जातीयवादी राजकारणातून मग पवारांनी अस्तित्वात नसलेले विषय निर्माण करून त्याभोवती राजकारण खेळण्याचा प्रयत्न केला. पुणेरी पगडीचा वाद आठवा. छत्रपती आणि पेशवे तुलनेचा वाद आठवा. कोल्हापूरच्या छ. संभाजीराजेंची राज्यसभेवर नियुक्ती या विषयाला ’पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केली’ असे कुत्सितपणे म्हणत देवेंद्र फडणवीसांची जात काढण्याचा प्रयत्न करणे, हे केवळ शरद पवारांनाच जमू शकेल. आजही शरद पवारांचे हे असेच जातीयवादी प्रयत्न सुरू आहेत, कारण राजकारणात पन्नास वर्षांहून अधिक काळ घालवूनही पवारांच्या हाती काहीच लागलेले नाही.
अखेर घाव वर्मी लागलाच. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्याने घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेचा अवकाश व्यापलेला असतानाच दुसरीकडे त्यांच्या दोन भाषणांतून शरद पवार यांच्यावर केलेले शरसंधानदेखील तितकेच महत्त्वाचे ठरले आहे. राज ठाकरे यांनी ठाण्यात भाषण करताच लगेचच शरद पवारांनी ज्या त्वरेने पत्रकार परिषद घेतली व ’राज यांना महत्त्व कशाला द्यायचे?’ असे म्हणत स्वतः मात्र ज्या प्रकारे राज यांच्या टीकेवर स्पष्टीकरणे दिली, ते पाहता राज यांचा वाग्बाण पवारांच्या वर्मी लागला असल्याचे स्पष्ट आहे. आणि याच निमित्ताने पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे राज्याचे लक्ष वेधण्यात राज यांना यश मिळाले, तो मुद्दा म्हणजे शरद पवारांचा जातीयवाद!
गेली जवळपास 55 वर्षे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत, त्यापैकी गेली किमान चाळिसेक वर्षे राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये पवारांची गणना होत आली आहे. शरद पवारांचा वकूब, अभ्यास, अनुभव, राज्याची व राज्याच्या प्रशासनाची जाण याबाबत कुणालाही शंका असण्याचे कारण नाही. महाराष्ट्राचे आजवरचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री असा विक्रमही पवारांच्या नावावर जमा. एवढे होऊनही आज पन्नास वर्षांनंतर या ’शरद पवार ब्रँड’ची ’ब्रँड व्हॅल्यू’ काय आहे? तर कोणतीही तात्त्विक बैठक, विश्वासार्हता, नैतिकता नसणारे, केवळ आणि केवळ सत्तेसाठी केले जाणारे राजकारण म्हणजे शरद पवार. ’पाठीत खंजीर खुपसणे’ हा शब्दप्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात प्रसिद्ध झाला तो पवारांमुळेच. शरद पवारांनी राज्याच्या हितासाठी काय केले? असे विचारल्यास उत्तर देणार्यास बराच विचार करावा लागेल. याच पवारांनी राज्याचे नुकसान कसे केले? असे विचारल्यास मात्र उत्तरकर्ता भलीमोठी यादीच सादर करू शकेल. या यादीत सर्वांत वरचे स्थान पवारांनी खेळलेल्या विखारी जातीयवादी राजकारणास देता येईल.
