निर्धाराचं दुसरं नावलेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर

विवेक मराठी    07-Mar-2022   
Total Views |
सर्वात आधी त्यांचं शालीन सौंदर्य लक्ष वेधून घेतं. मग जेव्हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी तपशिलात ऐकतो, तेव्हा लक्षात येतं की या शालीन सौंदर्याभोवती एक आभा आहे. ती आहे त्यांच्या प्रखर बुद्धीची, निर्धारी स्वभावाची आणि अंतर्बाह्य उमललेल्या प्रसन्नतेची... आणि त्यांच्या बोलण्यातून हेही समजतं की, प्रवास कितीही खडतर असला, तरी निर्धार पक्का असेल तर यशाला गवसणी घालता येते आणि कर्तृत्वाची नवनवीन शिखरं सर करायची ऊर्मीही जागृत राहते. तिला वयोमर्यादेचंही कुंपण आड येत नाही.
 
सैन्यदलातल्या लेफ्टनंट जनरल या सर्वोच्च पदावरून निवृत्ती घेतल्यानंतर डॉ. माधुरी कानिटकर आता महाराष्ट्रात परतल्या आहेत. नाशिक इथे असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. जागतिक महिला दिन विशेषांकानिमित्ताने त्यांची भेट घेतली. धावता का होईना, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून घेतला. या भेटीची, त्यातल्या संवादाची झलक म्हणजे हा लेख.
 
 
madhuri
 
प्रखर बुद्धीच्या बळावर वैद्यकीय शिक्षणात मिळवलेलं उत्तुंग आणि सातत्यपूर्ण यश आणि महाविद्यालयाच्याच वरिष्ठांनी सैन्यदलात जाण्याऐवजी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा दिलेला सल्लाही त्या विशीतल्या तरुणीचं मन वळवू शकला नाही. सैन्यात जायचं, भारतमातेच्या सेवेसाठी आपलं आयुष्य पणाला लावणार्‍या सैनिकांसाठी डॉक्टर म्हणून आपली सेवा द्यायची हा तिचा निर्धार होता. या निर्धाराला कारणीभूत ठरल्या दोन गोष्टी - पहिली म्हणजे, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजला (ए.एफ.एम.सी.ला) मैत्रिणीसमवेत दिलेली भेट. तिथली शिस्त, अभ्यास, खेळ आणि अन्य गोष्टींना असलेलं पोषक वातावरण पाहून ती प्रभावित झाली. तेव्हापासून डॉक्टर होऊन, देशासाठी प्राणपणाने लढणार्‍या सैनिकांना सेवा द्यायची, असा तिने मनोमन निश्चय केला. त्या रुबाबदार वर्दीनेही तिचं मन काबीज केलं होतं. त्या वर्दीत ती स्वत:ला पाहू लागली होती. म्हणूनच सी.बी.एस.ई. बोर्डाच्या परिक्षेत फिजिक्स-केमिस्ट्री-बायोलॉजी या तिन्ही विषयांत भारतभरात अव्वल येऊनही आणि पुण्यातल्या बी.जे. मेडिकल कॉॅलेजमध्ये प्रवेश सहजशक्य (खरं तर स्वागतच!) असतानाही तिने ठरवल्याप्रमाणे, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.. तोही आईवडिलांचा रोष पत्करून. घरीदारी कोणीही सैन्यदलात नसताना तिला मात्र या खडतर वाटेचे वेध लागले होते. तिथल्या सेवेच्या अन् पराक्रमाच्या संधीची तिला ओढ लागली होती.


women
 
आणि या वज्रनिश्चयामागचं दुसरं कारण मात्र अतिशय नाजूक होतं. त्या फूलपाखरी वयाला शोभेलसं. तेव्हा ही सौंदर्यवती ज्याच्या प्रेमात पडली होती, तो सैन्यात दाखल होणारा रुबाबदार, तडफदार युवक होता. सैन्य हेच त्याची पॅशन होती, मिशन होतं. अशा युवकाला साथ द्यायची ती केवळ सहचरी बनून नाही, तर त्याच्याबरोबर प्रत्यक्ष देशसेवेतल्या सहभागाची सप्तपदी चालून, हे तिने ठरवलं होतं.
 
