सामान्य संघस्वयंसेवकांचा सहभाग

लेखांक 4

विवेक मराठी    23-Aug-2022   
Total Views |
हिंदू संघटनेच्या नित्य कार्यावर अढळ निष्ठा असलेले डॉ. हेडगेवार जंगल सत्याग्रहासारख्या महत्त्वाच्या पण नैमित्तिक आंदोलनात सहभागी झाले. संघस्वयंसेवकांनी काय करावे हे त्यांनी त्यांच्या विवेकबुद्धीवर सोडले होते. ’तुम्ही अमुकच करा’ असा आग्रह त्यांनी आपल्या अनुयायांना चुकूनही केला नाही. नेत्याने कोणतेही औपचारिक निर्देश दिलेले नसताना आणि तो कारागृहात असताना अनुयायी काय करत होते, हा खरा प्रश्न आहे.

RSS
 
देशाच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात येणार्‍या प्रत्येक प्रयत्नाला रा.स्व. संघाचे निर्माते डॉ. हेडगेवार यांचा सक्रिय पाठिंबा होता. त्यामुळे ते जंगल सत्याग्रहात सहभागी झाले, यात आश्चर्य नाही. एखाद्या नेत्याचा मोठेपणा केवळ त्याच्या व्यक्तिगत कार्यकर्तृत्वामुळे सिद्ध होत नाही. कोरड्या उपदेशाने नव्हे, तर आपल्या व्यक्तिगत आचरणातून अनुयायांना अनुसरण करण्याची प्रेरणा देणे, आपल्या ईप्सिताचे संचरण ’ये हृदयीचे ते हृदयी’ करणे हेच खर्‍या नेतृत्वाचे गमक आहे. हिंदू संघटनेच्या नित्य कार्यावर अढळ निष्ठा असलेले डॉ. हेडगेवार जंगल सत्याग्रहासारख्या महत्त्वाच्या पण नैमित्तिक आंदोलनात सहभागी झाले. संघस्वयंसेवकांनी काय करावे हे त्यांनी त्यांच्या विवेकबुद्धीवर सोडले होते. ’तुम्ही अमुकच करा’ असा आग्रह त्यांनी आपल्या अनुयायांना चुकूनही केला नाही. नेत्याने कोणतेही औपचारिक निर्देश दिलेले नसताना आणि तो कारागृहात असताना अनुयायी काय करत होते, हा खरा प्रश्न आहे.
जंगल सत्याग्रहातील संघाचे अन्य पदाधिकारी

डॉक्टरांप्रमाणे संघाच्या अनेक पदाधिकार्‍यांनी जंगल सत्याग्रहात भाग घेतला. सविनय निर्बंधभंग करण्यासाठी नागपुरात दि. 1 मे 1930ला झालेल्या पहिल्यावहिल्या सभेत मिठाचा निर्बंध मोडणारे डॉ. मुंजे, डॉ. मोरेश्वर रामचंद्र चोळकर आणि गोपाळ मुकुंद उपाख्य बाळाजी हुद्दार असे पहिले तीन सत्याग्रही होते. पैकी हुद्दार हे रा.स्व. संघाचे सरकार्यवाह होते. डॉक्टरांच्या काळात संघात सरसंघचालकांनंतर सरसेनापतींचा क्रम असे. दि. 2 जून 1930ला मध्य प्रांताच्या युद्धमंडळात संघाचे सरसेनापती मार्तंड परशुराम जोग यांना असिस्टंट कमांडर नियुक्त करण्यात आले (के.के. चौधरी संपादक, सिव्हिल डिसोबीडियन्स मूव्हमेंट, एप्रिल-सप्टेंबर 1930 खंड 9, गॅजेटियर्स डिपार्टमेंट, महाराष्ट्र सरकार, 1990, पृ. 946). दि. 8 ऑगस्टला जोगांना युद्धमंडळात ’स्वयंसेवक प्रमुख’ करण्यात आले. दि. 13 सप्टेंबर 1930ला एम्प्रेस मिलसमोर पिकेटिंग केले, म्हणून मार्तंडराव जोगांना अटक (त्यांच्यासोबत भास्कर बडकस या स्वयंसेवकालाही अटक झाली) होऊन त्यांना आधी नागपूर आणि मग रायपूर कारागृहात ठेवण्यात आले. दि. 7 जानेवारी 1931ला त्यांची सुटका झाली. प्रांतिक काँग्रेस कमिटीचे चिटणीस आणि वर्धा जिल्हा संघचालक हरी कृष्ण उपाख्य आप्पाजी जोशी, सालोडफकीरचे संघचालक त्र्यंबकराव देशपांडे आणि आर्वी (जि.वर्धा)चे संघचालक नारायण गोपाळ देशपांडे हे तर डॉक्टरांच्या तुकडीतच होते. त्यांना प्रत्येकी चार महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली होती. देशपांडे यांच्या जागी आर्वीचे संघचालक झालेले डॉ. मोरेश्वर गणेश आपटे (आणि त्यांच्याबरोबर वामन हरी मुंजे नावाचा संघस्वयंसेवक) यांनादेखील दि. 27 ऑगस्ट 1930ला जंगल सत्याग्रहात कारावासाची शिक्षा झाली. नागपूर जिल्ह्याचे संघचालक आप्पासाहेब हळदे आणि सावनेरचे संघचालक नारायण कृष्णाजी उपाख्य नानाजी आंबोकर यांनीही जंगल सत्याग्रहात तुरुंगवास भोगला. सरसंघचालक डॉ. हेडगेवार, सरसेनापती मार्तंडराव जोग, सरकार्यवाह बाळाजी हुद्दार, डॉ. ल.वा. परांजपे, अण्णा सोहोनी, आबाजी हेडगेवार, विश्वनाथराव केळकर, आप्पाजी जोशी ही त्या काळातील संघाची ’अंतरंग मंडळी’ होती. यांतील परांजपे, सोहोनी, आबाजी आणि केळकर सोडून इतर सर्व जंगल सत्याग्रहात सामील झाले, हे विशेष! अपवाद असलेले चार कार्यकर्ते योजनेनेच संघकाम सांभाळण्यासाठी बाहेर राहिले, असे वाटते.
 