जातिद्वेषासाठी खोटे बोलणे हा तर पवारांचा गुणधर्मच आणि वयाची ऐंशी वर्षे उलटून गेल्यावरही तो बदललेला नाही. राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना पवारांनी स्व. बाबासाहेब पुरंदरेंबाबत केलेले वक्तव्य याचा ढळढळीत पुरावा आहे. वास्तविक जेम्स लेनने केलेल्या गलिच्छ लिखाणावर बंदी आणण्यात सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे व डॉ. जयसिंगराव पवार, पांडुरंग बलकवडे, निनाद बेडेकर आदी मंडळींनी पुढाकार घेतला होता. त्यांनीच ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडे सातत्याने पाठपुरावा करून जेम्स लेनचे पुस्तक मागे घेण्यास, माफी मागण्यास भाग पाडले होते. परंतु आज शरद पवार काय म्हणताहेत? तर म्हणे जेम्स लेनला गलिच्छ लिखाणासाठी पुरंदरेंनी माहिती पुरवली! याहीपुढे जाऊन पवार काय म्हणतात, तर पुरंदरेंनी शिवचरित्रात जिजाऊ माँसाहेबांचे योगदान न मांडता दादोजी कोंडदेवांचे योगदान मांडले. ज्याने बाबासाहेबांनी लिहिलेले शिवचरित्र संपूर्ण वाचले आहे, अशी एकही व्यक्ती असे तद्दन खोटारडे वक्तव्य करण्यास धजावणार नाही. परंतु शरद पवार बिनदिक्कतपणे अशी विधाने सातत्याने करत असतात, कारण या सगळ्याच्या मुळाशी असलेले जातीचे राजकारण. याच जातीच्या राजकारणातून संभाजी ब्रिगेडसारख्या अनेक विघातक संघटना जन्मास आल्या, त्यांना खतपाणी घातले गेले, छत्रपती शिवरायांना एका जातीपुरते मर्यादित ठेवून राज्यातील सामाजिक वातावरण गढूळ केले गेले. ही फार जुनी गोष्ट नाही, महाराष्ट्राचा गेल्या पंचवीस-तीस वर्षांचा इतिहास आहे आणि या इतिहासातील खलनायक आहेत शरद पवार. पवारांनी या ना त्या कारणाने उपकृत करून ठेवलेली अनेक पत्रकार, लेखक इ. मंडळी पवारांना ’चाणक्य’, ’भीष्म’ वगैरे उपमा देत असली, तरी पवारांचा हा इतिहास महाराष्ट्राने आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. तो काहीही केले तरी पुसता येण्यातला नाही.
याच जातीयवादी राजकारणातून मग पवारांनी अस्तित्वात नसलेले विषय निर्माण करून त्याभोवती राजकारण खेळण्याचा प्रयत्न केला. पुणेरी पगडीचा वाद आठवा. छत्रपती आणि पेशवे तुलनेचा वाद आठवा. कोल्हापूरच्या छ. संभाजीराजेंची राज्यसभेवर नियुक्ती या विषयाला ’पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केली’ असे कुत्सितपणे म्हणत देवेंद्र फडणवीसांची जात काढण्याचा प्रयत्न करणे, हे केवळ शरद पवारांनाच जमू शकेल. आजही शरद पवारांचे हे असेच जातीयवादी प्रयत्न सुरू आहेत, कारण राजकारणात पन्नास वर्षांहून अधिक काळ घालवूनही पवारांच्या हाती काहीच लागलेले नाही. ना त्यांचा पक्ष साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर जाऊ शकला, ना खुद्द पवार आपल्या विश्वासघातकी, जातीयवादी या प्रतिमेतून बाहेर येऊ शकले. आजही पवारांचे शागिर्द त्यांची यूपीए अध्यक्ष म्हणून नेमणूक करू पाहतात, त्यावर काँग्रेसवाले ढुंकूनही पाहत नाहीत. मग पवारांनाच सांगावे लागते की मला यूपीए अध्यक्ष व्हायचेच नाही! त्यामुळे कारकिर्दीच्या उताराच्या काळातही पवारांच्या हाती एकच हत्यार शिल्लक आहे, ते म्हणजे जात आणि जातीचे राजकारण. राज ठाकरेंनी नेमके याच जातीयवादावर शरसंधान केल्याने हा घाव वर्मी लागला आणि त्यातूनच मग लगबगीने खुलासे करायला, त्यातून नवे जातीय वाद उकरून काढायला शरद पवार पुढे सरसावले.