प्राचीन भारतातील एकेकाळचा राजधर्म असलेला जैन धर्म आज भारतातील अत्यंत छोटा अल्पसंख्याक धर्म म्हणून ओळखला जातो. मुख्यत: व्यापारी, उद्योजक असलेल्या अत्यंत शांतताप्रिय अहिंसावादी अल्पसंख्य जैन समाजाचे परमोच्च श्रद्धास्थान असलेले ‘श्री सम्मेद शिखरजी’ हे परमपावनधाम सध्या नसत्या वादाचा विषय झालेले आहे. या स्थानास तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन सन्मान करण्याऐवजी झारखंड सरकारने ‘पर्यटन स्थळ’ घोषित करून, जैनांच्या धार्मिक श्रद्धांवरच प्रहार केलेला आहे. सरकारच्या या घोषणेविरुद्ध जैन समाजाने निकराचा संघर्ष सुरू केला असून ठिकठिकाणी शांततापूर्ण निषेध मोर्चे काढले आहेत. या श्रद्धारक्षण आंदोलनाचा आढावा.
भारतवर्ष हा धर्मप्रधान देश आहे. अनेक धर्म, पंथ, संप्रदाय हे भारताचे वैशिष्ट्य आहे. भारताएवढी धार्मिक विविधता जगात अन्यत्र कोठेच आढळत नाही. भारतामध्ये जे अनेक धर्म प्रचलित आहेत, त्यामध्ये सनातन, बौद्ध, जैन, शीख हे भारतामध्ये उदय झालेले, तर पारशी, ख्रिस्ती, इस्लाम हे परदेशभूमीत जन्मलेले धर्म आहेत. भारतीय धर्मांमध्ये, ‘अहिंसा परमो धर्म:’ मानणारा जैन धर्म हा एक अत्यंत प्राचीन धर्म आहे. भगवान ऋषभदेव ते भगवान महावीरांपर्यंतची 24 तीर्थंकरांची परंपरा आणि भारतभर विखुरलेली सिद्धक्षेत्र तीर्थक्षेत्रे ही जैन समाजाची परमोच्च श्रद्धास्थाने आहेत. या 24 तीर्थंकरांपैकी 20 तीर्थंकरांचे निर्वाण स्थान, मोक्षभूमी म्हणून झारखंड राज्यातील ‘श्री सम्मेद शिखर’ या सिद्धक्षेत्र पर्वत परिसरास जैन समाजात सर्वोच्च स्थान आहे. थोडक्यात, सम्मेद शिखर हे स्थान जैन श्रावकांसाठी ख्रिश्चनांची ‘व्हॅटिकन सिटी’, इस्लाम धर्मीयांच्या ‘मक्का-मदिना’ आणि हिंदूंच्या काशी-पंढरीसारखे परमपावन क्षेत्र आहे. अशा या प्राचीन धर्मस्थळावरील जैन समाजबांधवांच्या श्रद्धा-निष्ठा लक्षात न घेताच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंड सरकारने ते ‘पर्यटन स्थळ’ म्हणून विकसित करण्याची योजना घोषित केली आहे. जैनांच्या सर्वोच्च परमपावन धार्मिक स्थळाला खरे तर तीर्थक्षेत्राचा अधिकृत दर्जा देऊन ते जतन करण्याऐवजी ते ‘पर्यटन स्थळ’ म्हणून घोषित करणे हा शांतताप्रेमी, देशप्रेमी, अहिंसावादी, श्रद्धाळू जैन धर्मीयांवर फार मोठा अन्याय आहे.
