जरच्या खुनाचा पत्ता लागू नये, हे जरा विस्मयकारक आहे. याचाच अर्थ मी शीर्षकात काढला तसाच होतो.
निज्जरचा खून झाल्यावर लगेचच कॅनडाच्या गुप्तचरांनी राहत रावचे घर गाठले आणि त्याला त्याच्या सोशल मीडियावरच्या सर्व पोस्ट्स काढून टाकण्यास बजावले. नुसते बजावले कसले, तर त्याला आपल्यासमोर त्या काढून टाकून पुढचे काही दिवस घराबाहेर न पडण्याचा इशाराही दिला. त्याला त्यांनी हेही सांगितले की, “तू जर घराबाहेर पडशील, तर तू भारतीय हस्तकांच्या गोळ्यांना बळी पडशील आणि तिथून पुढे आम्हाला त्यांचा पत्ता काढणेही मुश्कील होईल.” ज्या गुप्तचरांना खुनाचा शोध घ्यायचा आहे, ते निज्जरचा खून ज्याने केला असा संशय आहे, त्यालाच तू बाहेर पडलास तर तुझे काही खरे नाही असे बजावतात, हेच जरा विचित्र आहे. हे म्हणजे ‘आयएसआय’शी त्यांचे असलेले लागेबांधेच दर्शवणारे आहे. मादक पदार्थांच्या व्यवहारात राहत राव आणि तारिक कियानी यांचा आणखी एक तिसरा स्पर्धक होता. त्याचे नाव गुरुचरण पन्नून. हा त्यांचा ‘सुवर्ण त्रिकोण’ तयार झाला म्हटल्यावर कॅनेडियन गुप्तचरांचे काम सोपे झाले. निज्जरच्या खुनाची काही तयारी चाललेली आहे याची कॅनडा सरकारला माहिती अर्थातच होती, म्हणूनच त्यांनी ‘जी-20 देशांच्या परिषदेला हजर राहणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणार्या बोलण्यांमध्ये निज्जरचा विषय कसा उपस्थित करता येईल याविषयीचे टिपण तयार केले. ट्रुडो यांची उपस्थिती आणि निज्जरचा खून यामध्ये तीन महिन्यांचा काळ लोटलेला होता, हे लक्षात घ्या. म्हणजे हे मेलेले मढे उकरून काढायची या गुप्तचरांनीच त्यांना सुचवलेली खेळी होती. त्यातून दोन गोष्टी साध्य होणार होत्या - एक म्हणजे निज्जरच्या खुनात कॅनडाची काहीच भूमिका नाही, हे त्यातून स्पष्ट झाले असते आणि दुसरी म्हणजे ज्यांना कॅनडाने या खुनासाठी ‘मार्गदर्शन’ केले, त्यांच्यावरून जगाचे लक्ष अन्यत्र वळले असते. जी-20 देशांच्या परिषदेत निज्जरच्या खुनाचा विषय उपस्थित व्हावा किंवा तो इतरांनी करावा, अशी कॅनडाची इच्छा होती, पण ते जमले नाही. त्यामुळे खासगी चर्चेच्या वेळी कॅनडाने हा विषय उपस्थित केला असण्याची शक्यता आहे. मोदींनी तातडीने त्यांचा तो मुद्दा धुडकावून लावला आणि त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ट्रुडोंनी कॅनडाच्या पार्लमेंटमध्ये कार्यक्रमपत्रिकेत नसलेल्या विषयावर भाष्य करून आपल्याकडे असलेल्या ‘विश्वासार्ह आरोपा’चा उल्लेख केला.
विवेकमध्ये लिहिलेल्या लेखात (25 सप्टेंबर-1 ऑक्टोबर) मी ट्रुडोंना उद्देशून ‘महामूर्ख आणि आपमतलबी’ असे लिहिले होते. एक क्षण मला असे वाटले की कोणत्याही पंतप्रधानांविषयी अशी शेलकी विशेषणे वापरणे योग्य नाही; पण त्यांची एकूणच शैली लक्षात घेतली, तर मी काही चुकीचे लिहिलेले नाही हे मला स्पष्ट झाले. त्यांनी जरी हे तथाकथित विश्वासार्ह आरोप करण्याआधी कॅनडामध्ये चाललेल्या मादक पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराकडे लक्ष दिले असते, तरी त्यात कोणकोण आहेत आणि त्यांचे कसे धंदे चाललेले असतात, ते त्यांच्या लक्षात आले असते. ज्या पंतप्रधानांच्या हातात ‘कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस’ आहे, त्यांना आपले खाते कोणकोणत्या उद्योेगांत गुंतलेले आहे हे कळत नसेल, तर ते महामूर्ख नव्हेत तर कोण आहेत? आयएसआयला ट्रुडोंच्या गुप्तचरांनी वापरून घेतले की कॅनडाच्या गुप्तचरांना आयएसआयने वापरून घेतले आणि आपल्या मादक पदार्थांच्या व्यापारातला एक काटा काढला, हेही पाहावे लागेल. मला वाटते ते असे की, एकमेकांवर मात करण्याच्या ईर्षेने दोघांनीही एकमेकांना खड्ड्यात घातले आहे.
