पुरोगामी शेंदुराची गोष्ट

नीरक्षीर

विवेक मराठी    10-Aug-2022   
Total Views |
 
 दगडावर शेंदूर थापून दगडाला देवत्व दिले जाते आणि मग परिपाठी म्हणून दरवर्षी शेंदुराचे नवे नवे थर त्या दगडावर चढवले जातात. या प्रक्रियेमुळे दगडाचे मूळ स्वरूप नष्ट होते आणि गुणधर्मही लक्षात राहत नाहीत. उरतो तो केवळ श्रद्धाभाव. मागील काही दशकात असेच पुरोगामी शेंदूर थापलेले दगड महाराष्ट्रात सन्मानाने मिरवत असले तरी पुरोगामित्वाच्या शेंदराची पुटं इतकी साचली आहेत की, त्या दगडाचा मूळ चेहरा महाराष्ट्र विसरून गेला आहे.

dev
नुकतेच धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात असणार्‍या माणकेश्वर मंदिरातील पत्रलेखिकेच्या मूर्तीवरील शेंदूर खरवडून काढण्यात आला. हिंदू समाजाच्या सश्रद्ध भावनेमुळे या देखण्या शिल्पाचे मूळ स्वरूप नष्ट झाले होते. हिंदू समाजधारणेत सटवाईला खूप महत्त्व आहे. सटवाई आपले भविष्य लिहित असते. माणकेश्वर येथील पत्रलेखिकेला सटवाई समजून शेंदूर थापला जाऊ लागला आणि मूर्तीचे मूळ स्वरूप आणि सौंदर्य नष्ट झाले. जेव्हा पुरातत्त्व विभागाने मूर्तीवरील शेंदूर खरवडून काढला, तेव्हा तो चार ते पाच इंच जाडीचा होता. मूर्तीवर किती वर्षांपासून शेंदूर फासला जात असेल यांचा अंदाज लावला, तर असे लक्षात येते की केवळ श्रद्धाभावाने शतकानुशतके इथे हे शेंदूर लेपन होत असावे. असे शेंदूर थापलेले दगड महाराष्ट्रात रानोमाळ दिसतात. म्हसोबा, येडोबा, चेडा या नावाने हे शेंदूर लावलेले दगड ओळखले जातात. रानोमाळ शेंदूर लावलेल्या दगडावर दरवर्षी जत्रा, उरूस, उत्सव यांच्या निमित्ताने शेंदूरलेपन केले जाते. त्यामागे श्रद्धाभाव महत्त्वाचा घटक असतो. उदाहरण द्यायचे तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवरच्या बहिरम बाबाचे देता येईल. कधी काळी सुपारी एवढा असणारा बहिरमबाबा आणि पंधरा फुट उंचीचा आणि वीस फुट रुंदीचा झाला आहे. हा आहे हिंदूंचा श्रद्धाभाव. गावोगावी असे अनेक छोटे-मोठे बहिरम आपण पाहत असतो.
 
निर्जीव दगडाना शेंदूर थापून देवत्व बहाल केले जाते. हा शेंदूर थापण्याची परंपरा केवळ दगडापुरती नाही, तर माणसांनाही शेंदूर फासला जातो. आणि सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्या पातळीवर ही माणसे जगू लागतात. ते सांगतील तेच सत्य. अशी समाजधारणा तयार करण्यात ते यशस्वी होतात. त्यांना लावलेला शेंदूर पुरोगामी असतो. या पुरोगामी शेंदुराची खास वैशिष्ट्य आहेत. ती समजून घेण्यासाठी आधी पुरोगामी म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल. मुळात पुरोगामित्व म्हणजे काय हे कळले की मागील तीस-चाळीस वर्षांपूर्वी व्यवहारात आलेला पुरोगामी शेंदूर म्हणजे काय हे सहज लक्षात येईल. पुरोगामी म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. पुरोगामी म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. म्हणजेच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी नसतात, कट्टर धार्मिक नसतात.
 
वरील व्याख्या वाचताना आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातील पुरोगामित्व म्हणजे जातवाद, प्रांतवाद, ब्राह्मणद्वेष, जातीजातीतील तेढ, महापुरुषांचे जातीकरण, सोईचा इतिहास अशा विविध लक्षणांनी माखलेले लोक स्वतःला पुरोगामी म्हणवतात हे सहजपणे लक्षात येते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचार म्हणजे फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार अशी व्याख्या कुणीतरी केली आणि त्यांचेच ढोल इतक्या जोरात वाजवले की फुले, शाहू, आंबेडकर यांच्याशिवायचे अन्य सर्वजण प्रतिगामी ठरले. त्यांचा त्याग, समाजसुधारणेचे कार्य एका फटक्यात अडगळीत टाकून दिले गेले. महाराष्ट्रात सत्ता हवी असेल, तर फुले-शाहू-आंबेडकर यांचे तोंडदेखले नाव घेतले की भागले. अशी एक धारणा घट्ट करण्यात काही मंडळी यशस्वी ठरले आणि मग फुले पगडी विरूद्ध टिळक पगडी अशी विभागणी झाली. आपल्या विरोधात निवडणूक लढवणार्‍या उमेदवारीची जात कोणती याची जाहीर विचारणा होऊ लागली आणि अशी सामाजिक विभागणी करणे, जातीची उठाठेव करणे हे पुरोगामित्व असल्याचे ठासून सांगितले गेले.