सम्मेद शिखर माहात्म्य
सम्मेद शिखर हे स्थान पूर्वी बिहारमध्ये होते, पण राज्य विभाजनानंतर ते नवनिर्मित ‘झारखंड’ राज्यात समाविष्ट झाले. झारखंड राज्यातील ‘गिरिडिह’ जिल्ह्यात, छोटा नागपूर पठारावर एका पहाडावर हे स्थान असून जैन समाजात या पर्वताला ‘पार्श्वनाथ पहाड’, ‘पारसनाथ पहाड’ म्हणून ओळखले जाते. सम्मेद शिखराची उंची 1350 मीटर (4430 फूट) आहे. ‘शिखरजी’ म्हणून हे परमपावन क्षेत्र अवघ्या भारतभर प्रसिद्ध आहे. रांची या शहरापासून सुमारे 100 कि.मी. अंतरावर हे स्थान आहे. हे स्थान व सर्व पहाडी परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित आहे. या भागात हॉटेल्स, इमारती, मोटारसायकल यांना बंदी आहे. देशभरातून येथे जैन भाविकांचे मोठ्या संख्येने वर्षभर येणे होत असते. व्रतस्थ राहून, अनवाणी पायाने मोठ्या श्रद्धेने-निष्ठेने ते ही ‘सम्मेद शिखर’ पदयात्रा करतात. जीवनात एकदा तरी सम्मेद शिखरजीची यात्रा करायची अशी प्रत्येक जैन बांधवाची इच्छा असते, इतके या सिद्धक्षेत्राला महत्त्व आहे. ‘शाश्वत तीर्थ’ म्हणून या तीर्थक्षेत्राचे माहात्म्य आहे.
24 तीर्थंकरांपैकी प्रथम तीर्थंकर ऋषभदेव उर्फ आदिनाथ यांची मोक्षभूमी कैलास पर्वत मानली जाते; 12वे तीर्थंकर भगवान वासुपूज्य यांची मोक्ष-निर्वाणभूमी चंपापुरी आहे; 22वे तीर्थंकर नेमीनाथ यांचे निर्वाण क्षेत्र गिरनार पर्वत (गुजरात) आहे, तर 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचे मोक्षप्राप्ती स्थान पावापुरी आहे. हे 4 तीर्थंकर सोडून ज्यांची मोक्षभूमी सम्मेद शिखर आहे, त्या उर्वरित 20 तीर्थंकरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - तीर्थंकर क्रमांक 2) भगवान अजितनाथ, 3) भ. संभवनाथ, 4) भ. अभिनंदन, 5) सुमतीनाथ, 6)भ. पद्मप्रभू, 7) भ. सुपार्श्वनाथ, 8) भ. चंदाप्रभूजी, 9) भ. सुविधीनाथ, 10) भ. शीतलनाथ, 11) भ. श्रेयांसनाथ, 13) भ. निमलनाथ, 14) भ. अनंतनाथ, 15) भ. धर्मनाथ, 16) भ. शांतिनाथ, 17) भ. कुंथुनाथ, 18) भ. अमरनाथजी, 19) भ. मल्लिनाथ, 20) मनी सुव्रत, 21) भ. नेमीनाथ, 23) भ. पार्श्वनाथ.
कठोर तप, साधना आणि आत्मज्ञान म्हणजेच केवळ ज्ञान प्राप्त करणार्या इंद्रियविजयी म्हणजे जितेंद्र व्यक्तीला ‘तीर्थंकर’ अशा सर्वोच्च आदरार्थी, पूजनीय संबोधनाने ओळखले जाते. तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांच्या नावावरून या पहाडी भागास ‘पार्श्वनाथ पहाड’ किंवा ‘पारसनाथ पहाड’ म्हणून ओळखले जाते.
