जत तालुक्यातील जालिहाळ ब्रद्रुक येथील ‘येरळा प्रोजेक्ट सोसायटी’ या सामाजिक संस्थेतर्फे शेतकर्यांना कमी पाण्यात येणार्या ‘ड्रॅगन फ्रूट’ या विलायती फळाच्या माहितीसह लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. सध्या संस्थेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात 750 एकरांवर ‘ड्रॅगन फ्रूट’चे क्षेत्र विस्तारले आहे. शेतीतला हा नवीन प्रयोग शेतकर्यांना ‘आर्थिक वरदान’ ठरत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्याची ओळख कायमस्वरूपी दुष्काळी तालुका अशी आहे. येथे ना पूर्णपणे फुललेली शेती पहायला मिळते, ना निसर्गरम्य वातावरण. आढळते ते दगड-गोटे, काटेरी खुरटी झाडी. एकूणच दुष्काळसदृश परिस्थिती. अशा या वातावरणात जीवन कंठत असणार्या शेतकर्यांच्या जीवनात आनंदाची पालवी फुटली ती ‘येरळा प्रोजेक्ट सोसायटी’ या संस्थेमुळे. 1972 सालच्या भीषण दुष्काळात संस्थेचे कार्यकर्ते दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. त्यांनीच एकत्र येऊन 1976 साली सांगली शहरापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या जालिहाळ बुद्रुक (ता. जत) या ठिकाणी ‘येरळा प्रोजेक्ट सोसायटी’ची स्थापना केली. सध्या ही संस्था जत तालुक्याच्या दुष्काळी भागातील 22 गावांत शेती, पाणी, वृक्षारोपण, शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण आदी क्षेत्रांत काम करीत आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या तीस एकर हलक्या पडीक जमिनीवर पथदर्शक पीक प्रात्यक्षिके होत असतात. कडधान्ये, फळबागा, ठिबक व तुषार सिंचन पद्धत, सौर ऊर्जा, हायड्रोपोनिक चारा याची प्रात्यक्षिके संस्था प्रथम आपल्या शेतात राबविते. त्यानंतर ते शेतकर्यांपर्यंत पोहोचविले जाते. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादकता कशी मिळेल यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असते.
ड्रॅगन फ्रूट लागवडीचा प्रयोग
डाळिंब आणि द्राक्ष या भागाची हुकमी पिके. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस आणि बागांवर पडणारे रोग यांमुळे इथला फळ बागायतदार मेटाकुटीला आला होता. दरम्यान, येरळा संस्थेचा पर्यावरणाला अनुकूल पर्यायी पीक-फळाचा अभ्यास सुरू होता. या संदर्भात अनुभव सांगताना संस्थेचे सचिव नारायण देशपांडे म्हणाले, “ड्रॅगन फ्रूट महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ असणारे पीक समजले जाते. व्हिएतनाम, थायलंड, तैवान देशांत याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. कमी खर्चात परवडणारे हे पीक आहे, शिवाय शेतकरी पारंपरिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वळावे हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून संस्थेने जालिहाळ बुद्रुक येथील दीड एकरावर ड्रॅगन फ्रूट उत्पादनासाठी सहा वर्षे संशोधन केले. 2014 साली प्रायोगिक तत्त्वावर ड्रॅगन फ्रूट शेती करायला सुरुवात केली. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकर्याकडून रोपे मागविण्यात आली. एका एकरात 550 पोल बसले. सहा बाय दहाचे अंतर करून प्रत्येक पोलवर चार रोपांची लागवड केली. एकरी 2800 रोपे लागली. रोपांना योग्य प्रमाणात पाणी मिळावे म्हणून ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर केला. त्यामुळे रोपांची एकसारखी वाढ होत गेली. जानेवारी ते मे या कालावधीत फळाला अतिशय कमी पाणी लागते. त्यामुळे 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमानातही तग धरू शकणारे आणि रोगप्रतिकारक्षम फळ असल्याचे आमच्या लक्षात आले. एकरी तीन ते साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. पहिल्या वर्षी रोपांची चांगली उगवण झाली. दुसर्या वर्षापासून फळधारणा सुरू होते आणि चौथ्या वर्षापासून एकरी जवळपास सहा ते सात टन उत्पादन निघाले.
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आम्ही लागवड ते काढणीपर्यंतची माहिती देणारे पुस्तक प्रकाशित केले. हजारो शेतकर्यांना ते वितरित करण्यात आले. संस्थेने स्वत: रोपवाटिका तयार करून रोपे उपलब्ध करून दिली आहेत. संस्थेच्या प्रक्षेत्रावरचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणावर तो पाहण्यासाठी आले आणि बघता बघता जत, आटपाडी, कडेगाव, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील 750 एकर क्षेत्र ड्रॅग्रन फ्रूटखाली आले आहे. त्यासाठी ‘इंडियन ड्रॅगन फ्रूट ग्रोअरगट स्थापन करण्यात आला आहे. याद्वारे 400 ड्रॅगन फ्रूट शेतकर्यांची नोंदणी झाली आहे.”
शेतकर्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन
संस्थेने सर्व शेतकर्यांचा एक व्हॉट्सअॅप ग्रूप तयार केला आहे. ड्रॅगन फ्रूट हे नवीन पीक आहे. त्यामुळे या पिकांची सविस्तर माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. या पिकांची शास्त्रीय माहिती संस्थेने संकलित केली आहे. संस्थेचे अनुभवी शेतकरी नवीन शेतकर्यांना ड्रॅगन फ्रूटविषयी माहिती देत असतात. संस्थेने फळाविषयीचे तंत्रज्ञान विकसित करून लागवडीपासून काढणी, छाटणी, खत व पाणी व्यवस्थापन याविषयी शेतकर्यांना प्रशिक्षित केले आहे.