 
जंगल सत्याग्रहातील सामान्य संघस्वयंसेवक


नागपुरात संघाची स्थापना 1925 साली झाली असली तरी बहुसंख्य अन्य ठिकाणी संघ सुरू होऊन जेमतेम वर्ष झाले होते. संघाचे काम बहुसंख्य ठिकाणी अनियमित होते. बहुसंख्य ठिकाणी एकूण लोकसंख्या काही हजारांची, तर संघस्वयंसेवकांची संख्या शंभरदेखील नव्हती. जंगल सत्याग्रह सुरू झाला तेव्हा संघाचा जीव कितीसा होता? दि. 12 ऑक्टोबर 1929ला झालेल्या विजयादशमी उत्सवात सादर केलेल्या अहवालात सरकार्यवाह बाळाजी हुद्दार यांनी संघाच्या मध्य प्रांत, वर्‍हाड आणि काही अन्य प्रांतांत मिळून 40 शाखा असल्याचे सांगितले. यांतील किमान 18 शाखा नागपुरात आणि किमान 12 शाखा वर्धा जिल्ह्यात होत्या. संघाचे बहुतांश काम नागपूर, वर्धा, चांदा आणि भंडारा या मराठी मध्य प्रांतात होते. अमरावती, बुलढाणा, अकोला आणि यवतमाळ या वर्‍हाडातील जिल्ह्यांत ते नगण्य होते. शैशवस्थेतील आणि बहुतांश काम दोन जिल्ह्यांपुरते मर्यादित असलेल्या संघाच्या शेकडो स्वयंसेवकांनी जंगल सत्याग्रहात भाग घेतला, ही बाब डोळ्यांत भरण्यासारखी आहे.

 
संघाच्या अभिलेखागारातील कागदपत्रांतून उपलब्ध माहितीनुसार ठिकठिकाणी जंगल सत्याग्रहात भाग घेणार्‍या संघस्वयंसेवकांची नावे  (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, registers\Register 3 DSC_0048- DSC_0061).

