परंपरेतील समानता हिंदू-मुस्लीम ऐक्याचा आधार?

विवेक मराठी    26-Jul-2022   
Total Views |
विराग पाचपोर। 9422870842
  
भारतीय मुस्लीम म्हणून जो काही समाज आज हिंदुस्थानात राहतो आहे, तो बहुतांश मूळचा हिंदूच आहे. हिंदू आणि मुस्लीम समाजातील समान परंपरांना जर व्यक्त करता येणे शक्य झाले, तर समानतेच्या स्वराची तार सहजपणे झंकारता येईल, असे लक्षात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या मिशनसाठी पुढाकार घेऊन गेल्या 11-12 जून रोजी दिल्लीत ‘परंपरा लेखन’ या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत काही मुस्लीम प्रतिनिधीदेखील सामील झाले होते. त्यात मुख्यतः त्यागी, राजपूत, जाट आणि ब्राह्मण या जाती-बिरादरींचे पण धर्मांतरित झालेले सुमारे 100च्या जवळपास मुस्लीम या कार्यशाळेत उपस्थित होते.

RSS

 
दि. 4 जुलै 2021 रोजी गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे विद्वान मुस्लीम प्राध्यापक आणि लेखक डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद यांच्या "Meeting of Minds : A Bridging Initiative' या पुस्तकाचे प्रकाशन करताना रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत असे म्हणाले की “हिंदू आणि मुस्लीम हे आम्ही दोन वेगळे एकक (युनिट) मानत नाही. ऐक्य होण्यासाठी दोन वेगळे एकक असण्याची गरज आहे. इथे वेगळेपण नाही, तेव्हा हिंदू-मुस्लीम ऐक्य ही येथे अप्रस्तुत बाब आहे.”
 
 
डॉ. भागवत पुढे असेही म्हणाले की “या देशात राहणार्‍या आणि या देशाला मातृभूमी मानणार्‍या सर्वांचा डीएनए एकच आहे.” त्याआधीदेखील दिल्लीला त्यांची तीन दिवसांची एक व्याख्यानमाला झाली होती, त्यातही “मुस्लिमांना वगळून हिंदुराष्ट्राची संकल्पना करणे चूक आहे” असे डॉ. भागवत म्हणाले होते. मुस्लीम समाजात त्यांच्या या दोन्ही विधानांचे भरपूर स्वागत झाले होते आणि त्यांना मुस्लीम समाजाचा एक सकारात्मक प्रतिसाद लाभला होता.
 
 
भारतीय मुस्लीम म्हणून जो काही समाज आज हिंदुस्थानात राहतो आहे, तो बहुतांश मूळचा हिंदूच आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांनी काही ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक किंवा आर्थिक कारणामुळे इस्लामचा स्वीकार केला असेल, पण त्यांचे पूर्वज तर हिंदूच होते ही गोष्ट तेदेखील मानतात. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कुंवर मेहमूद अली एकदा संघाचे चतुर्थ सरसंघचालक प्रोफेसर राजेंद्र सिंह उपाख्य रज्जूभैय्या यांना भेटले. या भेटीत चर्चेच्या दरम्यान त्यांनी रज्जूभैय्यांना सांगितले की आम्ही तर राजपूत आहोत. हेच राज्यपाल महोदय एकदा उज्जैन येथे गेले असताना त्यांनी कब्रस्तानात जाऊन त्यांच्या पूर्वजांसाठी दुआ केली आणि लगेच क्षिप्रा नदीच्या तिरावर जाऊन तर्पणदेखील केले. हे पाहून त्यांच्यासोबत असणार्‍या पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न केला, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की “कब्रस्तानात जाऊन मी माझ्या मुस्लीम पूर्वजांच्या शांतीसाठी दुआ केली, तर क्षिप्रा नदीच्या तिरावर जाऊन मी माझ्या 300-400 वर्षांपूर्वीच्या हिंदू पूर्वजांसाठी तर्पण केले. यात मी काहीच चूक केले नाही.”
 