ए.एफ.एम.सी.मध्ये प्रवेश घेताना एक बाँड लिहून द्यावा लागतो. तिथे शिकल्यानंतर जर सैन्यदलात सामील व्हायचं नसेल तर पैसे भरावे लागतात. “ज्या कारणासाठी तू या कॉलेजला प्रवेश घेते आहेस, पदवी मिळाल्यानंतर त्या विचारापासून मागे हटायचं नाही. उद्या तुला सैन्यात दाखल व्हावं असं वाटलं नाही, तर मी पैसे भरणार नाही.” वडिलांनी बजावलं. खरं तर तिला परावृत्त करण्याचा तो आणखी एक प्रयत्न केला. पण ती ठाम होती. “असं काही होणार नाही.” तिने वडिलांना हमी दिली. एम.बी.बी.एस.च्या तिन्ही परीक्षांमध्ये पहिला क्रमांक पटकावत शेवटच्या वर्षी सुवर्णपदकाची मानकरी ठरली, तरीही ती निश्चयापासून ढळली नाही. “तुमच्या मुलीच्या बुद्धीला न्याय मिळेल असा स्कोप सैन्यात मिळणार नाही. तेव्हा तिला उच्च शिक्षण घ्यायचं असेल किंवा परदेशी पाठवायचं असेल, तर पुन्हा विचार करा.” कॉलेजच्या डायरेक्टरनी वडिलांना बोलावून सांगितलं. “ती हट्ट करून इथे आली आहे. त्या वेळीच मी पैसे भरणार नाही असं तिला बजावलं होतं. तरीही बाहेर शिकायची तिची इच्छा असेल तर मी माझे शब्द मागे घ्यायला तयार आहे.” वडील म्हणाले. पण तिला पुनर्विचार करावासा वाटला नाही. जीवनसाथीच्या जोडीने देशसेवा करण्याचं जे स्वप्न तिनं रंगवलं होतं, त्या स्वप्नाची वीण कोणत्याही प्रलोभनाने उसवली जाणार नव्हती.
 
 
पदवीचं शिक्षण पूर्ण होताच दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली, ठरल्याप्रमाणे राजीव कानिटकर या सैन्याधिकार्‍याशी विवाह आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून सैन्यदलात प्रवेश. (गुणवत्ता आणि क्षमता कितीही असली, तरी मुलींसाठी तेव्हा सैन्यात दाखल होण्याचा हा एकच पर्याय होता.)
  
विवाहानंतर बराच काळ एकमेकांपासून दूर राहत, पण मनाने परस्परांना साथ देत केलेला प्रवास म्हणजे कानिटकर दांपत्याचं सैनिकी वातावरणातलं सहजीवन. अतिशय अनोखं आणि प्रेरकही.
 

ka
 
सैन्यदलात कार्यरत असणार्‍या पतिपत्नींना एकाच वा जवळच्या गावी पोस्टिंग देणं अपेक्षित असलं, तरी ते मिळण्याची शक्यता धूसर असते. या वस्तुस्थितीला कानिटकर दांपत्याला लग्नानंतर लगेचच सामोरं जावं लागलं. हे सांगताना जनरल कानिटकर म्हणाल्या, ""As far as possible असं म्हटलं जात असलं, तरी, प्रत्यक्षात मात्र ते as f...a....r as possible असं असतं, याची आम्हांला जाणीव झाली. सैन्यदलातल्या छत्तीस वर्षांपैकी चोवीस वर्ष आम्ही एकमेकांपासून दूर होतो. मुलं माझ्याजवळ आणि राजीव त्यांच्या पोस्टिंगच्या गावी, असा आमचा संसार चालू असे.” हे सांगणं सहज असलं, तरी तेव्हा या वास्तवाचा स्वीकार करणं जड गेलं. सैन्यात काम करायचं ते राजीव यांच्या बरोबरीने, हाही अंत:स्थ हेतू होता, तो मात्र लांबलांबच्या पोस्टिंगमुळे सफल होत नव्हता. मग मन उदास होई. सोडून द्यावी नोकरी असंही एखाद्या हळव्या क्षणी मनात येऊन जाई. तेव्हा राजीव त्यांना समजावायचे, “तू सैन्यात येण्यासाठी घरच्यांशी भांडलीस, पण जिद्द सोडली नाहीस. सैन्यदलात काम करणं हेच माझंही जीवनध्येय आहे. तेव्हा आपण दोघांनी सैन्यातच राहायचं. Let us grow together, without growing apart. तू जर राजीनामा देऊन घर सांभाळत राहिलीस, तर तुझ्या हुशारीचा उपयोग काय होणार? मला त्याचं वाईट वाटेल. आणि ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी बाहेर पडायचं ठरवलंस तरी आपल्याला एकमेकांपासून दूरच राहावं लागेल. मग आहे तेच स्वीकारून पुढे जाऊ. आपण यावर उपाय शोधत राहू.” याने डॉ. माधुरींची समजूत पटली. मग त्यांनी परमनंट कमिशन घेऊन सैन्यदलात प्रवेश केला.


