अद्वितीय नेते आबे सान

विवेक मराठी    19-Jul-2022   
Total Views |
जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांची एका प्रचारसभेदरम्यान हत्या करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध होते. आबे पंतप्रधानपदावर नसतानाही त्यांची मैत्री कायम होती. त्यामुळेच आबे यांच्या निधनानंतर मोदींनी त्यांच्या ब्लॉगवर लेख लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिंझो आबे यांचे नेतृत्व खरोखरच आगळेवेगळे होते आणि मोदींनी त्यांच्या लेखात त्यांच्यातल्या प्रत्येक पैलूचा अतिशय खुबीदार उल्लेख केल्याने त्या लेखाचीही जगभर चर्चा झाली.
 
modi
जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांची जपानमध्ये नारा गावात एका प्रचारसभेदरम्यान हत्या करण्यात आली हे जितके खेदजनक आहे, तितकेच संतापजनकही आहे. तेतसुया यमागामी हा आबे सान यांचा मारेकरी असून त्यास सुरक्षा रक्षकांनी झडप घालून जागेवरच पकडले. आबे यांना ठार करण्यामागे त्याचा उद्देश काय होता, हे स्पष्ट झाले नसले तरी त्यामागे तिसरा देश नसेलच असे नाही. अशा गोष्टी पुढे कधीतरी तीस-चाळीस वर्षांनी जाहीर होत असतात. आबे सान यांच्या मृत्यूनंतर ज्या जागतिक नेत्यांनी त्यांना भावपूर्ण आणि अगदी हृदयापासून श्रद्धांजली वाहिली, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थान अतिशय वरचे आहे. भारत-जपान मैत्री केंद्रस्थानी ठेवून मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली हे योग्यच आहे, पण ती केवळ ट्विटरच्या माध्यमातून न वाहता त्यांनी आपल्या ब्लॉगवर एक दीर्घ लेख लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुळातच त्यांचे या लेखाचे शीर्षक ‘माझे मित्र आबे सान’ असे आहे. जपानी भाषेत एखाद्याचा सन्मानपूर्वक उल्लेख करायचा असेल, तर त्या व्यक्तीच्या नावानंतर ‘सान’ असा केला जातो.
 
 
मोदी आणि आबे यांची मैत्री 2007पासून आहे आणि ती आबे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही चालू राहिलेली होती, याचा मोदींनी आवर्जून उल्लेख केला आहे. सर्वसाधारणपणे जागतिक नेते कोणाही पदावरील नेत्याला श्रद्धांजली वाहताना भारावलेले असतात, हे आपण नेहमीच पाहतो. एकदा ती व्यक्ती पडद्याआड गेली की त्यांच्या लेखी ती कोण आणि आपण कोण असे होऊन जाते. शिंझो आबे यांच्याविषयी अन्य जागतिक नेत्यांच्या श्रद्धांजलींना मी मुद्दाम नजरेखालून घातले आहे. बहुतेकांच्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त झाल्या आहेत. पण कोणीही वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून आपले मत व्यक्त केलेले नाही. मोदी यांनी वाहिलेली श्रद्धांजली वृत्तपत्रांनी ब्लॉगवरून घेतली. ब्रिटनचे अलीकडेच राजीनामा देऊन बाहेर पडलेले नेते बोरिस जॉन्सन यांनीही आबे यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बान्स, फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही ट्विटरचा आधार घेतलेला दिसतो. जपानचा सख्खा शेजारी चीन, पण त्या देशाच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने आबे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा शहाणपणा दाखवलेला नाही. उलट चीनमध्ये आबे यांचा मृत्यू ‘साजरा’ करण्याचा मूर्खपणा करण्यात आला आहे. मात्र असे असूनही, आपल्या घराशेजारी कोणीतरी गेलेले असताना आपण त्यांची साधी दखल न घेण्याइतके कृतघ्न कसे? असेही विचारणारे काही जण चीनमध्ये - विशेषत: शांघायमध्ये सापडले. खरे तर कृतघ्नता म्हणजेच चीन असे समीकरण झालेले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला जपानने विरोध केला, तरी रशियाने आबे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करणारा संदेश जपानकडे पाठवून दिला आहे. सांगायचा मुद्दा असा की जो गादीवर असेल तो आपल्याला प्रिय, हा जगाचा बाणा दिसतो, पण भारताचे तसे नाही. मोदींनी आबे यांना एकदा मित्र मानले ते कायमचे.
 
 
 
शिंझो आबे हे जपानमधल्या लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते होते आणि त्यांनी 16 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी वैद्यकीय कारणास्तव हा राजीनामा दिला होता. जपानच्या काही पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आपल्या पदाचे राजीनामे यापूर्वी सादर केले होते. असे चार पंतप्रधान त्या पदावरून एकामागोमाग दूर झाल्याचे आपण पाहिले आहे. शिंझो आबे तसे नव्हते. पण तरीही ते आपल्या लिबरल डेमॉकॅ्रटिक पक्षाच्या सिनेट निवडणुकीच्या प्रचारासाठी नारा येथे गेले होते आणि त्या वेळी अतिरेकी विचारसरणीच्या तेतसुया याने त्यांची हत्या केली. भारतात निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची झालेली हत्या आपल्याला माहीत आहे. नारामध्ये त्यांची हत्या करणारी ही व्यक्ती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचू शकली, हे गूढच आहे. तेही एवढी मोठी बंदूक घेऊन? त्या खुन्याने आपली बंदूक लपवलेली होती आणि ती कॅमेर्‍यासारखी दिसत होती, असे प्रसिद्ध झाले आहे, तरीही तिथल्या स्थानिक सुरक्षा व्यवस्थेची ती चूकच म्हणावी लागेल. या हत्येची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटनांनी जपानच्या गुप्तचर संघटनेला मदत करण्याची आवश्यकता आहे, त्याप्रमाणे ती केली जात आहे. पण या हत्येत एखादा तिसरा देश नसेल असे मानणे भाबडेपणाचे ठरावे.
 