विक्री व्यवस्थापन
नारायण देशपांडे सांगतात, “या नवीन फळासाठी ग्राहक मिळविणे एक मोठे आव्हान होते. त्याचे आहारातील महत्त्व पटवून देणारी हजारो घडीपत्रके संस्थेने थेट किरकोळ फळविक्रेत्यांपर्यंत व ग्राहकांपर्यंत वितरित केली. सांगली, सोलापूर, पुणे, मुंबई, वाशी येथील व्यापार्यांशी संपर्क साधून विक्रीचा प्रश्न सोडविला.”
विक्रमी उत्पादन व निर्यात
उत्तम व्यवस्थापन व मशागत असल्यास ड्रॅगन फ्रूटचे विक्रमी उत्पादन घेता येते, हे संस्थेच्या शेतकर्यांनी दाखवून दिले आहे. 2018-19 या काळात 400 टन, 2019-20मध्ये 525 टन, तर 2020-21 साली 700 टन ड्रॅगन फ्रूटचे विक्रमी उत्पादन एकट्या जत तालुक्यातून घेण्यात आले. यातून सात कोटी रुपयांची उलाढाल झाली. पहिल्या वर्षी लागवडीचा खर्च साडेतीन लाख रुपये एकरी आला. खते, छाटणी, पाणी व्यवस्थापन याचा एकरी खर्च 32 हजार रुपये आला. सरासरी 80 ते 100 रु. किलो रुपये असा भाव मिळाला आहे. या भागातून युरोपमध्ये व अरब राष्ट्रात प्रथमच फळाची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली.
उत्कृष्ट रोपवाटिका
महाराष्ट्राच्या विविध भागांत ड्रॅगन फ्रूटची लागवड होत असली, तरी बहुतांश ठिकाणी या फळाच्या रोपवाटिका उपलब्ध नाहीत, ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने तंत्रज्ञानाची मदत घेऊन उत्कृष्ट सहा रोपवाटिका विकसित केल्या आहेत. यामुळे संस्थेला उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे. वर्षभरातून एका रोपवाटिकेतून दहा हजारांपेक्षा अधिक रोपांची विक्री होते.
शेतकरी समाधानी
कमी श्रम, कमी पाणी, एकदाच गुंतवणूक, रासायनिक फवारणीचा खर्च शून्य, एकदा लागवड केल्यानंतर तब्बल 25 वर्षे नफा मिळवून देणारी ही शेती आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळले आहेत.
लागवडीबद्दलचा अनुभव नोंदवताना वांगी (ता. कडेगाव) येथील शेतकरी राजाराम देशमुख म्हणाले, “मी पूर्वी द्राक्ष व ऊस शेती करत होतो. नवीन पीकपद्धतीचा अभ्यास करून व येरळा संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर 2015 साली 25 गुंठ्यांत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. यातून 11 टन उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता सरासरी आठ लाखाचे उत्पन्न मिळाले. 2020 साली पुन्हा ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र वाढवले. सध्या मी दीड एकरामध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहे.”
तडसर (ता. कडेगाव) येथील शेतकरी व महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष आनंदराव पवार सांगतात, “2014 साली येरळा संस्थेचे सचिव नारायण देशपांडे यांचा फोन आला. पिलीव (ता. माळशिरस) येथील शेतकरी जाधव यांनी दोन एकर ड्रॅगन फ्रूट शेतीतून 27 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या शेतीला भेट देऊन चर्चा करण्याची विनंती देशपांडे यांनी केली. पुढे आम्ही ड्रॅगन फ्रूट शेतीला भेट दिली. एक-दोन वर्षे या शेतीचा अभ्यास केला.
2016 साली मी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. दोन ओळींतील अंतर 12 फूट व दोन रोपांतील अंतर 7 फूट अशी रचना करून 30 गुंठ्यांत लागण केली. प्रारंभी कमी पाणी दिल्यामुळे म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्यामुळे 2017 साली कमी उत्पन्न - म्हणजे 400 किलो उत्पादन मिळाले. त्यानंतर शेणखत, कंपोस्ट खत व जीवामृत यांचा वापर केला. 2018 साली 1309 किलो, 2019 साली 2460 व 2020 साली 7389 किलो व 2020-21 या काळात 8541 किलो उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता 6 लाख 44 हजार 145 रुपयांचे उत्पन्न मिळाले. फेब्रुवारी 2021मध्ये 2 एकरांमध्ये रेड रेड व जंबो रेड या व्हरायटीची लागवड केली आहे. कमी पाण्यात भरपूर उत्पन्न देणारे हे नगदी पीक आहे. उसाएवढा खर्च केला, तरी उसाच्या दुप्पट उत्पन्न देणारे हे पीक आहे. शिवाय द्राक्षासारखी फार रिस्क घ्यावी लागत नाही.”
देशमुख व पवार या दोन्हीही शेतकर्यांनी प्रथमच दुबईला ड्रॅगन फ्रूट निर्यात केली आहे. या निर्यातीमुळे त्यांना 110 रुपये प्रतिकिलो किलो भाव मिळाला आहे.
आगामी योजना
ग्राहकांपर्यंत ड्रॅगन फ्रूटचे महत्त्व पोहोचविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. त्यासाठी शीतगृहातील साठवणक्षमता वाढवण्यासाठी परदेशी संस्थांशीदेखील संपर्क केला आहे. या फळावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.
एखाद्या संस्थेच्या माध्यमातून सातासमुद्रापार पिकणार्या ड्रॅगन फ्रूटची अनोखी शेती असा दुष्काळग्रस्त भागात फुलविला गेलेला हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग ठरला आहे. त्यामुळे हा प्रयोग शेतकर्यांसाठी नवा आदर्श ठरला आहे.
\