 
RSS
भारतातील बहुसंख्य मुस्लिमांचे पूर्वज हिंदूच आहेत, ही गोष्ट आता सर्वमान्य होत आहे. न्यायमूर्ती मोहम्मद करीम छागलादेखील म्हणायचे की “ख रा कळपर्वी लू ठरलश रपव र्चीीश्रळा लू ऋरळींह.” आपल्या देशावर पुष्कळ आक्रमणे झालीत. त्यांचा एक प्रदीर्घ इतिहास आपल्यासमोर आहे. या आक्रमकांपैकी ग्रीक, यवन, शक, कुशाण, हूण यासारख्या आक्रमकांना आपल्या समाजाने पचवून टाकले. ते येथील संस्कृतीशी कालांतराने एकरूप होऊन गेले. कार्ल मार्क्सने म्हटले आहे की “जेथे विजयी समाजाचा सांस्कृतिक स्तर निम्न दर्जाचा असतो, तेथे स्वाभाविकपणे ते पराजित लोकांच्या श्रेष्ठ संस्कृतीचा स्वीकार करतात.” मार्क्स लिहितो -- The Arabs, Turks, Tartars, Mughals who had successfully overcome India, soon became Hinduised, the barbarian conquerors being by an eternal law of history, conquered themselves by the superior civilization of their subjects.
 
 
भारतात मुघल साम्राज्य स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांच्या सरदारांमध्ये आणि राजवंशातील इतर लोकांत हिंदूंचे धर्म, संस्कृती, दर्शन इत्यादी जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. औरंगझेबाचा मोठा भाऊ दारा शिकोह याचे उदाहरण प्रसिद्ध आहे. त्याने उपनिषदे, गीता, रामायण, महाभारत आदी ग्रंथांचे फारसी भाषांतर केले आणि त्यांचा प्रभाव हळूहळू उच्चवर्णीय मुसलमानांवर होताना दिसू लागला होता. त्यामुळे औरंगझेबाने दारा शिकोहची हत्या करविली. या दाराची एक कविता प्रसिद्ध आहे. तो लिहितो - Thou art in the Kabaa, as well as in the Somnath Temple; In the convent as in the Tavern. आजही अनेक मुस्लीम आपल्या प्राचीन परंपरांचे जतन आणि पालन करताना दिसून येत आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला एकदा म्हणाले होते की ते ब्राह्मण आहेत.
 
 
 
हाच विषय पुढे नेत हिंदू आणि मुस्लीम समाजात कोणते असे विषय किंवा मुद्दे आहेत ज्यावर सामाजिक-सांस्कृतिक आणि भावनिक ऐक्याची पक्की इमारत उभी करता येईल, असा विचार सुरू झाला आणि लक्षात असे आले की दोन्ही समाजांत काही परंपरा समान आहेत. अशा समान परंपरांना जर व्यक्त करता येणे शक्य झाले, तर समानतेच्या स्वराची तार सहजपणे झंकारता येईल.
 
 
मग या दोन्ही समाजांत कोणकोणत्या समान परंपरा आहेत, त्याचा शोध घेणे सुरू झाले. कारण ज्या वेळी इस्लामी आक्रमणाच्या काळात आमच्याच समाजातील काहींनी इस्लामचा स्वीकार केला, त्या वेळी किंवा त्यानंतर काही काळात त्यांच्या ‘घरवापसीचा मार्ग’ही हिंदू समाजाने बंद केला होता. काश्मीरच्या मुसलमानांचे उदाहरण या संदर्भात देता येईल. काशीच्या पंडितांनी त्यांचा हिंदू धर्मात येण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला होता.
 
