सरसंघचालकांची मुलाखत अर्थ आणि अन्वयार्थ

विवेक मराठी    20-Jan-2023   
Total Views |
@विराग पाचपोर। 9579296582
 सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी पांचजन्य आणि ऑर्गनायझर या साप्ताहिक नियतकालिकांना दिलेली मुलाखत सध्या माध्यमात आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. त्यांच्या विधानाचा अनर्थ करीत माध्यमांनी आणि स्वार्थी राजकारणी नेत्यांनी डॉ. भागवत मुस्लिमांना धमकीवजा इशारे देत आहेत, त्यांना घाबरवत आहेत, असा अपप्रचार करण्याची संधी साधली. पण सरसंघचालकांच्या व्यक्तव्याचा भाव आत्मसात करून ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना जगात प्रसारित करण्याचे आव्हान स्वीकारणे हीच भारताची आणि भारतीय जनतेची नियती आहे. या दृष्टीनेच त्यांच्या या मुलाखतीकडे पाहावे लागेल.
  
rss
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी काही दिवसांपूर्वी पांचजन्य आणि ऑर्गनायझर या साप्ताहिक नियतकालिकांना दिलेली मुलाखत सध्या माध्यमात आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. या मुलाखतीदरम्यान सरसंघचालकांनी काही नवीन मुद्दे मांडलेत किंवा संघाच्या मूळच्या भूमिकेत काही परिवर्तन होण्याचे संकेत दिलेत, किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या विचारांशी जवळीक दर्शविली आणि संघाच्या स्वयंसेवकांना निवडणुकीत सक्रिय होण्याचे निर्देश दिलेत असे काहीदेखील झाले नाही. परंतु माध्यमातील संघाचे ’जाणकार’ आणि ’अभ्यासक-विचारक’ मंडळी, राजकारणातील डावे-लिबरल, सेक्युलर, उदारमतवादी, मानव अधिकारवादी अशी अनेक मंडळी या मुलाखतीतून त्यांच्या-त्यांच्या मगदुराप्रमाणे आणि आकलनशक्तीच्या कुवतीनुसार अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असताना दिसतात. त्यांचे आकलन आणि निष्कर्ष त्यांनाच लखलाभ.
काय म्हणाले होते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत? अगदी सरळ सोप्या भाषेत ते म्हणाले की “हिंदू ही आमची ओळख, राष्ट्रीयत्व आणि प्रवृत्ती आहे. सर्वांना आपले मानून चालण्याची हिंदू प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती कायम राहायलाच हवी.”
 
 
1925 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर जेव्हा नागपूरला डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, त्या दिवसापासून संघाची हीच भूमिका राहिली आहे की ‘हा देश हिंदूंचा आहे, या देशात राहणार्‍यांची ओळख हिंदू म्हणून आहे, या देशाच्या उन्नती-अवनतीकरिता हा जो भारतमातेचा पुत्ररूप हिंदू समाज आहे तोच सर्वस्वी जबाबदार आहे. हा समाज स्वाभिमानी, संघटित, सामर्थ्यसंपन्न झाला तरच या देशाचे भाग्य बदलता येईल. यासाठीच संघाची स्थापना झाली आहे.’
 
 
 
शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाकडे दृष्टी टाकली, तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्यापासून तो डॉ. मोहनराव भागवतांपर्यंत सर्व सरसंघचालकांनी त्यांच्या त्यांच्या काळातील आवश्यकतांचे, परिस्थितीचे, सामाजिक स्थितीचे, आणि देश-काल-परिस्थितीचे योग्य आकलन करून संघाची ही मूळ भूमिका अत्यंत समर्पक पद्धतीने मांडली आहे. तोच धागा पकडून वर्तमान सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनीही त्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.
 

