समाजकारणाची नाडी गवसलेल्या डॉ. भारती पवार

विवेक मराठी    07-Mar-2022   
Total Views |
हातात असलेल्या एम.बी.बी.एस.सारख्या अतिशय मानाच्या पदवीमुळे संधीचे अनेक दरवाजे त्यांच्यासाठी खुले होते. तरी अशा सहज मिळू शकणार्‍या मानमरातबाकडे पाठ फिरवून त्या सक्रिय राजकारणात आल्या त्या या क्षेत्रात समाजसेवेची अधिक संधी आहे याचं दर्शन घडल्यामुळे. सासरे समाजकारणासाठी राजकारण करण्यात हयात वेचलेले. सतत माणसांच्या गर्दीत वेढलेले. त्यांना त्यांच्या कामात साहाय्य करता करता आपोआपच त्यांची राजकारणातली मुळाक्षरं गिरवली जात होती. डोळे, कान उघडे ठेवून हे शिक्षण चालू होतं. ते प्रत्यक्ष उपयोगात आणायची पहिली संधी मिळाली ती जिल्हा परिषदेची सदस्य म्हणून. आज हा प्रवास केंद्रीय राज्यमंत्री होण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. इथवर पोहोचायला लागलेला कालावधी केवळ एका दशकाचा असला, तरी यामागे कोणताही चमत्कार नाही.
 
59 वर्षांनी नाशिक जिल्ह्याला मिळालेला केंद्रीय मंत्रिपदाचा मान आणि प्रथमच या जिल्ह्यातील एका महिलेला मिळालेलं हे केंद्रीय मंत्रिपद म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची, त्यातून दिसलेल्या तळमळीची पोचपावती आहे. या आहेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार. या महिला दिन विशेष अंकासाठी त्यांच्याशी केलेली बातचीत.


bjp

हातात एम.बी.बी.एस.सारखी पदवी असताना, राजकारणाचं हे क्षेत्र करिअर म्हणून कसं निवडलंत? नेमका काय विचार होता?
लग्न होऊन या घरात येईपर्यंत कधी या क्षेत्राचा विचारही मनाला शिवला नव्हता. जेव्हा या घरात आले, तेव्हा माझे सासरे स्व. ए.टी. पवार यांच्या कामाची तळमळ, झपाटा पाहून मी खूपच प्रभावित झाले. समाजाची सेवा करण्यासाठीच मी वैद्यकीय अभ्यासक्रम निवडला होता. मात्र त्याहीपेक्षा राजकारणात सेवेच्या संधी कैक पटींनी आहेत, हे सासर्‍यांचं काम पाहताना लक्षात येत गेलं. अर्थात हे सगळं निरीक्षण मनाशी नोंदवत असताना माझा वैद्यकीय व्यवसाय आणि पुढच्या पदवीचा अभ्यासही चालू होता. त्याच वेळी देवळा तालुक्यातला उमराणी हा जिल्हा परिषदेचा गट महिलांसाठी आरक्षित झाला. तिथल्या लोकांनी दादासाहेबांचं - माझ्या सासर्‍यांचं काम पाहिलेलं असल्याने तिथे आमच्या घरातलीच महिला असावी, असा आग्रह धरला. मी तिथून उभी राहू शकते, असं दादासाहेबांनी म्हटल्यानंतर त्या भागातले लोक येऊन मला उभं राहण्यासाठी राजी करायला आले. तोपर्यंत शाळेतल्या दिवसात नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून जेवढी जिल्हा परिषद माहीत होती, तेवढीच. त्यामुळे मी त्यांना स्पष्ट शब्दांत नकार दिला. ‘दादासाहेबांची त्या भागात कामातून चांगली प्रतिमा तयार झालेली आहे. तुमच्या घराकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. आम्हालाही राजकारणात अनुभवी असलेल्या घरातला सुशिक्षित चेहरा हवा आहे. तेव्हा तुम्ही उमेदवारीचा अर्ज भरा, पुढची सगळी जबाबदारी आमची’ अशी गळ घातली. मग दादासाहेबांनीही आग्रह केला आणि मी राजकारणाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. इतकंच नव्हे, तर प्रचंड मतांनी विजयीही झाले.