dev
 
माळावर एका मोठ्या दगडाला शेंदूर फासून म्हसोबा तयार केला जातो आणि त्याच्या आसपास छोट्या-छोट्या दगडावरही शेंदूर फासून त्यांना म्हसोबाचे गण मांडले जातात. अगदी तसेच महाराष्ट्रात पुरोगामित्वाचा शेंदूर लावलेला ‘जाणता राजा’ आहे, आणि जिल्हा जिल्ह्यात त्याचे छोटे मोठे गण इमानेइतबारे काम करीत आहेत. विविध जाती समूहातील सोईचे लोक या गणामध्ये आपली स्थानिक वतनदारी सांभाळत असतात. वरवर पहाता सर्वसमावेशक, सर्व समाजाचे सर्वमान्य नेतृत्व, दिल्लीला पर्याय अशा विविध विशेषनामांनी गौरविण्यात येणारे हे नेतृत्व खरोखरच पुरोगामी आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो. जवळपास साठ वर्षांच्या राजकीय वाटचालीत कोणता प्रगतीचा, समाजकल्याणकारक मार्ग या नेत्यांनी महाराष्ट्राला दाखवला आहे? पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी या नेत्याने देशाला रामायण-महाभारताची गरज नाही अशी घोषणा केली. मात्र कुराण, हदीसचे कायदे बदलता कामा नये अशी भूमिका घेतली. ही या नेत्याची धर्मनिरपेक्षता. सरदार ज्या मार्गाने जाईल, त्याच मार्गाने त्यांची प्यादी जात असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यातील प्याद्यांमध्ये आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्याची होड लागलेली असते.
 
तर अशा पुरोगामी शेंदुराने माखलेल्या लोकांची गर्दी महाराष्ट्रात आहे. सत्तेत असले की त्यांचा शेंदूर स्वकेंद्रित होतो. मी, माझा, माझे अशा चढत्या भाजणीत तो विकसित होतो. सत्ता गेली की मात्र फुले, शाहू, आंबेडकर यांची हमखास आठवण येते आणि मग पुरोगामी शेंदूर वाटेल त्या मार्गाने आपले पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी सज्ज होतो. याचा अनुभव महाराष्ट्राने अनेक वेळा घेतला आहे.

 
पुरोगामी विचार म्हणजे काय? हे आपण वर समजून घेतले आहे. पण पुरोगामी शेंदराची पुटं चढलेल्या मंडळींचे अंतरंग काय आहे? एकदा हा शेंदूर खरवडून काढला तर काय समोर येईल? जातवादी मानसिकता सदैव जागृत ठेवण्यासाठी लागणारे खतपाणी याच पुरोगामी शेंदूर माखलेल्या नेतृत्वाकडून मिळत असते ना? समाजात असंतोष, असुरक्षितता निर्माण होण्यासाठी कोणती अदृश्य शक्ती कार्यरत असते? खोट्या इतिहासाचे कोण समर्थन करत असते? असे अनेक प्रश्न पुरोगामी शेंदूर खरवडून काढताना उपस्थित होतात.
 
 
या पार्श्वभूमीवर आपल्याला खरा पुरोगामी महाराष्ट्र निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी जातवाद, प्रांतवाद यांना मूठमाती द्यावी लागणार आहे. मागील तीस-चाळीस वर्षात पुरोगामी शेंदुराची विषमात्रा समाजमनावर भिनली आहे. ती समूळ नष्ट करण्यासाठी समरसतेच्या मार्गाने जावे लागणार आहे. सर्वच सामाजिक प्रश्नांची उत्तरे राजकारण देऊ शकत नाही. तर सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी जातवाद आणि जाती विद्वेषाला विसरून बंधुभाव जागवावा लागणार आहे. महापुरुष सर्व समाजाचे, त्यांचे विचार सर्व समाजाचे कल्याण करणारे आहेत. त्यांना एका जातीपुरते मर्यादित करून महापुरुषांचे अवमूल्यन करता कामा नये. अशी भावस्थिती सामाजिक जीवनात आली, तरच पुरोगामी शेंदराची पुटं गळून पडतील आणि त्या आडचे ओगंळ चेहरेही समोर येतील.
 
 

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001