rss 
 
“राष्ट्रीयता धर्माच्या आधारावर निश्चित होत नाही, तर मातृभूमीच्या आधारावर होते. त्यामुळे अलग-अलग पंथ-मतांना मानणार्‍या एकाच देशातील नागरिकांची राष्ट्रीयता एकच असते, संमिश्र नाही.”
- प.पू. संघसंस्थापक
डॉ. केशव बळीराम हेडगेवार
 
संघाच्या हिंदू राष्ट्राच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करणारे लोक नेहमी एकच प्रश्न उपस्थित करतात. भारत हे जर हिंदू राष्ट्र असेल, तर या देशात राहणारे मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, लिंगायत इत्यादी धर्मीय लोकांचे काय? ते या देशाचे नागरिक नाहीत का? परंतु त्यातही सर्वाधिक संवेदनशीलता मुस्लीम आणि ख्रिश्चन यांच्याबद्दलच व्यक्त होते.
 
 
 
या प्रश्नावर संघाची भूमिका समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाचा मागोवा घ्यावा लागेल. इस्लामच्या उदयानंतर इसवीसन 712पासून भारतावर इस्लामी आक्रमक सातत्याने आक्रमण करीत होते. येथील राजांनी आणि समाजाने त्यांचा अनेक वेळ दारुण पराभवदेखील केला, तरी एकीच्या अभावामुळे परकीय मुस्लीम, मोगल आक्रमकांनी या देशावर सुमारे 800 वर्षे राज्य केले. या 800 वर्षांचा भारताचा इतिहास हा सतत संघर्षाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महाराज सुहेलदेव, छत्रपती संभाजी महाराज, छत्रसाल, बाजीराव पेशवे, गुरू तेघबहादूर, गुरू गोविंदसिंह, बंद बैरागी, अशी वीरांची मांदियाळी आहे, ज्यांच्या नेतृत्वात या देशाच्या जनतेने मुस्लीम आक्रमकांच्या विरोधात सतत आघाडी उघडून संघर्ष सुरू ठेवला होता.
 
 
 
मुस्लीम शासनकर्त्यांच्या काळात या देशातील हजारो-लाखों हिंदूंचे धर्मांतर केले गेले, कोट्यवधी लोकांची कत्तल केली गेली, महिलांची अब्रू लुटली गेली, मंदिरांचा विध्वंस केला गेला.. अशा अनेक घटना घडल्या, ज्यामुळे हिंदू समाजाचा मानभंग होऊन त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचेला. परंतु संपूर्ण हिंदू समाजाला इस्लाममध्ये परावर्तित करण्याचे आणि भारताचे दार-उल-हर्बमध्ये रूपांतर करण्याचे मुस्लीम आक्रमकांचे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही.
 
 
 
rss
 
“मुस्लिमांना स्पष्टपणे हे सांगण्याची गरज होती की, आता मोगल सत्तेचे दिवस संपले आहेत. यापुढे हिंदू-मुस्लिमांना एकाच भारत राष्ट्रात समतेच्या पायावर भाऊ भाऊ म्हणून राहावयाचे आहे.”
- द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी


पुढे, इंग्रजांच्या काळात त्यांनीदेखील ख्रिश्चन धर्माचा प्रचार करून हजारो-लाखों हिंदूंना ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित केले. या देशातील मूळ शिक्षण पद्धती बंद करून त्याजागी इंग्रज शिक्षण पद्धती आणली, जेणेकरून हिंदू समाज विचार, आचार आणि व्यवहार यामुळे ख्रिश्चन बनेल, केवळ नावापुरताच तो हिंदू राहील असे प्रयत्न केले. त्यांचे ते प्रयत्न बर्‍याच अंशी सफल झाले असे आपण आज पाहतो आहोत. त्यांनी आपल्या देशाचा इतिहास बदलला, ’फोडा आणि राज्य करा’ या तत्त्वाचा अवलंब करून हिंदू समाजात जाती, भाषा, प्रांत या मुद्द्यांवरून भेद निर्माण केले आणि 200 वर्षे या देशावर राज्य केले. 1857 साली या देशातील हिंदू आणि मुस्लीम यांनी मिळून एक भारतीय किंवा हिंदुस्तानी या नात्याने इंग्रजांचे गुलामीचे जोखड फेकून देण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न सफल झाला नाही, त्याची अनेक कारणे आहेत. त्यांची चर्चा करणे हा प्रस्तुत लेखाचा विषय नाही. या युद्धानंतर इंग्रजांना याची जाणीव झाली की हिंदू आणि मुस्लीम जर एकत्र राहिले, तर या देशावर राज्य करणे आपल्याला कठीण जाईल. त्यामुळे त्यांनी प्रयत्नपूर्वक या दोन समाजात फूट पाडण्याचे कारस्थान रचले आणि ते यशस्वी केले.
 