RSS
 
ब्रिटिशविरोधी उपक्रम आणि संघस्वयंसेवक

 
दि. 2 ऑगस्टला सकाळी मुंबईत काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल, पं. मदनमोहन मालवीय आणि इतर सात काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आली (चौधरी, पृ. 362). त्याचा निषेध म्हणून मध्य प्रांत युद्धमंडळाने दि. 3 ऑगस्टपासून ’बहिष्कार सप्ताह’ पुकारला. त्याच्या अंतर्गत दि. 8 ऑगस्टला ’गढवाल दिवस’ पाळण्यात आला. काँग्रेस कार्यालयासमोर जमलेल्या 50,000 लोकांना पांगविण्यासाठी कामटीहून आलेल्या सैन्य तुकडीने नागपुरात संचलन केले. जमावबंदीचे उल्लंघन करू पाहणार्‍या मिरवणुकीला पोलिसांनी जवळजवळ बारा तास मध्यरात्रीपर्यंत अडवून धरले. संघाच्या शुश्रुषा पथकातील 60 गणवेशधारी संघस्वयंसेवक दुपारी 1 ते दुसर्‍या दिवशी पहाटे 1पर्यंत तहानलेल्या लोकांना पाणी देण्याचे काम अव्याहतपणे करत होते. अकोला कारागृहात असलेल्या डॉ. हेडगेवारांनीच डॉ. परांजपे यांना हे शुश्रुषा पथक उभारण्याची सूचना दिली होती (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, registers\register 7\DSC_0247).

 
दि. 9 सप्टेंबर 1930ला रामटेकच्या दोन युवकांना सत्याग्रह केल्याप्रकरणी नागपूर कारागृहात चाबकांची शिक्षा देण्यात आली. त्या दिवशी निषेध सभा होऊन दुसर्‍या दिवशी हरताळ पुकारण्यात आला. सकाळी न्यायालयासमोर आणि सरकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. न्यायालयासमोर जमलेल्या जमावाला पांगविण्यासाठी घोडेस्वार पोलीस त्यात घुसले. यात चार जणांना दुखापत झाली. युद्धमंडळाचे अध्यक्ष पी.के. साळवे आणि इतर तीन जणांना अटक करण्यात आली. चाबकाची शिक्षा झालेल्या सत्याग्रहींना स्ट्रेचरवर ठेवून दुपारी मोटारीने त्यांची विराट मिरवणूक काढण्यात आली. त्यांची शिक्षा दर्शविणारा फलक मिरवणुकीत फिरविण्यात आला (चौधरी, पृ. 1036). या मिरवणुकीत संघाचे शुश्रुषा पथक सिद्ध करण्यात आले होते. शुश्रुषा पथकाचा गणवेश घालून 32 संघस्वयंसेवक मिरवणुकीत सामील झाले होते. अटक झालेल्यांचे अभिनंदन करणारी सभा सरसंघचालक डॉ. परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली दुसर्‍या दिवशी दि. 11 सप्टेंबरला झाली. पोलिसांनुसार सभेला 3500 लोक उपस्थित होते (चौधरी, पृ. 1038).

 
काँग्रेस नेते बॅरिस्टर मोरोपंत अभ्यंकर यांच्यावर तुरुंगात झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मध्य प्रांत युद्धमंडळाने दि. 24 ऑक्टोबर 1930 हा ’अभ्यंकर दिन’ पाळण्याचे आवाहन केले होते. या कार्यक्रमात संघाला आमंत्रित करण्यात आले होते. त्यात संघाच्या स्वयंसेवकांनी व्यक्तिगत स्तरावर घोषात भाग घेतला, तसेच संघाचे गणवेशधारी शुश्रुषा पथक सहभागी झाले (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे,registers\register 7\DSC_0249, DSC_0250).


RSS

जंगल सत्याग्रहाचा संघकामावर परिणाम

 
डॉक्टरांना अटक झाली म्हणून संघाचे काम काही थांबले नाही. धामधुमीच्या जुलै महिन्यात संघाच्या कार्यकारी मंडळाच्या तीन सभा व शिक्षकांची एक सभा झाली. महाविद्यालयीन सुट्ट्या संपल्यावर संघात लाठीकाठीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले. वर्गणी गोळा करण्याची व्यवस्था योजण्यात आली. लष्करी ड्रिल संघस्थानाच्या बाहेर नेण्यात येऊ लागले. उपस्थितीदेखील वाढत्या प्रमाणावर होती. अण्णा सोहोनी, सेनापती यशवंत नारायण उपाख्य बापूराव बल्लाळ, कार्यवाह कृष्णराव मोहरीर, डॉक्टरांचे चुलते मोरेश्वर श्रीधर उपाख्य आबाजी हेडगेवार इत्यादी मंडळी डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नागपुरातील संघाचे दैनंदिन काम पाहत होती. शिवाय सरसंघचालक डॉ. परांजपे व विश्वनाथराव केळकर यांची संघकामावर देखरेख होतीच. डॉक्टर कारावासात असताना डॉ. परांजपे त्यांना नियमितपणे भेटत. डॉक्टरांची खुशाली संघस्वयंसेवकांना नियमितपणे दिली जात असे. (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, registers\register 7\DSC_0242, DSC_0244).