women
 
त्या वेळी ग्रामीण भागातल्या लोकांनी महिलांसाठी आरक्षित जागेसाठी विचारपूर्वक एका सुशिक्षित महिलेचा आग्रह धरणं ही मी लोकशाही प्रगल्भ होत असल्याची खूण समजते. या पहिल्या विजयाने तुम्हाला काय दिलं?
 
 
निवडून आल्यानंतर मी या क्षेत्रासाठी आवश्यक अशा अभ्यासाला सुरुवात केली. माझ्या कार्यक्षेत्रात डोळे, कान उघडे ठेवून खूप फिरायला लागले. लोकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घ्यायला लागले. शासकीय कागदपत्रं वाचायला लागले. त्यातली भाषा समजून घ्यायला लागले. सदस्य म्हणून माझ्या कर्तव्य-अधिकाराची माहिती करून घेतली. जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या अधिकार्‍यांना भेटायला सुरुवात केली. त्यांचं काम समजून घ्यायला लागले. त्यातून माझा राजकारणातला रस वाढायला लागला. सुदैवाने तिथेही मला आरोग्य समितीत काम करायला मिळालं. त्यातून ग्रामीण आरोग्याचे प्रश्न समजले.


bjp
 
शिक्षणाची अशी सांगड घातली गेल्याने माझ्या अभ्यासविषयाशी मी कायमच जोडलेली राहिले आणि या क्षेत्रामुळे माझ्या कामाचं वर्तुळ विस्तारलं. ग्रामीण भागातल्या कुपोषणाचा अभ्यास केला, त्यावर उपाययोजनाही केली. त्यातून कुपोषित बालकांची संख्या कमी व्हायला मदत झाली. सातत्याने होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला. त्या प्रश्नाची तड लावली. सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली, तर त्याचे परिणाम होतात. आपण जागरूक राहून कामाचा पाठपुरावा केला, तर हाताखालच्या लोकांनाही काम करत राहायची सवय लागते. या सगळ्यातून माझ्यातल्या नवोदित राजकारणी स्त्रीला भरपूर शिकायची, समृद्ध व्हायची संधी मिळाली.
 
या पहिल्या टप्प्यावर दादासाहेबांचं लाभलेलं मार्गदर्शन...त्याविषयी..

 
दादासाहेब म्हणजे राजकारणातलं चालतंबोलतं विद्यापीठ होते. लोकांशी नम्रपणे कसं बोलावं, त्यांच्या तक्रारी शांतपणे आणि न कंटाळता कशा ऐकून घ्याव्यात, एखाद्या विषयाचा पाठपुरावा कसा करावा, संबंधित अधिकार्‍यांशी बोलून अंमलबजावणीतल्या अडचणी कशा समजून घ्याव्यात, त्यातून मार्ग कसा काढावा हे मी त्यांच्याकडूनच शिकले.
 
मात्र या वाटेवर फक्त दादासाहेबच मार्गदर्शक होते असं नाही. माझे यजमान प्रवीण पवार यांनीही वेळोवेळी माझ्या शंकांचं निरसन केलं. सहकार्य केलं. कामातल्या तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. जेव्हा राजकारणात नव्याने प्रवेश करणार्‍या महिलेला अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळतं, तेव्हा ती फक्त रबर स्टँप राहत नाही. तिची कार्यक्षमता वाढते. प्रत्यक्ष काम करताना अधिकार्‍यांकडूनही मी अनेक विषय, त्यातल्या समस्या समजून घेतल्या.
 
 
या क्षेत्राची वाट धरली आहे, तर त्यातली बलस्थानं, खाचाखोचा समजून घ्यायच्या असं मी ठरवलं होतं. या सगळ्यांच्या मन:पूर्वक सहकार्यामुळे ते साध्यही झालं.
 