 
 
या काळातही स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, नारायण गुरू यासारख्या धार्मिक नेत्यांनी, राजा राम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, गोपाल कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सामाजिक क्षेत्रात, तर लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार यांनी राजकीयदृष्ट्या जनजागृती करून स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवली. त्यामुळे हा सुमारे 1000 वर्षांचा इतिहास हा स्वत:ची ओळख, अस्तित्व, अस्मिता टिकवून ठेवण्याच्या हिंदूंच्या धडपडीचा आणि संघर्षाचा इतिहास आहे. त्यात कधी ते यशस्वी झाले आहेत, तर कधी त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना यश मिळाले नाही.
 

rss 
 
मुस्लीम आणि इंग्रज यांच्या शासनकाळात स्थानिक हिंदूंचे धर्मपरिवर्तन झाले, त्याची ऐतिहासिक, सामाजिक, भौतिक, धार्मिक अशी अनेक कारणे असू शकतात. परंतु त्याचा परिणाम असा झाला की आज भारतात 17 कोटीहून अधिक मुस्लीम आहेत आणि 5 ते 6 कोटींच्या आसपास ख्रिश्चन आहेत, जे मूळ हिंदू समाजातून धर्मांतरित झाले आहेत. या धर्मांतरित लोकांचे पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी जी उर्वरित हिंदूंची आहे तीच आहे. धर्म किंवा उपासनापद्धती बदलली म्हणजे पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी बदलते असे नाही. इंडोनेशियाचे मुस्लीम याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी इस्लामचा स्वीकार केला, पण आपली मूळ संस्कृती नाही सोडली. आजही त्यांच्या विमानसेवेचे नाव ‘गरुड एअरवेज’ आहे, रामायण-महाभारत हे त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचे आजही अभिन्न घटक आहेत, त्यांची नावेदेखील संस्कृत भाषेतील आहेत.
 
 
 
भारतीय मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्या बाबतीत मात्र हे होऊ शकले नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे येथील धर्मांतरित मुस्लिमांचा स्वत:ला आक्रमक मुस्लीम शासकांशी जोडण्याचा तसेच जेथे इस्लामचा उदय झाला त्या अरब संस्कृतीशी आपली नाळ जुळविण्याचा प्रयत्न. भारतातील ’हिंदू-मुस्लिमांचे’ जे नेते होते, त्यांनी आणि त्यांच्या मतांवर आपले राजकीय सत्तेचे गणित साधणार्‍या नेत्यांनी सर्वसाधारण मुस्लिमांना भारतीय संस्कृती, पूर्वज आणि मातृभूमी यापासून दूर ठेवण्याचाच प्रयत्न केला. त्याचा परिणाम आज आपल्याला देशात अनेक क्षेत्रांत दिसून येत आहे.
 
 
 
जगातील सर्व मानवसमूहांत हिंदू हा असा एक समूह आहे, जो खर्‍या अर्थाने सहनशील आहे, वेगवेगळ्या विचारांचे स्वागत, स्वीकार आणि आदर करणारा आहे. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांचा आदर जितका भारतात झाला, तितका जगातील कोणत्याही देशात होत नाही. इस्लाममध्ये मुस्लिमांचे एकूण 72 फिरके (म्हणजे पंथ, उपपंथ, गट) आहेत. ते सर्व केवळ भारतातच सुरक्षित आहेत. जगात एकूण 50-55 मुस्लीम देश आहेत, त्यापैकी एकाही देशात या सर्व 72 फिरक्यांचे लोक आढळून येत नाहीत. तीच गोष्ट ख्रिश्चन लोकांच्या बाबतीतही आहे. म्हणून भारताचा स्वभाव सहिष्णू आहे, सेक्युलर आहे. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस नेहमी म्हणत असत की “मुस्लीम आणि ख्रिश्चन यांना भारतीय समाजाने, राजांनी आश्रय दिला, धर्मप्रचाराचे आणि धर्माचरणाचे स्वातंत्र्य दिले. अशा हिंदू समाजाला ‘सेक्युलॅरिझम’चे धडे देणे म्हणजे Carrying coal to New Castleसारखे होईल. हिंदू हा मुळातच सेक्युलर आहे.”
 
 
rss
 
डॉ. मोहनराव भागवतांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की “भारतातील मुस्लिमांना ’आम्ही एकेकाळी राज्यकर्ते होतो आणि पुन: राज्यकर्ते होऊ’ ही भावना नक्कीच सोडून द्यावी लागेल.” यापूर्वी संघसंस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनीही असेच प्रतिपादन केले आहे. डॉ. हेडगेवार म्हणत असत की “राष्ट्रीयता धर्माच्या आधारावर निश्चित होत नाही, तर मातृभूमीच्या आधारावर होते. त्यामुळे अलग-अलग पंथ-मतांना मानणार्‍या एकाच देशातील नागरिकांची राष्ट्रीयता एकच असते, संमिश्र नाही.”
 
 
सन 1935च्या वर्धा जिल्ह्यात आरवी येथे संघाच्या एक शिबिरात स्वयंसेवकांना संबोधित करताना डॉ. हेडगेवार म्हणाले की, “महात्मा गांधींच्या हिंदू-मुस्लीम एकतेच्या विचाराला संघाचा विरोध नाही. पण गांधीच असे म्हणतात की An average Muslim is a bully and an average Hindu is a coward. मग दोघात एकता कशी होणार?” असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले की मित्रता बरोबरीच्या दोघांत होते. ही स्पष्ट करणारा महाभारतातील एक श्लोक त्यांनी सांगितला, तो असा -
 
 
ययोरेवं समं वित्तम ययोरेवं समं बलं।
तयोरविवाहों मैत्री च न तु पुष्टविपुष्टयो:॥
 
 
याचा अर्थ असा की समान शक्तिशाली आणि धनवान लोकांमध्येच परस्पर मैत्री आणि विवाहादी संबंध सार्थक प्रस्थापित होतात, पुष्ट आणि अपुष्ट लोकांत नाही. भारतातील मुस्लिमांच्या मनात हाच भाव आहे की हिंदूंच्या तुलनेत ते अधिक संघटित आणि शक्तिशाली आहेत. ही भावना जोवर त्यांच्यात विद्यमान आहे, तोवर हिंदू-मुस्लीम एकता कशी होणार? असा प्रश्न त्यांनी तेव्हा उपस्थित केला होता.
 
 
 
संघाचे दुसरे सरसंघचालक श्री माधव सदाशिवराव गोळवळकर यांनीसुद्धा प्रसिद्ध मुस्लीम पत्रकार आणि विचारवंत डॉ. मोहम्मद जिलानी यांच्याशी झालेल्या चर्चेत याच भूमिकेचा पुनरुच्चार करीत मुस्लीम बांधवांना मूळ राष्ट्रीय प्रवाहात येण्याचे आवाहन केले होते. मुस्लिमांना स्पष्टपणे हे सांगण्याची गरज होती की, आता मोगल सत्तेचे दिवस संपले आहेत. यापुढे हिंदू-मुस्लिमांना एकाच भारत राष्ट्रात समतेच्या पायावर भाऊ भाऊ म्हणून राहावयाचे आहे. शेवटी मुसलमानदेखील भारतीय वंशाचे, भारतीय रक्ताचेच आहेत. भूतकाळात तलवारीच्या धाकावर त्यांचे धर्मांतर घडवून त्यांना मुसलमान करण्यात आले आहे. आता मुसलमानांनी मोगल, तुर्क, इत्यादी परकीय आक्रमकांशी नाते ठेवण्याची गरज नाही. वेगळेपणाच्या सर्व स्मृती गाडून टाकून त्यांनी या भूमीशी व येथील संस्कृती आणि परंपरा यांच्याशी एकरूप झाले पाहिजे. (भारतीय मुस्लिमविषयी श्रीगुरुजी, भारतीय विचार साधना, पुणे, 2006, पृष्ठ 18-19.)
 