निज्जरच्या खुनाचा उल्लेख करून त्यात भारताचा हात असल्याचा आरोप करणार्या ट्रुडोंनी तो आरोप केला जात असतानाच कॅनडातच मारल्या गेलेल्या आणखी एकाचा उल्लेख केला नाही. तो तर हरदीपसिंग निज्जरपेक्षा महाभयानक होता. त्याचे नाव मागच्या माझ्या लेखात प्रारंभीच घेतलेले होते. तो होता अर्शदीपसिंग. तो खलिस्तान टायगर फोर्सचा होता आणि त्याला कोणी संपवले, हे कळायला मार्ग नाही. 2020मध्ये त्याच्याविषयी कॅनडाला पाठवलेल्या माहितीपत्रात कळवले होते. त्याची दखलही कॅनडाने घेतलेली नव्हती आणि तो मेल्यावरही कॅनडाने त्याच्याविषयी अळीमिळीगुपचिळीचेच धोरण ठेवलेले आहे. दुसरा दहशतवादी सतिंदरजितसिंग ब्रार - गोल्डी ब्रार हा पंजाबी गायक शुभदीपसिंग सिधू उर्फ मुसेवाला याच्या खुनातला एक आरोपी होता. तो कॅनडाला पळून गेला. त्याने तिथे राजकीय आश्रय मागितला आणि त्याला तो देण्यात आला. मुसेवाला हा रॅप गायक होता आणि तो पंजाबमधल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे रिंगणात होता, पण तो पराभूत झाला. त्याचा खून 29 मे 2022 रोजी झाला, म्हणजे तो पळून गेल्याची तारीख त्यानंतरची आहे हे उघड आहे. त्याचा खून करणारा गोल्डी ब्रार म्हणजेच सतिंदरजितसिंग हा काही काळ कॅलिफोर्नियात राहत होता. तिथून तो कॅनडामध्ये गेला. इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू संदीपसिंग नान्गल अंबला याचा खून स्नोवरसिंग धिल्लनने केला, असा आरोप आहे. पैशाच्या अनेक गैरव्यवहारात तो होता, पण त्यालाही कॅनडात आश्रय मिळाला.
असे अनेक दहशतवादी खुनी गणंग कॅनडात राहत आहेत आणि त्यांना सरकारी आश्रय मिळतो आहे. भारताने कॅनडाकडे अनेकदा तक्रार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून कॅनडाने ‘चोर तो चोर, वर शिरजोर’ असे धोरण का पत्करावे हे मागच्याच लेखात मी लिहिलेले आहे. भारत अमेरिकेकडे जास्त झुकलेला आहे, ही कॅनडाची पोटदुखी आहे, खरे तर तसा तो नाही. पण त्याबरोबरच मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे त्यांना कॅनडामध्ये असलेला शीख समाज हा सर्वच्या सर्व खलिस्तानवादी आहे असे वाटत असावे आणि त्यातूनच त्यांनी भर पार्लमेंटमध्ये हे आचरट विधान केले, हे उघड आहे. अमेरिकेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेसाठी गेलेले आपले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आमसभेत बोलताना अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांवर टीका करून म्हटले की, “दहशतवादाचा सामना हा राजकीय सोयी-गैरसोयीच्या दृष्टीकोनातून कधीच केला जाता कामा नये.” पत्रकारांनी त्यांना ‘फाइव्ह आइज’च्या निज्जरच्या खूनप्रकरणात लक्ष घालण्याच्या आणि निज्जरच्या खुनानंतर अमेरिकेत राहणार्या शीख दहशतवाद्यांना (किंवा खलिस्तानवाद्यांना) ‘एफबीआय’ने दिलेल्या तथाकथित इशार्याचे मर्म विचारता ते म्हणाले, की “मी काही फाइव्ह आइजचा सदस्य नाही किंवा मी ‘एफबीआय’साठी कामही करत नाही, तुम्ही हा प्रश्न चुकीच्या ठिकाणी विचारत आहात.” हा म्हणजे जयशंकर यांनी या दोघांनाही दिलेला उघडउघड जोडा होता.
जाता जाता आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. गेल्या सप्ताहात जेव्हा युक्रेनचे अध्यक्ष वोलोद्मीर झेलेन्स्की कॅनडात होते, तेव्हा कॅनेडियन पार्लमेंटसमोर त्यांचे भाषण झाले, त्या वेळी यारोस्लाव हुंका या कॅनेडियन-युक्रेनियन व्यक्तीचाही पार्लमेंटमध्ये सत्कार करण्यात आला. हे गृहस्थ 98 वर्षांचे आहेत आणि ते दुसर्या महायुद्धात नाझींच्या सैन्यात होते. कॅनडाच्या सरकारने त्यांचा सत्कार करावा, हे असंख्य ज्यूंच्या भावना दुखावणारे होते. त्याबद्दल रशियाचे कॅनडातील राजदूत ओलेग स्टेपानोव्ह यांनी जस्टिन ट्रुडो यांच्याकडे माफी मागण्याची मागणी केली.
त्याप्रमाणे ट्रुडोंनी पार्लमेंटमध्ये उभे राहून माफी मागितली आणि आपल्या अज्ञानामुळे हा प्रमाद घडला, असे जाहीररित्या सांगितले. हरदीपसिंग निज्जरच्या खुनासंबंधात भारतावर केलेल्या आरोपाबद्दलही त्यांना अशीच माफी मागावी लागेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.