मराठवाड्यावर ‘गोगलगायीं’चे संकट

विवेक मराठी    30-Jul-2022   
Total Views |
@विकास पांढरे। 9970452767
 
 राज्यात अतिवृष्टीमुळे आधीच शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असताना आता नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकावर शंखी गोगलगायीने डल्ला मारला आहे. मुख्यत: मराठवाड्यात सोयाबीनचे सुमारे 40 ते 50 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
 
 
 
Snail
 
‘सोयाबीन’ हे मराठवाड्याचे मुख्य पीक. या ठिकाणी दर वर्षी 15 ते 20 लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होत असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची वाढती मागणी लक्षात घेता मराठवाड्याचे संपूर्ण क्षेत्र आज सोयाबीनने व्यापले आहे. लातूर-धाराशिव हे तर सोयाबीनचे आगार म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. असे असले, तरी सोयाबीनवर दरसाल संकट ओढवत आहे. कधी सोयाबीन बियाणांच्या उगवण क्षमतेवर, तर कधी पावसाने दडी मारल्याने घटलेल्या उत्पादनावर प्रश्नचिन्हे उपस्थित उभी राहतात. यंदा महाराष्ट्रात कधी नव्हे ते जुलै महिन्यातच ‘ओला दुष्काळ’सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ-मराठवाड्यातल्या शिवारात पाणीच पाणी आहे. त्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मूग आदी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुबार पेरणी करणे शक्य नाही. सर्वत्रच शेतकर्‍यांना अडचणी येताना दिसत आहेत. अशाही परिस्थितीत चिकाटीने शेती करत असलेल्या शेतकर्‍यांसमोर ‘शंखी गोगलगायीचे’ संकट उभे राहिले आहे. रोपावस्थेत असलेल्या सोयाबीन पिकावर शंखी गोगलगायीने आक्रमण केले आहे.
 
 
ही गोगलगाय आकाराने लहान व पाठीवर तांबूस रंगाचा शंख दिसणारी आहे. ओलसर ठिकाणी तिचा वावर दिसून येत आहे. इतर गोगलगायींच्या मानाने ही पिकांचा जास्त विध्वंस करते. एका दिवसात सोयाबीनची तीन ते चार कोवळी रोपे फस्त करत आहे. त्यामुळे सोयाबीनचे जवळपास 30 ते 40 टक्के नुकसान होत आहे. लातूर, धाराशिव व बीड या जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कृषी विभागाकडून नुकसानाची अधिकृत आकडेवारी आली नसली, तरी गोगलगायीने आठ ते दहा हजार हेक्टर क्षेत्राला घेरल्याचा अंदाज आहे.
 
 
यंदा मराठवाड्यातील सोयाबीनचे अर्थकारण कोलमडून पडण्याची शक्यता आहे, असा अंदाजही तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हा विषय मराठवाड्यात चर्चेचा आणि चिंतेचा विषय झालेला आहे. याला तोंड देण्यासाठी कृषी विभागाकडून औषधांवर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अडचणीत सापडलेल्या, कर्जाच्या बोजाखाली जीवन जगत असलेल्या शेतकर्‍यांपुढे आता कोणत्या पिकांचे उत्पादन घ्यावे? असा प्रश्न उभा राहिला आहे.
गोगलगायीचा शिरकाव कसा झाला?
 
 
 
महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. काही ठिकाणी कमी पावसावर पेरणी झाली होती. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने हाहाकार केला. अतिवृष्टी झाली. शेताच्या बांधावर गवत उगवले. अस्वच्छ ठिकाण हे गोगलगायीचे माहेरघरच. त्यामुळे गोगलगायींना याचा फायदा झाला. दुसरे कारण असे की, सोयाबीन पिकाची सततची पेरणी (पावसाळी व उन्हाळी पेरणी) आणि ओलावा, आर्द्रता व हानिकारक बुरशींचा जमिनीत वाढता शिरकाव यामुळे गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला.
 
 
“शेतकरी बंधूंनो, मिश्र पद्धतीने शेती करा!”
“शंखी गोगलगायींच्या संकटामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली. सध्या गोगलगायीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी सेवा केंद्राद्वारे खर्चीक व धोकादायक औषधी शेतकर्‍यांच्या माथी मारली जात आहे. संकटाला अनेक पर्याय आहेत. पण हे संकट का निर्माण होते याचा शेतकर्‍यांनी विचार करावा. सोयाबीन हे नगदी पीक आहे. जास्त पैसे मिळवून देत आहे म्हणून शेतकरी वर्षातल्या दोन्ही हंगामांत सोयाबीनची लागण करत आहे. त्यामुळे जमिनीचा कस निघून जात आहे. जमिनीचे योग्य व्यवस्थापन होत नाही. यामुळे गोगलगायीचे संकट ओढवले गेले, हे एक कारण आहे.