 
rss
 
 
““मुस्लीम आणि ख्रिश्चन यांना भारतीय समाजाने, राजांनी आश्रय दिला, धर्मप्रचाराचे आणि धर्माचरणाचे स्वातंत्र्य दिले. अशा हिंदू समाजाला ‘सेक्युलॅरिझम’चे धडे देणे म्हणजे Carrying coal to New Castleसारखे होईल. हिंदू हा मुळातच सेक्युलर आहे.” - तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस
 
 
यानंतर श्री बाळासाहेब देवरस यांनी तर 1977 साली मुस्लिमांसाठी संघाची दारेसुद्धा उघडली होती. “या देशात अल्पसंख्य-बहुसंख्य हा भेद संपला पाहिजे. आपण सगळेच हिंदुस्तानी आहोत, भारतीय आहोत ही भावना वाढीस लागणे आवश्यक आहे. धर्म किंवा उपासना पद्धती बदलली म्हणून परंपरा, मातृभूमी आणि पूर्वज बदलत नाहीत’‘ असे ते म्हणत असत.
 
  
 
संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी 1931 साली जंगल सत्याग्रहासाठी जाताना पुसद येथे एक जाहीर सभेत हेच विचार अधिक जोरकसपणे मांडले होते. ते म्हणाले होते की, “या देशातील हिंदू-मुसलमान या दोन्ही समाजात एकच रक्त आहे. या देशातील बहुसंख्य मुसलमान येथीलच आहेत. या देशावर झालेल्या मुस्लीम आक्रमणामुळे, काही भीती व काही लोभ यामुळे त्यांनी मुस्लीम उपासना पद्धती स्वीकारली असली, तरी आम्ही त्यांना आपलेच बांधव समजतो. त्यांनी जरूर मुस्लीम धर्माप्रमाणे वागावे. कोणताही धर्म अत्याचार व हिंसा यांना उत्तेजन देत नाही. मुस्लीम बांधवांनी अन्य धर्माचा द्वेष न करता येथील राष्ट्रप्रवाहात समरस व्हावे. अनादिकाळापासून चालत आलेल्या या राष्ट्रप्रवाहाचे नाव या देशाच्या हिंदुस्थान या नावाप्रमाणे हिंदू हेच आहे. हे नाव कोणत्या जातीचे किंवा संप्रदायाचे नाही. हे येथील मानवी समाजाचे व त्याच्या जीवन पद्धतीचे नाव आहे. ज्या धर्माला हिंदू धर्म म्हणतात, त्याचे अस्तित्व अनादिकाळापासून असून जैन, बौद्ध, शीख या सर्वांचा समावेशक असा हा हिंदू जीवनप्रवाह आहे. त्यात मुसलमान, ख्रिश्चन आदींनी आपली स्वतंत्र उपासना पद्धती कायम ठेवून पूर्णपणे विलीन व्हावे. यात त्यांचे, आमचे आणि संपूर्ण देशाचे कल्याण आहे.” (आसमंत, तरुण भारत, नागपूर, दिनांक 8 ऑगस्ट 2021.)
 