अहिंसावादी जैन समाज
भारताच्या एकूण लोकसंख्येत जैनांची लोकसंख्या 0.4% असल्याचे सरकारी जनगणनेतून दिसते. धार्मिक अल्पसंख्याक म्हणून ज्या समाजांना ओळखले जाते, त्यात जैन समाज हा सर्वात लहान, खर्या अर्थी अल्पसंख्य समाज आहे. पण लोकसंख्येने अल्प असलेल्या या समाजाचे सामाजिक, राष्ट्रीय योगदान प्रचंड आहे. जैन धर्म आज अत्यंत अल्प वाटत असला, तरी एकेकाळी तो प्राचीन भारतात अनेक राजांचा राजधर्म होता. भारतीय कला, शिल्प, साहित्य यामध्ये जैन राजांचे योगदान फार मोठे आहे. गुप्त राजघराण्याचा काळ हा भारताचा व जैन धर्माचा सुवर्णकाळ होता. मगधचा राजा बिंबिसार, चंपाचा राजा अजातशत्रू, कलिंग सम्राट खारवेल, सम्राट अशोकाचा नातू राजा संप्रती हे भारताच्या इतिहासातील विख्यात जैन राजे होते. त्याशिवाय श्रेष्ठ आचार्य भद्रबाहू, स्थूलभद्र, महागिरी या जैन विद्वानांचे योगदानही संस्मरणीय स्वरूपाचे आहे. पुढे जैन धर्माचे प्राबल्य हळूहळू क्षीण होत गेले. भारतातील राजगीर, पावापुरी, गिरनार, शत्रुंजय, श्रवणबेळगोळ ही जैन धर्मीयांची प्रमुख परमपावन श्रद्धास्थाने-तीर्थक्षेत्रे आहेत. या विविध स्थळांतून प्राचीन वैभवाची अक्षरगाथा आपणास अनुभवास येते.
व्यापारी, उद्योजक, उद्यमी समाज म्हणूनच आज जैन समाज सर्व भारतभर ओळखला जातो, तसेच हा समाज शांतताप्रिय व अत्यंत सहिष्णू म्हणूनही परिचित आहे. भारताच्या आर्थिक प्रगतीत या समाजाचे फार मोठे योगदान आहे. एकूण आयकरांच्या 24 टक्के आयकर हा जैन समाजाच्या विविध उद्योगधंद्यातून गोळा होतो. त्याशिवाय कोणत्याही विशेष सवलती न मागता जैन समाज भारताच्या सकल बहुजन समाजासमवेत ज्या सौहार्दपणे गुण्यागोविंदाने नांदतो, हे फाजिल लाड करून घेणार्या व सतत वेगवेगळी चूल मांडणार्या मुस्लीम समाजाने धडा घेण्यासारखे आहे. देशातील बहुसंख्य गोशाळा या जैन समाजाद्वारेच संचालित केल्या जातात. निसर्गप्रेमी, जीवदयावादी, पर्यावरणरक्षक जैन समाज भारतीय समाजजीवनाचा आदर्श आहे. सम्मेद शिखरजी रक्षणार्थ रस्त्यावर उतरलेल्या जैन समाजाने देशातील अनेक शहरातून मोठे मोठे निषेध मोर्चे काढले, पण कोठेही अनुचित प्रकार, मोडतोड करून समाजस्वास्थ्य बिघडवले नाही. आपल्या मागण्यांसाठी शांततेने कशा प्रकारे मोर्चे काढावेत, याचा जैन समाजाने सर्वांपुढे अनुकरणीय आदर्श ठेवलेला आहे.