 
दि. 2 ऑक्टोबर 1930ला निघालेल्या विजयादशमीच्या संचलनातील संघस्वयंसेवकांनी सरसेनापती मार्तंडराव जोग बंदिवान असलेल्या नागपूर कारागृहाकडे आणि मग बंदिवान असलेले काँग्रेस नेते बॅरिस्टर मोरोपंत अभ्यंकरांच्या घराकडे तोंड करून सैनिकी मानवंदना दिली होती. मोहिते संघस्थानावरील संघाला काही नतद्रष्ट लोकांनी त्रास दिल्यामुळे केंद्र संघस्थान राजे लक्ष्मणराव भोसल्यांच्या हत्तीखान्यात हलविण्यात आले, ते दि. 24 डिसेंबर 1930 या दिवशी - म्हणजे डॉक्टर कारागृहात असताना (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, registers\register 7\DSC_0292).

 
डॉक्टरांच्या अनुपस्थितीतही संघाच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त स्वातंत्र्य संपादनाच्या विविध उपक्रमांत संघस्वयंसेवकांनी कधी व्यक्तिश:, तर कधी संघ म्हणून भाग घेतल्याचे दिसते. दि. 1 ऑगस्ट 1930ला राष्ट्रीय उत्सव मंडळाच्या वतीने नागपुरातील सहस्रचंडीच्या देवळात टिळक पुण्यतिथीचा उत्सव घेण्यात आला. ’महाराष्ट्र’चे संपादक गोपाळराव ओगले यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरसंघचालक डॉ. परांजपे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची सर्व व्यवस्था रा.स्व. संघाकडेच होती (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे,registers\register 7\DSC_0243). दि. 7 ऑक्टोबर 1930ला भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली, तर सोलापूरमध्ये दोन पोलिसांच्या हत्याप्रकरणात दि. 13 जानेवारी 1931ला चार देशभक्तांना फाशी देण्यात आली. दोन्ही प्रसंगी हुतात्म्यांना सैनिकी मानवंदना दिल्यावर संघाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. दि. 26 जानेवारी 1931ला स्वातंत्र्यदिनानिमित्त संघाला सुट्टी देण्यात आली असून 55 स्वयंसेवकांनी काँग्रेसच्या मिरवणुकीत भाग घेतला. दि. 6 फेब्रुवारी 1931ला पं. मोतीलाल नेहरूंच्या झालेल्या निधनानिमित्त संघाला दुसर्‍या दिवशी सुट्टी देण्यात आली (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, registers\register 7\DSC_0304, DSC_0306).
 
