नात्यांची उसवलेली वीण

विवेक मराठी    16-Oct-2023   
Total Views |
विषवृक्षाची बीजे या लेखमालिकेतील हा सातवा आणि शेवटचा लेख. बदलत्या सामाजिक वास्तवाचा व कुटुंबव्यवस्थेवर होत असलेल्या त्याच्या परिणामांचा वेध आपण या मालिकेत घेतला. लैंगिकतेच्या संदर्भात आपली विचारपद्धती कशी बदलली, या मुद्द्याचा गेल्या भागात विचार केला होता. आजच्या नवउदारमतवादी आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीत व स्त्री अस्मितेच्या संदर्भात स्त्रियांची प्रगती, असुरक्षितता व त्याचे मानवतेवर होणारे परिणाम यांचा संबंध या लेखात पाहू या, काही उपायांचा विचार करू या.

women
 
प्रत्येक कुटुंब वेगळे, व्यक्ती वेगळ्या. घरातले वातावरण हे व्यक्ति- व परिस्थितिसापेक्ष असले, तरी घरोघरी कुठे न कुठे एखादा टाका उसवलेला दिसेल. वेळीच तो ठीक केला नाही, तर वीण उसवते. तो उसवलेला टाका शोधायचे व जोडायचे पर्याय शोधणे हे आपले प्रत्येकाचे काम आहे.
 
 
गेली तीन-चार दशके ही जागतिकीकरणाची आहेत. या काळात नवउदारमतवाद जगभर पसरला व रुळला. त्याचे चांगले व वाईट परिणाम आता दिसू लागले आहेत. भारताच्या संदर्भात विचार केला, तर 50-60च्या दशकात नवभारताच्या निर्मितीचे, 70च्या दशकात स्त्री स्वातंत्र्याचे, 80च्या दशकात शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे, खाजगी महाविद्यालयांचे, 90च्या दशकात परदेशी शिक्षणाचे, 21व्या शतकाच्या पंचविशीत मल्टिनॅशनल कंपन्यांचे, मोबाइल फोनचे व सोशल मीडियाचे, मॉलचे व ब्रँडेड कपड्यांचे, मल्टिप्लेक्स चित्रपटांचे ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे पर्व आले. हे झंझावात वेळोवेळी नवशिक्षित व नवमध्यम वर्गात भलतेच पटकन स्थिरावले. त्याने कुटुंब- व समाजव्यवस्थेसमोर काही प्रश्न उभे केले आहेत. हे प्रश्न केवळ संस्कारांचे नाहीत, तर संस्कृतीच्या संकरातून निर्माण झालेले, सोयीची मूल्ये, तडजोडीची तत्त्वे स्वीकारल्याचे, जीवनशैलीचे आहेत. ते पर्यावरणाचे, अतिउपभोगाचे, आहे रे आणि नाही रे गटांमधल्या आर्थिक-सांस्कृतिक संघर्षाचे, जीवनशैलीतून ओढवलेल्या आजारांचे, स्त्रियांच्या सुरक्षिततेचे असे बहुआयामी प्रश्न आहेत.
 
 
आपल्या विषयमालिकेशी संबंधित प्रश्न आहे तो सुबत्ता व स्त्री सुरक्षा यांचा. सुबत्ता हा प्रश्न असू शकतो का? असा प्रश्न पडेल. पण नक्कीच! ‘प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी’, पैसा, वस्तू यांच्या अतिउपलब्धतेतून, सेवा, मनोरंजन यांचे अनेक पर्याय उपलब्ध असल्यानेही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. नवउदारमतवादी जगाचे वैशिष्ट्य हे की या व्यवस्थेत माणूस फक्त माणूस न राहता भांडवल बनतो, उपभोग हे विकासाचे मुख्य परिमाण मानले जाते. मग मूल्यव्यवस्था बदलते. किती प्रकारांनी हे बदल घडतात?
 