वैवाहिक सुखाचा त्याग जसा त्या दोघांना करावा लागला, तसा मुलांनाही बराच काळ बाबांचा सहवास मिळू शकला नाही. यावर जनरल माधुरी म्हणाल्या, “आमच्या सर्व्हिसच्या या कालखंडात मुलांना जी तडजोड करावी लागली, ती खूप मोठी आहे. त्यांचाही त्यागच होता तो. आमच्या कामाचं महत्त्व कळण्याचं त्यांचं वय नव्हतं. साहजिकच घरात बाबा हवेसे वाटत. बाबांच्या आठवणींनी ती व्याकूळ होत. अनेकदा खट्टू होत. आपलं घर असं का आहे, हे न समजून रागवायचीही आमच्यावर.

 
सर्व्हिसमधली आव्हानं वेगळी होती आणि आई म्हणून, पालक म्हणून असलेली वेगळी. मुलांची समजूत काढणं ही अनेकदा सत्त्वपरीक्षाच असायची. एक प्रसंग आठवतोय - 90च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात काश्मीरमध्ये बारामुल्ला भागात दहशतवादाने उग्र रूप धारण केलं होतं. राजीवचं पोस्टिंग तिथे होतं. त्या वेळी मोबाइल्स नव्हते आणि बाकीच्या टेलिफोन लाइन्स कट केलेल्या होत्या. तेव्हा आठवड्यातून एकदा अगदी काही मिनिटांसाठी त्यांचा खुशालीचा फोन यायचा. त्या वेळी मी खडकीच्या मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये होते. घरी आल्यावर मी मुलांना बाबांची खुशाली सांगायचे. एकदा हे सांगितल्यावर मुलगी रडायला लागली. काय झालं विचारल्यावर ती मुसमुसत म्हणाली, "Baba doesn't love us. ते आमच्याशी कधीच बोलत नाहीत, फक्त तुझ्याशीच बोलतात. आपल्या घरी पण फोन आहे ना?” बाबा सिव्हिल फोनवर बोलू शकत नाहीत, हे कळण्याचं तिचं वय नव्हतं. असं काही घडलं की माझ्यातल्या आईला वाईट वाटत असे. पण या वातावरणात त्यांना वाढवावं लागल्याने त्यांच्यावर जबाबदारीही खूप लवकर पडत गेली. त्यातून आज ती दोघंही पूर्णपणे स्वावलंबी, स्वतंत्र विचारांची आणि कणखर बनली आहेत, ज्याचा आईवडील म्हणून आम्हां दोघांनाही अभिमान आहे. आनंद आहे.”
 
हम साथ साथ है!
भारतीय सैन्यदलातले लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजीव कानिटकर आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर हे एकमेव भारतीय जोडपं ज्यांनी आपापल्या शैक्षणिक संस्थांमधून सुवर्णपदक मिळवून सैन्यदलात प्रवेश केला. राजीव कानिटकर यांना सैन्यातले परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक असे सर्व मानाचे पुरस्कार मिळाले, तर डॉ. माधुरी कानिटकर यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक हे पुरस्कार मिळाले आहेत. असे पुरस्कार मिळवणारं आणि लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त होणारं फक्त भारतातलंच नव्हे, तर पूर्ण कॉमनवेल्थमधलं एकमेव दांपत्य आहे.


madhuri


बालरोगतज्ज्ञ म्हणून स्पेशलायझेशन केलेलं असल्याने डॉ. माधुरी कानिटकर यांचं पोस्टिंग मोठ्या शहरांतून होत असे. आर्म्ड फोर्समध्ये डॉक्टरांना अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कामंही करावी लागतात आणि रिलीव्हर आला नाही की एखाद्या ठिकाणचा कालावधीही अचानक वाढू शकतो. अशा प्रसंगी मुलांच्या शाळांचा कालावधी लक्षात घेऊन, पोस्टिंगमुळे त्यांचं शालेय वर्ष बुडू नये यासाठी डॉ. माधुरी पोस्टिंगच्या ठिकाणी काही फेरबदल करण्याची विनंती करत. ती मान्य होई. राजीव यांना मात्र देशाच्या कानाकोपर्‍यात जावं लागे. त्यातल्या अनेक गावांची नावं आधी ऐकलेली नसत आणि सुट्टीच्या काळात मुलांना तिथवर घेऊन जायचं, तर तो प्रवासही फार खडतर असे. “मुलगा मोठा झाल्यावर मात्र सततच्या घर बदलाला कंटाळून आजीआजोबांकडे पुण्याला शिकायला गेला. मग मी आणि मुलगी पठाणकोटला, राजीव हिस्सारला आणि मुलगा पुण्यात अशी त्रिस्थळी यात्रा सुरू झाली.” सैन्यातील वातावरणाचं खूप गोडगुलाबी, आकर्षक चित्र आपल्याकडच्या चित्रपटांमधून वा कथा-कादंबर्‍यांमधून रंगवलेलं असतं. सैन्यातलं आयुष्य म्हणजे पार्टी, मौजमजा याची रेलचेल असलेलं असा समज करून देणारं असतं. वास्तवात चित्र किती वेगळं असतं, याची जाणीव डॉ. माधुरी यांच्या बोलण्यातून होत होती.

