विजयादशमी उत्सव हा संघजीवनात महत्त्वाचा उत्सव आहे. आपल्या शक्तीची अनुभूती देताना संघ सज्जनशक्तीचे संचयन करत असतो. समाजासमोर असणार्या समस्यांचा आणि आव्हानांचा सामना करण्याचा संकल्प करत हिंदू चिरविजयाचा संकल्प अधोरेखित करणारा उत्सव म्हणजे विजयादशमी.
आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र उत्सव सुरू होतो आणि या काळात शक्तीची आराधना केली जाते. नवरात्रीच्या उत्सवास आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक अधिष्ठान आहे. या उत्सवाची सांगता म्हणजे दसरा. विजयादशमी, दसरा - देशाच्या कानाकोपर्यात साजरा केला जाणारा सण, उत्सव. या दिवशी सोने लुटले जाते. ही खूप प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. विजयादशमीशी प्रभू रामचंद्र, महाभारतातील पांडव यांच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. दसर्याला हिंदू समाजात औद्योगिक क्षेत्रात व पारंपरिक पद्धतीने घरी शस्त्रपूजनाची जुनी परंपरा आहे. हिंदू शास्त्रही जाणतो आणि शस्त्रेही जाणतो. शस्त्र आणि शास्त्र ज्ञान असलेला हिंदू समाज पराभूत का झाला? हजारो वर्षे दमन होत असतानाही तो पेटून उठला नाही, कारण समूहशक्तीचा अभाव.
आधुनिक काळात या दिवसाला एक सामाजिक आयाम जोडला गेला असून त्याचा भारतीय समाजजीवनात खूप मोठा प्रभाव आपण अनुभवतो, तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन. साधारणपणे 1927 साली संघसंस्थापक पू.डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी आपल्या बालस्वयंसेवकांना सोबत घेऊन विजयादशमीचे संचलन काढले. तेव्हापासून सुरू झालेले संघाचे विजयादशमीचे संचलन काही अपवाद वगळता आजही चालू आहे. संघाच्या सहा उत्सवांत विजयादशमी हा महत्त्वाचा उत्सव असून तो समाजासाठी आहे. विजयादशमी संचलन म्हणजे समूहशक्तीचे दृश्य रूप. त्या काळी पू.डॉ. हेडगेवारांनी संघसंचलनाची सुरुवात केली, तो काळ कसा होता? डॉ. हेडगेवारांनी सामाजिक स्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे की, “चार हिंदू एका दिशेने तेव्हा चालतात, जेव्हा त्यांच्या खांद्यावर पाचवा असतो.”
संघटनशक्तीचा अभाव असलेल्या, आत्मविस्मृती झालेल्या आणि जाज्वल्य इतिहासाचा विसर पडलेल्या, पराभूत मानसिकतेने ग्रासलेल्या हिंदू समाजाला एकसंघ करण्यासाठी, समूहशक्तीची अनुभूती देण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी विजयादशमीचे संचलन सुरू केले. त्याचप्रमाणे जात, उपासना, पंथ अशा विविध कुंपणांमुळे विभागलेला केवळ हिंदू समाज म्हणून सिद्ध व्हायला पाहिजे, त्यासाठी आदर्श समोर ठेवला पाहिजे यासाठी डॉक्टर हेडगेवार यांनी तत्त्वज्ञान आणि कृती यांचा सुरेख मेळ घालून संघव्यवहारात समूहशक्तीची मांडणी केली. पराभव हीच आमची नियती आहे असे मानून जगणार्या आणि आपले आत्मतेज विसरलेल्या हिंदू समाजाला ताठ मानेने चालायला शिकवले ते संघ संचलनाने. संघाने आत्मतेजाची जाणीव करून दिली. त्याचा स्वाभाविक परिणाम हिंदू समाजावर झाला.