 
शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, दळणवळणाच्या साधनांची मुबलकता, जागतिक संधी, स्थलांतरे, विविध देश-संस्कृतींचे मिश्रण, आर्थिक सुबत्ता व विविध वस्तू-सेवांची उपलब्धता, वाढलेल्या गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी अधिक उत्पन्न व तीव्र स्पर्धा अशी ती एक साखळी आहे. स्त्रियांच्या बाबतीत शिक्षणाचा प्रसार, स्त्रियांच्या विकासासाठी नवी सरकारी धोरणे, शिक्षणातून मिळालेल्या नोकरी-व्यवसायाच्या संधी, आत्मविश्वास, सिद्ध करून दाखवायची संधी.. ‘आकांक्षांपुढती गगन ठेंगणे’ अशी स्त्रियांची स्थिती झाली. थोडक्यात, या नवउदार व्यवस्थेने स्त्री-पुरुषांना आर्थिक उत्पादक घटक व एक वस्तू बनवले. त्याच्या मोबदल्यात जीवनमूल्यांशी, जीवनदृष्टीशी, इतकेच काय, चवीचवीने जीवन जगण्याशीही तडजोड करावी लागते आहे. हे निओलिबरल र्‍हेटोरिक (Rhetoric) महिलांच्या इतके अंगवळणी पडले की यातल्या स्त्री स्वातंत्र्याची, जेंडर समवेशाची भाषा, आधुनिकता व मुक्त आचारविचार यांच्याबरोबर अपरिहार्यपणे आलेली स्त्रीहिंसा व पुरुषसत्ताकता याकडे डोळेझाक होत आहे. अनेकदा चित्रपट-मालिकांमधून दाखवलेली मुक्त स्त्रीची प्रतिमा, कणखर स्त्रीची प्रतिमा यशाचे ‘पुरुषी’ मापदंड घेऊन येते. पेहराव, भाषा, व्यसने, बेदरकारी, कटकारस्थाने, बोर्डरूम किंवा उच्चपदस्थ स्त्रीचा व्यवहार हे सारे पुरुषांचे अनुकरण करणारे असते. तेच मापदंड स्थापित करणारे असते. जागतिकीकरणाचे आर्थिक, तांत्रिक व सांस्कृतिक असे त्रिविध पैलू नीट समजून त्यावर काम केले जात नाही. त्यामुळे नववसाहतवादी, भांडवलशाही रचनेतून वाढलेला हिंसाचार, पुरुषसत्ताक संरचना नवे गहन प्रश्न निर्माण करीत आहेत. गळेकापू स्पर्धा, ईर्षा, काटाकाटीचे डावपेच हा या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. आज स्त्रिया सर्व क्षेत्रे पादाक्रांत करू लागल्या आहेत. शिक्षण, नोकरीच्या जागा, उच्च पदे, आर्थिक उत्पन्न अशी सर्व क्षेत्रांतली स्पर्धा व स्त्रियांचे वृद्धिंगत होणारे स्थान पारंपरिक विचाराच्या पुरुषांना सहन होत नाही. आजपर्यंत पुरुषत्वाचे विशेषाधिकार उपभोगणार्‍या पुरुषांना स्त्रियांचा आत्मविश्वास, त्यातून येणारा अभिमान पचवणे जड जाते. अशा ‘स्पर्धक’ स्त्रियांना ‘त्यांची जागा दाखवून द्यायची’ तर शारीरिक हल्ला, चारित्र्यहनन, बॉडी शेमिंग अशा कृष्णकृत्यांचा आधार घेतला जातो. हेच ‘रोल मॉडेल’ म्हणून नव्या तरुणांसमोर उभे राहते. चित्रपट, माध्यमे व मनोरंजन दुनिया त्याला खतपाणी घालते. त्यातून कुटुंबव्यवस्थेची वीण उसवलेली दिसते.
 

women 
 
आता इथे निवडीचा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे का? आर्थिक संधी, सुबत्ता तर हव्यात, पण जोडीला सुरक्षितता, संस्कार व सुखी सहजीवन कसे घडवायचे याचाही अभ्यास करावा लागेल व मेळ घालावा लागेल. नव्या जागतिक रचनेत केवळ ‘अर्थ’आधारित तर्क हाच आदर्श, योग्य मानला जातो, तो उचित नाही. प्रगतीचे मापदंड फक्त पैशात न मोजता ही आर्थिक सुबत्ता आपल्याला सांस्कृतिक उंची देते का? माणूस म्हणून आपल्या जाणिवा प्रगल्भ करते का? उन्नयन करते का? भौतिकतेतून तयार झालेले विकासाचे मॉडेल, परिणामी उभे झालेले शारीरिक व मानसिक आरोग्याचे प्रश्न, साहचर्याचे, नातेसंबंधांचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न, अतिरेकी उपभोगाचे प्रश्न, त्याच वृत्तीतून स्त्रीकडे उपभोग वस्तू म्हणून पाहण्याचे प्रश्न, हिंसकतेचे प्रश्न, नैसर्गिक स्रोतांच्या मालकीचे व र्‍हासाचे प्रश्न, पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचे प्रश्न, गरीब-श्रीमंत वाढणार्‍या दरीचे प्रश्न, गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचे प्रश्न.. असे हे प्रश्नजंजाळ सुटेल कसे व नव्या पिढीकडे आपण काय वारसा देणार, हा प्रश्न गंभीर आहे.
 