 
सैन्यदलातल्या सेवाकाळात डॉ. माधुरी यांची जशी वेगवेगळ्या आर्मी हॉस्पिटल्समध्ये नियुक्ती झाली, तशी त्यांच्या आवडत्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित काम करायची संधीही चालून आली. तीही जिथे त्यांनी विद्यार्थी म्हणून अतिशय उज्ज्वल यश मिळवलं, त्या ए.एफ.एम.सी. कॉलेजात. या कॉलेजची डीन म्हणून त्यांची नेमणूक झाली. कोणत्याही व्यक्तीसाठी ही अतिशय आनंदाची, अभिमानाची गोष्ट. डॉ. माधुरीही त्याला अपवाद नाहीत. बोलण्याच्या ओघात या टप्प्यावरच्या आठवणी येणं साहजिकच होतं. त्या म्हणाल्या, “मी विद्यार्थी होते, तेव्हा प्रोफेसर युनिफॉर्ममध्ये येतात, स्टाफ कारमधून जातात ज्यावर एक स्टार प्लेट आहे, एक झेंडा असतो हे आम्ही पाहिलं होतं. त्या रुबाबाचा त्या वेळी खूप हेवा वाटे. आणि डीन असलेल्या व्यक्तीची भीतीही. कारण काही चूक घडली, तरच विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑफिसमधून बोलावणं येत असे. मग भीतीने, दडपणाने गळून जायला व्हायचं. जेव्हा माझी नियुक्ती झाली, तेव्हा हे सगळं आठवलं. त्यातली जबाबदारी लक्षात आली. इथे डीन म्हणून करण्यासारखं खूप काम आहे, याचीही जाणीव झाली. विद्यार्थी म्हणून संस्थेकडे पाहण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे मला विद्यार्थ्यांना काय अपेक्षित असेल तेदेखील समजत होतं. त्याचा खूप फायदा झाला. माझ्या कारकिर्दीतलं अतीव समाधान दिलेल्या पोस्टिंगमधलं हे एक...” त्यांचं शिक्षणप्रेम अधोरेखित करणारे हे उद्गार होते.
सैन्यदलातलं काम म्हणजे आव्हानांची मालिकाच असते. मात्र सीमेवर ज्या आव्हानांचा सामना सैन्यदलाला करावा लागतो, त्याच्या तुलनेत मिलिटरी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करताना कमी आव्हानं वाट्याला येतात, असं जनरल कानिटकर यांच्या मनात येई आणि त्याबद्दल मनाच्या कोपर्‍यात थोडं असमाधान असे. “सैन्यात एकाच वेळी मी फौजी होते, डॉक्टर होते आणि प्राध्यापकही होते. डॉक्टर म्हणून पहिली पेडियाट्रिक्स नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून काम करायला मिळालं आणि त्या कामाबद्दलचे सर्व मानसन्मानही. नागरी सन्मानही प्राप्त झाला. ए.एफ.एम.सी.मध्ये डीन म्हणून काम करायची मिळालेली संधी माझ्यातल्या प्राध्यापकाचं समाधान करून गेली. मात्र माझ्यातला फौजी अजून म्हणावा तसा समाधानी नव्हता. म्हणून मी डीननंतर लेफ्टनंट जनरल म्हणून पोस्टिंग मिळण्याच्या मधल्या काळात मला नॉर्दर्न कमांड द्या अशी मागणी केली. “तुला गंमत वाटतेय का? ते काम सोपं नाही,” असं डायरेक्टर जनरल म्हणाले. त्यावर... सर, मी कधी सोपं काम मागितलंच नाही, असं मी म्हटलं. मग लष्कराचं एक मुख्य ठाणं असलेल्या उधमपूर इथे नॉर्दर्न कमांड हेडक्वार्टरमध्ये मी रुजू झाले. त्याच वेळी कलम 370 रद्द केल्यामुळे या भागात अस्वस्थता होती. सैन्य मोठ्या प्रमाणावर बोलावण्यात आलं होतं. सगळीकडे शटडाउन करावं लागल्याने जनजीवन ठप्प होतं. श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर दगडफेक चालू होती. जखमींची संख्याही मोठी होती. ऑक्सिजनचा तुटवडा भासायला लागला होता. या सगळ्या पुरवठ्याची व्यवस्था पाहायची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे या परिस्थितीत अगदी सियाचेन पोस्टपासून एकेका लष्करी हॉस्पिटलला मी भेटी दिल्या. त्या त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेत, तातडीने निर्णय घेत आव्हानं पार पाडली. या कामाने मला आगळं समाधान दिलं. जवळजवळ 11 महिने मी तिथे होते. कलम 370 रद्द झाल्यामुळे झालेल्या गोंधळानंतर लष्कराच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना घडली. अशा घटनांमुळे जखमींची संख्या प्रचंड होती. तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करून मी कायमस्वरूपी उपाय योजण्यावर भर दिला. टेलिमेडिसिनचा प्रयोग यशस्वीरित्या राबवला.” एका आव्हानात्मक कामातून त्यांच्यातल्या फौजीला मिळालेलं समाधान माझ्याशी बोलतानाही त्यांच्या डोळ्यात दिसत होतं.
 