 
काही ठिकाणी प्रतिकूल परिणाम

 
जंगल सत्याग्रहामुळे दैनंदिन संघकामावर काही ठिकाणी काही काळापुरता तरी प्रतिकूल परिणाम झाला. चिमूर (जि.चांदा) येथील संघाचे स्थानिक उपसंघचालक माधव नारायण भोपे डॉक्टरांना पत्रातून कळवितात - चिमूर येथे 24/8/30 रोजी सामुदायिक जंगल सत्याग्रह झाला. त्यात सरासरी 1500-1600 जनसमूह होता. त्यांची धडपड (? धरपकड) 16/9/30ला सुरू होऊन 22/9/30पर्यंत पंधरा इसमांना पकडले. त्यांत बहुतेक आपल्या संघातील माणसे असल्यामुळे बाकीच्या सर्व स्वयंसेवकांचे लक्ष तिकडेच वेधून गेल्यामुळे संघाचे शिक्षण अजिबात बंद पडले म्हणावयास हरकत नाही (सरासरी दोन महिन्यांपासून). चिमूर येथे काँग्रेसचे प्रचारक येऊन त्यांची व्याख्याने सुरू झाली व त्यामुळे संघाचे स्वयंसेवक व गावातील इतर लोक मिळून सरासरी दोनशे लोकांनी काँग्रेसचे वालंटियर बनून काँग्रेसचे प्रचाराचे कार्य हाती घेतले (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, registers\Register 3\ DSC_0061). सन 1921च्या जनगणनेनुसार चिमूरची लोकसंख्या 5500 असून नोव्हेंबर 1929पर्यंत तेथे 69 संघस्वयंसेवक होते, हे लक्षात घेतले पाहिजे.
सन 1930च्या अल्लीपूर (जि. वर्धा)च्या विजयादशमी उत्सवाच्या अहवालात पुढील उल्लेख सापडतात - मागील वर्षाची सर्व कार्यकारी मंडळी त्याच हुद्द्यावर आहेत. फक्त गोविंदराव चोपडे (सेनापती व कोषाध्यक्ष) व बालाजी कोठेकर (पर्यवेक्षक) हे चालू चळवळीमुळे निघाले आहेत... हल्ली संघात वीस-पंचवीस मंडळी हजर राहतात. चालू चळवळीमुळे बरीशी मंडळी येत नाहीत... जागेच्या अडचणीमुळे बाकीचे सर्व शिक्षण बंद आहे. फक्त प्रार्थना व व्यायाम सुरू आहे व शिक्षण देणाराही कोणी नाही (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, registers\Register 3\ DSC_0061).  सन 1921च्या जनगणनेनुसार अल्लीपूरची लोकसंख्या 4443 असून त्यात नोव्हेंबर 1929पर्यंत 110 संघस्वयंसेवक होते, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
दि. 2 ऑक्टोबर 1930ला झालेल्या चांद्याच्या शस्त्रपूजन उत्सवाच्या वृत्तान्तातील पुढील उल्लेख लक्षणीय आहेत - काँग्रेसचा परिणाम स्वयंसेवकांवर होऊन तेथेही (ब्रह्मपुरी) संघाचा उत्सव उत्साहाने व थाटाने होईल असे दिसत नाही. प्रथम शस्त्रपूजन व श्रीरामदास स्वामी, श्रीशिवाजी, लोकमान्य, गांधी व श्रीवज्रदेही मारोतीरायाचे पूजन करण्यात आले. (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, registers\Register 3 DSC_0068).

जंगल सत्याग्रहाचा संघकामावर अनुकूल परिणाम
 
 
संघकामाचा वर्‍हाडात विस्तार होण्याच्या दृष्टीने जंगल सत्याग्रहाचा लाभ झाला. डॉ. हेडगेवार मध्य प्रांताचे असल्यामुळे ते मध्य प्रांतात सत्याग्रह करतील असे काही लोकांना वाटत होते. पण डॉक्टरांनी सत्याग्रह केला तो वर्‍हाडात. त्या वेळी वर्‍हाडात संघाविषयी थोडीदेखील माहिती नव्हती. डॉक्टरांनी वर्‍हाडात सत्याग्रह केल्यामुळे त्यांना अकोला कारागृहात ठेवण्यात आले. त्या अवधीत त्यांच्या संपर्कात आलेले त्या वेळचे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते झाले. अकोला कारागृहातून सुटल्यावर ऑगस्ट-सप्टेंबर 1931ला डॉक्टरांनी संघकामाच्या विस्तारासाठी वर्‍हाडात संचार केला आणि संघशाखा सुरू केल्या. सविनय निर्बंधभंगाच्या चळवळीत सक्रिय असलेली अनेक मंडळी डॉक्टरांच्या प्रभावाने संघात सामील झाली. त्यांतील अनेक जण सप्टेंबर 1931मध्ये पुढीलप्रमाणे संघचालक झाले - डॉ. यादवराव श्रीहरी उपाख्य तात्याजी अणे (वणी, हे कलकत्त्याच्या दिवसांपासूनचे डॉक्टरांचे मित्र होते), डॉ. प्रल्हाद माधव काळे (खामगाव), दाजीसाहेब बेदरकर (आकोट), शंकरराव उपाख्य अण्णासाहेब डबीर (वाशिम). (चळवळीतील या मंडळींच्या सहभागासाठी पाहा चौधरी पृ.888, 891, 897, 931, 942, 998, 1009, 1023.) दारव्हा (जि. यवतमाळ) येथे बापूसाहेब डाऊ यांची संघचालकपदी नियुक्ती करण्यात आली. दि. 29 जुलै 1930ला अमरावती येथे सत्याग्रह करताना अटक झालेले अमरावतीच्या ’उदय’ पत्राचे संपादक नारायण रामलिंग उपाख्य नानासाहेब बामणगावकर हे दि. 11 सप्टेंबर 1933ला अमरावतीचे संघचालक झाले.
बाबासाहेब चितळे यांची आठवण
 