 
modi
 
जपान हा ‘क्वाड्रिलॅटरल’ म्हणजेच ‘क्वाड’मधील अर्थात ‘चतुष्कोनीय सुरक्षा संवादा’तला महत्त्वाचा घटक होता. ‘क्वाड’ची निर्मिती करण्यातही आबे यांचाच सिंहाचा वाटा होता. जपान, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका असा हा संवाद होता आणि त्यात नियमित लष्करी कवायतींसह बर्‍याच गोष्टी अंतर्भूत होत्या. आशिया-पॅसिफिक भागात चीनची जी दादागिरी नेहमीच चालते, त्याला उत्तर देण्यासाठी या ‘क्वाड’ला निर्माण करण्यात आले आहे. या संघटनेच्या कामात आबे यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली होती, हे नाकारून चालणार नाही. चीनला नेमकी तीच बोच लागून राहिलेली आहे. आबे यांच्या हत्येनंतर चीन आपण त्या गावचेच नाही, अशा पद्धतीने वागला, त्याची ही मेख आहे. मोदींनी आबे यांच्याविषयी लिहिलेल्या लेखात ‘क्वाड’चा विशेष उल्लेख करून त्याव्यतिरिक्त त्यांच्या या लेखात आसियान, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातले जपानचे सहकार्य, आशिया-आफ्रिका विकास महामार्ग अशा असंख्य उपक्रमांचा उल्लेख आहे. आजपर्यंत जपानचे अनेक पंतप्रधान झाले, त्यापैकी अनेकांनी भारताला भेटही दिलेली आहे. पण या सर्वांमध्ये उठून दिसणारे व्यक्तिमत्त्व शिंझो आबे यांचेच होते, हे मान्य करावे लागेल. कदाचित त्यामुळेच त्यांना ‘पद्मविभूषण’सारखा दुसर्‍या क्रमांकाचा किताब देण्यात आला.
 
 
 
शिंझो आबे यांचे नेतृत्व खरोखरच आगळेवेगळे होते आणि मोदींनी त्यांच्या लेखात त्यांच्यातल्या प्रत्येक पैलूचा अतिशय खुबीदार उल्लेख केल्याने त्या लेखाचीही जगभर चर्चा झाली, हे आणखी विशेष. शिंझो आबे जपानच्या पंतप्रधानपदी आणि मोदी गुजरातचे मुख्यमंत्री अशी ही तेव्हापासूनची मैत्री, असे मोदींनीच या लेखात म्हटले आहे. आबे साबरमती आश्रमात गेले असता त्यांनी घातलेला पोशाख लक्षात राहणारा. त्यांनी अगदी भारतीय - म्हणजे झब्बा आणि सुरुवार, त्यावर निळ्या रंगाचे जाकीट असा हा पोशाख पाहून ते जपानी आहेत की भारतीय असे वाटावे. मोदींनी त्यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांना आबे यांनी दिलेल्या आर्थिक सल्ल्याचीही माहिती या लेखात दिली आहे आणि तो आपल्याला कसा उपयुक्त ठरला, तेही अगदी दिलखुलासपणे सांगितले आहे. पुढे जेव्हा पंतप्रधानपदावर मोदी विराजमान झाले, तेव्हाही जपानने भारताशी केलेल्या सहकार्य करारांची माहितीही त्यात आहे. या प्रदेशाच्या सुरक्षेसाठी काय करणे आवश्यक आहे तेही या दोघांमध्ये झालेल्या चर्चेत ठरले. काळाच्या पुढे राहण्याची त्यांची मानसिकता आणि त्यांची दूरदृष्टी भारताला साह्यभूत ठरली आहे, याची मोदींनी नोंद घेतली आहे. 2007 ते 2012 या काळात आबे पंतप्रधानपदी नव्हते आणि 2020नंतर ते निवृत्त जीवन जगत असतानाही त्यांची आपली भेट कशी होत असे आणि फुजी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या त्यांच्या निवासस्थानाला भेट देण्याचे भाग्य आपल्याला कसे लाभले, ते मोदींनी या लेखात म्हटले आहे. सत्ता येते आणि जातेही, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांचे नाव घेतले जाते, अशा दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये असलेले मैत्रिसंबंध कसे दृढ राहिले आणि त्याचा त्यांच्या मनावर कसा ठसा उमटला, तेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ही भारत आणि जपान यांची मैत्री आहे. मला वाटते की एखाद्या राजकारण्याने मनमोकळेपणाने दुसर्‍या देशाच्या, पण सध्या नेतेपदी नसलेल्या एका व्यक्तिमत्त्वाविषयी लिहिलेला असा हा पहिलाच उत्कट आणि भावपूर्ण लेख असेल.