हिंदू आत्मतेज म्हणजे तरी काय? आम्ही हिंदू आहोत असे अभिमानाने सांगण्याचीसुद्धा भीती वाटावी आणि समजा, आम्ही हिंदू आहोत असे सांगण्याचे धाडस केले, तर आपले आता काय होणार अशी टांगती तलवार डोक्यावर घेऊन जगणार्या समाजाचा पुरुषार्थ जागवत डॉ. हेडगेवारांनी आपल्या सांस्कृतिक मूल्यांची ओळख करून दिली आणि आपण पराजित का झालो? याची मीमांसा केली आणि या समस्येला तोंड कसे द्यायचे याचे उत्तर शोधले - हिंदू संघटन. हिंदू समाजाचे एकसंघ संघटन करणे आणि त्यांच्या शक्तीचे दर्शन घडवून पुन्हा त्याला अढळ स्थान प्राप्त करून देणे म्हणजेच हिंदू आत्मतेजाची प्रचिती होय.
सन 1927मध्ये डॉ. हेडगेवार यांनी नागपुरात सुरू केलेले विजयादशमी संचलन संघव्यवहारातील महत्त्वाचा उत्सव आहे. आज देशात जिथे जिथे संघाचे काम पोहोचले आहे, तिथे तिथे विजयादशमी उत्सव आणि संचलन होत असते. संघाचा हा उत्सव आत्मप्रौढीचा नाही. संघाची ताकद किती वाढली, स्वंयसेवकांची संख्या किती वाढली आहे हे दाखवण्यासाठी हा उत्सव नाही. हा उत्सव आहे प्रेरणेसाठी आणि आत्मपरीक्षणासाठी. आपापल्या ठिकाणी संघकाम करणार्या स्वयंसेवकांची शिस्त आणि एकात्मिक व्यवहार समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न अशा संचलनातून केला जातो. शाखेत एकमेकांवर दंडाचे प्रहार करणारे स्वयंसेवक दंडयुद्ध संपले की एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पुढे जातात. हे केवळ शिस्त आणि जाज्वल्य देशाभिमान यामुळे घडून येते. संचलनातून, प्रात्यक्षिकातून समाज याचे दर्शन घेत असतो.
संघस्थापनेपासूनचा अनुभव असा आहे की, अशा संचलनामुळे प्रेरित होऊन खूप मोठी सज्जनशक्ती संघकामात जोडली गेली आहे. अनेक सेवा कार्यांच्या पाठीशी ही शक्ती तनमनधनपूर्वक उभी राहिली आहे आणि आपणच आपल्या समाजासाठी काहीतरी विचार केला पाहिजे ही जाणीव मनात ठेवून ते काम करू लागले आहेत. संघ सज्जनशक्ती जागृत करतो, या शक्तीचे संघटन बांधून समाजासमोर असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो. देशभरात चालू असणारी हजारो सेवा कार्ये म्हणजे समूहशक्ती आणि सज्जनशक्ती यांचे दृश्य रूप आहे.
संघ केवळ संचलनातून, प्रात्यक्षिकातून समाजासमोर आदर्श ठेवत नाही, तर समकालीन समस्या आणि आव्हाने याकडे दिशादर्शन करण्याचे काम संघ करत असतो. सरसंघचालकांच्या विजयादशमी बौद्धिकाकडे जगाचे लक्ष असते. या उत्सवातून हिंदू समाजाला कालोचित दिशादर्शन होत असते. सरसंघचालकांनी विजयादशमी उत्सवात ज्या विषयावर भाष्य केले, ते विषय वास्तवात आणण्यासाठी संघस्वयंसेवक काम करत असतात. सामाजिक कुप्रथा, हीन आचार दूर करण्यासाठी आणि सामाजिक समरसता, सामाजिक न्याय यासाठी प्रयत्न करणे हे संघस्वयंसेवकाचे कर्तव्य असते. काही वर्षांपूर्वी सरसंघचालकांनी ‘एक मंदिर, एक पाणवठा, एक स्मशानभूमी’ असा विषय विजयादशमी उत्सवात मांडला होता. आता अनेक गावांमध्ये हा विषय वास्तवात आला आहे. ही संघ कार्यप्रणाली आहे. एका दिशेने एक विचार घेऊन पुढे जाताना समाजाला जागृत करत, सोबत घेऊन बदल घडवून आणण्यासाठी संघ प्रयत्न करत आहे.
विजयादशमी उत्सव या संघाच्या महत्त्वाच्या उत्सवातून समाजाला समूहशक्तीची अनुभूती येते आणि संघस्वयंसेवकांना अधिक कार्यप्रवण करण्याची शक्ती संचलनातून मिळते.