 
नव्या युगातल्या कुटुंबात अपत्यांवर समानतेचे संस्कार तर हवेतच, पण या परिस्थितीतून उद्भवलेली, लादलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी काही ठोस तरीही सूक्ष्म उपाय करणे गरजेचे आहे.विशेषत: कुटुंबाच्या परिघात ते करायला हवेत. जी जीवनमूल्ये चिरंतन आहेत, ती नवसमाजाला या काळातही ती उपयुक्त असतीलच. ती रुजवण्याचा ठरवून विशेष प्रयत्न करायला हवा.
 
 
व्यक्तिस्वातंत्र्य
 
व्यक्तिस्वातंत्र्य हे महत्त्वाचे जीवनमूल्य आहेच, पण ते अमर्याद किंवा पराकोटीचे असू शकत नाही. त्यालाही कुटुंब, समाज, देश, धर्म व मानवता अशा चौकटी असतात आणि त्या नेहमी असणारच आहेत. व्यक्तिवादी स्वातंत्र्याची टोकाची कल्पना प्रश्न निर्माण करते आहे. माझे स्वातंत्र्य जितके मला महत्त्वाचे, तितकेच इतरांचे स्वातंत्र्य जपणेही महत्त्वाचे, हा मूलभूत सिद्धान्त आहे. घटना असो वा कायदा, इतरांवर अन्याय करण्याचे स्वातंत्र्य तो कोणालाही देत नाही, सहिष्णू भारतीय संस्कृती तर नक्कीच ते देत नाही. स्वातंत्र्य हे मूल्य म्हणून जपले, तर ते मनमानीला थारा देत नाही, स्वार्थी विचारांना थारा देत नाही, ती एक जबाबदारी बनते, कर्तव्य पार पाडण्याचे भानही देते.
 
 
‘स्वातंत्र्य’ ही एक प्रत्येक वेळी निभावायची गोष्ट आहे. मैत्री असो, पती-पत्नी नाते असो, कुटुंबातले आई-वडील, सासू-सासरे यांच्याशी संबंध असोत - सकारात्मकता, अन्य व्यक्तींचा सन्मान व संयम हे त्याचे आधारस्तंभ आहेत.
 
 
संवादी निर्णयप्रक्रिया
 
पूर्वी तरुणवर्गही ‘आईवडिलांच्या आज्ञेत असणे’ हे कुटुंबव्यवस्थेतले मूल्य होते. आता बंधने सैलावलेली आहेत. बदलत्या काळानुसार मुलांच्या वाढलेल्या क्षमतांना, माध्यमांनी आणलेल्या माहिती क्रांतीला प्रतिसाद देत घरातली निर्णयप्रक्रिया संवादी तर असावीच, त्याचबरोबर वयाला आणि जीवनानुभवालाही काही मूल्य असते, हे लक्षात घेत आबालवृद्धांना त्या प्रक्रियेत स्थान असावे.
 
 
संवाद
 
कुटुंबात कितीही मतभेद झाले, तरी मनभेद होऊ नयेत म्हणून अहंकाराला दूर ठेवून सर्व पिढ्यांमध्ये संवाद साधला जायला हवा. केवळ कुटुंबच नव्हे, तर विस्तारित कुटुंबातले अन्य नातेवाईक, शेजारी व ऑफिसमधले सहकारी, वाहनचालक, गृह साहाय्यक यांच्याशीही संवाद हवा. मानसिक दुरावा, कुतरओढ, आत्महत्येची परिस्थिती येऊ नये, याची सजगता हवी. अशा नातेसंबंधात पैशापेक्षा भावना, त्याग यांना महत्त्व हवे, सर्व प्रकारचा मनाचा कोतेपणा कमी करायला हवा.
 
 
सहकार्य व स्वावलंबन
 
दैनंदिन व्यवहाराच्या कामांत, नैमित्तिक कामात सर्व कुटुंबसदस्यांनी आपला वाटा उचलला पाहिजे. ‘घर सर्वांचे, काम सर्वांचे’ हे नव्या कुटुंबाचे जीवनमूल्य असायला हवे. स्वयंपाकघरातल्या, स्वच्छतेच्या कामांपासून ते आर्थिक गुंतवणुकीच्या कामापर्यंत प्रत्येकातले किमान कौशल्य प्रत्येकाकडे हवे. रुचीनुसार व क्षमतेनुसार कामातले कमी-जास्त कौशल्य व वाटा ठरवावा. विशेषत: घरकामाचे ओझे फक्त बाईवर नक्की नसावे, किंवा सर्व सेवा आउटसोर्स्डही नसाव्यात. स्वावलंबन हे एक मूल्य आहे. सुखी संसाराचे ते गमक आहे.
 