madhuri 

 
डॉ. माधुरी कानिटकर सैन्यात दाखल झाल्या, तेव्हा महिलांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन हा एकमेव पर्याय होता. मात्र ट्रेनिंग मिळायचं ते मात्र परमनंट कमिशन घेऊन दाखल होणार्‍या पुरुष अधिकार्‍यासारखंच. त्यात डावं-उजवं नव्हतं. फरक होता तो, सर्व्हिसच्या कालावधीत आणि त्यामुळे मिळणार्‍या (खरं तर हुकणार्‍या) संधीत. याबाबत सांगताना त्या म्हणाल्या, “पहिली शॉर्ट सर्व्हिस कमिशन संपल्यावर मी परमनंट कमिशनसाठी अर्ज केला. तेव्हा मला परमनंट कमिशन मिळालं, पण मी मेरिटनुसार वर असूनही मला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागली. आता मात्र बदलाचे वारे वाहताहेत. महिलांना अनुकूल असे बदल हळूहळू पण निश्चितपणे घडताहेत. त्याचं स्वागत करायला हवं. हळूहळू जेंडर न्यूट्रॅलिटी येते आहे. एन.डी.ए.मध्ये मुलींना खुला झालेला प्रवेश हे त्याचंच प्रतीक आहे.
 
 

अर्थात, हे बदल घडत असले, तरी आतापर्यंत पुरुषी वर्चस्व असलेलं हे क्षेत्र होतं, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्याचंच प्रतिबिंब इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर पडलेलं आहे. म्हणूनच सैन्यात दाखल होत असलेल्या महिलांना आजही काही अडचणींचा सामना करावा लागतो. कारण महिलांसाठी काय सुविधा उभारायला हव्यात याबाबत इथले अधिकारी अनभिज्ञ होते. त्यामुळे शासनही सैन्यात मुलींची भरती हळूहळू करत आहे. त्यामुळे पोस्टिंगच्या ठिकाणी महिलांसाठी आवश्यक अशा मूलभूत सोयीसुविधा निर्माण करायला वेळ मिळेल.”
उधमपूरनंतर डॉ. माधुरी कानिटकर लेफ्टनंट जनरल या लष्करातील सर्वोच्च पदावर नियुक्त झाल्या. आतापर्यंत फक्त तीन जणींना हा बहुमान मिळाला आहे, त्यापैकी डॉ. कानिटकर तिसर्‍या आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या पहिल्या लष्करी अधिकारी. त्या दोन वर्षांच्या कालावधीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “लेफ्टनंट जनरल झाल्यानंतर, पहिले सीडीएस बिपीन रावत सर यांच्या कार्यालयात डेप्युटी चीफ मेडिकल म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. तोवर मी पार पाडलेल्या जोखमीच्या आणि महत्त्वाच्या जबाबदार्‍यांसमोर हे पद फारसं आव्हानात्मक नव्हतं. आमच्या डायरेक्टर जनरलनाही वाईट वाटलं. सर वाईट वाटून घेऊ नका. माझ्याकडे काम नसलं तर ते मला शोधत येतं. किंवा मी शोधून काम करते, असं मी त्यांना सांगितलं. आणि तसंच घडलं. त्यानंतर आलेल्या कोविडच्या आपत्तीत तिन्ही दलांसाठीचं आपत्ती व्यवस्थापन हे ट्राय सर्व्हिसेसकडे होतं. त्याची सूत्रं बिपीन रावत सरांनी माझ्यावर सोपवली. फक्त 15 दिवसांत हजार बेड्सचं हॉस्पिटल डीआरडीओच्या मदतीने उभं केलं. याच काळात रेल्वेबरोबर काम करायला मिळालं. दुसर्‍या लाटेत जेव्हा पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा पुन्हा बिपीन रावत सरांनी, ‘ये हो जाना चाहिए’ एवढंच सांगितलं. हा त्यांचा माझ्यावरचा विश्वास होता. सैन्याची ‘ऑपरेशन कोजीत’ ही तिन्ही दलांसाठीची मोहीम माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि त्या माध्यमातून आम्ही हजार हजार बेड्सची हॉस्पिटल्स देशभर उभी केली. आमच्या मिलिटरी हॉस्पिटल्समध्येही या काळात भरपूर काम करण्याची संधी मिळाली.” कामातून मिळणारा आनंद जेव्हा बोलणार्‍याच्या चेहर्‍यावर उमटतो, तेव्हा त्यातून कामाप्रतीचा लगाव लक्षात येतो. डॉ. कानिटकरांच्या चेहर्‍यावर ते वाचता येत होतं.

 
याच कार्यकाळात नीती आयोगावर वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञ म्हणून, तसंच पंतप्रधानांच्या विज्ञान-तंत्रज्ञान सल्लागार समितीच्या सदस्य म्हणून झालेली नेमणूक म्हणजे त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अफाट अनुभवाचा केलेला सन्मानच आहे. एकाच वेळी अनेक जबाबदारीच्या पदावरून किती अर्थपूर्ण योगदान देता येतं, त्याचं जनरल कानिटकर या मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्याशी बोलताना मी हे कौतुकोद्गगार काढले, त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. त्या म्हणाल्या, “मल्टीटास्किंगची तर बाईला उपजत देणगी असते. आपण जेवढं काम करत राहतो ना, तेवढी आपली एफीशिएन्सी वाढते, असं मला वाटतं. शरीर हे मशीनसारखं असतं, जेवढं काम करेल तेवढं चालत राहील. ज्या दिवशी एका जागी बसलात त्या दिवशी ठप्प झालात, गंज लागला असं समजा.
एखाद्या उच्च पदावर, त्यातही अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून बाई असणं ही तर खूप सकारात्मक गोष्ट आहे. हा अ‍ॅसेट आहे, असं माझं मत आहे. मल्टीटास्किंगबरोबरच एखाद्या विषयात नेतृत्व करताना ती कधी फक्त मेंदूने विचार करत नाही, तिचं मन किंवा हृदय आणि मेंदू हातात हात घालून काम करत असतात. मुख्य म्हणजे, मेंदू कधी वापरायचा आणि कधी हृदयाला महत्त्व द्यायचं याचा बॅलन्स बाईला साधता येतो. मी अजिबात पुरुषविरोधी नाही. पण बाईची ही बलस्थानं मी निरीक्षणातून नोंदवलेली आहेत.” स्पष्टीकरणार्थ एक छोटं उदाहरण दिलं, “मी कुलगुरू म्हणून चार्ज घेतल्यावर विद्यापीठाच्या आवारातून पहिल्यांदा फेरफटका मारताना ड्यूटीवर असलेल्या गार्डस्ना विचारलं की, तुमच्यासाठी टॉयलेट्स कुठे आहेत? डबा खाण्यासाठीची सोय काय आहे? सांगायचं तात्पर्य, बाईचं मन आणि मेंदू या दिशेने काम करतो. म्हणूनच कोणत्याही कामात स्त्री-पुरुषांचा सारखाच आणि मन:पूर्वक सहभाग असेल तर त्या कामाचा दर्जा उंचावतो असं म्हणतात, त्यात नक्की तथ्य आहे. आपली बलस्थानं आहेत आणि कमतरताही. तशाच पुरुषांच्याही. त्यामुळे स्वत:ला कमी समजून मागे राहू नका असं मी सगळ्या बायकांना सांगते. त्याच वेळी जबाबदारी निभावण्यासाठी पुरुषासारखं बनायची धडपडही करू नका. बाई म्हणून आपलं सामर्थ्य ओळखा आणि कामात झोकून द्या.”
नीती आयोगातल्या त्यांच्या पहिल्या बैठकीची जी आठवण सांगितली, ती आपल्या पंतप्रधानांची व्हिजन आणि जनरल कानिटकर मॅडमच्या मूलभूत मांडणीचं दर्शन घडवणारी आहे. त्या म्हणाल्या, “नीती आयोगाची पहिलीच मीटिंग माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडली, हे विशेष. आमच्या मनात काय आहे, ते आधी त्यांनी जाणून घेतलं. लष्करातल्या जबाबदार्‍या पार पाडताना मला शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात काम करता आलं होतं. ती माझ्या विशेष आवडीची क्षेत्रं होती. नीती आयोगासाठी ते अनुभव उपयोगी पडले. मी एक डॉक्टर म्हणून हॉस्पिटलमध्ये, एक टीचर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये, एक सायंटिस्ट म्हणून लॅबोरेटरीत काम केलं आहे. आरोग्याचा विचार करता ही परस्परांशी निगडित क्षेत्रं आहेत. पण तसं होताना दिसत नाही. तेव्हा शिक्षण-सार्वजनिक आरोग्य-संशोधन यांच्यातले परस्परसंबंध हे त्रिकोणाचे तीन बिंदू असे न राहता, एका वर्तुळावरील बिंदू असे झाले तर त्याचा उपयोग होईल, हा मुद्दा मी माझ्या पंतप्रधानांसमोरच्या प्रेझेंटेशनमध्ये मांडला. त्यानंतर माझी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया बोर्ड ऑफ गव्हर्नर्सवर नियुक्ती झाली. यामुळे मला या क्षेत्रातल्या अनेक मोठ्या माणसांबरोबर काम करता आलं. त्यातून देशाची शिक्षणव्यवस्था बदलण्यासाठी अनेक सुधारणा सुचवल्या, त्याचा पाठपुरावाही केला. परीक्षा कशा घेतल्या जाव्यात यासाठी गाइडलाइन्स सुचवल्या.”
 
नीती आयोगाबरोबरच त्या Prime Minister's Science, Technology and Innovation Advisory Council (PM-STIAC) या समितीच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या मानद सल्लागार म्हणून काम करतात. या माध्यमातूनही खूप काही चालू असल्याची माहिती त्यांच्या बोलण्यातून मिळाली, “राष्ट्रीय भाषा मिशन हाती घेतलं जाणार आहे. मी यात आरोग्य क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून काही गोष्टी सुचवल्या. देशात अनेक भागात डॉक्टरांची भाषा पेशंटला आणि पेशंटची डॉक्टरांना नीट समजत नाही. त्यामुळे योग्य उपचारांमध्ये फार मोठा अडथळा येतो. तेव्हा वैद्यकीय विषयातल्या पारिभाषिक शब्दांसाठी विविध भाषांमधल्या पर्यायी शब्दांचा कोश किंवा सॉफ्टवेअर तयार करता येईल का, हा मुद्दा मांडला आहे. त्याचबरोबर, खूप हुशार मुलं मेडिकलला प्रवेश घेतात, पण इंग्लिशमुळे त्यांचे मार्क कमी होतात. इथे ट्रान्सलिटरेशनचा पर्याय वापरता येईल का, असा विचार मी मांडला आहे. त्याचबरोबर वयाशी सुसंगत अशा मानसिक स्वास्थ्यासाठी अ‍ॅप तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. यासाठी मोठी टीम बरोबर आहे. मन:स्वास्थ्य हे निरोगी शरीराचा पाया आहे, हे पोहोचवायचं आहे. हे STIACच्या माध्यमातून काम चालू आहे. नीती आयोग आणि STIAC असा एकत्रितपणे हाच कार्यक्रम सिटी क्लस्टर म्हणून करायचं ठरवलं आहे. सहा महानगरांमध्ये नॉलेज क्लस्टर होईल, जिथे प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था आणि उद्योग एकमेकांबरोबर एका सामाईक विषयावर काम करतील. इतक्या वर्षांच्या अनुभवांतून सुचलेल्या कल्पना, विचार मांडण्यासाठी हे प्लॅटफॉर्म खूप चांगले आहेत.
 
चौकटीबाहेरचे आणि काही अनुभवातून तयार झालेले विचार मांडायची संधी मला या कामांमधून मिळते आहे. सैन्यदलात काम केल्याने माझ्या व्यक्तिमत्त्वाचा जो सर्वांगीण विकास झाला, त्यात आत्ता देत असलेल्या योगदानाची बीजं आहेत. माझ्या लष्करी पार्श्वभूमीमुळे बुद्धीला, विचारांना शिस्त लागली. आमच्या युनिफॉर्ममुळे समाजात चांगला मान मिळाला. तुम्ही चांगल्या सोल्जर आहात की चांगल्या डॉक्टर? या प्रश्नाला माझं उत्तर आहे की, As I am a soldier, Im a good doctor and because of good doctor, am a better soldier.''
 

madhuri
 
सैन्यदलातला खडतर प्रवास कानिटकर दांपत्याने एकमेकांच्या साथीने सुंदर, अविस्मरणीय केला. एकमेकांना खूप समजून घेतल्याने आणि परस्परांच्या कामाविषयी आदरभाव बाळगल्याने, त्यासाठी आवश्यक त्या तडजोडी मन:पूर्वक केल्याने इथवरचा प्रवास वैशिष्ट्यपूर्ण झाला. याविषयी सांगताना जनरल कानिटकर म्हणाल्या, “तू एकटीने कसं मुलांना वाढवलंस असं जेव्हा राजीव काळजीयुक्त कौतुकाने म्हणायचे, तेव्हा माझ्याही मनात लगेच येत असे की यांनाही किती दिवस मुलांपासून, घरापासून दूर राहत एकट्याने दिवस काढावे लागले. तेव्हा सोपं दोघांसाठीही नव्हतंच. आणि त्याची आम्हांला जाण होती. त्यातून आमच्यातलं बाँडिंग मजबूत राहिलं. जेव्हा केव्हा मनाची चलबिचल अवस्था आली, तेव्हा एकमेकांना ठाम राहण्याचं बळ देत राहिलो. ते माझ्याआधी चार वर्षं निवृत्त झाले. तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की आता मी कोणत्याही नवीन कामात न गुंतता, तू असशील तिथे तुझ्याबरोबर तुझा सपोर्ट म्हणून राहणार.”
 