तुम्हाला मिळालेल्या या सहकार्यावरून राजकारणातल्या स्त्रीची प्रतिमा हळूहळू बदलते आहे असं म्हणता येईल का?

 हो, निश्चितच. आरक्षणामुळे राजकारणात प्रवेश केलेली बाई आणि प्रत्यक्षात तिच्या मुखवट्याआडून राजकारण करणारी घरातली मंडळी चित्रपटात वा मालिकांमध्ये दाखवली जातात. त्यातून विनोदनिर्मिती होते आणि काही भागात ही वस्तुस्थिती असली, तरी आज राजकारणात प्रवेश करणार्‍या सर्वच महिला कठपुतळ्या नसतात, हे आता अनेक जणी आपल्या कामातून, कामाप्रतीच्या निष्ठेतून आणि शिकण्याच्या ऊर्मीतून दाखवून देत आहेत. बाईने जसं काळाच्या ओघात कठपुतळी होणं नाकारलं, तसा तिच्या आजूबाजूचा समाजही थोड्या धीम्या गतीने का होईना, बदलतो आहे असं वाटतं. आमच्यासारख्यांना घरातून आणि बाहेरून मिळणारा पाठिंबा, प्रोत्साहन हे त्या बदलाचं प्रतीक आहे.


bjp
 
“तुला समाजसेवेची आवड आहे, तर त्यासाठी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण हा चांगला पर्याय आहे” असं माझ्या यजमानांनी, सासर्‍यांनी मला सांगितलं. लोकविकासाची कामं या माध्यमातून मी अतिशय मनापासून करते आहे, हे दिसल्यावर त्यांनी पुन्हा दुसर्‍या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उभं राहायला प्रोत्साहन दिलं. माझ्यासारख्या नवोदिताला जेव्हा घरातूनच प्रोत्साहन, पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळतं, तेव्हा या मार्गावर काही भरीव काम करण्याचा उत्साह येतो. मुख्य म्हणजे, एक बाई म्हणून घरच्या आघाडीच्या बाबतीत निर्धास्त राहून कामात झोकून देता येतं.
 
सत्तेच्या राजकारणात, त्यातही मंत्रिपदावर काम करणारी एक स्त्री असली, तरी तिच्यामागे एक सपोर्ट सिस्टिम काम करत असते. त्यात जशी घरची माणसं येतात, तसेच वेळोवेळी मदत करणारे प्रशासकीय अधिकारी असतात, पक्षातले आणि मंत्रीमंडळातले वरिष्ठ मार्गदर्शक असतात. पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी यांच्यासारख्या नेत्यांचं वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन विचारांना आणि कामाला दिशा देतं. महिला सक्षमीकरण हे नुसतं भाषणापुरतं नसून ते प्रत्यक्षात उतरायला हवं असं आमच्या वरिष्ठांना वाटतं, हे ते देत असलेल्या पाठिंब्यातून स्पष्ट होतं. हे एक प्रकारचं टीमवर्कच आहे आणि हातून उत्तम काम होण्यासाठी त्या टीममधल्या प्रत्येकाचं स्थान महत्त्वाचं आहे, याचं भान ठेवलं पाहिजे आणि त्याविषयी ऋणीही असलं पाहिजे.
 
 
जिल्हा परिषदेपासून जेव्हा सक्रिय राजकारणात वाटचाल सुरू होते, ‘तेव्हा ग्राउंड लेव्हल’चा अनुभव जमा होतो. लोकांचं दैनंदिन जीवन, त्यातले प्रश्न जाणून घेण्याची आणि त्यावरचे उपाय शोधण्याची संधी असते. पुढच्या वाटचालीसाठी झालेलं ते मजबूत फाउंडेशनच असतं. जिल्हा परिषद ते खासदार ते केंद्रीय मंत्री असा तुमचा आतापर्यंतचा प्रवास झाला. या प्रवासात तुमच्या स्वत:कडून काय अपेक्षा होत्या?
 
