या वर्षी कृषी क्षेत्रातील दोन व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये कर्नाटकमधील 72 वर्षांच्या अमई महालिंगा नाईक या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला शेतात उभारलेल्या सिंचन व्यवस्थेबद्दल पुरस्कार जाहीर झालाय. या लेखात त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.
खरे तर पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आणि ’अमई महालिंगा नाईक’ या नावाची शोधमोहीम सुरू झाली. मुळात हे नाव आतापर्यंत कुणालाही ठाऊक नव्हते. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल जास्त लेखन नाही आणि गूगलवर माहितीसुद्धा उपलब्ध नव्हती, हेच विद्यमान केंद्र सरकारचे वेगळेपण आवडून गेले आणि याबाबत कितीही कौतुक केले तरी थोडेच आहे. 2014पासून झालेला हा बदल अभिनंदनीय आहे.
कर्नाटकमधील आडनदीकाठापासून जवळच एक छोटे खेडेगाव केपू. गावातील एका श्रीमंत शेतकर्याकडे एक शेतमजूर काम करायचा. त्यांच्या नारळ आणि सुपारीच्या बागेत हे गृहस्थ मजूर म्हणून इमानदारीने काबाडकष्ट करत होते. त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी त्या शेतमजुराला आपल्या डोंगरावरील पडीक पडलेला शेताचा तुकडा बक्षीस म्हणून दिला. पण त्या माळरानावर पाण्याचा मोठा प्रश्न होता. तरीही यांच्यासारख्या अवलियाने तिथे सुपारीची बाग लावण्याचे स्वप्न बघितले आणि तिथूनच संघर्षाचा प्रवास सुरू झाला. बघितलेले स्वप्न सत्यात उतरवणे तसे कठीण आहे. पण अमई महालिंगा नाईक हे नाव आज ‘टनेल मॅन’ म्हणून जगप्रसिद्ध झाले आहे, कारण त्यांनी जे स्वप्न बघितले, ते सत्यात उतरवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
साधारण 1978 सालातील ही घटना आहे. अमई महालिंगा नाईक यांना शेताचा तुकडा मिळाला होता, पण शेतात आणि त्या माळरानावर पाण्याचा प्रश्न आ वासून त्यांच्यासमोर उभा होता. आपल्यापैकी एखादा त्यांच्या जागी असता, तर हा शेतीचा नाद कधीच सोडून दिला असता. पण म्हणतात ना.. ’कोशिश करने वालों की कभी हार नही होतीं’ याप्रमाणे त्यांनी हार न मानता काम चालू ठेवले. त्यांनी त्या माळरानावर राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी बांधली. तेथील जमीन सपाट करून घेतली. जमीन डोंगराच्या पायथ्याशी असल्याने त्यांनी पावसाचे पाणी अडवण्यासाठी चर खोदायला सुरुवात केली. हे सगळे होत असतानाच मालकाच्या शेतातील काम सुरूच होते. दिवसभर मालकाच्या शेतात काम करायचे आणि काम संपले की चर खोदण्याचे काम करणे हे त्यांचे रोजच्या परिपाठाप्रमाणे सुरू होते. हे काम रोज रात्री 9 वाजेपर्यंत चालायचे. अमई महालिंगा नाईक माळरानावर जाताना कापसाच्या वाती आणि रॉकेलची चिमणी घेऊन जायचे. असे करत करत त्यांनी पहिला बोगदा 20 मीटरपर्यंत खोदल्यानंतर तो कोसळला. तब्बल 2 वर्षे खोदण्याचे काम करूनही त्यांच्या हाताला काहीच मिळाले नाही. त्यानंतर सलग सहा वर्षांत असे 4 बोगदे कोसळल्यानंतरही त्यांनी माघार घेतली नाही. मग त्यांच्या नंतरच्या बोगद्याने त्यांच्यापुढे हार मानली आणि तब्बल 30 फूट खोदल्यानंतर बोगद्याला पाणी लागले. परंतु ते पाणी शेतापर्यंत आणण्याचे आव्हान होतेच. मग त्यांनी एक शक्कल लढवली आणि सुपारीच्या खोडाचा पाइपसारखा वापर करून बोगद्यातील पाणी शेतापर्यंत आणले आणि तिथे पाणी साठवण्यासाठी मोठा हौद तयार केला.
सुमारे आठ वर्षांतील तेवीस हजार तासांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले होते. या आठ वर्षांत त्यांना अनेक लोकांनी नावे ठेवली, पण त्यांनी या बोलण्याकडे लक्ष न देता आपले काम केले आणि यामुळे त्यांच्या ओसाड माळरानावर सोने पिकवण्याच्या स्वप्नाला दिशा मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या शेतात सुपारीची, नारळाची आणि काजूची झाडे लावली. हौदातील साठवलेले पाणी शेतासाठी पुरत होते. हेच जिद्दी, मेहनती आणि पाण्याचा मागमूस नसलेल्या ओसाड माळरानावर सोने पिकवून दाखवणारे शेतकरी म्हणजेच आजचे पद्मश्री अलंकृत अमई महालिंगा नाईक. याच जिद्दीच्या जोरावर त्यांच्या शेतात आज 300पेक्षा जास्त सुपारीची, 75 नारळाची झाडे, 150 काजूची झाडे, 200 केळीची आणि काही मिरचीची झाडे आहेत. खोदलेल्या बोगद्याच्या साहाय्याने त्यांनी शेतीसाठी एक नवी सिंचन व्यवस्था शोधून काढलीय, म्हणून ’टनेल मॅन’ म्हणून जगभर त्यांची ओळख निर्माण झालीय. अमई महालिंगा नाईक यांनी जिद्दीने शेतकर्यांसमोर आपल्या कामातून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आज त्यांचे वय 72 वर्षे इतके आहे. आजही अमई महालिंगा नाईक स्वत: शेतातली सगळी कामे करतात आणि सगळी शेती सेंद्रीय पद्धतीने करतात, हे विशेष आहे.
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमधील पुरस्कार सोहळ्यात त्यांना नुकताच कृषी क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण, तंत्रज्ञान, पैसा यांपैकी काहीच जवळ नसताना फक्त मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करता येतात, हे त्यांनी साध्य करून दाखवले आहे. आजच्या काळातील तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही शेतीकडे दुय्यम दृष्टीकोनातून बघणार्या शेतकर्यांसाठी ’अमई महालिंगा नाईक’ हे एक उत्तम उदाहरण आहेत. कृषिप्रधान असणारा आपला देश अमई महालिंगा नाईक यांच्यासारख्या कष्ट करणार्या लोकांमुळे अधिक श्रीमंत होतो आहे. पद्मश्री ’अमई महालिंगा नाईक’ यांच्या कार्याला सलाम आहे. या वेळी कवी बा.भ. बोरकर यांच्या ’लावण्य रेखा’ या कवितेतील ओळी स्मरणात येत आहेत.
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे।