डॉ. हेडगेवार आजच्या संदर्भात

विवेक मराठी    01-Apr-2022   
Total Views |
महापुरुषाचे विचार कालातीत असतात. संघसंस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार त्याला अपवाद नाहीत. सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही काळाच्या कसोटीवर टिकतात. आजच्या संदर्भात आपण जेव्हा डॉक्टर हेडगेवार यांच्या संघमंत्राचे अवलोकन करतो, तेव्हा डॉक्टर कालदर्शी होते हे लक्षात येते. चैत्र शुद्ध प्रतिपदा या त्यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण.

RSS

वर्षप्रतिपदा... गुढीपाडवा म्हणजे संघसंस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची तिथीनुसार जयंती. डॉक्टर हेडगेवारांनी स्थापन केलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शंभरीकडे वाटचाल करीत आहे. या प्रदीर्घ काळात संघस्वयंसेवकांनी हिंदू आणि राष्ट्र या दोन शब्दांना सन्मुख ठेवून वाटचाल केली आहे. शककर्ता शालिवाहनाने जसे मातीच्या बाहुल्यांमध्ये प्राण भरले आणि परचक्र उलटवून लावले, अगदी तसेच डॉक्टर हेडगेवारांनी ‘जगायचे कसे? आणि कशासाठी?’ या विषयाचा प्राणमंत्र दिला. त्यांनी कृती केली आणि त्यानुसार विचार मांडला. डॉक्टर हेडगेवार हे क्रांतदर्शी होते. त्यांनी भूतकाळ अभ्यासला होता आणि भविष्य कसे असायला हवे याचे चिंतनही केले होते. डॉक्टर हेडगेवार यांच्या जयंतीच्या आधी काही दिवस ‘झुंड’, ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘पावनखिंड’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. हे तिन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समाजमाध्यमांतून आणि राजकीय, सामाजिक व्यासपीठावर जो धुरळा उडू लागला, तो पाहताना डॉक्टर हेडगेवार यांची दूरदृष्टी अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही.

कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच )

सा. विवेकने 2025 पर्यंत दर चार महिन्यांनी पाच कर्तव्यभूमीच्या पुजार्‍यांच्या कार्याचा संच प्रकाशित करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्वरूपात संघ काम करणार्‍या दिवंगत संघ स्वयंसेवकाच्या कामाचा परिचय करून देणार्‍या पुस्तिका प्रकाशित होणार आहेत.
https://www.vivekprakashan.in/books/book-of-the-work-rashtriya-swayamsevak-sangh-swayamsevak/

 
 
काश्मीर, काश्मिरी पंडित, त्यांचे विस्थापन आणि हत्याकांड यांची संगतवार मांडणी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात पाहायला मिळते आणि हे दाहक चित्र पाहताना प्रश्न पडतो की ही स्थिती का निर्माण झाली? काश्मीरमधील हिंदूंना क्रूर हत्याकांडाला का सामोरे जावे लागले? भारताचे नंदनवन असलेल्या भूभागातून पलायन का करावे लागले? या प्रश्नांचे उत्तर आहे आपण आपली ओळख विसरलो. आपली संस्कृती विसरलो, फुटीरतावादाचे आपण शिकार झालो. असंघटित झालो. हिंदू म्हणून आपण संघटितपणे उभे राहू शकतो नाही. एकात्मता विसरलो. हातीचे शस्त्र गळून पडले. अर्थात हे सारे एका दिवसात घडले नाही. दीर्घकाळ आपण आपली अस्मिता आणि राष्ट्रीयत्व विस्मृतीच्या रोगाचे शिकार झालो आणि एका दिवसात काश्मीरमधील हिंदू बेदखल झाले. जे मूठभर होते, त्यांच्या पाठीशी राजसत्ता स्वार्थासाठी उभी राहिली आणि बहुसंख्य परागंदा झाले. आपण आपला इतिहास विसरलो, पुरुषार्थ विसरलो हेच यामागचे कारण आहे. ही परिस्थिती कशी बदलणार? काय उत्तर आहे या समस्येचे? डॉक्टर हेडगेवार म्हणतात, ‘आपणात राष्ट्रीयत्व उप्तन्न करून हिंदू हे एकराष्ट्रीय आहेत व हिंदू समाजाशी निगडित असे त्यांचे संबंध आहेत, हे शास्त्रीयदृष्ट्या समजून घेऊन प्रत्यक्ष कामाला लागावयाचे आहे. राष्ट्ररूपी व समाजरूपी विराट पुरुषाचे कल्याण हेच आपले ध्येय आहे. ज्याप्रमाणे हाताचे बोट शरीरापासून अलग केले असता स्वतंत्रपणे वावरू शकत नाही, त्याप्रमाणे व्यक्तींचेही आहे. शरीराच्या अंताप्रमाणेच जर एखादी व्यक्ती समाजापासून अलग राहू लागली, तर ती मृतवत बनेल. समाजावाचून व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, म्हणून समाज सुखी असेल तर ती व्यक्ती सुखी, ही भावना ठेवून आपण आपल्या हिंदू समाजाच्या संरक्षणाच्या कार्यास झपाट्याने सुरुवात केली, तर याचि देही याचि डोळा तो परमभाग्याचा दिवस आपण पाहू शकू.’ 19 जानेवारी 1990च्या रात्रीपासूनच संघस्वयंसेवक कार्यरत झाले आणि त्यांनी काश्मीरमधून हाकलले गेलेल्या हिंदू बांधवांना मदत केली. विस्थापित बांधवांच्या निवार्‍याची सोय केली. शिक्षण, नोकरी इत्यादीसाठी व्यवस्था निर्माण केली. ज्या श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवून दाखवा अशी धमकी दिली, तेथे जाऊन तिरंगा फडकवणारा संघस्वयंसेवक आज देशाचा पंतप्रधान आहे. घटनेच्या ज्या कलमामुळे फुटीरतावादी विचार बळावले, ते 370 कलमही रद्द झाले. एक देश, एक निशाण, एक प्रधान ही घोषणा प्रत्यक्षात आली. आपण एक आहोत, एका राष्ट्राचे अविभाज्य घटक आहोत, राष्ट्र आणि समाज हे वेगळे नाहीत तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हा भाव डॉक्टर हेडगेवारांनी जागवला आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी संघस्वयंसेवकांनी आपापल्या क्षेत्रात काम केले.
 

RSS 
 
‘पावनखिंड’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचे कथानक सर्वपरिचित आहे. बाजीप्रभू देशपांडेेंच्या आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची कथा पाहतानाही डॉक्टर हेडगेवारांचा संदेश आठवत राहतो आणि पुन्हा हिंदू व राष्ट्र याच दोन गोष्टी प्रकर्षाने समोर येतात. स्वराज्यासाठी, भगव्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा शिवा काशिद, रायाजी, कोयाजी, फुलाजी प्रभू, बाजीप्रभू हे डॉक्टर हेडगेवारांनी दिलेल्या संदेशाची पुन्हा पुन्हा आठवण करून देतात. डॉक्टर हेडगेवार म्हणतात, ‘ही आमची मातृभूमी आहे, तिचे नाव बदलण्याचा कोणासही हक्क नाही. ज्याप्रमाणे इंग्लंड इंग्रजांचा, फ्रान्स फ्रेंचांचा, जर्मनी जर्मनांचा, त्याचप्रमाणे हिंदुस्थान हिंदूंचा! अनादिकाळापासून हा देश आमचा आहे व पुढेही आमचाच राहणार. जोपर्यंत हिंदू रक्ताचा एक पुरुष जिवंत आहे, तोपर्यंत या देशावर अन्य कोणाचीही मालकी असणे शक्य नाही.’ (संदर्भ - भागीरथीच्या प्रवाहात - 1935 साली पुण्याच्या बौद्धिक वर्गातील डॉ. हेडगेवारांचे बौद्धिक.) स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्याला मरणाला कवटाळून पाय रोवून उभे रहायचे आहे, तरच स्वराज्य टिकेल, मातृभूमीवर परकीयांचा वरंवटा फिरणार नाही, हे त्या वीरांनी जाणले आणि स्वराज्यासाठी ते पावनखिंडीत धारातीर्थी पडले. इतिहासात अमर झाले. आज आपल्याला हाती तलवार घेऊन लढाई करण्याची आवश्यकता नसली, तरी समाजमाध्यमावर लढाई टाळता येऊ शकत नाही. हा देश, हा समाज विखंडित व्हावा यासाठी अनेक मार्गांनी आक्रमण सुरू आहे. खोटा इतिहास, खोट्या आख्यायिका यांच्या आधारे जातवाद वाढीस लावला जातो. जातीजातीत तेढ वाढवली जाते. महापुरुषांचे जातीकरण होते आहे. भूतकाळात झालेल्या अन्यायाचा बदला वर्तमानकाळात घेण्याच्या वल्गना केल्या जातात. अशा वेळी आपली भूमिका काय असायला हवी? या भूमीचा गौरवशाली इतिहास, आपल्या पूर्वजांचा दिव्य वारसा आणि सर्वाभूती ईश्वर पाहणार्‍या सनातन धर्माचा तत्त्वाधार यांच्या आधारे ही लढाई लढावी लागणार आहे. आपण एक आहोत, हिंदू आहोत हा भाव जागवणारा मंत्रघोष आपल्याला उच्चरवाने करावा लागेल. हा देश विखंडित व्हावा, इथली सनातन संस्कृती मातीमोल व्हावी यासाठी नव्या नव्या स्वरूपात दररोज आक्रमण होते, तेव्हा डॉक्टर हेडगेवार यांनी सांगिलेल्या संघसूत्राचे नित्य स्मरण आवश्यक होते.
  
 आपण एक आहोत, हिंदू आहोत हा भाव जागवणारा मंत्रघोष आपल्याला उच्चरवाने करावा लागेल. हा देश विखंडित व्हावा, इथली सनातन संस्कृती मातीमोल व्हावी यासाठी नव्या नव्या स्वरूपात दररोज आक्रमण होते, तेव्हा डॉक्टर हेडगेवार यांनी सांगिलेल्या संघसूत्राचे नित्य स्मरण आवश्यक होते.
डॉक्टर हेडगेवार म्हणतात - ‘होय, हे हिंदू राष्ट्र आहे’, तेव्हा ते केवळ धर्माच्या संदर्भात बोलत नाहीत. संस्कृती, संस्कार, परंपरा, जीवनपद्धती, भाषा, उपासना, प्रदेश अशा सर्वच गोष्टी त्यात सामावलेल्या असतात. मात्र वरील गोष्टींना पुढे करून आपल्या स्वार्थासाठी काही मंडळी भेद निर्माण करतात, त्याला धर्माचे अधिष्ठान प्राप्त करून देतात. परिणामी आपला समाज क्षतिग्रस्त होतो. जातिभेद, अस्पृश्यता, उच्चनीचता अशा अनेक व्याधी समाजाला जडतात. या व्याधीतून मुक्त झाल्याशिवाय हिंदू समाज बलशाली होणार नाही, राष्ट्र समर्थ होणार नाही, हे डॉक्टर हेडगेवारांनी ओळखले आणि त्यांना व्याधिमुक्त होण्याचा मार्ग सांगितला. ते म्हणतात, “आपले कार्य समग्र हिंदू समाजाचे असल्यामुळे त्याच्या कोणत्याही अंगाची उपेक्षा करून चालणार नाही. सार्‍या हिंदू बांधवांशी - मग ते कोणत्याही उच्च वा नीच श्रेणीचे का असेनात, प्रत्येकाशी आमचा व्यवहार प्रेमाचाच असला पाहिजे. कोणत्याही हिंदू बांधवाला नीच समजून त्याला दूर लोटणे पाप आहे.” डॉक्टर हेडगेवारांनी सांगिलेला मार्ग आज ‘समरसता’ म्हणून ओळखला जातो. सामाजिक समरसतेचा एक आयाम ‘झुंड’ चित्रपट प्रेक्षकासमोर ठेवतो, तो आहे संधीचा, तो आहे मन स्वच्छ करून भ्रातृभावाची अनुभूती देण्याचा. बकाल वस्तीतील अथांग ऊर्जेला दिशा दिली, संधी दिली तर काय घडते याचे दर्शन झुंड चित्रपटात होते. व्यवस्थेने नाकारलेल्या, परिस्थितीने नाडलेल्या, शिक्षण, संस्कार यापासून कोसो दूर असलेल्या एका मोठ्या समूहाची ओळख गलिच्छ वस्ती अशी असते. ती बदलून चैतन्यशील, उद्यमशील आणि यशाचा मार्ग पादाक्रांत करणारी ऊर्जावान वस्ती करण्यासाठी केवळ संधी आणि पाठराखण यांची गरज असते. संधी कधी दिली जाते? पाठराखण कधी केली जाते? या प्रश्नांची उत्तरे आपलेपणा आणि बंधुभाव यांच्या आत्मीय व्यवहाराशी जोडली आहेत. परिस्थिती बदलली, साधनसामग्री वाढली तरी सामाजिक दरी कायम आहे. कारण ही दरी लिंपण्यासाठी आवश्यक असणार्‍या बंधुभावाचा, आत्मीय भावाचा अभाव आहे. डॉ. हेडगेवार याच अभावाच्या मुळाशी जाऊन तो दूर करणारा मंत्र देतात. समग्र हिंदू समाजाचे हित ज्यात आहे, त्या बंधुतेचा आग्रह धरतात.


RSS 
 
 

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001