हा प्रवास माझ्यासाठी राजकीय शिक्षणाची पाठशाळाच ठरली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांशी जोडलेले होते. तिथे अनुभव भरपूर मिळाला, तरी कार्यक्षेत्र मर्यादित होतं. एका जिल्ह्याशी बांधिलकी होती. तिथून जेव्हा खासदार म्हणून निवडून जाऊन मी लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात प्रवेश केला, तेव्हा कामाचा आवाका वाढल्याची, तसंच त्यातून वाढलेल्या जबाबदारीची जाणीव झाली. जिल्हा परिषदेत काम करताना माझ्या कार्यक्षेत्रात 1300 गावं होती आणि खासदार झाल्यानंतर माझं कार्यक्षेत्र 13000 गावांपर्यंत विस्तारलं. या सभागृहाचे नियम, तिथली आचारसंहिता जाणून घेत स्वत:ला मोल्ड करणं गरजेचं असतं. प्रश्नोत्तराच्या तासाला आपल्या वाट्याला आलेल्या अतिशय मोजक्या वेळेत आपला प्रश्न सभागृहापुढे ठेवणं आणि त्यानंतर खासदार या नात्याने त्याचा पाठपुरावा करणं महत्त्वाचं असतं. मंत्री म्हणून जबाबदारी सोपवल्यावर तर आपल्या खात्याच्या संदर्भात पूर्ण देशाचा अभ्यास करणं अपेक्षित असतं. यासाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून झालेला अभ्यास, अनुभव कामी आला. एखादी योजना अमुक एका ठिकाणी यशस्वी होऊ शकते की नाही, हा विचार आपोआप होत गेला तो या पूर्वानुभवामुळे.


bjp
 
जशी टप्प्याटप्प्याने जबाबदारीत वाढ झाली, तशी माझ्यातली राजकारणी प्रगल्भ होत गेली. कामाचा आवाका वाढला, तसा उरकही वाढत गेला. आत्मविश्वासात वाढ झाली. आपल्या कामाशी चोवीस तासांची बांधिलकी म्हणजे काय, हे या जबाबदार्‍यांनी मला शिकवलं. या जबाबदार्‍या सोपवण्यासाठी माझ्या वरिष्ठांनी मला योग्य समजलं, यात माझा गौरव आहे असं मला वाटतं. या वरिष्ठांची मी ऋणी आहे.
 
 
वरिष्ठांनी जबाबदारी सोपवली हा तुमचा गौरव तर आहेच, पण त्यांच्याबरोबर काम करताना तुमच्या मनाने त्यांच्याविषयी काय नोंद घेतली, ते समजून घ्यायला आवडेल.
 
काम हे रिझल्ट ओरिएंटेड असावं याचा आग्रह धरणारे, त्यासाठी मार्गदर्शन करणारे आमचे वरिष्ठ नेते आहेत. लोकांच्या सत्ताधार्‍यांकडून ज्या अपेक्षा आहेत, त्यांची पूर्ती करण्यासाठीच सरकारने लोककल्याणाच्या निरनिराळ्या योजना आणल्या आहेत. त्या समजून घ्या आणि आपापल्या भागात त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सजग राहा, असं सांगण्यात आलं आणि त्याचं वेळोवेळी मूल्यमापनही होत राहिलंं. त्यामुळे आपल्यातली कामाची प्रेरणा कमी होत नाही, असं मला वाटतं.
 
 
तुमच्या खासदारकीचा कालखंड सुरू झाला आणि अवघ्या सहा महिन्यांतच कोरोना नावाच्या झंझावाताने जगाला वेढलं. त्या वेळी अन्य कोणताही पर्याय नसल्याने सर्वसामान्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेतलं. पण सत्ताधार्‍यांंसाठी ती सत्त्वपरीक्षा होती. समाजहितासाठी तुम्ही काही करावं ही स्वाभाविक अपेक्षा होती. या आव्हानात्मक परिस्थितीत तुम्ही खासदार म्हणून तुमच्या मतदारसंघासाठी काय पावलं उचललीत?
 