सम्मेद शिखरजीचा वाद
सम्मेद शिखरजी हे विशेष ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित व्हावे अशी जैन समाजाची राज्य सरकारकडे अनेक वर्षे मागणी आहे. या मागणीचा विचार न करताच झारखंड सरकारने सम्मेद शिखर ‘पारसनाथ हिल’ हा भाग ‘पर्यटन केंद्र’ म्हणून विकसित करण्याची योजना जाहीर केली. ‘सम्मेद शिखर’ परिसर हा सुमारे 10 कि.मी.चा परिसर असून येथे जैनांची श्रद्धास्थाने असलेली 60हून अधिक मंदिरे व स्थाने आहेत. त्यामुळे मधुबन तळापासून ते सम्मेद शिखरपर्यंतची 13 कि.मी.ची संपूर्ण चढण जैन समाज व्रतस्थभावाने, श्रद्धेने पायात काहीही न घालता पूर्ण करतात. अशा ठिकाणाला ‘पर्यटन केंद्र’ केल्याने तेथे हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार अशा पर्यटकांसाठीच्या सुविधा निर्माण होणार, या हॉटेल्समधून मांसाहार, दारूचे सेवन होणार, पर्यटक मुक्तपणे सर्वत्र वावरल्यामुळे धार्मिक स्थळाची शांतता-पावित्र्य भंग होणार, या सर्वाला जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. अहिंसा परमोच्च मानणार्या जैन समाजाच्या श्रद्धास्थानी पशुहत्या घडणार, मांस-मद्य विक्री होणार हे कोणाही धार्मिक-आध्यात्मिक वृत्ती-प्रवृत्तीच्या समाजाला सहन होणार नाही. या दृष्टीने जैन समाजाचा पर्यटन स्थळाला विरोध हा सात्त्विक संताप आहे आणि सरकारने या संतापाची, नाराजीची त्वरित दखल घेऊन ‘पर्यटन स्थळ’ घोषणा मागे घेण्याची गरज आहे.
दि. 11 डिसेंबर 2022पासून जैन समाजाने देशभर शांततापूर्ण आंदोलन सुरू केले असून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बिहार आदी अनेक राज्यांतील अनेक शहरात ‘निषेध मोर्चे’ काढण्यात आलेले आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून अनेक जैन मुनी-आचार्य यांनी अन्नसत्याग्रह सुरू केलेला आहे. या अन्नत्याग सत्याग्रहात आजवर दोन मुनीमहाराजांचे प्राण गेले आहेत. मुनी सुज्ञेय सागर महाराज आणि मुनी समर्थ सागर महाराज यांच्या बलिदानामुळे जैन समाजाचा सरकारविरुद्धचा रोष अधिक तीव्र झाला आहे. जैन समाज केवळ 0.4% असल्याने व विखुरलेला असल्याने त्यांची ‘व्होट बँक’ एकगठ्ठा मतशक्ती नाही, त्यामुळेच सरकारी पातळीवर-राजकीय पक्ष व नेत्यांकडून या समाजाची त्वरित दखल घेतली जात नाही, अशीही या समाजाची तक्रार आहे.
सम्मेद शिखरचा वाद हा केंद्र सरकारचे वन खाते व झारखंड राज्य सरकार यांच्यातील विसंवादाचा परिणाम आहे. दोन्ही सरकारे एकमेकाला या संदर्भात दोषी ठरवीत आहेत. पण या वादात जैन समाज भरडून निघत आहे. त्यांच्या श्रद्धास्थानांची विटंबना होत आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांचे संयुक्त सरकार असून हेमंत सोरेन मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रातील भाजपा सरकारशी या राज्य सरकारचे फारसे जमत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा स्थितीत बिचार्या जैन समाजाची स्थिती केविलवाणी झालेली आहे. केंद्र सरकारने जैन समाज प्रतिनिधींशी चर्चा करून, पत्र लिहून झारखंड सरकारला ‘पर्यटन केंद्र’ घोषित करण्याचे नोटिफिकेशन रद्द करण्यास सांगितलेले आहे. आता यावर झारखंडचे हेमंत सोरेन-काँग्रेस सरकार काय व केव्हा निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान काही समाजविघातक शक्ती या वादाचा गैरफायदा घेत संथाल आदिवासींना जैन समाजाविरुद्ध चिथावणी देत आहेत आणि या विषयाला वेगळेच वळण देऊन त्याचा कुटिल डाव खेळत आहेत. या सर्व बाजूंचा त्वरित विचार करून झारखंड सरकारने तातडीने लक्ष घालून जैन समाजाला न्याय द्यावा व सामाजिक स्वास्थ्य, सद्भाव यांचे रक्षण करावे, या दृष्टीने आता झारखंड सरकारच्या निर्णयाकडे सार्या देशाचे लक्ष आहे.