 
 
आज डॉ. भागवत जेव्हा म्हणतात की “भारतातील मुस्लिमांना घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, त्यांचे नुकसान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; ज्यांना मुस्लीम म्हणून राहायचे आहे, त्यांनी राहावे, ज्यांना आपल्या पूर्वजांकडे परत यायचे आहे, त्यांनी जरूर यावे. तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. देशात इस्लामला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मात्र, त्यासाठी त्यांना आम्ही एकेकाळी राज्यकर्ते होते आणि पुन्हा राज्यकर्ते होऊ ही भावना नक्कीच सोडावी लागेल”, तेव्हा ते संघसंस्थापकांची वर नमूद केलेला विचारच अधोरेखित करीत आहेत.
 
 
 
परंतु त्यांच्या या विधानाचा अनर्थ करीत माध्यमांनी आणि स्वार्थी राजकारणी नेत्यांनी डॉ. भागवत मुस्लिमांना धमकीवजा इशारे देत आहेत, त्यांना घाबरवत आहेत, असा अपप्रचार करण्याची संधी साधली.
 
 
 
सरसंघचालक भागवत या मुलाखतीत असेही म्हणाले की या “देशात राहणार्‍या सर्व लोकांची ओळख हिंदू म्हणूनच आहे. हिंदू हा कोणाची धर्मवाचक शब्द नाही, तर आमची राष्ट्रीय ओळख आहे.” यापूर्वी 4 जुलै 2021 रोजी गाझियाबाद येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत यांनी “भारतात राहणार्‍या हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन सर्वांचे डीएनए सारखे आहेत. मुसलमांना आम्ही वेगळे मानत नाही, ते आमचेच आहेत. त्यामुळे हिंदू-मुस्लीम एकतेच्या गोष्टी करणे हे योग्य नाही. दोन वेगळ्या घटकात एकता होऊ शकते पण येथे सर्व एकच आहेत’‘ असे म्हटले. याच्याही आधी दिल्लीत विज्ञान भवनातील व्याख्यानमालेत बोलताना संघाची हिंदू राष्ट्राची संकल्पना मुसलमानांना सोबत घेतल्याशिवाय अपूर्ण आहे, असे विधानही केले होते.
 
 
 
त्यामुळे संघाचे सरसंघचालक भारतीय मुसलमानांना घाबरवीत आहेत असे मुळीच नाही. हा एक शुद्ध खोडसाळ प्रचार आहे. 2014पासून भारतीय मुसलमान समाज हा हिंदू विचाराच्या जवळ येत आहे, हे या मंडळींचे खरे दुखणे आहे. भारतीय जनता पक्षाच्या कल्याणकारक योजना त्यांनाही लाभदायक आहेत, असे त्यांच्या अनुभवास आले आहे. जनधन योजनेपासून ते उज्ज्वला, घरकुल, शौचालय इत्यादी सर्व योजनांचे लाभ मुस्लीम समुदायालाही मिळत आहेत. मुस्लिमांचा कल भाजपाकडे झुकताना दिसत आहे, याचे प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या गुजरात, हिमाचल, उत्तर प्रदेशमधील रामपूर अशा अनेक निवडणुकांतून मिळाले आहे. गुजरातमध्ये तर मुस्लीम बहुसंख्या असलेल्या 19 मतदारसंघांपैकी 17मधून भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रथमच जिंकले आहेत. रामपूर हा आजम खान यांचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्याशिवाय कुणीही तेथून आजवर निवडणूक जिंकलेला नव्हता, हे विशेष.
 
 
 
संघाचे पाचवे सरसंघचालक कुप्प. सी. सुदर्शन यांच्या आशीर्वादाने आणि वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांच्या मार्गदर्शनात मुस्लीम राष्ट्रीय मंच या संघटनेने 2002 पासून मुस्लीम समाजात एक सामाजिक सुधार आंदोलन म्हणून आपले काम सुरू केले आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम आणि प्रभाव आता दिसून येत आहे. सर्वसाधारण मुस्लीम समाजाचा कॉँग्रेस व इतर सेक्युलर आणि डावे पक्ष, मानवाधिकारवादी, धार्मिक नेते यांच्याबद्दलचा भरवसा तुटत चालला आहे. त्यामुळे या पक्षांचे धाबे दणाणले आहे असे दिसून येते. म्हणूनच सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या सरळ विधानाचा उलट-सुलट अर्थ लावून मुस्लीम समाजाला दिग्भ्रमित करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. परंतु आता त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होईलच याची खात्री नाही.
 