 
माझा मतदारसंघ खूप मोठा आहे. त्यात 10 तालुके येतात आणि 6 विधानसभा मतदारसंघ येतात. तेव्हा निवडून आल्यावर सर्वात आधी मी प्रत्येक तालुक्याचा प्रवास केला. तिथल्या समस्या, मागण्या समजून घेतल्या. तिथली पाणीपुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजनेची स्थिती असा सगळा आढावा घेतला. वंचितांना घर मिळावं या हेतून मा. पंतप्रधानांनी आणलेली ही योजना आहे. माझ्या कार्यक्षेत्रात तिची अंमलबजावणी कशी होते आहे, याचा अभ्यास केला. माझ्या कार्यक्षेत्रात सुमारे 70 हजार गरजू कुटुंबांना डोक्यावर छप्पर मिळालं. मातृत्व अनुदान योजनेच्या माध्यमातून महिलांना दिला जाणारा निधी गरजू महिलेपर्यंत पोहोचतो आहे की नाही, याचाही पाठपुरावा केला. स्तनदा मातांच्या आरोग्यरक्षणासाठी ज्या तपासण्या सांगितल्या आहेत त्या केल्या जाताहेत की नाही, औषधांचा पुरवठा वेळेवर होतो आहे की नाही हे पाहिलं.
 
 
नंतर कोविड काळात सरकारने जी पॅकेजेस जाहीर केली, त्याचाही पाठपुरावा करणं, आढावे घेणं हे मी सातत्याने करत होते. लोकांना रेशनचा पुरवठा होतो आहे का, याकडे जातीने लक्ष पुरवलं. त्या वेळी आमच्या भागात रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला होता. त्यासाठी मुंबईतल्या संबंधित यंत्रणांच्या संपर्कात राहून पाठपुरावा केला. नाशिकसाठी आलेले व्हेंटिलेटर्स उपयोगात आणले गेले का, याकडे लक्ष ठेवलं. ते आवश्यक तिथे पोहोचतील असं पाहणं हाही कामाचा भाग होता. कोविड पेशंटना तातडीने आणि आवश्यक ते उपचार मिळण्यासाठी धावपळ करावी लागली. कधीकधी केंद्र सरकारकडून राज्याला त्वरित मदत मिळते. पण राज्यांकडून ती खालपर्यंत झिरपायला वेळ लागतो. अशा वेळेस राज्य सरकारशी संपर्क ठेवून ती मदत वेळेत गरजूंपर्यंत पोहोचेल हे पाहावं लागतं. आपल्या मतदारसंघातले लोक रोजीरोटीसाठी अन्य राज्यांत असतील तर तिथल्या खासदारांच्या संपर्कात राहणं आणि याच्या अगदी उलट, परराज्याचे लोक जिथून आमच्या भागात आले असतील त्यांना तत्काळ मदत मिळेल असं पाहणं, अशी आमच्याकडून अपेक्षित अशी आणि अनपेक्षित पण अत्यावश्यक अशी कामं या काळात झाली.
 

bjp
 
एक आठवण आवर्जून सांगण्यासारखी... कोविडच्या काळात द्राक्षाच्या गाड्या अन्य राज्यांच्या सीमेवर अडवल्या जात होत्या. कोविडच्या नावाखाली त्यांना प्रवेश मिळत नव्हता. तेव्हा ‘नाशवंत पदार्थाची वाहतूक करणार्‍या गाड्यांना अडवता येणार नाही’ असं केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीत स्पष्ट नमूद केलं होतं, त्याच्या आधारे या गाड्यांची होणारी अडवणूक थांबवली. यासाठी एक यंत्रणाच तयार केली. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांचं आणखी नुकसान टळलं, याचं समाधान मिळालं.

