दोन समारोप, सूत्र एक

नीरक्षीर

विवेक मराठी    07-May-2022   
Total Views |
साहित्य हे समाज मनाचा आरसा असते. समाज कसा असावा याचे मार्गदर्शन साहित्य करते, म्हणून साहित्य संमेलने आणि त्यातून व्यक्त केले जाणारे विचार नेहमीच गांभीर्याने घेतले जातात. नुकत्याच झालेल्या दोन संमेलनांच्या समारोपाच्या भाषणांनी ही गोष्ट अधोरेखित केली आहे.

marathi sahitya sammelan udgir 2022

नुकतेच उदगीर येथे 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्याच काळात 18वे विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजनही उदगीर येथे करण्यात आले होते. मागील काही वर्षांपासून ही दोन्ही संमेलने एकच वेळी आयोजित होत आहेत. असे असले, तरी दोन्ही संमेलनांचे उद्देश वेगवेगळे आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात साहित्य संमेलनाचे महत्त्व खूप मोलाचे होते, असे म्हणण्याचे कारण अलीकडच्या काळात साहित्य संमेलन म्हणजे राजकीय टीकाटिप्पणीचे व्यासपीठ झाले असून साहित्यबाह्य विषयामुळे ते गाजते. साहित्य आणि संस्कृती संमेलनाच्या प्रवेशद्वारावर केविलवाण्या अवस्थेत उभ्या राहिल्या आहेत आणि व्यासपीठावर मात्र राजकीय भाषणाचा फड गाजवला जात आहे, त्याला संमेलनाचे अध्यक्षही अपवाद नाहीत असे चित्र वारंवार दिसत आहे. उदगीर येथील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हेच चित्र समोर आले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे आणि विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश वीसपुते हे दोघेही आपापल्या क्षेत्रात दिग्गज आहेत. त्यांचा साहित्यपसारा, साहित्यिक कारकिर्द खूप मोठी आहे. मात्र महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी या सार्‍याचा उपयोग झाला असता, तर बरे झाले असते. मात्र साहित्यबाह्य, राजकीय टीकाटिप्पणी करून त्यांनी आपलेही पाय मातीचे आहेत हे दाखवून दिले. समकालीन आव्हाने, भविष्यवेधी दिशादर्शन आणि सामान्य माणसाला काय हवे याचा मूलभूत विचार या व्यासपीठावर होणे आवश्यक होते. तो न होता नकार, टीका आणि द्वेषाचा पानमळा फुलवण्यात अनेकांना धन्यता मानली. या पार्श्वभूमीवर दोन्हीही संमेलनांच्या समारोपाच्या निमित्ताने झालेली भाषणे खूप बोलकी आणि खर्‍या अर्थाने साहित्यजाणिवा प्रकट करणारी होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ते आपल्या भाषणात म्हणाले, “सत्ता डोळे नष्ट करू शकते. दृष्टी नष्ट करू शकत नाही. आपला समाज बदलतो आहे. या बदलामागची दृष्टी समजून घेतली पाहिजे. साहित्य, संस्कृती ही आपली शक्ती आहे. त्या शक्तीचा वापर कशासाठी होतो? आपल्याला संविधानाने मूलभूत अधिकार दिले, स्वातंत्र्य दिले, ते साहित्यातून व्यक्त होते का? साहित्य केवळ लोकरंजनासाठी नसते. ते समाजाला दिशा देण्यासाठी असते. दोष सर्वांमध्ये असतात. आपली प्रगती उत्तम, अतिउत्तम, सर्वोत्तम अशी व्हायला हवी, हे आपले उद्दिष्ट आहे. प्रबोधन, प्रशिक्षण, लोकशिक्षण ही प्रक्रिया साहित्याने पूर्ण केली पाहिजे. साहित्य हा केवळ मनोरंजनाचा विषय नाही. त्यात भावनांना खूप महत्त्व आहे. मानवी जीवनाला योग्य दिशा आणि दृष्टी देण्यासाठी साहित्य निकोप आणि निर्भेळ हवे. आमच्यात मतभेद असले तरी चालतील, पण मनभेद असता कामा नयेत. एकविसावे शतक हे भारताचे असून जगाचे नेतृत्व आपण करत असताना साहित्य, संस्कृती यांच्या माध्यमातून आपण काय देणार आहोत हे ठरवायला हवे.”

 
विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप नागराज मंजुळे यांनी केला. ते आपल्या समारोपात म्हणाले, “साहित्याचे काम जाग करण्याचे आहे. येथे जमणारी माणसे जाग करणारी आहेत. आपण मनापासून चांगले लिहिले पाहिजे. सामान्य माणूस आणि साहित्य यामध्ये फारकत असता कामा नये. साहित्य, कला यातून व्यक्त होणारे विचार सामान्य माणसाला कळतील असे हवे. आज साहित्य आणि साहित्यिक यांचा प्रभाव असताना सामाजिक जागृती नसेल तर आपले प्रकरण गंडले आहे हे मान्य करायला हवे. आणि म्हणून कला-कलावंत, साहित्य-साहित्यिक व सामान्य माणूस यांच्यातील दरी कमी झाली पाहिजे. चार्वाक ते तुकाराम आणि फुले ते बाबासाहेब आंबेडकर अशी मोठी परंपरा आपल्याला लाभली आहे. ही परंपरा आपली आहे, त्यासाठी वाचले पाहिजे. तुमची जात कोणती हे महत्त्वाचे नाही, तर दुसर्‍याचे दुःख, वेदना तुम्हाला कळते का? हे महत्त्वाचे आहे. आपले माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी एकमेकांवर प्रेम करणे हा आजच्या काळात विद्रोह आहे. असा विद्रोह आपण करायला पाहिजे. एकमेकांवर प्रेम करायला पाहिजे.”

 
वरील दोन्हीही समारोपाच्या भाषणांत एक समान सूत्र आहे, ते म्हणजे समन्वयाचे आणि समजून घेण्याचे. याच सूत्राच्या आधारे आपले सामाजिक सहजीवन सुलभ होणार आहे. साहित्य संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम यातून जर असा समन्वय आणि एकमेकांना समजून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, तर नक्कीच आपला समाज निर्दोष होईल, निर्भेळ होईल. त्यांचे प्रतिबिंब साहित्य आणि लोकजीवनात पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी धुरिणांनी पांघरलेले बुरखे काढून निर्मळ मनाने साहित्य विचार मांडले पाहिजेत. सत्ता, नेता, राजकारण हे चिरंजीव नाहीत. त्यामुळे जे चिरंजीव आहे, सनातन आहे, त्याचा विचार मांडला गेला पाहिजे.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001