 
डॉक्टरांना वयाने ज्येष्ठ असलेले आणि त्यांच्याविषयी आत्यंतिक जिव्हाळा असलेले अकोल्याचे संघचालक गोपाळ कृष्ण उपाख्य बाबासाहेब चितळे यांची आठवण लक्षणीय आहे. ती त्यांच्याच शब्दांत - ’डॉक्टर सत्याग्रहात गेले हे कळताच संघातील जबाबदार 125 लोकांनी सत्याग्रह केला. सर्वांना शिक्षा होऊन ते सर्व अकोला जेलमध्ये स्थानबद्ध केले गेले. मी डॉक्टरांना जेलमध्ये भेटण्यास गेलो. तेथे 25 मंडळींसमक्ष सहज विनोदाने डॉक्टरांना बोललो, “जंगल सत्याग्रहात जाऊन एक गवताची काडी तोडली व नऊ महिने आता जेलमध्ये सडत बसणार. यात काय कमावलेत? शिवाय बरोबर 125 मंडळी येऊन बसली ती वेगळी. आता संघटनेची वाढ खुंटणार व कार्यहानी फार मोठी होणार.” या माझ्या विनोदवजा बोलण्याने डॉक्टर व इतर लोक पाच मिनिटे सारखे हसत होते. डॉक्टरांना या माझ्या बोलण्याने काय वाटले कोण जाणे. ते हजारो लोकांजवळ कौतुकाने व हसत हसत सांगत असत की बाबा चितळे जेलमध्ये भेटण्यास आले आणि म्हणाले काय, तर एक गवताची काडीही तोडली व नऊ महिने जेलमध्ये सडत बसले. हाच आनंद व हीच मजा त्यांना वाटत होती.” (केसरी, 2 जुलै 1940).

 
डॉक्टरांसोबत शेकडो संघस्वयंसेवकांनी जंगल सत्याग्रहात भाग घेतला, पण त्यामुळे संघाचे नित्यकाम खुंटले नाहीच, उलट ते वाढले. आपल्या ईप्सिताचे संचरण ’ये हृदयीचे ते हृदयी’ झाले याचे सात्त्विक समाधान डॉक्टरांच्या त्या निर्मळ हास्यात होते, यात शंका ती काय?
 
(समाप्त)

डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले

शिक्षण व व्यवसाय

एमबीबीएस व एमडी (मेडिसिन) - सेठ जीएस मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालय मुंबई; डीएनबी (एण्डोक्रायनॉलॉजी) - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली; पुणे-स्थित मधुमेह व ग्रंथीविकार तज्ज्ञ

 

लेखन: मराठी पुस्तके

'मधुमेह' (सहलेखन), 'अहिंदू लोकसंख्येचा विस्फोट', 'इस्लामचे अंतरंग', ‘बौद्ध-मुस्लिम संबंध: आजच्या संदर्भात', 'मार्सेलीसचा पराक्रम: सावरकरांची शौर्यगाथा', ‘मागोवा खिलाफत चळवळीचा’

 

लेखन: हिंदी पुस्तके

‘शुद्धि आंदोलन का संक्षिप्त इतिहास: सन ७१२ से १९४७ तक’, ‘ईसाइयत: सिद्धान्त एवं स्वरूप’

 

लेखन: इंग्रजी पुस्तके

‘Full Life with Diabetes' (co-author), Savarkar’s leap at Marseilles: A Heroic Saga, ‘Krantiveer Babarao Savarkar’ (online), ‘Khilafat Movement in India (1919-1924)’

 

ग्रंथ संपादन

'हिंदू संघटक स्वा. सावरकर', 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार','द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस'

 

ग्रंथ अनुवाद

'जिहाद: निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धांत' (सह-अनुवादक, मूळ इंग्रजीतून मराठीत), ‘Love jihad’ (मूळ मराठीतून इंग्रजीत)   

 

संकेतस्थळ निर्मिती सहभाग
www.savarkar.org , www.golwalkarguruji.org    

मधुमेह व हॉर्मोनविकार या विषयांसंबंधी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये शोधनिबंध; सामाजिक विषयांवर स्फुट व स्तंभलेखन