 
थोडक्यात, केंद्र सरकारकडून विविध योजनांच्या वा उपक्रमांच्या माध्यमातून जे जाहीर होतं, ते माझ्या मतदारसंघात पोहोचतं की नाही हे पाहणं, पोहोचत नसल्यास त्यासाठी तातडीने पावलं उचलणं आणि आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेत कामाची आखणी करणं हे खासदारकीच्या पहिल्या दोन वर्षांत काम झालं. या आपत्तीमुळे वैविध्यपूर्ण कामाची आणि खूप शिकण्याची संधी दिली.
 
 
नाशिकचा पट्टा हा समृद्ध पट्टा म्हणून ओळखला जातो. इथल्या शेतकर्‍यांच्या भल्यासाठीही तुम्ही चांगलं काम केल्याचं ऐकलं आहे, त्याबद्दल थोडं...
 
 
किसान रेलच्या माध्यमातून कृषिसेवा करण्याचं जे मोठं पाऊल माननीय पंतप्रधानांनी उचललं, त्याचा या भागाला खूप फायदा झाला. या रेलमधून आमच्याकडचा कांदा, भाजीपाला, द्राक्षं परराज्यात जाऊ शकली. या किसान रेलच्या फेर्‍या वाढवून मिळण्यासाठी मी पाठपुरावा केला आणि त्या वाढवूनही मिळाल्या. त्याचबरोबर गेल्या वर्षी जेव्हा कांदा निर्यात बंद होती, तेव्हा तत्कालीन मंत्री मा. पियूषजी गोयल यांच्याशी चर्चा करून कांद्याची निर्यात खुली केली. त्याला योग्य तो भावही मिळाला. मी स्वत: कृषिकन्या असल्याने आणि लहानपणी शेतीत थोडंफार काम केलेलं असल्याने, त्यांंचे प्रश्न, काळज्या परिचयाच्या होत्या. त्यामुळे वेळोवेळी शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेता आले, याचं समाधान आहे.
 
मका खरेदीसाठी केंद्र सरकारने उद्दिष्ट ठरवून दिलं होतं, पण ते मर्यादित कालावधीत पूर्ण करायचं होतं. त्या वेळी मा. रावसाहेब दानवेजींनी खूप मदत केली. उद्दिष्टासाठी वेळ आणि टार्गेट दोन्ही वाढवून दिलं.
 
 
अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधितही काही प्रोजेक्ट आता चालू आहेत. येणार्‍या काळात कोणाची इच्छा असेल त्यांना या योजनेत सहभागी होता येईल. त्यासाठी इच्छुकांना मार्गदर्शनही उपलब्ध आहे. मधुमक्षिकापालनाच्या व्यवसाय प्रशिक्षणाचा अलीकडेच एक कार्यक्रम घेतला. मधुमक्षिकापालन करणार्‍यांनी एकत्र येऊन क्लस्टर बेसवर काम केलं, तर त्यातून सर्वांचा आर्थिक फायदा होईल हा विचार त्यामागे आहे. एकाच ठिकाणी मध गोळा करून त्याचं मार्केटिंग करता येईल का, यावर सध्या विचार चालू आहे. अशा अभिनव संकल्पनांमुळे आणि या संदर्भात केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे शेतकर्‍यांचा खूप फायदा होतो. मधुमक्षिकापालनासारखा जोड व्यवसाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते, हा विश्वास या माध्यमातून देता आला.


bjp
 
कारकिर्दीतला यानंतरचा टप्पा म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रिपदाचा लाभ. तोही तुमच्या मूळ अभ्यासविषयाशी संबंधित. ते जाहीर झालं, तेव्हा खासदारकीच्या पहिल्या टप्प्यात केलेल्या कामाचं हे प्रशस्तिपत्र आहे असं आम्हांला वाटलं. तुमची प्रतिक्रिया काय होती?
 