इतकं वैविध्यपूर्ण आणि रोमांचक अनुभवांनी भरलेलं आयुष्य जगल्यावर कोणालाही निवृत्तीनंतर शांत जीवन व्यतीत करावं असं वाटू शकतं. पण जनरल माधुरी कानिटकर यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची कुलगुरू म्हणून एक नवी जबाबदारी स्वीकारत त्यात पूर्वीच्याच उत्साहाने स्वत:ला झोकून दिलं. कसा हा निर्णय घेतला असेल याविषयी स्वाभाविक उत्सुकता होती. त्यावर त्या म्हणाल्या, “आधी म्हटलं तसं, कामं मला शोधत येतात. मी सैन्यातून निवृत्त व्हायच्या आधीच माझे शुभचिंतक या पदासाठी माझा विचार करत होते. मी राजीवना विचारल्यावर ते म्हणाले ‘पुन्हा नवीन काम म्हणजे डोकेदुखी होईल ना?’ मी म्हटलं, ‘उलट मी नीती आयोग, स्टिक माध्यमातून जे विचार मांडले, पॉलिसीमध्ये योगदान दिलं ते सगळं प्रत्यक्षात आणायची ही संधी आहे असं मला वाटतं. ते करावं असं वाटतंय,’ त्यावर ते म्हणाले, ‘मग तर तू नक्की कर. काम करत राहणं हेच तुझं टॉनिक आहे. आपण एकमेकांना चांगलेच ओळखतो. तू निवृत्तीचा काळ नुसतं बसून काढू शकणार नाहीस याची मला खात्री आहे.’
 
माझा हा निर्णय डळमळीत करू शकणारी एकच गोष्ट होती, ती म्हणजे माझा नऊ महिन्यांचा नातू. मुलाचा मुलगा. तो पुण्याला असतो. आता त्याच्याबरोबर राहावं असं एका क्षणी वाटलं. पण लगेच दुसर्‍या मनाने या कामासाठी कौल दिला. त्यामुळे आठवड्यातले पाच दिवस मी विद्यापीठाची कुलगुरू असते आणि दोन दिवस माझ्या नातवाची आजी.”
 
 
madhuri
 
काय असावं गुपित या सुखी, समाधानी, समर्पित आणि कार्यमग्न आयुष्याचं? आणि प्रसन्नतेचं रहस्य तरी काय असावं? या माझ्या निरोपाच्या प्रश्नांचं त्यांनी समाधान केलं, “सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी अतिशय उत्साही, हसतमुख असते याचं कारण... सकाळी उठलं की मी पहिला विचार करते, ‘एक नवा दिवस, एक नवं सरप्राइज आपल्यासमोर येत आहे. त्याचं स्वागत करू या. त्या आनंदात उठल्यानंतर तासभर वॉक, व्यायाम, मेडिटेशन करते. आणि झोपताना सरलेल्या दिवसानं जे काही छान दिलं त्याची मनात उजळणी करते. याची आता सवय झाली आहे.
 
आणि प्रसन्नतेबद्दल बोलायचं तर ती आतून आलेली आहे. माझ्या आयुष्यात नैराश्याचे क्षण आले नाहीत असं नाही. पण मी दु:खात चूर होऊन तिथेच उभी राहिले नाही. माझ्याकडे कायम कामाचा दुसरा पर्याय तयार असायचा. आणि त्यात मी तितक्याच मन:पूर्वक झोकून देऊ शकायचेे. माझ्या आनंदाचा, प्रसन्नतेचा कंट्रोल मी माझ्या हातात ठेवला. परिस्थितीला त्यावर स्वार होऊ दिलं नाही, कदाचित हेच रहस्य असावं... नाही का?” खळखळून हसत त्यांनी विचारलं. त्यांच्या या प्रश्नातच उत्तर होतं. प्रसन्न हसण्याला दाद द्यावी की अर्ध्या तासाच्या भेटीत त्यांनी जे दिलं त्याबद्दल कृतज्ञता मानावी, या विचारात मी तिथून बाहेर पडले.
 
 

अश्विनी मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.