 
 
लोकसंख्या नियंत्रण हा आणखी एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. डॉ. भागवतांनी या मुद्द्याला स्पर्श करीत एक सर्वंकष कायदा असण्याची आणि तो सर्व नागरिकांना लागू करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. हीदेखील योग्यच आहे. आज देशात हिंदू बहुसंख्य आहेत आणि हिंदूंच्या उत्थानाद्वारेच देशातील सर्व लोक सुखी होऊ शकतात. लोकसंख्येचे असंतुलन झाल्यास काय होते, हे जगातील अनेक उदाहरणांद्वारे सिद्ध झाले आहे. जिथे असमतोल होता, तिथे देशाची फाळणी झाली. हे जगभर घडले आणि त्याचे कारण म्हणजे जगातील लोकांची, संस्कृतीची प्रवृत्ती आक्रमक आहे. फक्त हिंदू समाज आहे, जो आक्रमक नाही. म्हणूनच अनाक्रमण, अहिंसा, लोकशाही, धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवायची असल्यास अनाक्रमणाची प्रवृत्ती असलेल्यांना वाचविण्याची गरज असून त्यासाठी लोकसंख्या नियंत्रणाची नीती अतिशय गरजेची आहे, असे सरसंघचालक डॉ. भागवत यांनी म्हटले.
 
 
 
लोकसंख्येचे जिथे जिथे असंतुलन झाले, तिथे तिथे आपल्या देशाचा तो भूभाग वेगळा झाला, हा इतिहास आहे. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे पाकिस्तानची निर्मिती. जगातील उदाहरण द्यायचे झाले, तर ईस्ट तिमोर आणि सुदान यांचे देता येईल. लोकसंख्येचे संतुलन बिघडले तरच या घटना घडतात आणि समाजावर त्याचे भयंकर परिणाम होतात, ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे.
 
 
 
म्हणून हिंदू म्हणून भारताची जी ओळख आहे, ती कायम ठेवणे गरजेचे आहे. भारत हे अनादिकाळापासून हिंदू राष्ट्रच आहे. संघाला नव्याने हिंदू राष्ट्र निर्माण किंवा स्थापित करावयाचे नाही ही गोष्ट संघाच्या सर्व सरसंघचालकांनी वेळोवेळी स्पष्ट केली आहे, तरीसुद्धा राजकीय नेते आणि माध्यमे पुन्हापुन्हा भ्रामक प्रचार करून या विषयावर जनमत प्रभावित करण्याचा प्रयत्न करीतच आहेत. म्हणून सर्वसामान्य हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध धर्मीय भारतीय नागरिकांनी ही वस्तुस्थिती समजून घेण्याची नितांत गरज आहे.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज भारत जागतिक क्षितिजावरील एक तळपता तारा म्हणून उदयाला येत आहे. संपूर्ण जगाला आणि मानवतेला शांतीचे, प्रगतीचे, समृद्धीचे आणि मानवतेचे मार्गदर्शन करण्याची क्षमता भारतात आहे. त्यामुळे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या व्यक्तव्याचा भाव आत्मसात करून ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना जगात प्रसारित करण्याचे आव्हान स्वीकारणे हीच भारताची आणि भारतीय जनतेची नियती आहे. या दृष्टीनेच त्यांच्या या मुलाखतीकडे पहावे लागेल. हाच त्यांच्या या मुलाखतीचा अर्थ आणि अन्वयार्थ आहे.
 
लेखक न्यूजभारती डॉट कॉमचे संपादक आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक आहेत.