मी केलेल्या कामाचं माझ्या मतदारसंघाने केलेलं मूल्यमापन, त्यांनी दिलेले आशीर्वाद, केंद्रातल्या तसंच राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन आणि आशीर्वाद याचं हे फळ आहे असं मला वाटतं. मा. नरेंद्रजी मोदी, मा. अमितभाई, मा. नितीनजी गडकरी, मा. देवेंद्रजी आणि अनेक ज्येष्ठ नेते यांचं माझ्या कामाकडे लक्ष आहे असा मला याचा अर्थ वाटतो. माझ्या पक्षाने, नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास म्हणजे हे मंत्रिपद आहे. तो सार्थ ठरवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.

 
खासदार म्हणून आपल्या मतदारसंघाचा आणि मंत्री म्हणून पूर्ण देशाचा विचार करत, त्यानुसार कामाची आखणी, वेळेचं नियोजन करत तुमची वाटचाल सुरू आहे. मंत्रिपदी येऊन काही महिनेच झाले असले, तरी ते अनुभव समजून घ्यायला आवडतील.

प्रत्यक्ष मीटिंगमध्ये एखादी नवी योजना समजावून सांगताना, माननीय पंतप्रधान तिची खासियत तर सांगतातच, त्याचबरोबर आपापल्या मतदारसंघात ती कशी राबवता येईल याबाबत मार्गदर्शन करतात. या सगळ्याचा उपयोग काम करताना होतो. त्यातूनच कामाचा उत्साह आणि ऊर्मी टिकून राहते. केवळ मंत्रिपदच नाही, तर हा खासदारकीचा कार्यकाळ म्हणजे कोविडसारख्या आपत्तीत देशसेवेची मिळालेली संधी आहे, असं मी समजते.
 
जेव्हा मी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला, त्यानंतर त्याचा व्याप किती प्रचंड आहे याची जाणीव झाली. या कामाला खूप आयाम आहेत आणि यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या निधीची तरतूद केलेली असते, तिचा योग्य आणि प्रभावी विनियोग करणं हे माझं काम आहे. सध्या कोविडवर जास्त लक्ष केंद्रित झालेलं असलं, तरी टी.बी. निर्मूलन, मलेरिया निर्मूलन यासारख्या खूप व्यापक आणि गरजेच्या मोहिमाही चालू आहेत. कारण कोविडवर नियंत्रण ठेवताना अन्य आजारांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही, याचं भान आम्हांला आहे आणि त्यानुसार कामाची आखणी केली जाते.
 

bjp
 
तुमची एकूण व्यग्रता पाहिली की वाटतं... आमच्याप्रमाणे दिवसाचे चोवीस तासच तुमच्या खात्यात जमा होतात. पण तो वेळ तुम्ही किती काटेकोरपणे वापरता! बाई मुळातच मल्टीटास्कर असली, तरी घराप्रमाणे मंत्रिपद हेदेखील सतत वेळ देण्याचं क्षेत्र. कसं जमवता हे? घरातल्या ज्येष्ठांचं प्रोत्साहन, पाठिंबा मान्य... मुलं कसं समजून घेतात कामात मग्न असलेल्या आपल्या आईला?
 
स्त्रिया जेव्हा राजकारणात येतात, तेव्हा घरच्यांचा विनाअट पाठिंबा त्यांना कामासाठी बळ देतो. यजमान, सासू-सासरे, आई यांच्या पाठिंब्यामुळे तर मी इतकं काम करू शकते आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलांच्या समंजस दृष्टीकोनामुळे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर, “मुझे बहोत प्राउड फील हो रहा है। आप मोदी जी के टीम में हो।” सहाव्या इयत्तेत शिकणार्‍या माझ्या मुलाचे हे उत्स्फूर्त उद्गार माझ्यातल्या आईला निश्चिंत करतात. तिला कोणत्याही गंडापासून लांब ठेवतात. मोदीजी काय कामं करताहेत हे माझ्या मुलांना माहीत आहे आणि मी खासदार म्हणून, मंत्री म्हणून देशासाठी काम करते आहे याची जाणीव आहे. अभिमान आहे. देशाच्या सेवेत तू कुठे कमी पडू नको, संविधानाचा गैरवापर करू नको... असं मुलं जेव्हा मला सांगतात, तेव्हा त्यांनी माझं राजकारणात असणं किती गांभीर्याने घेतलं आहे हे लक्षात येतं. मी आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर मी काय करायला हवं, हेदेखील ते दोघं माझ्याशी बोलले. आई म्हणून माझ्यासाठी तो एक आनंदाचा क्षण होता.
 