मी मिश्र पद्धतीने (एकात्मिक शेती) शेती करतो. यामध्ये सोयाबीन, तूर, उडीद, मूग अशी आंतरपिके घेतो. त्यामुळे किडीला या ठिकाणी वाव मिळत नाही. ही निसर्ग आधारित व पूर्वापार चालत आलेली शेती आहे. त्यामुळे माझ्या शेतीला गोगलगायींचा प्रादुर्भाव झालेला नाही. शेती कीडमुक्त करायची असेल तर मिश्र शेती हा त्यासाठी एक पर्याय आहे.”
 

Snail
 - रवींद्र देवरवाडे,
प्रगतिशील शेतकरी
देवळा, ता. अंबाजोगाई, जि. बीड

 
रात्रीच्या वेळी पिकांवर डल्ला
 
 
या शंखी दिवसा मातीत लपून किंवा सावलीत पानांखाली, ओल्या जागी आढळतात. रात्री आक्रमक होऊन पिकाच्या खोडाशेजारी जवळ येऊन पानाला छिंद्रे पाडत आहेत. नव्या अंकुरांचा अक्षरश: फडशा पाडत आहेत. या प्रकारांमुळे शेतकरी धास्तावला आहे. पूर्णा तालुक्यातील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी आपल्या शेतामधील शंखी गोगलगाय वेचल्यानंतर टोपलीभोवती कशा पांगल्या होत्या, याचे छायाचित्र समाजमाध्यमातून व्हायरल झाले. हे उदाहरण या संकटाची गहनता लक्षात आणून देते.
शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ
 

Snail
 
गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. याबाबत संजितपूर (ता. कळंब, जि. धाराशिव) गावातील सोयाबीन उत्पादक शेतकरी रामराजे कुटे म्हणाले, “माझी बारा एकर जमीन आहे. नगदी पीक म्हणून यंदा बारा एकरांवर सोयाबीनची पेरणी केली. जून महिन्यात पावसाचा पत्ता नव्हता. पेरणीही उशिराच झाली. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू झाली. यामुळे गोगलगायी वाढल्या. पहिल्यांदा रानात कमी दिसू लागल्या होत्या. जसजशी त्यांची पैदास वाढू लागली, तसतशा संपूर्ण रानात ‘शंखी’ दिसू लागल्या. सोयाबीनचे रोप दिसू लागले होते. अशातच गोगलगायी त्यावर आक्रमण करत असल्याचे चित्र नजरेस पडले. गोगलगायी वेचल्याही, पण प्रादुर्भावाला रोखू शकलो नाही. संपूर्ण बारा एकर क्षेत्र गोगलगायीने गिळंकृत केले. त्यामुळे बारा एकर क्षेत्र मोडून नव्याने पाच एकरांवर सोयाबीनची लागण केली आहे. दुबार पेरणीमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. भविष्यात ही समस्या अशीच उभी राहिली, तर खर्च कसा भरून काढायचा? हा प्रश्न उभा राहणार आहे.”
 
 
Snail
 
2020-21 या हंगामात महाराष्ट्रात सोयाबीनचे सर्वाधिक - एकरी 41 क्विंटल असे विक्रमी उत्पादन घेतलेले औसा तालुक्यातील हसलगण गावातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अजित फुलसुंदर यांनादेखील असाच फटका बसला आहे. या संदर्भातील अनुभव सांगताना अजित फुलसुंदर म्हणाले, “यंदाही योग्य नियोजन व व्यवस्थापन करून पाच एकरांवर सोयाबीनची पेरणी केली. त्यानंतर कधी नव्हे असा गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला आणि त्यांनी संपूर्ण पीक फस्त केले. पहिल्यांदाच असा अनुभव आला. गोगलगायींच्या निर्मूलनासाठी योग्य उपाय असणारी औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे बांधावरची स्वच्छता, रान स्वच्छ ठेवणे इ. जुजबी इलाज करूनही गोगलगायींचे निर्मूलन करणे कठीण जात आहे. अतिवृष्टीमुळे दुबार पेरणी करणे शक्य नाही. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.”
 
 
Snail
 
शेती उत्पन्न घटण्यासाठी किडी, रोग मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. शेतीच्या व विकासाच्या दृष्टीने ही सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी कृषी विद्यापीठांतील, कृषी संशोधन केंद्रांतील व कृषी विभागातील अधिकार्‍यांनी, सजग शेतकर्‍यांनी पुढे येऊन शेतकर्‍यांचे प्रबोधन केले पाहिजे.

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.