 
समाजाचे एकक
  
कुटुंब हे समाजाचे मूळ एकक आहे, ते समाजाभिमुख कसे होईल याचा विचार करावा. बिल्डिंगच्या कार्यक्रमात, सार्वजनिक उत्सवात, सणासुदीला सहभागी व्हावे, इतरांना सामील करून घ्यावे व आपले योगदानही द्यावे. शेजार्‍यांच्या गरजेच्या वेळेला तन-मन-धनाने मदत करावी. एकेकटे राहणार्‍या व हॉस्टेलमध्ये राहणार्‍या मुला-मुलींनी पहिली काळजी आपला उपद्रव होणार नाही याची घ्यावी. योग्य तेवढा परिचय करून घ्यावा, सहभागही घ्यावा ही अपेक्षा चुकीची किंवा अवाजवी नाही.
 
 
तडजोड
 
कुटुंब सुदृढ ठेवायचे, तर तडजोडीला पर्याय नसतो. सर्वच सदस्यांनी तडजोडीची तयारी ठेवली पाहिजे. मी श्रीमंत, मी कमावता/ती, मी हुशार, मी लाडका/की, मी वयोवृद्ध, मी आजारी, मी शेंडेफळ.. असे म्हणून लादली जाणारी एकाधिकारशाही नातेसंबंध गढूळ करते. प्रत्येक व्यक्तीला निर्णयात स्थान, योग्य तो मान, तडजोडीची, कधीकधी माघार घेण्याची तयारी सर्वांकडे असेल तर ते कुटुंब सुखी, समतोल असते.
 
 
आध्यात्मिकता, कर्तव्यपालन, धर्माप्रती जागरूकता व अधर्माचे, अनैतिकतेचे भय, स्त्री-पुरुषांप्रती आकर्षणातही संयम, नैतिकता अशी महत्त्वाची मूल्ये हिंदू संस्कृतीने जगाला दिली आहेत. समताधारित समाजव्यवस्था व कुटुंबव्यवस्था चालू राहिली पाहिजे. ही मूल्ये स्वत:च्या आचरणाने प्रस्थापित करायची आहेत. तरुण पिढीकडून कळत-नकळत अपघात झाला, तर त्यांना सावरण्याची जबाबदारीही आपलीच आहे. भारतीय जीवनपद्धती व विचारपद्धती, आचार व परंपरा, प्रथा यांत सामावलेले विश्वकल्याणाचे तत्त्वज्ञान उलगडून सांगताना वर्तनातील विसंगती, जातीयता, स्त्री/पुरुष द्वेष, याबद्दल चर्चा व्हायला हवी. स्वधर्माचा आदर हवा, विशिष्ट धर्म, वेश, आहार याबद्दल दुराग्रह येणार नाही ही आपली कसोटी आहे. नवउदार जगात जग हे जागतिक खेडे झाले आहे. त्यात संस्कृती, विवाह, रहिवास, भाषा, भूषा, भोजन यांचे संकर होणार. नवी पिढी प्रयोगशील असणार हे गृहीत धरायला हवे, त्यांना यथाशक्ती सल्ला, मदत, सावधगिरीचा इशारा, अनुभवाचे शहाणपण आणि आपलेपणाचा हात द्यायला हवा.
 
 
आपली अपत्ये चुकली असे वाटत असेल, तुमचा शहाणपणाचा सल्ला त्यांनी ऐकलेला नसला, तरी त्यांच्या परतीचे दोर कापू नका. त्यांच्या आयुष्यापेक्षा तुमचा राग, अपमान, अभिमान, अहंकार, लोकांची टीका, घराण्याची अब्रू महत्त्वाची आहे का? याचा विचार करा. कुटुंबव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करणारी बीजे वेगवेगळ्या माध्यमांतून येत आहेत. मुलगे व मुली शिक्षणासाठी घरापासून दूर, परदेशात जातात. त्यामुळे घर, नातेवाईक, मूल्यव्यवस्था, नातेसंबंध, प्रेम यापासून ती तुटत आहेत का? यावर बारकाईने लक्ष हवे. भुसभुशीत मातीत विषवृक्षाचे तण फोफावायला पोषक वातावरण आहे.
 
संवाद, संतुलन, मूल्ये व मानवी संबंध हे घटक सर्वोपरी आहेत. सर्वांनी प्रयत्न करू या!
 
(समाप्त)

नयना सहस्रबुध्दे

स्त्रीविषयक लेखनासाठी प्रसिध्द असणाऱ्या नयना सहस्रबुध्दे या भारतीय स्त्री शक्ती या संघटनेच्या संस्थापक सदस्य आहेत. भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणूनही त्या कार्यरत होत्या. नयना सहस्रबुध्दे या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदावर कार्यरत होत्या. सध्या महिला बँकेत डेप्युटेशनवर रुजू झाल्या आहेत. साप्ताहिक विवेकमध्ये स्त्रीभान या सदरातून त्या स्त्रीविषयक लेखन करत आहेत.