 
 
पण आता मात्र आशेचा एक किरण दिसू लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या प्रखर हिंदू संघटनेने या मिशनसाठी पुढाकार घेऊन गेल्या 11-12 जून रोजी दिल्लीत ‘परंपरा लेखन’ या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात प्रामुख्याने दिल्लीच्या आसपासच्या प्रदेशातील जाती-बिरादरींचे लोक सहभागी झाले होते. संघाचे सह-सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी दोन दिवसांच्या या कार्यशालेचे उद्घाटन केले. आपल्या उद्घाटन भाषणात डॉ. गोपाल म्हणाले की “आमच्यातीलच काही लोक परधर्मात गेले असले, तरी आमच्या परंपरा, संस्कृती आणि मूल्ये समान आहेत. ती त्यांनी आजही जपून ठेवली आहेत. या समानतेच्या धाग्याचे आपण प्रयत्नपूर्वक जतन केले पाहिजे, कारण त्यांच्याच साहाय्याने आपण आपले उद्दिष्ट गाठू शकू.”
 
 
 
या कार्यशाळेत अयोध्येचे खासदार ब्रजभूषणदेखील होते. हे तेच ब्रजभूषण आहेत, ज्यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या भेटीला विरोध करून प्रचंड राजकीय खळबळ उडवून दिली होती. तसेच संघाचे वरिष्ठ प्रचारक डॉ. इंद्रेश कुमार, धर्मजागरण संयोजक श्री शरद ढोले, संघाचे संपर्क प्रमुख श्री रामलाल आणि अन्य मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
 
 
 
या कार्यशाळेत दुसर्‍या दिवशी काही मुस्लीम प्रतिनिधीदेखील सामील झाले होते. त्यात मुख्यतः त्यागी, राजपूत, जाट आणि ब्राह्मण या जाती-बिरादरींचे पण धर्मांतरित झालेले सुमारे 100च्या जवळपास मुस्लीम या कार्यशाळेत उपस्थित होते. प्रत्येकाने आपला परिचय देताना आपली जाती, बिरादरी आणि गोत्र सांगितले आणि मला आश्चर्य याचे वाटले की या मुस्लिमांचे गोत्र अत्री, कश्यप, वगैरे - जसे हिंदू समाजात असतात तसेच आहे. अनेक मुस्लिमांची कुलदेवतादेखील आहे आणि ही कुलदेवता बदलता येत नाही. मुस्लीम मंचाचे गुजरातचे एक कार्यकर्ते आहेत, त्यांची कुलदेवता एक देवी आहे आणि तिचे मंदिर गुजरातमध्ये वापीजवळ आहे. त्या देवीच्या दर्शनासाठी ते एकदा आम्हाला घेऊन गेले होते. विवाहप्रसंगी मुस्लीम असल्याने निकाह पढने हे सर्वांसमोर, पण घरात मात्र सप्तपदीसारखे धार्मिक विधी हिंदू परंपरेनुसार केले जातात.
 
 
 
परंपरेच्या या समानतेची जपणूक यासाठीही करणे गरजेचे आहे की त्यामुळे या समाजाला त्यांची मूळ ओळख पटवून देणे सहज शक्य होईल. उदाहरणार्थ, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राजस्थानात ब्यावर येथे एक प्रकल्प चालविला जातो. तेथे पृथ्वीराज चौहान यांच्या सैन्यातील अनेक हिंदू सैनिकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यांच्यात काम करून परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिवर्तन घडवून आणले. आज त्यांच्यापैकी सुमारे एक ते दीड लाख मुस्लिमांनी हिंदू धर्मात पुनः प्रवेश घेतला आहे. आज देशात ठिकठिकाणी असे अनेक प्रकल्प सुरू आहेत.
 
 
 
आज भारतात सुमारे 20 कोटी मुसलमान आहेत, तर 2.5-3 कोटी ख्रिश्चन आहेत. या सर्वांचे मूळ हिंदूच आहे. त्यांना या मूळ स्वरूपाची ओळख पटवून देऊन त्यांच्यातील पूर्वज, संस्कृती, परंपरा याविषयीचा स्वाभिमान जागविण्याच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी या कार्यशाळेचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास या दोन दिवसांच्या कार्यशाळेतील चर्चेतून अनुभवास आला. ही समानता लक्षात आणून दिल्यास मतभेदांची आणि विरोधाची धार बोथट होऊन एकतेचा प्रवाह निर्वेधपणे प्रवाहित करता येईल, असे वाटते.