 
कामानिमित्त मी बराच काळ घरापासून दूर राहत असले, तरी मी व्हिडिओ कॉलमुळे त्यांच्या संपर्कात असते. त्यांची ख्यालीखुशाली जाणू शकते. मात्र अधिवेशन काळात दोन दोन दिवस माझा फोनवरूनही संपर्क होत नाही. पण ते दोघं मला समजून घेतात. अशा वेळी यजमानांना मुलांची आई होऊन समजून घ्यावं लागतं. ते ही भूमिकाही छान निभावतात.

 
बाहेर महत्त्वाच्या पदावर काम करणार्‍या कोणत्याही स्त्रीसाठी घरच्या आघाडीवर असं वातावरण गरजेचं असतं, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं.
 
 
समाजाचा अर्धा हिस्सा असूनही सत्तेच्या राजकारणात आजही महिलांचं ठळक प्रतिनिधित्व नाही. ते असायला हवं. स्त्रियांचीही तशी मानसिकता तयार व्हायला हवी आणि समाजाचीही. यासाठी काय करता येईल?
 
 
तशी मानसिकता समाजाची हवी, खुद्द महिलांची हवी आणि राजकीय पक्षांचीही. तुम्ही संसदेतील स्त्रियांची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की महिलांना सत्तेत सहभागी होण्याची सगळ्यात जास्त संधी भाजपाने दिली आहे. त्यातही शिक्षित, काही करू पाहणार्‍या स्त्रियांना सामावून घेतलं आहे. यामागे आमच्या नेतृत्वाची व्हिजन आहे.
 
 
ज्यांना सत्तेच्या राजकारणातून समाजासाठी काम करायचं आहे, त्यांच्यासाठी हे क्षेत्र खूप मोठं आहे. आपल्या क्षमता जोखण्याच्या आणि विकसित करण्याच्या इथे प्रचंड संधी आहेत. स्त्रियांचा सत्तेतला सहभाग तिला देशाला योगदान देण्यासाठीच्या अनेक वाटा खुल्या करतो, तसंच त्यांच्या प्रतिनिधी सत्तेत केंद्रस्थानी आल्या तर अनेक प्रश्नांची सोडवणूक व्हायला मदत होते. त्यामुळे शिक्षित-उच्चशिक्षित महिलांनी जरूर या राजकारणात येण्याचा विचार करावा.
 
 
आपण प्रामाणिकपणे, तळमळीने काम करत राहिलो तर त्यातून काही चांगलं निष्पन्न होतं, असा माझा विश्वास आहे. तो आतापर्यंतच्या अनुभवातून कमावलेला आहे. आपण जर सद्भावनेने काम केलं, तर सहकार्‍यांच्या/ज्येष्ठांच्या ते लक्षात येतं. अशा वेळी ते नुसतं कौतुक करत नाहीत, तर गरज असेल तिथे मार्गदर्शन करतात, मदतीचा हात देतात आणि नवी जबाबदारीही विश्वासाने सोपवतात. पॉलिसी मेकिंगमध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं जातं ते म्हणूनच.
तेव्हा करिअर म्हणून महिलांनी या क्षेत्राचा जरूर विचार करावा. समाजाच्या उपयोगी पडण्याचं हे एक मोठं आणि प्रभावी साधन आहे यात शंकाच नाही.

अश्विनी मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.